Friday, October 30, 2009

शक्ती दे! युक्ती दे... (आणि बुध्दीही दे!!)

तुळशीमाळ गळा... (कुणाच्या?)
(सौजन्य : महान्यूज)

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. वनमंत्री बबनराव पाचपुते, राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, नाशिकचे खासदार समीर भुजबळ, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, आमदार एकनाथ खडसे आदी याप्रसंगी उपस्थित होते.


...तब्बल दहा वर्षे सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना आता निवडणुकांनंतर पुन्हा समस्यांची जाणीव झाली आहे. पांडुरंगाच्या चरणी तरी त्यांनी याची अप्रत्यक्ष कबुली दिली, हे चांगले. महाराष्ट्राच्या वैभवसंपन्नतेची जाहिरात करत सत्तेवर आलेल्या आघाडीने निवडणुकीनंतर पुन्हा समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि युक्ती द्यावी, असे देवालाच साकडे घातले आहे.
मुळात प्रश्न आहे, तो समस्या सोडविण्याच्या इच्छाशक्तीचा. देवाने त्यांना तशी बुध्दी द्यावी, अशी प्रार्थना आपण पांडुरंगाकडे करूया...
...आता तो पांडुरंग कधी आघाडीच्या मदतीला धावून येईल, आणि या समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि बुध्दी देईल, त्याकडे डोळे लावून आपण बसू या!

Saturday, October 24, 2009

नव्या इतिहासाची नांदी?

महाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आणि मुख्यालय असलेल्या दादर माहीम मतदारसंघावर "मनसे'चा झेंडा फडकावून, "विधानसभेवर भगवा' फडकावण्याच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला मनसेच्या इंजिनाने धडक दिली आहे. राज्याची सत्ता तर दूरच, पण येत्या काही वर्षांत होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेवरचा "भगवा' तरी शाबूत राहणार की नाही याची चिंता करण्याची वेळ निवडणुकीच्या ताज्या निकालांनी "युती'वर आणली आहे. दादर-माहीममधून " सुसाट सुटलेले' मनसेचे इंजिन आता महापालिका मुख्यालयाकडे वळणार आणि युतीच्या या सत्तास्थानास धडक देणार, हे स्वच्छ भविष्य आहे. त्यामुळे "युती'ची फेरबांधणी करावी की तिचे अस्तित्व टिकविण्याची धडपड करावी असा पेच युतीच्या, विशेषतःशिवसेनेच्या नेत्यांसमोर उभा राहणार आहे. राज ठाकरे यांच्याविषयी शिवसेनेतील अनेकांच्या मनात आजही असलेली सहानुभूती आता उफाळून आली, तर सेनेसमोर नव्या समस्या उभ्या राहणार आहेत. त्या समस्या ऊग्र होण्याआधी काळाची पावले ओळखली नाहीत तर शिवसेना हा एक राजकीय इतिहास होईल, आणि बालेकिल्ल्याचे काही ढासळलेले बुरूज भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची साक्ष देत राहतील...
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसमोरील मनसेचे आव्हान उघड झाले होते. राज ठाकरे यांनी इन्कार केला तरी मनसेमुळे सेना-भाजप युतीची मोठी पडझड झाली, हे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. "मनसे'च्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला, तरी युतीच्या पराभवात त्यांचा हातभार होता, हे मनसे आणि युतीमधील मतविभागणीवरून उघडही झाले आहे. या मतविभागणीमुळेच मुंबईत युतीला विधानसभेतदेखील याच आव्हानास सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट दिसत होते. तरीही सेनेच्या नेतृत्वाला जनमानसाचा अंदाज आला नाही. "मनसे'ला मत देण्याने कॉंग्रेसचा लाभ होतो, हे मतदारांच्या लक्षात आलेले असल्याने लोकसभेत केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीत, अशा भ्रमातून सेना नेतृत्वाने राज ठाकरे आणि "मनसे'वरील टीकेचा एककलमी कार्यक्रम राबविला तेव्हा भाजप मात्र एकमार्गीपणाने प्रचाराचे गाडे महागाईच्या मुद्‌द्‌यावर आणण्याचा अपयशी प्रयत्न करीत होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची गाडी एका रुळावरून धावलीच नाही, आणि मनसेचे इंजिन शिवसेनेची फरफट करीत आहे, असे एक "करमणूकप्रधान' दृश्‍य प्रचाराच्या काळात जनतेला पाहायला मिळाले.

