Monday, September 13, 2010

तेरावी रास !

माणसाच्या मेंदूचे काम कमी होत आहे की काय अशी शंका येण्यासारखी स्थिती अलीकडे सभोवती पसरली आहे. फोफावलेल्या विज्ञानवादावर विसंबून राहिल्यामुळे माणसाला मेंदूचा वापर करण्याची फारशी संधी राहिली नाही, की केवळ एका 'क्लिक'च्या जोरावर सारे जग संगणकाच्या पडद्यावर आणून उभे करण्याच्या अभूतपूर्व चमत्काराच्या यशाची धुंदी मेंदूत भिनली यापैकी नेमके कोणते कारण यामागे असावे, हे शोधण्याची तसदी माणसाने घेतलेली नसली, तरी मेंदूचा भार हलका करणारे शोध माणसासमोर हात जोडून उभे राहिल्याने माणसाला अप्रत्यक्षपणे बौद्धिक परावलंबित्व आले, ही बाब नाकारता येणार नाही. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात, निरुपयोगी आणि बिनकामाचे अवयव गळून पडत गेले आणि अन्य पशुंपेक्षा वेगळे असे द्विपाद रूप माणसाला प्राप्त झाले. उत्क्रांतीचा टप्पा एखाद्या विशिष्ट काळापुरता मर्यादित नसतो. ती एक अविरत प्रक्रया असते. पण ती दिवसागणिक जाणवत नाही. कित्येक शतकांनंतर हे सूक्ष्म बदल स्पष्ट होत जातात. विज्ञानाला वेठीस घरून माणसाने साधलेल्या भौतिक प्रगतीमुळे उत्क्रांतीच्या वर्तमान टप्प्यात मात्र या बदलांचा वेग वाढत चालला असावा. भविष्य घडविण्यासाठी कर्तृत्व पेरावे लागते, हा विचार विसरून पुन्हा एकदा अवघे जग अज्ञातातून मिळणाऱ्या भविष्याच्या संकेतांकडे डोळे लावून बसले आहे. असे दृश्य हा या बदलांचाच एक परिणाम असावा. एका बाजूला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधण्याचा खटाटोप सुरू आहे, निसर्गाच्या मदतीशिवाय, विज्ञानाच्या साह्याने नवी जीवसृष्टी उभी करण्याचे प्रयोग आकाराला येत आहेत, मृत्यूचे गूढ संपविण्याचे संशोधन सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला, भविष्याचा वेध घेण्यासाठी विज्ञानाच्या कसोटीला असंमत असलेल्या प्रयोगांनाही जगाची मान्यता मिळत आहे. हा अतर्क्यपणा आणि विसंगति हा या बदलांच्या प्रक्रियेतीलच अपरिहार्य टप्पा असू शकतो. म्हणूनच, याच विज्ञानवादी जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा विजेता जाणून घेण्यासाठी एखाद्या पॉलबाबाच्या अतींद्रिय शक्तीला साकडे घातले जाते. रस्त्याकडेच्या कुडमुड्याच्या पोटापाण्याचे साधन असलेला पिजऱ्यातला एखादा पोपटदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निकालांवर भविष्यवाणी वर्तवू शकतो, आणि अवघे जग त्यामागे नादावून जाते. भौतिक सुखांची सारी साधने हाताशी उभी असताना आणि या साधनांचा वापर करून भविष्य घडविण्याची क्षमता असतानाही कधीकधी माणूस अशा परावलंबित्वाकडे का झुकतो, हे कोडे असले, तरी जनसमूहाची मानसिकता हे त्याचे ढोबळ उत्तर असू शकते. गर्दीचे मानसशास्त्र हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय असतो. या मानसशास्त्राला व्यक्तिगत मानसिकतेचे निकष लागू होत नसतात, असे दिसते. पॉलबाबाने टाकलेली भुरळ हादेखील जनसमूहाच्या मानसिकतेचाच एक परिणाम असू शकतो. कदाचित, आपापल्या बुद्धीच्या निकषावर पॉलबाबाचा भविष्यवेध ही हास्यास्पद घटना असू शकते. पण गर्दीच्या मानसिकतेपुढे व्यक्तिगत विचारशक्ती दडविण्याची मनोवृत्ती प्रबळ ठरते. पण या आधुनिक भविष्यवेत्त्यामुळे एक गोष्ट नक्की झाली आणि विज्ञानवादी जगात आता भविष्यवाणीलाही महत्व येण्याचे संकेत मात्र स्पष्ट झाले आहेत. भविष्याचा हा नवा फंडा जोरात असतानाच, आता माणसाच्या राशीला आणखी एक नवी रास येऊ घातली आहे. ही तेरावी 'भुजंगधारी रास' आता आकाशातील काल्पनिक पट्ट्यांचे आणखी विभाजन करून माणसाच्या भविष्यातील घडामोडींचीही वाटणी करणार आहे. गतिमान युगात काळाच्या वेगाने धावण्यातच दमछाक होणाऱ्या माणसाच्या मेंदूचे काम विज्ञानाच्या वाट्याला आल्याने कदाचित भविष्याचे निर्णय घेण्याची मेंदूची क्षमता संपुष्टात येऊ पाहात असेल. अशा वेळी, सहजपणे भविष्यवेध घेणाऱ्या कुणा अज्ञाताचा अदृश्य आधार मिळावा, यासाठी नकळत सुरू झालेला हा खटाटोप तर नसेल?