Sunday, December 19, 2021

'उंच' आणि 'मोठा'!

 मला डोंगर, पर्वत आवडतात. लहानपणी, तरुणपणी आमच्या गावाच्या आसपासच्या कित्येक डोंगरांवर मी पायपीट केली आहे. ते नुसते डोंगर नाहीत. पर्वत आहेत. एका बाजूला निळाशार, अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारा पर्वत. कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी आणि दऱ्याखोरी पायाखालून घालत पार शिखर गाठलं, की खाली चारही बाजूंना दिसणाऱ्या घनदाट जंगलातून जमिनीचा तांबडा तुकडा शोधावा लागायचा तेव्हा! ज्या जमिनीवरून चालताना डोक्यावरचं जे झाड महावृक्ष वाटायचं, ते झाड पर्वताच्या शिखरावरून न्याहाळताना हिरवळीतल्या गवताच्या पात्याएवढं दिसलं की उगीचच, शिखरावर उभे राहिलेले आपण खूप ग्रेट, भारी वगैरे आहोत असं वाटायला लागायचं, आणि पर्वत उतरून पाय रोजच्या जमिनीवर आले की मन भानावर यायचं. म्हणून, मला पर्वताच्या शिखरांवर चढायचा कंटाळा यायला लागला. मग मी पर्वताचे पायथे शोधू लागलो. आख्ख्या पर्वतावरून रोरावत उतरत, दगडाधोंड्यांवर वेड्यागत आदळत, धसमुसळेपणा करत पायथ्याकडे झेपावण्याचं वेड प्रपातांना का असतं ते उमगू लागलं.

कारण, पर्वताचा भव्यपणा पायथ्यावरूनच जाणवतो. शिखरावर उभं राहून खालच कस्पटासमान दिसणारं दृश्य न्याहाळताना, आपणास आपलं वाटणारं आभासी मोठेपण पायथ्यावर उभे राहून मान वर करताच गळून पडतं, आणि भव्यतेच्या पायाशी उभे राहिल्याने, आपण किती ‘कस्पट’ आहोत हे लक्षात येतं.आमच्या देवरुखजवळ बामणोली, मार्लेश्वर, अशा जागी गेलं, की भिंतीसारखे सरळसोट, आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे काळे पहाडी कडे आपल्याला आपली ओळख करून देतात, आणि या व्यापक विश्वातल्या किड्यामुंगीएवढीच आपली उंची आहे याची जाणीव जिवंत होऊन त्या पर्वतापुढे विनम्रपणे मान झुकते.

… म्हणून मला पर्वत आवडतात!!
Vijayk

Saturday, December 18, 2021

वाईन स्टेट...

 कोणत्याही नव्या गोष्टींची लोकांना सवय किंवा चटक लावायची असेल, तर अगोदर त्याचे इतर सर्व पर्याय नष्ट केले पाहिजेत. काही वेळा ही नवी गोष्ट कॉम्प्लिमेंटरी म्हणून घरोघरी मोफत वाटली पाहिजे, ती वापरण्याचे किंवा अनुभवण्याचे फायदे लोकांना सांगितले पाहिजेत. (आजच आमच्याकडे बिग बास्केट किंवा अशाच काहीतरी मार्केटिंगवालांचा प्रतिनिधी सर्वे करून गेला. जाताना त्यानेही मसाला छासचे ५० मिलिचे टेट्रापॅक फुकट दिले!) तर, असे करावे लागते. वर्तमानपत्रेही खप वगैरे वाढविण्यासाठी स्कीमबीम राबवतात. पूर्वी, म्हणजे कदाचित शंभरएक वरिषांपूर्वी, आपल्या आधीच्या पिढ्याही दूध वगैरे प्यायच्या. उन्हाबिन्हातून पायपीट करून घरी आलेल्याचे स्वागत माठातल्या थंड, लोणीदार ताकाने व्हायचे. चहा आला आणि त्याने या प्रथा व्यवस्थित मोडीत काढायला सुरुवात केली. चारपाच दशकांपूर्वी आमचे एक परिचित ब्रुक बॉंडचे एजंट होते, ते घरोघरी चहाची नवी सॅम्पल म्हणून जुन्याच चहाच्या नव्या पुड्या मोफत वाटायचे. वर्तमानपत्राच्या स्कीमचा एक उद्देश असतो. स्कीममधून दहा जणांनी पेपर सुरू केला तर स्कीम संपताना त्यापैकी चारपाच जण पेपर रिटेन करतात. त्या चहाच्या मोफत सॅम्पलचाही तसाच उद्देश असायचा. दहा घरांत सॅम्पल वाटली तर दोनतीन घरांतून पाव किलो, अर्धा किलो वगैरेची ऑर्डर मिळायची. अशा तऱ्हेने त्या एजंटाने चहाच्या विक्री व्यवसायात जम बसविला होता.