शिवसेनेच्या जन्मापासून अगदी कालपर्यंत मुंबई आणि शिवसेना हे एकमेकांचा आधार असल्याचे चित्र होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, रमेश प्रभू आदी मोहरे बाहेर गेल्यानंतरदेखील बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा हीच शिवसेनेची शक्ती होती. उद्धव ठाकरे यांच्या हातात सेनेची सूत्रे आल्यानंतर नारायण राणे आणि त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी सेनेला सोडचिठ्ठी देत सेनेसमोर आव्हाने उभी केली. या काळात सेनेची पडझड सुरू झाल्यानंतर मात्र, मुंबई आणि शिवसेनेचे नाते हा एक "इतिहास' झाला. गेल्या पाच वर्षांत राणे आणि राज यांनी शिवसेनेला असंख्य धक्के दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या शक्तीचा उतरता आलेख आणखी ठळक झाला आहे. "मनसे'मुळे शिवसेनेला मोठा फटका बसला हेच याही वेळचे वास्तव आहे. मुंबईतील वडाळा, भायखळा, मुंबादेवी, मालाड (प.), वर्सोवा, अंधेरी (प.), चांदिवली, धारावी आणि वांद्रे (प.) या नऊ मतदारसंघांत कॉंग्रेस आघाडीने स्वबळावर वर्चस्व सिद्ध केले आहे. यापैकी धारावी, वांद्रे (प.), वर्सोवा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघांत "मनसे' नसतानाही युतीला कॉंग्रेस आघाडीकडून पराभव पत्करावा लागला, तर मनसे आणि युती अशा लढतीत शिवडी आणि घाटकोपर (प.) या दोन जागा मनसेने युतीकडून काबीज केल्या. शीव कोळीवाडा, कुलाबा, दिंडोशी, कांदिवली (पूर्व), अंधेरी (पूर्व), विलेपार्ले, वरळी, अणुशक्तीनगर आणि कुर्ला या नऊ मतदारसंघांत मनसे आणि युतीच्या मतविभागणीमुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व मतदारसंघांत मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. बोरीवली आणि मुलुंडमध्ये मनसेशी थेट टक्कर देऊन युतीमधील भाजपने या जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, मनसेमुळे फायदा झालेल्या कॉंग्रेस आघाडीसही माहीम, मागठाणे, विक्रोळी आणि भांडुपमध्ये "मनसे'ची धडक बसलीच आहे. या चार जागा मनसेने कॉंग्रेसशी थेट लढत देऊन जिंकल्या आहेत, तर चेंबूर आणि कालिना या दोन मतदारसंघांत मनसे आणि कॉंग्रेस अशी लढत होऊनदेखील युतीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे मनसेला फटका बसला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे रिंगणात असूनदेखील वांद्रे (पूर्व), दहिसर, गोरेगाव, जोगेश्‍वरी (पूर्व), चारकोप, घाटकोपर (पू.), आणि मलबार हिल या सात मतदारसंघांत युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघांत मनसेचा युतीच्या विजयावर परिणाम झालेला नाही.
मुंबईतील निकालावरील "मनसे फॅक्‍टर'चा प्रभाव या निकालातून स्पष्ट दिसतो. शिवसेनेच्या पडझडीतून जन्मलेल्या "मनसे'मुळे सेनेच्या सहानुभूतीदारांना "हवा असलेला पर्याय' मिळाला आणि त्यांची मते मनसेकडे वळली, हाच याचा अर्थ आहे. शिवसेनेची एक भक्कम "मतपेढी' आता फुटली आहे, हे स्पष्ट झाले आहे. मनसेला तरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. त्याबरोबरच, मुंबईत "मनसे'ला सहा जागांवर मिळालेल्या विजयास शिवसेनेच्या जुन्या मतदारांचाही हातभार आहे, हेही स्पष्ट आहे. वाढती ताकद घेऊन नव्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या "मनसे'मुळे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद क्षीण होत गेल्याचे मनसेच्या स्थापनेनंतरच्या दोनच निवडणुकांत उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या भक्कम निकालांमुळे मनसेचे मनोबल वाढले आहे. आता त्यांच्या तंबूत मुंबई महापालिकेसाठी "तिसऱ्या लढाई'ची तयारी सुरू झाली आहे. "दोन ठोशां'मुळे क्षीण झालेली शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे.
(सकाळ, शनिवार २४ ऒक्टो. ०९)

समृद्धीची रास, घरोघरी.... ५६ टन सोने खरेदी !


धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात ‘सोनियाचे दिन’ होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या बोनसच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली.
दिवस खरंच बदललेत काय?
दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षांच्या तुलनेत ३९.२ टक्के अधिक रु. ८,९०४ कोटींची मौल्यवान धातूची खरेदी केली गेली.
दिवाळीनिमित्त अनेक शहरांत जवाहि-यांनी एकत्र येऊन किंवा स्थानिक स्तरावर स्वतंत्रपणे सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी ग्राहकांना प्रोत्साहनपर विशेष योजना यंदा आखल्या आणि ग्राहकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सोने आता केवळ दागिन्यांच्या हौशीपुरते मर्यादित राहिलेले नसावे. भविष्यातील खडतर आर्थिक संकटांतून मार्ग काढण्याचा सुलभ मार्ग म्हणूनही त्याकडे पाहिले जात असावे. म्हणूनच, दिवसेंदिवस सोन्याचे भाव कडाडत असतानाही, सोन्याची खरेदी वाढते आहे... माणसातला ‘गुंतवणूकदार’ जागा झाल्याचेही हे लक्षण असावे..
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात सर्वाधिक १९.६ टन अर्थात रु. ३,११६.४० कोटींच्या सोन्याची विक्री झाली. त्या खालोखाल...
ही बातमीच वाचा ...
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=17869:2009-10-23-17-52-24&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

Sunday, October 18, 2009

आमच्या बखरीतून...

