Friday, December 18, 2009

`स्टोरी'चं नवं पान! .

तिचं अस्तित्व `आपल्या जगा'पासून केव्हाच वेगळं झालंय...36 वर्षांपूर्वी जिवंतपणाच्या सगळ्या संवेदना हरवलेली अरुणा शानभाग सध्या पुन्हा चर्चेत आली असली, तरी त्या चर्चेचे वारे तिच्या आसपासदेखील पोचलेले नाही... `ती जिवंत आहे', एवढंच `केईएम'चे वैद्यकीय अधिकारी सांगतात. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तिचं एकटेपण आणखी `कडेकोट' झालं आहे... `केईएम'च्या एका निर्जन कोपऱ्यातल्या `बेड'वर एकाकीपणे तिची देखभाल करणारे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी वगळता, अन्य अनेकांना ती कुठे आहे हे माहीतदेखील नाही... अनेक परिचारिका आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात `डॉक्‍टरकी'चे धडे गिरविण्यासाठी शिकतानाच वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये गळ्यात "स्टेथो' अडकवून `ड्यूटी' करणाऱ्या अनेक नवख्या डॉक्‍टरांना तर अरुणा शानभाग हे नाव आज पहिल्यांदाच माहीत झालंय... ... आज अरुणाच्या `स्टोरी'चा `नवा अंक' सुरू झाला, म्हणून माझी पावलेही उत्सुकतेने `केईएम'कडे वळली. अरुणाला `ठेवलेल्या' त्या वॉर्डच्या आसपास तिच्या `अस्तित्वा'च्या काही खाणाखुणा असतील, तर त्या अनुभवाव्यात असं वाटत होतं. पण `प्रशासना'नं तिथं पोहोचू दिलंच नाही... अरुणानं जगावं, की मरावं, हे जर प्रसार माध्यमं ठरवणार असतील, तर त्यांच्यातल्या कुणावर अशी वेळ आल्यावर आम्ही काय करावं, असा थेट प्रश्न प्रशासनाच्या एका वरिष्ठानं `घुसवला', आणि मी गप्प होऊन बाहेर पडलो... आवारातल्याच `मेडिकल कॉलेज'चे काही स्टुडंटस घोळक्यानं गप्पा मारत आसपास फिरत होते... एका घोळक्यापाशी मी थांबलो, आणि अरुणाची चौकशी केली... त्यांच्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्हं मला स्पष्ट दिसली... पण आजच ती `स्टोरी' छापून आल्यानं काहींना लगेच उलगडाही झाला, आणि अनेकांनी केवळ खांदे उडविले... मी तिथून निघालो, आणि एका काहीश्या एकाकी व्हरांड्यात उभा रहिलो... समोरून एक काहीशी वयस्क, रिटायरमेंटकडे झुकलेली नर्स येताना दिसली... मी तिला थांबवलं, आणि पुन्हा अरुणाविषयी विचारलं... क्षणभर तिच्या डोळ्यात वेदनेची झाक उमटलेली मला जाणवली, पण ती सावरली... मानेनंच नकार देत ती पुढं निघाली... मी पुन्हा तिला थांबवलं. `तुम्ही पाहिलेलंत तिला?' मी विचारलं... आणि तिनं मान हलवली. `कशी आहे ती?' ती कोमात आहे, हे माहीत असूनही मी पुढचा प्रश्न विचारला. `ती जिवंत आहे'... ती थंडपणानं म्हणाली. मी स्तब्ध... तिच्या डोळ्याततली वेदना आणखीनच स्पष्ट झालेली. `कुणी असतं तिच्यासोबत?'... `२४ तास?' नकारार्थी मान हलवतच तिनं मलाच विचारलं. `नातेवाईक वगैरे?'... पुन्हा ती गप्प. `कुठे ठेवलंय तिला?' मी एक अयशस्वी प्रयत्न पुन्हा केला... आणि काहीच न बोलता, मान झुकवून ती चालू लागली... --------------- नोव्हेंबर 1973 मध्ये, म्हणजे तब्बल 36 वर्षांपूर्वी सूडभावनेने पेटलेल्या सोहनलाल वाल्मिकी नावाच्या कुणा नरपशूने कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळून तिच्यावर पाशवी बलात्कार केला, तेव्हाच तिच्या मेंदूच्या संवेदना हरपल्या. तिची वाचा आणि दृष्टीदेखील हरवली... कुत्र्यांना अमानुषपणे वागविणार्‍या या `टेंपरवारी' सफाई कामगाराला कडक शब्दात समज दिल्याचा सूड म्हणून त्यानं तिच्यावर अमानुष बलात्कार केला. संवेदना हरपलेल्या स्थितीमुळे मूक अरूणाला स्वतः त्याविरुद्ध कोणताच पुरावा देता येणं शक्यच नव्हतं... काही दिवसांतच तिचं लग्न होणार होतं. सामजिक अवहेलनेपासून वाचविण्यासाठी प्रशासनानं बलात्कारची तक्रारही केली नव्हती, असं म्हणतात... सोहनलालवर बलात्काराचा आरोपही होऊ शकला नाही... आणि तो शिक्षा भोगून पुन्हा आपल्या, माणसांच्या जगात परतलाही... अरुणा मात्र, सोहनलालने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे... एकाकीपणे, मूकबधीरपणे... पण तेव्हापासून, तिनं आपल्या, `जिवंत जगा'कडे डोळे उघडून पाहिलेलंदेखील नाही... ... 36 वर्षांपूर्वी सुरू झालेली अरुणाची ही "कथा' आज एका नव्या वळणावर येऊन थांबली आहे. रुग्णालयातील तिच्या संवेदनाहीन अस्तित्वाचादेखील कधीकाळी तिथल्या परिचारिकांना मोठा दिलासा होता. कारण, अरुणावरील अत्याचारामुळे रात्रंदिवस ड्यूटी बजावणाऱ्या परिचारिकांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अरुणा शानभाग हे परिचारिकांच्या लढ्याचे प्रतीक बनले होते. अरुणा शुद्धीवर नाही, तिच्या संवेदना हरवल्या आहेत, हे माहीत असूनदेखील याच भावनेतून तिच्यावरील मायेपोटी तिच्यावर उपचार करणाऱ्या आणि तिच्याच "बॅच'च्या परिचारिका आज बहुधा रुग्णालयाच्या सेवेत नाहीत. त्यामुळे, बेशुद्धावस्थेतही अरुणानं परिचारिकांच्या जगाशी जुळवलेलं नातं आज संपून गेलं आहे. अरुणा ही रुग्णालयाच्या आणि तेथील आजच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने केवळ एक "कथा'च राहिली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी "अरुणाची स्टोरी' पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि प्रसारमाध्यमांची "केईएम' परिसरात गर्दी सुरू झाली. पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आणि अरुणाचा वॉर्ड रहदारीसाठी बंद केला... तो आणखीच एकाकी झाला. जगाच्या जिवंतपणाचं भानदेखील नसलेली अरुणा अधिक एकटी झाली. अरुणाच्या वॉर्डकडे फिरकण्यावर महापालिका आयुक्तांनी बंदी घातली, त्याला आता अनेक वर्षे झाली आहेत. अरुणाला जिथे ठेवलंय, तिथे जाण्याची सर्वसामान्यांना मुभा नाही. गेल्या 36 वर्षांच्या काळात अरुणाच्या "स्टोरी'चा गाभादेखील काहीसा पातळ झाला आहे. तिच्या मायेचं, कुटुंबातलं बहुधा कुणीच तिच्याकडे फारसं फिरकत नाही. तिच्या संवेदनाहीन शरीरात केवळ "वैद्यकशास्त्रीय जिवंतपणा' आहे, पण "जिवंतपणा' असलेल्या जगापासून ती दूरच आहे. अरुणावर उपचार सुरू असलेला रुग्णालयाचा तो "कोपरा' केवळ पाहता यावा, आणि शक्‍य झाल्यास लोकांपर्यंत पोचवावा, म्हणून आज पुन्हा प्रसारमाध्यमांनी खूप प्रयत्न केले. ... ३६ वर्षं जगाकडे पाठ फिरवून राहिलेल्या अरुणाने आता आपल्या वयाची साठी ओलांडलेली असेल... पुन्हा एक नवी "स्टोरी' सुरू झाली आहे!...

Wednesday, December 9, 2009

आमची `शोध'(?)पत्रकारिता!

कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात. म्हणून हा पुरावा..
...तर, लोकांच संभाषण चोरून ऐकणं, रस्त्यावर सापडलेल्या चुरगळलेल्या कागदाच्या घड्या विस्कटून त्यावरील मजकूराबरहुकूम बातमी पाडणं, इतकंच नव्हे, तर अगदी महापालिकेतल्या किंवा मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावरच्या कचर्‍याच्या ढिगार्‍यातले कागद उपसणं आदी अनेक उद्योग आम्ही केलेले असल्यामुळे आमच्या पत्रककारितेला बहर आला आहे. ( खुलासा : या विधानांवरून काही वादंग निर्माण झालेच, तर त्यावर येथेच पडदा टाकण्यात येत आहे. आणखीही एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे- हल्ली कंपोझिटर नावाची संस्था हद्दपार झालेली असल्याने, हा मजकूर आम्ही स्वहस्ते टाईप करीत आहोत. त्यामुळे प्रुफाच्या काही चूका राहाण्याचि दाट शक्याता आहे. वर्तमानपत्रांचे वाचक ज्याप्रमाणे त्या सहन करतात, तसेच आपणही आहोत असे सम्जून हा मजकूर वाचावा. ) तर, अश्या सवयीतून आम्ही बायलायनीच्या असंख्य ष्टोर्‍या पाडल्या आहेत. नंतर त्यावर येणार्‍या खुलाश्यातूनही वेगळे मुद्दे शोधून नवी बायलाईन पाडण्याची कलाही आम्हास अवगत आहे.
(पुन्हा एक खुलासा : या मजकूरातील पात्रे - अगदी खुद्द आम्हीही- पूर्णपणे काल्पनिक असून, कोणाशी त्याचे साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा.)
तर, आम्चे एक मित्र, बापू म्हणतात त्यांना- ते मागं आजारी पडले होते, तेव्हाची ही गोष्ट! ते कळल्यापासून वरवर हळहळल्यासारखं दाखवत, बापूंचा आजार असाच राहो, असं साकडं काहीजण घालतायत असं त्या दिवशी रात्री प्रेस्क्लबात टेरेसवरच्या कोपर्‍यातल्या कुणाचंतरी वाक्य आम्ही चोरून ऐकलं. सुदैवानं तेव्हा रात्र फार झाली नव्हती, त्यामुळे आम्हीही पूर्ण ‘जागे’ होतो. हे ऐकलं, आणि आम्ही सवयीनुसार कामाला लागलो. बापूंच्या आजाराचं कारण शोधायच्या! कान, नाक आणि डोळे हे बातमीदारचे संवेदन्शील अवयव असतात, असं फडकेसरांनी सांगितल्याचं एरॊसशेजारच्या गल्लीतून जाणारी दोनचार मुलं बोलतानाही आम्ही ऐकलं होत. तर, आताही आम्ही कान आणि नाक खुपसण्याच्या उद्योगाला लागलो. चांगला बातमीदार म्हणून आम्हाला हे करणं भागच आहे. आणि आता ही सवय सुटणं शक्यच नाही. उलट आम्हाला या सवयीचा अभिमानच आहे. म्हणूनच आधी, सगळ्यांच्या, -म्हणजे आमच्यातल्यांपैकीच कुणाच्यातरी- (आमच्या जगाला आम्ही वृत्तपत्रसृष्टी म्हणून संबोधतो) ब्यागेत, किमानपक्शी बोलण्यात बापूंच्या आजारपणाबद्दल काहीतरी हाताशी लागेल, अशी आमची खात्री होती.
...तसं झालं, पण ते भलतीकडेच. दुसर्‍याच एका `पिशवी'त आम्हाला हवा होता तो ‘मजकूर’ सापडला.
परवा, दादरच्या पहिल्या फलाटावर ट्रेनची वाट बघत असल्याचं भासवत आम्ही बराच वेळ उभे होतो. संध्याकाळच्या वेळी असं उभं राहायला मजा येते, असं नरीमन पॉईंटवर संध्याकाळी हवा आणि शेंगदाणे खायला आलेल्या तंबीनं पाथरेबुवांना सांगितलेलंही आम्ही एकदा असंच चोरून ऐकलं होतं. त्यानंतर बर्‍याचदा दादर हे आमचं संध्याकाळच्या टाईमपासचं ठिकाण झालं. त्या दिवशीही आम्ही तसेच उभे राहून येणार्‍याजाणार्‍या गाड्या न्याहाळत होतो. फलाटावरही आमचं लक्ष होतं. तेवढ्यात लेडीज डब्याजवळच्या फस्क्लासजवळ अनंतराव दिसले. अपराधीकाका. आम्ही त्यांना दिसणार नाही, अशा बेतानं त्यांच्या आसपास जाऊन उभे राहिलो. बातमी काढायची म्हणजे असंच करायचं असतं. तेही आम्च्यासारखेच कधीपास्नं उभे होते, हे त्यांच्या ‘शोधक’ नजरेवरून आम्ही ओळखलं. त्यांच्या हातातल्या जुन्या डायरीत कागदांची भेंडोळी खच्चून भरली होती. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यातला एखादा कागद हाताला लागला, तर आपल्या नावावर काहीतरी विनोदी खपवता येईल, असा एक विचार आमच्या मनात चमकून गेला. (आणि तसं झालं, तर पुढच्या पुरवणीत,- काही अपरिहार्य कारणामुळे आज अमुकअमुक सदर नाही-अशी नोट येणार या कल्पनेनं आम्हाला आणखीनच उकळ्या फुटल्या. )
अनंतराव ट्रेनमधे चढतील तेव्हा त्यांच्या डायरीतला एकतरी कागद खाली पडूदे, असं साकडं आम्ही लेडीज डब्याजवळच्या देवळातल्या मारूतीकडे बघून- खरंच तिथेच बघत होतो आम्ही- वारंवार घातलं.
आणि देव पावला. ट्रेन आली. अनंतराव फस्क्लाससमोर उभे होते, पण ते तिथे चढणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. घाईघाईनं ते बाजूच्या जनरलकडे वळले, आणि गर्दीतून डोकं घुसवून आत शिरले. हातातल्या डायरीतले काही कागद खाली पडले, आणि ट्रेन सुटली.
बातमीदाराच्या त्वरेनं आम्ही पुढे होऊन ते कागद ताब्यात घेतले आणि आमचे डोळे विस्फारले.
तातूला लिहिलेलं पत्र होतं. अनंतराव कोकणातले असावेत, असा आमचा अंदाज होता. त्याचा तातू नावाचा नातू कोकणात कुडाळात र्‍हातो, असं पाथरेबुवांनी मागं ठोकून दिलं होतं. तरीच अनंतरावानी त्याला पेपरातून पत्र पाठवायची युक्ती काढली. पोश्टेजपण वाचलं, नावपण झालं. बरं, पत्रात खाजगी काहीच नाही. सगळ्यांनी वाचलं तर काय बिघडनार? तातूला वाचायला मिळालं की झालं.
आता तातूचं काय होणार, या विचारनं आम्ही क्श्णभर हेलावलो. आणि मन घट्ट करून, कागद खिशात घालून घर गाठले.
रात्री सगळी निजानिज झाल्यावर ते कागद वाचावयास सुरुवात केली.
‘प्रिय तातूस,
हे पत्र तुला मिळेल की नाही मला सांगता यणार नाही, पण तू ते वाचू शकशील याची मला खात्री आहे.’
पहिलेच वाक्य वाचून अनंतराव त्यांच्या झुबकेदार (मिशीतल्या) मिशीत आमच्याकडे बघून हसतायत असा भास आम्हाला झाला. आम्ही पुढे वाचू लागलो.
‘पत्र लिहिण्यास थोडा उशीरच झालाय याचं कारण आपले बापू...’
आम्ही उत्सुकतेनं पत्र पुढे वाचू लागलो. जे हवे तेच मिळतेय याचा आनंद डोळ्यात मावत नव्हता.
‘तर ह्या बापूला बरं नाहीसं झालं कळलं म्हणून बघायला गेलो तर दारातच वहिनी काळ्जी करत बसलेल्या दिसल्या म्हणून काय झालं विचारताना डॊक्टरला बोलवायला हवं म्हणाल्या. मग मी सरळ परळच्या पेटिट हॊस्पिटलात कदम्बांडे डॊक्टरांकडे गेलो तर त्यांचाकडे आधीच एक पेशंट आलेला होता म्हणून बाहेरच थांबलो तेव्हा लांबूनच हंबरण्याचे आवाज ऐकू यायला लागले आणि सहज चौकशी केली तर पेशंट बरेच रांगीत आहेत असं सांगून केबिन्बाहेरच्या शिपायानं मला कल्टी मारायचा प्रयत्न केला म्हणून खिशातली- माझ्या खिशातली- दहाची नोट सरकवली- आता आपल्याला बसनं घरी जाता येणार नाही, हे माहीत असून्सुद्धा मी त्याच्याकडे बघून हसलो तर तुम्ही पत्रकार वगैरे आहात का म्हणत जरासा ओशाळत त्यानं नोट खिशात घातली. नाही नाही मी पत्रकार नाही असं मी जोरातच ओरडल्यावर चक्क डॊक्टर कदम्बांडे बाहेर आले. मग मी बापू आजारी असल्याचं त्यांना सांगून बरोबरच त्यांना तपासायला चला अशी विनंती केल्यावर सगळ्या पेशंटांना दावणीला बांधून ठेवायला शिपायाला सांगून ते माझ्याबरोबर बापूंच्या घरी आले.
दारातच वयनी काळजी करत उभ्या होत्या आणि बापू, बेडवर पडल्यापडल्या गेट वेल सूनचे मेसेज वाचत मलूल पडला होता. त्याचा खंगलेला चेहेरा बघून तुला सांगतो तातू, मला खरंच खूप वाईट वाटलं. आपण कद्धीकद्धी कुण्णाबद्दल वाईट लिहायचं नाही असं मी तव्हाच ठरवून टाकलं आणि डॊक्टरांना घेऊन बापूजवळ उभा राहिलो. बापू माझ्याकडे बघून हसत होता तेवढ्यात डॊक्ट्रांनी त्याचं पोट तपासलं आणि काय खाल्लं म्हणून वयनींना विचारलं तर वयनी माहीत नाही असं मानेनंच म्हणाल्या, तेव्हा बाहेर नव्हे, घरात असं मी वयनीना विचारल्यावर, पुरण्पोळी असं उत्तर त्यांनी दिल्यावर डॉक्टरांचा चेहेरा खुलला. आता यांच्याकडे अजून पुरणपोळ्या शिल्लक असतील का असा विचार सहज आपला माझ्या मनात आल्यावर मी पुन्हा वयनींकडे बघितलं तर त्या आत गेल्या. परवा पत्रकार दिन होता म्हणून घरी पुरण्पोळ्या केल्या होत्या, असं बापूनं सांगितल्यावर डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं आणि मला जायला पायजे असं सांगून घाइघाईनं बाहेर पडले. तिकडे पेशंटांची रांग लागलीये म्हणताना वाटेतच त्यांनी ब्यागेत आण्खी इंजेक्शनं विकत घेऊन भरली, आणि ते बैलघोड्याला परत आले. मीपण त्यांच्यासोबतच होतो. तर ते परत येताच सगळ्या पेशंटानी माना हलवून जोरात हंबरायला सुरुवात केली, तर ह्यांच्या घरीपण पत्रकार दिन साजरा झालेला दिसतोय म्हणत डॊक्टरांनी एकेकाला इंजेक्शन देऊन घरी पाठवायला सुरुवात केली. मी त्यांना थॆंक्यू म्हणून निघालो, तर खिशात दहाची नोट नसल्याचं लक्शात आल्यावर रेल्वेस्टेशनवर आलो. आता उतरल्यावर घरी चालत जाव लागणार हे आठवल्यामुळे जरासा नर्वस झालो, पण घरी यावच लागणार हे माहीत होतं. आल्याआल्या तुला पत्र लिहायला घेतलंय. अजून पुरं नाही झालंय पण जसं जमेल तसं लिहून काढीन म्हणतो. बापूला एखादा मेल करून गेट वेल सून म्हण. सध्या इतकच. तुझा अंतूकाका’
.. पत्र वाचून झाल्यावर बापूच्या आजारपणाचं कारण समजल्याने, शोधपत्रकारितेच्या आमच्या कौशल्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटू लागला, आणि आम्ही लगेच ते ऒपरेट करायला बसलो.
(आता पुढ्च्या पुरवणीत, ‘काही अपरिहार्य कारणामुळे...’ वाचायला मिळणार याचा आनंद आम्हाला आवरत नव्हता)

