Sunday, May 14, 2023

माझी आई....

 चौदा वर्षांपूर्वी, ६ डिसेंबर २००८ या दिवशी आमच्या आईने निरोप घेतला, आणि वडिलांच्या- दादांच्या- पाठोपाठ चार वर्षांनी तिनेही अज्ञाताचा प्रवास सुरू केला...

त्या दिवशीच्या या क्षणाची आठवण काळजात एक कळ उमटवून गेली...
... आणि ‘आई शोधताना’, तो, जुना लेख समोरही आला!
***
आई...
तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहात होते. “आम्हालाही वापर..” म्हणत!
पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं.
आज, या क्षणालाही तसंच वाटतंय.
पण तरीही ठरवलं.
डोळे मिटून लिहायचं.
जमेल, आठवेल, सुचेल तसं लिहीत जायचं.
आणि शब्द संपले, की त्या क्षणी, तिथे थांबायचं.
तसंही, यावर लिहिताना, भल्याभल्यांना शब्द सापडत नाहीत. मग, आपलीही तशीच अवस्था झाली, तर शरमायचं काहीच कारण नाही.
असा विचार केला, आणि धीर आला.
बसलो लिहायला....

------
“या घरात मनाला खूप शांति वाटते... इथे बनविलेल्या साध्या पदार्थालाही वेगळीच चव लागते...” काल दुपारी जेवताना वीणा, माझी बायको बोलून गेली, आणि माझं मन खूप मागे गेलं.
“एखादी वास्तू, आपल्या मनात उमटणाऱ्या भावनांनाही तथास्तु म्हणत असते”, असं आई म्हणायची.
ते वाक्य अचानक कानात घुमलं.
‘हा या वास्तूचा परिणाम आहे... इथे वावरणाऱ्या ऊर्जेचा हा प्रभाव आहे... या वास्तूत आईदादांच्या पाऊलखुणा आहेत...’ मी तिला म्हणालो.
आम्ही वास्तुशास्त्र वगैरे फारसं मानत नाही. (एका दक्षिणमुखी घरातही आम्ही चारपाच वर्षं आनंदाने राहिलोय!) पण घरातला पसारा आवरला, सगळ्या वस्तू घासूनपुसून जागच्या जागी ठेवल्या, म्हणजे, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते, हा साधा अनुभव सगळ्यांसारखाच आम्हीही सहजपणे घेत असतो.
बऱ्याचदा, शनिवार-रविवारी आम्ही दोघं अंधेरीच्या घरी जायचो.
घर स्वच्छ करायचं, केरकचरा काढायचा, फरशा पुसायच्या, आणि एक मुक्काम करून पुन्हा बोरीवलीला परतायचं... असं अधूनमधून करतो.
तसं त्या दिवशी अंधेरीला आलो.
आल्याआल्या कामालाही लागलो.
फरशी पुसायला घेतली, आणि मला आईची आठवण आली.
दहा वर्षांपूर्वी आई गेली. दादांसोबत नव्या, आपल्याला माहीत नसलेल्या जगात, नवं आयुष्य जगायला...
दादा -माझे वडील-गेल्यानंतर चार वर्षं ती याच घरात राहायची.
आम्ही समोरच, रस्त्यापलीकडच्या बिल्डींगमध्ये राहायचो.
दररोज रात्री माझ्या मुलींपैकी कुणीतरी इथे यायचं. आजीच्या सोबतीला. झोपायला.
सकाळी मी यायचो. केरकचरा काढायचा, फरशा पुसायच्या...
आईला सारं स्वच्छ, टापटीप लागायचं.
एखाद्या दिवशी मी फरशी पुसली नाही, तरी घर फरशी पुसल्याविना राहायचं नाही. ती पुसायची. ते नको, म्हणून मी शक्यतो ते काम टाळायचो नाही.
.....
तशीच त्या दिवशी फरशी पुसायला घेतली, आणि अचानक आठवणींचा एक कढ मनात दाटून आला.
आई आत, बेडरूममध्ये आहे, असं उगीचच तीव्रपणे वाटून गेलं.
नंतर दिवसभर, त्या घरात वावरताना, आई आसपास आहे, असंच वाटत होतं.
इतक्या वर्षांत असं कधी झालं नव्हतं.
बोरीवलीला घरातल्या भिंतीवर एका बाजूला आईचा फोटो आहे. दररोज क्षणाक्षणाला तो फोटोतला चेहरा आईच्या असंख्य आठवणी जागवतो.
पण आई आसपास असल्याचा तो भास मात्र, कधीच झाला नव्हता.
म्हणून तर, इतक्या वर्षांत जे धाडस जमलंच नव्हतं, ते करायचं ठरवलं.
आईसंबंधी लिहायचं...
------
मग, मला माझ्या लहानपणापासूनची माझ्या आईची असंख्य रूपं आठवू लागली.
तरीही, लिहिताना हात अडखळतायतच!
प्रत्येकाचीच आई असते. तशीच माझी, आम्हा सहा भावंडांची आई.
या क्षणी, नजरेसमोरून भूतकाळाचा विस्कळीत पट सरकतो आहे. म्हणून मीसुद्धा, स्वतःला वर्तमानकाळातून मागे नेलंय.
