Friday, May 6, 2022

वेताळ आणि वेताळ...

 

दरबारात तातडीची बैठक बोलावल्यामुळे विक्रमादित्यास स्मशानात जाण्यास वेळच नव्हता. तिकडे झाडावर लोंबकळणाऱ्या प्रेताच्या मानगुटीवर बसून विक्रमादित्याची वाट पाहाणारा वेताळ वैतागून गेला. काय करावे याचा विचार करत असतानाच शेजारच्या झाडावरच्या वेताळाने त्याला हाक मारली. “कसला विचार करतो आहेस वेताळा?” असे विचारत पलीकडच्या झाडावरचा वेताळ उगीचच हसला, आणि हा वेताळ ओशाळला. “काही नाही रे, विक्रमादित्य आला तर त्याच्या खांद्यावरून निसटण्याकरिता कोणती नवी गोष्ट सांगावी याचा विचार करतोय...” वेताळ म्हणाला, आणि दोघेही नव्या गोष्टीवर विचार करू लागले. पलीकडच्या झाडावरच्या वेताळाने लगेचच गुगलवर गोष्टीचा शोध सुरू केला. पण विक्रमादित्यास सांगण्याजोगी व अडचणीचा प्रश्न विचारता येण्याजोगी गोष्ट त्याला सापडलीच नाही. अखेर वैतागून मोबाईल बंद करत असतानाच त्याच्या नजरेस एक बातमी पडली. ताबडतोब त्याने ती या वेताळासमोर धरली, आणि वेताळ खुश झाला. “ठरलं... हीच गोष्ट विक्रमादित्याला सांगायची. म्हणजे त्याला उत्तर देता येणारच नाही, आणि माहीत असूनही त्याने त्तर दिले नाही, तर आता तरी त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायाशी लोंबकळतील...” खदाखदा हसत वेताळ म्हणाला, आणि झाडावरच्या प्रेताच्या मानगुटीस विळखा घालून तो निवांत पहुडला...

 इकडे विक्रमादित्याच्या राज्यात काही तातडीच्या समस्या निर्माण झाल्याने काय करावे हे न सुचून त्याने विचारविनिमयासाठी बोलाविलेली जाणत्यांची बैठक आटोपली होती. कठीण प्रसंगी सगळेच आपल्यावर निर्णय सोपवून नामानिराळे राहात असल्याचा विक्रमादित्यास अगोदरपासूनच संशय होता. या बैठकीतही तेच झाले. विक्रमादित्याच्या डोक्याचा पुरता भुगा झाला होता. अखेर तिरिमिरीतच त्याने चढावा चढविल्या, तलवार कमरेला लावली, आणि स्मशानाचा रस्ता पकडला. वेताळाच्या गोष्टीतून काही उत्तर सापडले तर समस्येशी पडताळून पाहू असा विचार करत त्याने स्मशान गाठले.  त्याला येताना पाहून वेताळाला आनंद झाला. आता पुढचा काही वेळ मजेत जाणार होता. विक्रमादित्याने चढावा झाडाखाली काढून ठेवल्या, तलवार सावरत तो झाडावर चढला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागताच, प्रेताच्या मानगुटीवर बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुकही वाटते, आणि आता तर गंमतही वाटू लागली आहे. तुझ्यासमोरचा कोणताच प्रश्न तुला सोडविता येत नसल्याने तू हा उद्योग चालविला आहेस व उत्तर शोधत आहेस हे मला माहीत आहे. म्हणून आता मी तुला जी गोष्ट सांगतो ती ऐक. तुला उत्तर देता आले नाही, तर काय होणार ते तुला ठाऊकच आहे...” असे म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.

 “विक्रमादित्या, ही गोष्ट नाही, तर तीनचार वर्षांपूर्वीचीच एक बातमी आहे. पुणे नावाच्या शहरात, एका झोपडपट्टीतील एक कोंबडा भल्या पहाटे बांग देत असे. त्यामुळे त्याच्या गरीब मालकास पहाटे लवकर जाग येऊन तो कामासाठी बाहेर पडत असे. आयत्या गजराची सोय असल्यामुळे त्याचे त्या कोंबड्यावर प्रेमही होते. पण शेजारच्या इमारतीतील एका महिलेस पहाटे कोंबड्याची बांग ऐकून त्रास होऊ लागला. भल्या पहाटे कानावर पडणारी त्याची बांग आपली झोपमोड करते आणि दिवस खराब जातो, अशी तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली, आणि बांग देऊन झोपमोड करणाऱ्या कोंबड्यावर कारवाई करा अशी मागणी करणारा अर्जच तिने पोलिसांना दिला. ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आली, आणि पोलिसांची पंचाईत झाली. कोंबड्यावर कोणत्या कलमाखाली कारवाई करावी हे त्यांना सुचेना. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले. तर विक्रमादित्या, आता सांग पाहू, भल्या पहाटे बांग देऊन मालकास कामासाठी लवकर उठविणारा कोंबडा आणि शेजऱ्याची झोपमोड करणारा कोंबडा यापैकी कोणास तू न्याय देशील?”

 गोष्ट ऐकून विक्रम गोंधळला. विचारात पडला. आता पुन्हा राज्यातील जाणत्यांची बैठक घेतली पाहिजे, असे त्याने मनाशी ठरविले. इकडे वेताळ मात्र उत्तराची वाट पाहात होता. विक्रमादित्यास या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही याची खात्री होताच वेताळाने खांद्यावरील प्रेतासह पुन्हा झाडाकडे झेप घेतली, आणि तो फांदीला लटकून विक्रमादित्याकडे पाहात खदाखदा हसू लागला.