तर सांगायचा मुद्दा हा, की आता जर सरकारला लोकांनी घरोघरी वाईन प्यावी असे वाटत असेल तर फक्त किराणा दुकांनात ती विकायला परवानगी देणे पुरेसे नाही. जसे दुध आणि ताकाला चहाचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच धोरण आखून वाईनची सवय लावावी लागेल. कदाचित वेगवेगळ्या ब्रॅंडसना आपली प्रॉडक्ट सॅम्पल्स वाटावी लागतील, सरकारला वाईन खरेदीसाठी प्रसंगी सबसिडी द्यावी लागेल आणि सरकारी कार्यालयांत वगैरे चहा देण्याऐवजी वाईन ऑफर करण्याचा फतवाही काढावा लागेल. फूटपाथवर आणि खाऊ गल्ल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या चहाच्या टपऱ्या चालविणाऱ्या महाराजांना चहा विकणे सक्तीने बंद करून वाईन विक्रीची मुभा द्यावी लागेल. आणि मुख्य म्हणजे, शाळा महाविद्यालयांच्या कॅन्टीन्समधून चहा हद्दपार करून वाईन वाटायची योजना आखावी लागेल.
वाईनची लोकप्रियता वाढवली पाहिजे असे आपल्या राज्यातल्या एका जाणत्या नेत्याचे दहा वर्षांपासूनचे स्वप्न होते.
आता नवे सरकार त्यासाठी जोरदार पुढाकार घेत असताना जनतेने मागे राहणे चांगले नाही!
आपण वाईन कॅपिटल स्टेट ऑफ इंडिया म्हणून नावही कमावू शकतो. आपली ती क्षमता आहे याची खात्री बाळगा!