आत्ता आपण या क्षणाचे नाही, असं स्वतःला बजावलं, आणि माझी नजर दरवाज्याकडे गेली.
...
समोर आई उभी आहे.
पाणावल्या डोळ्यांची.... हुंदका आवरणारी... मागे दादाही आहेत, तेही गदगदलेत... आम्ही सारे एका बाजूला उभे आहोत.
एकमेकांच्या मनातले कढ सावरत.
टॅक्सी आली, आणि मी एकेक बॅग खाली नेऊ लागलो. रमेशनं वाकून आईदादांना नमस्कार केला, आणि अनावर झालेले हुंदके फुटले.
आईनं चमचाभर दही रमेशच्या हातावर ठेवलं, आणि त्याला कुरवाळलं...
रमेशही गदगदून गेला. सगळी वास्तूच जणू गदगदली होती.
आपण कितीही खंबीर वगैरे समजत असलो, तरी एखादा क्षण असा येतोच. सारा कणखरपणा पुरता गळून पडतो. भावनांचा आवेग अनावर होतो, आणि स्वतःला खंबीर भासविण्याचे नकली प्रयत्न पार फसून जातात.
त्या क्षणी तसेच झाले होते.
रमेश पहिल्यांदा, अमेरिकेत जाण्यासाठी मुंबईतून निघाला, त्या रात्रीचा हा प्रसंग...
रमेश खाली उतरला.
----------
मी डोळे पुसून दरवाजाकडे पाहिलं.
पाठमोरी आई...
ती किचनकडे वळली. तिची पावलं जड झाली होती.
लहानपणी, मला संगमनेरहून आजोळी, साखरप्याला सुट्टीला पाठवतानाही तिचं असंच व्हायचं. पंधरावीस दिवसांसाठी आजोळी जायला मिळणार याचा आम्हाला एवढा आनंद होत असताना, ही रडते का, असं वाटायचं, तेव्हा आमच्या डोळ्यात पाण्याचं टिपूसही नसायचं. उलट, तिच्या रडण्याचीच गंमत वाटायची.
रमेश अमेरिकेला निघाला तेव्हा त्या अश्रूंचा अर्थ समजला.
त्याआधीच्या कितीतरी प्रसंगांत आई, वेगवेगळ्या अंगांनी उलगडतच होती, तरीही ती उमगणं, अवघडच आहे, हेही जाणवत होतं...
बहिणींची लग्न झाली, रमेश अमेरिकेला गेला, आणि मी मुंबईत आलो. संगमनेर-देवरूखचा संसार गुंडाळून उतारवयात आईदादा मुंबईला आमच्यासोबत आले.
तोवर दोघंही कधी मुंबईतही आले नव्हते. सगळं जगच नवीन.
गावाकडे रात्री आठ साडेआठ वाजता दिवस संपून चिडीचूप व्हायचं.
इथे मध्यरात्रीपर्यंतच्या दिवसाशी जुळवून घेताना, दोघांची जाम तारांबळ व्हायची.
तिकडे, संध्याकाळी साडेपाच सहा वाजता सगळी नोकरदार माणसं घरी परतलेली असायची.
इकडे मला घरी परतायला रात्रीचे अकरा, बारा, कधीकधी आणखीही उशीर व्हायचा...
मग दादांची तळमळ व्हायची.
किचनच्या खिडकीतून समोरचा रस्ता लांबवर दिसतो.
ते खिडकीतून रस्त्याकडे टक लावून उभे असायचे.
आईनं मात्र, माझं उशीरा घरी परतण्याचं रुटीन जमवून घेतलं होतं.
रात्री कितीही उशीर झाला, तरी जेवणाच्या ताटात एक तरी पदार्थ गरम असावा, याची ती काळजी घ्यायची.
रात्री आईला सांगावं असं काहीतरी माझ्याकडे दिवसभरातल्या भटकंतीतून जमा झालेलं असायचंच... ते सांगून झालं, की आमचा दिवस संपायचा. निजानीज व्हायची.
डोळा लागला, की रात्री कधीतरी हलक्या पावलांनी आत येऊन आई माझ्या अंगावर पांघरूण घालायची. मला जाग आलेली असायची. पण झोपेचं सोंग घेणंच मला जास्त आवडायचं.
लग्नाआधीची दोनचार वर्षं या अपरिमित सुखाचा ठेवा माझ्याकडे जमा झाला होता.
कॉलेजात असताना मला टायफॉईड झाला होता.
दिवसागणिक खंगत चाललो होतो. पोटात अन्नाचा कण नाही, आणि गोळ्यांची रिअँक्शन... अंथरुणावर असूनही, अंथरुण सपाट आहे असं वाटावं, इतका मी क्षीणक्षीण झालो होतो.
एका दिवशी डॉक्टरांनी मला तपासलं, आणि त्यांनी निराश होऊन हात हवेत उंचावले.
देवाची प्रार्थना करा... ते जडपणे म्हणाले.
मी अशक्त होतो, पण जाणिवा तल्लख होत्या.
