Friday, February 22, 2013

पैसा आणि पोट

रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही.. कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं. त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं. त्या दिवशी मी गाडी पकडायच्या गडबडीत घाईनं चालत होतो, आणि अचानक एक केविलवाणा हात समोर पसरला गेला. मी थोडंसं चिडूनच, चमकून वर बघितलं. एक मध्यमवयीन स्त्री समोर उभी होती. कडेवर एक लहान मूल, हाताशी दोन मुलं. भांबावल्यागत भिरभिरत्या डोळ्यांची. विस्कटलेल्या केसांची, मळकटलेल्या फाटक्या कपडय़ांत गुंडाळून घेतलेली.. त्या बाईच्या डोळ्यातही केविलवाणेपण ठासून भरलेलं. माझे पाय थबकले. ‘भाऊ, दुष्काळानं सगळं धुतलं. आम्ही शेतीवाडीवाली माणसं. पण हाती काही नाही राह्य़लं. वडापाव खायला घाला. पोरं लई भुकेली हाईत’.. त्या केविलवाण्या आवाजानं मन फाटलं. पण नेहमीसारखीच कुणीतरी भिकारीण असेल, असं समजून चालू लागलो. ती माझ्या मागोमागच हात पसरून चालत होती. शेवटी, मी बाजूच्या स्टॉलवर गेलो आणि चार वडापावची ऑर्डर दिली. मग तिनं माझ्यासमोर पसरलेला हात झटक्यात मागे घेतला. ‘भाऊ, वडापाव नका देऊ.. पैसे द्या. पंचवीस-तीस रुपये. उद्याला व्हतील!’ तिनं आर्जवी स्वरात विनवलं. मग मी खिशात हात घातला. वीस रुपये काढून तिच्या हातावर दिले. तिनं मला नमस्कार केला आणि ती निघून गेली. मी गाडीत चढलो. गाडीतली माणसं, आपापल्या हातातल्या मोबाइलवर काही ना काही करत होती. प्रत्येकजण समोरच्या मोबाइलमध्ये रमलेला. सगळे जणू आत्ममग्न! आपल्याआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखं.. गाडी सुरू झाली आणि माझा ‘शून्य प्रहर’ सुरू झाला. नजर आसपास भिरभिरू लागली.. आणि बाजूच्याच एका प्रवाशावर स्थिरावली. गाडीनं वेग घेतल्यावर तो उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडून आतली पेपरची घडी काढली. बॅग पुन्हा वर टाकली आणि तो ऐसपैस बसला. त्याच्या हातातला पेपर जुनाच होता. त्यानं खिशाचं मार्कर पेन काढलं. वाचता वाचता तो कुठल्या तरी मजकुरावर खुणाही करत होता. मग मी त्याच्या पेपरात मान खुपसली. त्याच्या ते लक्षात आलं. माझ्याकडे बघून तो हसला. त्याच्या हातातला पेपर मराठी होता. त्यानं खुणा केलेल्या बातम्या माझ्यासमोर धरल्या. एक बातमी दुष्काळाची होती. मराठवाडय़ात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. आताच अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसताहेत. कधीतरी एखादा टँकर गावात येतो, आणि माणसांची झुंबड उडते. मग भांडणं, मारामाऱ्या.. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यानं केंद्राकडे पैसे मागितले आहेत! दुसऱ्या बातमीत, जनावरांच्या छावण्यांच्या भ्रष्टाचाराचा मजकूर होता. दुष्काळाचा ‘धंदा’ सुरू झाल्याचा सूर त्या बातमीत स्पष्ट उमटला होता! आणि तिसरी बातमी, मुंबईची होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं आयुक्तांचं भलंमोठं भाषण. त्यातली एक ओळ त्यानं मार्करनं लाल केली होती. तेवढीच त्यानं माझ्यासमोर धरली. मुंबईला रोज होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी, जवळपास ३० टक्के पाणी वाया जातं, असं काहीतरी त्यात म्हटलं होतं. वाया जाण्याचं हे प्रमाण चारपाच टक्क्य़ांनी कमी करायचा संकल्प आयुक्तांनी सोडला होता. त्यासाठी पैशांची गरज असल्याचं काहीतरी म्हटलेलं. .. ‘सगळ्यांना पैसे हवेत.’