Thursday, December 16, 2021

विकासाचा अनुशेष

 समाजाचा मानसिक विकास असा शब्द दिसला की मनात वेगवेगळे विचार येतात. मुळात विकास म्हटले की आपल्या नजरेसमोर रस्ते, वीज, पाणी, धऱणे, उड्डाण पूल, रेल्वे, कारखाने आणि रोजगार देणाऱ्या यंत्रणांची निर्मिती असे सर्वसाधारण चित्र असताना, मानसिक विकासाच्या अंगाने विचार करणे हे मने जिवंत आणि सक्रिय असण्याचे लक्षण आहे असा विचार मनात येतो. काल काशी विश्वेश्वरधाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण ऐकत मी खिडकीत बसलो होतो. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक नाला आहे. कधीकाळी ती नदी, खाडी असावी एवढे ऐसपैस पात्र आहे त्याचे. आम्ही या घरात राहायला आलो, तेव्हा ती वाहती नदीच होती. थंडीच्या दिवसांत पहाटे त्या पात्रातील पाण्यावर वाफांची वर्तुळे नृत्य करायची, आणि काठावर ध्यान करून बसलेले बगळे अचानक पाण्यात चोची बुडवून एखादा मासा गट्टम करायची. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिल्यावर दिसणाऱ्या या दृश्याला भुलून आम्ही हे घर घेतलं, तेव्हा भविष्याची जरादेखील शंका मनात डोकावली नव्हती. आता त्या नाल्यातून रसायनमिश्रित काळे पाणी वाहते. आता काठावर बगळे नाहीत, कावळे कलकलाट करत असतात. भरतीची वेळ सोडली, तर त्या नाल्यातलं ते प्रदूषित रसायन एकाच जागी संथ साचल्यागत स्वस्थ असतं. कधीतरी एखादा डंपर येतो, आणि त्या काळ्या पाण्यात ट्रकभर कचरा ओतला जातो. कुणीतरी रस्त्यावरून जाताजाता पुलावर थांबून कचरा किंवा टाकाऊ वस्तूंनी भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकतं.  त्या संथ साचलेपणात थोडीशी खळबळ माजते. काही क्षण नाला ढवळला जातो, आणि पुन्हा साचलेलं काळं पाणी संथ होऊ लागतं. कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे ढिगारे माजले की, ते काळं पाणी संकोचून काठाकडचा कोपऱ्यात जमा होऊ लागतं, तोवर पावसाळ्याची चाहूल सुरू होते. मग महापालिका नालेसफाई वगैरे कार्यक्रम हाती घेते आणि मोठमोठी पोकलेनसारखी यंत्रे काठावर धडधडू लागता. काळं पाणी ढवळून निघतं. आधी टाकलेला कचरा उचलण्याचा कार्यक्रम घाईघाईने पार पाडून गाड्या निघून जातात, आणि काळं पाणी उरलेला कचरा कवटाळत पुन्हा जागच्या जागी साचून स्वस्थ बसतं.

पंतप्रधानांचं भाषण ऐकताना खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या नाल्यात साचलेल्या काळ्या पाण्यावर पडली. आता पाण्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी राहिलेले नाहीत. त्यामध्ये मासा शोधूनही सापडणार नाही, पण त्याच्या तेलकट तवंगावर किडे वळवळताना दिसतात. उन्हाची किरणं त्या तवंगावर पडली, की वळवळणाऱ्या किड्यांच्या हालचालींनी नाला अस्वस्थ चुळबुळताना दिसतो. कदाचित त्यातल्या रसायनालादेखील एकाच जागी साचल्याचा कंटाळा येत असावा...  

पंतप्रधाधानांच्या भाषणातील स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख कानावर पडला, तेव्हा मी किड्यांच्या वळवळण्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या काळ्या डबक्याकडे पाहात होतो. मला अलीकडे ते पाहताना आनंद वगैरे होत नाही. आता तो नाला पुन्हा पहिल्यासारखा नदी होऊन नितळ पाण्याने वाहू लागणार नाही, याची मला पुरती खात्री असल्याने, नाल्याचे वास्तव मी मान्य केले आहे. नदीचा नाला होऊन पाण्याची जागा रसायनमिश्रित द्रवपदार्थांनी घेतली हा त्या नाल्याचा नव्हे, तर माणसाचाच दोष आहे, हे माहीत असूनही आपल्याला लाज का वाटली नाही असा विचारही मनात आला. त्याच वेळी स्वच्छ भारत मोहिमेचे काहीसे हसू देखील आले. स्वच्छता हा कोट्यवधी रुपये खर्चाचा सरकारी कार्यक्रम करावा लागतो, हा मानसिक विकासाच्या अनुशेषाचाच परिणाम आहे, हेही जाणवले, आणि विचार करत करत मन मागे गेले.