Thursday, December 3, 2009

स्नोई.. .

लोकसत्ता'च्या व्हिवा पुरवणीत (३ डिसें.०९) माझ्या नववीतल्या, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलीचा- सलोनीचा- हा लेख प्रसिध्द झालाय.) गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी आणि माझी बहीण-विदिशा- आम्ही दोघंही आई-बाबांच्या अगदी मागे लागलो होतो. एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणा म्हणून. शेवटी, सहा-सात महिन्यांपूर्वी बाबांनी तळहातावर धरून एक पपी आणला. जापनीज स्पिट्झ जातीचा.. पांढराशुभ्र.. गोड.. गुबगुबीत, एवढय़ाशा, काळ्याभोर डोळ्यांचा, गुलाबी नाकाचा आणि मऊमऊ तळव्यांचा.. आम्ही लगेच त्याला नाव दिलं स्नोई. जेमतेम महिनाभराचा इवलासा तो गोड जीव, तळहातावर उचलून धरला की आपल्या बटनाएवढय़ा डोळ्यांनी आमच्याकडे पाहायचा, आणि आपोआपच त्याचं कौतुक सुरू व्हायचं. घरी आल्यावर पहिले दोन-तीन दिवस तो खूपच शांत होता. पण नंतर जसजसा तो घरात, आमच्यात रुळत गेला तसतसा तो मस्तीखोर होत गेला. सुरुवातीला त्याला बोललेलं काहीच कळत नव्हतं. हळूहळू त्याला समजायला लागलं. पहिला शब्द जो त्याला कळला, तो ‘मंम्म’ होता. एका काचेच्या बशीतून आम्ही त्याला सेरेलॅक द्यायचो. त्या बशीचा नुसता आवाज आला, तरी तो असेल तिथून धावत येऊन बघायचा. आपल्यासाठी काही खायला तर ठेवलेलं नाही ना.. बशीत काही दिसलं नाही की पुन्हा निमूटपणे आपल्या ठरलेल्या जागी टेबल किंवा सोफ्याखालच्या कोपऱ्यात बसून राहायचा. काही दिवसांनंतर त्याला आणखी एक शब्द कळायला लागला. ‘भूर चला!’ असं म्हटलं, की त्याची धांदल सुरू व्हायची.. मान उंचावून वर पाहात सोबतीनं पावलं टाकत तो घरभर आमच्याबरोबर चालत राहायचा. बाहेर जाण्यासाठी कुणी तयारी करायला लागलं की त्याची अगदी तारांबळ उडायची. मग पट्टा शोधायची पळापळ सुरू व्हायची.. पट्टा शोधत तो घराचा कानाकोपरा धुंडाळायचा.. ‘इथे बघू या’.. म्हणत आम्ही जिथंजिथं बोट दाखवू, तिथंतिथं वाकून बघायचा आणि दिसला नाही की बिचाऱ्यासारखं आमच्याकडे बघत राहायचा.. आम्ही पट्टा शोधणारच, हे त्याला माहीत असायचं. मग तो शांत उभा राहायचा, गळ्यात पट्टा अडकवून घेण्यासाठी. पण हे फक्त बाहेर जायची खात्री असेल तर. नाहीतर, घरात असतानाही आपल्या गळ्यात पट्टा अडकवतोय असं लक्षात आलं की तो अशा जागी जाऊन गंमत बघत बसायचा की, आमचा हातदेखील तिथे पोहोचणार नाही. आता तो मोठा होतोय. त्याला सगळं समजतंय. आम्ही त्याच्याशी मराठीतच बोलतो.. त्याला फक्त बोलता येत नाही. पण आम्ही त्याच्याशी बोलतो. कारण त्याला सगळं समजतं. खूप वेळा तो अगदी शहाण्यासारखं वागतो. पण प्रत्येकानं घरी येताच आधी आपलं कौतुक केलंच पाहिजे, असा त्याचा हट्ट असतो. आई-बाबा किंवा मी आणि विदिशा कुणीही अगदी एक मिनिटासाठी बाहेर जाऊन घरात परतलं, की शेपटीसकट सगळं अंग हलवत कान पाडून तो कुरकुरायला लागतो.. तेव्हा त्याची पळापळ बघण्यासारखी असते आणि शेजारी बसताच शांत होतो. मग त्याच्या गुबगुबीत, केसाळ पाठीवरून बोटं फिरवताना आमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. कधी कधी सगळेजण घरात असताना दरवाजाची बेल वाजते आणि त्याचा अवतार बदलतो. घराची जबाबदारी जणू आपल्यावरच आहे, अशा थाटात तो दरवाजाशी जाऊन गुरगुरायला लागतो. दरवाजा उघडेपर्यंत त्याचं भुंकणंही सुरू झालेलं असतं. बाहेर कुणीतरी पाहुणा, अनोळखी माणूस उभा असला की त्याचं भुंकणं वाढतं. मग त्याला उचलून घ्यावं लागतं. ‘कोण आहे बघू या’, असं म्हटलं, तर तो उचलू देतो. नाहीतर, उचलण्याचा प्रयत्न करणं, त्याला तसं पसंत नसतं. मग तो पाहुणा घरात असेपर्यंत एकदा तरी त्यानं आपल्याशी खेळावं, असा याचा हट्ट सुरू होतो. तेव्हा त्याला दुसरं काहीच सुचत नसतं.. पाहुण्याकडे डोळे लावून शेपटी हलवत आणि घशातून कुरकुरण्याचा आवाज काढत तो पाहुण्याकडे पोहोचायची धडपड करत असतो. पण सगळ्याच पाहुण्यांना कुत्री आवडतात असं नसतं. मग आम्हालाच कसंतरी होतं. गळ्यात पट्टा बांधून आम्ही त्याला आतल्या खोलीत घेऊन जातो. पाहुणा बाहेर असेपर्यंत त्याचं मात्र कशातच मन रमत नाही. आमचा स्नोई आता आठ महिन्यांचा आहे. घरी आणला तेव्हा तो एकच महिन्याचा होता. कुत्र्याच्या पिल्लाचं सगळं अगदी लहान मुलासारखंच असतं. तो घरात आल्यापासून सात महिने कसे गेले ते कळलंच नाही. आता तो आमच्यात एवढा रमला की घरातल्या सगळ्यांना तो ओळखतो. घरातली सगळीच माणसं त्याला खूप आवडतात. तो शहाण्यासारखा वागतो, पण कधीकधी मस्ती करतोच. त्यानं आम्हाला एवढा जीव लावलाय की, त्याच्याशिवाय आम्हा कुणालाच करमत नाही. त्याच्या मस्तीखोरपणाची खात्री महिनाभरापूर्वी आम्हाला पटली. आई आणि बाबा कुठेतरी बाहेर जात होते. तो बेडरूममध्ये कपाटाजवळच्या कोपऱ्यात शांत बसला होता. सकाळची वेळ होती. त्याची बाहेरची चक्कर झाली होती. नेहमी तर फिरायला जाऊन आल्यावर तो दोन-तीन तास मस्त झोपतो. पण त्या दिवशी आई-बाबांनी दार उघडलं आणि स्नोई पळत बाहेर आला. काही कळायच्या आत दरवाजाच्या एवढय़ाशा फटीतून बाहेर पळून जिने उतरू लागला. बाबाही त्याच्या मागे पळाले आणि स्नोईनं मागे वळून पाहिलं. बाबा पाठी आहेत अशी खात्री होताच, आता फिरायला जायचंय, असंच त्याला वाटलं असावं. तो जिने उतरू लागला आणि खाली उतरून मोकळेपणानं धावत सुटला. अख्ख्या बिल्डिंगला फेऱ्या मारल्या. झाडांवरचे कावळे, पक्षी, खाली उन्हात बसलेली मांजरं, सगळ्यांच्या मागे स्नोई धावत होता. त्या सगळ्यांची नुसती पळापळ झाली. पुन्हा दोन-तीन दिवसांनंतर तो असाच बाहेर पळाला आणि फिरून आला. स्नोईला त्या दिवशी घरात आणलं, तेव्हा तो इतका शांत होता की हाच तो मस्तीखोर स्नोई, असं त्याच्याकडे बघून कुणालाही वाटलं नसतं. स्नोईनं आम्हाला अगदी जीव लावला आहे. त्याला काही झालं, की आम्हाला फारच वाईट वाटतं. मागं तो अगदी लहान दोन-तीन महिन्यांचा होता, तेव्हा बेडवर शांत झोपला होता. आसपास कुणीच नव्हतं. अचानक आम्हाला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला आणि आम्ही आत धावलो. स्नोई खाली जमिनीवर पडला होता आणि कुरकुरत होता. आम्ही त्याला उचलून घेतलं. विदिशाला तर रडूच आलं. तेव्हापासून, त्याला काही होऊ नये, म्हणून आम्ही जपत असतो.

Friday, November 27, 2009

श्रद्धांजली...


रक्त सांडुनि तुम्ही फेडले ऋण या मातीचे....
तुमच्यासाठी आम्ही सांडले थेंब दोन अश्रूंचे....

Wednesday, November 25, 2009

...आणि गोठलेल्या अश्रूंना पुन्हा वाट फुटली!

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते. गर्दीच्या मनावरची ती जखम पुन्हा भळभळत होती आणि त्या वेदनाही जाग्या होत होत्या... त्या छायाचित्रांनी रेल्वेस्थानकाच्या त्या परिसराला पुन्हा एकदा त्या कडवट स्मृतींच्या खाईत लोटले होते... ...दुपारी मी या स्थानकावर उतरलो आणि हाच रस्ता पकडला. रस्त्याला लागण्याआधी बस डेपोच्या शेजारच्या फेरीवाल्यांचे आवाज नेहमीसारखेच घुमत होते; पण स्टेशनच्याच आवारात, मेन लाइन आणि लोकल लाइनच्या रस्त्याच्या दुभाजकावरील जाळीसमोरचे चित्र मात्र नेहमीपेक्षा काहीसे वेगळेच होते. तिथल्या प्रत्येक खांबावरच्या छायाचित्रांतून गेल्या वर्षीच्या हल्ल्याची जखम पुन्हा भळभळती झाली होती आणि अस्वस्थ, बेचैन गर्दी ती छायाचित्रे न्याहाळत स्तब्ध झाली होती... बाहेरच्या फेरीवाल्यांच्या कोलाहलाचा, गाड्यांच्या कर्णकर्कश भोंग्यांचा आणि अवघ्या मुंबईच्या गतीचा परिणाम तिथे जणू गोठून गेला होता... मीही त्या गर्दीत मिसळलो... त्याच अस्वस्थतेचा अनुभव घेत एकेक छायाचित्र न्याहाळत पुढे सरकू लागलो. मुंबईतील विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी 26 नोव्हेंबरच्या "त्या' भयानक दिवशी जीव धोक्‍यात घालून केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तेथे मांडले होते... त्यामध्ये ओबेरॉयमधील थरार होता, ताजमधील आगीचे लोळ होते, भयाने गोठलेल्या वेदनांचा कल्लोळ होता, अतिरेक्‍यांशी सामना करण्याच्या तयारीतले हेमंत करकरेंचे छायाचित्र होते, जीव धोक्‍यात घालून छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांच्या धाडसाचे पुरावे होते आणि अपुऱ्या शस्त्रांनिशी अतिरेक्‍यांशी लढण्यास सज्ज झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे "पोझिशन'मधले फोटोही होते. एखाद्या छायाचित्रातील रक्ताची थारोळी न्याहाळत थरकापल्या मनाने प्रवासी पुढे-पुढे सरकत होते; कुणी त्यातलीच काही छायाचित्रे मूकपणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेत होते आणि शेवटच्या छायाचित्राजवळ पोचताच सुन्नपणे बाहेर पडत होते... अतिरेक्‍यांनी केलेल्या या "तबाही'मध्ये शहीद झालेल्यांना "अखेरचा सॅल्यूट' करताना दुःखावेग अनावर झालेल्या त्या मुंबईकराच्या छायाचित्रात जणू प्रत्येकाच्याच भावना ओतल्या गेल्या होत्या... गर्दी सुन्न होत होती. याच गर्दीसोबत मी पुढे सरकत होतो. नजर छायाचित्रांवर खिळली होती. अखेरचे ते छायाचित्र पाहून मीही पुढे आलो आणि थबकलो... ते प्रदर्शन पाहिले होते, तरीही मी पुन्हा मागे वळलो... ते प्रदर्शन पाहाणाऱ्या गर्दीच्या प्रतिक्रिया मला न्याहाळायच्या होत्या... मी मागे पहिल्या छायाचित्राजवळ आलो आणि सरकत्या गर्दीसोबत पुढे सरकू लागलो... अचानक माझी नजर बाजूनेच चालणाऱ्या एका तरुणीकडे गेली. भिजल्या आणि थिजल्या डोळ्यांनी ती एकेक छायाचित्र डोळ्यांत अक्षरशः साठवून घेत होती... तिच्या डोळ्यांतले थिजलेले भाव पाहताच मी गोठलो आणि तिला कळणार नाही, अशा बेताने तिच्याच गतीने पुढे सरकत राहिलो... प्रत्येक छायाचित्रासमोर तिचा व्याकूळपणा आणखीनच वाढत होता... एका हातानं तिनं तोंडावर रुमाल घट्ट धरला होता; पण तिच्या डोळ्यांतील वेदना मात्र लपली नव्हती. "ताज'मधून बाहेर पडणारे आगीचे लोळ एका छायाचित्रात दिसताच, ते डोळे आणखी व्याकूळ झाले... पुढच्याच छायाचित्रात, दोरखंडाच्या साह्याने अतिरेक्‍यांवर चढाईच्या तयारीतले जवान पाहताच तिचे डोळे चमकले... हेमंत करकरेंचे ते छायाचित्र पाहताच ती बहुधा पुन्हा कळवळली... तिनं तोंडावरचा रुमाल आणखी घट्ट धरला... एका टॅक्‍सीच्या आडोशाने अतिरेक्‍यांच्या कारवाया पाहणाऱ्या पोलिस शिपायांच्या छायाचित्रातील असहाय्यता पाहून ती बहुधा अस्वस्थ झाली... आपल्या कुणा नातेवाइकाच्या विरहाने आणि कदाचित अघटिताच्या बातमीने हंबरडा फोडणाऱ्या एका पाहुणीच्या छायाचित्राने तिला आणखी व्याकूळ केले... आता तिच्या गळ्यातून उमटणारे हुंदकेही मला जाणवत होते. त्यांना आवाज नव्हता; पण ती अक्षरशः हलली होती... ते स्पष्टपणे जाणवत होते... एका छायाचित्रासमोर येताच तिनं डोळेही गच्च मिटून घेतले... गेल्या वर्षीची ही छायाचित्रे पाहतानादेखील तिच्या मनावर असह्य ताण येतोय, हे जाणवून मलादेखील अस्वस्थ वाटू लागले होते... अखेर ती त्या शेवटच्या छायाचित्रासमोर येऊन उभी राहिली... पुढे सरकणाऱ्या अवघ्या गर्दीची पावले तिथे थबकलेलीच होती... सगळी गर्दी मूक झाली होती... एक विचित्र मानसिक दडपण तिथे दाटले होते... ...तीदेखील या गर्दीसोबत तिथे थबकली. तोंडावर पकडलेल्या रुमालाची पकड आणखी घट्ट झाली होती... डोळ्यांमधल्या वेदना आणखी ठळक झाल्या होत्या... आणि आतल्या आत उमटणारे ते हुंदके आता स्पष्ट झाले होते... अनावर दुःखाने शहीदांना अखेरचा, निरोपाचा "सॅल्यूट' करणाऱ्या "त्या मुंबईकरा'च्या छायाचित्रांसमोर येताच ती आणखीनच कोलमडली... आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका तिला आवरत नव्हता... डोळ्यांच्या ओल्या कडांमधून अश्रूंची धार सुरू झाली होती... तिने ते अश्रू तिथेच वाहू दिले... बाहेर पडणारा हुंदकादेखील न रोखता ती क्षणभर तिथे उभी राहिली आणि झटक्‍यात तिनं मान फिरवली... मागे न पाहता ती वेगाने रस्त्यावर आली आणि टॅक्‍सीला हात दाखविला... वाहत्या मुंबईत तीही नंतर सामील झाली होती, शहीदांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली अर्पण करून !!