अचानक तो म्हणाला, आणि गूढपणे हसला. मी चमकून त्याच्या तोंडाकडे बघितलं. ‘अहो, तिकडे माणसं पाण्यासाठी पायपीट करतायत आणि इकडे, दुष्काळाच्या नावानं राजकारण सुरू झालंय. पैसे हवेत सगळ्यांना. कशाला?’ असं म्हणत त्यानं उजव्या हाताची सगळी बोटं एकत्र केली, आणि तोंडाजवळ नेत तो हसला. ‘काय, बरोबर ना?’ त्यानं विचारलं. उत्तराची वाट न बघता बोलू लागला. ‘आपण मुंबईकर म्हणजे ना, पाण्याची किंमत आपल्याला नाहीये. कितीतरी पाणी आपण विनाकारण वाया घालवतो. आपल्याकडे पैसा पण पाण्यासारखा वाहातोय. जरा इकडे बघा म्हणावं..’ वर्तमानपत्रातल्या दुष्काळाच्या बातमीवर बोट आपटत तो तिडिकीनं बोलला. ‘वाया जाणारं पाणी वाचवलं, तर चार गावांची तहान भागेल. पण यांना काही करायचंच नाहीये. तसं केलं, तर पैशाचे प्रवाह बंद होतील ना..’ त्याच्या डोळ्यातही संताप संताप दिसत होता. मग त्यानं तिरिमिरीतच तो पेपर गुंडाळला. रॅकवरची बॅग काढली. दुसरा पेपर काढला आणि घडी उलगडत पुन्हा त्यानं मार्कर पेन सरसावलं. त्याचे डोळे चमकले आणि त्यानं सगळी बातमीच रंगवून टाकली. एका राज्यमंत्र्याच्या घरातल्या लग्नाची चमचमीत बातमी होती. शाही जेवण, शाही वरात आणि जखमेवर मीठ म्हणजे, लग्नाच्या मेजवानीचा शाही मेनू बनवण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातून माणसं आणलेली.. ती बातमी वाचता वाचता तो अक्षरश शहारला. ‘इथे मेजवान्या झडतायत आणि तिकडे माणसं, जनावरं उपाशी मरतायत. जेवण बनवायला आणलेल्या त्या लोकांच्या घशाखाली घास उतरला असेल त्या मेजवानीतला?.. हा मंत्री, आमच्या कोकणातला. हा काही पिढीजात श्रीमंत नाही. मग एवढा पैसा आला कुठून त्याच्याकडे..त्याचे साहेब म्हणे, चिडले त्याच्यावर. तिकडे दुष्काळ असताना संपत्तीचं असं प्रदर्शन करतो म्हणून.. पण मी म्हणतो, एवढा पैसा आला कसा त्याची चौकशी करा ना..’ तिरीमिरीत त्यानं तोही पेपर गुंडाळला. काही क्षण तसाच बसून राहिला. पण अस्वस्थतेची रेषा त्याच्या चेहऱ्यावरून पुसलीच जात नव्हती. .. माझ्या डोळ्यासमोर, वाटेत भेटलेली ती केविलवाणी, हात पसरून भीक मागणारी, तीन मुलांची आई दिसू लागली.. अचानक तो पुन्हा जागेवरून उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडली, आणि गुंडाळलेला हेडफोन काढला. खिशातून मोबाइल काढून त्यानं हेडफोन जोडला, आणि कानाला लावला.. आता त्यानं डोळे मिटले होते. त्याच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थ, संतापाची रेषा पुसट होत चालली होती. मधूनच तो कानात घुमणाऱ्या सुरांना दाद देत होता. आसपासच्या गर्दीप्रमाणेच, तोही आता मोबाइलमधल्या गाण्यात गुंगला होता. आपआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखा! मधूनच त्यानं डोळे उघडले. केविलवाणा हसला. ‘खूप त्रास होतो हो, पेपर वाचून. त्यापेक्षा, हे कानाशी असलं की जगणं तरी सुसह्य़ होतं.’ तो ओशाळवाण्या सुरात म्हणाला, आणि पुन्हा त्याचं मन कानातल्या सुरात रमलं. .. मोबाइलमुळे क्रांती झाली म्हणतात, ते काही खोटं नाही!

