Saturday, December 21, 2019

तन्दु रुसती है...

गण्याचं लग्न झालं. सुतन्दिनीशी. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. गण्या प्रेमानं तिला तन्दू म्हणायचा.
एकदा तन्दूने गण्याला किराणा आणण्यासाठी डीमार्टमधे पाठवलं.
काही वेळाने चारपाच पिशव्यांचा बोजा कसाबसा सावरत गण्या घरी आला, आणि तन्दूने सामान भरायला सुरुवात केली. काही पुड्या सोडून डबे जागेवर ठेवले, आणि पुन्हा पिशवीत हात घातला, तर हाताशी आला साबण! ‘लाईफबाॅय’ची वडी!
तन्दू मिनिटभर साबणाकडे बघतच राहिली. तिचा चेहरा बदलतोय असं गण्याला वाटलं... पुढच्याच क्षणाला तिने वडी पुन्हा पिशवीत ठेवली आणि तरातरा बेडरूममधे जाऊन तिने दार बंद करून घेतलं.
गण्या बावरला. काय झालं कळेना. साबणाच्या वडीकडे पहात विचार करू लागला.
आणि त्याची पेटली.
तन्दू रुसली होती.
गण्याला आठवले.
‘लाईफबाॅय है जहाॅं
तन्दू रुसती है वहाॅं...’
गण्याने गुपचूप ती वडी आपल्या कपाटात सिगरेटच्या पाकिटाखाली लपवली, आणि तन्दूला हाक मारली.
तिचा रुसवा गेला होता.
आता पुन्हा कधीच लाईफबाॅय आणायचा नाही, हे गण्यानं पक्कं ठरवलं!!

Friday, December 20, 2019

शास्त्रीय संगीताचं शास्त्र!

मला शास्त्रीय संगीतातलं शास्त्र मुळीच कळत नाही. पण सूर, ताल आणि तान यांचा कानाशी बसणारा आनंददायी मेळ अनुभवणे हा एक आनंद असतो एवढं कळतं, आणि या अनुभवापुरते कुणाचेही कान तयार असतात. माझेही आहेत असा माझा समज आहे.
एखाद्या शांत रात्री, लांबवर शहरातील दिव्यांच्या माळा लुकलुकताहेत, आकाश चांदण्यांनी गच्च भरलं आहे, गारवा भरलेल्या वाऱ्याची मंद झुळूक आसपास विहरते आहे, अशा तन्मय वातावरणात असे काही सूर कानावर पडणे हा एक अमृतानुभव असतो...
आत्ता मी तो अनुभवतोय!
पण अचानक मिठाचा खडा जिभेवर यावा असं काहीतरी वाटून गेलं.
कौशिकी चक्रवर्ती आणि महेश काळे यांची जुगलबंदी !
‘कानडा राजा पंढरीचा’...
दोघांच्या स्वरांच्या जादूने मन भारून गेले असतानाच, ‘हा नाम्याची खीर चाखतो’ या ओळीवर दोघांनीही सुरांच्या लगडी उलगडण्यास सुरुवात केली.
नाम्या या एका शब्दाभोवती तानांच्या गिरक्या सुरू झाल्या, आणि मला वसंतराव देशपांडेच्या काही मिनिटांपूर्वी पाहिलेल्या मुलाखतीतील किस्सा आठवला... ‘मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली’ हे गाणं आळवणाऱ्या गायिकेस जणू ‘शिमला’ दाखवावयास निघाले आहेत, असे वाटावे अशा रीतीने गाण्यातला तो शब्द ‘दाखवावया शिमला’ असा तोडल्यामुळे गंमत झाली, पण दर्दी श्रोते गायकाचा अधिकार मान्य करून ती गंमतही एन्जाॅय करतात हे सांगतानाच वसंतरावांनी गाण्यातले शब्द सुरांच्या सोयीसाठी तोडण्यामुळे होणाऱ्या गंमतीचे बहारदार किस्से या मुलाखतीत कथन केले. ‘रूपबली तो नरशा’ हादेखील सुराच्या सोयीचाच एक आविष्कार!...
नाम्या... नाम्या... नाम्या या शब्दाभोवतीच्या ताना ऐकताना मला तीच मुलाखत आठवलीच, पण पुढच्या ओळीमुळे चोखोबाही आठवला. मग, आमच्या गावातल्या एका हौशी कलाकाराने गायिलेल्या एका अभंगाचा कसा ‘चोथा’ झाला होता, तो प्रसंग आठवूनही मी स्वत:चीच करमणूकही करून घेतली.
त्या मैफिलीत चोखा मेळ्याचा अभंग तो गात होता, आणि श्रोते उगीचच दाद देत होते. गायक रंगात आला होता...
अभंगात, ‘चोखा म्हणे माझा, विठ्ठल विसावा’ वगैरे काहीतरी ओळ असावी. गायक तिथवर आला, आणि दाद मिळताच, ‘चोखा म्हणे माझा’शी रेंगाळला... ताना, गिरक्या फिरक्या मारत, पुन्हापुन्हा, ‘चोखा म्हणे माझा’ या ओळीशी रेंगाळू लागला, आणि काही मिनिटांनंतर श्रोते कंटाळले...
‘अरे पुढे बोल’... म्हणत एका रसिकाने ठेवणीतली कमेंट मारली, आणि मैफलीत ‘हास्यरंग’ उसळला!
नाम्या... नाम्या..., ना... म्या..., ना...म्या’ ऐकताना उगीचच तो प्रसंग आठवला.
म्हणून म्हणतो, अस्सल संगीतातले शास्त्र कळत नसलं की काहीही ‘खटकू’ शकतं कानाला.
... महेश काळे आणि कौशिकी चक्रवर्तीची ती ‘कानडा राजा पंढरीचा’ जुगलबंदी नक्की ऐका, आणि ‘नाम्या’भोवतीच्या ताना आणि फिरक्या कानाला कशा वाटल्या ते नक्की सांगा!

कोई लौटा दे मेरे....


वेळ आली आहे. विचार करण्याची. प्राधान्य ठरवण्याची.
आजचं जगणं जपायचं, की इतिहासाच्या खऱ्याखोट्या दंतकथांच्या आवरणात लपेटून घेत जगायचं हे ठरवण्याची...
घडी विस्कटते आहे. वीण उसवते आहे. कोण कुणाला फसवते तेच समजेनासं झालंय.
कोण कुणाला खेळवतंय हेही कळेना झालंय. सगळीकडे संशय माजलाय. उद्याचा सूर्य उगवणार की नाही एवढं अनिश्चित, असंभव भासायला लागलंय!...
यात जगायचं कसं, जगलो तर तगायचं कसं हा प्रश्नच आहे.
त्यापेक्षा,
आमचे जुने दिवस आम्हाला द्या!
चालेल आम्हाला भ्रष्टाचार, लाचखोरी...
बलात्कार, खून, दरोडे, दंगेधोपे, हाणामाऱ्या...
त्या तेव्हाही होत होत्या, पण उभा देश होरपळत तरी नव्हता.
भ्रष्टाचार करणारे करत होते, पण साधा समाज त्यातही जगत होता. उलट, चिरीमिरीची पुरचुंडी देऊन सहज कामं करून घेत होता.
काळा पैसावाल्यांची घरं नोटा, संपत्ती, ऐश्वर्याने भरली होती, पण साध्या समाजात समाधान, शांतता होती.
आश्वर्यसंपन्न इमारतींच्या सावलीतल्या झोपडपट्ट्यांमध्ये कधी कुठे होत असतील राडे... पण इमारतींच्या आनंदावर कधी नव्हते त्यांनी उमटवले ओरखडे...
एकंदरीत
भ्रष्टाचार, काळा पैसा, लाचखोरी, मनी लाऊंड्रिंग, एनपीए, हे सगळे भ्रम आहेत.
वास्तव जीवनाशी त्याचा संबंध नाही.
आमच्या जगण्याचा त्या जगाशी संबंध नाही ...
ते जिथे चालतं तिथे खुशाल चालू द्या...
आम्हाला आमचा दिवस आणि आमची रात्र हवीय! हक्काची!
भ्रष्टाचार, काळा पैसा चिरडण्यासाठी आम्ही नाही होणार तुमच्या ढाली..
एवढ्या त्यागापायी आम्ही नाही चिरडून घेणार कुणाच्या पायाखाली...
ते जुने दिवस पुन्हा द्या!
समांतर अर्थव्यवस्थेचे आणि त्यामुळे तयार झालेल्या समांतर जगण्याचे!
समांतर जगण्याने दरी होती, पण दरी असली तरी विभाजन नसते हे महत्वाचे!!

Tuesday, October 22, 2019

शब्द

आम्हा घरी धन
शब्दांची कोठारे
शब्दांची हत्यारे
धारदार...

शब्द हे संचित
शब्द व्यवहार
शब्दांचा संभार
मनामाजि...

शब्द न केवळ
बापुडा तो वारा
जीवन पैलतीरा
लावितसे...

जयासि न सीमा
नसे उल्लंघन
शब्दांचे कुंपण
जगण्यासि...


