Saturday, September 28, 2013

स्तब्ध शब्द...

`भाषा कधी मरत नाही... ती मारली जाते’... भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं हे वाक्य. खूप दिवस मनाच्या गाभ्यात घुमत राहील, असं... आजवर अनेक भाषा अशाच मारल्या गेल्या. काही अजूनही तरल्या आहेत. कारण भाषेचं मरण असं, अचानक होत नसतं. ते मरण पर्वतासारखं, हळूहळू असतं. आधी आजूबाजूचे दगडधोंडे अदृश्य होतात, मग माती दूर होऊ लागते.. असं दीर्घकाळ चालतं, आणि ते इतकं सवयीचं होऊन जातं, की डोळ्यादेखत एखादा पर्वत नष्ट झाला तरी ते लक्षातही येत नाही. हे झालं नैसर्गिक प्रक्रियेच्या बाबतीत! पण काही वेळा, कृत्रिमरीत्याही हे घडवलं जातं. डॉ. देवी यांचं भाषामरणाचं विश्लेषण वाचतानाही, पर्वताच्या मृत्यूपर्वाची कल्पना डोळ्यासमोर तरळू लागते. मुंबईच्या आसपास पर्वताच्या काही लहानमोठ्या रांगा बघितल्याचं अनेकांना आठवत असेल. त्यावर अनेकांनी आपल्या बालपणातलं एखादं पिकनिकदेखील केलं असेल. त्या वाटेवरून आज जाताना, सहज नजर त्या ठिकाणी गेली, तर काहीतरी चुकल्यासारखंही वाटतं. अशा काही रांगा, डोळ्यादेखत नष्ट झाल्यात... त्या डोंगरांतल्या जंगलात पूर्वी जंगली प्राणीही आढळायचे. वांद्र्याच्या कुठल्याश्या डोंगरावरची कोल्हेकुई म्हणे, संध्याकाळच्या नीरव वेळी खालच्या वस्तीत स्पष्ट ऐकू यायची. आता हे सारं काल्पनिक वाटतं, कारण ते सारं स्पष्ट अनुभवलेली एक डोंगराएवढी पिढीही आता त्या काळाआड गेलेल्या डोंगरांसारखीच होत चालली आहे... पवईच्या तलावात आपलं प्रतिबिंब पाहणाऱ्या डोंगररांगा अगदी कालपरवापर्यंत अनेकांना आठवत असतील... आता तिथून जातायेताना, कधीतरी त्यांची आठवण आली, की तिथल्या भरभराटी नागरीकरणाचं कौतुक करावं, की भुईसपाट झालेल्या त्या रांगांसाठी डोळ्याच्या कडा ओल्या करून घ्याव्यात, हेच समजत नाही... ... मग, पर्वताचा मृत्यूदेखील जिथे नैसर्गिक राहिलेला नाही, तिथे भाषांच्या आयुष्याचा भरवसा कोण देणार, असं उगीचच वाटत राहातं. ... दिल्लीत गेल्या १६ डिसेंबरला झालेल्या बलात्काराच्या निर्दयी घटनेनंतर देशात संतापाचा उद्रेक झाला. गेल्या पंधरवड्यात त्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली, तेव्हा, असे गुन्हे करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. पण त्यानंतरही सामूहिक बलात्काराच्या बातम्या सुन्न करतच आहेत. असं जेव्हा होतं, तेव्हा या प्रकारांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त व्हायला, शब्द सापडत नाहीत. शब्द अपुरे पडतात... ... अशा वेळी भाषेच्या भविष्याची उगीचच चिंताही वाटू लागते. अशा घटनांचा आणि भाषेच्या भविष्याचा तसा काहीच संबंध नसला, तरी! व्यक्त व्हायला, शब्द शोधावे लागणं, हे भाषेच्या समृद्धीला ओहोटी लागण्यासारखंच आहे, असं वाटू लागतं... ... हा विचार मनात आला, तेव्हा मला एक जुना किस्सा आठवला. गावाकडच्या एका वकिलाचा. त्यांचं ऑफिस घरातच होतं. कोर्ट, चालत जायच्या अंतरावर... वकील सज्जन, आणि संस्कृतीची शिकवण पाळणारे. आपलं पाऊल कधी वेडंवाकडं पडू नये, याची काळजी घेणारे. त्यामुळे, आपल्या व्यवसायाचीही कधीकधी त्यांना चीड येतच असे. घराबाहेर पडून कोर्टात जाईपर्यंतचा रस्ता, आडव्यातिडव्या वळणावळणांचा... पण वकील महाशयांनी मात्र, आपल्या सोयीचा एक मार्ग निवडलेला. त्या रस्त्यावरचं कुठलंही डावीकडचं वळण घ्यायला लागू नये, म्हणून... फक्त, कोर्टाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना त्यांना डावीकडे वळावंच लागायचं. पण ते त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं होतं. या साऱ्यामागचं कारण, सरसकटपणे समजणारं नव्हतंच. जवळचा रस्ता सोडून, वेड्यावाकड्या रस्त्यानं ते कोर्टात का जातात, हे त्यांच्या अशीलांनाही कोडं असायचं. एकदा त्यांनी कुणाला तरी हे कारण सांगितलं. रस्त्यावरच्या कुठल्याही वळणावर, डावीकडे वळायची वेळ येऊ नये, म्हणून आपण हा रस्ता निवडला, असं ते म्हणाले. कारण, त्यांच्या डोक्यात, वाममार्गाची कल्पना घट्ट रुतलेली होती. वाममार्गाला जायचं नाही, असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. त्या निश्चयाची आठवण रहावी, म्हणून त्यांनी उजव्या वळणांचा रस्ता स्वीकारला होता... हे वास्तविक जगणं, आणि तसं करणं म्हणजे सदाचरी वागणं नव्हे, हे त्यांनाही माहीत होतं, पण यामुळे आपल्याला आपल्या विचारांशी नातं राखता येतं, अशी त्यांची समजूत होती. मग, कोर्टाच्या प्रवेशद्वारावरचं ते डावीकडचं वळण?... तेही त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं होतं. कारण तो व्यवसाय त्या मार्गाशीच जुळणारा होता, तिथं डावंउजवं करावंच लागतं, असं त्यांचंच मत होतं. ... ही आठवण झाली, आणि मला तो शब्द छळू लागला. `वाममार्ग !’ आणि, अलीकडे अनेक वर्षांत हा शब्दच आपण कुठे वाचलेला, ऐकलेलाही नाही, असं जाणवू लागलं. कुठे गेला हा शब्द? अचानक गायब झाला, की त्या, नष्ट होणाऱ्या पर्वताशेजारच्या अगोदर गायब होणाऱ्या दगडधोंड्यांसारखा, नकळत अदृश्य झाला? अचानक समोर आलेल्या अशा एखाद्या, जुन्या शब्दाच्या आठवणीनं उगीचच बेचैनी येऊ लागते. खरं म्हणजे, चारदोन अक्षरं एकत्र येऊन तयार झालेला एखादा शब्द असतो. तो असला किंवा नसला, तरी आपल्या व्यवहारांचं काही फारसं अडत नसतं. वाममार्ग हा शब्द ज्या भाषेतच नसेल, ती भाषा बोलणारी माणसं सदाचारी नसतील असं थोडंच असतं? पण आपल्या भाषेशी नातं सांगणारा हा चार अक्षरी शब्द, केवळ भाषेपुरता नसतो, तर त्याचं नातं थेट जीवनशैलीशी जोडलं गेलेलं असतं. या शब्दाला जीवनशैलीचे संस्कार जोडलेले असतात. म्हणून हा शब्द अदृश्य झाल्याची खंत आणखीनच बेचैन करू लागते. खरं म्हणजे, असा एखादा शब्द नष्ट झालेला नसतो. त्याचा वापर मात्र खूपच कमी झालेला असतो. म्हणजे, त्या शब्दाला `स्थगिती’ दिली गेलेली असते?... की तो शब्दच स्वतःहून `स्तब्ध’ झालेला असतो?... असं जर होत असेल, एखादा शब्दच स्वतःहून भाषेच्या वापरातून स्तब्ध होत असेल, तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर होऊ शकत असेल? असा शब्द स्तब्ध झाला असेल, तर वाममार्गाची संकल्पनादेखील विरत चालली असेल? असे विचार डोक्यात घोळू लागले, की शब्दांची गरज लक्षात येऊ लागते. आपल्या भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत, अशी अवस्था होते... शब्दांचं नातं जीवनशैलीशी असेल, तर असे शब्द जपलेच पाहिजेत...

Friday, September 13, 2013

बिझिनेसचे बाळकडू...

बिझिनेसचे बाळकडू... उपनगरी गाडीतला तास-दीड तासाचा प्रवास म्हणजे, लोकशिक्षणाचे अगदी एकमेव उत्तम साधन आहे, असं माझं ठाम मत आहे. पण, शिक्षण घ्यायचं ठरवलं, तर अभ्यास करावा लागतो. इथेही, अभ्यासाच्या तयारीनं उतरायचं ठरवलं, तर किती वेगळ्या प्रकाराचं शिक्षण मिळतं, हे मला पटलंय. अजकाल, शाळाबाह्य शिक्षणाची खूप चर्चा होत असते. शाळाबाह्य शिक्षण म्हणजे, चार भिंतींच्या बाहेरचं शिक्षण. समाजात वावरण्याचं, जगण्याचं आणि खऱ्या अर्थानं यशस्वी होण्याचं शिक्षण... ते अनुभवातून, व्यवहारातूनच मिळतं. म्हणजे, एखादा अर्धशिक्षित, जेमतेम सहीपुरती अक्षरओळख आणि आकडेमोड करू शकणारा भाजीवाला, सदतीस रुपये किलोवाल्या भाजीचे साडेचारशे ग्रॅमचे पैसे जितक्या पटकन सांगेल, आणि जो हिशेब करण्यासाठी आपल्याला कॅलक्युलेटर घ्यावा लागेल, ते शिक्षण... तर, प्रवास हे अशा व्यावहारिक शिक्षणाचं सर्वात सुदृढ साधन असतं. या प्रवासात भेटणारी वेगवेगळी माणसं, त्यांच्यासोबत होणाऱ्या गप्पा, चर्चा यांतूनही आपली माहिती भक्कम होत असते. पण, शेजारी बसलेल्या, आपली तोंडओळखदेखील नसलेल्या प्रवाशांच्या गप्पा नुसत्या एकल्या, तरीही आपल्या माहितीत चांगली भर पडते. कित्येकदा, अशा गप्पांमधून मिळालेली माहिती, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी म्हणून वाचायला मिळते... तर, कान आणि डोळे उघडे ठेवले, तर असह्य गर्दीतला प्रवासही सुखाचा होतो, असा अनेकांचा अनुभव असतोच... म्हणून, मीदेखील अगदी लहानशा प्रवासातही, कान आणि डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करतो. कानाला इयरफोन लावून तेच तेच, स्टोअर केलेले काहीतरी एकण्याएवजी, तो बाजूला ठेवला तर प्रत्येक वेळी नवे काहीतरी एकायला मिळते, म्हणून... त्या दिवशीही मी गाडी फलाटावर थांबायच्या आधीच गाडी पकडली. सवयीनं. मग बसायला खिडकीची सीटही मिळाली. कधीकधी, नुसती खिडकीची सीट मिळण्यात मजा नसते. ती हवी तशी असली की प्रवासाला मजा येते. म्हणजे, अगदी टेकून बसल्यानंतरही सहजपणे बाहेर पाहाता येईल अशी खडकी... तर त्या दिवशी अगदी तशीच सीट मिळाली, आणि मी रेलून बसलो. पुढची दोनतीन स्टेशनं गेल्यावर गाडी पुरती भरली होती. माझ्या शेजारीच दोघंजण माझ्यासारखेच, पळती गाडी पकडून चढलेले, बसले होते. एखादा धान्याचा डबा भरल्यानंतर तो गदागदा हलवून पुरेपूर, व्यवस्थित बसवावा, तसं झालं आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या... मग माझे कान तिकडे लागले. वाईट खोड की चांगली सवय, मला माहीत नाही! एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती. आणि, बहुधा ते गुजराती असावेत. कारण, त्यांच्यात ‘बिझीनेस’च्या ‘वार्ता’ चालल्या होत्या. बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो बॅगेतले कसलेकसले हार्डवेअर कॉम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून साफसूफ करत होता. एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्याच. