Friday, November 27, 2009

श्रद्धांजली...


रक्त सांडुनि तुम्ही फेडले ऋण या मातीचे....
तुमच्यासाठी आम्ही सांडले थेंब दोन अश्रूंचे....

Wednesday, November 25, 2009

...आणि गोठलेल्या अश्रूंना पुन्हा वाट फुटली!

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते. गर्दीच्या मनावरची ती जखम पुन्हा भळभळत होती आणि त्या वेदनाही जाग्या होत होत्या... त्या छायाचित्रांनी रेल्वेस्थानकाच्या त्या परिसराला पुन्हा एकदा त्या कडवट स्मृतींच्या खाईत लोटले होते... ...दुपारी मी या स्थानकावर उतरलो आणि हाच रस्ता पकडला. रस्त्याला लागण्याआधी बस डेपोच्या शेजारच्या फेरीवाल्यांचे आवाज नेहमीसारखेच घुमत होते; पण स्टेशनच्याच आवारात, मेन लाइन आणि लोकल लाइनच्या रस्त्याच्या दुभाजकावरील जाळीसमोरचे चित्र मात्र नेहमीपेक्षा काहीसे वेगळेच होते. तिथल्या प्रत्येक खांबावरच्या छायाचित्रांतून गेल्या वर्षीच्या हल्ल्याची जखम पुन्हा भळभळती झाली होती आणि अस्वस्थ, बेचैन गर्दी ती छायाचित्रे न्याहाळत स्तब्ध झाली होती... बाहेरच्या फेरीवाल्यांच्या कोलाहलाचा, गाड्यांच्या कर्णकर्कश भोंग्यांचा आणि अवघ्या मुंबईच्या गतीचा परिणाम तिथे जणू गोठून गेला होता... मीही त्या गर्दीत मिसळलो... त्याच अस्वस्थतेचा अनुभव घेत एकेक छायाचित्र न्याहाळत पुढे सरकू लागलो. मुंबईतील विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी 26 नोव्हेंबरच्या "त्या' भयानक दिवशी जीव धोक्‍यात घालून केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तेथे मांडले होते... त्यामध्ये ओबेरॉयमधील थरार होता, ताजमधील आगीचे लोळ होते, भयाने गोठलेल्या वेदनांचा कल्लोळ होता, अतिरेक्‍यांशी सामना करण्याच्या तयारीतले हेमंत करकरेंचे छायाचित्र होते, जीव धोक्‍यात घालून छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांच्या धाडसाचे पुरावे होते आणि अपुऱ्या शस्त्रांनिशी अतिरेक्‍यांशी लढण्यास सज्ज झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे "पोझिशन'मधले फोटोही होते. एखाद्या छायाचित्रातील रक्ताची थारोळी न्याहाळत थरकापल्या मनाने प्रवासी पुढे-पुढे सरकत होते; कुणी त्यातलीच काही छायाचित्रे मूकपणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेत होते आणि शेवटच्या छायाचित्राजवळ पोचताच सुन्नपणे बाहेर पडत होते... अतिरेक्‍यांनी केलेल्या या "तबाही'मध्ये शहीद झालेल्यांना "अखेरचा सॅल्यूट' करताना दुःखावेग अनावर झालेल्या त्या मुंबईकराच्या छायाचित्रात जणू प्रत्येकाच्याच भावना ओतल्या गेल्या होत्या... गर्दी सुन्न होत होती. याच गर्दीसोबत मी पुढे सरकत होतो. नजर छायाचित्रांवर खिळली होती. अखेरचे ते छायाचित्र पाहून मीही पुढे आलो आणि थबकलो... ते प्रदर्शन पाहिले होते, तरीही मी पुन्हा मागे वळलो... ते प्रदर्शन पाहाणाऱ्या गर्दीच्या