Sunday, April 19, 2020

‘अंतर’भान!


मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ गेल्या मंगळवारी संध्याकाळी अचानक गर्दी जमली आणि अगोदरच करोनाच्या उद्रेकाच्या भयात भरडलेला सामान्य मुंबईकर चिंताग्रस्त झाला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेचे काही मिनिटांतच पुरते उल्लंघन झाल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे या चिंतने सरकारी यंत्रणांची झोप उडाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्यक्तीव्यक्तीमधील अंतराची मर्यादा पाळणे हाच एकमेव उपाय सध्या हातात असताना, अचानक अनावर गर्दी अवतरते तेव्हा सोशल डिन्स्टन्सिंगचे बारा वाजणार हे स्पष्टच आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला मुंबईसारख्या महानगरात गेल्या काही दिवसांपासून लोकांनी पाने पुसल्याच्या घटना अनेकदा घडल्या. शहर आणि उपनगरांतील ज्या भागांत या आजाराचा मोठा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तेथील लोकसंख्या आणि राहणीमानाची स्थिती पाहता, हा नियम धाब्यावर बसणार हे स्पष्टच होते. धारावीसारख्या परिसरात, जेथे दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्यांमध्ये दाटीवाटीनेच माणसे कशीबशी छपराखाली स्वतःस कोंबून घेतात, तेथे हा नियम धाब्यावर बसविल्याखेरीज राहणेच अशक्य होणार हे वास्तव आहे. २४० हेक्टरवर वसलेल्या दाटीवाटीने या वस्तीच्या जनजीवनाची घडी या साथीने विस्कटून गेली आहे. श्रमणाऱ्या हातांनी दिवस उजाडला की घराबाहेर पडायचे तेव्हा त्या झोपडीतील इतर माणसांना दीर्घ श्वास घेता येईल, हा येथील जगण्याचा अलिखित नियम असल्याने, दिवसाच्या काळात झोपडीच्या छपराखाली वावरणाऱ्यांची संख्या आपोआपच कमी होत असते. निवाऱ्याची जागादेखील आळीपाळीने वाटून घेतली तरच कधीतरी कुणा एखाद्यास जमिनीवर पाठ टेकविण्याची संधी मिळावी अशा परिस्थितीत ज्या महानगरात असंख्य लोक जगतात, तेथे सर्वांना घरातच राहण्याची वेळ आल्यास एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळणे केवळ अशक्य आहे. धारावीसारख्या दाट वस्तीतील हेच वास्तव असल्याने, करोना संकटातही घराबाहेर वावरणे ही अनेकांची अपरिहार्यता ठरली आहे. सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासण्याच्या या अपरिहार्यतेकडे मानवतेच्या दृष्टीने पाहिले, तर मुंबईबाहेर जाण्यासाठी झालेली धडपड ही एका अर्थाने मरणापासून पळ काढण्यासाठी, केवळ जगण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड होती, असेही म्हणता येईल.
महाराष्ट्रात धारावी हे एकच अशा केविलवाण्या जिण्याचे केंद्र नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आणि २०११ च्या जनगणनेनुसार, झोपडपट्ट्यांची आणि झोपडीवासींची लोकसंख्यावाढ दयनीय आहे. महाराष्ट्रातील १८९ शहरांना झोपडपट्ट्यांनी वेढले असून एक कोटी १८ लाख ४८ हजार लोकसंख्या अशा दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. देशातील अडीच हजारांहून अधिक शहरांमधील झोपडपट्टीवासीयांची एकूण लोकसंख्या साडेसहा कोटींच्या घरात आहे. ही आकडेवारी पाहता, देशभरातील झोपडीवासींपैकी तब्बल १६ टक्क्यांहून अधिक झोपडीवासी एकट्या महाराष्ट्रातील १८९ शहरांत राहतात, आणि त्यापैकी मोठी लोकसंख्या एकट्या मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एकवटलेली आहे. २०११ च्या जनगणना नोंदींनुसार, देशातील महानगरपालिका क्षेत्रांतील शहरांची लोकसंख्या ११ कोटी ६५ लाख ५८ हजार ७४५ एवढी असल्याचे २०११ च्या जनगणनेनुसार दिसते. त्यापैकी दोन कोटी ५० लाख ९९ हजार ५७६ एवढी लोकसंख्या झोपड्यांमध्ये राहते. मुंबई महापालिका क्षेत्राची लोकसंख्या एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ एवढी आहे, आणि त्यापैकी सुमारे ४२ टक्के, म्हणजे ५२ लाख सहा हजार ४७३ एवढी लोकसंख्या  झोपडपट्ट्यांमध्ये एकवटली आहे.
