Thursday, October 28, 2021

भाषा आणि भावना...

 


एखाद्या विषयाची चिंता किंवा काळजी वाटण्याचा एक हंगाम असतो. समजा, मनासारखा पावसाळा पार पडला आहे, सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य पसरलेले आहे, आणि उभ्या शेतात पिके डोलू लागली आहेत. नद्या, नाले ओढे दुथडी भरून वाहात आहेत, परसदारीच्या विहिरीच्या पाण्याची पातळी मनासारखी वर आलेली आहे, असे सारे असताना, दुष्काळाची चिंता किंवा काळजी करणे दूरच, पण त्याचा विचारही मनाला शिवणार नसतो. म्हणजे, काळजीचे विषय काही कायम डोकी वर काढत नाहीत. साधारणतः काळ बघूनच काळजीची काजळी वाढत असते. म्हणूनच, सध्याच्या हंगामाशी सुसंगत असा काळजीचा कोणता विषय असावा असा एक विचार आज उगीचच माझ्या मनात आला. खरं तर, हे जगावेगळंच होतं. पण विचार आलाच आहे, तर त्याच्या खोलात जावं असं ठरवलं, आणि वेगवेगळ्या विषयांवर विचार करू लागलो. त्यासाठी कधीकधी बाह्य स्रोतांचा आधार घ्यावा लागतो. सध्या असे स्रोत एका क्लिकसरशी हात जोडून समोर उभे राहात असल्याने, केवळ गुगलवर एखादे अक्षर टाईप केले, तरी हजारो विषय समोर येतात. मी संगणकाच्या कळपट्टीवरचे एक बटन दाबले, आणि सर्च रिझल्ट पाहताना गंमत वाटली. आपण ज्यावर विचार करतो, एखादी समस्या कधी छळत असते, तेव्हा, एखादं  पुस्तक हाती घ्यावं, आणि कोणतंही पान उघडून एखादा परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा. त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, थोडी वैचारिक कसरत केली, तर त्यामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या समस्येचं उत्तर लपलेलं जाणवतं, असं मागे मला कुणीतरी सांगितलं होतं. तेव्हा मी ते करूनही पाहिलं होतं. समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, पण दूरदूरचा काही अर्थ लावता आला, आणि समस्येशी त्याचा संबंध आहे हेही जाणवत गेलं. कधी वेळ असेल, तर तुम्हीही करून पाहा. उत्तर सापडेल असं नाही, पण विचाराला एक दिशा नक्की मिळेल. उत्तर शोधायची सवय लागेल. कदाचित खूप सवयीनंतर उत्तरही सापडेल. मला ज्याने हा उपाय सांगितला, त्याने मला ज्ञानेश्वरी उघडण्यास सांगितले होते. पण मी तुकोबारायांची गाथा उघडली, आणि जवळपास उत्तराच्या जवळ पोहोचलो. नंतर प्रयोग म्हणून, कोणतेही चांगले पुस्तक उघडून चाचपणी केली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होतो असं नाही, पण त्याची गंमत वाटते. मुख्य म्हणजे, वाचनात मन रमतं. ही त्याची जमेची बाजू.


पण आत्ता तो विषय नाही. तर मी एका कुठल्या तरी शब्दाच्या सुतावरून गुगलच्या मदतीने शोधाचा स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला. सकाळीच वर्तमानपत्र वाचताना, साहित्य संमेलनाविषयीची बातमी समोर आली होती. आत्ता, जगभरातील भाषांविषयीची माहिती समोर आली. मग मी सकाळच्या बातमीशी या शोधाची संगती लावण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि जमलं. हरएक साहित्य संमेलनात सहसा, ‘भाषेचं कसं होणार’ याची काळजी व्यक्त करणारे संवाद, परिसंवाद होत असतात. पहिले साहित्य संमेलनदेखील याच चिंतेपोटी आयोजित करण्यात आलं होतं, असं म्हणतात. त्यामुळे, सकाळी वाचलेली साहित्य संमेलनाची बातमी, आणि आत्ता सर्चमधून समोर आलेला भाषेचा मुद्दा, यांचं काहीतरी नातं नक्कीच होतं. जगभरात जवळपास साडेसहा हजार बोली भाषा आहेत, असं या सर्चमधून समोर आलं. त्यापैकी मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत १.०८ टक्के आहे. म्हणजे, जगभरातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांमध्ये मराठी भाषकांची संख्या आजही ८३ दशलक्षांहून अधिक आहे. तरीही, मराठी भाषेचं कसं होणार, याची काळजी आपण वर्षानुवर्षे करतो आहोत. त्यावरून कुणा भाषातज्ज्ञाचं एक वाक्य आठवलं,  ‘भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते!’


...आपल्या गावाशेजारी एखादा डोंगर दगडाची खाण अंगावर घेऊन उभा असतो. कधीतरी त्यावर पहिली कुदळ पडते, मग पोकलेन, क्रशर येतात, आणि काही कळेपर्यंत तो डोंगर जमीनदोस्त होऊन तेथे गगनचुंबी इमारतीही उभ्या राहतात. हे डोळ्यादेखत घडूनही, हा बदल जाणवतच नाही. कारण, तो संथ असतो. बदलाचीही सवय होते, आणि बदल जाणवत नाही. भाषेचं तसंच असतं. कदाचित त्यामुळेच, बोलीभाषा टिकून असली तरी तिचं कसं होणार याची चिंता जागी ठेवावी लागत असणार. तरीही, ज्या काळजीमुळे मराठी काळाआड जात असल्याचे बोलले जाते, त्यालाच, काहीजण भाषासमृद्धी असेही म्हणतात. ज्याचा त्याचा भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. अनेकांना भाषा हे केवळ संवादाचे साधन वाटते. कारण तिची लिपी आणि उच्चार यांहून, त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना महत्वाच्या, असे अनेकांना वाटते.


तसं असेल, तर समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या चित्रलिपीला, म्हणजे, ‘स्माईली’ला ‘भाषा’ म्हणून मान्यता मिळायला काय हरकत आहे? किंवा अनेकदा, विशेषतः राजकारणी नेते, काही बोलण्याऐवजी मौन पाळतात, आणि त्यातूनही अनेकांना अनेक अर्थ सापडतात. मग मौनाचीदेखील भाषा असतेच, असे मानायला काय हरकत आहे?... तसे असेल, तर मौनाच्या भाषेला जागतिक भाषा म्हणून मान्यता मिळायला काय हरकत आहे? कारण ही एक अशी भाषा आहे, ज्यामधून व्यक्त होणारे भाव, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी सारखेच असतात...

दै. पुण्यनगरी, २६ ऑक्टोबर २०२१