- दिनेश

Monday, October 14, 2019

गुण्या गोविंदा

दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!...
अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते. कारण त्याआधी त्यांनी यावर खूप विचारविनिमय करून मगच त्यांचे तसे एकमत झाले होते.
काही काळ विचारविनिमय व चिंतन केल्याने आताच्या धाकट्याने ठरविले, भोजनालय सुरु करायचे! दहा रुपयात थाळी! मग त्याने जमवाजमव सुरू केली. त्यातलीच एक थाळी उचलून बडवत नव्या भोजनालयाची जाहिरातही सुरू केली, आणि गरीबांचे चेहरे खुलले. दहा रुपयात थाळी मिळणार म्हणताना, सरकारी योजनेतून दोन रुपये किलोने धान्य मिळत असले तरी ते अधूनमधून वाचविता येईल या विचाराने लोकं खुश झाली. जिकडेतिकडे धाकट्याच्या दहा रुपयेवाल्या थाळीचीच चर्चा सुरू झाली. धाकट्याचा सरकारदरबारी चांगला वशिला होता. दहा रुपयेवाल्या थाळीसाठी सरकारकडून अनुदान घ्यायचे हे त्याने मनाशी ठरविलेलेच होते.
तर, दहावाल्या थाळीचा बोलबाला सुरू होताच थोरल्याचा तीळपापड झाला, आणि त्यानेही ठरविले. आपणही भोजनालय सुरू करायचे. पाच रुपयांत थाळी...
दोघेही भाऊ एकाच बिल्डिंगमधे दुकान सुरू करणार हे ठरलेलेच होते. थोरलाही वरची किंमत अनुदानरूपाने सरकारकडून उकळणार होता.
आता धाकट्याला चिंता वाटू लागली. आता दहा रुपये थाळीवाला धंदा कसा चालणार या काळजीने तो बेचैन झाला...
इकडे दोघाही भावांची धंद्याची तयारी जोरात सुरू होती. त्याआधी दोघांनीही पुन्हा एक मिटिंग घेतली. जागा वाटप ठरवून घेतले.
धाकटा बेचैन आहे हे मोठ्याच्या लक्षात आले होते. आपण पाच रुपयात थाळी देणार म्हणताना धाकट्याचा दहा रुपयेवाल्या थाळीचा धंदा बसणार हे थोरल्याने ओळखले. त्याला दया आली. काहीही झाले तरी आपण भाऊ आहोत, हे त्याला माहीत होते.
मग दोघांनी युक्ती केली. दोघांनीही आपापली हाॅटेले थाटली.
थोरल्याचे हाॅटेल सुरू झाले. पहिली चारदोन ग्ऱ्हाईके पाच रुपयांत थाळी खाऊन बाहेर पडताना धाकट्याच्या हाॅटेलातील दहा रुपयात थाळी वाला बोर्ड पाहून हसत पुढे निघून जायची.
काही दिवस गेले.
थोरल्याचा धंदा तुफान चालत होता. गर्दी वाढत होती.
अशातच एक दिवस थोरल्याच्या हाॅटेलात तोबा गर्दी असताना अचानक बाहेर बोर्ड लागला... ‘जेवण शिल्लक नाही!’
गर्दी तर भुकेली होती. पण थोरल्याचा नाईलाज होता... लोकांचाही नाईलाज झाला, आणि सारी गर्दी धाकट्याच्या हाॅटेलात वळली.
पाच रुपयांऐवजी दहा रुपयेवाली थाळी खाऊ लागली. आजकाल साधा वडापावही बारा रुपये पडतात, मग थाळीचा दर ठीकच आहे, असे बोलू लागली.
पुढे असे रोजच होऊ लागले.
थोरला हाॅटेल उघडताच बाहेर बोर्ड लावू लागला.
जेवण शिल्लक नाही!
मग गर्दी धाकट्याकडे वळू लागली.
अशा प्रकारे धाकट्याचा धंदा जोरात सुरू झाला.
आता रात्री, हाॅटेल बंद झाल्यावर थोरला आणि धाकटा रोज एकत्र बसतात. धाकट्याच्या हाॅटेलात संपलेल्या थाळ्यांचा हिशेब केला जातो, आणि धाकटा थोरल्याला पाच रुपयांच्या हिशेबाने पैसे देतो. मह दोघे मिळून थाळीमागे ठरलेल्या सरकारी अनुदानाचे स्टेंटमेंट ट्रेझरीत सादर करतात, आणि अनुदान मिळवतात.
.. अशा प्रकारे, दोनही भावांच्या धंद्याला बरकत आली असून दोघेही पुन्हा गुण्यागोविंदानेच नांदत आहेत.
आता त्यांच्यात कोण मोठा, कोण धाकटा यांवरून वादही होत नाहीत.
कारण, भाऊ हा शेवटी भाऊ असतो, छोटा-मोठा कोण हे महत्वाचे नसते, हे सध्याच्या धाकट्यास कळून चुकले आहे!!

Friday, September 27, 2019

धोबीपछाड

भविष्यात काय असेल माहीत नाही. पण काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची पुरती पडझड झाली आहे, आणि आता ‘कात्रजच्या घाटा’तून दोन्ही पक्षांचा प्रवास सुरू आहे, हे मान्य करावेच लागेल.
या राजकारणातील सगळ्या घडामोडी काही योगायोगाने घडत असतील असे समजणे हा दुधखुळेपणा ठरेल.
मग कोण असेल त्यामागचा मेंदू??
आज सकाळपासून शरद पवार यांनी ईडी चौकशीच्या निमित्ताने धोबीपछाड देऊन बाजी मारल्याचे चित्र तयार झाले आणि मरगळलेल्या राष्ट्रवादीमध्ये चैतन्य सळसळू लागले. या मुद्द्यावर पवारांनी आपली पाॅवर दाखवून देऊन ते पुण्यात पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी दाखल होतात तोच इकडे मुंबईत अनपेक्षितपणे प्रकटलेल्या अजितदादांनी विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला, आणि बातमीचे केंद्रस्थानच बदलून गेले. ईडी आणि चौकशीच्या माध्यमांतील चर्चा संपल्या आणि अजितदादांच्या धक्कादायक खेळीची चर्चा सुरू झाली. थोरल्या पवारांवरील प्रसिद्धीचा झोत काही क्षणांतच धाकट्या पवारांवर स्थिरावला... तेव्हा मुख्यमंत्री मात्र, वर्षावर विश्रांती घेत होते. ही बातमी त्यांना देणारा फोन वाजला आणि ते झोपेतून खडबडून जागे झाले असे म्हणतात. त्यांनी डोळे चोळतच ही बातमी ऐकली आणि त्यांनाही धक्का बसला, असेही कळते.
राजीनाम्याची बातमी सर्वात आधी ज्यांना कळली ती एकमेव व्यक्ती म्हणजे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. नंतर एकएक करून ती वार्ता पसरत पसरत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली...
सगळेच अंधारात?
या घटनांच्या योगायोगासही एक अनाकलनीय संगती आहे. राजकारणात ती असतेच! तरीही, राजीनाम्याची खेळी हा राजकारणातील धक्कादायक चमत्कार म्हणावा लागेल!! जर्जर राष्ट्रवादीला हा एक जबर धक्का आहे, यात शंका नाही.
आता एक नवा डाव सुरू झालेला दिसतो. दादांच्या मनात राजकीय निवृत्तीचे विचार सुरूच होते, हा शरदरावांचा दावा म्हणजे डावपेचाचे नवे संकेत ठरेल अशी चिन्हे आहेत.
आता ‘तो’ मेंदू काय खेळी करतो ते पहायलाच हवे!!
कारण, ‘सातारा’ अजून बाकी आहेच!

Friday, September 20, 2019

तुझं माझं जमेना...

गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे.
पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी... एक म्हणजे, विरोधक असूनही भाजपसोबत सत्तेत राहून सरकारच्या स्थैर्याला सेनेने धक्का लागू दिला नाही. म्हणूनच फडणवीस यांना अल्पमतातील असूनही एकहाती सरकार चालविता आले, आणि दुसरे महत्वाचे म्हणजे, सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका कठोरपणे निभावल्यामुळेच राज्यातील विरोधकांच्या स्पेसवर शिवसेनेने कब्जा मिळविला. राज्यातील खरे विरोधक असलेल्या काॅंग्रेस राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात आज भाजपला जे यश आले आहे, त्याचा मोठा वाटा शिवसेनेचाही आहे.
आज परिस्थिती पालटली आहे, तो शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत बजावलेल्या विरोधकाच्या भूमिकेचा परिणाम असू शकतो. सेना-भाजपचे सूर सरकार म्हणून जुळलेच नाहीत असे वाटण्यासारखी परिस्थिती गेल्या पाच वर्षांत वारंवार दिसत राहिली. विरोधकांची स्पेस कब्जात घेण्यासाठी सेना-भाजपने जाणीवपूर्वकच हे राजकारण जपले असावे असे सुरुवातीला वाटले, पण केंद्र सरकारबाबतही सेना आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत गेली. सरकारचे नाक दाबण्याची कोणतीही संधी जणू सोडायची नाही, असाच सेनेचा पवित्रा राहिला.
कालचे पंतप्रधानांचे खोचक टोमणे आणि आजचा सेनेचा बचावात्मक पवित्रा पाहता, आता बाजी पालटली असून नाक दाबण्याची खेळी आता भाजपकडे आली आहे, हे स्पष्ट दिसते.
म्हणजे, पाच वर्षांतील परिस्थितीचा व सेनेच्या विरोधकाच्या भूमिकेचाही, भाजपने पुरेपूर वापर करून घेतला, असेच चित्र आहे.
आता मिळेल ते घेऊ पण भाजपसोबत राहू अशी हतबलता सेनेच्या सुरात दिसते, हा त्याचाच परिणाम आहे!