मुंबईच्या मध्यावरून मिठी नदी वाहते. तिला अजूनही नदी म्हणत असले, तरी तो आता असाच एक नाला  आहे. रसायनमिश्रित द्रवपदार्थ, कचरा आणि टाकाऊ म्हणून नकोसे झालेल्या झालेल्या असंख्य वस्तू पोटात घेणारे ते हक्काचे ठिकाण झाले आहे. मागे काही महिन्यांपूर्वी, मुंबईत वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणीवसुली प्रकरणी कारवाई सुरू झाल्यावर तर, या मिठीच्या पोटातून संगणक आणि महत्वाची माहिती असलेल्या हार्ड डिस्कस् देखील बाहेर काढल्या गेल्या होत्या. असंख्य गुन्ह्यांचे पुरावेदेखी या नाल्याच्या पोटात गडप झाले असल्याची वदंता आहे. तरीही पश्चिम उपनगरांतील अनेकजण उपनगरी गाड्यांतून येजा करताना सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य वगैरे वस्तू गाडी पुलावर आली की भक्तिभावाने मिठी नदीत फेकतात, आणि नमस्कारही करतात. हेही मानसिकतेचेच एक रूप असते.

ते भाषण ऐकताना, स्वच्छ भारताच्या मुद्द्यापाठोपाठ मनात साचलेली ही काही दृश्ये जिवंत झाली, आणि स्वच्छता हे मानसिक विकासाचे पहिले लक्षण आहे, असा निष्कर्ष मी काढला. आजकाल मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी, रस्त्याकडेच्या भिंतींवर देवतांच्या वगैरे प्रतिमा रंगविल्या जातात. देवादिकांचे फोटोही लावले जातात. त्यांच्यासमोर कचरा वगैरे फेकण्याएवढा बेमुर्वतपणा माणसाच्या अंगी सरसकटपणे नसतो, असा त्यामागचा विचार असावा. पण स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या एखाद्या होर्डींगच्या खालीच कचरापट्टी झालेलीही इथे पाहायला मिळते.

मानसिक विकासाचा अनुशेष भरून काढायला आपल्याला किती वर्षे लागणार, या विचाराने मनात काहूर माजते. पंतप्रधान मात्र, आपल्या प्रत्येक भाषणात स्वच्छ भारताचा मंत्र देतच असतात...


Thursday, December 9, 2021

भाव गिर गया...

   हे एक दृश्य आता किती काळ छळणार?

माहीत नाही!…
“भाव गिर गया, भाव गिर गया” असं ओरडत त्याने पिंजऱ्यात हात घातला.
एक कोंबडी पकडली.
तिचा कलकलाट आसपास घुमला…
पायावरच्या पंज्याच्या पकडीतून सुटण्यासाठी तिने
पंखांची
निष्फळ फडफडही केली.
ती ओरडतच होती.
त्याने बाजूच्याच एका प्लास्टिकच्या टबावर तिला धरले,
आणि
उजवा पंजा तिच्या मानेभोवती पिरगाळला गेला.
क्षणात ती फडफड, तो कलकलाट शांत, मृत झाला…
फटाफट कातडीवरची पिसं काढून
क्षणापूर्वीचा तो जिवंत जीव
निर्जीवपणे समोरच्या तारेवर टांगून
तो पुन्हा कर्कश्शपणे ओरडला,
“भाव गिर गया!”….
समोर दोनचारजण नोटा हातात धरून उभेच होते!!!




Thursday, December 2, 2021

आठवण

वळच चक्कर मारून येण्यासाठी बाहेर पडलो, पायात चप्पल अडकवली. जिन्याच्या दोनतीन पायऱ्या उतरल्यावर थबकलो.

मास्क लावायला विसरलो होतो.

