Friday, July 30, 2021

'जंगली’ आणि ‘रानटी’!

 

... आणखी काही दिवसांतच तिच्या पोटातल्या बछड्यांना बाहेरचं जग दिसणार होतं... त्यांच्या जन्माचा सोहळा सुरक्षितपणे साजरा करता यावा म्हणून तिने एक मोक्याची जागाही हेरून ठेवली होती. अरुंद तोंडाची एक अंधारी गुहा... पोटात पिल्लं वाढतायत याची पहिली जाणीव झाली, तेव्हा याच गुहेच्या तोंडाशी लोळण घेत तिने आनंद साजरा केला आणि गुहेच्या अरुंद तोंडातून आत जाऊन पुन्हा एकदा गुहेची पाहणी केली. पिल्लांसाठी याच्यापेक्षा सुरक्षित जागा कोणती नाही याची खात्री करून घेण्यासाठी नंतरही दररोज ठरलेल्या वेळी ती त्या जागेवर यायची. दबक्या, सावध नजरेने आसपासचा कानोसा घ्यायची. परिसरातलं सारं जंगल, स्तब्ध होऊन तिच्या हालचाली न्याहाळत असायचं. झाडाच्या शेंड्यांवरली वानरं विस्फारल्या नजरेनं तिच्या हालचालींवर सावध नजर ठेवून जंगलाला इशारा देणारा एखादाच आवाज उमटवायची, आणि पुढचे पाय ताणून शरीराला लांबलचक आळस देत बेपर्वाईच्या आविर्भावात त्याकडे दुर्लक्ष करून ती गुहेत शिरायची... त्या दिवशीही तसेच झाले. ती आली, तिने आसपास पाहिले. जंगल नेहमीसारखं स्तब्ध होऊन तिच्या आगमनाचं मूक स्वागत करत होतं. मग फार वेळ न दवडता ती गुहेत शिरली. आता पिल्लांच्या जन्माला फार अवधी उरलेला नाही हे बहुधा तिच्या जडावलेल्या देहाला जाणवले होते. आता गुहेतच मुक्काम ठोकावा असा बहुधा तिचा विचार असावा. ती गुहेत शिरली, आणि गुहेतलाच एक कोपरा पकडून तिने अंग पसरले. आता तिला सुरक्षित वाटत होते. आपल्या पिल्लांना येथे कोणताच धोका नाही याचीही तिला खात्री झाली होती. आता पिल्लांचा जन्म होईपर्यंत बाहेरच पडायचं नाही, असंही बहुधा तिने ठरवलं असावं...
... तीच संधी साधून गुहेच्या तोंडाजवळ त्यांनी बांबूंचं जाळं लावलं. तिने कान टवकारले, डरकाळीही फोडली, आणि बाहेर शांतता पसरली. ती पुन्हा निर्धास्त झाली, आणि तिने डोळे मिटले. अचानक काही वेळानंतर ती खडबडून जागी झाली. बाहेर काहीतरी संकट आहे याचा तिच्या तीक्ष्ण नाकांना सुगावा लागला. गुहेचा आतला भाग धुराने भरून गेला होता. पोटातल्या पिल्लांना इजा होऊ नये म्हणून ती जडावलेल्या देहानिशी कशीबशी उठली, आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागली. पण गुहेच्या तोंडाशी आग पसरली होती, आणि गुहेत धूर माजला होता. आता जगणं अवघड आहे हे जाणवून तिने एक अखेरची डरकाळीही फोडली. पण आग आणि धुराने त्या धमकीला जुमानलेच नाही. आता तिला श्वास घेणंही अवघड झालं होतं. पोटातल्या पिल्लांच्या विचाराने ती कासावीस झाली, त्यांना वाचविण्यास आता आपण असमर्थ आहोत याची जाणीव होऊन ती कळवळली, आणि तिने श्वास थांबविला... पुढच्या काही मिनिटांतच तिची हालचालही थंडावली, आणि एका गर्भवतीचा मृत्यू झाला...
यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागातील मुकुटबन नावाच्या जंगलक्षेत्रात दोनतीन महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली... पोटात चार बछडे असलेल्या त्या गरोदर वाघिणीलाही अशाच पद्धतीने माणसांनी ठार मारले होते. मूल होण्यासाठी गरोदर वाघिणीची शिकार करण्याचा अघोरी इलाज कुणीतरी सुचविला आणि त्यानंतर एका वाघिणीची तिच्या गर्भातील बछड्यांसह कोंडी करून हत्या करण्यात आली... तिच्या मृतदेहाचे पंजे कापून नेले, मिशांनाही कात्री लावून रानटी शिकारी पसार झाले...
ही घटना घडली त्याच्या जवळपास तीनचार आठवडे अगोदर, मार्च महिन्यात, देशातील वाघांची संख्या, संरक्षण, संवर्धन, वगैरे मुद्द्यांवर लोकसभेत गंभीर चर्चा झाली होती. वाघ वाचविण्याच्या सरकारी मोहिमा, रानटीपणाने होणाऱ्या वाघांच्या शिकारी आणि माणसापासून स्वतःस वाचविण्याची केविलवाणी धडपड करणारी वाघांची जमात असे एक विसंगत चित्र त्या चर्चेतून अस्पष्टपणे उमटलेही होते. एका बाजूला वाघांच्या अधिवासाची नवनवी क्षेत्रे निर्माण करण्याच्या सरकारी योजनांची माहिती पुढे येत असतानाच, वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूचे आकडे मात्र, वाघांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवत होते. सन २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांत देशात तब्बल ३०३ वाघांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ५५ वाघ एकट्या महाराष्ट्रातील होते.
जंगली वाघांच्या कथा ऐकत आणि ऐकवत माणसाच्या पिढ्या मोठ्या होतात. पण अशा क्रूर शिकारींच्या कहाण्या समोर येऊ लागल्या की, तर क्षुल्लक समजुतींपायी त्यांची शिकार करणारा माणूस तर रानटी आहे, असेच वाटू लागते. निराधार अंधश्रद्धांची शिकार होऊन वाघाला जेव्हा जगाचा निरोप घ्यावा लागतो, तेव्हा जंगली आणि रानटी यांमधील फरकाची रेषा गडदच होते.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करताना, माणसाच्या ‘रानटी’पणाची शिकार ठरलेल्या त्या उमद्या ‘जंगली’ प्राण्यांची क्षमा तरी आपण मागू शकतो ना?...