Saturday, September 14, 2019

धन वर्षा...

एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती. डॉक्टरांनी तो जीव उचलून हातात घेतला, उलटा केल्याबरोबर त्याची बाहेर आलेली मान उलट्या दिशेने कलंडली. मग त्यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. निर्जीवपणे तो लोंबकळत होता.
डॉक्टरांनी निराशेने नकारार्थी मान हलविली.
ते कासव मेलं होतं.
'काहीच उपयोग नाही... तुम्ही उशीर केलात...' डॉक्टर म्हणाले, आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर काळजी, भीती, चिंता असे सारे संमिश्र भाव स्पष्टपणे उमटले.
'कुठून घेतलं हे कासव?'... डॉक्टरांनी विचारलं
‘कहींसे मंगवाया था'... ती म्हणाली आणि हताशपणे  मागे फिरू लागली.
डॉक्टरांनी निर्विकारपणे तिला खुणेनंच ते मेलेलं कासव उचलण्यास सांगितले, आणि तपासणी फीची रक्कमही सांगितली.
त्या महिलेचा चेहरा आणखीनच चिंताक्रांत झाला.
मेलेल्या कासवाच्या तपासणीसाठी पैसे द्यावे लागणार हाच त्या चेहऱ्यावरील भावाचा अर्थ असावा, हे लक्षात येत होतं. तिने पर्स उघडली. पैसे डॉक्टरांच्या टेबलवर ठेवले, आणि कसानुसा चेहरा करत तो गतप्राण देह पुन्हा कापडात गुंडाळून लांब धरत ती बाहेर पडली...
----
आजकाल अनेक घरांमध्ये कासव पाळण्याची प्रथा पडली आहे.
जनावरांच्या दवाखान्यात अधूनमधून अशी, तळव्याहूनही लहान कासवं उपचारासाठी आलेली दिसतात.
कुत्रीमांजरं पाळणारे प्राणीप्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा घटक म्हणून सांभाळतात. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात, आणि ते प्राणीही निर्व्याजपणे त्या प्रेमाची परतफेड करतात. अशा घरांमधील या सौहार्दामुळे त्या घरांत एक सकारात्मक वातावरण आपोआपच तयार झालेलं असतं. कुठलंही वास्तुशास्त्र घरातील पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कुत्रं-मांजर पाळा असा सल्ला देत नसतानाही हजारो कुटुंबे या प्राण्यांचा कुटुंबातील घटकाच्या मायेनं सांभाळ करतात, आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घरात घेतात...
पण वास्तुशास्त्र मात्र, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कासवं पाळायचा सल्ला देते.
-------
परवाचा जनावरांच्या दवाखान्यातील तो प्रसंग मला आज अचानक आठवला.
कारण, माझ्या मेलबॉक्समध्ये येऊन पडलेला एक ई-मेल.
'तीन पीढियोवाला कछुआ देता है अपार धन.. इतना धन, की आप संभाल नही पाओगे... घरमे कछुआ रखने को बहुत शुभ माना जाता है... अपने घर कछुआ ऑनलाईन मंगवाने के लिए, यहा क्लिक करे.. इससे घर और ऑफिसमे सकारात्मक उर्जा का प्रवाह बना रहता है!;... '
'धन वर्षा कछुआ' अशा मथळ्याखाली कासवाची ती जाहिरात मेलवर येऊन पडली होती. ती वाचली, आणि मला त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला.
ते मेल्याचं तिला वाईट वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी स्पष्ट दिसत होतं.
आता मला त्याचं वेगळंच कारण असावं, असं वाटू लागलं.
ते ‘धनवर्षा करणाऱ्या’ त्या कासवांपैकीच एक तर नसेल?ते कासव असं अचानक मेलं, तर धनाचा वर्षाव कमी होणार या भयाने तर तिचा चेहरा दुःखी झाला नसावा?
धनवर्षा करणाऱ्या कासवांच्या धंद्यामुळे कुठे तरी धन वर्षा सुरू आहे, हे स्पष्ट आहे. बिचारी मांडुळं तर आता नष्ट व्हायला लागली आहेत.
----
शिक्षणाचा अभाव आणि समजुतींचा पगडा यांमुळे अंधश्रद्धा फोफावतात, असे म्हणतात. पण तळव्यावर मावणारी कासवं दिवाणखान्याच्या दर्शनी भागात ठेवून शोभेची वस्तू म्हणून त्यांना मिरवणारा समाज अशिक्षित आडाणी नसतो. धनवर्षावाची हाव हेच त्याचे कारण असेल, तर त्या मुक्या जिवांच्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल ते स्पष्टच आहे....

उतारा!

कोणत्याही समस्येकडे सकारात्मक व विधायक भावनेने पाहिले तर कितीही गंभीर समस्या असली तरी ती कोणत्या तरी बाजूने उपकारक वाटू लागते, व एक समस्या हा दुसऱ्या त्याहून तीव्र समस्येवरील इलाज असावा असेही वाटू लागते.
महागाई, निवाऱ्याचा प्रश्न, महागडे शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी माणसाचे जगणे कठीण झाले आहेच, पण याच समस्यांमुळे या समस्येचे मूळ असलेली, बेफाम वाढणाऱ्या लोकसंख्येची बेसिक समस्या आटोक्यात यायला मदत झाली, हे वास्तव आहे.
अपुऱ्या आर्थिक उत्पन्नामुळे कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याचा मुद्दा संकटासमान वाटू लागतो. मुलाच्या जन्माआधीच आईबापांना त्याच्या अॅडमिशनचा, प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या डोनेशनचा, शाळा महाविद्यालयांतील भरमसाठ फीचा आणि शिक्षणातील गुणवत्तेसाठी सुरू असलेल्या गळेकापू स्पर्धेचा धसका बसलेला असतो. या सगळ्यातून पार पडून आपले मूल भविष्यात सुखी समाधानी व चांगले नागरिक बनू शकेल का, आपण तसे बनविण्यातील आपली जबाबदारी पेलवू शकतो का, हा विचार बळावतो, आणि नकारात्मक उत्तराच्या भयापोटी, ‘नकोच ते मूल’ असा निष्कर्ष काढणे भाग पडते.
महागाई, बेरेजगारी हे प्रश्नही कुटुंबविस्तीराच्या विचाराला वेसण घालतात, तर ‘डोक्यावर छप्परच नसेल तर संसाराचा पसारा कशाला वाढवायचा असा विचार बळावू लागतो.
अशा अनेक समस्यांचा परिणाम म्हणून लोकसंख्येची वाढ रोखली जाते.
हा या समस्यांचा थेट परिणाम नसला तरी लोकसंख्यावाढीचा वेग कमी होण्याची ही अप्रत्यक्ष पण प्रमुख कारणे असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. अर्थात, समस्या कायम ठेवणे किंवा वाढत ठेवणे हा अन्य कोणती समस्यांचा उपाय नाही, हे खरेच असल्यामुळे या समस्या म्हणजे अप्रिय, कडवट विषारी डोस आहे हेही खरे आहे.
पण काही समस्या सोडविण्यासाठी काही भयंकर मात्रा लागू पडतात.
मुंबईसारख्या महानगरातील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी याआधी सनदशीर मार्गांनी अनेक उपाय केले गेले. फ्लायओव्हर झाले, सी-लिंक झाला, फ्रीवे झाला, पादचाऱ्यांसाठी स्कायवाॅकही झाले. पण माणसांची आणि वाहनांची गर्दी वाढतच राहिली आणि वाहतुकीचा प्रश्न बिकटच होत गेला. आता तो एवढा बळावला आहे, की तो कायमचा सोडविण्यासाठी एखादी नवी समस्याच उभी करणे हाच पर्याय ठरावा...
केंद्र सरकारने संमत केलेल्या नव्या वाहन कायदा ही एक समस्या असल्याचे काहींना वाटू लागले असले, तरी या कायद्यातील दंड आकारणीच्या जबर तरतुदीमुळे रस्त्यावर विनाउद्देश उतरणाऱ्या वाहनांच्या गर्दीस आळा बसणे शक्य आहे. नवा कायद्याचा धसका हा समस्याग्रस्ततेमुळे लोकसंख्या विस्तारास वेसण घालण्याच्या विचारासारखाच जालीम उपाय ठरू शकतो, यात शंका नाही.
काही वेळा, नवी समस्या हाच दुसऱ्या जुनाट समस्येचा उपाय असू शकतो.
तुम्हाला काय वाटते?

