Saturday, December 21, 2019

तन्दु रुसती है...

गण्याचं लग्न झालं. सुतन्दिनीशी. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. गण्या प्रेमानं तिला तन्दू म्हणायचा.
एकदा तन्दूने गण्याला किराणा आणण्यासाठी डीमार्टमधे पाठवलं.
काही वेळाने चारपाच पिशव्यांचा बोजा कसाबसा सावरत गण्या घरी आला, आणि तन्दूने सामान भरायला सुरुवात केली. काही पुड्या सोडून डबे जागेवर ठेवले, आणि पुन्हा पिशवीत हात घातला, तर हाताशी आला साबण! ‘लाईफबाॅय’ची वडी!
तन्दू मिनिटभर साबणाकडे बघतच राहिली. तिचा चेहरा बदलतोय असं गण्याला वाटलं... पुढच्याच क्षणाला तिने वडी पुन्हा पिशवीत ठेवली आणि तरातरा बेडरूममधे जाऊन तिने दार बंद करून घेतलं.
गण्या बावरला. काय झालं कळेना. साबणाच्या वडीकडे पहात विचार करू लागला.
आणि त्याची पेटली.
तन्दू रुसली होती.
गण्याला आठवले.
‘लाईफबाॅय है जहाॅं
तन्दू रुसती है वहाॅं...’
गण्याने गुपचूप ती वडी आपल्या कपाटात सिगरेटच्या पाकिटाखाली लपवली, आणि तन्दूला हाक मारली.
तिचा रुसवा गेला होता.
आता पुन्हा कधीच लाईफबाॅय आणायचा नाही, हे गण्यानं पक्कं ठरवलं!!

Friday, December 20, 2019

शास्त्रीय संगीताचं शास्त्र!

मला शास्त्रीय संगीतातलं शास्त्र मुळीच कळत नाही. पण सूर, ताल आणि तान यांचा कानाशी बसणारा आनंददायी मेळ अनुभवणे हा एक आनंद असतो एवढं कळतं, आणि या अनुभवापुरते कुणाचेही कान तयार असतात. माझेही आहेत असा माझा समज आहे.
एखाद्या शांत रात्री, लांबवर शहरातील दिव्यांच्या माळा लुकलुकताहेत, आकाश चांदण्यांनी गच्च भरलं आहे, गारवा भरलेल्या वाऱ्याची मंद झुळूक आसपास विहरते आहे, अशा तन्मय वातावरणात असे काही सूर कानावर पडणे हा एक अमृतानुभव असतो...
आत्ता मी तो अनुभवतोय!
पण अचानक मिठाचा खडा जिभेवर यावा असं काहीतरी वाटून गेलं.
कौशिकी चक्रवर्ती आणि महेश काळे यांची जुगलबंदी !
‘कानडा राजा पंढरीचा’...
दोघांच्या स्वरांच्या जादूने मन भारून गेले असतानाच, ‘हा नाम्याची खीर चाखतो’ या ओळीवर दोघांनीही सुरांच्या लगडी उलगडण्यास सुरुवात केली.
नाम्या या एका शब्दाभोवती तानांच्या गिरक्या सुरू झाल्या, आणि मला वसंतराव देशपांडेच्या काही मिनिटांपूर्वी पाहिलेल्या मुलाखतीतील किस्सा आठवला... ‘मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली’ हे गाणं आळवणाऱ्या गायिकेस जणू ‘शिमला’ दाखवावयास निघाले आहेत, असे वाटावे अशा रीतीने गाण्यातला तो शब्द ‘दाखवावया शिमला’ असा तोडल्यामुळे गंमत झाली, पण दर्दी श्रोते गायकाचा अधिकार मान्य करून ती गंमतही एन्जाॅय करतात हे सांगतानाच वसंतरावांनी गाण्यातले शब्द सुरांच्या सोयीसाठी तोडण्यामुळे होणाऱ्या गंमतीचे बहारदार किस्से या मुलाखतीत कथन केले. ‘रूपबली तो नरशा’ हादेखील सुराच्या सोयीचाच एक आविष्कार!...
नाम्या... नाम्या... नाम्या या शब्दाभोवतीच्या ताना ऐकताना मला तीच मुलाखत आठवलीच, पण पुढच्या ओळीमुळे चोखोबाही आठवला. मग, आमच्या गावातल्या एका हौशी कलाकाराने गायिलेल्या एका अभंगाचा कसा ‘चोथा’ झाला होता, तो प्रसंग आठवूनही मी स्वत:चीच करमणूकही करून घेतली.
त्या मैफिलीत चोखा मेळ्याचा अभंग तो गात होता, आणि श्रोते उगीचच दाद देत होते. गायक रंगात आला होता...
अभंगात, ‘चोखा म्हणे माझा, विठ्ठल विसावा’ वगैरे काहीतरी ओळ असावी. गायक तिथवर आला, आणि दाद मिळताच, ‘चोखा म्हणे माझा’शी रेंगाळला... ताना, गिरक्या फिरक्या मारत, पुन्हापुन्हा, ‘चोखा म्हणे माझा’ या ओळीशी रेंगाळू लागला, आणि काही मिनिटांनंतर श्रोते कंटाळले...
‘अरे पुढे बोल’... म्हणत एका रसिकाने ठेवणीतली कमेंट मारली, आणि मैफलीत ‘हास्यरंग’ उसळला!
नाम्या... नाम्या..., ना... म्या..., ना...म्या’ ऐकताना उगीचच तो प्रसंग आठवला.
म्हणून म्हणतो, अस्सल संगीतातले शास्त्र कळत नसलं की काहीही ‘खटकू’ शकतं कानाला.
... महेश काळे आणि कौशिकी चक्रवर्तीची ती ‘कानडा राजा पंढरीचा’ जुगलबंदी नक्की ऐका, आणि ‘नाम्या’भोवतीच्या ताना आणि फिरक्या कानाला कशा वाटल्या ते नक्की सांगा!