प्रतिक्रिया मला न्याहाळायच्या होत्या... मी मागे पहिल्या छायाचित्राजवळ आलो आणि सरकत्या गर्दीसोबत पुढे सरकू लागलो... अचानक माझी नजर बाजूनेच चालणाऱ्या एका तरुणीकडे गेली. भिजल्या आणि थिजल्या डोळ्यांनी ती एकेक छायाचित्र डोळ्यांत अक्षरशः साठवून घेत होती... तिच्या डोळ्यांतले थिजलेले भाव पाहताच मी गोठलो आणि तिला कळणार नाही, अशा बेताने तिच्याच गतीने पुढे सरकत राहिलो... प्रत्येक छायाचित्रासमोर तिचा व्याकूळपणा आणखीनच वाढत होता... एका हातानं तिनं तोंडावर रुमाल घट्ट धरला होता; पण तिच्या डोळ्यांतील वेदना मात्र लपली नव्हती. "ताज'मधून बाहेर पडणारे आगीचे लोळ एका छायाचित्रात दिसताच, ते डोळे आणखी व्याकूळ झाले... पुढच्याच छायाचित्रात, दोरखंडाच्या साह्याने अतिरेक्‍यांवर चढाईच्या तयारीतले जवान पाहताच तिचे डोळे चमकले... हेमंत करकरेंचे ते छायाचित्र पाहताच ती बहुधा पुन्हा कळवळली... तिनं तोंडावरचा रुमाल आणखी घट्ट धरला... एका टॅक्‍सीच्या आडोशाने अतिरेक्‍यांच्या कारवाया पाहणाऱ्या पोलिस शिपायांच्या छायाचित्रातील असहाय्यता पाहून ती बहुधा अस्वस्थ झाली... आपल्या कुणा नातेवाइकाच्या विरहाने आणि कदाचित अघटिताच्या बातमीने हंबरडा फोडणाऱ्या एका पाहुणीच्या छायाचित्राने तिला आणखी व्याकूळ केले... आता तिच्या गळ्यातून उमटणारे हुंदकेही मला जाणवत होते. त्यांना आवाज नव्हता; पण ती अक्षरशः हलली होती... ते स्पष्टपणे जाणवत होते... एका छायाचित्रासमोर येताच तिनं डोळेही गच्च मिटून घेतले... गेल्या वर्षीची ही छायाचित्रे पाहतानादेखील तिच्या मनावर असह्य ताण येतोय, हे जाणवून मलादेखील अस्वस्थ वाटू लागले होते... अखेर ती त्या शेवटच्या छायाचित्रासमोर येऊन उभी राहिली... पुढे सरकणाऱ्या अवघ्या गर्दीची पावले तिथे थबकलेलीच होती... सगळी गर्दी मूक झाली होती... एक विचित्र मानसिक दडपण तिथे दाटले होते... ...तीदेखील या गर्दीसोबत तिथे थबकली. तोंडावर पकडलेल्या रुमालाची पकड आणखी घट्ट झाली होती... डोळ्यांमधल्या वेदना आणखी ठळक झाल्या होत्या... आणि आतल्या आत उमटणारे ते हुंदके आता स्पष्ट झाले होते... अनावर दुःखाने शहीदांना अखेरचा, निरोपाचा "सॅल्यूट' करणाऱ्या "त्या मुंबईकरा'च्या छायाचित्रांसमोर येताच ती आणखीनच कोलमडली... आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका तिला आवरत नव्हता... डोळ्यांच्या ओल्या कडांमधून अश्रूंची धार सुरू झाली होती... तिने ते अश्रू तिथेच वाहू दिले... बाहेर पडणारा हुंदकादेखील न रोखता ती क्षणभर तिथे उभी राहिली आणि झटक्‍यात तिनं मान फिरवली... मागे न पाहता ती वेगाने रस्त्यावर आली आणि टॅक्‍सीला हात दाखविला... वाहत्या मुंबईत तीही नंतर सामील झाली होती, शहीदांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली अर्पण करून !!

Friday, November 20, 2009

डोंबिवली, ते...