Thursday, September 12, 2019

भविष्य

वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही. उलट, तसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस प्राप्त होते.
तरीही, वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, तसे घेऊन दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे स्वत:चे मत आहे.
त्यासाठी ही पोस्ट!
उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये आज माझ्या राशीच्या ‘भविष्या’त म्हटले आहे की, ‘कमी पडू नका. आपले काम साधून घ्यावे. ‘लेकी बोले सुने लागे’ करावे लागेल!’
आता, एक तर, आजचे हे राशिभविष्य मी अर्धा दिवस उलटल्यानंतर वाचले. म्हणजे, ते खरे ठरविण्याचा अर्धा दिवस वाया गेला. म्हणजे, या क्षणापर्यंत या भविष्यानुसार काही घडलेले नाही.
आता उरलेल्या अर्ध्याच दिवसांत हे भविष्य खरे ठरवावे लागणार आहे. वेळ कमी असल्याने व ‘कमी पडू नका’ असे भविष्यातच म्हटलेले असल्याने, पुढच्या अर्ध्या दिवसात ते खरे ठरविण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडला आहे.
... त्यासाठी ‘सेकंड ओपीनियन’ हवे आहे!!

Sunday, September 8, 2019

बिगरी ते डिगरी (२)

भोंदे शाळेत का. वि. सावंत नावाचे हेडमास्तर होते. जेमतेम पावणेपाच फूट उंचीचा हा माणूस समोर दिसला, की मुलांची अक्षरशः फाटल्यागत व्हायची. जाम कडक वाटायचे. पण आम्ही त्यांना अधूनमधून हसतानाही पाहिले होते. त्यांना एक सवय होती. सिगरेटची! शाळा सुरू असताना ते मधेच कधीतरी शाळेच्या मागे भिंतीजवळ जाऊन सिगरेट ओढून यायचे. ते आम्ही पाहायचो. पण सिगरेट ही मुलांच्या देखत ओढण्याची वस्तू नाही, हे त्यांना माहीत होते. ते तसे करत त्यामुळे आम्हालाही ते कळले. सावंत गुरुजी सिगरेट ओढतात हे आम्हाला माहीत होते, पण मुलांनी ते करू नये म्हणून ते शाळेमागे जाऊन घाईघाईने सिगरेट ओढून परत येतात, यावरून सिगरेट ओढणे वाईट हा संस्कार आमच्या बालमनावर तेव्हा झालाच! हे गुरुजी मला आजही जसेच्या तसे आठवतात. कारण, माझ्या डोक्याचा लहान मेंदूकडचा भाग... जेव्हाजेव्हा माझा हात डोक्याच्या त्या बाजूला जातो, तेव्हातेव्हा तिथे कधीतरी झालेल्या एका स्पर्शाच्या आठवणी जाग्या होतात, आणि तो स्पर्श आपला आयुष्यभर पाठलाग करणार हे जाणवून सावंत गुरुजी आठवतात...
ती एक गमतीदार कहाणी आहे. आमच्या वर्गातलाच एक मुलगा- आम्ही आणि सगळेच जण त्याला दादा म्हणायचो- एकदम हिरो होता. त्या काळात त्याच्या मनगटावर चकचकीत पट्ट्याचे घड्याळ असायचे. गळ्यात वाघनखाची सोन्याची चेन, कधीकधी डोळ्यावर गॉगल, मस्त सजवलेली हरक्युलस सायकल, दप्तराची पत्र्याची पेटी असा त्याचा थाट होता. तो आपोआपच सगळ्यांचा हिरो, लीडर झाला होता.
दर शनिवारी शाळेचा वर्ग आणि बाहेरचा पॅसेज सारवायचे काम मुलांना करावे लागायचे. एका शनिवारी आमच्या वर्गाची पाळी असताना, आम्ही शेण गोळा करायला पत्र्याच्या तीनचार बादल्या काठीत कडी अडकवून पालखीसारख्या नाचवत गावाबाहेरच्या रानात गेलो. तिथे गुरं चरायला यायची. त्यामुळे शेण मुबलक सापडायचे. तर, त्या रानात गेल्यावर चार बादल्या शेण गोळा करून झाडाखाली बसलो असताना अचानक दादाने खिशातून काही पेेनं बाहेर काढली. आणि प्रत्येकाच्या हातावर एकएक पेन ठेवलं. आमचे डोळे विस्फारले. वर्गातल्याच मुलांची कधी ना कधी पेनं गायब व्हायची. कुणी तक्रारीही करत. पण चोर कधीच सापडत नसे. आज एवढी पेनं दादाच्या खिशात पाहून ते कोडं सुटलं होतं. आणि त्याचा भागीदार करून घेण्यासाठी दादाने एकएक पेन आमच्या हाती दिलं होतं. क्षणभरासाठी छातीत धडधड झाली. आपण करतोय ते चांगलं काम नाही, हेही जाणवलं. ही चोरी उघड झाली तर आपण पकडले जाऊ अशी भीतीही वाटू लागली. आम्ही दादाला तसं सांगितलं, आणि पेनं परत करू लागलो. पण दादानं डोळे वटारले. आता पेनं घेतली नाहीत, तर दादाची चोरी सगळ्यांना कळणार होती. दादाला ते माहीत होतं. म्हणून त्याने सगळ्यांच्या हातात बळेच पेन कोंबलं, आणि चोरी लपविण्याची एक युक्तीही सांगितली. पेनला तेल-हळद लावली की त्याचा रंग बदलतो. मग मूळ मालकाला ते पेन आपले आहे हेही कळत नाही... दादाने सांगितलेली ही युक्ती भन्नाट होती. ती करून पाहावी यासाठी तरी पेन घ्यावे असे वाटून मी ते पेन खिशात ठेवलं, आणि धडधडत्या छातीने वर्गात परतलो. त्या दिवशी पेन जपतच आम्ही वर्ग सारवले. शाळा सुटली. घरी गेलो, आणि आईकडून एका वाटीत गोडेतेल घेतले. त्यात चमचाभर हळद घातली, आणि चोरीचा रंग बदलण्यासाठी हळूच मागच्या पडवीत गेलो. तिथे पेनावर तेलहळद लावली, आणि आश्चर्य... काही सेकंदातच पेनाचा मूळ रंग पुरता बदलला होता... आता आपल्याला हे पेन राजरोस वापरायला हरकतच नाही, असे समजून मी ते पेन दप्तरात ठेवले.
सोमवारी शाळेत गेलो, तेव्हा काहीजण पेन हरवल्याच्या तक्रारी सावंत गुरुजींकडे करत होते. वर्गात वातावरण काहीसे तंग वाटत होते. सावंत गुरुजींनी शांतपणे तक्रारी ऐकून घेतल्या. मागे जाऊन एक सिगरेट ओढली, आणि ते परत आले. एकएक मुलास दप्तर ओतण्याचा आदेश झाला. माझी पाळी आली. मी प्रचंड विश्वासाने दप्तर मोकळेही केले. ते रंग बदललेले पेन खाली पडले, आणि ज्याचे पेन होते, त्याच्या नजरेत संशय उमटला... पण मी घाबरलो नाही... सावंत गुरुजींनी पेन उचलले. त्याचे टोपण उघडले, आणि त्यांचे डोळे चमकले. मग मात्र मी घाबरून गेलो. टोपणच्या आतल्या बाजूला तेलहळद लावायची राहूनच गेली होती. माझी चोरी, आणि रंग बदलण्याचे दादाचे तंत्र, दोन्हीचा पर्दाफाश झाला होता...
मग अपेक्षेप्रमाणे, सावंत गुरुजींना मला बकोटीला धरलं. वर्गासमोर उभं केलं, आणि घंटा वाजवायचा टोल लाकडी हातोडा हाती घेऊन टणाटणा माझ्या डोक्यात लहान मेंदूच्या बाजूला प्रहार करण्यास सुरुवात केली. शाळा सुटली तेव्हा डोक्यावर दोनचार टेंगळं उगवली होती. नंतर दोन दिवस तिथे हात गेला, की वेदनेची सूक्ष्म जाणीव व्हायची, आणि चोरी करणे वाईट हा धडा आणखीनच पाठ व्हायचा...
आजही, डोक्याच्या मागच्या बाजूला हात गेला, त्या जागी स्पर्श झाला, की, चोरी करू नये हा लहानपणी मिळालेला धडा पक्का आठवतो, आणि सहाजिकच, सावंत गुरुजीही आठवतात...
मोठा झाल्यावर मी सिगरेट ओढू लागलो होतो. पण मोठ्या माणसांसमोर आणि लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये, हे मी लहानपणीच शिकलो होतो. त्याचे श्रेयदेखील त्यांचेच!... ते शाळेमागे जाऊन मुलांच्या नजरेआड सिगरेट ओढतात, हे दिसायचे, तेव्हा, लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये हाच संदेश त्यांना द्यायचा असावा, हे आम्हाला लहानपणीच कळले होते.
आता मी सिगरेट ओढत नाही. पण मुलाबाळांदेखत सिगरेट ओढणारा कुणी पाहिला, की मला शाळेमागे जाऊन सिगरेट ओढणारे सावंतगुरुजी आठवतात...