... आमचा जन्मसिद्ध हक्क ! ‘अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव’... ... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि ‘टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला’ या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली... टिळकांचा जन्म चिखलीत झाला, तर रत्नाइरच्या टिळक आळीत त्यांचे जन्मस्थान कसे, हा प्रश्न नेमका भाषणाच्या वेळी माझ्या डोक्यात वळवळला आणि मी पुरता भांबावून गेलो... कपाळावर घाम आलाय असं वाटून मी मुठ सोडून हात कपाळाकडे नेला... वळलेला तळवाही तोवर ओला झाला होता... मग तर मला काहीच सुचेना! ... ‘एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो... जय हिंद, जय महाराष्ट्र...’ कसंबसं एवढं बोलून मी जागेवर येऊन बसलो, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला... का ते मला अजून उमगलेलं नाही. लोकमान्यांचा जन्म नेमका कुठे झाला याचा शोध घ्यायचा मी नंतर प्रयत्नच केलेला नाही. कारण, त्यांनी स्वराज्यावर जन्मसिद्ध हक्क सांगितला म्हणजे ते नक्की रत्नांग्रीतच जन्मले याविषयी माझ्या मनात नंतर शंकाही उरलेली नाही. त्यामुळे उलट आता टिळकांच्या जन्मस्थानाविषयी कुणाशीही वाद घालायचीही गरजच नाही... कारण, रत्नारीच्या मातीवर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे... त्यासाठी कोर्टात खेटे घालावे लागले तरी पर्वा नाही... आमच्या कितीतरी पिढ्या त्यातच संपल्यात... ‘वादे वादे जायते तत्वबोध:’ ही म्हण माहीत नसली, तरी नकळत तिचं तंतोतंत पालन करणारा कुणी तुम्हाला भेटला, तर ‘तुम्ही रत्नारीचे का’, असा प्रश्न तुम्ही बिन्धास्तपणे त्याला विचारा... या प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळणार नाही... पण, ‘तुम्ही कसं ओळखलंत?’ असा प्रतिप्रश्न आला, की तुमचा अंदाज खराय, याचा निम्मा पुरावच तुम्हाला मिळेल... कारण, प्रश्नाचं उत्तर द्यायचं हा आमचा स्वभावच नाही. प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्याला निरुत्तर करायचं, हाही आमचा एक जन्मसिद्ध हक्कच आहे... ‘केवढा उंच झालायस रे... तुझं वय काय?’ असं सहज कुंणाला विचारलंत, आणि ‘तुमचा काय अंदाज, किती असेल?’ असा प्रतिप्रश्न आला, की, आमच्या मातीचा तो कस अजूनही तिळमात्र कमी झालेला नाही याची खात्री पटते आणि अभिमानानं ऊर भरून येतो...कोकणाच्या लाल मातीत रंगलेला, सागराच्या गाजेत रमलेला, ‘सड्या’वरच्या पारावर गप्पा मारत दिवेलागणीची वाट पाहाणारा कुणी दामले, लेले, नेने असो, नाहीतर पाठारावरच्या पाखाडीत राहाणारा कुणी सद्या, बुध्या, रावज्या, धोंड्या असो- प्रत्येकाच्या अंगात रत्नांग्रीचंच रक्त सळसळून वाहात असतं... ‘काय रे बुध्या... वई नीट घट्ट बांधलीयेस ना?’ असा सवाल संध्याकाळी पैसे हातावर ठेवताना एखाद्या सदुनानांनी विचारलाच, तर, ‘बगा हल्लवन...’ असंच उत्तर सदुनानांना अपेक्षित असतं. त्यात ‘इकडेतिकडे’ झालं, तर बुध्याचं कायतरी बिनसलंय, हे कुणी सांगायची गरज नसते. ‘देवावरचं फूल उचलून’ बोलायची तयारी असलेला आत्मविश्वास नसानसात भिनलेला, दोन अक्षरांपेक्षा जास्त अक्षरं उगीचच आडनावात ‘फुकट’ घालवायची नाहीत असा ज्यांचा बाणा, ती माणसं बहुधा रत्नांग्रीत येऊन पहिल्यांदा स्थायिक झाली असावीत... त्यांच्यामुळेच ‘रत्नागिरी’चं ‘रत्नांग्री’ झालं, आणि गावाच्या नावातलं अर्धं अक्षर वाचलं... ‘परवडत नाही’ असं तोंडानं उच्चारणं, म्हणजे, शब्द वाया घालवणं... पण त्याच हिशेबापायी अनेक उंबरठ्यांमध्ये येणारा गणपती दीड दिवसांनी ‘माघारी’ जातो, असं म्हणतात... या दीड दिवसांचीसुद्धा काटकसर करून हा गणपती ‘दीड दिसां’चा केला, की ‘व’ वाचतो... तेवढा एक ‘व’, वाक्यात दुसरीकडे कुठेतरी उपयोगी पडू शकतो ना?... गणपती ही बुद्धीची देवता आहे. इतरांना दहा दिवसांत तो जितकी बुद्धी देतो, तेवढी मिळवण्यासाठी आमाला दीड दिवस पुरत असेल, तर उगीच दहादहा दिवस कश्याला वाया घालवायचे त्याचे?... असाही एक विचार त्यामागे असतोच. अश्याच सणासुदीच्या दिसांत, घरात भरपूर ‘पाव्हणेरावळे’ असले, की, फडताळातला तूप वाढायचा ‘तो’ चमचा बाहेर काढला जातो... पानात तूप पडण्याआधी चमच्याच्या मधोमधच्या भोकातून धार मागं भांड्यात जाते, हे त्यांच्या लक्षात येत नसेल का, असा भाबडा प्रश्न पडणारा पंक्तीतला माणूस म्हणजे नक्कीच रत्नारीत आलेला पाव्हणा असायचा... निम्म्या पंक्ती आटोपल्या, की अर्धी पोळी ‘बाजूला’ काढून ठेवावी आणि जेवणं उरकली, की त्या पोळीनं भाजीची कढई पुसून घ्यावी, म्हणजे ‘भाजीपण साफ, आणि पोळीलापण चव’ हे शहाणपण इथल्या माहेरवाशिणीला शिकवायला लागत नाही, असं म्हणतात... दुपरी भांडी घासायला आलेल्या भिक्याला कढईला चिकटलेला भाजीचा रस दिसला, की, ‘वयनी, कुणी जेवायचं र्‍हायलंय की काय?’ अशी खवचट शंका त्यानं घेतली, म्हणून कुणी रागवणार नाही! ...अमेरिकेनं हिंदी महासागरात सातवे आरमार आणून ठेवलान, तेव्हाची गोष्ट! ही बातमी पसरली, आणि रत्नारीत खळबळ उडाली. प्रत्येकजण सातव्या आरमाराची चर्चा करताना दिसायचा... अनेकांची तर झोपच उडाली होती... हिंदी महासागर तो आहे कुठे, सातवं आरमार म्हजी काय, ते म्हासागरात कश्या आणून ठेवलान, असे प्रश्न ‘आंगण्या’चा कचरा काढताकाढता एखादा गडी करायचा, आणि पंचाईत व्हायची. ‘तुला कश्या हव्यात नाही त्या पंचायती?’ अशा ‘उत्तरा’नं प्रश्न पलटवले जायचे. मग आरमाराचं काल्पनिक चित्र मनात रंगवत तो निमूटपणे कचरा काढायचा... .... पण अखेर या बैचैनीचा शेवट झाला. एका बातमीनं अमेरिकेचं ते सातवं आरमार माघारी गेलं... अजूनही ती आठवण कुणीकुणी सांगतं. त्याचं काय झालेलं, भिशानं ‘आरशा’च्या अग्रलेखातनं अमेरिकेला ‘हाग्या दम’ भरलान. ‘आरमार मागं घेतलं नाही, तर परिणामांना तयार रहा’ अशी कडक समज दिलान, म्हणूनच अमेरिकेनं आरमार मागं घेतलं, असं आम्हाला कुणीतरी सांगितलन... ‘आरशा’चा तो अंक अमेरिकेच्या कुण्या बड्या अधिकायाच्या हातात पडला, आणि त्याच्या सोबतच्या कुणीतरी ‘रटप’ करत नुस्तं हेडिंग वाचलान... आणि ते इंग्रजीत सायबाला सांगतलान... यातलं खरं किती आणि खोटं किती हे आम्हाला माहीत नाही. पण दुसर्‍या दिशी अमेरिकेचं आरमार मागे गेलं होतं... ... सदुभाऊ पाटणकर हे नाव रत्नारीत एकदातरी जाऊन आलेल्या कोणत्याही देशवासीयानं नक्कीच ऐकलेलं असणार. अटलबिहारी वाजपेयी नुस्ते खासदार होते, तेव्हा रत्नारीला आले होते, आणि सदुभाऊंना भेटले होते... संघाची काळी