झोपडपट्ट्यांचा आकुंचित परिसर आणि त्यामध्ये दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या पाहिल्या, तर लोकसंख्येच्या घनतेचा मुद्दा किती गंभीर आहे हे ध्यानात येते. एका पाहणीनुसार, मुंबईच्या एक चौरस किलोमीटरच्या, म्हणजे, दहा लाख चौरस मीटरच्या परिसरात २० हजार ६२४ माणसे राहतात. नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार, झोपडपट्ट्यांतील पन्नास टक्के कुटुंबांकडे केवळ एक लहानशी खोली असते. मुंबईतील प्रत्येक चार जणांपैकी एक माणूस झोपडीवासीय आहे, असे म्हणतात. धारावीसारख्या परिसरात लहानलहान घरांमध्ये २० हजारांहून अधिक वेगवेगळे लघुउद्योग चालतात. एक चौरस किलोमीटर क्षेत्रात जवळपास ७० हजार माणसांना दाटीवाटीने रहावे लागते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथे शंभरदीडशे चौरस फुटाच्या एका झोपडीत सरासरी सहाजण राहातात. तर वरळीच्या कोळीवाड्यातील लोकवस्तीची घनता एक चौरस किलोमीटरमागे सुमारे ९२ हजार एवढी आहे. अशा घनदाट वस्तीत शारीरीक अंतराची मर्यादा राखणे केवळ अशक्य असते, हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
केवळ दाटीवाटीने राहण्यापुरतीच झोपडपट्ट्यांची समस्या मर्यादित नाही. या परिसरांत आरोग्यास पोषक अशा नागरी सुविधांचीही वानवाच दिसते. अगोदरच अपुऱ्या, अस्वच्छ असलेल्या प्रत्येक एका सार्वजनिक शौचालयमागे  रोज सुमारे दीड हजार रहिवासी असा वापर होतो. तेथील पाण्यामुळे पसरणारी अस्वच्छता, घराघरांत चालणाऱ्या उद्योगांमुळे जागोजागी साचणारे कचऱ्याचे ढिगारे, इतस्ततः फिरणारी मोकाट जनावरे, गळक्या जलवाहिन्यांमुळे मिळणारे दूषित पिण्याचे पाणी, अशी अनेक कारणे मुळातच रोगराईस निमंत्रण देत असल्याने, साथीच्या कोणत्याही आजाराचे पहिले आक्रमण अशाच परिसरांवर होत असते.
गेल्या दोन दशकांत मुंबईची लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढत गेली. मात्र, मुंबईच्या भौगोलिक क्षेत्रास मर्यादा असल्याने, या वाढत्या लोकसंख्येस सामावून घेण्याच्या क्षमतेवर सहाजिकच मर्यादा येतात. त्यामुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो. एका बाजूला मर्यादित भूक्षेत्रावरील वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उभ्या विकासाची कास धरली गेली. कमीत कमी क्षेत्रावर उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या, तरी नागरी सुविधांवरील ताण वाढतच होता. दुसरीकडे, झोपडपट्ट्या कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पूर्ण असफल ठरून झोपडपट्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्यानंतर नव्या झोपडपट्ट्या जागोजागी अस्तित्वात येत असल्याने लोकसंख्येचा विस्फोट अटळच ठरत होता. हा वेग रोखला नाही, तर येत्या दहा वर्षांनंतर मुंबईची लोकसंख्या पावणेतीन कोटींच्या घरात जाईल, असे काही जागतिक संस्थांचे अहवाल सांगतात.