त्या क्षणी मनाला काय वाटलं माहीत नाही, पण त्या वेळी आईनं माझ्या कुडीला घातलेल्या मिठीच्या स्पर्शानं काय वाटलं, ते मात्र आजही आठवलं.
मला देवाघरी जाण्यापासून रोखण्यासाठी आईनं जो काही संघर्ष केला, तेव्हाचं आईचं रूप आत्ता आठवलं.. डोक्यावरून फिरणाऱ्या त्या हाताच्या स्पर्शाची ऊब पुन्हा टवटवीत झाली..
अनेकदा आई अनाकलनीय वाटायची. खूपदा कणखर व्हायची. ती अशी का हे कोडंच वाटायचं.
पुढे आमचा संसार सुरू झाला, मुली मोठ्या होऊ लागल्या, आणि काही प्रसंगांत भावनांना आवर घालावा लागतो, हे आईबाप म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं, तेव्हा ते कोडं उलगडलं.
आईच्या कडवटपणाला, कठोरपणालाही मायेचीच ऊब असते, हे जाणवायला लागलं, आणि कडवट म्हणून मनात साठलेल्या अनुभवांना साखरेचा मुलामा चढला...
दादा गेल्यानंतर आई खूप एकटीएकटी झाली होती. नंतरची चार वर्षं ती अशीच, स्वमग्न राहायची. बहुधा ती अलिप्त होण्याचा प्रयत्न करत होती. ते जाणवायचं.
मग घरी सतत मी, किंवा मुली थांबू लागलो.
माझ्या मुलींच्या जन्मापासून त्यांच्यावर आजीच्या प्रेमाची पाखर घालणारी, त्यांना न्हाऊ-माखू घालणारी, त्यांच्यासाठी गाणी म्हणणारी, त्यांच्यावर कविता रचणारी, मुलींची आजी, अमेरिकेतल्या नातवासाठी- ऋषीसाठी- फोनवर मराठमोळी अंगाई गीते गाताना तल्लीन होणारी आज्जी आणि माझी आई, त्या चार वर्षांत खूपच वेगळी वाटू लागली. तिला एकटं राहणं जास्त पसंत असायचं, असं जाणवू लागलं.
एकदा कधीतरी त्याचा उलगडा झाला.
घरात नसलेल्या दादांशी तिचा संभाषण सुरू असायचं. एकटीच!...
जेवण, दुपारची विश्रांती, लहानसहान घरकाम, सारं काही करताना, दादा आसपास आहेत, असं समजूनच ती घरात वावरायची.
हे जाणवल्यावर काय करावं ते कळेना. तिला त्यामध्ये काहीतरी वेगळं समाधान मिळत असावं, असा विचारही मनात येत होता, पण हे काही मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असंही वाटत होतं.
ती मात्र, मी आसपास असताना, आई म्हणूनच वावरत असायची.
तिच्या अखेरच्या दिवसांत ती खूप आजारी झाली. थायरॉईडचा विकार बळावला. आणि ती खंगत गेली.
त्या काळात मी एका पुस्तकासाठी प्रवास करत होतो. बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी जायला लागायचं.
मग आईची निसटती भेट, निसटतं बोलणं व्हायचं.
पण त्या आजारपणातही, माझं पुस्तकाचं काम कुठवर आलं, नवीन काय लिहिलं, नवीन कोण भेटलं, कसं वाटलं, याची चौकशी आई करायची, म्हणून नवीन शोधायचा हुरूप यायचा...
आज नवीन काय पाहिलं, लिहिलं, ते सांगितल्याशिवाय दिवस संपायचा नाही, ही आमची जुनी सवय होती. आईच्या आजारपणात तिनं ती मुद्दाम जपली.
तिला सांगण्यासाठी तरी, काहीतरी नवीन केलं पाहिजे, असं मला वाटावं, म्हणून...
म्हणून ते पुस्तकही माझ्याकडून लिहून झालं.
--- ****
माझ्या लहानपणापासून, तिच्या अखेरच्या क्षणापर्यंतची संपूर्ण आई मला आत्ता जशीच्या तशी आठवतेय. आत्ता ती बाजूला आहे, एवढा विश्वासही वाटतोय.
पण आख्खं जग वाचता आलं, आणि त्याचं तंतोतंत वर्णन करता आलं, तरी आई शब्दांत बांधता येणारच नाही, असंच वाटतंय.
आईच्या वर्णनासाठी आजवर ज्यांनी ज्यांनी जेवढं लिहिलंय, तेच सारे शब्द उधार घेऊन एकत्र करावेत, असंच वाटतंय.
आपल्याकडे शब्द नाहीत अशी जाणीव याआधी कधीही झाली नव्हती.
आत्ता ती झाली.
उधार घेऊनही शब्द अपुरे ठरावेत, असं जाणवायला लागलं.
आणि, एक लक्षात आलं.
यासाठी एवढं शब्दजंजाळ साठवणुकीचं काही कारणच नाही.
दोनच अक्षरं पुरेत... आई!
आणि, आपण आईविषयी लिहायचंय, म्हणून, त्याआधी आणखी दोन अक्षरं जोडावीत...
‘माझी आई!’
.