Saturday, September 7, 2019

बिगरी ते 'डिगरी'! ( १)

तर, आपल्या बोटाला धरून 'बिगरी'पासून 'डिगरी'पर्यंतचा प्रवास घडवून आणणाऱ्या गुरुजनांच्या अनेक आठवणी काल मनात अचानक, आणि नकळतही, उचंबळून आल्या.
अशा आठवणींना वयाचा क्रम नसतो. म्हणजे, संगमनेरच्या नवीन मराठी शाळेच्या पहिल्या मजल्यावरचा तिसरीचा ५२ वर्षांपूर्वीचा वर्ग अचानक लख्ख आठवायला लागतो, नऊवारी पातळ नेसलेल्या, कपाळावर चंद्राएवढा कुंकवाचा टिळा लावलेल्या करजगीकर बाई गणिताचा पाढा शिकवताहेत आणि आपण मांडी घालून जमिनीवर बसल्यावस्थेत पेंगत झोपेचे आक्रमण परतवून लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, असे दृश्य जसेच्या तसे आठवून हसूदेखील येते, तोवर एकदम देवरूखच्या भोंदे शाळेतला ४८ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग धूसरपणे जागा होऊ लागतो.
या शाळेत मी चौथीच्या वर्गापासून दाखल झालो. चौथीला के. ज. पुरोहित नावाचे गुरुजी होते. (त्यांची पुढे ‘शांताराम-केजं’मुळे कायम आठवण येत असे.) देवरुखपासून आठएक किलोमीटरवरचं काटवली हे त्यांचं गाव. शनिवारी सकाळी शाळा असली की गावातच, अगदी शाळेची घंटा घरात ऐकू येईल एवढ्या अंतरावर असूनही आम्हाला हमखास उशीर व्हायचा, पण स्वच्छ पांढरा लेंगा सदरा घातलेली, दाट केसांचा व्यवस्थित भांग पाडलेली पुरोहित गुर्जींची मूर्ती मात्र, खुर्चीत दाखल असायची. हस्ताक्षर ‘घडविणे’ हा त्यांचा ‘ध्यास’ असायचा. एकएका मुलासमोर मांडी ठोकून बसून, उजव्या चिमटीत टाचणी लपवून ते ‘ह’ आणि ‘ळ’ ही अक्षरे घोटवून घेत असत. ही दोन अक्षरे वळणदारपणे लिहिता येईल त्याचे हस्ताक्षर सुंदर झालेच समजा, हा त्यांचा सिद्धान्त होता... ते वळण मनाजोगते जमेपर्यंत त्यांच्या हातातील टाचणीचे टोक किती वेळा मी बोटावर टोचून घेतले असेल त्याची गणतीच नाही. पुढे माझे हस्ताक्षर सुवाच्यच नव्हे, तर सुंदर झाले. एवढे, की मलाच नव्हे, तर इतरांनाही माझ्या अक्षराचा अभिमान वाटू लागला. इतका, की पुढे शाळा-काॅलेजातील सभा-समारंभांच्या निमित्ताने फळ्यावर ‘सुस्वागतम’ किंवा ‘सुविचार’ वगैरे लिहिणे हे माझे कामच ठरून गेले. नंतर तर, देवरुखच्या बाजारपेठेतील माणिक चौकात पुरोहित टेलरांच्या इमारतीवरील ‘ग्रामफलका’वर देश आणि जगातल्या महत्वाच्या बातम्या गावासाठी लिहिण्याची जबाबदारी आम्ही काही मित्रांनी माझ्या हसिताक्षराच्या विश्वासावरच उचलली, आणि कितीतरी वर्षे पेललीदेखील!
माझ्या ‘बातमीदारी’ची मुळे बहुधा त्यातच रुजली असावीत.
आणि त्याचे मूळ, पुरोहित गुर्जींनी टोचून टोचून घोटवून घेतलेल्या ‘ह’ आणि ‘ळ’ मध्ये असावे. आजही, ही अक्षरे कोणत्या शब्दात वाचताना किंवा लिहीताना मला पुरोहित गुरुजींची आठवण होते.!
(क्रमश:)

Monday, September 2, 2019

पहाट

सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...

कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!

लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...

घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!

Thursday, August 29, 2019

पुस्तक

अलीकडेच माझ्या मनात एक विचार आला. पुस्तक लिहायचा. या पुस्तकाची संकल्पना मी तुम्हाला सांगणार नाही. पण हे नक्कीच वेगळ्या धाटणीचे पुस्तक ठरावे असा माझा प्रयत्न होता.
कधीकधी पुस्तकाचे नावच त्याचा गाभा उलगडून दाखविते.
म्हणून पुस्तकातील पहिल्या लेखाचे पहिले अक्षर लिहिण्याआधी मी पुस्तकाचे नाव निश्चित केले... ‘युद्ध आमुचे सुरू!’...
ज्या डायरीत माझे हे संकल्पित पुस्तक हस्तलिखित स्वरूपात संपन्न होणार आहे, त्या डायरीच्या पहिल्या पानावर मी झोकदार अक्षरात हा मथळा लिहून टाकला आहे.
‘युद्ध आमुचे सुरू!’
... आज बायकोच्या हाताला ती डायरी लागली, आणि ती घाबरीघुबरी झाली.
तिने गुपचूप ती रद्दीत टाकली, आणि रद्दीवाल्याला फोन केला.
रद्दीवाला आला. बायकोने रद्दीच्या गठ्ठ्यात डायरी मधोमध लपविली, आणि गठ्ठा रद्दीवाल्यासमोर ठेवला.
रद्दीवाला चाणाक्ष आहे. वर्तमानपत्रांचा रद्दीत एकच डायरी पाहून त्याचे कुतूहल चाळवले. त्याने डायरी उचलली, आणि पहिल्याच पानावरचा मथळा वाचला. ‘युद्ध आमुचे सुरू!’...
त्याचे डोळे आत्ता विस्फारले आहेत.
त्याने शांतपणे डायरी परत केली, आणि बाकीच्या रद्दीचे वजन करून पैसे देऊन रद्दीचा गठ्ठा खांद्यावर टाकून तो निघून गेला.
आत्ता ती डायरी हातात घेऊन बायको दरवाजात उभी आहे. निराश नजरेने ती रद्दीवाल्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहाते आहे.
वातावरण आणखी तंग होणार हे ओळखून मी पुढे झालो.
ती डायरी घेतली, आणि पहिले पान फाडून त्याचे तुकडे तुकडे करून ते डस्टबिनमधे टाकले.
आता वातावरण निवळले आहे. डायरीही कोरी झाली आहे.
...आणि त्या संकल्पित पुस्तकासाठी दुसरे नाव मी शोधतो आहे!!

Wednesday, August 28, 2019

माणुसकी



माणुसकीला अजूनही धुगधुगी आहे, तोवर ती जगविण्यासाठी हालचाल केली पाहिजे.
 भर पावसाळ्यात ओलाव्याने जडावलेल्या झाडांच्या फांद्या तुटून कोसळतात, झाडेही उन्मळून पडतात. त्यामुळे होणारी हानी हा निसर्गाचा दोष नाही. पण निसर्गाचे संतुलन राखणे हे माणसाचे कर्तव्य आहे. निसर्गाची कत्तल करून माणसाचे हित सांभाळणे ही माणुसकी नव्हे!
मुंबई महापालिकेकडून पावसाळयात माणसाच्या सुरक्षिततेसाठी झाडे अमानुषपणे छाटली जातात. त्यामुळे झाडांच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात, आणि स्वत:स वाचवू न शकणारी असंख्य पिल्ले आकाशात भरारी मारण्याआधीच देवाघरी जातात...
माणसाच्या डोक्यावरील संकटाची टांगती तलवार दूर करताना, जगण्याच्या आशेने केवळ चिमुकल्या व केवळ परावलंबी मातापित्यांवर निर्भर असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा बळी घेतला जातो, हे त्यांच्या गावीही नसते.
महापालिका सभागृहाच्या बैठकीत शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर नावाच्या नगरसेविकेने या मुद्द्याला वाचा फोडून माणुसकीचे दर्शन घडविले. वृक्षछाटणीचे काम शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे व छाटणीआधी फांद्यांवरील घरटी तपासावीत अशी मागणी त्यांनी केली. घरटे नसेल तरच फांद्या छाटाव्यात असा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महापालिका प्रशासनाचा यावर काय प्रतिसाद होता ते आज प्रसिद्ध झालेल्या बातमीतून स्पष्ट झाले नाही, पण राजकारणाने लडबडलेल्या क्षेत्राच्या एका कोपऱ्यात कुठेतरी माणुसकीही धुगधुगी धरून आहे, याचा दिलासा या बातमीने नक्कीच दिला.
पक्ष्यांना वाचता आले असते, तर आज झाडाझाडावर, फांदीफांदीवर किलबिलाट करून त्यांनी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असता.
पुढचं पुढे!!

Tuesday, August 27, 2019

योगक्षेमं वहाम्यहं...

