Monday, June 22, 2020

पितृदिन



जेव्हाजेव्हा हा लहानसा दगड नजरेसमोर दिसतो, तेव्हा मला दादांची- माझ्या वडिलांची- आठवण होते. जवळपास २० वर्षांहून अधिक काळ हा दगड आम्ही जपून ठेवलाय. तोही, देव्हाऱ्यात. रस्त्यावर असे असंख्य दगड असतात. पण एका दिवशी चालताना दादांची नजर नेमकी या टीचभर दगडावर पडली, आणि त्यांनी तो उचलून कपाळाला लावत निगुतीने शर्टाच्या खिशात ठेवला. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या वेळी आठवणीनं तो बाहेर काढला, स्वच्छ धुतला, आणि पूजा करताना देव्हाऱ्यात ठेवून त्याला गंधही लावलं. या दगडात त्यांना गणपतीचं निराकार रूप दिसलं होतं ... मी फारसा देवभोळा वगैरे नाही. आम्हाला कुणालाच त्यात कधी तसं काही दिसलं नाही, पण दादांनी मात्र भक्तिभावाने त्या दगडाची पुढे रोज पूजा केली. विठोबा रखुमाई आणि पिढ्यापिढ्यांपासून देव्हाऱ्यात असलेल्या देवांच्या मूर्तींप्रमाणे या दगडालाही आंघोळ, गंध, दिवा-नैवेद्य मिळू लागला, आणि दादांच्या भक्तिभावामुळे रस्त्यावरच्या एका दुर्लक्षित, क्षुल्लक दगडाला देवत्व मिळाले.

आज दादा आमच्यात नाहीत. १६ वर्षांपूर्वी त्यांनी अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं. त्यांचा हा निराकार गणपती मात्र, आमच्या देव्हाऱ्यात आहे.
देव म्हणून, आणि दादांची, त्यांच्या भोळ्या, निरागस भक्तिभावाची आठवण म्हणून!
अधूनमधून जेव्हा मी पूजा करतो, देव्हारा साफ करतो आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुन्हा टापटिपीने जागेवर ठेवतो, तेव्हा या दादांनी भक्तिभावाने ‘देव’त्व दिलेल्या या दगडाची मूर्ती हाती असताना मला दादांची तीव्र आठवण येते.
वीसपंचवीस वर्षांपासूनचा देव्हाऱ्यातला हा दगड म्हणजे दादांच्या भक्तीचे अमूर्त रूप आहे.
म्हणून तो पूजेतला देव झालाय.
त्या दिवशी दादांनी त्याला रस्त्यावरून आणून देव्हाऱ्यात बसवला नसता, तर आज तो कुठे गेला असता, कळत नाही.
काही स्पर्श आणि त्यामागील भावनांच्या आधारावर माणसंही वाढतात. मोठी होतात.
आईवडिलांची अशी सावली, तो स्पर्श, ती भावना आधाराला नसती, तर आपणही रस्त्यावरच्या दगडासमान असतो. देवत्व लाभलेल्या त्या दगडाकडे पाहताना मी नकळत स्वत:कडे पाहू लागतो. आपण जे काही असतो, आहोत, ते अशा पितृभावाच्या कृपेमुळेच आहोत, हे स्वत:स बजावतो. त्या सावलीमुळेच
देव्हाऱ्याची लायकी आपल्याला लाभली, ही त्यांची कृपा.
म्हणून तो दगड देव झाला, याची जाणीव जिवंत राहते!

Saturday, May 9, 2020

‘मातृदिन’ आणि ग्रेस’चे स्मरण...



एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा.
... बाजूच्याच एका झाडाखाली एक कोवळं कोकरू बसलेलं त्याला दिसायचं. त्या वाद्याचा ताल कानात साठवत एकाग्र बसलेलं... तो निघाला की जाताना प्रेमानं त्या गोंडस कोकराच्या पाठीवरून हात फिरवायचा, आणि ते कोकरू त्याच्याकडे पाहायचं. डबडबलेल्या डोळ्यांनी!!
हे कोकरू त्याच्यासाठी कोडं होऊ लागलं. रोज न चुकतां झाडाखाली बसून त्या वाद्यातून निघणारा ताल एकाग्रतेने ऐकताना त्याचे डोळे पाण्यानी भरतात, ते आतून गदगदत असतं, हे त्या वादकाला जाणवू लागलं.
आपल्या वादनानं अवघं आसपास आनंदून मोहरत असताना हे कोकरू मात्र कळवळून आतल्या आत आक्रोश करते, या जाणीवेनं वादक अस्वस्थ होऊ लागला...
त्या संध्याकाळीही तो निघाला, नेहमीप्रमाणे कोकराला गोंजारलं, आणि बेचैन सुरात त्यानं त्या कोकराला विचारले, 'माझ्या वाद्याच्या तालाने सारी सृष्टी मोहरत असताना, तू मात्र दु:खानं झुरत असतोस... असं का?'
कोकरानं केविलवाण्या ओल्या नजरेनं वादकाकडे पाहिलं. एक हुंदका घशातूनच मागे परतवला, आणि लांबवर कुठेतरी नजर लावून ते बोलू लागलं...
'तुमची बोटं ज्या वाद्यातून स्वर्गीय सूर उमटवतात, त्या वाद्याचं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही वाजवू लागता तेव्हा उमटणाऱ्या सुरातून मला माझ्या आईचा आवाज एेकू येतो, ती माझ्याशी बोलू लागते, आणि मी आईच्या आठवणीत बुडून तिच्या सहवासाचं सुख शोधू लागतो...'
वादक त्या कोकराच्या प्रत्येक शब्दागणिक अधिकच बेचैन होत होता.
त्यानं पुन्हा ते वाद्य उघडलं, थाप मारली, आणि ताल धरला.
आता फक्त त्या पिल्लासाठी आईचे बोल उमटत होते!!
दोघंही भान विसरले होते.
अचानक वारा वाहू लागला, ढग दाटले आणि अवघं आकाश बरसू लागलं!!

...आई या शब्दातच जादू असते!!

ही कथा दूरदर्शनच्या एका जुन्या मैफिलीत संवादकाने ऐकवली, अन् मला ग्रेस आठवला!
तेही एक कोडंच!
कधी सहज सुटणारं, कधी कधीच न आकळणारं!!

मग ग्रेसच्या लेखणीतून उमटलेले ते शब्दही आठवले, अन् आश्चर्य म्हणजे, त्या छोट्या पडद्यावर त्याच शब्दांना सुरांना साज चढत गेला...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता !

....गाणं संपलं, आणि मला पुढचं, एक अव्यक्त कडवंही आठवलं..

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

... बाहेर पाऊस रिमझिम निनादतच होता!
_________________________________

Friday, May 8, 2020

कुपोषित आरोग्यसेवा!


नर्स हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे, हे या साथीने आज दाखवून दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्याा अहवालानुसार, आज जगभरात नर्सेसची संख्या केवळ दोन कोटी ८० लाख एवढी आहे. आणि प्रत्यक्षात  ६० लाख नर्सेसचा तुटवडा आहे. येत्या दशकभरात यापैकी दहा टक्के नर्सेस सेवानिवृत्त होतील, तेव्हा ही तफावत अधिकच जाणवेल. कारण नव्याने या क्षेत्रात दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच संथ आहे.
विशेष म्हणजे, नर्सिंग हे क्षेत्र महिलांसाठीच असल्याचा जागतिक समज आहे. आज जगभरात या क्षेत्रात ९० टक्के महिलाच आहेत.भारतातही जेमतेम १२ टक्के पुरुष या व्यवसायात आहेत.
या पार्श्वभूमीवर, भारतातील या क्षेत्राची स्थिती काळजी वाटावी अशीच दिसते. १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील परिचारिकांची संख्या केवळ २३ लाख ३६ हजार २०० एवढीच आहे. याचा अर्थ, प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे, १७.३ एवढीच परिचारिकांची संख्या आहे.दर वर्षी देशात सुमारे ३ लाख २३ हजार परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, आणि दहा टक्के परिचारिका निवृत्त होऊन व्यवसायाबाहेर जातात. या हिशेबाने, येत्या दहा वर्षांत भारतात परिचारिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम ३० लाखांपर्यंत वाढलेली असेल, असा अंदाज आहे.
भारताच्या आरोग्य क्षेत्राचे एकूण आकारमान लोकसंख्येच्या प्रमाणात जेमतेमच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या या क्षेत्राच्या एकूण पसाऱ्यापैकी ४७ टक्के आहे, तर वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या जेमतेम २३.३० टक्के आहे. दंतवैद्यकांचे प्रमाण तर केवळ साडेपाच टक्के एवढेच आहे, आणि मिडवाईफ नावाचा प्रकार शोधावाच लागेल अशी स्थिती आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जगासमोरील एक मोठी समस्या अधोरेखित झाली आहे. यापुढे ही समस्या दुर्लक्षित राहिली, तर करोनाव्हायरसने मानवजातीला इशारा देऊनही आपण शहाणपण शिकलो नाही, असे होईल. जगभरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे ही यापुढील काळाची गरज राहील.

नया है वह!

करोनाचे संकट अभूतपूर्व आहे. आजवरच्या पठडीबाज आपत्ती व्यवस्थापन धोरणानुसार आखणी करून यावर मात करणे शक्य नाही. त्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार धोरणे बदलावी लागतात. काल घेतलेला एखादा निर्णय एखाद्या ठिकाणी अधिक कठोर करावा लागतो, एखाद्या ठिकाणी शिथील करावा लागतो, तर एखाद्या ठिकाणी रद्द करावा लागतो. अशा वेळी स्थानिक परिस्थिती व कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांच्या आकलनशक्तीनुसार कमीजास्त बदल होतात. त्याला धरसोड वृत्ती वगैरे म्हणणाऱ्याचा शोध लागलाच, तर सरकारने ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन स्थायी स्वरूपाची निर्दोष आपत्ती निवारण योजना त्याच्याकडून आखून घ्यावी व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही -अधिकार नव्हे, जबाबदारी!- त्याच्यावरच सोपवावी.
आपणा सर्वांना एव्हाना हे माहीत झाले आहेच. की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पक्षसंघटना चालविण्याचा एकहाती अनुभव असला तरी प्रशासनाचा काहीही अनुभव नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांची ‘नया है वह’ अवस्था नेमकी जोखली असून, सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावयाची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार मात्र स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द केल्याने स्थानिक पातळीवर स्थानिक यंत्रणा हेच त्या त्या ठिकाणी सरकार म्हणून काम पाहात आहे. शिवाय, सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीचे निर्णय घेण्याबाबतचे अधिकार सर्वांनाच समान रीतीने दिले असल्याने प्रशासनातील समानतेचा एक वेगळा प्रयत्न सरकार करू पाहात आहे. म्हणजे, समजा, एखादा निर्णय लागू करावयाचा असे समजून महसूल विभागाने तसा फतवा काढला तर पोलीसांना म्हणजे गृहखात्यास तो अयोग्य वाटून स्थानिक पातळीवर तो रद्द करण्याचे अधिकार वापरावेसे त्यांना वाटू लागते. आता यामध्ये पक्षीय राजकारण वगैरे असल्याचा वास विरोधकाना आलाच, तर ते राजकारण करताहेत हे नक्की समजावे. कारण, महसूल खाते काॅंगिरेसकडे तर गृह खाते राष्ट्रवादीकडे असल्याने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले अंमलबजावणीचे अधिकार आपण गमावतां नयेत असे दोघांनाही वाटत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ शकतो. मात्र, अशा कठीण काळात आम्ही राजकारण करणार नाही असे कालच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या व्हिडिओ काॅन्फरन्समधे सांगितले असल्याने बहुधा विरोधक तसे बोलण्याची शक्यता कमी आहे. कालच्या बैठकीस व्हिडिओ काॅन्फरन्स असे का म्हणायचे असा प्रश्नही काहींच्या मनात येऊ शकतो. तर त्याचे रोखठोक उत्तर असे, की विरोधक जरी जातीने मंत्रालयातच हजर झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी स्वत:च्या घरातूनच व्हिडिओ संवाद साधला होता. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. मुख्यमंत्री राज्यातील करोनास्थितीचा आढावा सातत्याने घरूनच घेत असताना, प्रशासकीय यंत्रणांनी दिलेली माहिती व बातम्या, टीव्ही चॅनेल वगैरे हेच त्यांचे माहितीचे स्रोत असल्याने, प्रशासकीय यंत्रणा जी माहिती देणार त्याचाच प्रभाव त्यांच्या निर्णयावर होणार हे सहाजिकच आहे. त्यामुळे, प्रशासनातील ढिसाळपणा किंवा बेबंदशाही वगैरे असेलच, तर त्याचे खापरमुख्यमंत्र्यांवर फोडता येणार नाही. संकटाचे गांभीर्य प्रशासनाने अधिक ओळखले पाहिजे. घरातून माहिती घेऊन त्यानुसार घरात राहूनच त्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा कितीही प्रशासनकुशल नेत्याच्या निर्णयक्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.
म्हणून, महाराष्ट्रात तरोनास्थिती हाताळण्यात अपयश येत असल्याची जर कोणाची भावना असेलच, तर त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर किंवा शासनावर नव्हे, प्रशासनावरच फोडावे लागेल. पण ही राजकारण करण्याची वेळ नाही, याचे भान ठेवावेच लागेल.
विरोधकांनी काल तसा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला आहे, हे त्यांच्या तंबूतील सर्वांनी लक्षात ठेवायला हवे !!

