Thursday, July 28, 2011

गुरू बोले तो..

मास्तर घराबाहेर पडले आणि शाळेच्या वाटेवरल्या गणपतीच्या देवळात जाऊन बसले. इथे आल्यावर मास्तरांचं मन टवटवीत होऊन जायचं. गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहताना मास्तरांची तंद्री लागायची. मन विचारात गुरफटून जायचं. आपण परमनंट झालोय, आणि कंत्राटी ’शिक्षणसेवका’ऐवजी ’फुलटाईम’ मास्तर झालोय, असं त्यांना दिसायचं.. ते बाहेर पडायचे. चपला अडकवून शाळेचा रस्ता धरायचे.. या गावात नेमणूक झाल्यापासून मास्तरांचा तो नेमच झाला होता. ‘गाव लई इरसाल हाये’, असं त्यांना अगोदरच जाणकार मास्तरांनी सांगून ठेवलं होतं. गावाचं इरसालपण त्यांना शाळेतच लक्षात आलं होतं. शिस्तीत वागणारं, एक पोरगं वर्गात दिसत नव्हतं. शिस्तीसाठी काय करावं, या विचारानं मास्तरांचं मस्तक पोखरून जायचं. मुलांना निबंध लिहायला सांग, कुठे चित्र काढून आणायला सांग, एखादं रोपटं रुजवून ते वाढवायची सवय लाव, असले वेगवेगळे प्रयोग मास्तर शाळेत करत होते पण त्यातूनही काही निष्पन्न व्हायचंच नाही. मग मास्तर स्वत:वरच वैतागायचे. पण, आपण ‘शिक्षणसेवक’ आहोत, याचं भानही लगेच यायचं.. त्या दिवशीही असाच विचार करताना, गुरुपौर्णिमा जवळ आलीय, हे त्यांना आठवलं, आणि मुलांना ’गुरू’वर निबंध लिहून आणायला सांगायचं ठरवून ते शाळेत पोहोचले. पोरांचा गलका सुरूच होता. मास्तरांनी फळ्यावर दोनतीन गणितं लिहिली, आणि स्वत:शीच मोठय़ानं बोलत ती सोडवली.. मग व्याकरणाचं पुस्तक काढलं, आणि स्वत:शीच मोठय़ानं वाचलं. एक कविताही मोठय़ानं घोकली.. विज्ञानाचा एक पाठही मोठय़ानं वाचून झाला.. मग त्यांनी टेबलावर जोरात छडी आपटली. पण मास्तर आपल्याला छडीनं मारू शकत नाहीत, हे माहीत असल्यानं पोरांनी तिकडे लक्षच दिलं नाही.. संध्याकाळ झाली. पोरांचा गलका आता वाढला होता.. मास्तरांनी जिवाच्या आकांतानं ओरडून पोरांना गप्प केलं, आणि निबंधाचा गृहपाठ पोरांना सांगितला.. ’शनिवारी निबंध तयार पाहिजेत ’.. मास्तर ओरडले, तोवर पोरं पाठीला दप्तर अडकवून पळत सुटली होती. मास्तरांनी स्वत:ला सावरलं. आपण शिक्षणसेवक आहोत असं बजावत तेही बाहेर पडले. शनिवार आला. मास्तरांनी पोरांना निबंधाबद्दल विचारलं, आणि काही पोरांनी पटापट दप्तरातून वह्य़ा काढून मास्तरांच्या हातात दिल्या. मास्तरांनी डोळे मिटून गणपतीला मनातल्या मनात नमस्कार केला. वह्य़ा पिशवीत नीट ठेवल्या. घरी जाऊन निवांतपणे सगळे निबंध वाचायचे असं त्यांनी ठरवलं.. अध्र्या दिवसानं शाळा सुटली, तेव्हा मास्तरांनी जाताजाता पुन्हा देवळात जाऊन गणपतीच्या पायावर डोकं ठेवलं. गणपती मिस्किल हसतोय असा भास मास्तरांना झाला. आपण ’शिक्षणसेवक’ आहोत, याचा त्यांना अभिमान वाटला. ते घरी आले. . आज रविवार असल्यानं मास्तर निवांत उठले. चहापाणी झालं आणि मास्तरांनी पिशवीतल्या निबंधाच्या वह्य़ा बाहेर काढल्या. आजच गुरुपौर्णिमा आहे, हे त्यांना माहीत होतं. आपणही मास्तर, म्हणजे ’गुरू’ आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला. क्षणभरानंतर, आपण ‘शिक्षणसेवक’ आहोत, हेही आठवलं, आणि मास्तर हिरमुसले. एक वही काढून उघडली. मुलाचं नाव बघितलं. सरपंचाचं पोर होतं. सरपंच म्हणजे वजनदार असामी.. राजकारणातला बाप माणूस.. घरावर भगवा झेंडा फडकायचा.. मास्तर मनातल्या मनात घाबरले. तांबडी पेन्सिल त्यांनी ब्यागेत ठेवून दिली, आणि ते निबंध वाचू लागले.. ..