Saturday, August 20, 2011

माणसाशी नातं जोडणारी मूर्ती!

सुमारे ३० वर्षांपूर्वी, १९८१ मध्ये, मुंबईतील एका लहानशा अपार्टमेंटमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू होती. भविष्याचा वेध घेतला गेला, आणि, आपल्या कामाची जगानं नोंद घेतली पाहिजे यावर एकमत झाले. त्यासाठी आपली कंपनी पूर्णपणे व्यावसायिकरीत्या चालविली पाहिजे, असे ठरले, आणि ‘इन्फोसिस’ने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या जागतिक बाजारात पदार्पण केले. केवळ ‘गुणवत्ता’ हाच कंपनीतील अधिकारपदाचा निकष निश्चित झाला. नातेवाईकांचा गोतावळा, कुटुंबाचे वर्चस्व अशा गोष्टींना कंपनीच्या व्यवस्थापनात अवास्तव थारा द्यायचा नाही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. जेमतेम दहा हजार रुपयांच्या ‘उसनवारी’वर सुरू झालेल्या ‘इन्फोसिस’ने कारभार सुरू केला.तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या वाटचालीने आज यशाचे शिखर गाठले आहे. आज या कळसाध्यायाची आणखी एक ओवी लिहिली जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या निरपेक्षभावाचा आदर्श आणि यशाच्या स्वप्नाची कास धरून ‘इन्फोसिस’ने वाटचाल केली, ते एन. आर. नारायणमूर्ती उद्या, २० ऑगस्टला ६५ वर्षांचे होत आहेत. कॉर्पोरेट जगतात हे वय निवृत्तीचे नसते. पण नैतिक मूल्ये जपणारे नारायण मूर्ती मात्र, इन्फोसिसच्या कारभारातून उद्यापासून अलिप्त होत आहेत. आज इन्फोसिसच्या बंगलोरमधील संकुलात नारायणमूर्तीच्या ‘इन्फोसिस कुटुंबा’ने त्यांना आदराने निरोप दिला. हा कार्यक्रम प्रसार माध्यमांसाठी खुला नव्हता. नारायण मूर्तीचे कुटुंबीय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही दिग्गज, इन्फोसिसचे आजी-माजी सहसंस्थापक आणि कंपनीच्या यशस्वी वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यात मोलाचा वाटा उचलणारे अधिकारी अशा मोजक्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कर्नाटकमध्ये २० ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या नारायणमूर्ती यांच्या आयुष्याचा प्रवास अद्भुतांनी भारलेला आहे. इन्फोसिसचा जन्म आणि वाटचाल हे यातील सर्वात अचंबित करणारे टप्पे ठरले. १९६७ मध्ये म्हैसूरला अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर कानपूर आयआयटीमधून ‘एम. टेक’ झालेल्या नारायणमूर्तीनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले, आणि पुणे येथून इन्फोसिसचा प्राथमिक प्रवास सुरू झाला. आज या कंपनीची उलाढाल २७ हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. १९९३ मध्ये इन्फोसिसची भारतीय शेअरबाजारात नोंदणी झाली, आणि पुढे सहा वर्षांत, १९९९ मध्ये इन्फोसिस ही अमेरिकेच्या ‘नॅसडॅक’मध्ये नोंदणी झालेली पहिली भारतीय कंपनी ठरली. जागतिक बाजारपेठेत दमदार पदार्पण केलेल्या या कंपनीने आपल्या भरभराटीच्या प्रत्येक पावलासोबत चालणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि हजारो गुंतवणुकदारांना संपत्तीची दालने खुली केली. इन्फोसिस हा भारतात जन्मलेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चमत्कार ठरला, आणि नारायण मूर्ती या चमत्काराचे शिल्पकार, प्रेरणास्थान ठरले..व्यावसायिक द्रष्टेपणाला माणुसकीची जोड देत कंपनीचे बळ वाढविणाऱ्या नारायणमूर्तीनी कंपनीच्या विकासात कोणतीही तडजोड केली नाही. नोकरीतील आरक्षणासारख्या भावनिक मुद्दय़ाला महत्त्व न देता, गुणवत्ता हा एकमेव निकष निश्चित केला. मात्र, भरभराटीच्या वाटचालीतदेखील, सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सामान्य जनतेच्या जगण्याशी नाते जोडायचे असेल, तर सामान्यांसारखेच राहिले पाहिजे, या तत्वाशी बांधील राहिले. म्हणूनच समाजासोबतचे अंतर वाढविणे अमान्य असणारी ही मूर्ती कॉर्पोरेट विश्वाचा आगळा आदर्श ठरली.. नारायण मूर्तीनी १९८१ ते २००२ या काळात इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. २००२ ते २००६ या काळात संचालक मंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले. ऑगस्ट २००६ मध्ये त्यांनी कार्यकारी जबाबदारीतून निवृत्ती घेतली, आणि पुढे कंपनीचे केवळ अ-कार्यकारी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत राहिले. देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया रचणाऱ्या इन्फोसिसच्या या शिल्पकारास २००८ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले. आता देशभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी ही मूर्ती आपले ज्ञान वाटत सुटणार आहे. पश्चिम बंगालच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची नवी वाट आता नारायणमूर्ती आखणार आहेत