Thursday, May 7, 2020

मोकळ्या वेळाचा समृद्ध पसारा...

आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा काय करत असतो? सध्या करोनामुळे लॉकडाऊन अवस्थेत असलेल्या प्रत्येकासच, आपण सध्या काहीच करत नाही असेच वाटत असले पाहिजे. पण ते तसे नसते. आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हाही आपण काहीतरी करतच असतो. ते म्हणजे, विचार... उलट, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, तेव्हा फक्त तेच काहीतरी करत असतो. पण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा भरपूर काहीतरी करत असतो. काहीच न करण्याच्या काळात एकाच वेळी आपण असंख्य विचार करत असतो. विचारांचे जंजाळ डोक्यात असते. यामध्ये भूतकाळ असतो, वर्तमानकाळ असतो, आणि भविष्यकाळही असतो. त्यात आपण असतो, आसपासची माणसं असतात, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, नद्या, नाले, डोंगर असतात. अशा असंख्य विचारांचा गुंता झाला, की काहीच न करण्याचा वेळ इतका व्यग्र होऊन जातो, की तो सोडवताना त्या सगळ्यातूनच काही ना काही नव्याने दिसायला लागतं. एवढ्या काळापासून हे सारं आपल्या आसपास आहे, तरी याआधी कधीच कसं दिसलं नाही, असं वाटायला लागतं. आपण अचंबित होतो, आणि काहीच न करण्याच्या काळातील विचार करण्याच्या काळामुळे आपल्याला नवं काहीतरी गवसल्याचा आनंदही मिळून जातो.
अलीकडे, बऱ्याच जणांशी फोनवर वगैरे बोलताना, एक गोष्ट समायिक असते. ती म्हणजे, जवळपास सगळ्यांनाच, पहाटे जाग येण्यासाठी पहिल्यासारखा मोबाईलचा अलार्म लावावा लागत नाही. एकच ठरावीक पक्षी, तुमच्या खिडकीच्या अगदी जवळ, अगदी ठरलेल्या वेळी अशी काही मंजुळ शीळ वाजवू लागतो, की त्या जादूई आवाजाने आपल्याला जाग येते. ती नुसती जाग नसते, तर प्रसन्न सकाळ उजाडल्याच्या अनुभवासोबत आलेली ती जाग असते. पूर्वी, जेव्हा अलार्म लावून सकाळी उठावे लागायचे, तेव्हा तो आवाज कानाशी वाडू लागला, की अर्धवट झोपेतही मूड जायचा. साखरझोपेचं खोबरं झालं, असं वाटून वैताग यायचा, आणि तशाच अवस्थेत चाचपडत अलार्म बंद करून लोळत पडावेसे वाटायचे. आता, त्या अलार्मच्या वेळेआधीच बाहेर पक्ष्यांची किलबिल सुरू होते, त्या आवाजने जाग येते, तेव्हा अलार्ममुळे वाटणाऱ्या कटकटीचा लवलेशही मनावर नसतो.
असे झाले, की दिवस नक्की प्रसन्न जातो, आणि काहीच न करण्याच्या वेळेत काहीतरी करण्यासाठी विचारांचे एक मोठ्ठे गाठोडेच आपण अगदी आनंदाने खांद्यावर घेतो.
अशाच, काहीच न करण्याच्या काळात, काही सन्मित्रांच्या फेसबुकवर फेरफटका मारण्याचा मस्त विरंगुळा मला सापडला. तेथूनच, त्यांच्या ब्लॉग्जच्या लिंक सापडल्या, आणि काहीच न करण्याच्या वेळात काहीतरी भरघोस वाचता येईल, असा खजिना सापडल्याचा आनंद झाला. मित्रवर्य प्रवीण बर्दापूरकर, समीर गायकवाड, रमेश झवंर, अशा अनेक दिग्गजांच्या ब्लॉगवर एक तरी चक्कर मारली नाही, तर काहीच न करण्यातला महत्वाचा वेळ वाया गेला असे मला वाटू लागले, आणि ब्लॉगवाचन हा जुना छंद जिवंत झाला.
त्यात मला आठवलं, आपणही एक ब्लॉग जवळपास बारातेरा वर्षाँपासून चालवतच आहोत. मग मी तो जिवंत केला. काहीच न करण्याच्या या कालात आपल्या ब्लॉगला खतपाणी घालायचं ठरवलं, आणि बघता बघता माझा, zulelal.blogspot.com हा ब्लॉग जिवंतच नव्हे, ताजातवानाही झाला.
तुम्हाला देखील, काहीच न करण्याच्या काळात काहीतरी करावेसे वाटत असेल, तर तुमचा जुना ब्लॉग जिवंत करा, नाहीतर नवा ब्लॉग सुरू करा.
त्यात नक्की मजा आहे.

हीच ती वेळ!

महाराष्ट्रात भाजपने सरकार स्थापन केले असते तर आजचे करोनाचे आव्हान त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारएवढ्या कार्यक्षमतेने पेलले असते का?
आज महाराष्ट्र हे कोरोनाच्या फैलावाबाबत देशात एक नंबरचे राज्य ठरले आहे. फडणवीस सरकारची निवडणुकीआधीची ती, ‘सर्वात पुढे आहे, महाराष्ट्र माझा’ ही घोषणा आज आठवावी अशी ही स्थिती! पण असं झालंय, की, ठाकरे सरकार ज्या धैर्याने जनतेशी संवाद साधते, धीर देते, कौतुकाची थाप योद्ध्यांच्या पाठीवर मारते, परप्रांतीयांच्या मदतीसाठी धावून जाते अशा विविध कारणांमुळे दिवसेंदिवस सरकारची लोकप्रियता वाढतच असल्याने, विरोधी पक्षांची जबाबदारी म्हणून विचारावयाचा, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ हा प्रश्न उच्चारणेही फडणवीसांच्या विरोधी पक्षास अवघड झाले आहे.
आपले भविष्य हे राज्याच्या भविष्याशी बांधले गेलेले असते. म्हणजे, एखाद्या कठीण प्रसंगात, राज्याचे जे काही होईल, तेच आपलेही होणार हे नक्की आहे!
आपले सुदैव असे, की जनतेचा अपार विश्वास असलेले सरकार सत्तेवर आहे, आणि ते आपले भविष्य निश्चितच घडवेल याची जनतेला खात्री आहे.
योगायोग म्हणा, किंवा महाराष्ट्राची पुण्याई म्हणा, कठीण प्रसंगात जसे असायला हवे तसेच सरकार महाराष्ट्रास लाभलेले असल्याने, सरकारच्या शिल्पकारांस सलाम केलाच पाहिजे!
हीच ती वेळ आहे!!

Wednesday, May 6, 2020

एक दिलासादायक बातमी-


तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेला इस्राईलने कोरोना विषाणूवर लस बनविल्याचा दावा केला आहे. इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी हा दावा केला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने (आयआयबीआर) कोरोना विषाणूवर अंटीबॉडी विकसित करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती त्यांनी अलीकडेच दिली.
इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी सोमवारी दावा केला की, आयआयबीआर इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्राईलने कोरोना विषाणूची लस विकसित केली आहे. संस्थेने अंटीबॉडी बनवली आहे. आता वॅक्सीनच्या विकासाची पायरी पुर्ण झाली आहे. आता त्याचे पेटंट आणि मोठ्या प्रमाणात निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.
आयआयबीआर ही इस्रायलमधील अत्यंत गुप्त संस्था आहे. बाहेरील जगाला येथे केलेल्या प्रयोगांविषयी फारशी माहिती मिळत नाही. पण नेस जिओना भागात असलेल्या या प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर नैफताली बेन्नेट यांनी जगभरातील लोकांना लस शोधल्याची बातमी दिली. टाइम्स ऑफ इस्राईलच्या वेबसाईटसह अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
नैफताली बेन्नेट यांनी सांगितले की, ही अँटीबॉडी मोनोक्‍लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करते. त्यामुळे कोरोनाचा विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये किंवा दुसर्‍या व्यक्तींमध्ये पसरत नाही.
इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या लॅबने आता ही लस पेटंट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर हे मोठ्या प्रमाणात तयार केले जाईल जेणेकरुन जगभरातील लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
बेन्नेट यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांशी बोलू. या लसीची मानवी चाचणी झाली आहे की नाही याबाबत बेन्नेट यांनी माहिती दिली नाही.

Tuesday, May 5, 2020

करोनोत्तर काळ!

सुमारे पस्तीस वर्षांच्या ॲान फील्ड पत्रकारितेनंतर महिनाभरापूर्वी, मार्चमध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर ‘किमान गरजे’पुरते हातपाय हलवून थोडी कमाई करावी व विचाराची सवय लागलेल्या मेंदूला गंज येऊ नये यासाठी मुक्त पत्रकारिता, लेखन, संपादन, व प्रकाशन क्षेत्रास पूरक असे काही करावे अशी ठोस आखणीही केली. नोकरीतून मुक्त होऊन काही दिवस मोकळा श्वास घ्यावा, बरेच दिवस रखडलेला प्रवास करावा, नव्या नियोजनाच्या दृष्टीने भेटीगाठी घ्याव्यात वगैरे विचार सुरू असतानाच लाॅकडाऊनमुळे घरात जखडून घ्यावे लागले, आणि सारी मनोरथे मनातच राहिली.
वर्किंग फ्राॅम होम ही संकल्पना करोनोत्तर काळात जगभर राबविली जाईल असे स्पष्ट दिसू लागले आहे. याचे फायदे आहेत असेही बोलले जातेय. ते नक्कीच आहेत. मुख्य म्हणजे, काम करणाऱ्या- विशेषत: बौद्धिक काम करणाऱ्यालाच हे फायदे मिळणार आहेत. प्रवासाकरिता वाया जाणारा वेळ व एनर्जी वाचवून अधिक क्षमतेने काम करण्यासाठी वापरता येईल, घराबाहेर वावरण्यामुळे होणारे, विशेषत: कपडे, हाॅटेलिंग, रिक्षा-टॅक्सी वगैरेचे खर्च वाचून गरजा कमी होणार असल्याने बचत वाढेल वगैरे महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा होत आहे. डिस्टन्सिंग हे जगण्याचे सूत्र राहणार असल्याने माणसामाणसांत थेट-प्रत्यक्ष संपर्क न राहताही व्हर्चुअल भेटीगाठीतून कामांची आखणी, विभागणी करता येईल असाही एक फायदा सांगितला जातो. थोडक्यात, आजवरची जगरहाटी किमान वेळात पूर्णपणे उलटी फिरवावी लागेल. ते संपूर्ण साध्य होईल तेव्हा हे फायदे थोडेफार पदरात पडण्यास सुरुवात होईल.
हा झाला बुद्धिजीवी वर्गाच्या भविष्यातील कार्यसंस्कृतीचा ढोबळ विचार. हे चित्र अगदीच निराशादायी नाही असे वाटून या वर्गाची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी सकारात्मक राहील यात शंका नाही. याचे दुसरे कारण असे असेल, की, याच नवकार्यसंस्कृतीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांचा विचार करण्याची सध्याच्या नकारात्मक काळात कोणाचीच तयारी नाही. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे आजपर्यंतच्या हजारो वर्षांचे वास्तव एका फटकाऱ्यात पुसून टाकावे लागेल अशी ही भविष्यातील स्थिती पचविणे मानसिकदृष्ट्या माणसाला किती सोपे राहील याचा विचार सध्या करणे योग्य नाही, त्यामुळे सध्या फायद्यांची चर्चा सहाजिक आहे. पण, बुद्धिजीवी वर्गापलीकडच्या, श्रमजीवी वर्गास नवसंस्कृतीच्या दडपणापोटी किंवा अपरिहार्यतेपोटी घरातच बंद करून घेणे परवडणारेही नाही, आणि ते शक्यही नाही. ‘हातावरचे पोट’ हीदेखील समाजाचीच कार्यसंस्कृती आहे. करोनोत्तर काळात, संचार आणि परस्परांतील थेट संपर्क व संवादावर कमालीचे निर्बंध येतील, तर श्रमजीवी वर्गाचे भविष्य काय असेल याचा विचार करून आखणीपूर्वक या वर्गाचे जगणे आश्वस्त करणे हे भीषण आव्हान असेल. बुद्धीजीवी वर्गाकडील संपत्तीचे व्यवहारात चलनवलन होते, त्यावर अर्थव्यवस्थेची गती बऱ्याचशा प्रमाणात स्थिर राहते. घरात बसून काम करणाऱ्या या वर्गाच्या गरजा मर्यादित झाल्या, तर मुख्यत्वे त्यांच्यासाठी निर्माण कराव्या सुविधांच्या गरजाही कमी होतील, आणि विकास म्हणून आज ज्या गोष्टींचे नियोजन केले जाते त्यांना प्रचंड प्रमाणात खीळ बसेल. उदाहरणार्थ, कोणत्याही कार्यालयांकरिता विशिष्ट परिसरांतील ऐसपैस जागांची गरज मर्यादित होईल. त्यांचे इंटिरीयर, कामाच्या सुविधांवर होणारा खर्च, आदी बाबी ‘गरजा’ राहणार नाहीत, आणि ‘मोक्याच्या जागा’ची किंमत कवडीमोल होऊन जाईल. कोट्यवधींची गुंतवणूक करोनोत्तर काळात केवळ निरुपयोगी होऊ शकेल. सहाजिकच, या गुंतवणुकीच्या अनुषंगाने हातावर पोट असणाऱ्या ज्या वर्गास रोजगार मिळत असतो, त्यालाच फटका बसेल. असंघटित श्रमिकासाठी तो वाईट काळ असेल.
पायाभूत सुविधांमध्ये दिवसागणिक भर टाकूनही त्या अपुऱ्या पडाव्यात अशी कालपर्यंतची स्थिती होती. मनोरंजन, प्रवास, पर्यटन, अशा क्षेत्रांशी संबंधित सुविधांचे व त्यावर थेट किंवा अप्रत्यक्ष  अवलंबून असणाऱ्यांचे भविष्य काय असेल याचाही विचार करावा लागेलच!
केवळ सेवाक्षेत्रे तग धरतील तर तेवढे पुरेसे नाही, असा याचा अर्थ आहे. करोनोत्तर काळातील मन:स्थिती हाही एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे माणसाचे जगणे आनंदी व समाधानी होत असते. भविष्यातील नवी जीवनशैली तो आनंद वा ते समाधान देण्यास व पर्यायाने जगण्यातील रस कायम ठेवण्यास पुरेशी पडणार नसेल, तर त्यासाठीच्या नव्या पर्यायांचाही व त्यातून निर्माण करावयाच्या उपजीविकेच्या संधींचाही विचार व्हायला हवा.
माझे भविष्यातील नियोजन आणि अचानक बदललेला वर्तमानकाळ यांवर विचार करत असताना भविष्यातील कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्याच्या शक्यता खडतर आहेत असे वाटू लागले. कारण, आज, आत्ताच बुद्धीजीवी वर्गात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांवरच अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, आणि पर्यायी मार्ग देखील आक्रसत चालले आहेत.
पत्रकारितेच्या क्षेत्राचे भविष्यचक्र तर पुरते उलटे होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अनेकांच्या हाती नारळ दिले गेले आहेत, तर अनेकजण, केव्हाही नारळ मिळेल या भीतीने धास्तावले आहेत. कदाचित या क्षेत्राचीही भविष्यातील सामाजिक मागणी कमी होईल, व इथल्या रोजगाराला त्याचा फटका बसेल. लिहित्या हातांची मागणी मर्यादित होईलच, पण या क्षेत्रातील श्रमिकांचीही गरज मर्यादित होईल.
अशा स्थितीत, ‘एकाच नावेतून प्रवास करणाऱ्या’ सर्वांनी, सुरक्षिततेचे नियम पाळून, एकमेकांना मदतीचा हात आणि साथ देत तरंगत राहण्याची माणुसकी जिवंत ठेवणे हाच एकमेव मार्ग राहील. तो अवलंबिणे हा ‘परमार्थ’!
भविष्यातील जीवनशैलीत, ‘परमार्थ’ हा परवलीचा शब्द व्हायला हवा!
ही अगदी ढोबळ मांडणी आहे, पण तसे होईल काय, या प्रश्नाचे ठामपणे होकारार्थी उत्तरच मिळेल असे वाटण्याजोगी परिस्थिती मात्र, अजूनही उगवलेली दिसत नाही!