मुंबईतल्या एका कंपनीत नवीनच कामाला लागलेले ते दोघे... एक डोंबिवलीत राहाणारा, तर दुसरा साऊथ इंडियातल्या कुठल्यातरी खेड्यातून आलेला... एकत्र काम करताना त्यांची मैत्रीही घट्ट होत असते. काम संपल्यावर गप्पा, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्हवर फेर्फटका, असं सुरू असतं. खूप चांगली, निर्व्याज दोस्ती!
कधीमधी हा डोंबिवलीकर आपल्या साऊथ ईंडियन मित्राला घरी येण्याचं आमंत्रण द्यायचा, आणि हाही ते आनंदानं स्वेकारायचा. कितीतरी वेळा असंच व्हायचं. साऊथ इंडियन मित्र कधीच `नाही' म्हणायचा नाही.
... पण कधीच डोंबिवलीला गेलाही नाही !
शेवटी एकदा डोंबिवलीकर मित्रानं अस्वस्थ होऊन त्याला विचारलेच.
`काय रे, इतक्या वेळा मी तुला घरी बोलावलं, आणि तू पण येतो, येतो म्हणतोस, पण एकदाही आला मात्र नाहीस... असं का करतोस?'
आता साऊथ इंडियन मित्र गंभीर होतो...
`अरे, मला तुझ्याकडे यायला काहीच प्रॉब्लेम नाही रे, पण'...
`काय पण...?' डोंबिवलीकराचं टेन्शन वाढतं. त्याच्या चेहेर्‍यावर उमटतं. तोंडवरून दोनतीन वेळा अस्वस्थपणे तळवा फिरवत तो विचारतो.
`अरे, एव्हढं काही गंभीर नाही... पण मी तुझ्याकडे आलो होतो हे गावाकडे माझ्या बाबांना कळलं तर...' पुन्हा साउथ इंडियन मित्र बोलताबोलता थांबतो.
डोंबिवलीकर आणखी अस्वस्थ.
` अरे, बाबा मला रागावतील रे... मला त्यांची भीती वाटते'... साऊथ इंडियन मित्र केविलवाणा झालेला असतो.
`पण का? माझ्याविशयी काही वाईटसाईट कळलंय का तुझ्या बाबांना?' डोंबिवलीकर दक्षिणेकडे लांबवर पाहात आणखी अस्वस्थपणे विचारतो.
`तसं नव्हे रे, ते म्हणतील, डोंबिवलीला जातोस, पण इतक्या दिवसांत तुला घरी, गावाला येता येत नाही... मी काय सांगणार, तूच सांग...'
... डोंबिवलीकर लांबवर लागलेली नजर न हटविता केवळ मान हलवतो...
`खरंय', असं सुचवत!

Thursday, November 19, 2009

तुझे निरंतर चित्र काढतो...

....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र-
गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!!
आहात कुठे???
या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय? तुम्हाला काय वाटते?

