Wednesday, December 31, 2008

आपत्तींचा उत्तररंग

अनेक वर्षांपूर्वी देशाच्या दोन दिशांना, अस्वस्थ पंजाबात आणि धगधगत्या आसामात दाटलेले अंतर्गत दहशतवादाचे सावट दूर होत असतानाच आंतरराष्ट्रीय दहशतवादाने भारतात घर केले. पंजाबातील "ऑपरेशन ब्लू स्टार'नंतरची पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हापासून दहशतवादाच्या अमानवी सावलीने देश काळवंडत गेला. नंतरच्या गेल्या सुमारे पंचवीस वर्षांत देशात दहशतवादी कारवायांनी धुमाकूळ घातला आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दहशतवादी कारवायांची लक्ष्य बनली. 1992-93 च्या जातीय दंगली आणि नंतरच्या बॉम्बस्फोटांमुळे मुंबईचा चेहरा आणि मानसिकता यांमध्ये एक संथ बदल होत चालला आहे. दहशतवादाची चाहूल लागताच चिडीचूप होणारी दहापंधरा वर्षांपूर्वीची मुंबई आज दहशतवादी कारवाया पाहण्यासाठी उत्सुकतेने रस्त्यावर उतरून अलोट गर्दी करते...
शेकडो बळी घेणाऱ्या जातीय दंगली आणि बॉम्बस्फोटासारख्या मानवनिर्मिती आपत्तींपाठोपाठ महापूर, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींचे गंडांतर गेल्या काही वर्षांत मुंबईने झेलले. या आपत्तींनी मुंबईच्या समाजमनाच्या एखाद्या कोपऱ्यात माणुसकीचे अनोखे दर्शनदेखील घडले, पण या घटनांचा मुंबईच्या मानसिक आरोग्यावर एक परिणाम नकळतपणे होत गेल्याचे अनेक सामान्यांनाही वाटते. नैसर्गिक आपत्तींनंतर रोगराई, साथीचे आजार फैलावतात, आणि त्या आपत्तींमधून बचावलेले असंख्य जीव नंतर त्यांचे बळी ठरतात. निर्घृणपणे शेकडो बळी घेणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींनंतर सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मात्र अशा दृष्टिकोनातून फारसा विचार केला जात नाही. 1993 मधील भीषण बॉम्बस्फोट मालिकांनंतर लगेचच मुंबईचे जनजीवन पूर्ववत झाल्याचे अभिमानाने सांगितले जात होते. कठीण प्रसंगातही न डगमगण्याच्या वृत्तीमुळेच मुंबई सावरली आणि पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागली, असे सांगितले जात असले, तरी सामाजिक अभ्यासकांना मात्र हा मुंबईकरांच्या मानसिकतेमधील हा बदल अस्वस्थ करीत होता. नैसर्गिक आपत्तींनंतर येणाऱ्या साथीच्या आजारांप्रमाणेच, मानवनिर्मित आपत्तींतून बचावल्यानंतर "आपण वाचलो' या भावनेच्या पगड्यामुळे सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीच ही चाहूल असू शकते, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली होती. नोव्हेंबरातल्या दहशतवाद्यांच्या धुमाकुळाच्या दोन दिवसांतील घटनाक्रमानंतरची मानसिकता पाहता, ही भीती खरी ठरते आहे का?