Friday, November 20, 2009

डोंबिवली, ते...

मुंबईतल्या एका कंपनीत नवीनच कामाला लागलेले ते दोघे... एक डोंबिवलीत राहाणारा, तर दुसरा साऊथ इंडियातल्या कुठल्यातरी खेड्यातून आलेला... एकत्र काम करताना त्यांची मैत्रीही घट्ट होत असते. काम संपल्यावर गप्पा, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्हवर फेर्फटका, असं सुरू असतं. खूप चांगली, निर्व्याज दोस्ती!
कधीमधी हा डोंबिवलीकर आपल्या साऊथ ईंडियन मित्राला घरी येण्याचं आमंत्रण द्यायचा, आणि हाही ते आनंदानं स्वेकारायचा. कितीतरी वेळा असंच व्हायचं. साऊथ इंडियन मित्र कधीच `नाही' म्हणायचा नाही.
... पण कधीच डोंबिवलीला गेलाही नाही !
शेवटी एकदा डोंबिवलीकर मित्रानं अस्वस्थ होऊन त्याला विचारलेच.
`काय रे, इतक्या वेळा मी तुला घरी बोलावलं, आणि तू पण येतो, येतो म्हणतोस, पण एकदाही आला मात्र नाहीस... असं का करतोस?'
आता साऊथ इंडियन मित्र गंभीर होतो...
`अरे, मला तुझ्याकडे यायला काहीच प्रॉब्लेम नाही रे, पण'...
`काय पण...?' डोंबिवलीकराचं टेन्शन वाढतं. त्याच्या चेहेर्‍यावर उमटतं. तोंडवरून दोनतीन वेळा अस्वस्थपणे तळवा फिरवत तो विचारतो.
`अरे, एव्हढं काही गंभीर नाही... पण मी तुझ्याकडे आलो होतो हे गावाकडे माझ्या बाबांना कळलं तर...' पुन्हा साउथ इंडियन मित्र बोलताबोलता थांबतो.
डोंबिवलीकर आणखी अस्वस्थ.
` अरे, बाबा मला रागावतील रे... मला त्यांची भीती वाटते'... साऊथ इंडियन मित्र केविलवाणा झालेला असतो.
`पण का? माझ्याविशयी काही वाईटसाईट कळलंय का तुझ्या बाबांना?' डोंबिवलीकर दक्षिणेकडे लांबवर पाहात आणखी अस्वस्थपणे विचारतो.
`तसं नव्हे रे, ते म्हणतील, डोंबिवलीला जातोस, पण इतक्या दिवसांत तुला घरी, गावाला येता येत नाही... मी काय सांगणार, तूच सांग...'
... डोंबिवलीकर लांबवर लागलेली नजर न हटविता केवळ मान हलवतो...
`खरंय', असं सुचवत!

Thursday, November 19, 2009

तुझे निरंतर चित्र काढतो...

....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र-
गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!!
आहात कुठे???
या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय? तुम्हाला काय वाटते?

भुजबळांच्या स्वप्नातील तो महाराष्ट्र असा असेल...
-राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी हाती घेतलेल्या कायदा व सुव्यवस्थाविषयक कार्यक्रमांना अधिक गती देण्याबरोबरच नक्षलवाद व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम करण्यात येईल.
(मागच्या सरकारचेही हेच स्वप्न होते...)
-राज्यातील सर्व प्रमुख शहरे किमान चारपदरी रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहेच. आता त्यापुढे जाऊन वाड्या, तांडे, पाडे यांसह ५०० लोकवस्तीपर्यंतची व त्यावरील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्याचे ठरविले आहे.
-गरीबांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये किंमतीची २७५ चौ. फुटांची घरे बांधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून येत्या पाच वर्षांत दहा लाख घरे बांधण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
-मुलींना पदवीपर्यंतचे, तर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार आहोत. ( तारखेकडे लक्ष द्या... )
मुलींची भ्रूणहत्या थांबावी म्हणून मुलगी जन्माला येताच तिच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवून ती उपवर होईल तेव्हा एक लाख २५ हजार रुपये मिळतील, अशी `माहेर योजना` आम्ही राबविणार आहोत.
-आज निराधारांसाठी, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना सुरू आहेत. त्यांची व्याप्ती वाढवून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ६५ वर्षांवरील प्रत्येक गरजू स्त्री-पुरूषाला आजीवन सहाशे रुपये पेन्शन दरमहा देण्याची योजना आमच्या विचाराधीन आहे.
-दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आम्ही २५ किलो धान्य ३ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना आरोग्यपत्रिकाही देणार आहोत. अशा आरोग्यपत्रिकाधारक नागरिकांना हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, ब्रेन ट्यूमर इत्यादी दुर्धर आजारांवरील उपचार व सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याची तरतूद असणार आहे.
-राज्यातील शेतमजुरांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे तसेच विविध प्रकारच्या कारागीरांचेही बचतगट स्थापन करण्यात येतील. या बचतगटांना विविध उद्योगांसाठी ४ टक्के दराने कर्ज देण्याचे आम्ही ठरविले आहे.
-मागासवर्गीयांच्या उत्थान कार्यक्रमाचीही कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-`सुजल महाराष्ट्र, निर्मल महाराष्ट्र` अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सर्वांना वैयक्तिक नळजोडण्या देण्याचा निर्धार आघाडी शासनाने केला आहे.
-परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी चैत्यभूमी स्मारक परिसरात जमीन उपलब्ध करून त्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी `चैत्यभूमी विकास प्राधिकरण` स्थापन करण्याचेही आम्ही ठरविले आहे.
(यापेक्षा आणखी काय हवे???)
(टीप : काहीतरी `विनोदी' लिहावे, असा विचार मनात आला, म्हणून सहज महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज‘ या पोर्टलवर चक्कर मारली. आणि, चक्क, किती कॊपी करू अन किती नको, एवढा ‘मसाला’ हाती आला... तोच चिकटवला आहे. त्यामुळे, यातील कोणताही विनोद माझा नाही... अधिक तपशीलासाठी किवा मनोरंजनासाठी तुम्हीही मधूनमधून तेथे चक्कर मारा... )

Saturday, November 14, 2009

‘वादळ’ आणि ‘वादळग्रस्त’...

‘वादळ’ आणि ‘वादळग्रस्त’... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली ‘मने’ नवनिर्माणाच्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक ‘हवामान’ बदलून गेले. वातावरणात कुठेतरी निर्माण झालेल्या मोठ्ठ्या ‘पोकळी’मुळे सगळे चित्रच पालटून गेले. पुन्हा ढगांची गर्दी झाली. हवा कोंडल्यासारखी झाली आणि वादळाची चिन्हे उमटू लागली. कुठल्यातरी पोकळीमुळे कुठेतरी वादळे माजतात, हा निसर्गाचा नियमच आहे. तोच नियम महाराष्ट्रातही अनुभवायला लागणार, असे संकेत त्या चिन्हांमधून मिळू लागले. आणि अखेर, ते वादळ राज्यात येऊन थडकले. ‘पोकळी’चा नियम खरा ठरला. महाराष्ट्राचा सरता आठवडा अक्षरश: वादळी ठरला. वर्षानुवर्षे भक्कमपणे घट्ट उभे राहिलेले अनेक जुने वृक्ष त्या झंझावाती वादळात कोलमडून जमीनदोस्त झाले, तर अनेकांच्या फांद्या कोसळून पडल्या. सभोवती साठलेला जुना पालापाचोळा तर त्या वादळी वाऱ्यांसोबत कुठल्या कुठे उडून गेला. काहींना या वादळाचीच जणू प्रतीक्षा होती. असे वादळ यायलाच हवे होते, असे म्हणत अनेकांनी वादळी वारे आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटा अनुभवण्यासाठी समुद्रकिनारे गाठले आणि वादळासोबतच कोसळणाऱ्या पावसाच्या थंड शिडकाव्यात स्वत:ला भिजवून घेतले... वादळामुळे कोणते वृक्ष कोसळले, कुणाचे किती नुकसान झाले, कोणाला किती हानी सोसावी लगली, याचा हिशेब त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. वादळ आले, याचा आनंदही कुठेकुठे साजरा होत होता... पोकळी निर्माण झाली, की वादळ येणारच, मग त्याला सामोरे गेलेच पाहिजे, असा साधा सरळ हिशेब अनेकांनी माडला, तर आता हे वादळ कसे थोपवायचे, या चिंतेने अनेकांची झोप उडाली. आपल्या बापजाद्यांनी मजबूत बांधलेले आपले ‘घर’ या वादळापुढे टिकाव धरेल का, या काळजीने कुणाचे ‘मन’ थरकापून गेले... बरोब्बर त्रेचाळीस वर्षांपूर्वी, १९६६ मध्ये असेच एक वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घोंघावले होते... त्या वेळी वादळांना ‘ग्लोबल’ नावे नसत. तरीदेखील, ते वादळ कित्येक वर्षे मराठमोळ्या मनामनात घोंघावत राहिले. त्या वादळानेदेखील, त्या वेळी मोठी पडझड झाली होती. भलेभले, मजबूत आणि घट्ट मुळांचे अनेक वृक्ष त्या वादळात साफ आडवे झाले आणि अनेकांनी वादळापुढे मान झुकवून शरणागती पत्करली. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती’ असे एक वचन आहे. त्या वादळात जेव्हा मोठमोठ्या वृक्षांची वाताहात होत होती, तेव्हा लहानशी, कुठे अस्तित्वही नसलेली लव्हाळी मात्र तरारून उठली आणि त्या वादळानं त्यांना जणू संजीवनी दिली. अनेक लव्हाळी हा वादळवारा पिऊन तरारून उठली, आणि बघताबघता फोफावली... मोठी झाली. ज्या जमिनीतून जुनी खोडे जमीनदोस्त झाली होती, तिथेच ही लव्हाळी मूळ धरू लागली... त्या वादळानं नवे वृक्ष जन्माला घातले, आणि तब्बल त्रेचाळीस वर्षे हे वृक्ष अनेकांना सावली देत राहिले... १९६६च्या ‘त्या’ वादळातही, अनेकांची, त्यांच्या पूर्वजांनी ‘भक्कम’ बांधलेली मजबूत घरे मोडकळीस आली होती... म्हणूनच त्या वादळाच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात रुतलेल्या आहेत. ... महाराष्ट्रात नुकतेच थैमान माजविणाऱ्या या नव्या वादळाने त्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. ‘त्या’ वादळात आणि ‘या’ वादळात बरेचसे साम्य आहे, हे ‘अनुभवी’ जाणकारांनी नेमके ओळखले आणि हे नवे वादळदेखील ‘पडझडी’च्या असंख्य खाणाखुणा उमटविणार, हे स्पष्ट झाले. ‘त्या’ वादळाच्या वेळी तरारलेली लव्हाळी आता मोठी झाडे झाली आहेत. त्यांच्या सावलीतच, त्यांचीच बीजे पुन्हा रुजली आहेत. आजवर ती लहानगी रोपे, या सावलीतूनच वाऱ्यांच्या लहानश्या झुळुकांसोबत नुसती झुलायची. वादळाची चाहूलदेखील त्यांना शिवली नव्हती... पण अचानक आलेल्या या नव्या वादळात, ती जुनी खोडे भयाने झुकली, आणि जीव मुठीत धरून बचावासाठी आसरा शोहू लागली. त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला. पण या नव्या वादळापुढे ते जुने वादळही फिके पडले, तेव्हा त्या खोडांनी पायाशी झुलणाऱ्या रोपांना वादळात सोडून दिले, आणि अनेक रोपे हा नवा ‘वादळवारा’ पिऊन तरारली. नव्या वादळाने त्यांना झपाटून टाकले. आणि जुनी झाडे, ‘वादळग्रस्ता’ सारखी केविलवाणी झाली. आता केव्हाही आपण कोलमडणार, या भयाची सावली आता त्यातल्या अनेकांच्या फांदीफांदीवर दिसते आहे. त्रेचाळीस वर्षांपूर्वी आलेले ते वादळ अगोदर मुंबईवरच घोंघावले, आणि किनारपट्टीचा वेध घेतघेत ते कोकणात सरकले. बघता बघता त्याने कोकणाचा कब्जा घेतला. आणि अवघे कोकण काबीज करून ते वादळ तेथेच स्थिरावले. नंतर अनेक वर्षे कोणतीच पोकळी कुठेच निर्माण झाली नव्हती. पण निसर्ग मोठा लहरी असतो. उभे आयुष्य हवामानाच्या संशोधनात घालविणाऱ्या अभ्यासकांचे अंदाजही तो चुकवितो. कधीतरी कुठल्यातरी पोकळीची चाहूल लागली म्हणून वादळाचा अंदाज वर्तवावा, तर अचानक ती पोकळीच नष्ट व्हावी आणि वादळाची सगळी चिन्हेच पुसली जावीत, तर कधी पोकळीचा अंदाजच न आल्याने वादळाचा वेग किती असेल याचेच आडाखे विस्कटून जावेत, असा अनुभव अशा अभ्यासकांनाही अनेकदा आलेला असतो. या नव्या वादळाचे नेमके तेच झाले... ‘अशी अनेक वादळे आम्ही पाहिली आणि पचविली आहेत’, अशा भ्रमात असलेल्यांनाच या वादळाचा मोठा तडाखा बसलाय. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कशी करायची, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर चक्रीवादळासारखा घोंघावत असेल. ... आता ‘पंचनाम्या’ला सुरुवात होईल, तेव्हा नुकसानीचा नेमका अंदाज येईल... मग, घरे पूर्णपणे कोसळलेल्यांना किती ‘नुकसानभरपाई’ द्यायची, नुसती पडझड झालेल्यांना कसे ‘सावरायचे’, आणि कुणाला ‘तात्काळ मदती’ची गरज आहे, हे त्या पंचनाम्यानंतरच निश्चित होणार आहे. सध्या तरी, ‘वादळग्रस्तां’ची नुसती मोजदाद करण्याचे काम सुरू आहे.

Sunday, November 8, 2009

ग्लोबल स्टेट` : महाराष्ट्र

मुंबई आणि राज्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन, महागाईवर नियंत्रण अशा विविध माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत आहे. अडचणी अनेक असल्या तरी महाराष्ट्र आजही गुंतवणुकदारांसाठी पहिल्या पसंतीचे स्थान आहे.
`ग्लोबल स्टेट` म्हणून महाराष्ट्र नजीकच्या भविष्यात लौकीक प्राप्त करील, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शपथविधीनंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणार असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असेल, असे सांगितले.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि वीरमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा प्राधान्यक्रम सादर केला. तसेच राज्यातील जनतेच्या विकासासाठी शासन करणार असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

(‘महान्यूज’च्या सौजन्याने...)

जमलं एकदाचं...


