Thursday, March 28, 2019

नाटक!

आज जागतिक रंगभूमी दिन आहे म्हणे. 
खरं तर, हे जग हीच एक विशाल रंगभूमी आहे, आणि आपण सारे - माणसे, पशुपक्षी, किडेमुंग्या, साप-गांडुळे, - या रंगभूमीवरची पात्रे आहोत, असं कुणीतरी म्हणून ठेवलंय. 
प्रत्येकाच्या वाटणीला त्याची त्याची भूमिका आलेली असते. ती त्याने बजावायची असते. तरीही, 
काहीजण स्वत:ची भूमिका विसरून पुन्हा तोंडाला रंग फासतात, काहीजण वेगळे मुखवटे धारण करतात, आणि आपली मूळ भूमिका न बजावता, दुसरीच भूमिका वठवतात.
उलट, अशांमधलेच काहीजण श्रेष्ठ, नटसम्राट ठरतात.
मग त्यांच्यातला माणूस शोधण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची किंवा आपणच शोधलेला, त्यांच्यातला माणूस कसा मोठा आहे, त्याचं कसं वेगळेपण आहे, असं सांगणाऱ्यांची स्पर्धा सुरू होते.
यातून एक नवं नाट्य तयार होतं.
कधीकधी ते इतकं रंगतं, की बाकीचे सारेजण भान विसरून ते नाटक न्याहळू लागतात.
... म्हणजे, मुखवटा धारण करणाऱ्या नटसम्राटाच्या आतला माणूस शोधणाऱ्या माणसांच्या कथेतून निर्माण होणाऱ्या नाटकात नवे मुखवटाधारी अभिनेते तयार होतात, आणि या अभिनयात, त्यांच्यातला खरा माणूस, म्हणजे, त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचा नायक तो हरवून बसतो.
... आणि आपण, प्रेक्षक बनून तोंडात बोटं घालून बसताना आपली मूळ भूमिकाही विसरलेलो असतो.
मग समीक्षा सुरू होते, नाटकातून निर्माण होणाऱ्या नाटकांची. त्यातील पात्रांची आणि त्यांनी बजावलेल्या भूमिकांची!
त्यातून सर्वश्रेष्ठ नटसम्राट निवडला जातो. काही दुय्यम कलाकारही नावारूपाला येतात.
या सर्वात, खरं म्हणजे, आपणही, कलाकारच असतो. कारण आपण प्रेक्षक झालेले असतो म्हणजे प्रेक्षकाची भूमिकाच वठवलेली असते.
त्याचं मात्र, मूल्यमापन होतच नाही.
म्हणजे, मूळ भूमिका तर आपण विसरलेलो असतोच, पण प्रेक्षकाची भूमिकाही उठावदारपणे वठलेली नसते.
मग, प्रश्न पडणारच!
या जगाच्या रंगभूमीवर, आपल्या वाट्याला आलेली नेमकी भूमिका काय?
कारण, आपण कलावंतही ठरत नसतो, आणि प्रेक्षकही!!


आठ चौपन

आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या...

गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या...

पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले... एका प्लास्टिकच्या पिशवीतली एक छोटीशी डफली बाहेर आली, आणि नाजूकशी थाप पडताच नेहेमीच्या सवयीनं तो डबा सळसळला...
डोळे मिटून, हात जोडून सगळ्याजणी शांत सुरात प्रार्थना म्हणत होत्या... `इतनी शक्ती हमें देना दाता....' विंडोच्या बाजूला उमटलेल्या त्या सुरानी फलाटावरच्या गर्दीतही एक प्रसन्न झुळूक लहरून गेली...
चढत्या सुरांबरोबर गाडीनंही वेग घेतला आणि अवघ्या डब्यात सूर आणि तालाचा मस्त मेळ जमला... अवघ्या डब्याला सवयीचा झालेला नेहेमीचाच तो आगळा सोहळा सुरू झाला... एकामागून एक येणाऱ्या सुरेल गाण्यांबरोबर डब्यातल्या सगळ्या बायका गुणगुणू लागल्या, आणि खचाखच भरलेली सगळी गर्दीच जणू एक्जीव होऊन गेली... पुढच्या पाऊण तासाच्या प्रवासाला सूर गवसला, आणि त्या सुरांनी सकाळच्या ताजेपणालाही एक नवी टवटवी आणली... मधल्या स्टेशनावर चढणाऱ्या एका वयस्कर सोबतीणीसाठी अगोदरच कुणीतरी जागा मोकळी करून ठेवली होती...

मिनिटभरासाठी गाडी थांबली आणि डब्यातल्या सुरांची पट्टी थोडीशी खाली झाली. दररोज न चुकता त्यांच्याबरोबर असणारी ती सोबतीण आज फलाटावर नव्हतीच... गाडी सुटली तेव्हा त्या सुरांमधली अस्वस्थ छटा बाकीच्या नेहेमीच्या प्रवाशांना नेमकी जाणवली, आणि पुढचं स्टेशन येईपर्यंत डबा थोडासा शांत झाला...

आता गाडीनं मुंबई गाठली होती. पुन्हा पिशव्या, पर्स सावरायला सुरुवात झाली आणि डब्यातला नाद हळूहळू मंदावत गेला. पुन्हा डोळे मिटून एक प्रार्थना झाली आणि पुढच्या स्टेशनागणिक रितारिता होताना डब्यातला उदासपणा मात्र वाढत गेला. प्रवासाच्या सुरुवातीला सुरांमधून सांडणारं चैतन्य गाडी शेवटच्या स्टेशनावर थांबली, तेव्हा कोमेजून गेलं होतं. त्या स्टेशनवर नेहेमी चढणारी त्यांची नेहेमीची साथीदारीण का आली नसेल, ही चिंता प्रत्येकीच्या चेहेयावर दिसत होती.