कोई लौटा दे मेरे....


वेळ आली आहे. विचार करण्याची. प्राधान्य ठरवण्याची.
आजचं जगणं जपायचं, की इतिहासाच्या खऱ्याखोट्या दंतकथांच्या आवरणात लपेटून घेत जगायचं हे ठरवण्याची...
घडी विस्कटते आहे. वीण उसवते आहे. कोण कुणाला फसवते तेच समजेनासं झालंय.
कोण कुणाला खेळवतंय हेही कळेना झालंय. सगळीकडे संशय माजलाय. उद्याचा सूर्य उगवणार की नाही एवढं अनिश्चित, असंभव भासायला लागलंय!...
यात जगायचं कसं, जगलो तर तगायचं कसं हा प्रश्नच आहे.
त्यापेक्षा,
आमचे जुने दिवस आम्हाला द्या!
चालेल आम्हाला भ्रष्टाचार, लाचखोरी...
बलात्कार, खून, दरोडे, दंगेधोपे, हाणामाऱ्या...
त्या तेव्हाही होत होत्या, पण उभा देश होरपळत तरी नव्हता.
भ्रष्टाचार करणारे करत होते, पण साधा समाज त्यातही जगत होता. उलट, चिरीमिरीची पुरचुंडी देऊन सहज कामं करून घेत होता.
काळा पैसावाल्यांची घरं नोटा, संपत्ती, ऐश्वर्याने भरली होती, पण साध्या समाजात समाधान, शांतता होती.
आश्वर्यसंपन्न इमारतींच्या सावलीतल्या झोपडपट्ट्यांमध्ये कधी कुठे होत असतील राडे... पण इमारतींच्या आनंदावर कधी नव्हते त्यांनी उमटवले ओरखडे...
एकंदरीत
भ्रष्टाचार, काळा पैसा, लाचखोरी, मनी लाऊंड्रिंग, एनपीए, हे सगळे भ्रम आहेत.
वास्तव जीवनाशी त्याचा संबंध नाही.
आमच्या जगण्याचा त्या जगाशी संबंध नाही ...
ते जिथे चालतं तिथे खुशाल चालू द्या...
आम्हाला आमचा दिवस आणि आमची रात्र हवीय! हक्काची!
भ्रष्टाचार, काळा पैसा चिरडण्यासाठी आम्ही नाही होणार तुमच्या ढाली..
एवढ्या त्यागापायी आम्ही नाही चिरडून घेणार कुणाच्या पायाखाली...
ते जुने दिवस पुन्हा द्या!
समांतर अर्थव्यवस्थेचे आणि त्यामुळे तयार झालेल्या समांतर जगण्याचे!
समांतर जगण्याने दरी होती, पण दरी असली तरी विभाजन नसते हे महत्वाचे!!