Monday, May 4, 2020

तिजोरीच्या पोषणा’ची नशा!


अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच गोष्टी जगण्यासाठी आवश्यक असतात हा समज जुना होऊनही आता जमाना लोटला. मोबाईल, इंटरनेट आदी गरजांची मूलभूत गरजांमध्ये भर पडली त्यालाही आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. जीवनावश्यक नाहीत अशा वस्तू शोधणेही कठीण होईल अशी परिस्थिती आता विकासाच्या वेगाने उदयास येत आहे. एके काळी, दारूबंदीच्या प्रचारसाठी गावोगावी मोहिमा सुरू व्हायच्यादारू हा सामाजिक प्रतिष्ठेचा नव्हे, तर तिरस्काराचा विषय होता. त्या काळी, गावोगावीच्या रिकाम्या भिंतींवर, दारूचा पाश, करी संसाराचा विनाशदारूची नशा, करी जीवनाची दुर्दशा वगैरे घोषणा रंगविलेल्या दिसत. कालांतराने, ती अक्षरे पुसली गेली आणि गावागावात दारूची दुकाने, देशी बार, दिसू लागले. यातून सरकारच्या तिजोरीस सर्वाधिक महसूल मिळतो, हे सिद्ध झाल्यावर, दारूविक्रीस प्रोत्साहन मिळेल असेच वातावरण तयार केले जाऊ लागले. वर्षारंभ, वर्षअखेर, गटारी, शिमगा, किंवा कोजागिरी असे सण साजरे करण्यासाठी दारू हा अपरिहार्य घटक बनला. दारूने घरादारांची, संसारांची, आयुष्याची दुर्दशा होऊ लागली, तरी सरकारी तिजोरीला मात्र, दारूमुळे बाळसे चढू लागले. संसाराची दुर्दशा करणारी ती दारू आपोआप प्रतिष्ठित झाली. दारूचे वेगवेगळे ब्रँड मिरविणाऱ्या बाटल्यांना शो केसमध्ये मानाची जागा मिळू लागली, आणि दारूने दैनंदिन जीवनावर पुरता कब्जाही मिळविलादारूच्या रंजक कहाण्यांना वर्तमानपत्रे, मासिकांमध्येही प्रतिष्ठेची जागा मिळू लागली.
दारू पिण्याच्या प्रथेस प्रतिष्ठितांच्या जगात मान मिळू लागल्यावर, दारू पिणाऱ्यांमध्येही सामाजिक स्तर तयार झाले. पहिल्या वर्गातील लोकांना मद्यशौकिन म्हणून गणले जाऊ लागले, तर दुसऱ्या वर्गातील लोकांची तळीरामदारुडेबेवडे अशा शेलक्या शब्दांत संभावना सुरू झाली. उंची मद्य पिणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असली, देशी-विदेशी बनावटीच्या उंची मद्याच्या खपाचे आकडे कोटींच्या घरात पोहोचू लागले असले, तरी तळागाळातला, देशी दारू रिचविणाऱ्यांचा वर्ग या देशात त्याहूनही मोठा आहे. दिवसभर श्रम करूनही समाधानापासून पारखेच राहणाऱ्या कष्टकऱ्यांना स्वस्तातला उपाय म्हणून सरकारी मान्यतेचा, देशी दारू नावाचा नवा प्रकार उदयास आलादेशी दारू पिणाऱ्या वर्गाची आर्थिक क्षमता फार नसली, तरी दारू सेवनाच्या एकंदर दैनंदिन प्रमाणात या वर्गाकडून मिळणारा महसूल सर्वाधिक आहे, असे दिसते.
देशावर आर्थिक मंदीचे सावट दाटल्यापासून उद्योग संकटात सापडले आहेत. बेरोजगारीची समस्या तीव्र होत आहे. अनेक क्षेत्रांना मंदीचा फटका बसला आहे. पण अशा परिस्थितीतही, दारूविक्रीचा आलेख मात्र, वाढतच आहे. २०१८-१९ या वर्षात दारूची विक्री त्याआधीच्या वर्षाहून दहा टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते. गरीब, कष्टकरी समाजाच्या खिशास परवडणाऱ्या देशी दारूचा खपही आधीच्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी वाढला. सुमारे वीस वर्षांपूर्वी, २००० साली, राज्यातील देशी दारूचा खप सुमारे १४ लाख लिटर होता. २०१९ मध्ये देशी दारूचा खप, सर्वाधिक म्हणजे, २७ लाख १३ हजार लिटर एवढा झाला असावा, असे सागितले जाते. (लोकसभा, विधानसभा व विविध निवडणुकांमुळे ड्राय डेज वाढल्यामुळे हा खप कमीच होता, अशी चर्चा आहे.) देशी दारू पिणारा वर्ग मुख्यत्वे रोजच्या कमाईवर घर चालविणारा असल्याने, त्या कमाईतीलच मोठा हिस्सा दारू सेवनावर खर्च होऊ लागला. गरीब कुटुंबांतील उत्पन्नास असे अनावश्यक फाटे फुटू लागले, की त्याची सर्वात मोठी झळ पहिल्यांदा त्या कुटुंबांतील महिलांना आणि मुलांना बसते. कमावत्यांच्या हाती येणारा पैसा दारूवर उधळला जाऊ लागल्याने, मुले आणि महिलांवर उपासमार व कुपोषणाचे सावट पसरले. महिलांमध्ये अँनिमियासारखे आजार बळावत चालले, आणि श्रमजीवी कुटुंबाच्या पुढच्या पिढ्याची वाताहत सुरू झाली. वर्षागणिक वाढणाऱ्या दारूच्या किंमतीमुळे कमावत्या हातातील पैसा पुरेनासा झाला आणि कुटुंबांतील कलह वाढू लागले. श्रमिकांच्या घरात अशांतता माजली, की सामाजिक संस्कृतीचा समतोल पुरता बिघडतो. सरकारी तिजोरीत महसुलाच्या रूपाने मोठी भर घालणाऱ्या दारूमुळे श्रमिक, गरीबांच्या घराचे खिसे फाटके होऊ लागले, आणि असंख्य घरांवर उपासमारीची वेळ आलीदारूमुळे संसाराची वाताहत होते, ही पूर्वी भिंतींवर लिहिलेली वाक्य पुसली गेली असली, तरी ते वास्तव मात्र, दिवसागणिक गडद होत चालले आहे.
आता करोनाच्या संकटकाळात दारूची विक्री बंद झाल्यापासून दारू हा मुद्दा पुन्हापुन्हा चर्चेस येऊ लागला आहे. मद्यशौकिनांपासून बेवड्यांपर्यत अनेकजण दारूअभावी अस्वस्थ होऊ लागले असून, दारूविना जगणे असह्य होईल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. दारूसाठी तळमळणारे जीव दारूकरिता कोणतेही धाडस करतील अशी परिस्थिती आसपास दिसूही लागली आहे. त्यामुळे, करोना संकटात दारूविक्री सुरू करावी का यावर सरकारी पातळीवर चर्चा सुर झाली आहे. अशीच मागणी काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात अभिनेते ऋषी कपूर यांनी केली, तेव्हा त्यांची खिल्ली उडविली गेली होती. मात्र, महसुलाचे स्रोत आटू लागल्याचे कारण गंभीर होताच, वेगवेगळ्या क्षेत्रांतून जे उपाय सुचविले जाऊ लागले, त्यामध्ये मद्यविक्रीस मंजुरी देण्याचा सूर अधिक जोमदार झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट पत्र लिहूनच मद्यविक्री सुरू करून महसुलवाढीस चालना देण्याचा उपाय सुचविला. मद्यविक्री सुरू केल्यास तिजोरीच्या पोषणाची समस्या सुटेल, असे त्यांना वाटते. मात्र, करोनाकाळी मद्यविक्री सुरू केल्यास, गरीब, कष्टकरी समाजाचे काय हाल होतील, त्याचे सामाजिक परिणाम काय होतील, याचा विचार करून त्याच्या उपाययोजनांची आधी तयारी करावी लागेल.
करोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे अनेकांचे उत्पन्नाचे स्रोत संपूर्णपणे बंद झाले आहेत. हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गास याचा सर्वाधिक फटका बसला असून, रोजची भूक भागविण्याचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. हाताला काम नसल्याने पैसा नाही, आणि पैसा नसल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली असताना दारू विक्री पुन्हा खुली केल्यास या वर्गातील दारूच्या आहारी गेलेल्यांची हाताशी असलेली तुटपुंजी पुंजीदेखील दारूच्या नशेत वाहून जाईल, आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्यापुढे नवे संकट उभे राहील, अशीच शक्यता अधिक आहे. शिवाय, अगोदरच नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबांत नवे कलह माजण्याचीही भीती व्यक्त केली जाते. दारूविना जगणे असह्य झाल्यावर मानसिक अवस्था काय होते, याची लहानमोठी उदाहरणे आता दिसू लागली आहेत. हाती पैसा नसलेल्या दारूबाजांमुळे राज्यातील कादा सुव्यवस्थेचे संकट उग्र होऊ शकते. आहे रे आणि नाही रे वर्गातील संघर्ष अशा संकटकाळात तीव्र होत असल्याची जगभरातील अनेक उदाहरणे समोर येऊ लागली असून, नाही रे वर्गाकडून आहे रे वर्गाकडील हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागेल अशा भयापोटी असुरक्षिततेची भावना व्यक्त होऊ लागली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या व व्यसनावर नियंत्रण ठेवू न शकणाऱ्यांची मानसिक अवस्था अशा काही थरास गेली, तर कोणत्या अनावस्थांना तोंड द्यावे लागेल, याचाही विचार आवश्यक आहे. 
दारूविक्री खुली करताना केवळ सोशल डिन्स्टन्सिंगचा नियम पाळण्याची अट पुरेशी नाही. त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या सामाजिक समस्यांचाही विचार करणे गरजेचे राहणार आहे. कारण, केवळ उंची मद्यपान करणाऱ्यांपुरता हा निर्णय मर्यादित राहणार नाही. अगोदरच, दारुमुळे ज्यांची आयुष्ये दुर्दशेच्या उंबरठ्यावर आहेत, त्या तळीरामांही दारू पिण्याची मुभा द्यावी लागेल. टाळेबंदीमुळे बेरोजगार झालेल्या तळीरामांच्या स्तरावरीललोकांना रोजगाराची व्यवस्था पुन्हा निर्माण होत नाही, तवर दारूविक्रीस परवानगी देण्याचे निर्णय घेणे म्हणजे संकटात भर घालण्यासारखे होईल. कारण प्रश्न केवळ महसूलवाढीचा नाही, तर सामाजिक सुरक्षिततेचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि अगोदरच विस्कटलेल्या संसारांच्या भविष्याचाही हा प्रश्न आहे.