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेलेच... विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता. आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते. म्हणजे, ते गुजराती होते. लोकल ट्रेनमध्ये आजकाल गप्पांचे आवाज कमी वेळा घुमतात. पाऊल ठेवण्यापुरती जागा मिळाली, की पाठीवरची सॅक रॅकवर अडकवून प्रत्येकजण खिशातला इयरफोन काढून कानाला लावतो, आणि गाणीबिणी एकत, मोबाईलवर चॅट सुरू करतो. मूक संवाद... जिथे गप्पांना आवाजही नसतो. अशा गप्पा मारणाऱ्यांना न्याहाळणं, हा एक मस्त टाईमपास असतो. त्यांच्या चेहऱ्यांवर उमटणारे भाव पाहूनच, ते कुणाशी चॅट करत असावेत, याचा अंदाज येतो. पहिली गोष्ट म्हणजे, ते आईवडिलांशी किंवा भावंडांशी नक्कीच बोलत नसतात... पण समोर बसलेले ते दोघं, थेट परस्परांशी गप्पा मारत होते. मुलगा आणि वडील. मस्त, खेळीमेळीत. ते दुर्मिळ दृश्य असल्यामुळेच, माझे डोळे आणि कानही, तिकडे, साहजिकच लागले. तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसऱ्या धंद्यावर विचार सुरू होता . त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते. ‘तू काँडोमकी दुकान खोल’... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं. ... मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले... `लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं... म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं. ‘क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है’... बापानं ‘लोजिक’ सांगितलं... ‘सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये’.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला... `लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... `पापा, ऐसा करे?... साथमें ‘पिल्स’भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता.. आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती... बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं ‘बिझिनेस प्लॆनिंग’ सुरू झालं... माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो... पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या... ... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती. ... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील... ... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल. त्या बापाच्या ‘द्रष्टे’पणाचे मला कौतुक वाटले... बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली... -------------

Tuesday, September 10, 2013

समाधान...

एखादं द़श्य आपण पाहतो, त्या वेळी त्यात वेगळं काही वाटत नाही, इतकं ते सहज असतं. काही क्षणांत ते मनावरून पुसलंही जातं. आज सकाळी असंच काहीतरी मला दिसलं. आत्ता खूप वेळानंतर ते पुन्हा आठवलं. म्हणजे, ते मनावरून पुसलं गेलं नव्हतं... प्रसंग अगदी साधा! म्युनिसिपालिटीची कचऱ्याची गाडी रस्त्यावर उभी होती. सगळा कचरा, घाण, दुर्गंध खचाखच भरलेली! ... आणि गाडीवरचा एक कर्मचारी, एक कपडा हातात घेऊन उतरला. बाजूच्या एका खड्ड्यातलं पाणी बऱ्यापैकी नितळ होतं. त्यात त्यानं तो कपडा भिजवला, घट्ट पिळला, आणि गाडीचा समोरचा भाग स्वच्छ पुसून काढला. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या एका वेलावर टवटवीत निळी फुलं फुलली होती. त्यानं ती सगळी तोडली आणि समोर काचेभोवती अडकवली. नंतर तो थोडा मागे गेला... दोन्ही बाजूंना मान थोडी तिरपी करून त्यानं गाडीकडे बघितलं... त्याच्या नजरेतलं समाधान स्पष्टपणे चमकत होतं. मिनिटभरानं गाडी निघून गेली. कचऱ्याचा नकोसा दुर्गंध मागे दरवळत होता! ... मागे एकदा पाहिलेलं आणखी एक द़श्य मला आठवलं. मळानं काळेकुट्ट झालेले फाटके कपडे घातलेल्या, अंगावर मळाचे थर साचलेल्या एका भिकाऱ्यानं, रस्त्याकडेला फूटपाथवर बसण्याआधी खांद्यावरच्या फाटक्या कापडानं झाडून जागा साफसूफ केली, तेव्हाही त्याच्या डोळ्यात असंच समाधान दिसलं होतं!...

Monday, September 2, 2013

आपली माणसं...

आपली माणसं... ‘नहीं, मुझे बोलना नहीं आता.. हम इन्सान जिस भगवान की पूजा करते है, उसको कभी देखा नहीं. लेकिन आज मैंने भगवान को देखा है.. इन्सान के रूप में.. वो सामने है.. उसके सामने मैं क्या बोलू?.. बस, यही से मैं उसको प्रणाम करता हूँ’.. असे म्हणत गरीबुल्लाहने डोळे पुसले आणि बसल्या जागेवरूनच समोरच्या व्यासपीठावर बसलेल्यांकडे पाहत नमस्कार केला. नंतर काही मिनिटे तो केवळ स्तब्ध, स्तब्ध होता. शेजारी बसलेल्या आपल्या मुलाच्या पाठीवर त्याचा हात आसुसल्या मायेनं फिरत होता आणि पाणावलेली नजरसमोर, व्यासपीठाकडे लागली होती. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होतं. ते तो एकाग्रतेनं ऐकत होता. मधेच मान हलवून दुजोरा देत होता.. मध्येच हाताचं एकच बोट हलवून वक्त्याच्या वाक्याशी सहमती दर्शवत होता..