नरीमन पाॅईंटला भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर, ‘योगक्षेम’च्या फुटपाथवर काही कुटुंबे राहातात. या कुटुंबातील महिला बहुधा फुलांचे गजरे वगैरे करून विकतात. लहान मुले, एअर इंडियासमोरच्या फुटपाथवरील खाऊ गल्लीत भेळ, वडापावच्या टपऱ्यांसमोरील गिऱ्हाईकांसमोर हात पसरून पोटभर कमावतात. बसस्टॉपवर बांधलेल्या साड्यांच्या पाळण्यात किंवा फूटपाथवरच झाडाच्या सावलीत लहान मुलांना झोपवून त्यांच्या आया दिवसा मोबाईलवरचे पिक्चर वगैरे बघत पडलेल्या दिसतात.
पुरुष काय करतात कळू शकत नाही. अंधार पडला की ही कुटुंबे आपापल्या फुटपाथवरच्या अदृश्य चौकटीतील घरात गोळा होतात. मग गप्पा, वादावादी, भांडणं आणि मारामाऱ्या अशा चढत्या क्रमाने त्यांची रात्र चढत जाते... काही कुटुंबाच्या घरात मात्र, एका पत्र्याच्या डब्यावर आडव्या ठेवलेल्या मोबाईलच्या पडद्यावर ‘पिक्चर’ सुरू असतो, आणि या ‘मिनी थियेटर’मधील महिला एकाग्रपणे तो पाहण्यात मग्न असतात.
या कुटुंबांच्या जीवनशैलीविषयी माझ्या मनात, का कोण जाणे, नेहमीच एक कुतूहल भरून राहिलंय.
त्याचं कारणही तसंच आहे.
एवढी कुटुंबे येथे कायमचे बस्तान मांडून बसलेली असली, तरी त्यांनी ठाण मांडलेल्या एकाही ‘घरा’त चूल पेटत नाही. किंबहुना, तेथे चूलच दिसत नाही. समोरच्या, जनता दलाच्या प्रदेश कार्यालयाच्या आवारात चालणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवरून जेवण विकत आणून त्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम चालतो. त्या स्टाॅलच्या चुलींवर शिजणाऱ्या अन्नाच्या दाण्या दाण्यावर या कुटुंबांचीच नावे लिहिलेली असावीत. कारण ही कुटुंबे म्हणजे या स्टाॅलची परमनंट मेंबर असावीत... समोरच कोपऱ्यावर एक सार्वजनिक शौचालयही आहे. लहान मुले बऱ्याचदा, फुटपाथवर कडेला रस्त्याकडे पाठ करून ‘बसलेली’ दिसतात. पाऊसबिऊस आला की सगळेजण बाडबिस्तरा गुंडाळून ‘योगक्षेम’च्या मुख्य दरवाजांना जोडणाऱ्या पुलाखाली गोळा होतात. पाऊस थांबला की आपापल्या अदृश्य भिंतींआडच्या घरातला संसार पुन्हा सुरू होतो.
राजकारण, श्रीमंती, करोडोंची उलाढाल करणाऱ्या उद्योगधंद्यांची काॅर्पोरेट कार्यालये आणि यांच्या विळख्यात राहूनही आपलं अस्तित्व अलिप्तपणे जपणारी ही कुटुंबे...
एकंदरीत बरे चाललेले असावे...
... ‘आकाश मंडप, पृथिवी आसन’ अशा आध्यात्मिक प्रवृत्तीने जगणाऱ्या या कुटुंबातील एक आई काल आपल्या तान्हुल्याला चहात बुडवून बिस्किट भरवताना मी पाहिलं.
पाच रुपयेवाला, निळ्या पॅकमधला, पार्ले जीसारखा कुठलासा पुडा समोर उघडून ठेवला होता...
आजही सामान्य आणि गरीब कुटुंबांतील लहान मुलांना चहासोबत बिस्किटच्या नाश्त्याचेच बाळकडू दिले जाते, हा याचा अर्थ!

Sunday, August 25, 2019

गोविंदा

थर थर वरवर
लावून भरभर
चढतो सरसर
गोविंदा ...
मनात हुरहुर
भयाण काहूर
धपापतो उर
गोविंदा... 
अखेरचा थर
निसटला जर
लटकतो वर
गोविंदा... 
खालुनि घुमतो
गर्दीचा स्वर
गोपाळा रे
गोविंदा!!

Wednesday, August 21, 2019

'भाषा' आणि 'नवता'...

बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातली पुरुष मंडळीचा ‘पंचा उपरणं पागोटं’ असा वेश असायचा, बायका ‘लुगडं’ नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा ‘धोतर सदऱ्या’ने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर ‘कोट’ आला. ‘वहाणां’ची जागा ‘चप्पल’ने घेतली. पुढे काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.

भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.

मागे कधीतरी, ‘पुण्याच्या’ एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. ‘पुण्यात’!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!

मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं...

“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”

नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, ‘इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!’

भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.

या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जागविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जागविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.
पण कुणीतरी करायला हवी. करताहेत...
त्यांना सलाम !!

'मंदीचा फेरा'

काही गोष्टी आपण उगीचच खाजगीपणाच्या नावाखाली लपवितो किंवा सांगायला लाजतो आणि त्याचे भयंकर व्यापक असे सामाजिक परिणाम होतात. तेही आपल्यालाच भोगावे लागतात, हे वेगळेच! या परिणामांचा प्रभाव कमी करायचा असेल तर खाजगीपणा म्हणून उघड न करावयाच्या काही गोष्टी सर्वांनी एकमेकांशी शेअर कराव्यात, त्याचा प्रसार करावा असे वाटते.
आजकाल सोशल मीडियामुळे विचारांचे आदानप्रदान तसेही सोपे झाले आहे. त्यातून समस्यांवर मात करण्याचा मार्ग सापडू शकतो. मंदीसारख्या समस्यांवर तर, सोशल मीडियावरील अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुरूदेखील झाले आहे.
सध्या तर, देशावर मंदीचे सावट दाटले आहे. अंडरगारमेंटचा- म्हणजे चड्ड्या-गंजीफ्राॅकांचा वगैरे- खप कमी झाल्यामुळे ही बाब स्पष्ट झाली हे जेव्हा वाचनात आले, तेव्हा मनात एक विचार आला. मंदीचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.
अंडरगारमेंटची म्हणजे चड्डी-बनियनची, साॅक्सची- म्हणजे पायमोज्यांची- एखाद दुसरी जादा जोडी प्रत्येकाने थेट मंदी सुरू होण्याआधी आज विकत घेऊन ठेवली तर? हातात पैसा खेळता आहे तोवर हे केले, तर मंदीच्या काळात पैसा जपण्याची जी कसरत करावी लागते, ती टाळणे शक्य होईल, आणि या मोहिमेस चळवळीचे रूप येईल.
ही चळवळ वाढली तर अंडरगारमेंटचा खप वाढेल आणि मंदीचे पहिले लक्षण जे मानले जाते, तेच संपुष्टात येईल.
तुम्हाला काय वाटते?

Tuesday, August 20, 2019

लाल परी...

दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.
या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे. या गाडीचा जिव्हाळा वाटण्याचे ते एक कारण आहेच, पण माझ्या दृष्टीने या गाडीचे एका अविस्मरणीय इतिहासाशी नाते आहे. माझ्या आठवणींत ते नाते आजही ताजे आहेच, पण एका हरवलेल्या काळाची ती हळवी आठवणही आहे!
... आज ही गाडी दिसली, आणि मला खूप जुना, बहुधा १९६५-७० च्या काळातला तो प्रसग आठवला. मी तो पाहिलेला नाही. पण तो जसा ऐकला, तसाच्या तसा घडलेला असणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
**
मुंबई सेंट्रलवर या गाडीची वाट पाहात एक गृहस्थ उभे होते. खाकी शर्ट, खाकी हाफ पॅन्ट, किंचित वाढलेले दाढीचे खुंट डोक्यावरचे तुरळक बारीक केस आणि पाच फुटांहून कमी उंचीचे हे गृहस्थ फलाटावर बाकड्यावर बसले होते. गळ्यातल्या पट्ट्याच्या पिशवीत भरलेले कपडे एवढेच सोबतचे सामान!... गाड्या फलाटावर लागत होत्या आणि प्रवाशांची धावाधाव सुरू होती. हे गृहस्थ शांतपणे ते सारे मनात जणू टिपून घेण्यासाठी निरीक्षण करत बसले होते.
... अचानक कुणीतरी खुणेनंच त्यांना बोलावलं. एक उंची कपड्यातला, बूट घातलेला माणूस आपली बायको व मुलांसोबत उभा होता. बाजूला एक मोठी बॅग होती. त्या माणसाने खुणेनेच या गृहस्थास बोलावले, आणि हे शांतपणे उठून खांद्यावरची आपली पिशवी सावरत त्याच्यासमोर उभे राहिले.
‘ही बॅग गाडीवर टाक!’... त्याने हुकमी आवाजात या गृहस्थास फर्मावले.
क्षणभर नजर चमकली. चेहऱ्यावर एक मिश्किल हास्यरेषाही उमटली, आणि काहीच न बोलता या गृहस्थांनी वाकून ती बोजड बॅग डोक्यावर घेतली व बघता बघता बसगाडीची शिडी चढून बॅग गाडीच्या टपावर ठेवून ते खाली उतरले...
खांद्यावरच्या चतकोर रुमालाने चेहरा पुसत त्यांनी त्या पॅन्टबूटवाल्याकडे पाहिले. पुन्हा डोळ्यात तीच चमक, अन् चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य...
त्या पॅन्टबूटवाल्याने खिशात हात घातला, अन् रुपयाची नोट या गृहस्थासमोर धरली.
हमाली म्हणून!
हे गृहस्थ मंद हसले...
त्यांनी मानेनेच रुपया घेण्यास नकार दिला, आणि म्हणाले, ‘सुदैवाने मी आमदार असल्याने पुरेसे मानधन मला मिळते. मी तर तुम्हाला केवळ मदत केली आहे!’
पॅन्टबूटवाल्याचा खजिल चेहरा न पाहाताच ते बाजूला फलाटावर लागलेल्या मुंबई देवळे मार्गे पाली गाडीत चढले!
**
त्यांचे नाव होते, आमदार शशिशेखर काशिनाथ आठल्ये. तेव्हाच्या लांजा मतदार संघात त्यांना लहानथोर माणसे ‘आठल्ये गुरुजी’ म्हणूनच ओळखत. समाजवादी विचारांचे आठल्ये गुरुजी १९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते. पण आयुष्याच्या अखेरीस, सन २०११ मध्ये, वयाच्या ९९ व्या वर्षी, अखेरचा श्वास घेतला तेव्हा उपचाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या कुटुंबास जमवाजमवच करावी लागली होती!!
... म्हणून या गाडीचे एका इतिहासाशी नाते आहे, असे मी मानतो!!