Sunday, April 19, 2020

‘अंतर’भान!


मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ गेल्या मंगळवारी संध्याकाळी अचानक गर्दी जमली आणि अगोदरच करोनाच्या उद्रेकाच्या भयात भरडलेला सामान्य मुंबईकर चिंताग्रस्त झाला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेचे काही मिनिटांतच पुरते उल्लंघन झाल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे या चिंतने सरकारी यंत्रणांची झोप उडाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्यक्तीव्यक्तीमधील अंतराची मर्यादा पाळणे हाच एकमेव उपाय सध्या हातात असताना, अचानक अनावर गर्दी अवतरते तेव्हा सोशल डिन्स्टन्सिंगचे बारा वाजणार हे स्पष्टच आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला मुंबईसारख्या महानगरात गेल्या काही दिवसांपासून लोकांनी पाने पुसल्याच्या घटना अनेकदा घडल्या. शहर आणि उपनगरांतील ज्या भागांत या आजाराचा मोठा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तेथील लोकसंख्या आणि राहणीमानाची स्थिती पाहता, हा नियम धाब्यावर बसणार हे स्पष्टच होते. धारावीसारख्या परिसरात, जेथे दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्यांमध्ये दाटीवाटीनेच माणसे कशीबशी छपराखाली स्वतःस कोंबून घेतात, तेथे हा नियम धाब्यावर बसविल्याखेरीज राहणेच अशक्य होणार हे वास्तव आहे. २४० हेक्टरवर वसलेल्या दाटीवाटीने या वस्तीच्या जनजीवनाची घडी या साथीने विस्कटून गेली आहे. श्रमणाऱ्या हातांनी दिवस उजाडला की घराबाहेर पडायचे तेव्हा त्या झोपडीतील इतर माणसांना दीर्घ श्वास घेता येईल, हा येथील जगण्याचा अलिखित नियम असल्याने, दिवसाच्या काळात झोपडीच्या छपराखाली वावरणाऱ्यांची संख्या आपोआपच कमी होत असते. निवाऱ्याची जागादेखील आळीपाळीने वाटून घेतली तरच कधीतरी कुणा एखाद्यास जमिनीवर पाठ टेकविण्याची संधी मिळावी अशा परिस्थितीत ज्या महानगरात असंख्य लोक जगतात, तेथे सर्वांना घरातच राहण्याची वेळ आल्यास एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळणे केवळ अशक्य आहे. धारावीसारख्या दाट वस्तीतील हेच वास्तव असल्याने, करोना संकटातही घराबाहेर वावरणे ही अनेकांची अपरिहार्यता ठरली आहे. सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासण्याच्या या अपरिहार्यतेकडे मानवतेच्या दृष्टीने पाहिले, तर मुंबईबाहेर जाण्यासाठी झालेली धडपड ही एका अर्थाने मरणापासून पळ काढण्यासाठी, केवळ जगण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड होती, असेही म्हणता येईल.
महाराष्ट्रात धारावी हे एकच अशा केविलवाण्या जिण्याचे केंद्र नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आणि २०११ च्या जनगणनेनुसार, झोपडपट्ट्यांची आणि झोपडीवासींची लोकसंख्यावाढ दयनीय आहे. महाराष्ट्रातील १८९ शहरांना झोपडपट्ट्यांनी वेढले असून एक कोटी १८ लाख ४८ हजार लोकसंख्या अशा दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. देशातील अडीच हजारांहून अधिक शहरांमधील झोपडपट्टीवासीयांची एकूण लोकसंख्या साडेसहा कोटींच्या घरात आहे. ही आकडेवारी पाहता, देशभरातील झोपडीवासींपैकी तब्बल १६ टक्क्यांहून अधिक झोपडीवासी एकट्या महाराष्ट्रातील १८९ शहरांत राहतात, आणि त्यापैकी मोठी लोकसंख्या एकट्या मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एकवटलेली आहे. २०११ च्या जनगणना नोंदींनुसार, देशातील महानगरपालिका क्षेत्रांतील शहरांची लोकसंख्या ११ कोटी ६५ लाख ५८ हजार ७४५ एवढी असल्याचे २०११ च्या जनगणनेनुसार दिसते. त्यापैकी दोन कोटी ५० लाख ९९ हजार ५७६ एवढी लोकसंख्या झोपड्यांमध्ये राहते. मुंबई महापालिका क्षेत्राची लोकसंख्या एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ एवढी आहे, आणि त्यापैकी सुमारे ४२ टक्के, म्हणजे ५२ लाख सहा हजार ४७३ एवढी लोकसंख्या  झोपडपट्ट्यांमध्ये एकवटली आहे.
झोपडपट्ट्यांचा आकुंचित परिसर आणि त्यामध्ये दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या पाहिल्या, तर लोकसंख्येच्या घनतेचा मुद्दा किती गंभीर आहे हे ध्यानात येते. एका पाहणीनुसार, मुंबईच्या एक चौरस किलोमीटरच्या, म्हणजे, दहा लाख चौरस मीटरच्या परिसरात २० हजार ६२४ माणसे राहतात. नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार, झोपडपट्ट्यांतील पन्नास टक्के कुटुंबांकडे केवळ एक लहानशी खोली असते. मुंबईतील प्रत्येक चार जणांपैकी एक माणूस झोपडीवासीय आहे, असे म्हणतात. धारावीसारख्या परिसरात लहानलहान घरांमध्ये २० हजारांहून अधिक वेगवेगळे लघुउद्योग चालतात. एक चौरस किलोमीटर क्षेत्रात जवळपास ७० हजार माणसांना दाटीवाटीने रहावे लागते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथे शंभरदीडशे चौरस फुटाच्या एका झोपडीत सरासरी सहाजण राहातात. तर वरळीच्या कोळीवाड्यातील लोकवस्तीची घनता एक चौरस किलोमीटरमागे सुमारे ९२ हजार एवढी आहे. अशा घनदाट वस्तीत शारीरीक अंतराची मर्यादा राखणे केवळ अशक्य असते, हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
केवळ दाटीवाटीने राहण्यापुरतीच झोपडपट्ट्यांची समस्या मर्यादित नाही. या परिसरांत आरोग्यास पोषक अशा नागरी सुविधांचीही वानवाच दिसते. अगोदरच अपुऱ्या, अस्वच्छ असलेल्या प्रत्येक एका सार्वजनिक शौचालयमागे  रोज सुमारे दीड हजार रहिवासी असा वापर होतो. तेथील पाण्यामुळे पसरणारी अस्वच्छता, घराघरांत चालणाऱ्या उद्योगांमुळे जागोजागी साचणारे कचऱ्याचे ढिगारे, इतस्ततः फिरणारी मोकाट जनावरे, गळक्या जलवाहिन्यांमुळे मिळणारे दूषित पिण्याचे पाणी, अशी अनेक कारणे मुळातच रोगराईस निमंत्रण देत असल्याने, साथीच्या कोणत्याही आजाराचे पहिले आक्रमण अशाच परिसरांवर होत असते.
गेल्या दोन दशकांत मुंबईची लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढत गेली. मात्र, मुंबईच्या भौगोलिक क्षेत्रास मर्यादा असल्याने, या वाढत्या लोकसंख्येस सामावून घेण्याच्या क्षमतेवर सहाजिकच मर्यादा येतात. त्यामुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो. एका बाजूला मर्यादित भूक्षेत्रावरील वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उभ्या विकासाची कास धरली गेली. कमीत कमी क्षेत्रावर उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या, तरी नागरी सुविधांवरील ताण वाढतच होता. दुसरीकडे, झोपडपट्ट्या कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पूर्ण असफल ठरून झोपडपट्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्यानंतर नव्या झोपडपट्ट्या जागोजागी अस्तित्वात येत असल्याने लोकसंख्येचा विस्फोट अटळच ठरत होता. हा वेग रोखला नाही, तर येत्या दहा वर्षांनंतर मुंबईची लोकसंख्या पावणेतीन कोटींच्या घरात जाईल, असे काही जागतिक संस्थांचे अहवाल सांगतात.
करोनाच्या साथीनंतर पसरलेल्या अस्वस्थतेतून नेमका हाच, लोकसंख्येच्या घनतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दाटीवाटीने राहणाऱ्या जनतेस सोशल डिस्टन्सिंगसारखी अपरिहार्य अटदेखील अमलात आणता येऊ नये, हे दुर्दैवी आहे. रस्त्यावर इतस्ततः दिसणारी गर्दी हा त्या अपरिहार्यतेचाच एक परिणाम आहे. घर नावाच्या एका आक्रसलेल्या चौकटीत दाटीवाटीने बसण्यापेक्षा, रस्त्यावर भटकत राहिले तर घरातील सोशल डिस्टन्सिंग तरी पाळता येईल, असा विचार करून जिवावर उदार झालेली केविलवाणी माणसे आता दिसू लागली आहेत. त्यांच्यासमोर करोनापासून वाचणे एवढा एकच प्रश्न नाही. या साथीशी झगडताना, जगण्याच्या अन्य साधनांची उपलब्धता हादेखील मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. सर्वत्र टाळेबंदी असल्याने उद्योगधंदे मंदावले आहेत, रोजगाराची साधने संपुष्टात आली आहेत, आणि भुकेचा प्रश्न दिवसागणिक भयाण रूप घेऊ लागला आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी भूक भागविण्याची साधने आपल्या हाती अगोदर पडावीत यासाठी केविलवाणी चढाओढ सुरू झाली आहे. या संघर्षात भरडताना सोशल डिन्स्टन्सिंग हा मुद्दा आपोआप डावलला जातो, कारण तसे केले नाही तर जगणे मुश्किल होईल अशा भयाचे सावट गडद होऊ लागले आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर टीका होणे साहजिक आहे. गर्दीमुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतात हे खरे आहे. पण या गर्दीमागची अपरिहार्यता लक्षात घेण्याची गरज आहे. तसे झाले तर माणुसकीचे झरे जिवंत राहतील. नाईलाजाने गर्दी करणाऱ्यांना तिटकाऱ्याची वागणूक तरी मिळणार नाही. आज लोकांमधील शारीरीक अंतर वाढले आहे. ती अपरिहार्यता आहे. पण त्यामुळे मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. तरच, ‘अंतर’भान जागे आहे, असे म्हणता येईल.

Tuesday, April 7, 2020

नवता आणि परंपरा!

नवता आणि परंपरा...
इंद्रधनूच्या जवळपास सगळ्या रंगांचा सुरेख संगम साधत रंगविलेला केशसंभार, आधुनिक वेषभूषातत्वानुसार अंगाचा आवश्यकतेपुरता भाग झाकला जाईल एवढाच वस्त्रसंभार, हातात इंपोर्टेड पर्स आणि पायात हायहिल सॅंडल अशा मादक वेषातली ती सुंदरी आपल्या गाडीतून उतरली आणि पन्नासेक पावलांवर असलेल्या ब्यूटी पार्लरच्या दिशेने चालू लागली.
आसपासचा रस्ता, काही क्षण थबकला!
तिकडे कुठेच लक्ष न देता ती रूपगर्विता आपल्याच तोऱ्यात मादक पदन्यास टाकत रस्ता कापत होती...
...अन् अचानक तिच्यासमोरून एक भेदरलेलं मांजर रस्ता आडवा कापून पलीकडच्या बांधाआड गायब झालं!
क्षणात तिच्या चालीची लय थबकली. ती जागच्या जागी उभी राहिली. क्षणभर तिने इकडेतिकडे पाहिले, आणि आपण ‘चुकून’ या दिशेने चाललो आहोत असा आविर्भाव स्वत:शीच करत ती गर्रकन मागे फिरली... काही पावलं उलट्या दिशेला चालत गेल्यावर पुन्हा थबकली... मागे फिरली, आणि झपाझप चालत ब्यूटी पार्लरच्या काचेच्या दरवाज्याआड गडप झाली...