भुजबळांच्या स्वप्नातील तो महाराष्ट्र असा असेल...
-राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी हाती घेतलेल्या कायदा व सुव्यवस्थाविषयक कार्यक्रमांना अधिक गती देण्याबरोबरच नक्षलवाद व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम करण्यात येईल.
(मागच्या सरकारचेही हेच स्वप्न होते...)
-राज्यातील सर्व प्रमुख शहरे किमान चारपदरी रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहेच. आता त्यापुढे जाऊन वाड्या, तांडे, पाडे यांसह ५०० लोकवस्तीपर्यंतची व त्यावरील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्याचे ठरविले आहे.
-गरीबांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये किंमतीची २७५ चौ. फुटांची घरे बांधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून येत्या पाच वर्षांत दहा लाख घरे बांधण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
-मुलींना पदवीपर्यंतचे, तर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार आहोत. ( तारखेकडे लक्ष द्या... )
मुलींची भ्रूणहत्या थांबावी म्हणून मुलगी जन्माला येताच तिच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवून ती उपवर होईल तेव्हा एक लाख २५ हजार रुपये मिळतील, अशी `माहेर योजना` आम्ही राबविणार आहोत.
-आज निराधारांसाठी, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना सुरू आहेत. त्यांची व्याप्ती वाढवून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ६५ वर्षांवरील प्रत्येक गरजू स्त्री-पुरूषाला आजीवन सहाशे रुपये पेन्शन दरमहा देण्याची योजना आमच्या विचाराधीन आहे.
-दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आम्ही २५ किलो धान्य ३ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना आरोग्यपत्रिकाही देणार आहोत. अशा आरोग्यपत्रिकाधारक नागरिकांना हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, ब्रेन ट्यूमर इत्यादी दुर्धर आजारांवरील उपचार व सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याची तरतूद असणार आहे.
-राज्यातील शेतमजुरांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे तसेच विविध प्रकारच्या कारागीरांचेही बचतगट स्थापन करण्यात येतील. या बचतगटांना विविध उद्योगांसाठी ४ टक्के दराने कर्ज देण्याचे आम्ही ठरविले आहे.
-मागासवर्गीयांच्या उत्थान कार्यक्रमाचीही कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-`सुजल महाराष्ट्र, निर्मल महाराष्ट्र` अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सर्वांना वैयक्तिक नळजोडण्या देण्याचा निर्धार आघाडी शासनाने केला आहे.
-परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी चैत्यभूमी स्मारक परिसरात जमीन उपलब्ध करून त्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी `चैत्यभूमी विकास प्राधिकरण` स्थापन करण्याचेही आम्ही ठरविले आहे.
(यापेक्षा आणखी काय हवे???)
(टीप : काहीतरी `विनोदी' लिहावे, असा विचार मनात आला, म्हणून सहज महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज‘ या पोर्टलवर चक्कर मारली. आणि, चक्क, किती कॊपी करू अन किती नको, एवढा ‘मसाला’ हाती आला... तोच चिकटवला आहे. त्यामुळे, यातील कोणताही विनोद माझा नाही... अधिक तपशीलासाठी किवा मनोरंजनासाठी तुम्हीही मधूनमधून तेथे चक्कर मारा... )

Saturday, November 14, 2009

‘वादळ’ आणि ‘वादळग्रस्त’...