पुष्पक



भगवान ब्रह्मदेवास एकदा घाईघाईने पृथ्वीवर जायचे होते. एका पुण्यात्म्याच्या महानिर्वाणाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याला सन्मानाने स्वर्गलोकी आणण्याचे काम इंद्रदेवाने ब्रह्मावर सोपविले होते.
सारी तयारी करून ब्रह्मदेव विमानतळावर आले. पुष्पक तेथे सज्जच होते. ब्रह्मदेव विमानात बसले आणि सारथ्याने पुष्पकाची आरंभकळ दाबली. पण दुर्दैव. विमान सुरू झालेच नाही. गरूडही गप्प उभा होता. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. तोही फसला. खूप वेळा प्रयत्न करूनही पुष्पक स्टार्ट होत नसल्याने वैमानिक हताश झाला. ब्रह्मदेवही काळजात पडले.. मुहूर्त तर जवळ येऊन ठेपला होता.
विमानतळाच्या बाजूच्याच वाटेने एक मानव स्वर्गाच्या दिशेने चालत होता. नुकतेच त्याचा स्वर्गवास सुरू होणार होता. तो कुतूहलाने चिंतातुर ब्रह्मदेव आणि हताश, दमलेल्या वैमानिकाकडे पाहात होता.
अखेर त्याला देवाची दया आली.
पुण्यात्माच तो!... तो ब्रह्मदेवाजवळ गेला आणि भक्तिभावाने प्रणाम करून त्याने विचारले, ‘भगवन, आपली अनुमती असेल तर मी एकवार प्रयत्न करून पाहू?’
ब्रह्मदेवाने अगोदर त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले. जे स्वर्गलोकीच्या प्रशिक्षित अनुभवी अभियंता वैमानिकास जमले नाही ते हा य:कश्चित मानव काय करणार’ असा विचारही त्याच्या मनात आला. पण अगोदरच हताश असल्याने, प्रयत्नाची संधी देण्यास काय हरकत आहे असा विचार करून त्याने त्या मानवास अनुमती दिली.
तो मनुष्य पुष्पक विमानाजवळ गेला. निरखून पाहात त्याने एक प्रदक्षिणा घातली, व डाव्या बाजूस उभा राहिला. .. मग त्याने वैमानिकासही खाली उतरावयास सांगितले.
दोघांनीही मिळून, गरुडास पंख पसरण्याचे आवाहन केले. गरुडाने काहीसे नाखुशीनेच पंख पसरताच, पृथ्वीवरून आलेल्या त्या माणसाने डावा पंख पाय देऊन जोराने खाली दाबला.
पाठीवरचे विमान डावीकडे झुकवून दोन मिनिटांनी त्याने आपला पाय उचलला व वैमानिकास आरंभकळ दाबण्यास सांगितले.
आणि काय आश्चर्य?... विमान चक्क सुरू झाले होते.
ब्रह्मदेवाने आश्चर्याने डोळे विस्फारून तोंडातही बोट घातले होते.
‘हे मानवा, तू कोण आहेस? कोठून आलास? तुला हे अवघड काम सहज कसे साधले?’ अचंबित ब्रह्माने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, आणि तो माणूस लाजला.
‘ब्रह्मन, मी पुण्याचा असून पूर्वी पुष्पक स्कूटरमध्येच अभियंता होतो...’ तो नम्रतेने म्हणाला.
ब्रह्मदेवाने त्यास आदरपूर्वक प्रणाम केला व पुष्पकाने पृथ्वीच्या दिशेने झेप घेतली!

Sunday, August 18, 2019

... ती सोज्ज्वळ स्मितरेषा!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या 'मनोगत' पाक्षिकाच्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख-