... तोवर थबकलेला रस्ता पुन्हा वाहू लागला होता, आणि पलीकडच्या कंपाऊंडच्या भिंतीवर ते मांजर शांतपणे समाधी अवस्थेत बसले होते

वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम!

करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
या कार्यक्रमांवरून देशातील समाजमाध्यमांच्या जोडीने प्रसारमाध्यमांमध्येही वैचारिक द्वंद्व जुंपले असताना, जागतिक आरोग्य संघटनेने अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे.
अशा वेळी आपण आणि आपली माध्यमे कोणती भूमिका घेणार, हा मुद्दा आता चर्चेला येणारच...
****  ****
करोनाच्या जागतिक महामारीचा सामना करताना स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या वैद्यकक्षेत्रातील प्रत्येकाच्या लढ्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांना भावनिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ‘वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसार माध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प ‘ग्लोबल सिटिझन’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केला आहे.
करोनाचे संकट थोपविण्यासाठी विज्ञान आणि आरोग्यसेवेच्या आधुनिक उपायांचाच वापर करावा लागणार आहे, पण अशा कठीण काळात या महामारीशी मुकाबला करणाऱ्या प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम जगभर प्रसारित करण्यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदानॉम यांनी काल या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले. आपण काही काळाकरिता एकमेकांपासून दूर असू, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आभासीपणाने का होईना, एकत्र येऊन ‘कृतज्ञतेचा हा सोहळा’ साजरा करून लढवय्यांच्या धैर्यास सलाम करू या, असे आवाहन त्यांनी केले. वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा कार्यक्रम म्हणजे, जगाला भेडसावणाऱ्या एका भयाच्या विरोधातील शक्तिप्रदर्शनाचा सोहळा असेल, असे ते म्हणाले. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या प्रत्येकासोबत आणि या युद्धात आघाडीवर राहून प्रत्येक जिवाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे आहोत, हे दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, मनोरंजन आणि परिणामकारकतेच्या माध्यमातून या जागतिक युद्धाच्या आघाडीवर लढणाऱ्या प्रत्येकास भावनिक बळ मिळेल, असा विश्वास ग्लोबल सिटिझनचे सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी ह्युज इव्हान्स यांनी व्यक्त केला.
वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा प्रदीर्घ कार्यक्रम जगभरातील विविध डिजिटल मंचांवरून प्रसारित होणार आहे. अलीबाबा, अमेझॉन प्राईम व्हिडियो, ॲपल, फेसबुक, इन्स्टाग्राम, लाईव्हएक्सलाईव्ह, टेनसेन्ट, ट्वीटर, याहू, युट्यूब आदी मंचांवरून हा कार्यक्रम जगभरातील जनतेस अनुभवता येईल, व या कृतज्ञता सोहळ्यात भावनिकदृष्ट्या सहभागीही होता येईल. अधिक माहिती www.globalcitizen.org/togetherathome येथे उपलब्ध होईल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानेही कंबर कसली असून, या कार्यक्रमात आमचाही सहभाग असेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेश यांनी जाहीर केले आहे. करोनाविरोधातील लढाईत संयुक्तपणे सहभागी होण्यासाठी याहून मोठे निमित्त नाही. त्यामुळे, या उपक्रमात आम्ही आहोत, आणि याद्वारे आम्ही सारे एकत्र येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sunday, April 5, 2020

माणुसकीची कसोटी!

माणुसकीची कसोटी !
रिकी मनॅलो नावाचा एक धर्मगुरू सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. वातावरण स्वच्छ होते. हवेत चांगलाच गारठा होता. अशा वातावरणात सकाळचा फेरफटका आणखीनच सुखद होतो. रिकी स्वमग्नपणे रस्ता कापत होता... आणि अचानक मागून एक ट्रक रोरावत आला... त्याच्या अगदी शेजारी येताच ट्रकचालकाने ब्रेक दाबला. ट्रकचा वेग संथ झाला... आता रिकीच्या पावलाच्या वेगाने ट्रक त्याच्या बाजूने पुढे सरकत होता. क्षणभर त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्या गारठ्यातही त्याला घाम फुटला, आणि त्याने वेग वाढविला. पण ट्रकला मागे टाकून पळणे शक्यच नव्हते. ट्रकनेही वेग वाढविला. आता अगदी काही फुटांच्या अंतरावरून ट्रक त्याच्यासोबत चालत होता. काही क्षणांनंतर ट्रकच्या खिडकीची काच खाली झाली, आणि आत बसलेला एकजण कुत्सित आणि दहशतीच्या आवाजात रिकीकडे पाहात ओरडला, ‘हे... व्हायरस... एशियन व्हायरस!’...
मग ट्रकमधील सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहात टोमणेबाजी सुरू केली.
वंशद्वेष आणि प्रांतभेद जन्म घेतोय, याचा पुढच्याच क्षणाला रिकीला अंदाज आला. त्याने रस्ता सोडला आणि धूम ठोकली. धापा टाकत तो जवळच्या एका दुकानात शिरला. ते दारूचे दुकान होते. काऊंटरवरचा इसम विचित्र नजरेने रिकीकडे पाहात होता, आणि भयानक घाबरलेला रिकी, काहीच न बोलता उभा होता. आपल्या छातीची धडधडही त्याला स्पष्ट ऐकू येत होती. जवळपास अर्धा मिनिट तो तसाच, भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. काही वेळानंतर तो सावरला, तेव्हा फार मोठा काळ पायाखालून सरकून गेला आहे, असे त्याला वाटत होते... दुकानाच्या मागच्या बाजूला संगीताचा ढणढणाट सुरू होता. गर्दीच्या गप्पांचा आवाज बाहेर येत होता... रिकीने घाबरून पुन्हा एकदा रस्त्याकडे नजर टाकली. तो ट्रक निघून गेला होता. त्याने सुटकेचा सुस्कारा सोडला, पण लगेचच त्याचे मन थरकापले. ही सुटका आहे, की संकटाची सुरुवात?... या विचाराने तो अस्वस्थ झाला. पण त्याने जिद्दीने स्वतःस सावरले. आपण वंशद्वेषाचे - मौखिक वंशद्वेषाचे- पहिले बळी ठरतोय, हे त्याला जाणवले होते. त्या ट्रकमधील माणसांच्या तोंडातून बाहेर पडणारे अपमानास्पद शब्द तापल्या तेलासारखे त्याच्या कानात ओतले गेले होते...
ही घटना अगदी अलीकडची... १६ मार्चची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केले, आणि वंशद्वेषाच्या भयाने अनेकजण ग्रस्त झाले. ध्यानीमनी नसताना रिकीला त्या भयाने गाठले. आता आपण सुरक्षित नाही, या भावनेने आता त्याच्या मनात घर केले आहे...
 ‘नाही... मी एशियन व्हायरस नाही... मी एक माणूस आहे. विषाणू नाही’.. तो मनातल्या मनात ओरडला... एवढ्या जोरात, की त्या आतल्या आवाजामुळे आपल्या कानठळ्या बसतील अशी त्यालाच भीती वाटू लागली...
त्यानंतर अजूनही रिकी सकाळच्या फेेरफटक्यासाठी घराबाहेर पडतो. पण आता तो आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेतो... आपले विशिष्ट ठेवणीचे डोळे कोणाच्याही नजरेस पडू नयेत, यासाठी सतत खबरदारी घेत आणि आसपासच्या नजरांचा भयभीत कानोसा घेत त्याची पावले पडत असतात...
कोरोनाव्हायरसच्या फैलावानंतरची ही एक प्रातिनिधिक घटना!
गेल्या २४ फेब्रुवारीला, लंडनच्या ऑक्स्फर्ड स्ट्रीट या गजबजलेल्या रस्त्यावर एका चिनी तोंडवळ्याच्या सिंगापुरी विद्यार्थ्यास जबर मारहाण झाली. करोनाच्या नावाने लाखोली वाहात लोकांनी त्याला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी अक्षरशः बुकलून काढले. ‘तुझ्या देशातला करोनाव्हायरस आमच्याकडे नको’, असे बोलत त्याच्यावर हल्ला चढविला... कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन तो तिथून पळाला, तेव्हा त्याच्या जबड्याची हाडे मोडली होती. डोळ्याखाली रक्त साकळले होते... आता मोडलेली हाडे जागेवर बसविण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागेल, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले. जोनाथन मोक असे त्याचे नाव... या घटनेचे वर्णन त्याने आपल्या फेसबुक पेजवर केले, त्या शब्दाशब्दांत त्याच्या भयाच्या वेदना उमटलेल्या जगाने अनुभवल्या...
(त्याच्या हल्लेखोर तरुणांना आता अटक झाली आहे.)
अशा काही घटना आसपास उमटू लागल्या आहेत. चीनमधून करोनाचा फैलाव सुरू झाल्याच्या भावनेने आणि ट्रम्प यांनी त्याचे ‘चायना व्हायरस’ असे नामकरण केल्यानंतर, पाश्चिमात्यांमध्ये पूर्व आशियाई लोकांविषयी राग धुमसत आहे. लंडनमध्ये ‘स्टॉप हेट –यूके’ नावाची संघटना गुन्हेगारीचे चटके बसलेल्यांना साह्य करते. करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून, वांशिक विद्वेषाचा विखार अनुभवलेल्या अनेकांनी या संस्थेकडे मदतीसाठी धाव घेण्यास सुरुवात केली आहे...
स्वार्थाला ऊत येणे हा या परिस्थितीत पहिला धोका संभवतो. बळावलेला स्वार्थ माणुसकीची भावना गिळू पाहात असतो. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात, करोनाच्या भयामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी सुरू झाली. उद्याच्या गरजा भागविणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सिडनीच्या वेस्टफील्ड वूलवर्थस या दुकानात अलीकडेच ग्राहकांची टॉयलेट पेपरसाठी अक्षरशः झोंबाझोंबी झाली. वाद एवढा विकोपास गेला, की एका महिलने दुसऱ्या एका ग्राहकावर उगारण्यासाठी चक्क सुरा उपसला... या मानसिकतेमागील भय कोणते रूप घेईल या चिंतेने आता तेथील दुकानदारही धास्तावले आहेत. अनेक दुकानदारांनी तर, दुकानांना टाळे लावून घरात बसणे पसंत केले आहे.
करोनाला माणसाभोवतीचा विळखा सोडावाच लागेल. तो नष्ट होईलच, पण या साथीमुळे नव्याच आजाराची, विखाराची भीती आता जगभरात फैलावू लागली आहे. ती म्हणजे, या आजाराने आपली मानवी मूल्ये, माणुसकीचे वेगळेपण हिरावले तर जाणार नाही ना?... जगाचा कोपराकोपरा करोनाच्या भयाने चिंतित असताना, आता या नव्या चिंतेची त्यात भर पडू पाहात आहे. या एका आजाराने माणुसकीच्या भावनेवर आघात सुरू झाला आहे. तो वेळीच आवरला नाही, तर करोनानंतरचे माणसांचे जग कसे असेल, याची चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. करोनाच्या आक्रमणामुळे मने भयभीत आहेतच, कदाचित, कधीच न अनुभवलेल्या या एकटेपणामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे, केवळ स्वतःचे अस्तित्व जपण्याची मानसिकता वाढेल आणि व्यक्तीव्यक्तीच्या मनातील भयाचा सामूहिक फैलाव झाला तर समाजिक अराजक माजेल, याची जाणीव आत्ताच ठेवली पाहिजे. त्यासाठी, माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या, सकारात्मकतेवर भर दिला गेला पाहिजे. या संकटात व्यक्तींमधील अंतर नाईलाजाने वाढले असेल, पण हेच वाढलेले अंतर एकमेकांच्या मनाचे अंतर कमी करण्यास कारणीभूत ठरावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. संकटाचे हे सावट, उजाडणारा प्रत्येक दिवस अनिश्चितता घेऊन येत असल्यामुळे असुरक्षिततेचे भय वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत, माणुसकी नावाच्या भावनेची कसोटी लागते. करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थीना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच, आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
त्यासाठी मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अगदी जगभरातील प्रत्येकाने!
****
जोनाथन - मारहाणीनंतरची सेल्फी 

Monday, March 30, 2020

इम्युनिटी

तळव्याएवढ्या
स्क्रीनवर फिरणारं
पांढरं धुरकट चक्र
अदृश्याचा पाठलाग करत
वेग वाढवू लागतं,
डाव्या कोपऱ्यातली
फोरजीची अक्षरं
दमछाक होऊन
टाकू लागतात धापा
गुपचूप, लपूनछपून...
‘फोर’च्या कोपऱ्यातून
उमटतात विषण्ण उसासे
भिजल्या अक्षराच्या डोळ्यात
वाहत जातो एक अश्रू...
हात जोडून म्हणतो,
माफ कर,
घरघर लागलीय...
शेवटी प्रश्न ‘इम्युनिटी’चा आहे...
तुमची वीजदेखील आता
‘ग्रीन’ राहिलेली नाही...
कोळशाच्या राखेची पुटं
अंगावर घेत वाहताना
आमचीही फुफ्फुसं
काजळीनं भरलीत खचाखच...
पण
थोडे प्रोटीन्स मिळाले तर
आम्हीही पुन्हा होऊ
‘फोरजी’ शक्तीमान...