एका घरात दोन पाळलेले बोके मजेत राहात होते. मालकाच्या घरी समृद्धी असल्याने त्यांची चैन होती. दिवसभर मलई खायची, आणि रात्री ढेकर देत मऊशार गादीवर लोळत पडायचे... असे मजेत दिवस जात होते... थोडक्यात, सुखाचा अगदी ‘वर्षा’व सुरु होता. दुसरा बोकाही हुशार होता. दिवसभर डोळे मिटून ‘मलई’ चापायची, आणि रात्री निजण्याआधी ‘राम’नामाचा जप करत दिवसभरातल्या गिव्ह ऎंड ‘टेक’चा हिशेब माडत पहुडायचे... एकूणच, दुसरा बोकाही सुखात असल्यामुळे, दोघांच्यातही भांडणाचा मुद्दाच नव्हता. आपापल्या ताटातली मलई खायची आणि मजा करत सुस्त राहायचं... शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?... मजेत जगणं हेच ना?... मग त्यासाठी माणसाचा काय, किंवा बोक्याचा काय... जन्म असला म्हणजे झालं. मालकाचा बिचारा नोकर मात्र, बोक्यांची ही चैन बघून खंतावायचा. हे डोळे मिटून मलई चापतात, पण मालकाचे डोळे तरी उघडे हवेत ना, असं त्याला वाटायचं आणि, आपल्या घरची उपाशी पोरं आठवून तो पाणावलेले डोळे मिटून घ्यायचा. बोके एकमेकांकडे बघून हसतायत, असा त्याला भास व्हायचा. मग तो तिकडे पाहायचाच नाही. मग बोके मलईवर तुटून पडायचे, आणे पोट भरल्यावर ‘पंजा’ने मिशा पुसत लोळायला जायचे.
अशी दहा वर्षे सरली. पिल्लू म्हणून घरात आलेले ते बोके आता चांगलेच गलेलट्ठ झाले होते. त्यांची भूक पण वाढली होती. शरीरं वाढली म्हणजे ते होणारच ना? आता त्यांना मलईची चटकच लागली होती. चांगली मलई कुठल्या कपाटात असते, तेही दोघांनाही माहीत झाले होते. दहा वर्षे एकाच घरात दोघेही वावरत होते ना? दोघांचाही डोळा त्या कपाटातल्या मलईवर होता. ही सगळी मलई आपल्यालाच मिळाली पाहिजे, असं दोघांनाही वाटू लागलं.
... आणि इथेच बिनसलं. दोघेही समोरासमोर आले, की एकमेकांवर गुरगुरायला लागले. मालक आणि नोकरांनाहे ते जुमानेसे झाले. आपणच मालक आहोत, अशा थाटात ते मलईच्या कपाटासमोर बसू लागले. हटकले तरी हलेनासे झाले. जिभल्या चाटत आणि आतल्या मलईच्या चवीच्या आठवणी मनात रंगवत ते सुस्तपणे पडून राहयचे.
एक दिवस मालक बाहेर कुठे गेला होता. नोकरानं आळस केला, आणि नेमकं मलईचं ते कपाट उघडं राहिल. ...आणि बोक्यांचं फावलं. सुखाच्या ‘वर्षा’वात लोळणा-या बोक्यानं झडप घातली, आणि कपाटातला तो मलईचा गोळा ‘पंजा’त पकडला. दुसरा बोका अजूनही सुस्त होता... बराच वेळ झाला, तरी दुस-या बाजूला हालचाल जाणवत नव्हती. तेव्हड्यात बाहेर घड्याळाचे ठोके पडले. घड्याळ वाजले, की त्याला मालकाची आठवण व्हायची. तो उठला. त्यानं आळस दिला, आणि मिशा फेंदारून त्यानं आजूबाजूला बघितलं. दुसरा बोका कुठेच दिसत नव्हता आणि मलईच्या कपाटाचं दार उघडं होतं... त्यानं अंदाज घेतला, आणि एकदा शरीराची कमान करून आळस झटकून उडी मारली. क्षणात तो दुस-या बोक्याच्या समोर उभा होता.
... दोघे समोरासमोर आले. आता गुरगुरण्याचा आवाजही वाढला होता. नोकरानं आत येऊन बघितलं. पण दोन्ही बोक्यांचा अवतार बघून पुढं व्हायची हिंमतच त्याला झाली नाही. आपलीच चूक आहे, आपणच कपाट उघडं ठेवून मलईचं ताट त्यांच्यासमोर वाढलं, आता करणार काय... कपाळावर सुन्नपणे हात धरून तो दोन बोक्यांचं भांडण बघत होता... आता बोके अगदी हातघाईवर आले होते. मलईचा तो गोळा काहीही करून पटकावायचाच, अश्या ईर्ष्येनेच दोघेही मैदानात उतरले होते... असा खूप वेळ गेला. मलईचा गोळा बाजूलाच पडला होता... आणि हे दोघे ‘हात’घाईवर आले होते. भाडून भांडून आता त्यांना थकवाही आला होता. ब-याच दिवसाच्या सुस्तीमुळे अलीकडे भांडायची ताकदही उरली नव्हती, हे दोघांच्याही लक्शात आले. आणि बाजूला जाऊन मलईच्या गोळ्यावर डोळा ठेवून ते दोघेही जरा विसावले.
... खूप वेळ झाला. पुन्हा बाहेर घड्याळाचे ठोके पडले आणि दुसरा बोका ताडकन उठला. आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. मग अचानक त्याचे डोळे चमकले. आवाज ह्ळूवार झाला. अंगाला लडिवाळ झोका देत तो पहिल्या बोक्याजवळ गेला, आणि त्याच्या अंगाला अंग घासत त्यानं लाडिक सुरात ‘मियांव’ केलं... पहिला बोकाही थकला होता. एकाच घरात राहायचं असेल, तर आपण असं एकमेकांशी भांडून चालणार नाही, असं त्याला बहुधा उमगलं होतं. शेवटी इतकी वर्षं एकत्र काढली होती. सुरुवातील तर, एका ताटात जेवलो होतो... पहिल्या बोक्याला ते दिवस आठवले, आणि तो विरघळला... त्यानंही शेपटीला विळखा देत दुस-याभी लडिवाळपणा करत मियाव केलं...
पण परत दुस-याचे डोळे चमकले. काहीतरी गडबड असावी, असं त्याला वाटू लागलं. पण त्यानं तसं दाखवलंच नाही... आता मलईसाठी काहीतरी करायलाच हवं, हे त्याला जाणवायला लागलं, आणि तेव्हढ्यात पुन्हा घड्याळाचा ठोका पडला. मग तो आपल्या भाषेत पहिल्या बोक्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. नोकर हे अचंबितपणे पाहात होता. पण त्याला त्यांची भाषा समजत नव्हती. बोक्यांना मात्र, माणसांच्या संगतीत राहून माणसांची भाषा येते, हे नोकरानं ऐकलं होतं. तो उठला आणि आपल्या कामाला लागला. आता गुरगुरणंही थांबलं होतं.
... ब-याच वेळानंतर दोन्ही बोके कुटूनतरी बाहेरून घरी आले, तेव्हा त्यांच्या तोंडात मलईचे दोन लहानसे गोळे होते. पण दोघेही खूश होते... एकमेकांच्या अंगाला अंग घासत दोघेही शेजारीशेजारी बसून मलई चापत होते. मधूनच एकमेकांना चाटत होते.
... नोकराला काहीच कळेना. अचानक त्याला त्या लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणा-या दोन बोक्यांच्या गोष्टीची आठवण झाली...
... ‘कुणीतरी वाटण्या करून दिलेल्या दिसतायत यांना’ नोकर स्वत:शीच पुटपुटला, आणि त्यानं केरसुणी हातात घेतली. बोक्यांचं भांडण बघण्यात आपली बरीच कामं तशीच रेंगाळलीत, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मालक ओरडेल या भीतीनं तो कामाला लागला...
पुन्हा घड्याळाचे ठोके पडले. मालकांची यायची वेळही झाली होती. आता मालकाला त्या मलईच्या गोळ्यांचं काय सांगायचं, या काळजीनं नोकर हैराण झाला होता. तेव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. दोन्ही बोक्यांनी कान टवकारले होते. मालक आला की ते नेहेमीच शेपटी घोळवत पुढेपुढे करायचे, आणि त्यांना कुरवाळताना मालकाचा रागही निवळायचा...
आताही तसंच व्हावं, असं नोकराला वाटत होतं.. त्यानं दरवाजा उघडला, आणि दोन्ही बोके मालकाकडे झेपावले... त्यांच्या मिशांना चिकटलेली मलई अजूनही तशीच दिसत होती...
मालकानं प्रेमान त्याच्या मिशा पुसल्या. नोकर अचंबित होऊन बघतच राहिला.
‘म्हणजे, मालकानंच मलईची वाटणी करून दिली की काय?’... तो पुन्हा पुटपुटला, आणि निमूटपणे कामाला लागला.
दोघेही बोके आता ‘पंजा’नं मिशा पुसत नोकराकडे बघत होते.
... मिश्किलपणे!...

सकाळ, ८ नोव्हेंबर २००९

Friday, October 30, 2009

शक्ती दे! युक्ती दे... (आणि बुध्दीही दे!!)

तुळशीमाळ गळा... (कुणाच्या?)
(सौजन्य : महान्यूज)

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. वनमंत्री बबनराव पाचपुते, राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, नाशिकचे खासदार समीर भुजबळ, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, आमदार एकनाथ खडसे आदी याप्रसंगी उपस्थित होते.


...तब्बल दहा वर्षे सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना आता निवडणुकांनंतर पुन्हा समस्यांची जाणीव झाली आहे. पांडुरंगाच्या चरणी तरी त्यांनी याची अप्रत्यक्ष कबुली दिली, हे चांगले. महाराष्ट्राच्या वैभवसंपन्नतेची जाहिरात करत सत्तेवर आलेल्या आघाडीने निवडणुकीनंतर पुन्हा समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि युक्ती द्यावी, असे देवालाच साकडे घातले आहे.
मुळात प्रश्न आहे, तो समस्या सोडविण्याच्या इच्छाशक्तीचा. देवाने त्यांना तशी बुध्दी द्यावी, अशी प्रार्थना आपण पांडुरंगाकडे करूया...
...आता तो पांडुरंग कधी आघाडीच्या मदतीला धावून येईल, आणि या समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि बुध्दी देईल, त्याकडे डोळे लावून आपण बसू या!

Saturday, October 24, 2009

नव्या इतिहासाची नांदी?

महाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आणि मुख्यालय असलेल्या दादर माहीम मतदारसंघावर "मनसे'चा झेंडा फडकावून, "विधानसभेवर भगवा' फडकावण्याच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला मनसेच्या इंजिनाने धडक दिली आहे. राज्याची सत्ता तर दूरच, पण येत्या काही वर्षांत होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेवरचा "भगवा' तरी शाबूत राहणार की नाही याची चिंता करण्याची वेळ निवडणुकीच्या ताज्या निकालांनी "युती'वर आणली आहे. दादर-माहीममधून " सुसाट सुटलेले' मनसेचे इंजिन आता महापालिका मुख्यालयाकडे वळणार आणि युतीच्या या सत्तास्थानास धडक देणार, हे स्वच्छ भविष्य आहे. त्यामुळे "युती'ची फेरबांधणी करावी की तिचे अस्तित्व टिकविण्याची धडपड करावी असा पेच युतीच्या, विशेषतःशिवसेनेच्या नेत्यांसमोर उभा राहणार आहे. राज ठाकरे यांच्याविषयी शिवसेनेतील अनेकांच्या मनात आजही असलेली सहानुभूती आता उफाळून आली, तर सेनेसमोर नव्या समस्या उभ्या राहणार आहेत. त्या समस्या ऊग्र होण्याआधी काळाची पावले ओळखली नाहीत तर शिवसेना हा एक राजकीय इतिहास होईल, आणि बालेकिल्ल्याचे काही ढासळलेले बुरूज भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची साक्ष देत राहतील...
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसमोरील मनसेचे आव्हान उघड झाले होते. राज ठाकरे यांनी इन्कार केला तरी मनसेमुळे सेना-भाजप युतीची मोठी पडझड झाली, हे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. "मनसे'च्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला, तरी युतीच्या पराभवात त्यांचा हातभार होता, हे मनसे आणि युतीमधील मतविभागणीवरून उघडही झाले आहे. या मतविभागणीमुळेच मुंबईत युतीला विधानसभेतदेखील याच आव्हानास सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट दिसत होते. तरीही सेनेच्या नेतृत्वाला जनमानसाचा अंदाज आला नाही. "मनसे'ला मत देण्याने कॉंग्रेसचा लाभ होतो, हे मतदारांच्या लक्षात आलेले असल्याने लोकसभेत केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीत, अशा भ्रमातून सेना नेतृत्वाने राज ठाकरे आणि "मनसे'वरील टीकेचा एककलमी कार्यक्रम राबविला तेव्हा भाजप मात्र एकमार्गीपणाने प्रचाराचे गाडे महागाईच्या मुद्‌द्‌यावर आणण्याचा अपयशी प्रयत्न करीत होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची गाडी एका रुळावरून धावलीच नाही, आणि मनसेचे इंजिन शिवसेनेची फरफट करीत आहे, असे एक "करमणूकप्रधान' दृश्‍य प्रचाराच्या काळात जनतेला पाहायला मिळाले.

शिवसेनेच्या जन्मापासून अगदी कालपर्यंत मुंबई आणि शिवसेना हे एकमेकांचा आधार असल्याचे चित्र होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, रमेश प्रभू आदी मोहरे बाहेर गेल्यानंतरदेखील बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा हीच शिवसेनेची शक्ती होती. उद्धव ठाकरे यांच्या हातात सेनेची सूत्रे आल्यानंतर नारायण राणे आणि त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी सेनेला सोडचिठ्ठी देत सेनेसमोर आव्हाने उभी केली. या काळात सेनेची पडझड सुरू झाल्यानंतर मात्र, मुंबई आणि शिवसेनेचे नाते हा एक "इतिहास' झाला. गेल्या पाच वर्षांत राणे आणि राज यांनी शिवसेनेला असंख्य धक्के दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या शक्तीचा उतरता आलेख आणखी ठळक झाला आहे. "मनसे'मुळे शिवसेनेला मोठा फटका बसला हेच याही वेळचे वास्तव आहे. मुंबईतील वडाळा, भायखळा, मुंबादेवी, मालाड (प.), वर्सोवा, अंधेरी (प.), चांदिवली, धारावी आणि वांद्रे (प.) या नऊ मतदारसंघांत कॉंग्रेस आघाडीने स्वबळावर वर्चस्व सिद्ध केले आहे. यापैकी धारावी, वांद्रे (प.), वर्सोवा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघांत "मनसे' नसतानाही युतीला कॉंग्रेस आघाडीकडून पराभव पत्करावा लागला, तर मनसे आणि युती अशा लढतीत शिवडी आणि घाटकोपर (प.) या दोन जागा मनसेने युतीकडून काबीज केल्या. शीव कोळीवाडा, कुलाबा, दिंडोशी, कांदिवली (पूर्व), अंधेरी (पूर्व), विलेपार्ले, वरळी, अणुशक्तीनगर आणि कुर्ला या नऊ मतदारसंघांत मनसे आणि युतीच्या मतविभागणीमुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व मतदारसंघांत मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. बोरीवली आणि मुलुंडमध्ये मनसेशी थेट टक्कर देऊन युतीमधील भाजपने या जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, मनसेमुळे फायदा झालेल्या कॉंग्रेस आघाडीसही माहीम, मागठाणे, विक्रोळी आणि भांडुपमध्ये "मनसे'ची धडक बसलीच आहे. या चार जागा मनसेने कॉंग्रेसशी थेट लढत देऊन जिंकल्या आहेत, तर चेंबूर आणि कालिना या दोन मतदारसंघांत मनसे आणि कॉंग्रेस अशी लढत होऊनदेखील युतीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे मनसेला फटका बसला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे रिंगणात असूनदेखील वांद्रे (पूर्व), दहिसर, गोरेगाव, जोगेश्‍वरी (पूर्व), चारकोप, घाटकोपर (पू.), आणि मलबार हिल या सात मतदारसंघांत युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघांत मनसेचा युतीच्या विजयावर परिणाम झालेला नाही.
मुंबईतील निकालावरील "मनसे फॅक्‍टर'चा प्रभाव या निकालातून स्पष्ट दिसतो. शिवसेनेच्या पडझडीतून जन्मलेल्या "मनसे'मुळे सेनेच्या सहानुभूतीदारांना "हवा असलेला पर्याय' मिळाला आणि त्यांची मते मनसेकडे वळली, हाच याचा अर्थ आहे. शिवसेनेची एक भक्कम "मतपेढी' आता फुटली आहे, हे स्पष्ट झाले आहे. मनसेला तरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. त्याबरोबरच, मुंबईत "मनसे'ला सहा जागांवर मिळालेल्या विजयास शिवसेनेच्या जुन्या मतदारांचाही हातभार आहे, हेही स्पष्ट आहे. वाढती ताकद घेऊन नव्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या "मनसे'मुळे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद क्षीण होत गेल्याचे मनसेच्या स्थापनेनंतरच्या दोनच निवडणुकांत उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या भक्कम निकालांमुळे मनसेचे मनोबल वाढले आहे. आता त्यांच्या तंबूत मुंबई महापालिकेसाठी "तिसऱ्या लढाई'ची तयारी सुरू झाली आहे. "दोन ठोशां'मुळे क्षीण झालेली शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे.
(सकाळ, शनिवार २४ ऒक्टो. ०९)

समृद्धीची रास, घरोघरी.... ५६ टन सोने खरेदी !


धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात ‘सोनियाचे दिन’ होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या बोनसच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली.
दिवस खरंच बदललेत काय?
दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षांच्या तुलनेत ३९.२ टक्के अधिक रु. ८,९०४ कोटींची मौल्यवान धातूची खरेदी केली गेली.
दिवाळीनिमित्त अनेक शहरांत जवाहि-यांनी एकत्र येऊन किंवा स्थानिक स्तरावर स्वतंत्रपणे सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी ग्राहकांना प्रोत्साहनपर विशेष योजना यंदा आखल्या आणि ग्राहकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सोने आता केवळ दागिन्यांच्या हौशीपुरते मर्यादित राहिलेले नसावे. भविष्यातील खडतर आर्थिक संकटांतून मार्ग काढण्याचा सुलभ मार्ग म्हणूनही त्याकडे पाहिले जात असावे. म्हणूनच, दिवसेंदिवस सोन्याचे भाव कडाडत असतानाही, सोन्याची खरेदी वाढते आहे... माणसातला ‘गुंतवणूकदार’ जागा झाल्याचेही हे लक्षण असावे..
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात सर्वाधिक १९.६ टन अर्थात रु. ३,११६.४० कोटींच्या सोन्याची विक्री झाली. त्या खालोखाल...
ही बातमीच वाचा ...
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=17869:2009-10-23-17-52-24&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

Sunday, October 18, 2009

आमच्या बखरीतून...