‘वादळ’ आणि ‘वादळग्रस्त’... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली ‘मने’ नवनिर्माणाच्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक ‘हवामान’ बदलून गेले. वातावरणात कुठेतरी निर्माण झालेल्या मोठ्ठ्या ‘पोकळी’मुळे सगळे चित्रच पालटून गेले. पुन्हा ढगांची गर्दी झाली. हवा कोंडल्यासारखी झाली आणि वादळाची चिन्हे उमटू लागली. कुठल्यातरी पोकळीमुळे कुठेतरी वादळे माजतात, हा निसर्गाचा नियमच आहे. तोच नियम महाराष्ट्रातही अनुभवायला लागणार, असे संकेत त्या चिन्हांमधून मिळू लागले. आणि अखेर, ते वादळ राज्यात येऊन थडकले. ‘पोकळी’चा नियम खरा ठरला. महाराष्ट्राचा सरता आठवडा अक्षरश: वादळी ठरला. वर्षानुवर्षे भक्कमपणे घट्ट उभे राहिलेले अनेक जुने वृक्ष त्या झंझावाती वादळात कोलमडून जमीनदोस्त झाले, तर अनेकांच्या फांद्या कोसळून पडल्या. सभोवती साठलेला जुना पालापाचोळा तर त्या वादळी वाऱ्यांसोबत कुठल्या कुठे उडून गेला. काहींना या वादळाचीच जणू प्रतीक्षा होती. असे वादळ यायलाच हवे होते, असे म्हणत अनेकांनी वादळी वारे आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटा अनुभवण्यासाठी समुद्रकिनारे गाठले आणि वादळासोबतच कोसळणाऱ्या पावसाच्या थंड शिडकाव्यात स्वत:ला भिजवून घेतले... वादळामुळे कोणते वृक्ष कोसळले, कुणाचे किती नुकसान झाले, कोणाला किती हानी सोसावी लगली, याचा हिशेब त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. वादळ आले, याचा आनंदही कुठेकुठे साजरा होत होता... पोकळी निर्माण झाली, की वादळ येणारच, मग त्याला सामोरे गेलेच पाहिजे, असा साधा सरळ हिशेब अनेकांनी माडला, तर आता हे वादळ कसे थोपवायचे, या चिंतेने अनेकांची झोप उडाली. आपल्या बापजाद्यांनी मजबूत बांधलेले आपले ‘घर’ या वादळापुढे टिकाव धरेल का, या काळजीने कुणाचे ‘मन’ थरकापून गेले... बरोब्बर त्रेचाळीस वर्षांपूर्वी, १९६६ मध्ये असेच एक वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घोंघावले होते... त्या वेळी वादळांना ‘ग्लोबल’ नावे नसत. तरीदेखील, ते वादळ कित्येक वर्षे मराठमोळ्या मनामनात घोंघावत राहिले. त्या वादळानेदेखील, त्या वेळी मोठी पडझड झाली होती. भलेभले, मजबूत आणि घट्ट मुळांचे अनेक वृक्ष त्या वादळात साफ आडवे झाले आणि अनेकांनी वादळापुढे मान झुकवून शरणागती पत्करली. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती’ असे एक वचन आहे. त्या वादळात जेव्हा मोठमोठ्या वृक्षांची वाताहात होत होती, तेव्हा लहानशी, कुठे अस्तित्वही नसलेली लव्हाळी मात्र तरारून उठली आणि त्या वादळानं त्यांना जणू संजीवनी दिली. अनेक लव्हाळी हा वादळवारा पिऊन तरारून उठली, आणि बघताबघता फोफावली... मोठी झाली. ज्या जमिनीतून जुनी खोडे जमीनदोस्त झाली होती, तिथेच ही लव्हाळी मूळ धरू लागली... त्या वादळानं नवे वृक्ष जन्माला घातले, आणि तब्बल त्रेचाळीस वर्षे हे वृक्ष अनेकांना सावली देत