‘‘त्यो काँगरेसवाल्यांचा जावाय हाये.. पाच वरसं झाली तरी बी आजून सरकार तेला फासावल लटकावंना झालंय. का, तर म्हनं अल्पसंख्याकांच्या भावना दुकत्यात.. दयेचा आरजं बी दाबून टाकल्याला हाय. जनतेला म्हाईत हाय, की ह्य़े समदं राजकारन हाय. पन गुरूला फासावर द्यायलाच लागंल".. मास्तरांनी डोळे मिटले. वही बंद करून त्यांनी दुसरी वही काढली. नाव बघितलं. फौजदाराच्या पोराची वही. मास्तर पुन्हा घाबरले. आता तांबडी पेन्सिल काढायचीच नाही असं ठरवलं, आणि वही उघडून ते निबंध वाचायला लागले.. .. ‘‘मुंबईतली हाजी मस्तान, युसूफ पटेल, करीमलालाची वट खतम झाली आणि दाऊद, गवळी, अमर नाईक, छोटा राजन, अशा भाई लोकांचा बोलबाला सुरू झाला. त्यांच्यातलाच गुरू हा पन एक.. गुरू लई टेरर हाये.. आजूनबी पोलिसांच्या हाताला लागल्याला न्हाई. गुरू साटमचं नाव निगालं तरी बी वेपारी, दुकानदार टराकत्यात ".. मास्तरांनी पुन्हा डोळे बंद करून वही मिटली. आपणच सांगितलेलं असल्यामुळे, सगळ्या वह्य़ा वाचायलाच हव्यात, हे स्वत:ला बजावलं. त्यांनी पुढची वही उघडली.. गावातल्या तंबू थेटराच्या मालकाचं पोरगं. वहीत काय असेल, याचा तर्क करतच त्यांनी निबंध वाचायला सुरुवात केली. आपला अंदाज बरोबर येतोय, या जाणिवेनं ते सुखावले होते.. .. ‘‘गुरूमधे अभिषेक बच्चम आणि ऐश्वर्या रायनं येकदम भारी एन्ट्री मारली हाय. त्यो मल्लिका शेरावतचा डान्स तर येकदम फाकडू. विद्या बालन खुर्चीत बसल्याली आसती, पन काय दिसतीय म्हंताना बोलून सोय न्हाई. गुरू म्या केबलवर बघिटला. लई भारी पिक्चर.. आनखी एक लव्ह गुरू बी हाय. पन त्यो आपाटला दनकून’’.. मास्तरांचा अंदाज एकदम बरोबर होता. आता त्यांना गंमत वाटू लागली होती. चारपाचच वह्य़ा शिल्लक होत्या. त्या वाचायच्याच, असं त्यांनी ठरवलं, आणि पुढची वही काढून उघडली. नाम्या शेळक्याचं पोरगं. गरीब, हुशार आणि म्हेन्ती.. मास्तरांना बरं वाटलं. त्यांनी निबंध वाचायला सुरुवात केली. आषाढीची वारी संपवून नाम्या अलीकडं काही दिवसांसाठी गावी आला होता. मग पुना मुंबईला जाणार होता. तो मुंबईत डबे पोचवतो, हे मास्तरांना माहीत होतं. ..‘‘मुंबईत येकच गुरू हाय. त्येला समदं मानत्यात. कुटंकुटं भाषान बी करायला समदं बोलावत्यात. मागं येकडाव ब्रिटनलाबी बोलावलं व्हतं त्या राजाच्या लग्नाला. म्यानेजमेटं गुरू म्हन्त्यात समदं आता. आता त्यो सादासुदा डबंवाला ऱ्हायला नाय’’.. मास्तरांनी वहीवरनं आदरानं हात फिरवला, आणि वही मिटली. पुढची वही काढली. नाव बघितलं.. पुजाऱ्याचं पोरगं. मास्तरांच्या आशा पालवल्या. त्यांनी वही उघडली, आणि तांबडी पेन्सिल हातात धरून ते वाचू लागले. ..‘‘दाणोलीचे साटम महाराज आमचे गुरू. जंगलात फिरायचे, गोठय़ात ऱ्हायचे. भक्तांवर त्यांची खूप माया व्हती. कदी हाताला गावंल ते फेकून मारायचे, पन आमी कवा घाबारलीलं नाय. परसादी म्हनू मार खायाचे.. शेवटी गुरू तो गुरू. एकदम द्य्वमानूस.’’ मास्तरांनी डोळे मिटून नमस्कार केला. लगेचच ते घाबरले. त्यांनी फौजदाराच्या पोराची वही पुन्हा उघडली.. तो गुरू साटम वेगळा.. खात्री झाल्यावर मास्तरांनी पुजाऱ्याच्या पोराची वही बंद केली.. आणि शेवटची वही उघडली. नाव बघितलं, आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्याच मुलाची वही होती. मास्तरांचा ऊर भरून आला. ते वाचू लागले.. ..‘‘पूर्वी मास्तरांना गुरू मानायचे. त्यांना नमस्कार करायचे. गावात त्यांना मान होता. आता सरपंचाच्या घरची कामं करायला लागतात. जनगणना करावी लागते. मतदारयाद्यांची कामही मास्तरच करतात. शिक्षणसेवक असले, तरी आख्ख्या गावाची सेवा मास्तरांना करावी लागते. मास्तर आता गुरू राहिले नाहीत. गुरासारखं वागवतात त्यांना सगळे’’.. .. पोरगा रागावून आपल्याकडे बघतोय, असं मास्तरांना वाटलं.. त्यांनी डोळे पुसले, आणि वही मिटून ठेवली. पुढच्या वह्य़ा वाचायच्या नाहीत, असं त्यांनी ठरवलं. .. आणि हातावर डोकं टेकून ‘शिक्षणसेवक’ तिथंच आडवा झाला. क्षणातच त्याला झोप लागली.