... आमचा जन्मसिद्ध हक्क ! ‘अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव’... ... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि ‘टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला’ या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली... टिळकांचा जन्म चिखलीत झाला, तर रत्नाइरच्या टिळक आळीत त्यांचे जन्मस्थान कसे, हा प्रश्न नेमका भाषणाच्या वेळी माझ्या डोक्यात वळवळला आणि मी पुरता भांबावून गेलो... कपाळावर घाम आलाय असं वाटून मी मुठ सोडून हात कपाळाकडे नेला... वळलेला तळवाही तोवर ओला झाला होता... मग तर मला काहीच सुचेना! ... ‘एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो... जय हिंद, जय महाराष्ट्र...’ कसंबसं एवढं बोलून मी जागेवर येऊन बसलो, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला... का ते मला अजून उमगलेलं नाही. लोकमान्यांचा जन्म नेमका कुठे झाला याचा शोध घ्यायचा मी नंतर प्रयत्नच केलेला नाही. कारण, त्यांनी स्वराज्यावर जन्मसिद्ध हक्क सांगितला म्हणजे ते नक्की रत्नांग्रीतच जन्मले याविषयी माझ्या मनात नंतर शंकाही उरलेली नाही. त्यामुळे उलट आता टिळकांच्या जन्मस्थानाविषयी कुणाशीही वाद घालायचीही गरजच नाही... कारण, रत्नारीच्या मातीवर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे... त्यासाठी कोर्टात खेटे घालावे लागले तरी पर्वा नाही... आमच्या कितीतरी पिढ्या त्यातच संपल्यात... ‘वादे वादे जायते तत्वबोध:’ ही म्हण माहीत नसली, तरी नकळत तिचं तंतोतंत पालन करणारा कुणी तुम्हाला भेटला, तर ‘तुम्ही रत्नारीचे का’, असा प्रश्न तुम्ही बिन्धास्तपणे त्याला विचारा... या प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळणार नाही... पण, ‘तुम्ही कसं ओळखलंत?’ असा प्रतिप्रश्न आला, की तुमचा अंदाज खराय, याचा निम्मा पुरावच तुम्हाला मिळेल... कारण, प्रश्नाचं उत्तर द्यायचं हा आमचा स्वभावच नाही. प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्याला निरुत्तर करायचं, हाही आमचा एक जन्मसिद्ध हक्कच आहे... ‘केवढा उंच झालायस रे... तुझं वय काय?’ असं सहज कुंणाला विचारलंत, आणि ‘तुमचा काय अंदाज, किती असेल?’ असा प्रतिप्रश्न आला, की, आमच्या मातीचा तो कस अजूनही तिळमात्र कमी झालेला नाही याची खात्री पटते आणि अभिमानानं ऊर भरून येतो...कोकणाच्या लाल मातीत रंगलेला, सागराच्या गाजेत रमलेला, ‘सड्या’वरच्या पारावर गप्पा मारत दिवेलागणीची वाट पाहाणारा कुणी दामले, लेले, नेने असो, नाहीतर पाठारावरच्या पाखाडीत राहाणारा कुणी सद्या, बुध्या, रावज्या, धोंड्या असो- प्रत्येकाच्या अंगात रत्नांग्रीचंच रक्त सळसळून वाहात असतं... ‘काय रे बुध्या... वई नीट घट्ट बांधलीयेस ना?’ असा सवाल संध्याकाळी पैसे हातावर ठेवताना एखाद्या सदुनानांनी विचारलाच, तर, ‘बगा हल्लवन...’ असंच उत्तर सदुनानांना अपेक्षित असतं. त्यात ‘इकडेतिकडे’ झालं, तर बुध्याचं कायतरी बिनसलंय, हे कुणी सांगायची गरज नसते. ‘देवावरचं फूल उचलून’ बोलायची तयारी असलेला आत्मविश्वास नसानसात भिनलेला, दोन अक्षरांपेक्षा जास्त अक्षरं उगीचच आडनावात ‘फुकट’ घालवायची नाहीत असा ज्यांचा बाणा, ती माणसं बहुधा रत्नांग्रीत येऊन पहिल्यांदा स्थायिक झाली असावीत... त्यांच्यामुळेच ‘रत्नागिरी’चं ‘रत्नांग्री’ झालं, आणि गावाच्या नावातलं अर्धं अक्षर वाचलं... ‘परवडत नाही’ असं तोंडानं उच्चारणं, म्हणजे, शब्द वाया घालवणं... पण त्याच हिशेबापायी अनेक उंबरठ्यांमध्ये येणारा गणपती दीड दिवसांनी ‘माघारी’ जातो, असं म्हणतात... या दीड दिवसांचीसुद्धा काटकसर करून हा गणपती ‘दीड दिसां’चा केला, की ‘व’ वाचतो... तेवढा एक ‘व’, वाक्यात दुसरीकडे कुठेतरी उपयोगी पडू शकतो ना?... गणपती ही बुद्धीची देवता आहे. इतरांना दहा दिवसांत तो जितकी बुद्धी देतो, तेवढी मिळवण्यासाठी आमाला दीड दिवस पुरत असेल, तर उगीच दहादहा दिवस कश्याला वाया घालवायचे त्याचे?... असाही एक विचार त्यामागे असतोच. अश्याच सणासुदीच्या दिसांत, घरात भरपूर ‘पाव्हणेरावळे’ असले, की, फडताळातला तूप वाढायचा ‘तो’ चमचा बाहेर काढला जातो... पानात तूप पडण्याआधी चमच्याच्या मधोमधच्या भोकातून धार मागं भांड्यात जाते, हे त्यांच्या लक्षात येत नसेल का, असा भाबडा प्रश्न पडणारा पंक्तीतला माणूस म्हणजे नक्कीच रत्नारीत आलेला पाव्हणा असायचा... निम्म्या पंक्ती आटोपल्या, की अर्धी पोळी ‘बाजूला’ काढून ठेवावी आणि जेवणं उरकली, की त्या पोळीनं भाजीची कढई पुसून घ्यावी, म्हणजे ‘भाजीपण साफ, आणि पोळीलापण चव’ हे शहाणपण इथल्या माहेरवाशिणीला शिकवायला लागत नाही, असं म्हणतात... दुपरी भांडी घासायला आलेल्या भिक्याला कढईला चिकटलेला भाजीचा रस दिसला, की, ‘वयनी, कुणी जेवायचं र्‍हायलंय की काय?’ अशी खवचट शंका त्यानं घेतली, म्हणून कुणी रागवणार नाही! ...अमेरिकेनं हिंदी महासागरात सातवे आरमार आणून ठेवलान, तेव्हाची गोष्ट! ही बातमी पसरली, आणि रत्नारीत खळबळ उडाली. प्रत्येकजण सातव्या आरमाराची चर्चा करताना दिसायचा... अनेकांची तर झोपच उडाली होती... हिंदी महासागर तो आहे कुठे, सातवं आरमार म्हजी काय, ते म्हासागरात कश्या आणून ठेवलान, असे प्रश्न ‘आंगण्या’चा कचरा काढताकाढता एखादा गडी करायचा, आणि पंचाईत व्हायची. ‘तुला कश्या हव्यात नाही त्या पंचायती?’ अशा ‘उत्तरा’नं प्रश्न पलटवले जायचे. मग आरमाराचं काल्पनिक चित्र मनात रंगवत तो निमूटपणे कचरा काढायचा... .... पण अखेर या बैचैनीचा शेवट झाला. एका बातमीनं अमेरिकेचं ते सातवं आरमार माघारी गेलं... अजूनही ती आठवण कुणीकुणी सांगतं. त्याचं काय झालेलं, भिशानं ‘आरशा’च्या अग्रलेखातनं अमेरिकेला ‘हाग्या दम’ भरलान. ‘आरमार मागं घेतलं नाही, तर परिणामांना तयार रहा’ अशी कडक समज दिलान, म्हणूनच अमेरिकेनं आरमार मागं घेतलं, असं आम्हाला कुणीतरी सांगितलन... ‘आरशा’चा तो अंक अमेरिकेच्या कुण्या बड्या अधिकायाच्या हातात पडला, आणि त्याच्या सोबतच्या कुणीतरी ‘रटप’ करत नुस्तं हेडिंग वाचलान... आणि ते इंग्रजीत सायबाला सांगतलान... यातलं खरं किती आणि खोटं किती हे आम्हाला माहीत नाही. पण दुसर्‍या दिशी अमेरिकेचं आरमार मागे गेलं होतं... ... सदुभाऊ पाटणकर हे नाव रत्नारीत एकदातरी जाऊन आलेल्या कोणत्याही देशवासीयानं नक्कीच ऐकलेलं असणार. अटलबिहारी वाजपेयी नुस्ते खासदार होते, तेव्हा रत्नारीला आले होते, आणि सदुभाऊंना भेटले होते... संघाची काळी टोपी आणि अर्ध्या चड्डीतल्या सदुभाऊना पाहून, आपल्या स्वप्नातला भाजप असाच असला पाहिजे, असं तेव्हा वाजपेयींना वाटलं होतं म्हणे... सदुभाऊचा नवा फलक उपक्रम पेपरात छापून आला, की मुंबईतला प्रत्येक चाकरमानी रत्नागिरिकर तो पेपर विकत घ्यायचा... काही पेपरांनी असा आपला खप वाढवला होता, अशी वदंता आहे... आमरसाचा कारखाना सुरू झाला, आणि रत्नांग्रीच्या आंब्याचा रस डब्यातनं बाहेरगावी जायला सुरुवात झाली. माणसांना रोजगार मिळाले. कारखान्यातली माणसं संध्याकाळी काम संपवून घरी जायच्या आधी नळाखाली हात धूत, तेव्हा सगळी पन्हळी ‘पिवळीधम्मक’ होऊन, आंब्याचा नुस्ता घमघमाट सुटायचा. या पाण्याला आमरसाची चव ना, म्हणून मग मालकानं हात धुवायला पातेली ठेवलान, आणि ते पाणी ‘मॆंगोला’ म्हणून विकलान... अशी चर्चा नंतर कारखाना बंद पडेपर्यंत चालू होती... ... वरच्या आळीतल्या कुणाचा नातू अमेरिकेत गेला, आणि तो खोर्‍यान पैसा खेचतोय, असं कुणी कुणाला सांगितलन, तर, `पैसे मिळवायला अमेरिकेला जायला लागत नाही... अंगात धमक असेल तर, हितं, बसल्या जागेवर, बागेतनं पैसा मिळतो’ असं ठणकावून सांगायची हिंमतही या मातीतच असते... आंगण्याच्या ‘गडग्या’वर उगवलेलं आंब्याचं रोपटं पुढं वादळ माजवणार, हे माहीत असतानाही दोन्ही घरांच्या प्रेमाची पाखर त्याला मिळावी आणि ते फोफावत जावं, पुढे रसाळ आंब्यांनी लगडल्यावर त्याच्यावरून दोन घरांत होणारे भांडणाचे तमाशे पाहात शेजारपाजायांनी ‘टाईमपास’ करावा, हेही इथे नवं नाही... .... गडग्यावरच्या आंब्यासाठी ‘बेड्याचा कणका’ उचलून सख्ख्या भावकीवर धावून जाणार्‍या आणि आपल्याच वंशावळीचा उद्धार करीत शिव्यांची स्वैर खैरात करणार्‍यांच्या चुली वेगळ्या होत गेल्या... पण मुंबैत आल्यावर ‘भावकीतलं किचाट’विसरून एकसाथ गौरी-गणपतीला आणि दिवाळीच्या सुट्टीला गावकडे फिरकला नाही, तो ‘रत्नांग्रीकर’ नव्हेच! सणासुदीला कोकणाकडे जाणाया गाड्यांची गर्दी वाढते ते उगीच नाही... असं असूनही, ‘परतीचं रिझर्वेशन’ हा प्रकार मनावर घ्याची आमच्यात पद्धत नाही... आयत्या वेळी एस्टी स्टॆंडवर घिरट्या घालायच्या, आमदाराची चिठ्ठी मिळवायची, नाहीतर ‘वशिले’ शोधायचे... मग स्टॆंडवर घुटमळणारा कुणीतरी बेरक्या समोर बरोब्बर उभा राहातो... मायाळू नजरेनं चाकरमान्याकडे पाहातो... ‘किती तिकीटं हवीत रे बावा तुला?’ असा प्रेमळ प्रश्न विचारतो, ‘पैसे दे, आत्ता तिकिटं आणून देतो’ असा एक आश्वासक दिलासाही देतो आणि उत्तराची वाट न पाहाताच हात पुढे करतो...पण चाकरमानी मुंबईचं पाणी पिलेला असतो... तो सगळ्या तिकिटांचे पैसे एकरकमी देणार नाही, हे त्या बेरक्या’ला माहीत असते...‘असं करा, निम्मे पैसे आता द्या, उरलेले तिकिटं हातात मिळाल्यावर द्या’ तोच तोडगा सुचवतो, आणि चाकरमान्याला हे पटतं. ‘उद्या सकाळी समोरच्या पानाच्या गादीवरनं तिकिटं घेऊन जा... मी तिकिटं तिथे ठेवतो’ असं सांगून तो गर्दीत दिसेनासा होतो... दुसया दिवशी तिकिटं मिळत नाहीत, तेव्हा आपण गंडवले गेलो, हे चाकरमान्याला लक्षात येतं... ‘निम्मेच पैसे देऊन आपणच कसा शहाणपणा केला, हे तो मुम्बईत आल्यावर शेजारच्यांना सांगतो... ... संध्याकाळी चाळीत सगळीकडे ही `वार्ता' झालेली असते...

Saturday, October 17, 2009

शुभेच्छा!!

शुभेच्छा!!

दिव्यांची आरास... सजवी घरास...
समृद्धीची रास... यावी घरोघरी...

Friday, October 16, 2009

सदुभाऊ...

"राजकारण असंच असत... माणसांचा वापर करून घेणारेच इथे जास्त. हे माहित असूनही मी हे करतोय.. खाज म्हणा हवं तर... काय मिळतं म्हणाल, तर... समाधान... ते सगळ्यात मोठंय्‌' ... सदुभाऊ बोलत होते, आणि आतून त्यांची बायको कुत्सित हुंकार देत होती...
"कसलं समाधान?... घरचं खाऊन लष्कारच्या भाकऱ्या भाजायचे नस्ते उद्योग!' ती आतूनच म्हणाली, आणि सदुभाऊंनी मला जोरदार टाळी दिली.
"वयनी.. पण तुम्हाला नवऱ्याचा अभिमानच वाटत असणार'... मी मुद्दामच म्हणालो...
"अज्जिबात नाही.. मी खमकी आहे, म्हणून चाल्लयं... काही नाही अभिमान-बिभिमान' ती पुन्हा म्हणाली, पण त्या शब्दातलं कौतुक स्पष्ट जाणवतं होतं.
...रत्नागिरीत त्या दिवशी भाजपाचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी विनोद तावडेंची सभा सुरू होती... सभागृह खच्चून भरलं होतं... तावडेंचं भाषणही ताडाखेबंद होत होतं... टाळ्या, घोषणांचा पाऊस पडत होता, आणि स्टेजच्या एका कोपऱ्यात प्रचाराचा फलक घेऊन एक माणूस पुतळ्यासारखा उभा होता. माझं लक्ष त्या माणसाकडेच होतं. श्रोते आणि नेते आरामात बसलेले असताना फलक हातात धरून निष्टेनं उभा राहीलेल्या या माणसाची मला कीव येत होती. सगळे त्याला मूर्ख समजत असतील, असंही मला राहूनराहून वाटत होतं. पण त्यानं माझ लक्ष वेधलं होतं.... सभा संपल्यानंतर त्याला भेटायचंच असं मी ठरवलं....
गर्दी ओसरताच मी त्याला शोधू लागलो.. पण तो गायब झाला होता... रत्नागिरीच्या बाबा परुळेकर वकिलांना फोन केला. त्यां माणसाचा पत्ता मला शोधायचाच होता.
`अरे, तो सदुभाऊ... कशाला भेटणारेस त्याला? काहीतरी लिहू नकोस हो त्याच्याबदल. एकदम चांगला, सज्जन माणूस आहे तो'... बाबानं फोनवरच मला सांगितलं, आणि मीही त्याला अगदी `वचन` दिलं... तसं माझ्या मनातच नव्हतं...
नंतर काही वेळातच मी बाबाबरोबर समोरच्या सदुभाऊंच्या घरी होतो...
`कुठेतरी पावसेकडे गेलेत प्रचाराला'... बाजूच्या दुकानात गिर्‍हाईकाला काहीतरी बांधून देत सदुभाऊंची पत्नी तिकडूनच म्हणाली, आणि बाबानं माझ्याकडे बघितलं..
`ठीक आहे... तो येईपर्यंत तू वयनींशी बोल... त्यांच्यामुळेच सदुभाऊंना मोकळेपणा मिळतोय' बाबा मुद्दामच मोठ्यानं म्हणाला, आणि अपेक्षेप्रमाणे वयनींनी तिकडूनच पुन्हा `हूं...' केलं... मिनिटभरानं वयनी दुकानातून घरी आल्या, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... वयनींच्या नापसंतीच्या सुरातही, नवर्‍याचा अभिमान डोकावतोय, असं मला जाणवत होतं...
पाचदहा मिनिटांतच सदुभाऊ आले... बाबानं बहुतेक त्याला फोन केला होता.
`स्वामी समर्थ'... हातातला फलक भिंतीशी कोपर्‍यात उभा करून ठेवत सदुभाऊंनी नमस्कार केला, आणि डोक्यावरची `कमळवाली कॅप' काढून गुडघ्यावर ठेवत ते समोरच्या खुर्चीत बसले...
`हं बोला तुम्ही'... म्हणत बाबा घरी गेला, आणि आम्ही बोलू लागलो...

