Sunday, June 16, 2013

तुम्हाला काय वाटतं?

फेम.. स्टारडम.. सेलिब्रिटी स्टेटस.. हे सगळं मिळावं, आपल्या मुलाभोवती सतत कॅमेऱ्याचा लखलखाट असावा, खोटय़ाखोटय़ा अभिनयात हरवलेली त्याची कोवळी, निरागस छबी दररोज कुठे ना कुठे झळकलीच पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?


हे सगळं मिळविण्यासाठी तुमचं मूल सज्ज आहे?.. म्हणजे, हे सगळं मिळावं यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला तसं घडवत आहात?

मग वाट पाहू नका.. तुमच्या मुलासाठी या सगळ्या संधी अगदी दरवाज्याशी येऊन खोळंबल्या आहेत. फक्त एक करा. बालकांमधील तारे-तारका शोधणाऱ्या स्पर्धेत तुमच्याही मुलाचं नाव घाला आणि निकालाकडे लक्ष द्या.. कदाचित ती सुवर्णमाळ तुमच्याच मुलाच्या गळ्यात पडेल’..

हे जणू ठरलेलंच आहे!

..खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि भरपूर अभ्यास करून भविष्यातील आयुष्य घडविण्याच्या आपल्या चिमुकल्याच्या बालपणातच सेलिब्रिटी घडविण्यासाठी धडपडणाऱ्या आणि पैशाच्या राशींची स्वप्ने पाहणाऱ्या आईबापांना भुरळ घालणारं एक ताजंताजं स्वप्न अलीकडेच अवतरलं आहे.. एका बडय़ा व्यापारसमूहाच्या जाहिरातीतून हे स्वप्न घरोघर पोहोचलं आहे. नव्या ‘लाइफस्टाइल’ची ‘माया’नगरी या स्वप्नातून आईबापांना खुणावू लागली आहे.

आता आपल्या निरागस मुलाचा, कोवळ्या चिमुरडीचा फोटो जाहिरातीत झळकणार अशी स्वप्ने असंख्य आईबापांना एव्हाना पडू लागली असतील.

इतक्या लहानपणीच प्रसिद्धी, स्टारडम आणि सेलिब्रिटी स्टेटस मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत आपलं मूल मागे पडू नये, म्हणून अनेक आईबापांची धडपड सुरूदेखील झाली असेल. या स्पर्धेत आपलं मूल निवडलं जावं, यासाठी येत्या तीन आठवडय़ांत स्पर्धेच्या संयोजकांकडे मुलांच्या छायाचित्रांचा पाऊस पडेल.. आणि आशाळभूत आईबापांचे स्वप्नाळू डोळे स्पर्धेच्या निकालाकडे लागतील.

आपलं इवलंस, निरागस हसणारं, जगाची पुरती ओळखदेखील न झालेलं आणि व्यवहाराशी काहीही देणंघेणं नसलेलं, जगण्यासाठी केवळ आईबापांच्या आधारावर विश्वस्त असलेलं मूल, आता सेलिब्रिटी झालंच, या समजुतीचे पंख लावून हे आईबाप स्वप्नांच्या दुनियेत भराऱ्या मारू लागतील.

मग स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. पाऊसभर छायाचित्रांतून मोजक्या मुलांची निवड होईल. स्पर्धेत निवड न झालेल्या आईबापांना नैराश्य येईल. आपलं मूल स्टार झालेलं पाहायचं त्यांचं स्वप्न विस्कटून जाईल. कदाचित, मुलाची निवड न झाल्याचा राग ते मुलावरच काढत राहतील..

आणि कदाचित, अशा मुलांना आईबाबांच्या रोषाच्या सावटाखालीच पुढचं आयुष्य ढकलावं लागेल!.. कदाचित, अशा परिस्थितीमुळे आणि आयुष्याचा अर्थ समजण्याआधीच्याच पहिल्याच स्पर्धेत मिळालेल्या अपयशामुळे त्या मुलांचा आत्मविश्वासदेखील हरवून जाईल. आयुष्यातील भविष्याची आव्हानं पेलण्याची उमेदही ते हरवून बसतील..