राहिले... १९६६च्या ‘त्या’ वादळातही, अनेकांची, त्यांच्या पूर्वजांनी ‘भक्कम’ बांधलेली मजबूत घरे मोडकळीस आली होती... म्हणूनच त्या वादळाच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात रुतलेल्या आहेत. ... महाराष्ट्रात नुकतेच थैमान माजविणाऱ्या या नव्या वादळाने त्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. ‘त्या’ वादळात आणि ‘या’ वादळात बरेचसे साम्य आहे, हे ‘अनुभवी’ जाणकारांनी नेमके ओळखले आणि हे नवे वादळदेखील ‘पडझडी’च्या असंख्य खाणाखुणा उमटविणार, हे स्पष्ट झाले. ‘त्या’ वादळाच्या वेळी तरारलेली लव्हाळी आता मोठी झाडे झाली आहेत. त्यांच्या सावलीतच, त्यांचीच बीजे पुन्हा रुजली आहेत. आजवर ती लहानगी रोपे, या सावलीतूनच वाऱ्यांच्या लहानश्या झुळुकांसोबत नुसती झुलायची. वादळाची चाहूलदेखील त्यांना शिवली नव्हती... पण अचानक आलेल्या या नव्या वादळात, ती जुनी खोडे भयाने झुकली, आणि जीव मुठीत धरून बचावासाठी आसरा शोहू लागली. त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला. पण या नव्या वादळापुढे ते जुने वादळही फिके पडले, तेव्हा त्या खोडांनी पायाशी झुलणाऱ्या रोपांना वादळात सोडून दिले, आणि अनेक रोपे हा नवा ‘वादळवारा’ पिऊन तरारली. नव्या वादळाने त्यांना झपाटून टाकले. आणि जुनी झाडे, ‘वादळग्रस्ता’ सारखी केविलवाणी झाली. आता केव्हाही आपण कोलमडणार, या भयाची सावली आता त्यातल्या अनेकांच्या फांदीफांदीवर दिसते आहे. त्रेचाळीस वर्षांपूर्वी आलेले ते वादळ अगोदर मुंबईवरच घोंघावले, आणि किनारपट्टीचा वेध घेतघेत ते कोकणात सरकले. बघता बघता त्याने कोकणाचा कब्जा घेतला. आणि अवघे कोकण काबीज करून ते वादळ तेथेच स्थिरावले. नंतर अनेक वर्षे कोणतीच पोकळी कुठेच निर्माण झाली नव्हती. पण निसर्ग मोठा लहरी असतो. उभे आयुष्य हवामानाच्या संशोधनात घालविणाऱ्या अभ्यासकांचे अंदाजही तो चुकवितो. कधीतरी कुठल्यातरी पोकळीची चाहूल लागली म्हणून वादळाचा अंदाज वर्तवावा, तर अचानक ती पोकळीच नष्ट व्हावी आणि वादळाची सगळी चिन्हेच पुसली जावीत, तर कधी पोकळीचा अंदाजच न आल्याने वादळाचा वेग किती असेल याचेच आडाखे विस्कटून जावेत, असा अनुभव अशा अभ्यासकांनाही अनेकदा आलेला असतो. या नव्या वादळाचे नेमके तेच झाले... ‘अशी अनेक वादळे आम्ही पाहिली आणि पचविली आहेत’, अशा भ्रमात असलेल्यांनाच या वादळाचा मोठा तडाखा बसलाय. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कशी करायची, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर चक्रीवादळासारखा घोंघावत असेल. ... आता ‘पंचनाम्या’ला सुरुवात होईल, तेव्हा नुकसानीचा नेमका अंदाज येईल... मग, घरे पूर्णपणे कोसळलेल्यांना किती ‘नुकसानभरपाई’ द्यायची, नुसती पडझड झालेल्यांना कसे ‘सावरायचे’, आणि कुणाला ‘तात्काळ मदती’ची गरज आहे, हे त्या पंचनाम्यानंतरच निश्चित होणार आहे. सध्या तरी, ‘वादळग्रस्तां’ची नुसती मोजदाद करण्याचे काम सुरू आहे.