मी गरीबुल्लाच्या त्या हालचाली पाहत बाजूच्याच खुर्चीत होतो. या कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन, माईक हातात धरून बोलायचं धाडस त्याला होत नव्हतं. पण त्याच्या मनात खूप काही साठून राहिलं होतं, आणि ते त्याला व्यक्तदेखील करायचं होतं. समोरच्या वक्त्याच्या वाक्यावाक्यातून आपलंच मन मोकळं होतंय, असं त्याला वाटत असावं, हे त्याच्या हालचालींवरून मला स्पष्ट जाणवत होतं. वक्त्याचं भाषण संपलं आणि गरीबुल्लाहनं माझ्याकडे बघितलं. तो रडक्या चेहऱ्यानंच कसंबसं हसत होता. पाणावलेले डोळे उलटय़ा मनगटानं पुसत त्यानं तोच ओला हात पांढऱ्या, अस्ताव्यस्त दाढीवरून फिरविला आणि त्यानं पुन्हा हात उंचावून नमस्कार केला.. शेजारी बसलेला त्याचा मुलगा, बापाच्या कुशीत शिरून बिलगला होता. त्यालाही हुंदके फुटत होते..
गरीबुल्लाह हा पन्नाशीच्या आसपासचा इसम.. पण कष्टानं रापल्यामुळे त्याचा चेहरा वयापेक्षा मोठा वाटत होता. उत्तर प्रदेशातल्या महू जिल्ह्यातल्या एका छोटय़ाशा गावात पाव, बिस्किटं विकून कुटुंब चालवणारा गरीब मुसलमान. आजवर क्वचितच मुंबईत पाऊल ठेवलेलं. तशी कधी गरजच नव्हती. पण मुंबईहून एक पत्र आलं आणि गरीबुल्लाहनं डोक्यावर टोपी चढवली, पिशवीत एक कुडता, लुंगी कोंबली आणि घरात साठवलेले पैसे खिशात कोंबून त्यानं मुंबई गाठली.. घरातून पळून गेलेला त्याचा पंधरा वर्षांचा मुलगा आज त्याला भेटणार होता आणि मुलाला घेऊन तो घरी परतणार होता. अशा अनेक मुलांना आपले घर आज परत मिळणार होते. मायेच्या माणसांच्या पुनर्भेटीचा सोहळा साजरा होत होता..
..गोरेगावच्या बांगूरनगरातील सभागृहात कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा गरीबुल्लाह माझ्या शेजारीच बसला होता. त्याची नजर अस्वस्थ होती. खुर्चीत अस्वस्थपणे बसलेला गरीबुल्लाह सारखा मागे-पुढे पाहत होता. त्याचे डोळे भिरभिरत होते.
सभागृहाच्या प्रवेशद्वारातून वीस-पंचवीस गणवेशातील मुलं एका रांगेत, पुढे सरकू लागली आणि गरीबुल्लाह उतावीळ झाला.. प्रत्येक मुलाचा चेहरा निरखून पाहताना नकळत तो खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि नजर एका मुलावर स्थिरावताच गरीबुल्लाहचे डोळे वाहू लागले.. त्याला रडू आवरत नव्हते. खांद्यावरच्या एका रुमालानं त्यानं डोळे टिपले, आणि रडतच त्यानं माझ्याकडे पाहत माझा हात हातात घेतला.. त्याची-माझी आधी साधी ओळखही नव्हती. खरं म्हणजे, मी त्या कार्यक्रमासाठी हजर असलेला एक साधा प्रेक्षक होतो. पण गरीबुल्लाहच्या भावना न्याहाळतानाच माझा त्रयस्थपणा संपला. मी त्याच्या हातावर थोपटलं आणि आसपास बघितलं.. मागच्याच खुच्र्याच्या रांगेतही, भावनांचा बांध फुटला होता. कुणा मुलाची आई, मामा, वडील, काका.. सगळेच डोळे वाहू लागले होते. व्यासपीठावर कार्यक्रम सुरूच होता.
व्यसनी बापाचा जाच, गरिबी, मुंबईची भुरळ, आईबापांच्या रागाची धास्ती, शिक्षणाचा कंटाळा आणि कधी त्याहूनही क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेली मुलं आपल्या गावाकडच्या रेल्वे स्टेशनावर समोर दिसेल ती ट्रेन पकडतात आणि भटकत, भरकटत मुंबईत येतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दादर, कुर्ला अशा कुठल्या तरी स्टेशनवर गाडी थांबली, की ही मुलं मुंबईत पहिलं पाऊल ठेवतात आणि तेव्हापासून त्यांचं जगणं दिशाहीन होऊन जातं. भूक लागली की पोटासाठी कधी चोरी करायची, पकडला गेला की मार खायचा, कधी काहीच हाती लागलं नाही, तर नशापाणी करून फलाटाच्या कोपऱ्यात अंग मुडपून झोपून जायचं, नाहीतर मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यावरच्याच कुणाची तरी वखवख शमविण्यासाठी निमूटपणे सोसायचं..
मुंबईत दररोज अशी सरासरी २०० मुलं गावाकडून भरकटून दाखल होतात. नशीब चांगलं नसेल, तर तेच त्यांचं आयुष्य बनतं, आणि रेल्वे स्टेशन हेच घर बनतं. अशा टोळ्या तयार होतात आणि माणुसकीपासून दुरावलेली ही मुलं समाजाचा शत्रू बनून समाजाचा तिरस्कारही करू लागतात.. शिस्तीच्या आणि घडय़ाळ्याच्या काटय़ानं बांधलेल्या मुंबईकराच्या आयुष्याशी या मुलांचं कोणतंच नातं नसतं. जगण्यासाठीच्या त्यांच्या संघर्षांला सुसंस्कृत समाजानं दिलेलं ‘गुन्हेगारी’ हे नावही या मुलांना मान्यच नव्हे, माहीतही नसतं. त्यांच्यासाठी तेच जगणं असतं..