Thursday, February 14, 2013

मनाचा पिसारा..!

आज नाथाला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. आळोखेपिळोखे देत तो बेडवरून उतरला आणि ब्रश करून गॅलरीत जाऊन उभा राहिला. ही त्याची नेहमीची सवय. नाथानं बाहेर बघितलं. रोजचचं दृश्य. समोरच्या बदामाच्या झाडावर कावळ्यांचे थवे कलकलाट करत होते. नाथाची नजर बदामाच्या झाडावर स्थिरावली. आणि त्याला धक्का बसला. .. .. हे झाडसुद्धा नाथाच्या डोळ्यादेखतच लहानाचं मोठं झालं होतं.. त्याच्यावर लगडलेली बदामाची फळं मटकावायला पोपटांचे थवे दिवसभर मुक्काम ठोकून असायचे. 'आपल्याला हे आजच का आठवलं?' नाथा बुचकळ्यात पडला. त्यानं नीट झाडाकडे बघितलं. आत्ता बदामाचा सीझन असायला हवा होता, असं त्याला वाटून गेलं. मग त्याला आणखी एक गोष्ट जाणवली, आणि तो बेचैन झाला. बदामाच्या झाडाची पानं लालसर व्हायला लागली होती. पानं पिकली होती. त्यानं जमिनीवर बघितलं. गुलाबी, सुकल्या पानांचा खच पडला होता. वाऱ्याचा एक झोत आला, आणि झाड शहारलं.. झाडावरची उरलीसुरली गुलाबी पानं जमिनीवर झेपावली. नाथानं आणखी निरखून झाडाकडे बघितलं. फांदीच्या टोकाला कोवळे, हिरवे कोंब फुटलेले दिसत होते. 'म्हणजे, झाड पुन्हा बहरणार'.. नाथा स्वतशीच म्हणाला.. तेवढय़ात मागे टेबलावर कपबशीचा खण्णकन आवाज झाला. नाथा दचकून मागे वळला. त्याला हसू आलं. चहाचा घोट घेत त्यानं समोरचा पेपर उघडला. पहिल्याच पानावरचा गुलाबी रंगातला भलामोठ्ठा बदाम पाहून नाथाला आठवलं. आज व्हॅलेंटाईन डे!!..नाथानं पुन्हा बदामाच्या झाडाकडे बघितलं. मघाशी केविलवाणं दिसणारं ते झाड नाथाला आता वेगळंच वाटलं. त्यानं स्वयंपाकघरात बघितलं. बायको चोरून आपल्याकडेच पाहातेय, असं त्याला वाटलं. मग चहाचा कप हातात घेऊन तोच आत गेला, तेव्हा नाथाच्या नजरेत खूप जुना, 'तेव्हा'चा खटय़ाळपणा उमटला होता. नाथाला आठवलं.. सकाळी ऑफिसला जाताना ती नेहमी स्टॉपवर दिसायची. बसची वाट पाहात. एकदा आपल्यालाच खूप उशीर झाला, तेव्हाही ती बसची वाट पाहातच होती. आपण शेजारून गेलो, तेव्हा तिनंच शेवटी अंगठा वर केला. मग आपण स्कूटर थांबवली, आणि ती मागं बसली. नेमंकं वाटेतच पेट्रोल संपलं. थोडं ढकलत गाडी पंपापर्यंत नेली. पंपावर जाईपर्यंत आपण घामाघूम झालो होतो. गाडी स्टँडला लावली, आणि हेल्मेट काढून टकलावरचा घाम पुसत आपण तिच्याकडे पाहिलं. ..तिचे डोळे आपल्या टकलाकडे लागले होते. रांगेत उभं राहून बराच वेळ गेला. ती अस्वस्थ.. शेवटी, घडय़ाळाकडे पाहात ती म्हणाली, 'अंकल, मी जाते.. थँक्यू, पण उशीर होतोय खूप.'तिच्या खळाळत्या सुरात खटय़ाळपणा भरला होता. ओशाळून आपण पटकन हेल्मेट डोक्यावर घातलं, पण सगळं संपलं, असं तेव्हा वाटलंच होतं.. .. हे सारं आठवून नाथानं बायकोकडे बघितलं, आणि टकलावरून हात फिरवत तो हसला. बायकोनंही त्याच्याकडे बघितलं, आणि ती खुशीत हसली.. 'अंकल, उठा.. आज सुट्टी नाहीये'.. ती म्हणाली. नाथाला खटय़ाळपणाची चांगलीच लहर आली होती. पण त्यानं मन आवरलं. .. कारण तिथे पिसारा फुलला होता!!