पळवून लावू त्या फिरत्या चक्राला
‘बफरिंग झोन’च्या पलीकडे!

‘चांगुलपणा’चा शोध...

लोकप्रभा’त प्रसिद्ध झालेला एक जुना लेख.

***


‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात.
थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’
हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’!
शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले. ‘आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका’… ‘तुम्ही चांगुलपणा दाखवलात तरच आम्हीही चांगुलपणा दाखवू’ असे काही मथळे असलेला मजकूर मात्र लगेचच पुढे आला, आणि चांगुलपणा शोधावाच लागणार असे नक्की वाटू लागले.
तसा शोध सुरू असतानाच वर्तमानपत्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक बातमी दिसली, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची खात्री पटली. तो शोधावा लागत असला, तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही, त्याचे अस्तित्व भक्कम आहे, असेही जाणवू लागले.
मग त्या बातमीशी तुलना करणारे काही जुने प्रसंग, जुने अनुभवही मनात जागे होऊ लागले.
… लोकल गाडी स्टेशनवर थांबण्याआधी रिकामी झाली होती. मी मोबाईलमधले पुस्तक वाचत असल्याने मला स्टेशन आल्याचे जरा उशीराच लक्षात आले. फर्स्टक्लासचा तो डबा जवळपास रिकामा होता. समोरच्या बाकावर, माझ्यासारखाच, उशीरा लक्षात आलेला एकजण होता. मी उतरताना सहज वर बघितलं. एका चकचकीत कागदात पॅक केलेला बॉक्स असलेली प्लास्टिकची पिशवी कुणीतरी रॆंकवर विसरून गेला होता. मी बाजूच्या त्या माणसाला विचारलं.
'ये आपका है?'
त्याची नसल्यामुळे तातडीनं तो 'नाही' म्हणाला. पण लगेचच त्याचं लक्ष त्या पिशवीवर खिळलं.
मी उतरलो. मागे बघितलं.
तो माणूस डब्यात रेंगाळला होता.
थोडं पुढे जाऊन मी थांबून बघू लागलो.
तो माणूस उतरला, तेव्हा त्याच्या हातात ती पिशवी होती!
... बहुधा मी उतरायची किंवा मूळ मालक येतो की काय याची वाट पहात तो रेंगाळला होता.
तो फलाटावर उतरून चालू लागला, आणि काही अंतरावर उभा असलेल्या मला त्यानं पाहिलं. झटक्यात मागे वळून उलट्या दिशेनं झपाझप चालत तो दिसेनासा झाला होता!
... दुसऱ्या दिवशी वाचलेल्या एका बातमीमुळे तो प्रसंग पुन्हा आठवला.
पुण्याच्या एका भंगारवाल्यानं, हिराबागेतील एका उच्चभ्रू घरातलं एक जुनं कपाट विकत घेतलं.
ते विकून चार पैसे नफा मिळणार म्हणून तो खुश होता.
या धंद्यातून होणाऱ्या पाचसहा हजाराच्या कमाईतून त्याचं कुटुंब कसंबसं जगत होतं. बायको जेवणाचे डबे बनवून संसाराला हातभार लावायची, दोन मुलगे जमेल तशी मजुरी करायची. मुलगी शाळेत शिकत होती. खेळात नाव कमवायचं तिचं स्वप्न होतं.
तिच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जही त्याच तुटपुंज्या कमाईतून तो नेमानं फेडत होता.
आपल्या वाटणीला आलेलं आयुष्य ते कुटुंब आनंदानं आणि प्रामाणिकपणाने जगत होतं.
ते कपाट विकून या वेळी हाताशी चार पैसे जास्त मिळणार होते.
त्यानं ते कपाट घरी आणलं, आणि विकण्याआधी स्वच्छ करण्याकरीता उघडलं. आत एक लॉकर होता. त्यानं तो उघडला.
एक जुनी पिशवी आत होती. त्यानं ती काढून उघडली, आणि त्याचे डोळे विस्फारले. नकळत दोन्ही हातांचे तळवे गालांवर आले.
काही वेळ फक्त तो त्या पिशवीत पाहात होता.
... आत सोन्याचे दागिने होते!
त्यानं भानावर येऊन पुन्हा पिशवी उचलली. जड होती. किलोभर तरी वजन होतं.
क्षणभरच, अनेक विचार मनात येऊन गेले.
आख्खं भविष्य एका सुखद वळणावर येऊन थांबल्याचा भासही त्याला झाला.
पुढचा क्षण त्याचं आयुष्य बदलण्यासाठी समोर हात जोडून जणू उभा होता.
त्यानं मिनिटभर डोळे मिटले, आणि लहानपणी आईवडिलांच्या तोंडून ऐकलेल्या संतांच्या गोष्टी त्याला आठवल्या. पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी आठवले...
... आणि पिशवीला घट्ट गाठ मारून तो पुन्हा हिराबागेतील त्या घरी गेला.
दार वाजवून मालकाच्या -आपण त्यांना पेंडसे म्हणू- हाती त्यानं ती पिशवी सोपवली.
पेंडशांनी ती उघडली.
आता त्यांचे डोळे विस्फारले होते. तोंडाचा आ झाला होता. त्यांना काही बोलायलाच सुचत नव्हते. अचानक समोर उभं राहिलेलं हे भाग्य आपल्याच घरात भंगारात कितीतरी वर्ष पडून राहिलं होतं, हेही त्यांनादेखील माहीतच नव्हतं...
तो भंगारवाला समोर दरवाजात उभा होता. काहीच न बोलता.
काही वेळानं पेंडसे सावरले. पिशवी घेऊन आत गेले, आणि पुन्हा बाहेर आले.
त्यांच्या हातात पाचशेची नोट होती. ती त्यांनी भंगारवाल्याच्या हातावर ठेवली.
तो जरासा कचरलाच. त्याचा हात पुढे झालाच नाही. मग पेंडशांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं!
'अरे, हे तुझ्या चांगुलपणाचं बक्षिस आहे! घे!' असं म्हणाले.
पाचशेची नोट घेऊन कपाळाला लावत त्यानं खिशात घातली आणि तो घरी आला.
त्या क्षणी त्याला अगदी हलकंहलकं, मोकळं वाटत होतं!
.... हा दुसरा प्रसंग.  
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली, आणि मला ट्रेनमधला प्रसंग आठवला.
मोहाचे क्षण टाळणं, भल्याभल्यांना जमत नाही.
चांगुलपणाच्या गप्पा सगळेच मारतात. पण असा एखादा क्षण समोर आलाच, तर कितीजण तो प्रत्यक्षात जगतील हे सांगणं कठीण असतं.
.... या दोन प्रसंगांतून ही दोन्ही उत्तरं मिळाली!
पुण्याच्या त्या गरीब भंगारवाल्याच्या चांगुलपणाला आणि श्रीमंतीला सलाम केलाच पाहिजे. कारण,  चांगुलपणा आजकाल शोधावा लागतो, असे सगळेच म्हणतात. म्हणूनच, अशा चांगुलपणाची एखादीच घटना दुर्मीळ ठरते, आणि तिची बातमी होते. अशी बातमी कधीतरीच वर्तमानपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात अवतरते, पण त्या दिवशी तीच सर्वाधिक वाचली जाते. कारण, चांगुलपणाविषयी समाजाच्या मनात आदर आहे. चांगुलपणाला गालबोट लावणाऱ्या घटनांबद्दल अजूनही तिटकारा व्यक्त होतो. म्हणूनच, सिनेमातल्या खलनायकाचाही प्रेक्षकांना राग येतो, आणि चांगुलपणाचा विजय झाला की हायसे वाटते...
चांगुलपणा ही मोठी वजनदार गोष्ट आहे. वाईटपणाच्या शेकडो गोष्टी आसपास सतत घडत असतानाही, चांगुलपणाची एखादीच गोष्ट त्या वाईट घटनांच्या दुःखावर फुंकर घालण्यास पुरेशी असते.
कारण चांगुपलणाचा कोपरा प्रत्येक मनामनात असतो. त्यावर एखाद्या घटनेची फुंकर बसली, की तो ताजा, टवटवीत होतो, आणि त्याचे झरे जिवंत होऊन पाझरू लागतात...
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, जिथे माणसं वावरतात, तिथे हे झरे जिवंत झाल्याचा अनुभव नेहमी येत असतो. ते झरे एवढे प्रवाही होतात, की जगाच्या थेट दुसऱ्या टोकावरही त्याचा ओलावा पोहोचून जातो, आणि चांगुलपणाच्या एखाद्या तरी घटनेची प्रतीक्षा करणाऱ्या मनांवर त्याचा शिडकावाही होतो.
चारपाच वर्षांपूर्वीची एक बातमी अशीच जगाच्या त्या टोकाकडून इथपर्यंत पोहोचली.
कॅनडामधील ओटावामध्ये एका शॉपिंग मॉलच्या परिसरात पन्नाशी उलटलेला एक इसम- स्कॉट मरे त्याचं नाव!- अगतिकपणे बसला होता. समोर एक फलक होता, ‘मी कॅन्सरग्रस्त आहे, मला उपचारासाठी मदत करा!’ पुढच्या दीडदोन तासांतच स्कॉटच्या वाडग्यात सुमारे शंभर डॉलर्स गोळा झाले होते. स्कॉटला मदत करणाऱ्यामध्ये ओटावा सिटिझन नावाच्या वर्तमानपत्राचा बातमीदारही होता. त्याने स्कॉटशी संवाद साधला. त्याची कहाणी समजून घेतली. चांगली सरकारी नोकरी करत असताना अचानक कधीतरी स्कॉटला कर्करोगाचे निदान झाले, आणि त्याचा आजाराशी संघर्ष सुरू झाला. कॅनडामध्ये रुग्णोपचाराचा खर्च सरकार करत असले तरी याच्याजवळची पुंजी संपतच आली होती. आता आपण जगलो नाही तर आपण पाळलेल्या मांजरीचे काय होणार, या चिंतेने स्कॉट अधिकच खंगत चालला. आपल्याजवळच्या पैशातून त्याने मांजरीसाठीचे खाद्य साठवून ठेवले. अशा आजारपणात तिचा सांभाळ करणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर त्याने आपल्या मांजरीला एका देखभाल केंद्रात दाखल केले, आणि तिच्या जगण्यासाठीचा खर्च उभा करण्याच्या चिंतेने आजारी स्कॉटला पछाडले. मग त्याने भिक्षा मागण्याचा मार्ग पत्करला, आणि माणसांमधल्या चांगुलपणाचे झरे स्कॉटसाठी जिवंत झाले.
त्या दिवशी ओटावा सिटिझनच्या त्या बातमीदाराने स्कॉटची ही कथा आपल्या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली, आणि चांगुलपणाच्या ओझ्याखाली आजारी स्कॉट अक्षरशः दबून गेला. त्याच्यावर चहूबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची प्रचीती जगाला आली...
अशा अनेक कथा जगाच्या कानाकोपऱ्यातून कधी ना कधी ऐकायला, पाहायला मिळतात.
केवळ माणसाने माणसांसाठीच नव्हे, तर ज्या माणसांच्या विश्वासावर अन्य सजीव प्राणी आश्वस्त असतात, त्यांच्यासाठीदेखील माणसाच्या मनातील चांगुलपणाचे झरे कळत नकळत जिवंत होतात, आणि तो स्पर्श असंख्य मनांना सुखावून जातो...
अशा चांगुलपणामुळेच माणुसकीला अजूनही धुगधुगी आहे. म्हणूनच ती जगविण्यासाठी हालचाल केली पाहिजे.
भर पावसाळ्यात ओलाव्याने जडावलेल्या झाडांच्या फांद्या तुटून कोसळतात, झाडेही उन्मळून पडतात. त्यामुळे होणारी हानी हा निसर्गाचा दोष नाही. पण ही हानी टाळण्यासाठी, माणसांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेकडून पावसाळयात झाडे अमानुषपणे छाटली जातात. अशा झाडांच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात, आणि स्वत:स वाचवू न शकणारी असंख्य पिल्ले आकाशात भरारी मारण्याआधीच देवाघरी जातात...
माणसाच्या डोक्यावरील संकटाची टांगती तलवार दूर करताना, जगण्याच्या आशेने केवळ चिमुकल्या व केवळ परावलंबी मातापित्यांवर निर्भर असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा बळी घेतला जातो, हे त्यांच्या गावीही नसते.
पुण्याच्या भंगारवाल्याच्या बातमीतून, ओटाव्यातील स्कॉट मरेच्या बातमीतून, चांगुलपणा पणाला लावणाऱ्या माणुसकीचे जे दर्शन घडते, तसेच दर्शन अधूनमधून राजकारणाच्या बजबजपुरीतही घडून जाते, आणि खात्री पटते, चांगुलपणा जिवंत आहे!
दोनतीन वर्षांपूर्वी एका पावसाळ्यात मुंबई महापालिकेत त्याचे दर्शन असेच घडून गेले... वृक्षछाटणीचे काम शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे व छाटणीआधी फांद्यांवरील घरटी तपासावीत अशी मागणी एका नगरसेवक महिलेने सभागृहाच्या बैठकीत केली. पक्ष्याचे घरटे नसेल तरच फांद्या छाटाव्यात असा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महापालिका प्रशासनाचा यावर काय प्रतिसाद होता ते त्या बातमीतून स्पष्ट झाले नाही, पण राजकारणाने लडबडलेल्या क्षेत्राच्या एका कोपऱ्यात कुठेतरी चांगुलपणा जिवंत आहे, याचा दिलासा या बातमीने नक्कीच दिला.
पक्ष्यांना वाचता आले असते, तर झाडाझाडावर, फांदीफांदीवर किलबिलाट करून त्यांनी त्या दिवशी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असता !...