Sunday, November 8, 2009

ग्लोबल स्टेट` : महाराष्ट्र

मुंबई आणि राज्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन, महागाईवर नियंत्रण अशा विविध माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत आहे. अडचणी अनेक असल्या तरी महाराष्ट्र आजही गुंतवणुकदारांसाठी पहिल्या पसंतीचे स्थान आहे.
`ग्लोबल स्टेट` म्हणून महाराष्ट्र नजीकच्या भविष्यात लौकीक प्राप्त करील, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शपथविधीनंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणार असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असेल, असे सांगितले.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि वीरमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा प्राधान्यक्रम सादर केला. तसेच राज्यातील जनतेच्या विकासासाठी शासन करणार असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

(‘महान्यूज’च्या सौजन्याने...)

जमलं एकदाचं...


एका घरात दोन पाळलेले बोके मजेत राहात होते. मालकाच्या घरी समृद्धी असल्याने त्यांची चैन होती. दिवसभर मलई खायची, आणि रात्री ढेकर देत मऊशार गादीवर लोळत पडायचे... असे मजेत दिवस जात होते... थोडक्यात, सुखाचा अगदी ‘वर्षा’व सुरु होता. दुसरा बोकाही हुशार होता. दिवसभर डोळे मिटून ‘मलई’ चापायची, आणि रात्री निजण्याआधी ‘राम’नामाचा जप करत दिवसभरातल्या गिव्ह ऎंड ‘टेक’चा हिशेब माडत पहुडायचे... एकूणच, दुसरा बोकाही सुखात असल्यामुळे, दोघांच्यातही भांडणाचा मुद्दाच नव्हता. आपापल्या ताटातली मलई खायची आणि मजा करत सुस्त राहायचं... शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?... मजेत जगणं हेच ना?... मग त्यासाठी माणसाचा काय, किंवा बोक्याचा काय... जन्म असला म्हणजे झालं. मालकाचा बिचारा नोकर मात्र, बोक्यांची ही चैन बघून खंतावायचा. हे डोळे मिटून मलई चापतात, पण मालकाचे डोळे तरी उघडे हवेत ना, असं त्याला वाटायचं आणि, आपल्या घरची उपाशी पोरं आठवून तो पाणावलेले डोळे मिटून घ्यायचा. बोके एकमेकांकडे बघून हसतायत, असा त्याला भास व्हायचा. मग तो तिकडे पाहायचाच नाही. मग बोके मलईवर तुटून पडायचे, आणे पोट भरल्यावर ‘पंजा’ने मिशा पुसत लोळायला जायचे.
अशी दहा वर्षे सरली. पिल्लू म्हणून घरात आलेले ते बोके आता चांगलेच गलेलट्ठ झाले होते. त्यांची भूक पण वाढली होती. शरीरं वाढली म्हणजे ते होणारच ना? आता त्यांना मलईची चटकच लागली होती. चांगली मलई कुठल्या कपाटात असते, तेही दोघांनाही माहीत झाले होते. दहा वर्षे एकाच घरात दोघेही वावरत होते ना? दोघांचाही डोळा त्या कपाटातल्या मलईवर होता. ही सगळी मलई आपल्यालाच मिळाली पाहिजे, असं दोघांनाही वाटू लागलं.
... आणि इथेच बिनसलं. दोघेही समोरासमोर आले, की एकमेकांवर गुरगुरायला लागले. मालक आणि नोकरांनाहे ते जुमानेसे झाले. आपणच मालक आहोत, अशा थाटात ते मलईच्या कपाटासमोर बसू लागले. हटकले तरी हलेनासे झाले. जिभल्या चाटत आणि आतल्या मलईच्या चवीच्या आठवणी मनात रंगवत ते सुस्तपणे पडून राहयचे.
एक दिवस मालक बाहेर कुठे गेला होता. नोकरानं आळस केला, आणि नेमकं मलईचं ते कपाट उघडं राहिल. ...आणि बोक्यांचं फावलं. सुखाच्या ‘वर्षा’वात लोळणा-या बोक्यानं झडप घातली, आणि कपाटातला तो मलईचा गोळा ‘पंजा’त पकडला. दुसरा बोका अजूनही सुस्त होता... बराच वेळ झाला, तरी दुस-या बाजूला हालचाल जाणवत नव्हती. तेव्हड्यात बाहेर घड्याळाचे ठोके पडले. घड्याळ वाजले, की त्याला मालकाची आठवण व्हायची. तो उठला. त्यानं आळस दिला, आणि मिशा फेंदारून त्यानं आजूबाजूला बघितलं. दुसरा बोका कुठेच दिसत नव्हता आणि मलईच्या कपाटाचं दार उघडं होतं... त्यानं अंदाज घेतला, आणि एकदा शरीराची कमान करून आळस झटकून उडी मारली. क्षणात तो दुस-या बोक्याच्या समोर उभा होता.