पुन्हा मागे आलो.
कपाटातला स्वच्छ धुतलेला मास्क काढला…
… आणि त्या क्षणी थबकलो.
मास्क हातातच होता.
मिनिटभर मास्क पाहात राहिलो, आणि मन सुन्न झालं.
मग बाहेर जायचा बेत रहित केला.
कपाटात जेवढे मास्क होते ते सगळे एकत्र केले.
ते पांढरेस्वच्छ, कापडाचे मास्कही मला उगीचच विमनस्क वाटले.
गेल्या वर्षी, मे महिन्यात या मास्कस् चं एक पार्सल टपालाने घरी आलं होतं. तेव्हा ती वरोऱ्याच्या सरकारी रुग्णालयात करोनायोद्धा म्हणून दाखल झाली होती. एकएक जीव संकटातून बाहेर काढण्यासाठी, वाचवण्यासाठी जिवावर उदार होऊन करोनाला थोपविण्यासाठी आघाडी सांभाळत होती.
तेव्हा मी बाजारातले मास्क वापरायचं बंद केलं, आणि तेव्हापासून बाहेर पडताना एक मास्क खिशात आणि एक मुखावर घेऊन वावरत राहिलो.
प्रत्येक वेळीच, मास्क तोंडावर बांधताना तिची आठवण यायची. पुढे पाचसहा महिन्यांनी त्या आठवणींचे कढ येऊ लागले.
आनंदवनातील रुग्णांना त्या केरोनाकाळात तिने स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्णतेचे अनेक धडे दिले होते.
प्रचंड प्रमाणावर मास्कनिर्मिती हा त्यातलाच एक उपक्रम होता. तिथे तयार झालेले हजारो मास्क गावोगावी रवाना झाले होते.

असंख्य स्त्रीपुरुषांना, मुलांना या मास्कमुळे करोनापासून संरक्षक कवच मिळाले होते.
असंच एकदा व्हॉटसअपवर तिचा मेसेज आला, ‘पत्ता पाठवा!’
मी पाठवला.
पुढच्या आठवडाभरात माझ्या पत्त्यावरही ते मास्क दाखल झाले.
रोज ते वापरताना ती आठवायची.
आज तेच झालं, आणि नकळत एक विषण्ण सुस्कारा बाहेर पडला.
मुंबईत आली की ती खूपदा गप्पा मारायला, भेटायला लोकसत्ताच्या ऑफिसमधे यायची.
एकदा तर वेळ होता म्हणून तिने आमच्या मुंबईच्या टीमबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, आणि मोकळं बोलायला मिळालं म्हणून मनापासून खुश झाली…
कितीतरी गप्पांमध्ये तिने आनंदवनात फुलवलेलं आनंदवन, तिचे ते वैशिष्ट्यपूर्ण जंगल, तिथले प्रकल्प, नव्या योजना… सांगताना तिचा उत्साह ओसंडून जायचा!
नंतर कधीतरी, काहीतरी निशब्द असा एक उद्विग्न मेसेज आला. एका बातमीमुळे ती खूप दुखावली होती.
रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला, वर्तमानपत्रे टाकून शिक्षण केले, वार लावून जेवत परिस्थितीवर मात केली, गरीबीशी झगडत मोठा झाला... असे काही प्रकार एखाद्याच्या मोठेपणाला झालर लावतात. असे करत मोठी झालेल्यांना समाज अधिक आदर देतो, ही जुनीच प्रथा आहे. कुणीच मोठी व्यक्तिमत्वे यातून बचावलेली नाहीत.
उलट, महान माणसांच्या पूर्वायुष्याकडून समाजाच्या याच जणू अपेक्षा असाव्यात इतका हा प्रकार मानसिकतेत भिनलेला आहे, ते योग्य नसले तरी पुसून टाकणे सोपे नाही असे वाटते.
पुढे काही दिवसांनी, ती गेल्याचीच बातमी झाली!
आज सकाळी कुणा मित्राच्या वॉलवर तिची आठवण जिवंत झाली.
आत्ता मास्क हाती घेतला, आणि तिचा बोलका, हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला.
मग डोळे भरत गेले, आणि तो चेहरा धूसर धूसर होत, गडप झाला.
एक वर्ष उलटलंय.
शीतल करजगी-आमटे आता आपल्यात नाही.