अशी अनेक मुलं समाजापासून दुरावताना दिसल्यानं, विजय जाधव नावाच्या तरुणानं त्यांना दिशा देण्यासाठी चळवळ सुरू केली. समता, ममता, तोहफा आणि लगाव-प्रेम.. अशी चतु:सूत्री डोळ्यांसमोर ठेवून ‘समतोल’ नावाची संस्था स्थापन केली आणि भरकटलेल्या अशा मुलांचं आयुष्य पुन्हा त्यांच्या मूळ रुळांवर आणण्याचं काम सुरू केलं. आजवर अशी तीन हजारांहून अधिक मुलं ‘समोतल’मुळे पुन्हा आपल्या आईबापांच्या छत्राखाली दाखल झालीत.
..गोरेगावच्या त्या कार्यक्रमातदेखील, अशाच मुलांना आपले आईबाप, दुरावलेली कुटुंबं पुन्हा भेटणार होती. घरच्यांवर रागावून घराबाहेर पडलेली ती मुलं, समतोलच्या शिबिरातील दीड महिन्यांच्या ‘मनपरिवर्तन’ संस्कारामुळे घराच्या ओढीनं आतुरली होती.
सगळी मुलं समोर बसली आणि तो ‘पाणावलेला सोहळा’ सुरू झाला.
इतका वेळ केवळ भिरभिरत आपल्या मुलांना शोधणाऱ्या आया, मामा, बापांचे डोळे वाहत होते, मुलं समोर बसली तेव्हा त्यांचीही तीच अवस्था झाली.
त्यांच्या नजरा भिरभिरत गर्दीतली ‘आपली माणसं’ शोधू लागल्या आणि नजरानजर होताच भावनांचे बांध फुटले..
मग एकेका मुलाचं नावं उच्चारलं जाऊ लागलं आणि त्याला पुन्हा आपल्या घरी न्यायला आलेल्या आईबापांचा तो विरहानंतरचा पुनर्भेट सोहळा व्यासपीठावरच सुरू झाला. त्या क्षणी सभागृह भारावून गेलं.
टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा, विरह संपल्याच्या समाधानाचं हासू आणि विरहाच्या आठवणींनी दाटलेले आसू असं संपूर्ण संमिश्रण सभागृहात दाटलं..
प्रमुख वक्त्यांनाही बोलताना भावना अनावर झाल्या..
गरीबुल्लाहनं व्यासपीठावर जाऊन आपल्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलाला मिठी घातली, विजय जाधवच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि मुलाला कुरवाळत, पाणावलेल्या डोळ्यांनिशी तो पुन्हा माझ्या शेजारच्या त्याच्या खुर्चीत बसला.
आता त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही रडत होता.
मग, मुलांच्या पालकांपैकी कुणीतरी बोलावं, असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सुचवलं, पण कुणीच उठलं नाही.
मी गरीबुल्लाहला खुणेनंच ‘बोला’, असं सांगितलं. पण त्यानं मान हलवून नकार दिला.
आणि व्यासपीठावर जाऊन बोलण्याऐवजी, माझ्या कानाशी तो बोलू लागला. मीही त्याच्या अगदी तोंडाजवळ कान नेला आणि गरीबुल्लाहला जे व्यासपीठावर बोलता येणार नव्हतं, ते त्यानं माझ्या कानाशी मोकळं केलं.
तो थांबला आणि मी मान मागे घेतली, तेव्हा गरीबुल्लाहच्या डोळ्यांतून टपकलेल्या पाण्यानं माझा शर्ट खांद्यावर भिजला होता..

गणपती इलो रे...

पावसाची सणसणीत सर नुकतीच कोसळून गेलेली असते. उगवत्या उन्हात तिळाची पिवळीधम्मक फुले पावसाचे थेंब पाकळ्यांवर घट्ट पकडून आणखीनच सोनेरीसोनेरी होऊन चमकत असतात. सगळ्या हिरवाईवर फुलांचा सुंदर साज चढलेला असतो आणि पोटरीला आलेल्या भाताच्या लोंब्यांचा धुंद सुगंध सगळ्या परिसरात घुमत असतो.. क्षणापूर्वी कोसळून गेलेल्या पावसानंतर आकाशातले ढगही पांगलेले असतात, आणि लांबवरच्या डोंगरकडय़ातून अधीरपणे जमिनीकडे झेपावत कोसळणाऱ्या धबधब्याच्या दुधाळ धारेचे वळसे स्पष्ट दिसू लागतात. पायथ्याच्या रानातला पक्ष्यांचा किलबिलाट घंटानादासारखा घुमत असतो. मधूनच एखाद्या मोराची लांबलचक आरोळी त्या किलबिलाटाला संगीत देते आणि अवघं रान मोहरून डोलू लागतं..
गावाबाहेर असा ‘मोहोर’ फुललेला असतानाच गावातल्या तांबडय़ाभडक मातीच्या रस्त्यांकडेची हिरवी झाडंही आसुसल्या नजरेनं रस्त्याकडे नजरा खिळवून बसलेली असतात. सकाळच्या पावसानं रस्ता कसा धुवून निघालेला असतो. उन्हं पडू लागतात आणि गावात लांबवरच्या रस्त्यापलीकडे ताशाचा तडतडाट ऐकू येतो. घराघरात पहाटेपासून सुरू झालेली लगबग रस्त्यावर दिसू लागते. देवघरात पूजाअर्चा आटोपल्यानंतर घुमणारा घंटांचा किणकिणाट आणि अगरबत्त्या, धूप आणि वळसेदार चंदनी गंधाचा वास घराचे उंबरठे ओलांडून बाहेर पडतो. झांजा खणखणू लागतात आणि ज्यासाठी आसुसलेपणानं रस्त्यांनी आपल्या नजरा खिळवलेल्या असतात ते दृश्य जिवंत होऊन उमटू लागते..