करोनाच्या साथीनंतर पसरलेल्या अस्वस्थतेतून नेमका हाच, लोकसंख्येच्या घनतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दाटीवाटीने राहणाऱ्या जनतेस सोशल डिस्टन्सिंगसारखी अपरिहार्य अटदेखील अमलात आणता येऊ नये, हे दुर्दैवी आहे. रस्त्यावर इतस्ततः दिसणारी गर्दी हा त्या अपरिहार्यतेचाच एक परिणाम आहे. घर नावाच्या एका आक्रसलेल्या चौकटीत दाटीवाटीने बसण्यापेक्षा, रस्त्यावर भटकत राहिले तर घरातील सोशल डिस्टन्सिंग तरी पाळता येईल, असा विचार करून जिवावर उदार झालेली केविलवाणी माणसे आता दिसू लागली आहेत. त्यांच्यासमोर करोनापासून वाचणे एवढा एकच प्रश्न नाही. या साथीशी झगडताना, जगण्याच्या अन्य साधनांची उपलब्धता हादेखील मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. सर्वत्र टाळेबंदी असल्याने उद्योगधंदे मंदावले आहेत, रोजगाराची साधने संपुष्टात आली आहेत, आणि भुकेचा प्रश्न दिवसागणिक भयाण रूप घेऊ लागला आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी भूक भागविण्याची साधने आपल्या हाती अगोदर पडावीत यासाठी केविलवाणी चढाओढ सुरू झाली आहे. या संघर्षात भरडताना सोशल डिन्स्टन्सिंग हा मुद्दा आपोआप डावलला जातो, कारण तसे केले नाही तर जगणे मुश्किल होईल अशा भयाचे सावट गडद होऊ लागले आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर टीका होणे साहजिक आहे. गर्दीमुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतात हे खरे आहे. पण या गर्दीमागची अपरिहार्यता लक्षात घेण्याची गरज आहे. तसे झाले तर माणुसकीचे झरे जिवंत राहतील. नाईलाजाने गर्दी करणाऱ्यांना तिटकाऱ्याची वागणूक तरी मिळणार नाही. आज लोकांमधील शारीरीक अंतर वाढले आहे. ती अपरिहार्यता आहे. पण त्यामुळे मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. तरच, ‘अंतर’भान जागे आहे, असे म्हणता येईल.

Tuesday, April 7, 2020

नवता आणि परंपरा!

नवता आणि परंपरा...
इंद्रधनूच्या जवळपास सगळ्या रंगांचा सुरेख संगम साधत रंगविलेला केशसंभार, आधुनिक वेषभूषातत्वानुसार अंगाचा आवश्यकतेपुरता भाग झाकला जाईल एवढाच वस्त्रसंभार, हातात इंपोर्टेड पर्स आणि पायात हायहिल सॅंडल अशा मादक वेषातली ती सुंदरी आपल्या गाडीतून उतरली आणि पन्नासेक पावलांवर असलेल्या ब्यूटी पार्लरच्या दिशेने चालू लागली.
आसपासचा रस्ता, काही क्षण थबकला!
तिकडे कुठेच लक्ष न देता ती रूपगर्विता आपल्याच तोऱ्यात मादक पदन्यास टाकत रस्ता कापत होती...
...अन् अचानक तिच्यासमोरून एक भेदरलेलं मांजर रस्ता आडवा कापून पलीकडच्या बांधाआड गायब झालं!
क्षणात तिच्या चालीची लय थबकली. ती जागच्या जागी उभी राहिली. क्षणभर तिने इकडेतिकडे पाहिले, आणि आपण ‘चुकून’ या दिशेने चाललो आहोत असा आविर्भाव स्वत:शीच करत ती गर्रकन मागे फिरली... काही पावलं उलट्या दिशेला चालत गेल्यावर पुन्हा थबकली... मागे फिरली, आणि झपाझप चालत ब्यूटी पार्लरच्या काचेच्या दरवाज्याआड गडप झाली...