टोपी आणि अर्ध्या चड्डीतल्या सदुभाऊना पाहून, आपल्या स्वप्नातला भाजप असाच असला पाहिजे, असं तेव्हा वाजपेयींना वाटलं होतं म्हणे... सदुभाऊचा नवा फलक उपक्रम पेपरात छापून आला, की मुंबईतला प्रत्येक चाकरमानी रत्नागिरिकर तो पेपर विकत घ्यायचा... काही पेपरांनी असा आपला खप वाढवला होता, अशी वदंता आहे... आमरसाचा कारखाना सुरू झाला, आणि रत्नांग्रीच्या आंब्याचा रस डब्यातनं बाहेरगावी जायला सुरुवात झाली. माणसांना रोजगार मिळाले. कारखान्यातली माणसं संध्याकाळी काम संपवून घरी जायच्या आधी नळाखाली हात धूत, तेव्हा सगळी पन्हळी ‘पिवळीधम्मक’ होऊन, आंब्याचा नुस्ता घमघमाट सुटायचा. या पाण्याला आमरसाची चव ना, म्हणून मग मालकानं हात धुवायला पातेली ठेवलान, आणि ते पाणी ‘मॆंगोला’ म्हणून विकलान... अशी चर्चा नंतर कारखाना बंद पडेपर्यंत चालू होती... ... वरच्या आळीतल्या कुणाचा नातू अमेरिकेत गेला, आणि तो खोर्‍यान पैसा खेचतोय, असं कुणी कुणाला सांगितलन, तर, `पैसे मिळवायला अमेरिकेला जायला लागत नाही... अंगात धमक असेल तर, हितं, बसल्या जागेवर, बागेतनं पैसा मिळतो’ असं ठणकावून सांगायची हिंमतही या मातीतच असते... आंगण्याच्या ‘गडग्या’वर उगवलेलं आंब्याचं रोपटं पुढं वादळ माजवणार, हे माहीत असतानाही दोन्ही घरांच्या प्रेमाची पाखर त्याला मिळावी आणि ते फोफावत जावं, पुढे रसाळ आंब्यांनी लगडल्यावर त्याच्यावरून दोन घरांत होणारे भांडणाचे तमाशे पाहात शेजारपाजायांनी ‘टाईमपास’ करावा, हेही इथे नवं नाही... .... गडग्यावरच्या आंब्यासाठी ‘बेड्याचा कणका’ उचलून सख्ख्या भावकीवर धावून जाणार्‍या आणि आपल्याच वंशावळीचा उद्धार करीत शिव्यांची स्वैर खैरात करणार्‍यांच्या चुली वेगळ्या होत गेल्या... पण मुंबैत आल्यावर ‘भावकीतलं किचाट’विसरून एकसाथ गौरी-गणपतीला आणि दिवाळीच्या सुट्टीला गावकडे फिरकला नाही, तो ‘रत्नांग्रीकर’ नव्हेच! सणासुदीला कोकणाकडे जाणाया गाड्यांची गर्दी वाढते ते उगीच नाही... असं असूनही, ‘परतीचं रिझर्वेशन’ हा प्रकार मनावर घ्याची आमच्यात पद्धत नाही... आयत्या वेळी एस्टी स्टॆंडवर घिरट्या घालायच्या, आमदाराची चिठ्ठी मिळवायची, नाहीतर ‘वशिले’ शोधायचे... मग स्टॆंडवर घुटमळणारा कुणीतरी बेरक्या समोर बरोब्बर उभा राहातो... मायाळू नजरेनं चाकरमान्याकडे पाहातो... ‘किती तिकीटं हवीत रे बावा तुला?’ असा प्रेमळ प्रश्न विचारतो, ‘पैसे दे, आत्ता तिकिटं आणून देतो’ असा एक आश्वासक दिलासाही देतो आणि उत्तराची वाट न पाहाताच हात पुढे करतो...पण चाकरमानी मुंबईचं पाणी पिलेला असतो... तो सगळ्या तिकिटांचे पैसे एकरकमी देणार नाही, हे त्या बेरक्या’ला माहीत असते...‘असं करा, निम्मे पैसे आता द्या, उरलेले तिकिटं हातात मिळाल्यावर द्या’ तोच तोडगा सुचवतो, आणि चाकरमान्याला हे पटतं. ‘उद्या सकाळी समोरच्या पानाच्या गादीवरनं तिकिटं घेऊन जा... मी तिकिटं तिथे ठेवतो’ असं सांगून तो गर्दीत दिसेनासा होतो... दुसया दिवशी तिकिटं मिळत नाहीत, तेव्हा आपण गंडवले गेलो, हे चाकरमान्याला लक्षात येतं... ‘निम्मेच पैसे देऊन आपणच कसा शहाणपणा केला, हे तो मुम्बईत आल्यावर शेजारच्यांना सांगतो... ... संध्याकाळी चाळीत सगळीकडे ही `वार्ता' झालेली असते...