‘कारखान्या’बाहेर लाल रंगात रंगविलेल्या पाटांची रांग लागलेली असते. आंघोळी उरकून, नवे कपडे घालून आणि डोक्यावर टोप्या चढवून बच्चेकंपनीला बरोबर घेऊन आलेली वडीलधाऱ्यांची गर्दी कारखाना उघडायची वाट पाहत थांबलेली असते.
खरं म्हणजे, कारखाना बंद झालेलाच नसतो. फळ्यांच्या दरवाज्याआड रात्रंदिवस तो सुरूच असतो. आदल्या रात्री जेवणखाण उरकून आतमध्ये बसलेली कारागिरांची टोळकी, आपल्यासमोरच्या मूर्तीला ताजा जिवंतपणा देण्यात दंगलेली असतात.
..लावणीची कामं आटपत आली की ज्येष्ठ-आषाढात कारखान्यांची धामधूम सुरू व्हायची. एकेक सुबक गणेशमूर्ती जोडून झाली की त्याला श्रावणातलं कोवळं उन्ह दाखवायचं आणि पांढऱ्या शाडू मातीच्या त्या मूर्तीवर पहिली सफेदी द्यायची.. मग कारखान्यातल्या फळ्यांच्या मांडणीवर रांगेने देखण्या मूर्ती विराजमान व्हायच्या. आमच्यासारखी पोरं शाळेत येता-जाताना कारखान्यासमोर घुटमळायची. मांडणीवरच्या रांगेतलीच एखादी पांढरीशुभ्र मूर्ती तयार होत असतानाच मनात भरलेली असायची. त्या मूर्तीला प्रत्येक नव्या दिवशी नवा साज चढलेला असायचा. श्रावण संपत आला की प्रत्येक मूर्ती रंगांनी सजून जायची आणि डोक्यावरच्या मुकुटांना, गळ्यातल्या आणि दंडावरच्या दागिन्यांना सोनेरी रंग चढायचा. मागचे केस काळे व्हायचे आणि ‘आता घरात गणपती येणार’, अशी एक अधीर जाणीव येणारा प्रत्येक दिवस मोजू लागायची..
गोकुळाष्टमीनंतर कारखान्यातल्या गणपतींची ‘रेखणी’ सुरू व्हायची. मूर्तीचे डोळे रंगविणे हे सर्वात कौशल्याचं काम. बाकीच्या रंगकामासाठी फावल्या वेळात कुणीही कारखान्यात जाऊन मदत करत असे. अवघं गाव गणपतीच्या आगमनाच्या तयारीसाठी आपापल्या परीनं मदत करत असायचं. रेखणीचं काम सुरू झालं की गावातल्या मोजक्या कलावंतांची मागणी वाढू लागायची. प्रत्येक कारखान्यात आळीपाळीनं जाऊन गणपतींचे डोळे रंगवण्याचं काम ते करायचे.
..बशीत तयार केलेला काळा रंग डाव्या हाताच्या मनगटावर घेऊन त्यामध्ये ब्रशचे असंख्य वळसे फिरवत ब्रशला टोक आणून नंतर त्या कालाकाराचा उजव्या हातातला ब्रश मूर्तीच्या भुवईकडे गेला की पाठीमागे उभे राहून दोन्ही गुडघ्यांवर हात घेऊन ओणव्यानं ही कलाकारी न्याहाळणाऱ्या आम्हा पोराटोरांचा श्वास अक्षरश: रोधला जायचा. तो कारागीरही क्षणभर स्वस्थ व्हायचा, आणि श्वास जणू छातीत भरून घेऊन ब्रश हळुवारपणे मूर्तीच्या कपाळाकडे न्यायचा. जिभेचं टोक बाहेर काढून, डोळे बारीक करून, मान किंचितशी तिरपी करून आणि मागे झुकून गणपतीच्या रेखाटलेल्या भुवयांचा अंदाज घ्यायचा, आणि आमची चलबिचल सुरू व्हायची. आता त्या डोळ्यांमध्ये काळी बुबुळं उतरली की गणेशाची मूर्ती पूर्ण तयार होणार असायची. रेखणी करणारा तो कलाकार हळूच आमच्या डोळ्यातही पाहतोय, असा भास आम्हाला व्हायचा. आमचे डोळे गणपतीच्या रंगवून झालेल्या भुवयांवर खिळलेले असायचे. आमच्या नजरेतल्या भावातूनच तो भुवयांचं काम नीट झालंय की नाही याचा अंदाज घ्यायचा, आणि पुन्हा डाव्या मनगटावरल्या काळ्या रंगात ब्रश फिरवून तो डोळे रंगवायला घ्यायचा.. आमच्या छातीत उगीचच धडधडल्यासारखं काहीतरी सुरू झालेलं असायचं. दोन्ही डोळ्यांची बुबुळं प्रमाणशीर झाली नाहीत तर परिश्रमानं घडविलेली आणि रंगानं मढलेली ती गणेशमूर्ती अचानक वेगळीच वाटू लागायची. असं होऊ नये म्हणून आम्ही मनातल्या मनात गणपतीचीच प्रार्थना करायचो, आणि मनातच हात जोडायचो. कारण आमचे हात गुडघ्यांवर असायचे.. ते काढले तर मूर्तीपासून नजर लांब जाणार. ओणवं राहून तासन्तास मूर्तिकाम न्याहाळण्याचा वेगळाच छंद त्या दिवसांत आम्हा शाळकरी मुलांना लागलेला असायचा.