... तोवर थबकलेला रस्ता पुन्हा वाहू लागला होता, आणि पलीकडच्या कंपाऊंडच्या भिंतीवर ते मांजर शांतपणे समाधी अवस्थेत बसले होते

वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम!

करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
या कार्यक्रमांवरून देशातील समाजमाध्यमांच्या जोडीने प्रसारमाध्यमांमध्येही वैचारिक द्वंद्व जुंपले असताना, जागतिक आरोग्य संघटनेने अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे.
अशा वेळी आपण आणि आपली माध्यमे कोणती भूमिका घेणार, हा मुद्दा आता चर्चेला येणारच...
****  ****
करोनाच्या जागतिक महामारीचा सामना करताना स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या वैद्यकक्षेत्रातील प्रत्येकाच्या लढ्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांना भावनिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ‘वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसार माध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प ‘ग्लोबल सिटिझन’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केला आहे.
करोनाचे संकट थोपविण्यासाठी विज्ञान आणि आरोग्यसेवेच्या आधुनिक उपायांचाच वापर करावा लागणार आहे, पण अशा कठीण काळात या महामारीशी मुकाबला करणाऱ्या प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम जगभर प्रसारित करण्यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदानॉम यांनी काल या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले. आपण काही काळाकरिता एकमेकांपासून दूर असू, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आभासीपणाने का होईना, एकत्र येऊन ‘कृतज्ञतेचा हा सोहळा’ साजरा करून लढवय्यांच्या धैर्यास सलाम करू या, असे आवाहन त्यांनी केले. वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा कार्यक्रम म्हणजे, जगाला भेडसावणाऱ्या एका भयाच्या विरोधातील शक्तिप्रदर्शनाचा सोहळा असेल, असे ते म्हणाले. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या प्रत्येकासोबत आणि या युद्धात आघाडीवर राहून प्रत्येक जिवाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे आहोत, हे दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, मनोरंजन आणि परिणामकारकतेच्या माध्यमातून या जागतिक युद्धाच्या आघाडीवर लढणाऱ्या प्रत्येकास भावनिक बळ मिळेल, असा विश्वास ग्लोबल सिटिझनचे सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी ह्युज इव्हान्स यांनी व्यक्त केला.
वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा प्रदीर्घ कार्यक्रम जगभरातील विविध डिजिटल मंचांवरून प्रसारित होणार आहे. अलीबाबा, अमेझॉन प्राईम व्हिडियो, ॲपल, फेसबुक, इन्स्टाग्राम, लाईव्हएक्सलाईव्ह, टेनसेन्ट, ट्वीटर, याहू, युट्यूब आदी मंचांवरून हा कार्यक्रम जगभरातील जनतेस अनुभवता येईल, व या कृतज्ञता सोहळ्यात भावनिकदृष्ट्या सहभागीही होता येईल. अधिक माहिती www.globalcitizen.org/togetherathome येथे उपलब्ध होईल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानेही कंबर कसली असून, या कार्यक्रमात आमचाही सहभाग असेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेश यांनी जाहीर केले आहे. करोनाविरोधातील लढाईत संयुक्तपणे सहभागी होण्यासाठी याहून मोठे निमित्त नाही. त्यामुळे, या उपक्रमात आम्ही आहोत, आणि याद्वारे आम्ही सारे एकत्र येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sunday, April 5, 2020

माणुसकीची कसोटी!

माणुसकीची कसोटी !
रिकी मनॅलो नावाचा एक धर्मगुरू सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. वातावरण स्वच्छ होते. हवेत चांगलाच गारठा होता. अशा वातावरणात सकाळचा फेरफटका आणखीनच सुखद होतो. रिकी स्वमग्नपणे रस्ता कापत होता... आणि अचानक मागून एक ट्रक रोरावत आला... त्याच्या अगदी शेजारी येताच ट्रकचालकाने ब्रेक दाबला. ट्रकचा वेग संथ झाला... आता रिकीच्या पावलाच्या वेगाने ट्रक त्याच्या बाजूने पुढे सरकत होता. क्षणभर त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्या गारठ्यातही त्याला घाम फुटला, आणि त्याने वेग वाढविला. पण ट्रकला मागे टाकून पळणे शक्यच नव्हते. ट्रकनेही वेग वाढविला. आता अगदी काही फुटांच्या अंतरावरून ट्रक त्याच्यासोबत चालत होता. काही क्षणांनंतर ट्रकच्या खिडकीची काच खाली झाली, आणि आत बसलेला एकजण कुत्सित आणि दहशतीच्या आवाजात रिकीकडे पाहात ओरडला, ‘हे... व्हायरस... एशियन व्हायरस!’...