Saturday, October 17, 2009

शुभेच्छा!!

शुभेच्छा!!

दिव्यांची आरास... सजवी घरास...
समृद्धीची रास... यावी घरोघरी...

Friday, October 16, 2009

सदुभाऊ...

"राजकारण असंच असत... माणसांचा वापर करून घेणारेच इथे जास्त. हे माहित असूनही मी हे करतोय.. खाज म्हणा हवं तर... काय मिळतं म्हणाल, तर... समाधान... ते सगळ्यात मोठंय्‌' ... सदुभाऊ बोलत होते, आणि आतून त्यांची बायको कुत्सित हुंकार देत होती...
"कसलं समाधान?... घरचं खाऊन लष्कारच्या भाकऱ्या भाजायचे नस्ते उद्योग!' ती आतूनच म्हणाली, आणि सदुभाऊंनी मला जोरदार टाळी दिली.
"वयनी.. पण तुम्हाला नवऱ्याचा अभिमानच वाटत असणार'... मी मुद्दामच म्हणालो...
"अज्जिबात नाही.. मी खमकी आहे, म्हणून चाल्लयं... काही नाही अभिमान-बिभिमान' ती पुन्हा म्हणाली, पण त्या शब्दातलं कौतुक स्पष्ट जाणवतं होतं.
...रत्नागिरीत त्या दिवशी भाजपाचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी विनोद तावडेंची सभा सुरू होती... सभागृह खच्चून भरलं होतं... तावडेंचं भाषणही ताडाखेबंद होत होतं... टाळ्या, घोषणांचा पाऊस पडत होता, आणि स्टेजच्या एका कोपऱ्यात प्रचाराचा फलक घेऊन एक माणूस पुतळ्यासारखा उभा होता. माझं लक्ष त्या माणसाकडेच होतं. श्रोते आणि नेते आरामात बसलेले असताना फलक हातात धरून निष्टेनं उभा राहीलेल्या या माणसाची मला कीव येत होती. सगळे त्याला मूर्ख समजत असतील, असंही मला राहूनराहून वाटत होतं. पण त्यानं माझ लक्ष वेधलं होतं.... सभा संपल्यानंतर त्याला भेटायचंच असं मी ठरवलं....
गर्दी ओसरताच मी त्याला शोधू लागलो.. पण तो गायब झाला होता... रत्नागिरीच्या बाबा परुळेकर वकिलांना फोन केला. त्यां माणसाचा पत्ता मला शोधायचाच होता.
`अरे, तो सदुभाऊ... कशाला भेटणारेस त्याला? काहीतरी लिहू नकोस हो त्याच्याबदल. एकदम चांगला, सज्जन माणूस आहे तो'... बाबानं फोनवरच मला सांगितलं, आणि मीही त्याला अगदी `वचन` दिलं... तसं माझ्या मनातच नव्हतं...
नंतर काही वेळातच मी बाबाबरोबर समोरच्या सदुभाऊंच्या घरी होतो...
`कुठेतरी पावसेकडे गेलेत प्रचाराला'... बाजूच्या दुकानात गिर्‍हाईकाला काहीतरी बांधून देत सदुभाऊंची पत्नी तिकडूनच म्हणाली, आणि बाबानं माझ्याकडे बघितलं..
`ठीक आहे... तो येईपर्यंत तू वयनींशी बोल... त्यांच्यामुळेच सदुभाऊंना मोकळेपणा मिळतोय' बाबा मुद्दामच मोठ्यानं म्हणाला, आणि अपेक्षेप्रमाणे वयनींनी तिकडूनच पुन्हा `हूं...' केलं... मिनिटभरानं वयनी दुकानातून घरी आल्या, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... वयनींच्या नापसंतीच्या सुरातही, नवर्‍याचा अभिमान डोकावतोय, असं मला जाणवत होतं...
पाचदहा मिनिटांतच सदुभाऊ आले... बाबानं बहुतेक त्याला फोन केला होता.
`स्वामी समर्थ'... हातातला फलक भिंतीशी कोपर्‍यात उभा करून ठेवत सदुभाऊंनी नमस्कार केला, आणि डोक्यावरची `कमळवाली कॅप' काढून गुडघ्यावर ठेवत ते समोरच्या खुर्चीत बसले...
`हं बोला तुम्ही'... म्हणत बाबा घरी गेला, आणि आम्ही बोलू लागलो...