... त्याचं नाव सदुभाऊ जोशी. गेल्या काही महिन्यांपासून, लोकजागृतीसाठी वेगवेगळ्या विषयांवरचे फलक हाती घेऊन हा एकांडा शिलेदार, जमेल तिथं प्रवास करणारा एक नवा आवलिया रत्नागिरीत अवतरलायं... असेच फलक घेऊन रस्तोरस्ती फिरणाऱ्या सदुभाऊ पाटणकरांची तब्बेत सध्या बरी नाही... सदुभाऊ जोशींनी त्यांचा वारसा चालवलाय...
मी त्यांच्या घरी त्यांच्याशी बोलत असतांना पंधरावीस माणसं तेवढ्या वेळात सदुभाऊंना हाक मारून गेली, आणि या आवलियाचा लोकसंग्रह मी डोळ्यांनी अनुभवला... मागे एकदा नगरपालिकेच्या निवडणूकीत सदुभाऊ भाजपाच्या तिकीटावर उभे राहीले, आणि सगळ्यांचा धुव्वा उडवला.. नंतर पक्षांनं उमेदवारी नाकारली, तेव्हा अपक्ष उभे राहिले, आणि दणकून आपटले.. म्हणूनच, `माणासापेक्षा पक्ष मोठा असतो', यावर त्यांची श्रद्धा... आता भाजपाच्या प्रचारासाठी सदुभाऊ हिंडतायत. ब्लड प्रेशर, डायबेटीजसारखे आजार सोबत घेऊन, स्वत:च्या खर्चानं. रिक्षा भाड्यानं घेऊन हातात प्रचाराचा फलक घेऊन ते गावोगाव फिरतायत. भाषण नाही, घोषणा नाहीत, आणि संवादही नाही... हातातला फलक एवढंच त्यांच्या प्रचाराच साधन.
स्वाईन फ्लूची साथ आली, तेव्हा सावधगिरीच्या सूचना देणारा फलक घेऊन सदूभाऊ चिपळूणपासून राजापूरापर्यंत स्वखर्चानं हिंडले... कधी लोकांनी चेष्टा केली, कधी आपुलकलीनं विचारपूरस केली... पण "खाज'!... ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही...
सामाजिक जाणीवेतून एक दुर्लक्षित आयुष्य फुलविण्याच्या उभेदीतून दत्तक घेतलेला चार महिन्यांचा मुलगा आज एकवीस वर्षांचा झालायं... वेदशाळेत शिकतोय... "आपण एका आयुष्याला आकार देण्यात यशस्वी ठरलो', एवढंच सदूभाऊ अभिमानानं सांगतात...
+++ +++ +++
`ही नवी खाज कधीपासूनची?'... बराच वेळ गप्पा मारल्यावर, हा माणूस मोकळाढाकळा आहे, अशी खात्री झल्यानं मी मध्येच एकदा सदुभाऊंना विचारल...
झाला दीडदोन महिने... मागे सावर्ड्यातल्या एका मुलाला स्वाईन फ्लुच्या उपचारासाठी `रत्नारी'त आणलं होतं.. त्याला बघायला हॉस्पिटलात गेलो, तेव्हा वाटलं, हे प्रकरण साधं नाही... आपण काहीतरी केलं पाहिजे... आणि मी विचार करायला लागलो... एकदम सदुभाऊंचीच आठवण झाली... आपले सदुभाऊ पाटणकर- अलीकडे आजारी आहेत... मग मी ठरवलं... लोक्जागृती करायची... करून घेतला एक मोट्ठा फलक... चांगला साताठशे रुपयांचा... आणि फिरलो राजापुरापास्नं खेडापोवत'... कोपर्‍यातल्या एका मोठ्या फलकाकडे बोट दाखवत सदुभाऊ म्हणाले...
`उचलून बघा... एका हाताला झेपणारा नाही'... खुर्चीतून उठत त्यांनी तो फलकच माझ्यासमोर धरला... `काय करावे, काय करू नये', याची लांबलचक यादी त्यावर होती...
मी सदुभाऊनाच हो फलक हातात धरायला सांगितलं, आणि घरातच त्यांचा एक फोटो घेतला...
पुन्हा गप्पा सुरू झाल्या...
तेव्हढ्यात वयनींनी दोनचार आल्बम समोर आणले होते... मुलाचे फोटो!
`चार महिन्यांचा असताना ह्याला घरी आणून हितं सुपात ठेवला...' दरवाज्याच्या उंबरठ्याकडे बोट दाखवत सदुभाऊ सांगू लागले...
`आई होती तेव्हा... ती पुढे आली, वाकून त्या एवढ्याश्या जिवाकडं बघितलंन, आणि `हुं' करून आत गेली... तिला आवडलं न्हवतं हे दत्तक प्रकरण'... हसतहसत सदुभाऊ म्हणाले.
`तिचा बिचारीचा काही दोष नाही... जुन्या वळणाची होती' भिंतीवरल्या आईच्या फोटोकडे पाहून नमस्कार करत सदुभाऊ म्हणाले.
`पण आम्हाला मूल हवं होतं... लग्नानंतर बरीच वर्षं मूल नव्हतं... मग नंदूच्या आग्रहावरून तपासणी करून घेतली, आणि लगेच ठरवलं... आपल्या बायकोचं आईचं सुख हिरावून घ्याचं नाही... तिला मुलाची माया मिळवून द्यायचीच'... सदुभाऊंच्या सुरात स्वभावातला सगळा प्रांजळपणा उतरला होता...
मग मी आल्बम उलगडू लागलो...
एकेका फोटोवर बोट ठेवत सदुभाऊ मुलाचं कौतुक सांगत होते...
तेव्हढ्या वेळात घरात आणखी सातआठजण येऊन बसले होते... सगळ्यांना हे माहीत होते, हे त्यांच्या चेहेर्‍यावरच दिसत होतं. तरीपण सगळेजण कान लावून ऐकत होते.
तासाभरानंतर सदुभाऊंच्या बायकोनं ट्रे भरून चहा आणला... सगळ्यांच्या हातात कप देतादेता तीही या कौतुकसोहळ्यात सामील झाली होती...
`वयनी, कश्याला केलात एवढ्या सगळ्यांना चहा?' मी उगीचच म्हणालो... पण तोवर सदुभाऊंनी मस्त फुरका मारला होता...
`घ्या हो... हे रोजचंच आहे आमच्याकडे'... समाधानानं बायकोकडे पाहात सदुभाऊ म्हणाले, आणि तिनंही प्रेमळ हसून त्यांना दाद दिली...
`पण फक्त, चहा डायबेटीसवाल्यांचा आहे'... पुन्हा खट्याळपणे माझ्याकडे पाहात डोळे मिचकावत सदुभाऊ म्हणाले, आणि त्यांनी टाळीसाठी हात समोर केला...
पुन्हा एक `हू' ऐकू आलं...
चहा संपवून सदुभाऊ उठले, आणि कोपर्‍यातला फलक त्यांनी उचलला... माझा हात हातात घेत निरोप घेतला, आणि ते रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या भाड्याच्या रिक्षात बसले...
मीही बाहेर आलो... सदुभाऊंना हात हलवून निरोप दिला.

Thursday, October 8, 2009

'ठेवणीतला' प्रश्‍न!

'आकाशातून कोसळणाऱ्या धारांच्या माऱ्यातून वाट काढत आमची एस. टी. मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. खिडक्‍यांच्या काचांवरही ढग साचले होते आणि त्यावर बोटं फिरवून साफ केलेल्या काचेतून बाहेर पाहात माझ्या शेजारच्या सीटवरचा तो वयस्कर प्रवासी सुन्न सुस्कारे सोडत होता. त्याचा चेहराही काळजीनं भरल्यासारखा होत होता. ...धुवांधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातलंय, जनजीवन पुरतं कोलमडून गेलंय....एरव्ही वाहनांनी गजबजून पळणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना आहे. एखादं मागे फिरून परतणारं वाहन आणि पावसातून वाट काढत जमेल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी एस. टी. अशी चुकार वाहनं मधूनमधून त्या ओल्याचिंब रस्त्यावरून सरकताना दिसत होती. पाचदहाच प्रवाशांना घेऊन जाणारी आमची एस. टी. कणकवलीपर्यंत जाण्यासाठी हळुहळू सरकत होती. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर काळजी होती.....माझ्या शेजारचा तो प्रवासी तर प्रचंड दडपणाखाली असल्यासारखा वाटत होता. ....मला राहवेना. त्याच्या मनावरचं दडपण बाजूला व्हावं, या उद्देशानं मी त्याच्याकडे बघून हलकंसं हसलो. पण त्याच्या डोळ्यातली काळजीची झाक मिटलीच नाही. तो त्याच नजरेनं माझ्याकडे बघत होता... 'मामा, काय म्हणताय? कुणाला मत देणार?' निवडणुकीच्या माहोलात प्रवास करतानाचा माझा 'ठेवणीतला' प्रश्‍न मी त्याला विचारला, आणि हसलो. पण तो हसला नाहीच, उलट काहीशा रागानंच त्यानं माझ्याकडे बघितलं. 'तुमाला सुचतायत मतां...हिकडं आमची भातां बगा...गेली सगली व्हावन...ह्या पावसानं सगलं वाट्टोलं क्‍येलान...निस्ता कोसलतोय....तीन दिस झाले. त्येला थोप न्हाई.' त्याच्या काळजीचं कारण मला समजलं होतं. मग मीही खिडकीची काच पुसली आणि बाहेर बघू लागलो... त्याचं दुःख वेगळं होतं... शेतातली आडवी झालेली भाताची रोपं त्याला अस्वस्थ करत होती. तोही माझ्याबरोबर बाहेर बघू लागला... एका वळणावर घाईघाईनं त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला आणि एका शेताकडं बोट दाखवत तो पुन्हा चुकचुकला. लोंब्यांनी ओथंबलेली भाताची रोपं जमिनीवर पडली होती. 'आता हातास काय लागणार...सगल्या दान्यास्नी पुन्ना मोड येनार...भातां सगली संपली. सत्यानास केलान पावसान... ज्यांनी भातं कापली, त्यांचीपन वाट लागली असंल...सुकवनार कुटं ती भातं? ....तो पुन्हा कळवळला. 'पण ही शेतातली रोपं अजून तयार नाही झालीत ना?' हिरवी दिसणारी काही रोपं बघून मी धीर करून त्याला विचारलं. 'तर वो...ही म्हान भातं...पन तयार झाली हायेत. कापायला झालीत. पन ह्या पावसातनं काय कापतांव?' प्रत्येक वाक्‍यासोबत तो अधिकच हळवा होत होता. "महान' म्हणजे, थोडं उशीरा तयार होणारं पीक...आणि "हळवी' म्हणजे लवकर पिकणारं पीक.. 'मिरगात कोसलला नाय येवडा आता हस्तात कोसलतोय...संपली सगली शेती'....तो स्वतःशीच बोलल्यासारखं बोलला. आता मात्र त्याच्या चिंतातूर चेहऱ्यातून ओसंडणारा अस्वस्थपणा आपल्यालाही घेरतोय, असं मला वाटायला लागलं होतं. 'जाऊ द्या हो मामा, हे शेत तुमचं थोडंच आहे?' मी जरा जोरातच बोललो आणि मला धक्का बसला. मघासारख्याच रागाच्या छटा आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि माझ्या डोळ्यात त्यानं आपली नजर खुपसली होती. 'म्हजी? काय बोलताव काय तुमी?....कुटनं आलाव, मुंबईवरनं?'....त्यानं जरा जोरातच मला विचारलं. मी मानेनंच "हो' म्हटलं. 'तरीच`... तो पुटपुटला... `जानार कुटं?'.....त्यानं मोठ्यानं विचारलं. 'सावंतवाडी'....मी तुटकपणानं म्हणालो 'कोन पावनेबिवने हायत तितं?'....त्यानं सौम्यपणानं प्रश्‍न केला. तो पुढं काय विचारणार याचा मला अंदाजच येत नव्हता. मी मानेनंच नाही म्हणालो. 'मुक्काम किती?'.....त्यानं पुढचा प्रश्‍न विचारला. 'दोन दिवस...एखाद्या हॉटेलात राहणार'....मी सांगून टाकलं. आणि तो खिन्न हसला. "तितं तुमी जेवनार, ते दाने काय तुमच्या शेतात पिकलेत?' त्यानं विचारलं, आणि त्याच्या प्रश्‍नाचा रोख मला समजला. "आवं, कुटल्या दान्यावर कुटल्या खानाऱ्याचं नाव लिवल्यालं आसतंय, ते कुनाला ठावं असतं का?....मंग हे शेत माजं नाय, म्हनू काय झालं?...हितलं दानं खानारा कोनतरी दुसराच असंल की नाय?....त्याच्या पोटात जानारे हे दाने आसं वाया जातायत....मंग चालंल का?'....तो समजावणीच्या सुरात माझ्याशी बोलत होता. मी खजिलपणानं मान डोलावली आणि तो समाधानानं हसला....आपल्या अस्वस्थपणाचं कारण त्यानं असं मला समजावून दिलं होतं. काहीच न बोलता रस्त्याकडेच्या शेतातली ती कोसळून गेलेली हिरवी रोपं न्याहाळत मी खिडकीची काच पुसून बाहेर बघत राहिलो. "किती वाजले?'....काही वेळानंतर अचानक त्यानं मला विचारलं आणि मी घड्याळ बांधलेलं मनगटच त्याच्यासमोर धरलं. "सांगा तुमीच, आमी काय पढीलिखी मान्सं नाय'...तो म्हणाला. आकडेदेखील वाचता न येणाऱ्या त्यानं अनुभवाच्या शहाणपणातून दिलेला धडा गिरवत मी त्याला वेळ सांगितली... शेतात पडलेल्या भाताच्या रोपांमुळे त्याचा मतांचा उत्साह पार हरवला होता... मग निवडणुकीचा आणि मतांचा तो "ठेवणीतला' प्रेश्‍न सरसकटपणे कुणाच्या माथ्यावर मारायचा नाही, असं मी ठरवलं... पाऊस ओसरला, की मगच पुन्हा तो प्रश्‍न घेऊन लोकांसमोर जायचं, असंही मी ठरवलंय...

Sunday, September 20, 2009

एनर्जी आणि टॉनिक!

हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते. ... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते. पंख्यांचा वेग कमी कमी होत स्थिरावला आणि साहेब बाहेर पडले. त्यांचा चेहरा टवटवीत दिसत होता. हेलिकॉप्टरभोवती गराडा पडला होता. लांबवर एका टोकाला ढोल-ताशे वाजत होते. फटाक्‍यांची लांबलचक माळही तडतडू लागली आणि साहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला... साहेबांच्या चेहऱ्यावर खुशीची झाकही पसरली. नमस्कारासाठी त्यांचे हात छातीशी आले. चेहऱ्यावरही उत्साहाची रेषा उमटली. नमस्कार करून ते गर्दीसमोर किंचितसे झुकले. तेवढ्यात, टवटवीत फुलांचा एक हार त्यांच्या गळ्यात पडला. पुन्हा घोषणा दुमदुमल्या. साहेबांचा शीण कुठल्या कुठे पळाला होता. झपाझप चालत ते स्टेजजवळ आले. स्टेजवर बसलेले नेते आणि कार्यकर्ते अदबीने उठले. सगळ्यांचे हात साहेबांच्या दिशेने जोडले गेले. चेहऱ्यावर काहीसे लाचार, नम्र हास्य आणत सर्वांनी साहेबांना नमस्कार केला. हसतमुखाने त्याचा स्वीकार करत साहेब रांगेतल्या मधल्या खुर्चीत बसले, आणि पुन्हा मंडपाबाहेर ढोल-ताशांचा जोरदार तडतडाट झाला... ... हे सारे आपल्यासाठी आहे, याची जाणीव साहेबांच्या स्मितरेषेत स्पष्ट उमटली होती. सभेला सुरवात झाली. पहिल्या वक्‍त्याने साहेबांचे नाव घेताच गर्दीतून टाळ्या, शिट्ट्या आणि साहेबांच्या नावाचा जयजयकार घुमला... साहेबांनी हवेतच हात उंचावून गर्दीला अभिवादन केले आणि शेजारी बसलेल्या नेत्याकडे त्यांनी मान वळविली. त्याच्या चेहऱ्यावरच्या धन्यतेच्या भावनेने साहेब सुखावून गेले होते... हातातल्या कागदांवरच्या कुठल्या तरी मजकुराकडे बोट दाखवत साहेब त्याच्याशी काही तरी बोलेले. त्यांनी दुसऱ्या दिशेला बसलेल्या नेत्याकडे मान वळविली. समोर छायाचित्रकारांच्या गर्दीतून फ्लॅश दणादण चमकत होते. साहेबांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा अधिकाधिक ठळक होत होती... बाजूच्या माईकसमोर वक्‍त्यांची भाषणं सुरूच होती. साहेबांनी समोर, गर्दीकडे चोहोबाजूंनी नजर फिरवली. त्या भाषणांकडे गर्दीचंही लक्ष नव्हतं. सगळे कान जणू साहेबांचे शब्द साठवायला आतूर झाले होते. मधूनच गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला... कुणी तरी जिवाच्या आकांताने जयजयकार केला. तो इशारा समजून वक्‍त्याने आपले भाषणही आवरते घेतले. तो जागेवर बसला. साहेबांकडे पाहात त्यानं ओशाळा नमस्कारही केला. साहेबांनी मान हलकेच झुकवून त्याचा स्वीकार केला. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता... ... आणि सूत्रसंचालकाने साहेबांना भाषण सुरू करण्याची विनंती केली. गर्दीला नमस्कार करीतच साहेब खुर्चीतून उठले. पुन्हा टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार दुमदुमले. गर्दीच्या कोपऱ्यातून कुणी तरी ठेवणीतल्या आवाजात लांबलचक घोषणा देत होता. साहेब शांतपणे माईकसमोर उभे होते. घोषणा आणि टाळ्यांचा गजर हळूहळू कमी होत असतानाच साहेबांनी हात उंचावून गर्दीला शांत होण्याची खूण केली आणि क्षणात सगळे आवाज थांबले... हे सगळे आपल्या एका इशाऱ्याने होते, हा अनुभव साहेबांना नवा नव्हता. ते पुन्हा सुखावले. गर्दीकडे पाहात त्यांनी आपली नेहमीची, ठेवणीतली साद घातली. आतापर्यंत हेच शब्द कानात साठवण्यासाठी जणू आतुरलेल्या गर्दीने साहेबांचे शब्द कानावर पडताच बेभानपणे टाळ्यांचा कडकडाट केला. साहेब काही मिनिटे पुन्हा शांतपणे गर्दीकडे पाहात थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते. पुढे तासभर गर्दीतला प्रत्येक कान साहेबांचे शब्द स्तब्धपणे साठवून घेत होता... सभा आटोपली, लगबगीने गर्दीला नमस्कार करत साहेब स्टेजवरून खाली उतरले. माईकसमोरचा सूत्रसंचालक गर्दी आवरण्यासाठी प्रयत्न करत होता; पण एव्हाना साहेबांभोवती गर्दीचा गराडा पडला होता. पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसी शिट्ट्या घुमू लागल्या... कार्यकर्त्यांनी भोवती केलेल्या साखळीतून पुढे सरकतच साहेब गर्दीतल्या कुणाचा पुढे आलेला हात हातात घेत होते, कुणाला नमस्कार करत होते... गर्दी त्यांच्यासोबत पुढे सरकतच होती. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि गर्दी हळूहळू मागे होत गेली... हेलिकॉप्टरने पुढच्या प्रवासासाठी हवेत झेप घेतली, तेव्हा साहेबांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. सोबतच्या पत्रकारांकडे पाहून त्यांनी हलकेच हास्य केले आणि गप्पा सुरू झाल्या... या सभेनंतर विजयाची गणिते आपल्याच पक्षाच्या बाजूने झुकणार असा विश्‍वास त्यांच्या बोलण्यातून डोकावत होता. त्याच उत्साहात हेलिकॉप्टर पुढच्या गावात प ोहोचले... तिथेही तोच अनुभव. तेच फटाके, घोषणा, हार, फुले, टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार... साहेब पुन्हा ताजेतवाने झाले. जोरदार भाषण करून सभा जिंकत पुन्हा पुढच्या प्रवासासाठी ते तयार झाले. आणखी एका गावातली तशीच, सळसळती सभा आटोपलेली असते. उन्हं तळपू लागलेली असतात. सोबतच्या कार्यकर्त्यांच्या खिशातून कागदाची एक घडी बाहेर येते. या वेळी साहेबांना कोणतं औषध, कोणतं खाणं द्यायचं, त्याचं टिपण त्या कागदावर असतं. हेलिकॉप्टरमध्ये गप्पा सुरू असतानाच साहेब यांत्रिकपणे औषधाच्या गोळ्या घेत असतात. दुसरा कार्यकर्ता ताजी फळं कापून साहेबांसमोर ठेवत असतो. प्रवासातच नाश्‍ता सुरू होतो. सकाळच्या वेळी कोणतेही तेलकट, मसालेदार पदार्थ खायचे नाहीत, हे ठरलेले असते. सभा होणाऱ्या प्रत्येक गावात तसा निरोप अगोदरच गेलेला असतो आणि प्रत्येक गावात ताज्या, टवटवीत फळांची; पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था झालेली असते. पुढच्या प्रवासाला निघण्याआधी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये फळे, पाणी ठेवले जाते... टळटळीत दुपार सुरू होते, तेव्हा ज्या गावात सभा असते, त्या गावातल्याच एका नामांकित नेत्याच्या घरी नंतर जेवणाचा बेत असतो. घरात कार्यकर्त्यांची गर्दी असते. सभा संपून साहेब इथे येतात आणि ताटकळत थांबलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू होते. कुणाच्या पाठीवरून हात फिरतो, कुणी साहेबांच्या पायाला हात लावण्यासाठी वाकलेला असतो... कुणी हातातला कागद हळूच साहेबांच्या हातात कोंबतो. साहेब त्यावर सराईत नजर फिरवून तो सोबतच्या कार्यकर्त्याकडे देतात. तो कागद फाईलमध्ये गेला, हे दिसताच समाधानाने तो कार्यकर्ता बाजूला होतो. दुपारच्या जेवणाचा बेत अगदी साधा असतो. मसालेदार आणि चमचमीत पदार्थ ताटात नसतात. चपाती आणि भाजी, दही-ताक असा हलकासा आहार घेऊन साहेब उठतात. बाहेर कार्यकर्ते असतात. मोजक्‍याच वेळात एक बैठक होते. वातावरणाची चर्चा होते. कुणाला कुठला निरोप द्यायचा असतो, कुठे कशाची तरी व्यवस्था करायची असते. भराभर सूचना करून साहेब एकीकडे वर्तमानपत्रं चाळत असतात... थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पुढच्या सभेसाठी निघायचं असतं.... गर्दीचं कोंडाळं मात्र भोवती घोटाळतच असतं... साहेब समाधानानं गर्दीत रमत असतात... अशाच सभांचा आणि गर्दीचा माहोल दिवसभर असतो. सभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद साहेबांना सुखावत असतो. कार्यकर्ते अवतीभोवती वावरत असतात. रात्री उशिरा जाहीर सभांची वेळ संपते. शेवटच्या सभेच्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामाची सोय असते. रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर मुंबईला फोनाफोनी आणि त्या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होते. व्यूहरचनेची आखणी होते. एखाद्या प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बरासोबतची बैठकही आटोपायची असते. हे संपेतोवर मध्यरात्र उलटून गेलेली असते. गर्दी घरोघरी परतते आणि साहेब झोपी जातात... दुसऱ्या दिवशी पुढच्या गावांमधील सभांची माहिती घेतली जाते आणि नवा दिवस सुरू होतो. साहेबांच्या परीटघडीच्या इस्त्रीच्या कपड्यांची एक बॅग अगोदरच गावात दाखल झालेली असते. कडक इस्त्रीचे खादीचे कपडे घालून साहेब नव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उत्साहाने तयार होतात. पुढच्या गावात जाण्यासाठी निघतात. निरोप द्यायला गावातल्या कार्यकर्त्यांची फौज कधीपासून आलेलीच असते. पुन्हा गर्दी दिसताच साहेब टवटवीत होतात... सोबतचे पत्रकार मात्र अजूनही मरगळलेलेच असतात... कसे तरी आटोपून घाईघाईनं ते हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसतात आणि गप्पा सुरू होतात... रटाळ चेहऱ्यानं एखादा कुणी तरी साहेबांना विचारतो, "साहेब, तुम्हाला कालच्या दिवसभराच्या या हेक्‍टिक धावपळीनं थकवा आला नाही?' साहेब मंद हसतात. बाहेर गर्दी हात हलवत निरोप देत असते... तिकडे एक नजर टाकून साहेब उत्तरतात, "हे माझं टॉनिक आहे... आणि कार्यकर्ते ही माझी एनर्जी... मग थकवा कसा येईल?' पत्रकार आपल्या डायरीत साहेबांचं हे वाक्‍य टिपून घेतो... दुसऱ्या दिवशीच्या बातमीचा मथळा ठरलेला असतो... "कार्यकर्ता ही एनर्जी, गर्दी हे टॉनिक!'...

Saturday, September 19, 2009

आजारी कोण, ‘टॉनिक’ कुणाला...

हाराष्ट्र हे संपन्न राज्य आहे. मुंबईसारख्या महानगरांनी तर प्रगतीच्या जागतिक स्पर्धेत उडी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे. नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्र जगाच्या औद्योगिक नकाशावरदेखील अव्वल स्थान मिळवील आणि देशाचे औद्योगिक नेतृत्व करील, असे अभिमानाने सांगितले जाते. ... पण "सार्वजनिक आरोग्या'वर या संपन्नतेच्या खाणाखुणा दिसत नसल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मात्र "खुरटलेले'च आहे. मुंबईसारख्या महानगरांवर संपन्नतेची सूज चढत असतानाच, मेळघाटातल्या आदिवासींची मुले मात्र कुपोषणाने मृत्यूला कवटाळत आहेत. मुंबईच्या आसपासच्या आदिवासी पाड्यांतील कुपोषणामुळे आरोग्य सेवेपुढे आव्हान उभेआहे. पाच वर्षांखालील पाच मुलांमागे किमान दोन मुले खुरटलेली असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (एनएफएचएस-३) निष्पन्न झाले आहे. नव्या आजारांचे आणि साथींचे विळखे सोडवताना, आरोग्य-सेवा हतबल झाली आहे. हिवताप, हत्तीरोग, मेंदूज्वर, डेंग्यू, चिकनगुनिया अशा कीटकजन्य साथींनी विदर्भ-मराठवाड्याबरोबरच अगदी ठाणे, सोलापुरातदेखील ठाण मांडले आहे; आणि आता स्वाईन फ्लूच्या साथीने राज्य हादरून गेले आहे. गेल्या दोन वर्षांत साडेआठ हजार व्यक्तींना हत्तीरोगाने गाठले; तर एक लाख १५ हजारांना हिवतापाची लागण झाली. या साथीने जवळपास ३०० जणांचा बळी घेतला; तर डेंग्यूने साडेसहा हजार रुग्णांपैकी ४४ जण दगावले. एडस्‌ग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी एडस्‌च्या बळींची संख्या आता वाढू लागली आहे. राज्यात २००४ मध्ये ४८७ ; तर २००८ मध्ये ८८६ व्यक्ती दगावल्या. अतिजोखीम गटातील एडस्‌ग्रस्तांची संख्यादेखील वाढते आहे. महाराष्ट्रातील दर एक हजार व्यक्तींमागे ५७ व्यक्ती अतिजोखीम गटातील एडस्‌ग्रस्त असाव्यात, असा एक भयावह अंदाज केंद्र सरकारी यंत्रणांनी गेल्या वर्षी वर्तविला आहे. गेल्या वर्षाअखेर राज्यात दहा हजारांच्या आसपास एडस्‌ग्रस्त असावेत, असाही या यंत्रणांचा अंदाज आहे. राज्यात आरोग्य सेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आरोग्य सेवा संचालनालय अशा सरकारी यंत्रणादेखील अद्ययावत सामग्रीने सज्ज आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची येथे वानवा नाही; आणि भक्कम आरोग्य सेवांसाठी केंद्र सरकारमार्फत जागतिक बॅंकेचा निधीही राज्य सरकारच्या तिजोरीत आला आहे. असे असतानादेखील साथीचे आजार नियंत्रणात येऊ शकलेले नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील "व्यावसायिकता' हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. पैसा खर्चण्याची क्षमता असलेल्यांना सर्वोत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा सहजपणे उपलब्ध होऊ शकतात; पण दुर्गम, ग्रामीण भागातील गरिबांसाठीच्या आरोग्यदायी योजनांचा निधी कुठे झिरपतो, हे कोडे उलगडतच नाही. म्हणूनच, आजार एकाला आणि "टॉनिक' चाखणारे मात्र दुसरेच, अशी स्थिती राज्याच्या आरोग्य सेवेत दिसते. शहरी भागांत पावलोपावली असलेले डॉक्‍टर ग्रामीण भागाकडे फिरकण्यास राजी नसल्यामुळे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धूळ खात पडल्या आहेत. १९८६ मध्ये एक हजार ५३६ प्राथमिक आरोग्य केंद्रे होती. गेल्या वर्षीपर्यंत त्यांत केवळ ४०० आरोग्य केंद्रांची भर पडली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, दोन वर्षांपूर्वी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एक हजार आठशे डॉक्‍टरांची गरज होती; पण त्यांपैकी तब्बल ३३ टक्के, म्हणजे ६०९ जागा रिकाम्याच होत्या. परिचारिकांच्या संदर्भात तर ही स्थिती आणखी बिकट होती. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांच्या एक हजार ६२८ जागा होत्या; परंतु त्यांपैकी केवळ ४२८ जागा भरलेल्या होत्या. म्हणजे, राज्यातील एक हजार ६६९ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी एक हजार २४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकाच नव्हत्या. आरोग्य सेवेच्या संदर्भात पाहता, डिसेंबर २००८ अखेर तीन हजार ९२० वैद्यक पदवीधरांनी रोजगारासाठी नावनोंदणी केली होती. एका बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये डॉक्‍टरांचा तुटवडा आणि दुसरीकडे रोजगारासाठी सरकारी यंत्रणेकडे डोळे लावून बसलेले वैद्यकीय पदवीधारक हे चित्र असूनही, तुटवड्याचे गणित सरकार का सोडवू शकले नाही हे अनाकलनीय आहे. आरोग्य सेवेच्या या आलेखावरून महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो; पण त्याहूनही चिंताजनक परिस्थिती भविष्यात उद्‌भवणार आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेच्या तिसऱ्या सर्वेक्षणानुसार, पुढारलेल्या आणि शिक्षणाचा प्रसार झालेल्या या राज्यात पहिल्या अपत्याच्या जन्माच्या वेळी स्त्रीचे सरासरी वय १९ वर्षे आणि नऊ महिने इतके होते. वाजवीपेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची संख्या सुमारे ४० टक्के होती, आणि राज्यातील ४९ टक्के विवाहित महिला "ऍनिमियाग्रस्त' होत्या. ५७.८० टक्के गर्भवतींनादेखील "ऍनिमिया'ने गाठले होते. ...या मातांच्या पोटी जन्माला येणाऱ्या भावी पिढीचे आरोग्य महाराष्ट्राचे संपन्न वैभव कसे जपतील, हे एक अस्वस्थ प्रश्‍नचिन्ह या चित्रातून उमटले आहे.

Tuesday, September 15, 2009

'मागच्या बाका'वरची दुर्लक्षित पोरं !

वर्गात मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांकडे शिक्षकांचेही दुर्लक्ष होते, तशी आज काही सरकारी खात्यांची स्थिती आहे. हजारो कोटी रुपये खर्चून पायाभूत विकासाला वेग देणाऱ्या आणि मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राच्या नागरीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्या राज्य शासनाने सामान्य माणसाची जबाबदारी असलेली अनेक खाती ‘मागच्या बाका’वर बसविल्याने एकीकडे करोडोंची खैरात; तर दुसरीकडे निधीची प्रतीक्षा असे विसंगत चित्र आहे. नगरविकास, गृह, वित्त, उद्योग, गृहनिर्माण आदी खात्यांना पहिल्या बाकावरचे स्थान मिळाले आहे; तर समाजकल्याण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला-बालकल्याण, रोजगारासारखी सामाजिक हिताची कामे पाहणारी खाती मात्र मागच्या बाकावर बसूनच शाळेचा ‘आनंद’ लुटत आहेत... शिक्षकांचे लक्ष नाही याची खात्री झाली, की मागची मुले उनाडक्‍या करू लागतात. समाजकल्याण खात्याची स्थितीदेखील तशीच झाली आहे. जवळपास दहा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील ५८ टक्के लोकसंख्येचे वास्तव्य राज्यातील ४१ हजार खेड्यांमध्ये आहे; तर ४२ टक्के लोकसंख्या ३७८ शहरांमध्ये राहते. मात्र, नागरी विकासाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनता मात्र किरकोळ प्राथमिक सुविधांपासूनदेखील वंचित असल्याचे विसंगत चित्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीतदेखील पुसले गेलेले नाही. राज्यातील अनुसूचित जातीजमातींची संख्या सुमारे एक कोटी ९० लाख आहे. यापैकी मोठा वर्ग आजही ग्रामीण भागांत विखुरलेला असल्यामुळे साहजिकच सामान्य सुविधांच्या अभावाचा पहिला फटका या वर्गालाच बसला आहे. अनुसूचित जातींमधील ५९ टक्के; तर अनुसूचित जमातींपैकी ५४ टक्के लोकांना रोजगाराची साधनेदेखील नाहीत. त्यामुळे अनुसूचित जातींची ग्रामीण महाराष्ट्रातील ४५ टक्के कुटुंबे दारिद्रयरेषेखालील जिणे जगताहेत. अशी कुटुंबे मग रोजगाराच्या शोधात शहरांचा रस्ता धरतात; परंतु शहरी भागातदेखील या जातींचे नशीब फारसे उजळलेले नाही. शहरी भागातील अनुसूचित जातींची ४३.२० टक्के कुटुंबे दारिद्रयरेषेखालीच आहेत. या वर्गाच्या उन्नतीसाठी प्राधान्याने शैक्षणिक सुविधा मिळाव्यात याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या; परंतु त्यांचा संपूर्ण लाभ मात्र या समाजापर्यंत झिरपलाच नाही. समाजकल्याण खाते हे तर भ्रष्टाचाराचे कुरणफ म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठीच्या काही योजनांना केंद्राचेही अर्थसाह्य मिळते. महाराष्ट्रात या वर्गासाठी अनेक योजना जाहीर झाल्या. केंद्र सरकार या योजनांसाठी निधी घेऊनच बसले होते; पण अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीयांसाठी राज्य सरकारने २००४ ते २००६ या तीन वर्षांत केंद्र सरकारकडे निधीची साधी मागणीदेखील केली नव्हती, हे लोकसभेच्या २००६ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातच उघडकीस आले होते. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजनांकरिता राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक असते. राज्य सरकारने २००६ पूर्वी तब्बल तीन वर्षे असा प्रस्तावदेखील केंद्राकडे पाठविला नव्हता. दुर्बल घटकांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या या खात्याच्या उदासीनतेचे हे उदाहरण. सफाई कामगार हा आणखी एक उपेक्षित सामाजिक घटक. या वर्गाच्या कल्याणाकरितादेखील केंद्राच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध होतो. २००७-०८ या वर्षात सहा कोटी ३२ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मिळाला; पण त्यापैकी तब्बल चार कोटींचा निधी वापरलाच गेला नव्हता. २००८-०९ मध्ये पाच कोटी ५२ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी तीन कोटी ८५ लाखांचा निधी वापरला गेला. याचा अर्थ, दोन वर्षांत मिळालेल्या निधीतील जेमतेम ५० टक्के रक्कम या वर्गाच्या कल्याणासाठी वापरली गेली. महाराष्ट्रातील ३०.७० टक्के म्हणजे जवळजवळ एकतृतीयांश लोकसंख्या दारिद्रयाशी झगडत असून, हे प्रमाण देशाच्या एकत्रित प्रमाणापेक्षा तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. १९९३-९४ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगालमधील दारिद्रयाची पातळी जवळपास सारखीच होती; पण २००४-०५ मध्ये पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडूतील दारिद्रयाचे प्रमाण खूपच कमी झाले, महाराष्ट्रात मात्र दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येत १२ लाख २० हजारांची वाढ झाली. महाराष्ट्रात दारिद्रयरेषेखालील ३० टक्के लोकांपर्यंत विकासाचे वारे पोचलेले नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वर्षात राज्यात एक लाख मोटारी होत्या. आज मोटारींची संख्या एक कोटी ४२ लाख आहे. दारिद्रयरेषेच्या वर असलेल्या ६९ टक्के लोकसंख्येकडे दर चार माणसांमागे एक मोटार आहे. या विषमतेमुळेच, समाजकल्याण खात्याचे मागील बाकडे बदलून त्याला पहिल्या बाकावर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Sunday, September 6, 2009

मठ-मंदिरांच्या दारी, इच्छुकांची वारी...