..जिया खान नावाच्या एका अभिनेत्रीनं, आपला पहिला चित्रपट सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत केला आणि लागोपाठ आमीर खानसोबत. अमिताभ आणि आमीरसोबत काम करणारी अभिनेत्री नंतर किती मोठी सेलिब्रिटी व्हायला हवी, याचे तिचे आडाखे मात्र चुकले. अमिताभ बच्चन, आमीर खान यांना एका भूमिकेतच सेलिब्रिटी स्टेटस, स्टारडम मिळाले नाही, हे समजून घेण्याची उमेदच निराश आयुष्यातून हद्दपार झाली आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षीच, आयुष्याची आव्हानं पेलण्याआधीच अपयशाच्या भावनेनं ती खचून गेली.

जगण्याच्या आव्हानांना घाबरून मरणाला मात्र निर्भयपणे सामोरी जाणारी अनेक कोवळी मुलं अशाच अपयशाच्या, नैराश्याच्या भावनेनं जीवन संपवून टाकताहेत. यश, सेलिब्रिटी स्टेटस, प्रसिद्धी, स्टारडम हे सारं मिळविण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं, तीव्र स्पर्धाना सामोरं जाऊन स्वत:चं अस्तित्व सिद्ध करावं लागतं, आणि त्यासाठी मनातली ईष्र्या जिवंत ठेवावी लागते, याची जाणीवच त्यांच्या आयुष्यातून पुसली गेली असावी. अशी ती एकटी नव्हती. याआधी अनेकांनी आपले आयुष्य अशाच नैराश्यातून या जगातून पुसून टाकली होती. अगदी सहजपणे. असं का घडतं?

आपल्या मनाची घुसमट एका क्षणात संपविण्याचा हाच एकमेव मार्ग आता शिल्लक आहे? एसएमएस, व्हॉटसअप किंवा फेसबुकवर स्टेटस अपडेट सोडले, तर मन मोकळं करण्याचा, संवादाचे सगळे मार्ग संपून गेले आहेत? भांडणं आणि प्रेम, लोभ आणि तिरस्कार, माया-ममता, सारं काही ऑनलाइन झाल्याचा हा परिणाम असेल? जियाच्या आत्महत्येच्या काही दिवस अगोदर एका तरुणानं आत्महत्येआधी जगाचा निरोप घेणारं स्टेटस फेसबुकवर अपडेट केलं.

त्याच दरम्यान, नवरा-बायकोचं ऑनलाइन भांडण सुरू असताना, पलीकडे वेबकॅमवरून पाहणाऱ्या नवऱ्यादेखत एका नैराश्यग्रस्त तरुणीनं आपल्या घरी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं.. या आत्महत्यांनंतर पुन्हा मनोवैज्ञानिक विश्लेषण झाले. संवाद हरवलाय, हाच अंतिम निष्कर्ष ठरला.

अपयश हा जीवनाचा शेवट नाही, हे मुलांच्या मनावर बिंबविणे हाच अशा घटना टाळण्याचा मार्ग आहे, यावरही एकमत झालं. दीर्घकाळ साचलेल्या नैराश्यातून अखेर आत्महत्येचा मार्ग कवटाळला जातो, असा जागतिक पाहणीचा एक निष्कर्ष आहे. अशा नैराश्यग्रस्तांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळतच असतात आणि एखाद्या आत्महत्येची बातमी कानावर पडली, की हा विचार अधिक वेगाने उसळी मारून प्रबळ होतो, असंही या पाहणीत आढळलंय.

अशा क्षणी, विश्वास देणारं, दिलासा देणारं आणि सावरणारं, जवळचं कुणीतरी असावं, या निष्कर्षांसाठी जागतिक पाहणीची गरज नसते. मन मोकळं केलं, की हलकं वाटतं, हा अनुभवसिद्ध उपाय आहे. पण मन मोकळं करण्याच्या वाटाच खुंटल्या असतील तर? ज्यांच्यापाशी हक्कानं, जवळिकीनं मन मोकळं करायचं असतं, त्यांच्याच भयानं नैराश्य वाढत असेल तर?

मग असं टोकाचं पाऊल उचलण्याच्या कृतीला कुणाचा अविचार जबाबदार धरायचा? हातावरली भविष्यरेषा उमटण्याआधीच मुलांचं सेलिब्रिटी भविष्य ठरविण्यासाठी धडपडणाऱ्या, मुलाला फेम आणि स्टारडमच्या झगमगाटात चमकलेलं पाहण्याची स्वप्नं गोंजारणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा.

तुम्हाला काय वाटतं?