... दोघे समोरासमोर आले. आता गुरगुरण्याचा आवाजही वाढला होता. नोकरानं आत येऊन बघितलं. पण दोन्ही बोक्यांचा अवतार बघून पुढं व्हायची हिंमतच त्याला झाली नाही. आपलीच चूक आहे, आपणच कपाट उघडं ठेवून मलईचं ताट त्यांच्यासमोर वाढलं, आता करणार काय... कपाळावर सुन्नपणे हात धरून तो दोन बोक्यांचं भांडण बघत होता... आता बोके अगदी हातघाईवर आले होते. मलईचा तो गोळा काहीही करून पटकावायचाच, अश्या ईर्ष्येनेच दोघेही मैदानात उतरले होते... असा खूप वेळ गेला. मलईचा गोळा बाजूलाच पडला होता... आणि हे दोघे ‘हात’घाईवर आले होते. भाडून भांडून आता त्यांना थकवाही आला होता. ब-याच दिवसाच्या सुस्तीमुळे अलीकडे भांडायची ताकदही उरली नव्हती, हे दोघांच्याही लक्शात आले. आणि बाजूला जाऊन मलईच्या गोळ्यावर डोळा ठेवून ते दोघेही जरा विसावले.
... खूप वेळ झाला. पुन्हा बाहेर घड्याळाचे ठोके पडले आणि दुसरा बोका ताडकन उठला. आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. मग अचानक त्याचे डोळे चमकले. आवाज ह्ळूवार झाला. अंगाला लडिवाळ झोका देत तो पहिल्या बोक्याजवळ गेला, आणि त्याच्या अंगाला अंग घासत त्यानं लाडिक सुरात ‘मियांव’ केलं... पहिला बोकाही थकला होता. एकाच घरात राहायचं असेल, तर आपण असं एकमेकांशी भांडून चालणार नाही, असं त्याला बहुधा उमगलं होतं. शेवटी इतकी वर्षं एकत्र काढली होती. सुरुवातील तर, एका ताटात जेवलो होतो... पहिल्या बोक्याला ते दिवस आठवले, आणि तो विरघळला... त्यानंही शेपटीला विळखा देत दुस-याभी लडिवाळपणा करत मियाव केलं...
पण परत दुस-याचे डोळे चमकले. काहीतरी गडबड असावी, असं त्याला वाटू लागलं. पण त्यानं तसं दाखवलंच नाही... आता मलईसाठी काहीतरी करायलाच हवं, हे त्याला जाणवायला लागलं, आणि तेव्हढ्यात पुन्हा घड्याळाचा ठोका पडला. मग तो आपल्या भाषेत पहिल्या बोक्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. नोकर हे अचंबितपणे पाहात होता. पण त्याला त्यांची भाषा समजत नव्हती. बोक्यांना मात्र, माणसांच्या संगतीत राहून माणसांची भाषा येते, हे नोकरानं ऐकलं होतं. तो उठला आणि आपल्या कामाला लागला. आता गुरगुरणंही थांबलं होतं.
... ब-याच वेळानंतर दोन्ही बोके कुटूनतरी बाहेरून घरी आले, तेव्हा त्यांच्या तोंडात मलईचे दोन लहानसे गोळे होते. पण दोघेही खूश होते... एकमेकांच्या अंगाला अंग घासत दोघेही शेजारीशेजारी बसून मलई चापत होते. मधूनच एकमेकांना चाटत होते.
... नोकराला काहीच कळेना. अचानक त्याला त्या लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणा-या दोन बोक्यांच्या गोष्टीची आठवण झाली...
... ‘कुणीतरी वाटण्या करून दिलेल्या दिसतायत यांना’ नोकर स्वत:शीच पुटपुटला, आणि त्यानं केरसुणी हातात घेतली. बोक्यांचं भांडण बघण्यात आपली बरीच कामं तशीच रेंगाळलीत, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मालक ओरडेल या भीतीनं तो कामाला लागला...
पुन्हा घड्याळाचे ठोके पडले. मालकांची यायची वेळही झाली होती. आता मालकाला त्या मलईच्या गोळ्यांचं काय सांगायचं, या काळजीनं नोकर हैराण झाला होता. तेव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. दोन्ही बोक्यांनी कान टवकारले होते. मालक आला की ते नेहेमीच शेपटी घोळवत पुढेपुढे करायचे, आणि त्यांना कुरवाळताना मालकाचा रागही निवळायचा...
आताही तसंच व्हावं, असं नोकराला वाटत होतं.. त्यानं दरवाजा उघडला, आणि दोन्ही बोके मालकाकडे झेपावले... त्यांच्या मिशांना चिकटलेली मलई अजूनही तशीच दिसत होती...
मालकानं प्रेमान त्याच्या मिशा पुसल्या. नोकर अचंबित होऊन बघतच राहिला.
‘म्हणजे, मालकानंच मलईची वाटणी करून दिली की काय?’... तो पुन्हा पुटपुटला, आणि निमूटपणे कामाला लागला.
दोघेही बोके आता ‘पंजा’नं मिशा पुसत नोकराकडे बघत होते.
... मिश्किलपणे!...

सकाळ, ८ नोव्हेंबर २००९