मग ट्रकमधील सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहात टोमणेबाजी सुरू केली.
वंशद्वेष आणि प्रांतभेद जन्म घेतोय, याचा पुढच्याच क्षणाला रिकीला अंदाज आला. त्याने रस्ता सोडला आणि धूम ठोकली. धापा टाकत तो जवळच्या एका दुकानात शिरला. ते दारूचे दुकान होते. काऊंटरवरचा इसम विचित्र नजरेने रिकीकडे पाहात होता, आणि भयानक घाबरलेला रिकी, काहीच न बोलता उभा होता. आपल्या छातीची धडधडही त्याला स्पष्ट ऐकू येत होती. जवळपास अर्धा मिनिट तो तसाच, भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. काही वेळानंतर तो सावरला, तेव्हा फार मोठा काळ पायाखालून सरकून गेला आहे, असे त्याला वाटत होते... दुकानाच्या मागच्या बाजूला संगीताचा ढणढणाट सुरू होता. गर्दीच्या गप्पांचा आवाज बाहेर येत होता... रिकीने घाबरून पुन्हा एकदा रस्त्याकडे नजर टाकली. तो ट्रक निघून गेला होता. त्याने सुटकेचा सुस्कारा सोडला, पण लगेचच त्याचे मन थरकापले. ही सुटका आहे, की संकटाची सुरुवात?... या विचाराने तो अस्वस्थ झाला. पण त्याने जिद्दीने स्वतःस सावरले. आपण वंशद्वेषाचे - मौखिक वंशद्वेषाचे- पहिले बळी ठरतोय, हे त्याला जाणवले होते. त्या ट्रकमधील माणसांच्या तोंडातून बाहेर पडणारे अपमानास्पद शब्द तापल्या तेलासारखे त्याच्या कानात ओतले गेले होते...
ही घटना अगदी अलीकडची... १६ मार्चची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केले, आणि वंशद्वेषाच्या भयाने अनेकजण ग्रस्त झाले. ध्यानीमनी नसताना रिकीला त्या भयाने गाठले. आता आपण सुरक्षित नाही, या भावनेने आता त्याच्या मनात घर केले आहे...
 ‘नाही... मी एशियन व्हायरस नाही... मी एक माणूस आहे. विषाणू नाही’.. तो मनातल्या मनात ओरडला... एवढ्या जोरात, की त्या आतल्या आवाजामुळे आपल्या कानठळ्या बसतील अशी त्यालाच भीती वाटू लागली...
त्यानंतर अजूनही रिकी सकाळच्या फेेरफटक्यासाठी घराबाहेर पडतो. पण आता तो आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेतो... आपले विशिष्ट ठेवणीचे डोळे कोणाच्याही नजरेस पडू नयेत, यासाठी सतत खबरदारी घेत आणि आसपासच्या नजरांचा भयभीत कानोसा घेत त्याची पावले पडत असतात...
कोरोनाव्हायरसच्या फैलावानंतरची ही एक प्रातिनिधिक घटना!
गेल्या २४ फेब्रुवारीला, लंडनच्या ऑक्स्फर्ड स्ट्रीट या गजबजलेल्या रस्त्यावर एका चिनी तोंडवळ्याच्या सिंगापुरी विद्यार्थ्यास जबर मारहाण झाली. करोनाच्या नावाने लाखोली वाहात लोकांनी त्याला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी अक्षरशः बुकलून काढले. ‘तुझ्या देशातला करोनाव्हायरस आमच्याकडे नको’, असे बोलत त्याच्यावर हल्ला चढविला... कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन तो तिथून पळाला, तेव्हा त्याच्या जबड्याची हाडे मोडली होती. डोळ्याखाली रक्त साकळले होते... आता मोडलेली हाडे जागेवर बसविण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागेल, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले. जोनाथन मोक असे त्याचे नाव... या घटनेचे वर्णन त्याने आपल्या फेसबुक पेजवर केले, त्या शब्दाशब्दांत त्याच्या भयाच्या वेदना उमटलेल्या जगाने अनुभवल्या...