Sunday, March 29, 2020

आठवावा देव...

मी फारसा श्रद्धाळू नाही. पण श्रद्धाळूंच्या भावनांचा प्रामाणिक आदर करतो. कारण स्वत:स नास्तिक, अश्रद्ध वगैरे अभिमानाने म्हणविणाऱ्यांच्या मनातदेखील कुठेतरी अशाच कसल्याशा भावनांचा ओला कोपरा अस्तित्वात असतो, आणि एखाद्या हळव्या क्षणी त्या कोपऱ्याचा कप्पा उघडतो, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नास्तिकतेवर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण करणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर आहे.
मध्यंतरी, जेव्हा अंधश्रद्धांच्या विरोधातील चळवळ काहीशी जोरात होती, तेव्हा, अशा प्रसंगात नेमकी कोणाची बाजू घ्यायची या संभ्रमात राजकीय नेते सापडले होते. कारण अशा प्रश्नांवर भूमिका घेताना लोकांच्या भावनांचा विचार करावाच लागतो. ती राजकीय अपरिहार्यता असते. म्हणूनच, ‘गणपती दूध पितो’ अशी आवई उठली तेव्हा, ‘आमचा गणपतीही दूध प्याला’ असे तत्परतेने सांगून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आवईलाही अधिकृत करून टाकले होते, तर तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र ही आवई झुरळासारखी झटकून टाकली होती. त्या त्या वेळी त्यांनी घेतलेल्या दोन्ही भूमिकांमागील वास्तव मात्र, ‘लोकभावना जपणे’ हेच होते.
अशाच काळात, आणखी एका ‘राज’कीय नेत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेतली. नवग्रहांचे अंगठे, गंडेदोरे, अंगारेधुपारे ही अंधश्रद्धा असून ती झुगारली पाहिजे असे सांगत या नेत्याने आपल्या बोटांतील ‘ग्रहांच्या’ अंगठ्या समुद्रात ‘विसर्जित’ केल्या होत्या. त्या काढून ‘फेकून’ दिल्या नव्हत्या, हे विशेष होते.
तर, श्रद्धा, आस्तिकता हा बऱ्याचदा ‘भूमिका’ म्हणून जाहीरपणे मांडण्याचा मुद्दा असल्याने, कल बघून त्या मांडणे असाच अनेकदा कल असतो, असे वारंवार दिसले आहे. लोकांना कोणती भूमिका पटेल याचा विचार करून तशी भूमिका घेणे अनेक राजकारणी नेते श्रेयस्कर मानू लागले तेव्हाच मंदिर-मस्जिदचे मुद्दे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले होते.
आता राजकारणाने काहीशी कलाटणी घेतली आहे. तेव्हा ज्यांना लोकांच्या श्रद्धेच्या राजकारणात ‘राम’ वाटत होता, त्यांना आता मात्र, तेव्हा ती चूकच होती असे वाटू लागले आहे. ‘ती कामगिरी आमची असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे’ असे उजळपणे सांगणाऱ्यांच्या अनुयायांना, ‘संकटकाळी देवांनी देवळातून पळ काढला’ अशी भाषा करणे ही गरज ठरू लागली.
त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या भावनांचा मुद्दा असल्याने, चावडीचावडीवर, पारावर, अंगणात, ओटीवर आणि, माजघरातही त्याचे पडसाद उमटत आहेत.
अशीच एक प्रतिक्रिया कानावर आली. बोलकी वाटली.
‘देव आठवावा अशी स्थिती ओढवलेली नाही ही देवाचीच कृपा!’

Sunday, March 22, 2020

दिवस... पक्ष्यांचा आणि माणसांचा!

सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता. बसगाड्यांचा धूरदेखील हवेत मिसळला नसल्याने जाग येण्यासाठी सवयीचा झालेला वासही अजून नाकात शिरला नव्हता ...
हे सगळं अचानक चाललंय काय, या शंकेनं जाणत्या वयस्कर पक्ष्यांनी घरट्यातूनच माना उंचावून बाहेर पाहिले, आणि त्यांना धक्का बसला. चक्क कधीचंच उजाडलं होतं... उन्हाची किरणं अंगावर येऊ पाहात होती, आणि दिनरहाटी सुरू झाल्याचा सांगावा देणाऱ्या सूर्याचा सोनेरी रंग फिका होऊन चकचकीत घासलेल्या चांदीच्या भांड्यासारखा मुलामा त्यावर चढू लागला होता...
मग एकाने हळूच चोच उघडून शीळ घातली, आणि तो दचकला... आपला आवाज एवढा मोठा आहे हे त्याला कधी माहीतच झालं नव्हतं. या महानगरात जन्माला आल्यापासून आपल्या आवाजाचा गोडवाही त्याने स्वत: कधी अनुभवलाच नव्हता. आसपासच्या गोंगाट, कोलाहलात आवाज कधी हरवून जायचा तेही त्याला कळत नसे. कधीकधी तर त्याला स्वत:चीच भीती वाटायची. आपण चोच उघडून, घशाच्या स्वरयंत्राच्या तारा ताणून ओरडतोय खरं, पण आवाज फुटतोय ना, या शंकेनं तो घाबराघुबराही व्हायचा...
आज ती शंका फिटली होती. आपल्याला आवाज आहे, तो मंजुळ आहे आणि त्याला सूरदेखील आहे हे जाणवल्याने त्याने देवाचे आभार मानले आणि पंख फडफडवत पुन्हा एक नवी मंजुळ शीळ घातली. लगेच तो दचकला. लांबवर कुणीतरी तशीच शीळ घातली होती... चार गल्ल्यांपलीकडच्या झाडावरून तो आवाज येत होता... त्याला तो स्पष्ट ऐकूही येत होता. त्याला कमालीचा आनंद झाला आणि पंखावर झुलत त्याने किलबिलाट सुरू केला. आसमंतात तो आवाज घुमू लागला आणि उठूउठू म्हणत घरट्यात आळसावलेल्या पक्ष्यांनी भराभरा उठून आपापले सूरही त्या आवाजात मिसळले. आसमंतभर फक्त पसरलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचा हा अनोखा आनंद अनुभवत महानगरीही मोहरून गेली...
दिवसाची सुरुवात अशी अनपेक्षितपणे अनोखी झाली होती.
नंतर सगळीकडे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या सुरांचेच संगीत घुमत होते, आणि चक्क दूरवरून एकमेकांना प्रतिसाद देत ते आकाशातही विहरत होते.
सकाळपासूनच्या शांततेत उमटणाऱ्या किलबिलाटाच्या आवाजांमुळे अनेक पक्ष्यांना आपल्या भाऊबंदांची नवी ओळख झाली. आपण एवढे जवळ असूनही एवढ्या वर्षांत एकमेकांचा आवाजही ऐकू शकलो नाही या जाणिवेने पहिल्यांदाच सारे पक्षीगण खंतावले, आणि आज पहिलयांदाच अनुभवाला आलेला शांत दिवस आपला आहे असे समजून त्यांनी दिवसावर सुरांचा साज चढविण्यास सुरुवात केली.
पक्ष्यांचे विश्व आज असे महानगरात मोहरून गेले...
दिवस चढत गेला तरी महानगरीत बाकी माणसांच्या अस्तित्वाचा आवाज कुठेच नव्हता. पक्षी आनंदले... आज आपले ऐक्य साजरे करायचे ठरवून आकाशात थव्यांनी विहार करू लागले...
दुपार टळली... आता सूर्य मावळतीला जाणार हे लांवलेल्या सावल्यांनी पक्षांना खुणावण्यास सुरुवातही केली. पण दिवस साजरा करण्याचा उत्साह अजूनही ओसरला नव्हता!
.... अशातच अचानक दणदणाट सुरू झाला. भांडी वाजू लागली. घंटांचा गजर सुरू झाला. दूरवरचा शंखध्वनी शांतता चिरून आवकाशात घुमला... थाळ्या बडवल्या जाऊ लागल्या, आणि टाळ्यांचा गरजरही त्यात मिसळून गेला... कुठेकुठे फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या तर कुठे डीजेचा दणदणाट घुमू लाला... अनपेक्षित झालेल्या या आवाजी हल्ल्याने थवे थिजले. आकाशात उडतानाच त्यांची चिमुकली ह्रदये धडधडू लागली, आणि दिशा बदलून सगळ्या भेदरलेल्या पंखांनी घरट्यांची वाट धरली... भराभर घरी पोहोचून सगळ्या पक्षिणींनी भीतीने घरट्यातल्या पिल्लांवर पंखांची पाखर धरली...
नेहमी तिन्हीसांजेला घरी परतणारे आपले आईबाप आज लवकर का परतले याच्या आश्चर्यात बुडालेली पिल्ले आईला बिलगली!
दूरवरून कुठून तरी, माणसाची घोषणा घुमली...
“गो, करोना गो!”
आणि माणसांचाच दिवस असल्याचे ओळखून पक्षी पुन्हा चिडीचूप झाले!!

Wednesday, March 18, 2020

आकाशफुले!

आकाशफुले!

एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातोकी त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहाते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतोआणि नव्या दिवसावरही तो जुनासुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... 
अगदी अलीकडचा तो एक दिवस असाचमनाच्या कप्प्यात जाऊन बसला.  एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो. थोडा मोकळा वेळ मिळालाम्हणून सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलोआणि गल्लीतल्या गुलमोहोरांच्या सावलीतून पुढे जात असताना अचानक एका बंगल्याच्या पाटीवर नजर स्थिरावली.  मन क्षणभर मोहरलं... 'प्रख्यात कथाकार जी. ए. कुलकर्णी येथे राहात होते', असा फलक बंगल्याच्या दर्शनी भिंतीवर दिसलाआणि आम्ही थबकलो. असं काही दिसलंकी फोटो काढून ठेवावासा वाटतोच! तसंच झालं. मोबाईल काढलात्या बंगल्याचा फोटो काढलातेवढ्यात, 'पुणे ऐतिहासिक वास्तु स्मृतीम्हणून जतन केलेल्या त्या बंगल्याच्या खिडकीतून कुणीतरी डोकावताना दिसलं. मग मात्रआपण आगाऊपणा करतोय असं वाटू लागलंआणि तीनचार फोटो काढून झाल्यावरसभ्यपणानं विचारलं, 'फोटो काढले तर चालतील ना?' त्यांनी मंद हसून परवानगी दिलीआणि पुढच्या काही मिनिटांतच बंगल्याचा दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. आम्ही गेटबाहेररस्त्यावर होतो. मग त्याच म्हणाल्या, 'आत याआणि फोटो काढा'!... पुन्हा एक पर्वणी चालून आल्यासारखं वाटलं. आत शिरलो. नवे फोटो काढले. जुजबी बोलणंही झालंआणि त्यांना काय वाटलं माहीत नाहीत्यांनी आम्हाला अगत्यानं घरात बोलावलं. मी आणि वीणा- माझी बायकोदोघं आत गेलोआणि गप्पा सुरू झाल्या... आता एक खजिना -आठवणींचा खजिना- आपल्यासमोर उलगडणार हे अलगद लक्षात यायला लागलंआणिपूर्वी झपाटल्यागत वाचून काढलेल्या जीएंची मी मनातल्या मनात उजळणी करू लागलो... 
जी. ए. कुलकर्णी नावाचं एक गूढसाक्षात त्यांच्या भगिनीच्यानंदा पैठणकरांच्या मुखातून उलगडू लागलंआणि आम्ही कानात प्राण आणून ते साठवून ठेवू लागलो... जीएंच्या कथांनी तरुणाईच्या उंबरठ्यावरच वेड लावलं असल्यानेमधल्याएवढ्या वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदाजीएंच्या घरात बसूनत्यांच्या भगिनीकडून जीए नव्याने ऐकू लागलो. जीए एकलकोंडे होतेमाणसांपासून अलिप्त रहायचेफारसं बोलत नसतत्यांच्या जगण्यातही त्यांच्या कथांसारखं काहीसं गूढ होतंवगैरे काही समजुती, -त्या वाचनकाळापासूनच- मनात घर करून होत्या. आज त्यांचा उलगडा होणारयाची खात्री झालीआणि गप्पा रंगत चालल्या. जीएंवरच्या प्रेमापोटीकुतूहलापोटी आणि आस्थेने कुणीतरी घरी आलंय याचा आनंद नंदाताईंना लपविता येत नव्हता. 
मग उलगडू लागलेजीएंच्या स्वभावाचे आणि त्या भावंडांचे भावबंध... जीएंचे मोजके सुहृदत्यांच्या मैत्रीचे रेशीमधागेआणि त्या गूढअबोलएकलकोंड्या माणसाच्या जीवनातील काही नाजूक धाग्यांचीही उकल होत गेली... जीए नव्याने समजले... जीए माणसांमध्ये मिसळत नसत हे खरे असलेतरी ते माणूसघाणे नव्हते. त्यांचा स्वतःचा एक अस्सल असा रेशीमकोश होताआणि त्या कोशात काही मोजक्या माणसांनाच प्रवेश होता. त्यांच्याशी ते समरसून गप्पा मारतहास्यविनोद होतयाच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून सिगरेटचे झुरके मारत जीएंच्या गप्पांच्या मैफिली सजतहे वेगळे जीए नंदाताईंकडून समजत गेले...  
कधीकधीएखाद्या अज्ञात समजुतीचं ओझं मनावर दाटून राहिलेलं असतं. इतकं नकळतकी आपण त्या ओझ्याखाली दबलेलो असतोहेही आपल्याला माहीत नसतं. नंदाताईंशी गप्पा मारल्यानंतर एकदम हलकंमोकळं वाटू लागलंआणि मनावर दीर्घकाळापासून दाटलेलं एक ओझं उतरल्याची जाणीव झाली. आपल्या मनावर त्या समजुतीचं ओझं होतंहेही तेव्हाच कळून गेलं...
जीएंच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे अनेक प्रसंग आपल्या 'प्रिय बाबुआण्णाया पुस्तकात नंदाताईंनी रेखाटले आहेत. ते प्रसंग नंदाताईंकडून ऐकतानाते पुस्तक जिवंत होत गेलंआणि जीए नावाचं एक गूढ अधिकृतरीत्या आपल्यासमोर उकलतंययाचा आनंदही वाटू लागला. नंदाताईंच्या आठवणींचे पदर हळुवारपणे आमच्यामुळे उलगडू लागलेआणि सासरी आल्यानंतरचे ते, पहिले दिवस, त्यांच्या डोळ्यासमोर तरळताना आम्हालाही स्पष्ट दिसू लागले. सासरी आल्यानंतर दर आठवड्याला पत्र पाठवायचंहा जीएंनी नंदाताईंना घालून दिलेला दंडकआणि त्यात कसूर झाल्यावर जीएंचा व्यक्त होणारा लटका रागसारं सारं त्यात आमच्या डोळ्यासमोर नंदाताईंच्या आवाजातून उमटत होतं... 
नंदाताई आणि जीए ही मावसभावंडं... प्रभावतीनंदा आणि जीए अशा त्या कुटुंबातल्या तीन पक्ष्यांचं एक अनवट घरटं त्या काळात इतक्या नाजुक विणीने बांधलं गेलं होतंकी त्यातला नंदा नावाचा हा छोटा पक्षी त्या धाग्याशी समरसून गेलायहे लक्षात येत होतं. धारवाडच्या घरात जीएंच्या मायेच्या सावलीत सरलेलं आणि आईवडिलांचं नसलेपण चुकूनही जाणवणार नाही अशा आपुलकीनं सजलेलं बालपण नंदाताईंच्या आवाजातही स्पष्ट उमटलं होतं... पुढे अखेरच्या दिवसांत जीए पुण्याला या नंदाताईंच्या बंगल्यात आलेआणि नंदा पैठणकरांचं घर पुन्हा बालपणातील मायेच्या शिडकाव्यानं सुगंधी झालं. 
याच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून जीएंच्या मोजक्या मित्रांसोबत गप्पांच्या मैफिली रंगत असत... याच घरात जीएंचे सुनिताबाईंसोबतचंग्रेससोबतचं अनोखंनाजूक मैत्रीचं नातं मोहोरलंअसं सांगताना नंदाताईंचा क्षणभर कातरलेला आवाज त्या नात्याच्या वेगळेपणाला हलकासा स्पर्श करून गेला. जीए आणि सुनिताबाईंची पत्रमैत्री मोहोरत असताना त्या दोघांनीही स्वतःभोवती आखून घेतलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा आणि ती न ओलांडण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करून परस्परांविषयी जपलेला आदर... 
...जिवाचे कान करून हे सारं ऐकलं नसतंतर नंदाताईंच्या आवाजातला आणि त्या नात्यातला नाजूक अलवारपणा मनाला जाणवलाच नसता...
बोलताबोलता नंदाताईंनी एक लहानशी पुस्तिका समोर धरलीआणि आमचे डोळे विस्फारले. जीएंनी रेखाटलेल्या चित्रांचा खजिना त्या छापील पुस्तकाच्या रूपाने समोर उभा होता. जीए नावाचं गूढ त्या एकाएका चित्रातून उलगडतंय असा नवाच भास उगीचच होऊ लागला. खडकाळलालसर लाटांनीस्वच्छझगझगीत आकाशापर्यंत वर चढत गेलेली टेकडीतिच्यावरची ती किरकोळ हिरवी खुरटलेली पानं मिरवणारीटेकडीपलीकडेआकाशापर्यंत गेलेली बाभळीची झाडं... 'काजळमाया'मधला एक 'ठिपकासमोर चित्रातून उलगडलाआणि 'चित्रमय जीएपाहताना मन हरखून गेलं... जीएंच्या मनात रुतून बसलेल्याबेळगावातल्या रेसकोर्सवरून परतताना आकाशात आभासलेल्या आकारातून उमटलेला पाण्याचा निळाशार तुकडाही एका चित्रातून व्यक्त झालेला पाहायला मिळाला... मग नंदाताईएकएका चित्रावर बोट ठेवून त्याचं जणू जिवंत रसग्रहण करू लागल्या आणि आम्ही कानातले प्राण डोळ्यात आणून ती चित्र न्याहाळू लागलो...
बोलताबोलता नंदाताईंनी एक पान उघडायला सांगितलं... जीएंनी रेखाटलेलं तीन पक्ष्यांचं सुंदर चित्र... 
मग नंदाताईंनाकिती बोलू असं झालं असावं हे आम्हाला जाणवलं... 
"बाबुअण्णापबाक्का- प्रभावती आणि मी"... त्या स्वतःच म्हणाल्या... 
"यातले जीए कोणते असतीलओळखा बरं"... नंदाताईंनी मिश्किलपणे मला विचारलंआणि मी क्षणभरच विचार करूनफांदीवर एकट्याचदोघा पक्ष्यांपासून काहीसा दूर बसलेल्या पक्ष्याच्या चित्रावर बोट ठेवलं. तेच जीए असणारहे ओळखणं अवघड नव्हतंच... 
मग जीए आणि नंदाताईंमधील त्या चित्रासंबंधीच्या संवादाची उजळणी झाली... 
"जीएंनी ते चित्र पूर्ण केलंआणि मी गंमतीनं त्याला म्हणालेअरेहे तर तू आपलंच चित्र काढलंयस.. तो म्हणालाकशावरून?... मी म्हटलंहे बघ नातू असा अगदी एका बाजूला तटस्थआमच्याकडे लक्ष आहे पण,आणि नाही पणअशा अवस्थेत बसलायस... मग त्यानं मला विचारलंतू कुठली यातली?... मी म्हणालेतूच सांग... त्यात एक छोटासा पक्षी आहे नाती मी... आणि मधली ती प्रभावती... मी तिच्याकडे सारखी भुणभुण लावते नातेच चाललंय... असं मी म्हणालेआणि तो खळखळून हसला...''
"ते चित्र काढताना ते त्याच्या मनात नव्हतं... पण मी हे सांगितलंआणि तो खुश झाला... अरे वा, म्हणजे तुला डोकं आहे म्हणायचं... तो म्हणाला..." 
हे सांगताना नंदाताईंच्या नजरेसमोर तो प्रसंग पुन्हा जिवंत झालायहे आम्ही अनुभवलं आणि त्यांच्या त्या आनंदात आम्हीही खळखळून सामील झालो...
"आमचे खूप छानसुंदर संवाद असायचे... भरपूर गप्पा व्हायच्या... घरातला जीए आणि बाहेरचा जीए ही दोन वेगळीच रूपं होती... बाहेरच्यांमध्ये तो फारसा मिसळत नसे... सभासन्मानसमारंभांपासून तो लांबच राहायचा... फाय फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालातेव्हा तो घ्यायला जायचं की नाही यावरून त्याची थोडी कुरबुरच सुरू होती. कशाला जायचंअसंच म्हणत होता... पण मीआग्रह केला. तुला नाहीतर तुझ्या निमित्ताने आम्हाला तरी मिरवता येईलतुझ्या बहिणी म्हणून... तू हवंतर गप्प बस... आम्ही खूप आग्रह केला...."
...जीएंच्या कथांची पुस्तकं झाली त्याचं नंदाताई अगदी निगुतीनं कौतुक सांगतात.... जीएंच्या कथा दिवाळी अंकात वगैरे प्रसिद्ध व्हायच्या... हातकणंगलेकरांनी त्या वाचल्याआणि भटकळांना पत्र लिहिलं, "सोन्याचं अंडं देणारी एक कोंबडी मी तुमच्याकडे पाठवतोयतू ती पाहा" 
"मग भटकळांनी त्याचा कथासंग्रह काढला. नाहीतरबाबुआण्णा स्वतःहून कथा घेऊन प्रकाशकाकडे गेलाच नसता... ते त्याच्या स्वभावातच नव्हतं..."
कौतुकानंअपूर्वाईच्या आणि आपलेपणाच्या आनंदानं ओथंबलेले नंदाताईंचे शब्द मी त्या दिवशी कानात जसेच्या तसेअक्षरशः, 'टिपूनघेतले!
जीएंची ही सारी मूळ चित्रं आज नंदाताईंकडे आहेत. त्याच्यावरून तयार केलेल्या चित्रांचा एक आल्बम बेळगावातल्या लोकमान्य वाचनालयातील जीए दालनात आहे... 
जीए केवळ कथाकारसाहित्यिकचित्रकारच नव्हते. त्यांना शिल्पकलेचीही जाण होती. एकदा चालताचालता त्यांना रस्त्यावर एका गुलाबी रंगाचा दगड सापडला. त्यांनी तो घरी आणलाआणि जीएंचा हात त्यावरून फिरला... एक सुंदर बुद्धमूर्ती साकारली... एका दगडातून घोडा साकारला. धारवाडहून पुण्यास येताना ट्रकमधील सामानातील ती बुद्धमूर्ती काहीशी डॅमेज झाली. जीएंना खूप रुखरुख लागली. 
"पुण्यास गेल्यावर नव्याने नवी मूर्ती घडवून देईन असे तो म्हणालापण इकडे आल्यावर ते नाहीच जमलं...''  
नंदाताईंचा स्वर काहीसा कातर झाला...
त्या तासभराच्या गप्पांमध्ये नंदाताईंनी आमच्यासमोर त्यांचं 'प्रिय बाबुआण्णाहे पुस्तक आणि त्यातलाही काही अप्रकाशित भाग समरसून जणू वाचून दाखविला होता... 
गप्पांमधून उलगडणारे जीए मनात साठवत आम्ही नंदाताईंचे आभार मानून निघालो.
बंगल्याबाहेर पडल्यावर रस्त्यावरून पुन्हा मागे वळून पाहिलं.
गच्चीवरचा झोपाळा झुलतोयअसा उगीचच भास झाला. 
वाऱ्यासोबत कुठूनसा आलेला सिगरेटचा गंधही त्याच वेळी नाकात परमळून गेला...
जीए नावाचं गूढ थोडसं उकलल्याच्या आनंदाचा गंध त्यात मिसळून छातीभर श्वास घेत आम्ही परतलो...
त्या दिवसानं मनाच्या कोपऱ्यात आता स्वतःच आपला मखमली कप्पा तयार केला आहे !..