... त्याचं नाव सदुभाऊ जोशी. गेल्या काही महिन्यांपासून, लोकजागृतीसाठी वेगवेगळ्या विषयांवरचे फलक हाती घेऊन हा एकांडा शिलेदार, जमेल तिथं प्रवास करणारा एक नवा आवलिया रत्नागिरीत अवतरलायं... असेच फलक घेऊन रस्तोरस्ती फिरणाऱ्या सदुभाऊ पाटणकरांची तब्बेत सध्या बरी नाही... सदुभाऊ जोशींनी त्यांचा वारसा चालवलाय...
मी त्यांच्या घरी त्यांच्याशी बोलत असतांना पंधरावीस माणसं तेवढ्या वेळात सदुभाऊंना हाक मारून गेली, आणि या आवलियाचा लोकसंग्रह मी डोळ्यांनी अनुभवला... मागे एकदा नगरपालिकेच्या निवडणूकीत सदुभाऊ भाजपाच्या तिकीटावर उभे राहीले, आणि सगळ्यांचा धुव्वा उडवला.. नंतर पक्षांनं उमेदवारी नाकारली, तेव्हा अपक्ष उभे राहिले, आणि दणकून आपटले.. म्हणूनच, `माणासापेक्षा पक्ष मोठा असतो', यावर त्यांची श्रद्धा... आता भाजपाच्या प्रचारासाठी सदुभाऊ हिंडतायत. ब्लड प्रेशर, डायबेटीजसारखे आजार सोबत घेऊन, स्वत:च्या खर्चानं. रिक्षा भाड्यानं घेऊन हातात प्रचाराचा फलक घेऊन ते गावोगाव फिरतायत. भाषण नाही, घोषणा नाहीत, आणि संवादही नाही... हातातला फलक एवढंच त्यांच्या प्रचाराच साधन.
स्वाईन फ्लूची साथ आली, तेव्हा सावधगिरीच्या सूचना देणारा फलक घेऊन सदूभाऊ चिपळूणपासून राजापूरापर्यंत स्वखर्चानं हिंडले... कधी लोकांनी चेष्टा केली, कधी आपुलकलीनं विचारपूरस केली... पण "खाज'!... ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही...
सामाजिक जाणीवेतून एक दुर्लक्षित आयुष्य फुलविण्याच्या उभेदीतून दत्तक घेतलेला चार महिन्यांचा मुलगा आज एकवीस वर्षांचा झालायं... वेदशाळेत शिकतोय... "आपण एका आयुष्याला आकार देण्यात यशस्वी ठरलो', एवढंच सदूभाऊ अभिमानानं सांगतात...
+++ +++ +++
`ही नवी खाज कधीपासूनची?'... बराच वेळ गप्पा मारल्यावर, हा माणूस मोकळाढाकळा आहे, अशी खात्री झल्यानं मी मध्येच एकदा सदुभाऊंना विचारल...
झाला दीडदोन महिने... मागे सावर्ड्यातल्या एका मुलाला स्वाईन फ्लुच्या उपचारासाठी `रत्नारी'त आणलं होतं.. त्याला बघायला हॉस्पिटलात गेलो, तेव्हा वाटलं, हे प्रकरण साधं नाही... आपण काहीतरी केलं पाहिजे... आणि मी विचार करायला लागलो... एकदम सदुभाऊंचीच आठवण झाली... आपले सदुभाऊ पाटणकर- अलीकडे आजारी आहेत... मग मी ठरवलं... लोक्जागृती करायची... करून घेतला एक मोट्ठा फलक... चांगला साताठशे रुपयांचा... आणि फिरलो राजापुरापास्नं खेडापोवत'... कोपर्‍यातल्या एका मोठ्या फलकाकडे बोट दाखवत सदुभाऊ म्हणाले...
`उचलून बघा... एका हाताला झेपणारा नाही'... खुर्चीतून उठत त्यांनी तो फलकच माझ्यासमोर धरला... `काय करावे, काय करू नये', याची लांबलचक यादी त्यावर होती...
मी सदुभाऊनाच हो फलक हातात धरायला सांगितलं, आणि घरातच त्यांचा एक फोटो घेतला...
पुन्हा गप्पा सुरू झाल्या...
तेव्हढ्यात वयनींनी दोनचार आल्बम समोर आणले होते... मुलाचे फोटो!
`चार महिन्यांचा असताना ह्याला घरी आणून हितं सुपात ठेवला...' दरवाज्याच्या उंबरठ्याकडे बोट दाखवत सदुभाऊ सांगू लागले...
`आई होती तेव्हा... ती पुढे आली, वाकून त्या एवढ्याश्या जिवाकडं बघितलंन, आणि `हुं' करून आत गेली... तिला आवडलं न्हवतं हे दत्तक प्रकरण'... हसतहसत सदुभाऊ म्हणाले.
`तिचा बिचारीचा काही दोष नाही... जुन्या वळणाची होती' भिंतीवरल्या आईच्या फोटोकडे पाहून नमस्कार करत सदुभाऊ म्हणाले.
`पण आम्हाला मूल हवं होतं... लग्नानंतर बरीच वर्षं मूल नव्हतं... मग नंदूच्या आग्रहावरून तपासणी करून घेतली, आणि लगेच ठरवलं... आपल्या बायकोचं आईचं सुख हिरावून घ्याचं नाही... तिला मुलाची माया मिळवून द्यायचीच'... सदुभाऊंच्या सुरात स्वभावातला सगळा प्रांजळपणा उतरला होता...
मग मी आल्बम उलगडू लागलो...
एकेका फोटोवर बोट ठेवत सदुभाऊ मुलाचं कौतुक सांगत होते...
तेव्हढ्या वेळात घरात आणखी सातआठजण येऊन बसले होते... सगळ्यांना हे माहीत होते, हे त्यांच्या चेहेर्‍यावरच दिसत होतं. तरीपण सगळेजण कान लावून ऐकत होते.
तासाभरानंतर सदुभाऊंच्या बायकोनं ट्रे भरून चहा आणला... सगळ्यांच्या हातात कप देतादेता तीही या कौतुकसोहळ्यात सामील झाली होती...
`वयनी, कश्याला केलात एवढ्या सगळ्यांना चहा?' मी उगीचच म्हणालो... पण तोवर सदुभाऊंनी मस्त फुरका मारला होता...
`घ्या हो... हे रोजचंच आहे आमच्याकडे'... समाधानानं बायकोकडे पाहात सदुभाऊ म्हणाले, आणि तिनंही प्रेमळ हसून त्यांना दाद दिली...
`पण फक्त, चहा डायबेटीसवाल्यांचा आहे'... पुन्हा खट्याळपणे माझ्याकडे पाहात डोळे मिचकावत सदुभाऊ म्हणाले, आणि त्यांनी टाळीसाठी हात समोर केला...
पुन्हा एक `हू' ऐकू आलं...
चहा संपवून सदुभाऊ उठले, आणि कोपर्‍यातला फलक त्यांनी उचलला... माझा हात हातात घेत निरोप घेतला, आणि ते रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या भाड्याच्या रिक्षात बसले...
मीही बाहेर आलो... सदुभाऊंना हात हलवून निरोप दिला.