रेखणीकारानं डोळे रंगवले की पुन्हा थोडं मागं झुकून बसल्याबसल्याच तो मूर्ती न्याहाळायचा. मनासारखं काम झाल्यानं मान हलवायचा आणि त्या मूर्तीला जिवंतपणा यायचा. काही वेळाआधीपर्यंतची मूर्ती अधिकच वेगळी वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत खटय़ाळ हास्य भरलंय, असा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती उगीचच, गंभीरगंभीर वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत आईच्या मायेचा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती वडिलांसारखी कडक, कठोर वाटू लागायची. एखादी मूर्ती अगोदरपासूनच कुठेतरी बघितल्यासारखी ओळखीओळखीची वाटू लागायची..
संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला की घराकडे परतताना, आपल्या घरात दुसऱ्या दिवशी कोणता गणपती आणायचा हे मनात पक्कं ठरलेलं असायचं..
..म्हणून चतुर्थीला कारखान्याबाहेरच्या वडीलधाऱ्यांच्या गर्दीत, आमचीही लुडबुड सुरू असायची. हातातल्या झांजांची उगीचच खणखण करत आम्ही कारखान्याच्या फळ्यांच्या फटीतून आत नजरा लावायचो, आणि काल नक्की केलेला गणपती मांडणीवर कुठे आहे, याचा अंदाज घ्यायचो. पण आज सगळ्याच मूर्ती सारख्याच आहेत, असंच वाटायचं.
कारखान्याच्या फळ्या काढल्या जायच्या. कारखान्याचे मालक, आंघोळ करून, नवे कपडे घालून, डोक्यावर टोपी घालून गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यांच्या कपाळावर कुंकवाची लालभडक लांबलचक रेषा असायची. वर्षभर दररोज भेटणारा हा माणूस त्या दिवशी काहीतरी वेगळाच, अनोळखी वाटायचा, आणि आपल्या घरचा गणपती याच्या हातून घडलाय हे नकळतपणे जाणवून त्याच्याबद्दल अपार आदर वाटू लागायचा. नंबर आला की आम्ही पुढे व्हायचो. मग मांडणीवरची मूर्ती घेऊन एखादा कामगार आमच्या घरून नेलेल्या पाटावर आणून ठेवायचा, आणि लगेचच त्या मूर्तीसमोर उदबत्त्या ओवाळल्या जायच्या. गणपतीच्या अंगावर रेशमी वस्त्र पांघरले जायचे. समोर सव्वा रुपया ठेवून आम्ही सगळे त्या मूर्तीला नमस्कार करायचो, आणि सगळी गर्दी गजर करायची..
‘गणपती बाप्पा मोरया’..
झांजांचा किणकिणाट एव्हाना रस्तोरस्ती सगळीकडेच घुमू लागलेला असायचा. कारखान्याच्या मालकाच्या हातात गणपतीची किंमत, नारळ देऊन त्याला वाकून नमस्कार करून गणपतीचा पाट उचलला जायचा आणि गणपती आमच्या घराच्या दिशेने निघायचा. वेगळ्याच आनंदात बेहोश होऊन प्रत्येकजण गणपती बाप्पाचा गजर करत असायचा. रस्त्यावर पाहावे तिकडे, घरोघरी निघालेल्या गणेशमूर्ती आणि मोरयाचा गजर..
अचानक एकाच गल्लीत जाणारी पाचदहा कुटुंबं रस्त्यावरच एकत्र यायची, आणि गणपतीबाप्पांची भव्य मिरवणूकच सुरू व्हायची. झांजांचा आवाजही दहापटीनं वाढलेला असायचा, आणि बाप्पाचा गजरही जोशात सुरू व्हायचा. एवढी गर्दी झाली की अचानक ताशेवाले कुठून तरी उपटायचे, आणि मिरवणुकीसमोर न सांगताच ताशांचा तडतडाट सुरू व्हायचा.
दरवाजाशी आलेल्या मूर्तीला ओवाळून तिचं स्वागत व्हायचं, आणि अगोदर तयार असलेल्या मखराशेजारी गणपतीची देखणी मूर्ती विराजमान व्हायची.
मग घराघरांत पूजेची धांदल सुरू व्हायची. स्वयंपाकघरात मोदकांची तयारी सकाळपासून सुरू झालेली असायची. काही वेळातच घरोघरी आरत्यांचे सूर घुमू लागायचे, आणि अवघं गाव धूप, अगरबत्त्यांच्या वासानं घमघमून जायचं.
सणाचं एक वेगळं, पारदर्शक असं रूप गावावर दाटलेलं असायचं.
त्या काळात गावात मुद्दाम सनईवाले यायचे. घरोघरी जाऊन सनईचौघडय़ाची सेवा देणारे हे गट त्या चार दिवसांत कुठल्यातरी एखाद्या घरात हक्कानं मुक्काम ठोकायचे. मग त्या घरात संध्याकाळीही सनईचौघडा घुमायचा. त्यांची ती एकसुरी पेटी वाजवायला मिळावी, म्हणून आम्ही पोरं त्या घरात नेहमीच घुटमळत राहायचो. उत्सवकाळात एकदा तरी ती पेटी वाजवायला मिळावीच, म्हणून!
चतुर्थीच्याच दिवशी अनेक घरांत सहस्रावर्तनं व्हायची. गावातली तरुण मुलं, गट तयार करायची आणि घरोघरी जाऊन सहस्रावर्तनं म्हणायची. पूजेनंतर दुपारच्या नैवेद्याआधी निम्म्या गावातील घरांमध्ये सहस्रावर्तनांचे पाठ झालेले असायचे. मग मोदकांच्या पंक्ती झोडून ही तरणी मुलं दुपारच्या वेळी घरात ताणून द्यायची.. गणेशोत्सवाचा घराघरातला सण पहिल्याच दिवशी अशा तऱ्हेने सगळ्या गावाचा सण बनून जायचा..