(त्याच्या हल्लेखोर तरुणांना आता अटक झाली आहे.)
अशा काही घटना आसपास उमटू लागल्या आहेत. चीनमधून करोनाचा फैलाव सुरू झाल्याच्या भावनेने आणि ट्रम्प यांनी त्याचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केल्यानंतर, पाश्चिमात्यांमध्ये पूर्व आशियाई लोकांविषयी राग धुमसत आहे. लंडनमध्ये ‘स्टॉप हेट –यूके’ नावाची संघटना गुन्हेगारीचे चटके बसलेल्यांना साह्य करते. करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून, वांशिक विद्वेषाचा विखार अनुभवलेल्या अनेकांनी या संस्थेकडे मदतीसाठी धाव घेण्यास सुरुवात केली आहे...
स्वार्थाला ऊत येणे हा या परिस्थितीत पहिला धोका संभवतो. बळावलेला स्वार्थ माणुसकीची भावना गिळू पाहात असतो. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात, करोनाच्या भयामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी सुरू झाली. उद्याच्या गरजा भागविणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सिडनीच्या वेस्टफील्ड वूलवर्थस या दुकानात अलीकडेच ग्राहकांची टॉयलेट पेपरसाठी अक्षरशः झोंबाझोंबी झाली. वाद एवढा विकोपास गेला, की एका महिलने दुसऱ्या एका ग्राहकावर उगारण्यासाठी चक्क सुरा उपसला... या मानसिकतेमागील भय कोणते रूप घेईल या चिंतेने आता तेथील दुकानदारही धास्तावले आहेत. अनेक दुकानदारांनी तर, दुकानांना टाळे लावून घरात बसणे पसंत केले आहे.
करोनाला माणसाभोवतीचा विळखा सोडावाच लागेल. तो नष्ट होईलच, पण या साथीमुळे नव्याच आजाराची, विखाराची भीती आता जगभरात फैलावू लागली आहे. ती म्हणजे, या आजाराने आपली मानवी मूल्ये, माणुसकीचे वेगळेपण हिरावले तर जाणार नाही ना?... जगाचा कोपराकोपरा करोनाच्या भयाने चिंतित असताना, आता या नव्या चिंतेची त्यात भर पडू पाहात आहे. या एका आजाराने माणुसकीच्या भावनेवर आघात सुरू झाला आहे. तो वेळीच आवरला नाही, तर करोनानंतरचे माणसांचे जग कसे असेल, याची चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. करोनाच्या आक्रमणामुळे मने भयभीत आहेतच, कदाचित, कधीच न अनुभवलेल्या या एकटेपणामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे, केवळ स्वतःचे अस्तित्व जपण्याची मानसिकता वाढेल आणि व्यक्तीव्यक्तीच्या मनातील भयाचा सामूहिक फैलाव झाला तर समाजिक अराजक माजेल, याची जाणीव आत्ताच ठेवली पाहिजे. त्यासाठी, माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या, सकारात्मकतेवर भर दिला गेला पाहिजे. या संकटात व्यक्तींमधील अंतर नाईलाजाने वाढले असेल, पण हेच वाढलेले अंतर एकमेकांच्या मनाचे अंतर कमी करण्यास कारणीभूत ठरावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. संकटाचे हे सावट, उजाडणारा प्रत्येक दिवस अनिश्चितता घेऊन येत असल्यामुळे असुरक्षिततेचे भय वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत, माणुसकी नावाच्या भावनेची कसोटी लागते. करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थीना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच, आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
त्यासाठी मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अगदी जगभरातील प्रत्येकाने!
****
जोनाथन - मारहाणीनंतरची सेल्फी