Thursday, October 8, 2009

'ठेवणीतला' प्रश्‍न!

'आकाशातून कोसळणाऱ्या धारांच्या माऱ्यातून वाट काढत आमची एस. टी. मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. खिडक्‍यांच्या काचांवरही ढग साचले होते आणि त्यावर बोटं फिरवून साफ केलेल्या काचेतून बाहेर पाहात माझ्या शेजारच्या सीटवरचा तो वयस्कर प्रवासी सुन्न सुस्कारे सोडत होता. त्याचा चेहराही काळजीनं भरल्यासारखा होत होता. ...धुवांधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातलंय, जनजीवन पुरतं कोलमडून गेलंय....एरव्ही वाहनांनी गजबजून पळणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना आहे. एखादं मागे फिरून परतणारं वाहन आणि पावसातून वाट काढत जमेल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी एस. टी. अशी चुकार वाहनं मधूनमधून त्या ओल्याचिंब रस्त्यावरून सरकताना दिसत होती. पाचदहाच प्रवाशांना घेऊन जाणारी आमची एस. टी. कणकवलीपर्यंत जाण्यासाठी हळुहळू सरकत होती. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर काळजी होती.....माझ्या शेजारचा तो प्रवासी तर प्रचंड दडपणाखाली असल्यासारखा वाटत होता. ....मला राहवेना. त्याच्या मनावरचं दडपण बाजूला व्हावं, या उद्देशानं मी त्याच्याकडे बघून हलकंसं हसलो. पण त्याच्या डोळ्यातली काळजीची झाक मिटलीच नाही. तो त्याच नजरेनं माझ्याकडे बघत होता... 'मामा, काय म्हणताय? कुणाला मत देणार?' निवडणुकीच्या माहोलात प्रवास करतानाचा माझा 'ठेवणीतला' प्रश्‍न मी त्याला विचारला, आणि हसलो. पण तो हसला नाहीच, उलट काहीशा रागानंच त्यानं माझ्याकडे बघितलं. 'तुमाला सुचतायत मतां...हिकडं आमची भातां बगा...गेली सगली व्हावन...ह्या पावसानं सगलं वाट्टोलं क्‍येलान...निस्ता कोसलतोय....तीन दिस झाले. त्येला थोप न्हाई.' त्याच्या काळजीचं कारण मला समजलं होतं. मग मीही खिडकीची काच पुसली आणि बाहेर बघू लागलो... त्याचं दुःख वेगळं होतं... शेतातली आडवी झालेली भाताची रोपं त्याला अस्वस्थ करत होती. तोही माझ्याबरोबर बाहेर बघू लागला... एका वळणावर घाईघाईनं त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला आणि एका शेताकडं बोट दाखवत तो पुन्हा चुकचुकला. लोंब्यांनी ओथंबलेली भाताची रोपं जमिनीवर पडली होती. 'आता हातास काय लागणार...सगल्या दान्यास्नी पुन्ना मोड येनार...भातां सगली संपली. सत्यानास केलान पावसान... ज्यांनी भातं कापली, त्यांचीपन वाट लागली असंल...सुकवनार कुटं ती भातं? ....तो पुन्हा कळवळला. 'पण ही शेतातली रोपं अजून तयार नाही झालीत ना?' हिरवी दिसणारी काही रोपं बघून मी धीर करून त्याला विचारलं. 'तर वो...ही म्हान भातं...पन तयार झाली हायेत. कापायला झालीत. पन ह्या पावसातनं काय कापतांव?' प्रत्येक वाक्‍यासोबत तो अधिकच हळवा होत होता. "महान' म्हणजे, थोडं उशीरा तयार होणारं पीक...आणि "हळवी' म्हणजे लवकर पिकणारं पीक.. 'मिरगात कोसलला नाय येवडा आता हस्तात कोसलतोय...संपली सगली शेती'....तो स्वतःशीच बोलल्यासारखं बोलला. आता मात्र त्याच्या चिंतातूर चेहऱ्यातून ओसंडणारा अस्वस्थपणा आपल्यालाही घेरतोय, असं मला वाटायला लागलं होतं. 'जाऊ द्या हो मामा, हे शेत तुमचं थोडंच आहे?' मी जरा जोरातच बोललो आणि मला धक्का बसला. मघासारख्याच रागाच्या छटा आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि माझ्या डोळ्यात त्यानं आपली नजर खुपसली होती. 'म्हजी? काय बोलताव काय तुमी?....कुटनं आलाव, मुंबईवरनं?'....त्यानं जरा जोरातच मला विचारलं. मी मानेनंच "हो' म्हटलं. 'तरीच`... तो पुटपुटला... `जानार कुटं?'.....त्यानं मोठ्यानं विचारलं. 'सावंतवाडी'....मी तुटकपणानं म्हणालो 'कोन पावनेबिवने हायत तितं?'....त्यानं सौम्यपणानं प्रश्‍न केला. तो पुढं काय विचारणार याचा मला अंदाजच येत नव्हता. मी मानेनंच नाही म्हणालो. 'मुक्काम किती?'.....त्यानं पुढचा प्रश्‍न विचारला. 'दोन दिवस...एखाद्या हॉटेलात राहणार'....मी सांगून टाकलं. आणि तो खिन्न हसला. "तितं तुमी जेवनार, ते दाने काय तुमच्या शेतात पिकलेत?' त्यानं विचारलं, आणि त्याच्या प्रश्‍नाचा रोख मला समजला. "आवं, कुटल्या दान्यावर कुटल्या खानाऱ्याचं नाव लिवल्यालं आसतंय, ते कुनाला ठावं असतं का?....मंग हे शेत माजं नाय, म्हनू काय झालं?...हितलं दानं खानारा कोनतरी दुसराच असंल की नाय?....त्याच्या पोटात जानारे हे दाने आसं वाया जातायत....मंग चालंल का?'....तो समजावणीच्या सुरात माझ्याशी बोलत होता. मी खजिलपणानं मान डोलावली आणि तो समाधानानं हसला....आपल्या अस्वस्थपणाचं कारण त्यानं असं मला समजावून दिलं होतं. काहीच न बोलता रस्त्याकडेच्या शेतातली ती कोसळून गेलेली हिरवी रोपं न्याहाळत मी खिडकीची काच पुसून बाहेर बघत राहिलो. "किती वाजले?'....काही वेळानंतर अचानक त्यानं मला विचारलं आणि मी घड्याळ बांधलेलं मनगटच त्याच्यासमोर धरलं. "सांगा तुमीच, आमी काय पढीलिखी मान्सं नाय'...तो म्हणाला. आकडेदेखील वाचता न येणाऱ्या त्यानं अनुभवाच्या शहाणपणातून दिलेला धडा गिरवत मी त्याला वेळ सांगितली... शेतात पडलेल्या भाताच्या रोपांमुळे त्याचा मतांचा उत्साह पार हरवला होता... मग निवडणुकीचा आणि मतांचा तो "ठेवणीतला' प्रेश्‍न सरसकटपणे कुणाच्या माथ्यावर मारायचा नाही, असं मी ठरवलं... पाऊस ओसरला, की मगच पुन्हा तो प्रश्‍न घेऊन लोकांसमोर जायचं, असंही मी ठरवलंय...