मुंबईत दहशतवाद्यांनी धुमाकूळ सुरू केला आणि मुंबईचे जनजीवन खिळखिळे झाले. देशात यापूर्वी कधीही, कोठेही दहशतवाद्यांनी एवढा भीषण हल्ला चढविलेला नाही. काश्‍मीर खोऱ्यातील सततच्या पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांमुळे तेथील जनजीवन विकलांग झाले. हतबलतेच्या भावनेने पछाडलेल्या समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ राहू शकत नाही. भीतीच्या सावटाखाली वावरणारा समाज उभारी धरू शकत नाही आणि मानसिक शक्ती हरवलेल्या समाजाला वेठीस धरणे सोपे होते, हा दहशतवादी कारवायांमागील गेल्या चार दशकांचा सिद्धांत आहे. मुंबईतदेखील, दहशतवादी कारवायांमधून याचाच प्रयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असावा. दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईकर जनता तत्परतेने संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येते. रक्तदानासाठी रांगा लागतात,जखमींना इस्पितळांमध्ये नेण्यासाठी अनेक हात पुढे होतात. सामाजिक संवेदना जाग्या करणारा हा एक पैलू जिवंत असला, तरी संकटाची सावली दूर होताच संशयाचे वातावरण पसरते आणि प्रत्येकजण स्वतःला एकटा समजू लागतो. समोरच्या प्रत्येकाविषयी संशयाचे भूत मनावर स्वार होते आणि आपुलकीची भावना थंडावत जाते. याचा अनुभव गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी घेतला आहे. समोरच्या कोणत्याही व्यक्तीवर लगेचच विश्‍वास ठेवायचा नाही, हा मुंबईच्या स्वभावाचा अगोदरपासूनचा व्यावहारिक स्थायीभाव मानला जातो. व्यापारी शहर असलेल्या मुंबईची सामाजिक मानसिकतादेखील "बनिया' वृत्तीकडेच झुकणारी असल्याचे बोलले जाते. दहशतवादी कारवायांमध्ये पोळल्यामुळे मुंबईकरांच्या या मूळच्या मानसिकतेत संशयी वृत्तीची भर पडत गेली. समोरच्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवायचा नाही, आणि ठेवला तर कदाचित फसविलेच जाऊ, असा विचारदेखील मुंबईत जागोजागी रुजलेला दिसतो. घड्याळाच्या काट्यामागे धावताना होणारी दमछाक आणि त्यात या भावनेची भर, त्यामुळेच, "मला काय त्याचे' ही वृत्तीदेखील वाढत असल्याचे दिसते.
मुळात, मुंबई हे गतिमान शहर आहे. इथे प्रत्येक व्यक्ती ही पोटापाण्यासाठी वेळेशी स्पर्धा करीत धावताना दिसते. त्यासाठी करावी लागणाऱ्या कष्टांमुळे प्रत्येकाच्या मानसिकतेला आत्मकेंद्रित प्रवृत्तीचाही पदर तयार झाला आहे. बहुसंख्य मुंबईकरांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पायपीट करण्यासाठी दिवसाचा वेळदेखील कमी पडत असल्यामुळे हे शहर झोपी जात नाही, हे वास्तव आहे, आणि ते खरे तर चटका देणारे आहे. मात्र, या वास्तवाच्या दाहकतेऐवजी तो मुंबईचा एक अभिमानास्पद गुण असल्याचे सांगत "न झोपणारे शहर' किंवा "गतिमान शहर' अशी बिरूदे मुंबईला लावली जातात. "सूज' आणि "गुटगुटीत आरोग्य' यांतील फरक वेळीच न ओळखता आल्यास कालांतराने दुष्परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. मुंबईच्या बाबतीत नेमकी तीच परिस्थिती आजवर अस्तित्वात होती. मुंबईचे अभिमानास्पद पैलू म्हणून ज्याकडे बोटे दाखविली गेली, त्यामागील सामाजिक मानसिकतेचा विचार करण्याची नेमकी गरज आता निर्माण झाली आहे. 1993 च्या दहशतवादी हल्ल्यांनी अनेक धडे मिळाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मुंबईने अनेक आपत्ती झेलल्या. त्या प्रत्येक आपत्तीतूनही अनेक धडे मिळाले. पण त्यातून शिकावयास काय मिळाले, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे. म्हणूनच, काही दिवसांपुरत्या सावधानतेनंतर पुन्हा एक शिथिलता पसरते, आणि गतिमान मुंबई मानसिकदृष्ट्या शिथिल होते. मुंबईत जागोजागी दिसणाऱ्या कडेकोट सुरक्षेच्या चौकटी सहजपणे भेदता येतील, इतक्‍या तकलादू असल्याचा धडा या नव्या संकटाने मिळाला आहे. आजवरच्या अनेक संकटांमुळे अशा संकटांचा आता सरावच झाला आहे, अशी मानसिकता त्या दोनतीन दिवसांतील सामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झाली. दहशतवादी कारवाया पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मुंबईच्या सामाजिक आरोग्यातील हे सूक्ष्म बदल व्यक्तिगतरीत्या प्रत्येक मुंबईकरास अस्वस्थदेखील करतात. "मॉब सायकॉलॉजी', म्हणजेच सामाजिक मानसिकतेपुढे व्यक्तिगत मानसिकता नेहमीच पराभूत होत असते. त्यामुळे अशी व्यक्तिगत अस्वस्थता हे बदल थोपवू शकणार नाही. सामाजिक आरोग्यात होणारा बदल हा "गुटगुटीतपणा', की "सूज' याचा विचार करून योग्य वेळी सामाजिक स्तरांवर योग्य उपचार झाले नाहीत, तर आज कुठेकुठे दिसणारे संवेदनशील कोपरे उद्या गुळगुळीत होतील, याची जाणीव जबाबदारांनी ठेवावयास हवी.