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण आणि अध्यात्म यांच्यातील आणखी घट्ट होत आहे. उमेदवारी मिळावी, नंतर विजय मिळावा व पुढे भलेभलेच होत जावे, यासाठी अध्यात्मिक गुरू, मठ-मंदिरे, बुवा-बाबांच्या दारी आता गर्दी सुरू होईल...
महाराष्ट्राला लाभलेल्या अध्यात्मिक परंपरेमुळे राज्यात अनेक आध्यात्मिक गुरूंचे वास्तव्य आहे. त्यांचा भक्तगण मोठा आहे. तोही मतदार आहे. त्यामुळे राजकीय यशासाठी गुरुचरणी डोके ठेवून भाविकांची मने जिंकणे ही अनेकदा "राजकीय गरज' ठरते. आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने ही गरज आणखी वाढेल. कोल्हापूर, सांगलीतील इच्छुकांच्या गाड्यांची वर्दळ बाहुबली, नरसिंहवाडीस सुरू होईल, तर औरंगाबाद, नाशिक, नगरचे इच्छुक दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वरला धाव घेतील. कोकण आणि मराठवाड्यातील काहींना रत्नागिरीजवळच्या नरेंद्र महाराजांची वेळ मागून घ्यावी लागेल, तर राजकीय वजन आणि वलय लाभलेल्या कुणा "देवी'च्या आशीर्वादाने "सहज'पणे उमेदवारी साध्य व्हावी म्हणून काहींची मोर्चेबांधणी सुरू होईल.
विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक वजनदार नेत्यांनी भय्यू महाराजांना गुरुस्थानी मानले आहे. काहींनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. नाशिकच्या शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे त्यांचे कट्टर अनुयायी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यापुढे राजकीय आणि आध्यात्मिक पेच उभा राहिला; पण आता सारे सुरळीत झाले आहे. शांतिगिरींच्या मठात पुन्हा पहिल्यासारखीच वर्दळ सुरू होणार आहे... नाशिक परिसरातले "फरशीवाले बाबा' वादग्रस्त ठरले होते. मात्र, राजकीय मंडळींची त्यांच्याकडची ऊठबस अजूनही कायम असल्याचे बोलले जाते. कोल्हापूरच्या शहाजी कॉलनीतील एक महाराजही असेच वादग्रस्त ठरले; पण पहाटेपूर्वीच त्यांच्या दर्शनासाठी राजकीय मंडळींची वर्दळ सुरू होते, अशी चर्चा आहे. रत्नागिरीजवळ नाणीज येथील नरेंद्र महाराजांच्या मठात लागणारी या भाविकांची रीघ लक्षात घेऊन तेथे नियोजन सुरू असल्याचे समजते.
औरंगाबाद, नगर, कोपरगावातील काही मुरब्बी राजकारणी वैजापूर तालुक्‍यातील मठाधिपतींच्या दर्शनासाठी धाव घेतात, असे सांगण्यात येते. काही जण वेरूळच्या वाटेवरील भांगशीमाता गडावरील परमानंदगिरींच्या आश्रमाची वाट धरतात. औरंगाबाद जिल्ह्यातच सिल्लोड तालुक्‍यात अल्पसंख्य समाजाच्या बड्या नेत्याने अलीकडेच पावसासाठी केलेल्या "पर्जन्ययागा'चे गोडवे अजूनही भाविकांमध्ये गायले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात वाशीम मतदारसंघातील एक उमेदवार पहाटे प्रथम भेटणाऱ्याची शाल-श्रीफळ देऊन पूजा करून त्याच्याकडून "यशस्वी भव' असा आशीर्वाद `घेत' असे. हे "व्रत' फळाला आले असते, तर विधानसभेसाठी अनेकांनी या व्रताचे पालन करण्याचे ठरविले होते; पण तो उमेदवारच पराभूत झाल्याने आशीर्वाद "घेण्याची' कल्पना बारगळली, असे बोलले जाते. सांगलीच्या कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी अकलूजच्या एका हितचिंतकाने संग्रामनगरातल्या साईबाबांना नवस केला आणि त्यांचा विजय झाला. या युवा खासदाराला मंत्रिपदही मिळाले. नंतर त्यांनी या दैवताचे दर्शन घेऊन भाविकांना तीनशे नारळांचे वाटप केले होते. आता येथे दर्शनासाठी राजकारण्यांची हमखास गर्दी होईल, अशी चर्चा आहे. औरंगाबादजवळ हातमळी नावाच्या खेड्यातील "मामा-भाचे मारुती'ही नवसाला पावतात, अशी श्रद्धा आहे. या मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती असल्याने मामा-भाच्यांनी एकत्र येऊन नवस केला, तर फळ मिळते, असे म्हणतात. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यावर भाजपच्या एका उमेदवाराने हा नवस फेडला आणि 101 नारळ अर्पण केले. या मंदिरालाही आता "राजकीय महत्त्व' प्राप्त होणार आहे. कुणी विजयासाठी तुळजापूरच्या भवानीला "तलवारी'चा नवस बोलेल, तर कुणी परभणीच्या पिराला कंदुरी करून मन्नत मागण्यासाठी धाव घेईल. कुणी मारुती मंदिरांसमोर घंटा बांधेल, तर कुणी शंकराला त्रिशूळ अर्पण करून विजयासाठी साकडे घालेल.
महाराष्ट्राची राजधानी आणि राज्याचे सत्ताकेंद्र मुंबईत तर निवडणुकीच्या मोसमात भाविकतेचा महापूरच येण्याची चिन्हे आहेत. ऐन गणेशोत्सवाचा मोका साधून भाविकांना शुभेच्छा देणारे "इच्छुकां'चे जागोजागी लागलेले फलक निवडणूक आयोगाने हद्दपार केले आहेत. त्यामुळे भाविकतेचा नवा मार्ग येत्या काही दिवसांत मुंबईत बांधला जाईल. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाची आरती करून आणि दर्शन घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रथाच पडलेली असल्याने येत्या काही दिवसांत सिद्धिविनायक मंदिरातील "व्हीआयपी' रांगांचीच लांबी वाढलेली दिसेल.
वशीकरण, हमखास यश, जादूटोणा अशा कलांमध्ये प्रसिद्ध असलेले बंगाली व हैदराबादी बाबाही राजकारणी मासे "गळाला' लावण्याच्या खेळात हिरिरीने उतरतील.
...निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आध्यात्मिक क्षेत्रही राजकारणाच्या रंगात न्हाऊन निघेल.

Thursday, September 3, 2009

आज महाजन असते तर?

आणीबाणी संपली आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले. आणीबाणीआधीचा जनसंघ भाजपच्या रूपाने नव्या दमासह राजकारणात उतरला होता. पंचवीस वर्षे सत्तेच्या जवळपासदेखील नसलेला हा पक्ष केंद्रातील जनता सरकारमध्ये आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये सहज सामावून गेला. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्‌द्‌यावरून उठलेल्या वादळात, संघ परिवाराशी असलेले नाते जपत सत्तेवरून पायउतारही झाला. त्याच काळात भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या नेतृत्वाचा उदय होत होता. डॉ. विश्‍वनाथप्रताप सिंह हे आमचे नेते आहेत, असे निःसंदिग्धपणे सांगत महाजनांनी देशाच्या सत्ताकारणात पक्ष रुजवायला सुरवात केली, तेव्हा वीस वर्षांनंतरचे भविष्य त्यांच्या मनात डोकावत असेल, याचा अंदाज फारच थोड्यांना आला असावा. ...मुंबईत नायगावच्या "चंचल स्मृती'मध्ये तेव्हा भाजपचे कार्यालय होते. वसंतराव भागवतांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मुंबईतील मुक्काम याच कार्यालयात असायचा. महाजनदेखील अनेकदा येथे असत. राजकारणातील भविष्याची स्वप्ने पाहणारा हा तरुण तेव्हा पक्षाचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्‍वास उराशी बाळगूनच वावरायचा. केंद्रीय राजकारणाशी फारशी जवळीक नसली, तरी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता. तो त्या वेळी त्यांच्या वाक्‍यावाक्‍यातून प्रकट व्हायचा. वाजपेयींच्या वक्तृत्वाची मोहिनी महाजनांच्या मनावर अंतर्बाह्य पसरलेली होती. वाजपेयी यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीमुळेच त्यांनी देशवासीयांच्या मनात स्थान मिळविले आहे, हेही त्यांनी हेरले होते. आणि म्हणूनच महाजनांनी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याआधी वक्तृत्वशैली विकसित करण्याचा ध्यास घेतला. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले आणि त्यांच्या यशाची कमान चढत गेली. १९९५ पासून भाजप आणि महाजन राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. जेव्हा मोबाईल ही सर्वसामान्यांसाठी "जादुई' चीज होती, त्या काळात महाजनांच्या हातात मोबाईल आला. तिथूनच भाजपला "पंचतारांकित संस्कृती'ची बाधा झाल्याची ओरड सुरू झाली. संघ परिवारातील अनेकांनीही या कुजबुजीत भाग घेतला होता; पण काळाची पुढची पावले ओळखणाऱ्या महाजनांनी आपल्या हातातला मोबाईल प्रत्येक नागरिकाच्या हातात यावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मात्र फारसे कौतुक झाले नाही. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे गोडवे गातो. या क्रांतीच्या शिल्पकारांच्या मालिकेत महाजनांचे नाव वरचे होते, तरी खुद्द महाजनांनी मात्र दिलखुलासपणे या क्रांतीचे सारे श्रेय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना दिले होते. कारण राजकारणात राहूनदेखील मध्यमवर्गीय मनमोकळेपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होताच. म्हणूनच श्रेयासाठी कधीही धडपड त्यांनी केली नाही. त्या त्या क्षणीचे नेमके आडाखे महाजनांकडे पक्के बांधलेले होते. म्हणूनच तणावाच्या असंख्य प्रसंगांनंतरही शिवसेनेसोबतची युती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनाही काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागले; पण ते अनुभव मनाच्या एका कप्प्यात कुलूपबंद करून "युतीचा धर्म' ते जपत राहिले. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनी महाजनांवर प्रेम केले. म्हणूनच, युतीमधील कटुता संपुष्टात आणण्यासाठी बाळासाहेब आणि लालकृष्ण अडवानी हे दिग्गज नेते केवळ महाजनांच्या शब्दाखातर समोरासमोर बसले. म्हणूनच कटुता असतानाही युतीचे सरकारही एकसंध राहिले. महाजनांच्या वैशिष्ट्यांची जाणीव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला होती. म्हणूनच प्रसंगी कठोर आणि अनाकलनीय वाटणारे महाजनांच्या स्वभावातले अवघड कंगोरेदेखील अनेकांनी पचविले; त्याकडे दुर्लक्ष केले. महाजन नावाच्या एका वादळी व्यक्तिमत्त्वाचा दुर्दैवी शेवट झाला आणि पोकळीचे विज्ञान राजकारणातही लागू होते, याचे प्रत्यंतर सध्या भाजपला येत आहे. २००४ मधील निवडणुकांमध्ये भाजपची प्रचाराची रणनीती आखण्यात महाजनांचा सिंहाचा वाटा होता; पण त्यांची "इंडिया शायनिंग' योजना सपशेल फसली. त्या पराभवाची जबाबदारी दिलखुलासपणे स्वीकारणारे ते पहिले होते. ... महाजन गेले आणि भाजपमध्ये वादळे घोंघावू लागली. कदाचित पोकळीच्या विज्ञानाचाच हा परिणाम असावा. लोकसभेत दारुण पराभव झाला. निवडणूक रणनीती आखण्यापासूनच्या टप्प्यावरच पक्ष भरकटल्याचे जनतेलाही जाणवत होते. पराभवाचे सावट मात्र कोणालाच दिसले नव्हते. महाजन असते तर अगोदरच्या निवडणुकीतील पराभवाचा धडा ते विसरलेच नसते. पराभवाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, हा तर त्यांचा बाणा होता. पराभवानंतर भाजपने बांधलेली "रालोआ'ची मोटदेखील खिळखिळी होऊ लागली. पुन्हा "एकला चलो रे' सुरू होणार, अशी चिन्हे दिसू लागली. हिंदुत्व हा भाजपला संघ परिवाराशी जोडून ठेवणारा दुवा होता. महाजनांनी मोठ्या कसरतीने संघ परिवारासोबतचे नाते जपत राजकारणही केले होते. अलीकडे मात्र "हिंदुत्व' हाच भाजपच्या वैचारिक संभ्रमाचा मुद्दा झाला. पक्षाच्या- अगदी जनसंघाच्या स्थापनेपासून- सत्तेचे वारेदेखील जवळपास फिरकत नव्हते, तेव्हापासून पक्षाच्या राजकीय वाटचालीचे पाईक असलेल्या अडवानी आणि वाजपेयी यांच्याबद्दल महाजनांच्या मनात अतीव आदर होता. कारण ते सत्तेच्या राजकारणासाठी पक्षकार्यात उतरलेले नेते नव्हते. अडवानींच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील बराच मोठा काळ तर ते सत्तेबाहेरच होते. म्हणूनच, अडवानींच्या निरपेक्ष पक्षसेवेबद्दल प्रमोद महाजनांच्या मनात आदर होता. ... आज अडवानींच्या नेतृत्वगुणांवरूनही भाजपमध्ये वादळे उठली आहेत. अशा वेळी पक्षाला सावरण्याची कसरत करणारा मात्र कुणीही पक्षात दिसत नाही. कदाचित संघाच्या पडद्यामागच्या मार्गदर्शनातून भाजपमधील वादळे शमविली जातीलदेखील, पण महाजनांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळेच ही वादळे उमटली आहेत, हे आता सर्वांनाच जाणवत असेल. म्हणूनच, "आज महाजन असते तर?' असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्याला केला तर क्षणभर तो अंतर्मुख होतोच. आज महाजन असते तर पक्षाची आणि "रालोआ'ची ही स्थिती झाली असती? म्हणूनच, "आज महाजन असते तर?' हा प्रश्‍न त्याला छळतो आहे...

Friday, August 28, 2009

कुटुंब गेले कुणीकडे?

जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे.
जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मागे पडत आहे. हा प्रश्‍न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिला. केवळ पुरेशा उपचारांच्या अभावामुळे दर वर्षी जगात पाच लाख महिला गर्भवती असताना किंवा प्रसूतीच्या वेळी मरण पावतात. आफ्रिकी देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, ते प्रगत देशांच्या शंभरपट अधिक असल्याचे लोकसंख्या निधीच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
महिला-बालकांचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण या विषयांचा प्राधान्यक्रम जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे मागे पडला आहे. जागतिक मंदीचा पहिला फटका महिलांनाच बसल्याचे या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. भविष्याचा वेध घेण्याची मानसिकता स्त्रीच्या अंगी असल्याने, बालकांचे भविष्य निर्भर करण्यात तिचा मोठा वाटा असतो. त्यामुळे महिलांचे आरोग्य आणि मानसिकता जपण्याची खरी गरज आहे. महिलांचे कल्याण म्हणजेच कुटुंबांचे कल्याण आणि पर्यायाने भविष्याची निर्भरता असल्याचे मत लोकसंख्या निधीने नोंदविले आहे.
जागतिक मंदीमुळे बेरोजगारी वाढत असून, या वर्षाअखेरीस बेरोजगारांची संख्या 50 दशलक्षांपर्यंत पोचेल, असा जागतिक कामगार संघटनेचा अंदाज आहे. यातही, महिलांमधील बेरोजगारी पुरुषांपेक्षा अधिक असेल आणि साहजिकच महिलांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कुटुंबाच्या चरितार्थाची साधने जेव्हा आकसतात, तेव्हा मुलींचे शिक्षण ही "चैनी'ची बाब बनते. मंदीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये नेमकी हीच स्थिती उद्‌भवण्याची भीती असल्याने महिला आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्याची गरज लोकसंख्या निधीने अधोरेखित केली आहे.
भारतात, आणि विशेषत: महाराष्ट्रात, या वर्षी मंदीसोबत दुष्काळाचेही संकट ओढवणार आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये दोन वेळा पेटणा-या चुली कदाचित एका वेळेपुरत्या थंडावतील... घराशेजारच्या गोठ्यातल्या ‘बिनकामा’च्या गुराढोरांची वैरण कमी होईल... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. कदाचित, ती तिथल्या जीवनपध्दतीची गरज आहे. मंदी आणि दुष्काळामुळे अनेक कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत आखडतील. मग काटकसर ही नवी जीवनशैली बनेल. आणि, ‘जगण्या’चे प्राधान्यक्रमही बदलतील. सहाजिकच, कुटुंबातल्या ‘कामाच्या हातां’ची पोटे भरण्यावर भर पडेल. माणुसकी जिवंत असतानाही, नाईलाजाची त्यावर मात होईल. एकत्र कुटुंबातल्या, किंवा एकट्या, निराधार वृद्धांची आबाळ होईल. महिला आणि मुलींच्या गरजांना दुय्यम स्थान मिळेल.
... असे होईलच असे नाही, पण परिस्थितीचा रेटा किती जोरदार असेल, त्यावरच असे चित्र अवलंबून असेल, हे नक्की... कारण, ‘जगण्या’च्या लढाईत माणुसकीचा पराभव होतो, याचे दाखले आजवर कमी नाहीत. दक्षिणेकडच्या काही राज्यांत परदेशात, विशेषत: आखाती देशांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त जाणा-या तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे, घरांमध्ये केवळ वृद्धांचाच वावर उरला असल्याचे एका पाहणीत उघड झाले होते. ही मुले आपल्या आईबापांच्या उदरनिर्वाहासाठी भरपूर पैसेही पाठवतात. पण देखभाल ही त्यांची उतारवयातील गरज दुर्लक्षित राहाते. मग, पैशाची पोतडी सोबत घेऊन त्यांना वृद्धाश्रम गाठावा लागतो...
... कुटुंबसंस्थेच्या या व्यवहाराकडे अजून जागतिक लक्ष गेलेले नसेल, तर तेच बरे आहे. नाही का?