गावातल्या मंदिरातही सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. रात्री घरोघरी आरत्यांची जणू चढाओढ लागायची. दिवेलागणीच्या वेळी अवघं गाव आरत्यांच्या सुरात न्हाऊन निघालेलं असायचं. गल्लीतली सगळी गर्दी आरतीसाठी घरं घेत हिंडायची, आणि टिपेच्या आवाजात आरत्या गाताना गावात भक्तिरसाचा जणू महापूर लोटायचा. आरत्यांपाठोपाठ वाटला जाणारा प्रसाद त्या काळात घरीच तयार व्हायचा. तळव्यावर मावणार नाही एवढा प्रसाद घराघरातून पोटात रिचवल्यावर, रात्रीच्या घरच्या जेवणासाठी पंगती तयार व्हायच्या तोवर देवळात शंखनाद सुरू झालेला असायचा. सार्वजनिक गणपतीची आरती हा एक सुंदर सोहळा असायचा. तिला हजेरी लावण्याच्या घाईत कसंतरी रात्रीचं जेवण उरकलं जायचं आणि पळापळ करत माणसं देवळात हजर व्हायची. देवळातली मुख्य घंटा वाजवणारा कुणी जणू मानक ऱ्यासारखा ठरलेला असायचा. आरतीला ताल असला पाहिजे, उगीच बेंबीच्या देठापासून बेसूरपणे कुठलीही ओळ जाऊ नये यासाठी काही जाणकार माणसं गर्दीवर नजरेनंच जरब ठेवत असत.
काही मिनिटं नुसताच घंटानाद झाल्यावर गंभीर शंखनाद घुमायचा आणि तबला-ढोलकीबरोबर झांजांचा तालबद्ध किणकिणाट सुरू व्हायचा.. एकापाठोपाठ एक आरत्यांची चवड उलगडली जायची आणि सुरांच्या लगडीवर स्वार होत रात्र पवित्र होऊन जायची.. ‘येई हो विठ्ठले’.. म्हणणारा एकच कुणी गावात असायचा. ‘निढळावरी कर’.. म्हणणारा त्याचा आर्त स्वर विशिष्ट जागेवर टिपेला गेला की होणारा झांजांचा किणकिणाट, घंटानाद आणि ढोलकीचा ताल यांचा सुंदर मिलाफ आरत्यांच्या वातावरणातला सर्वात आनंददायी, शब्दांत न सापडणारा असा आगळा क्षण ठरायचा..
सगळा गाव जणू त्या क्षणात वेढून जायचा.
असं तब्बल दहा दिवस चालायचं. दुसऱ्या दिवशीपासून गणेशदर्शनासाठी घराघरांत गर्दी सुरू व्हायची आणि प्रसादाची ताटं रिकामी व्हायची. सगळ्या गावावर उत्सवाचं एक सोज्ज्वळ, उत्सवी रूप चढलेलं दिसायचं.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, गावातल्या गणपतीसमोरच्या आराशीत झाडंपानं, फुलं, वेलींचाच मोठा भरणा असायचा. गावागावांत वीज आली आणि मुंबईहून गणपतीसाठी गावाला येणाऱ्या चाकरमान्याच्या सामानात इलेक्ट्रिकच्या माळाही दिसू लागल्या. फुलं-पानांच्या सजावटींची जागा नंतर लायटिंगनं घेतली. घरी बनणाऱ्या प्रसादाची जागा, मुंबईतून येणाऱ्या माव्याच्या मोदकांनी घेतली, आणि सकाळी लवकर घरच्या गणपतीची पूजा आटोपण्याच्या घाईत भटजीची वाट पाहायला नको म्हणून मुंबईवरनं येणारा चाकरमानी आपल्यासोबतच पूजेची कॅसेट किंवा डीव्हीडी आणू लागला. गावाबाहेरच्या रानात फुलणारी सुगंधी फुलं बाजारातल्या नकली फुलांच्या झगमगाटात लाजल्यासारखी दिसू लागली, आणि सहस्रावर्तनांच्या सुरात घुमणाऱ्या अनेक घरांत दिवसभर अथर्वशीर्षांची कॅसेट उलगडत राहिली.. उकडीच्या मोदकांचा घाट घालण्याच्या घाईत सकाळपासून लगबगलेली स्वयंपाकघरं ऑर्डरच्या मोदकांच्या भरवशावर निवांत दिसू लागली.
गावाचं जुनं रूप पालटून शहरीपणाचं पाणी गावावर चढू लागलं, तसतसा गणोशोत्सवाचा कौटुंबिक ग्रामसोहळाही संकुचित होत गेला. आता गावात गल्लीतली माणसं एकमेकांना फारसं ओळखत नाहीत. गणेशोत्सव अजूनही साजरा होतो. सनईवाल्यांच्या नव्या पिढीनं तो धंदा बंद केलाय. सार्वजनिक देवळातल्या उत्सवासाठी कीर्तनकार मिळणंही मुश्कील झालं, म्हणून कधी जादूचे प्रयोग, नकला आणि मिमिक्री करून उत्सव साजरा होतो. ‘येई हो विठ्ठले’ म्हणताना, स्वरानंदात गुंगणारा तो स्वरही आता थकला आहे. आणि तस्साच खणखणीत नवा स्वर गावाला सापडलेला नाही. देवळातली आरतीही लवकरच संपते. शंख वाजवायला कुणी पुढेच येत नाही, आणि तो शंखनादही अलीकडे कमीच घुमतो. गावात गाडय़ा, रिक्षांची वर्दळ वाढली. त्यामुळे देवळातला घंटानाद अलीकडे घराघरांपर्यंत ऐकूच येत नाही.
..मुख्य म्हणजे, जुने गणपतीचे कारखानेही आता कमी झालेत. नवे मूर्तिकार भव्य मूर्ती बनवतात. गावात सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या वाढलीये. गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्रीपासूनच गणपतीच्या मिरवणुका सुरू झालेल्या असतात..
पण गणेशोत्सव साजरा होतोच. भक्तीनं, प्रेमानं आणि तितक्याच उत्साहानं!!