अफाट गर्दीतून उमटणारा घोषणांचा उत्फुल्ल गजर आणि क्षणाक्षणाला उसळणारा आनंद अनुभवण्याचे भाग्य मिळालेल्या जागा फारच थोड्या असतात. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानास वर्षानुवर्षे असे भाग्य लाभले. या मैदानावर खऱ्या अर्थाने, असंख्य मुलुखमैदान तोफा गरजल्या आणि अफाट गर्दीने त्या असंख्य वेळा अनुभवल्या. राजकीय सभांच्या अनुभवाने शिवतीर्थ जसे समृद्ध झाले, तसा थरारता अनुभव मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनेही असंख्य वेळा घेतला. पण शिवतीर्थावरची गर्दी आणि वानखेडेवरची गर्दी यांमध्ये मोठा फरक होता. वानखेडेवरच्या उत्फुल्लतेचा अनुभव शिवतीर्थास नव्हता, आणि शिवतीर्थावरच्या गर्दीचा मोहोर वानखेडेने कधी अनुभवला नव्हता... 
या इतिहासाला, ३१ ऑक्टोबर २०१४ या दिवसाने कलाटणी दिली. शिवतीर्थावर उसळणाऱ्या अफाट जनसागरातून उचंबळणाऱ्या भावना त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवरही उमटल्या, आणि एका आगळ्या, ऐतिहासिक दिवसाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम समृद्ध झाले. याआधी या जागेने असंख्य वेळा गर्दी अनुभवली, उत्साह अनुभवला, जोष अनुभवला... पण त्या दिवशीचा उत्साह, जोष, जल्लोष काही वेगळाच होता. निमित्त होते, महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या शपथविधीचे... महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी ईश्वरास स्मरून शपथ घेतली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विशुद्धपणे आणि निस्पृहपणे काम करण्याची ग्वाही तमाम जनतेला दिली, आणि खचाखच गर्दीतील जल्लोषाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम नखशिखान्त मोहरून गेले. तब्बल १५ वर्षे विरोधकाच्या भूमिकेत वावरताना राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर आवाज उठविणाऱ्या, रस्त्यावर आणि विधिमंडळातही सरकारला धारेवर धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या नेतृत्वाची, सरकार चालविण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली.
राजकारणाच्या रंगमंचावर वावरणाऱ्या व्यक्तीस वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पण नाटकाचा रंगमंच आणि राजकारणाचा रंगमंच यांमध्ये एक फरक असतो. नाटकाच्या रंगमंचावर भूमिका बदलली की वेष बदलतो, राजकारणाच्या रंगमंचावर आवेश बदलतो. प्रश्न विचारणाऱ्याच्या भूमिकेतून उत्तर देण्याच्या भूमिकेत जावे लागते. ही बदललेली भूमिका सहजपणे निभावणे सोपे नसते. प्रश्न विचारणे कदाचित सोपेही असते. उत्तर शोधणे किंवा उत्तर देणे फारच अवघड असते. विरोधकाच्या भूमिकेतून राज्यकर्त्याच्या भूमिकेत गेल्यावर होणारा हा बदल सहजपणे पेलू शकेल अशा योग्य नायकाच्या गळ्यात या भूमिकेची माळ घालणे ही पक्षाची मोठी कसोटी असते. महाराष्ट्रात तर, भाजपला सरकार चालविण्याची संधी याआधी अल्पकाळच मिळाली असल्याने, अशा भूमिकेसाठी योग्य नायक निवडणे हे आव्हान होतेच, पण या जबाबदारीसाठी पक्षाने केलेली निवड सार्थ ठरविणे हे नायकासमोरील त्याहूनही खडतर आव्हान होते. सलग पाच वर्षांच्या कारकिर्दीवर आपल्या सक्षम नेतृत्वाची मोहोर उमटवून देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान पेलले, आणि नेतृत्वासाठी केलेली आपली निवड योग्य होती, हे सिद्ध करून नव्या पर्वास सामोरे जाण्याच्या नव्या आत्मविश्वासाचा मार्गही पक्षास दाखविला. आणखी काही दिवसांतच विधानसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागतील. कधीकाळी काही मोजक्या नेत्यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्रात जेमतेम राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला झेंडा रोवला आहे. जेथेजेथे ज्या ज्या निवडणुका झाल्या, तेथे तेथे, पक्षाचा झेंडा फडकू लागला आहे, आणि आगामी निवडणुकीत राज्यातील निम्म्याहून अधिक मतदार भाजपच्या पाठीशी असतील, असा दुर्दम्य विश्वास पक्षात मूळ धरू लागला आहे. या विश्वासाची बीजे पेरणाऱ्या नेत्याचे नाव, देवेंद्र फडणवीस!
... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, नागपूर शहर भाजपचा नेता, नागपूरचा महापौर, आमदार, महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशा, नेतृत्वाच्या प्रत्येक पायरीवर आपल्या पावलाची खूण उमटवून राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या या नेत्यास मी गेल्या काही वर्षांपासून काहीसात लांबूनच न्याहाळतोय. प्रत्यक्ष सहवासाचे संवादाचे क्षण फारच मोजके होते. तरीही, एक गोष्ट नेहमी, सातत्याने जाणवत गेली. ती म्हणजे, देवेंद्र फडणवीस नावाच्या या तरुणाच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा! विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेताना उमटलेल्या संतापाचे क्षण संपताच त्याची जागा घेणारी, व्यक्तिमत्वावर सौजन्यशीलतेची झालर पुन्हा पांघरणारी ही स्मितरेषा हे देवेंद्र पडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची मोठी शक्ती आहे, असे मला नेहमीच जाणवत राहिले. राजकारणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मुखवटे चढवावेच लागतात. ती तर या क्षेत्रातील यशस्वितेची अपरिहार्य गरज असते. फडणवीस त्याला अपवाद असण्याचे कारणच नाही. गरजेनुसार ज्या ज्या वेळी जो जो मुखवटा चढवून जी जी भूमिका त्यांनी वठविली, त्या भूमिकेला योग्य तो न्याय देऊन झाल्यावर, त्या स्मितरेषेसह समोर येणारा मूळ चेहरा ही त्यांची खरी कमाई आहे, असे मला नेहमीच वाटत आले. काही मुलाखतींच्या निमित्ताने या व्यक्तिमत्वाच्या आतला माणूस जाणवून गेला. मातृसंस्था संघ आपल्या स्वयंसेवकास घडवितो म्हणजे नेमके काय करतो, याचे फडणवीस हे स्पष्ट उदाहरण आहे, याची खात्रीही पटली. 
काही वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहिलेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मला अजूनही आठवते. कारण, आत्मविश्वासाचे अदम्य दर्शन त्या मुलाखतीतून त्यांनी घडविले होते. मित्रपक्षाचे नेते, विरोधकांमधील दिग्गजांनी सातत्याने शरसंधान सुरू ठेवल्यामुळे, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी फडणवीस यांची अवस्था झाली आहे, असे मुलाखतकारास वाटत होते. या नेत्याची पहिल्याच चेंडूत दांडी उडवावी अशा आविर्भावात मुलाखतकाराने तसा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरची ती स्मितरेषा अधिकच ठळक झाली. क्षणभर त्यांनी मुलाखतकाराकडे पाहिले, आणि ते म्हणाले, त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. माझ्याकडे ते ज्ञान आहे. चक्रव्यूहात मला घेरणाऱ्यांना तेथेच गुरफटवून कसे ठेवायचे, आणि आपण बाहेर कसे पडायचे ते मला माहीत आहे, आणि मी तसे करून दाखवेन... फडणवीस यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषेसोबत आत्मविश्वासाचीही एक रेषा उमटली आहे, असा भास त्या क्षणी मला झाला होता. त्यानंतर पुढे सरकणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत मुख्यमंत्री म्हणून वावरणारे फडणवीस मी दुरूनच न्याहाळत गेलो. राजकारणी फडणवीस, पक्षाचे नेतृत्व करणारे फडणवीस, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणारे, प्रचार सभांमध्ये तडाखेबंद भाषण करणारे फडणवीस, जबाबदार मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील फडणवीस, विधिमंडळातील फडणवीस आणि कुटुंबप्रमुख, पिता, पती अशा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे पदर हळुवारपणे उलगडून प्रत्येक आघाडीवर यशस्वी असल्याची आत्मविश्वासपूर्ण ग्वाही देणारे फडणवीस अशी वेगवेगळी रूपे उलगडत गेली. प्रत्येक भूमिकेस त्यांनी कसलेल्या नायकाप्रमाणे न्याय दिला, हे तर आता विरोधकांनाही मान्य झाले असावे...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाच वर्षांचा पहिला कार्यकाळ आता संपत आला आहे. नव्या पर्वात अधिक जोमाने काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांना विरोधकांसोबतच असंख्य वेळा ‘घरचे आहेर’देखील मिळत गेले. राजकारणात, मित्रपक्षाशी ‘जुळवून घेणे’ म्हणजे, मित्रपक्षांसमोर ‘गुडघे टेकणे’ असाच बऱ्याचदा अर्थ असतो. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या युतीच्या काळात भाजपला अनेकदा हेच करावे लागले. मोठ्या भावाच्या ताठ्यात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या या मित्राचे रुसवेफुगवे घालवून त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक केंद्रीय नेत्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत असे. त्या इतिहासास गेल्या पाच वर्षांत अशी काही अलगद कलाटणी मिळाली, की हे घडले कसे ते त्या इतिहासासही कळलेच नाही. 
‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र... याचा धनुष्यासारखा वापर करून शिवसेनेने फडणवीस यांच्यावर टीकेचे असंख्य बाण सोडले. पुराणकाळात अशी अस्त्रे निष्प्रभ करण्याचे मंत्र काहींना अवगत होते, असे दाखले पुराणकथांमध्ये मिळतात. त्या कथांना पुरावे नसल्याने, ते किती खरे हा वादाचा विषय असला, तरी फडणवीस यांच्याकडे पाहिल्यावर, असे काही मंत्र त्यांना अवगत असावेत, असेच वाटू लागते... २७ जून २०१५ या दिवशी सामना या मुखपत्रात मुख्यमंत्र्यांवर चक्क स्तुतिसुमने उधळली गेली होती. कुणी कितीही आरोप करा, टीका करा, पण विदर्भाचा हा बहादुर नेता अथकपणे आपले काम पार पाडतोच. कोणत्याही स्थितीत तो आपली पाठ जमिनीला लागू देत नाही, अशी तारीफ सामनाने केली होती... भाजपमध्ये समाधानाचे वातावरण होते. आता मने जुळली, असेही वाटू लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीस जेमतेम वर्ष पूर्ण झाले होते. यानंतर काही दिवसांतच, पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेस फडणवीस यांनी कठोर लगाम घातला, तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली होती. राजकीय मैत्र आणि प्रशासन याची गल्लत न करण्याचे धाडस त्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले, समोरून येणारा संभाव्य बाण निष्प्रभ करण्याचा मंत्र उच्चारूनच त्यांनी सेनेचे सारे बाण असे काही निष्प्रभ केले, की आता फडणवीस यांच्या हातात हात घालून विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे...
अगदी अलीकडेच, मुंबईतील बोरीवलीत स्थानिक आमदार व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी उभारलेल्या ‘अटल स्मृति उद्यान’ या अनोख्या ‘थीम पार्क’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केले. तेव्हा ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून मनोमीलनाचा असा उत्कट आविष्कार उपस्थितांना अनुभवास आला, की सातत्याने शरसंधान करणारी शिवसेना ती हीच का, असा प्रश्न पडावा... स्थानिक शिवसैनिकांनी भेटीदाखल उभयतांना दिलेल्या गदा एकमेकांविरुद्ध न वापरता प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वापरून त्यांना गदागदा हलविण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात वावरताना असंख्य मुखवटे असंख्य वेळा चढविले असतील... असंख्य भूमिका वठविल्या असतील. पण असे काही ‘करून दाखविण्या’ची ही जादू, त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील त्या सोज्ज्वळ स्मितरेषेमुळेच साधली असणार, यात शंकाच नाही... ही स्मितरेषा अशीच, अखंडपणे उजळलेली राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. कारण ही स्मितरेषा म्हणजेच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे… 

'च म चा'गिरी!

आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...
... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो. हातात गरमागरम चमचमीत कांदापोह्याची प्लेट आणि समोर मांडीवर वर्तमानपत्र ही त्या क्षणाच्या सर्वात चांगल्या सुखाची व्याख्या असते अशी माझी खात्री असल्याने, ते सुख अनुभवत असतानाच वर्तमानपत्रात कुठेतरी कांशीराम यांच्या ‘चमचा युगा’चा उल्लेख वाचला, आणि माझी वाचनमुद्रा क्षणभर खंडित झाली. हातातल्या कांदापोह्याच्या प्लेटमधला चमचा क्षणभर थरथरून गेल्याचा मला भास झाला, आणि माझी नजर वर्तमानपत्रावरून हातातल्या पोहेभरल्या चमच्यावर स्थिरावली. त्या क्षणी त्या चमच्याने माझ्याकडे पाहून डोळा मिचकावल्याचा भास मला झाला, आणि झटक्यात त्यातील खळग्यातले चमचाभर पोहे घशाखाली घालून मी चमच्याकडे पाहू लागलो.
पुढे जणू चमचा माझ्याशी बोलू लागला...
लहानपणी शाळेत असताना, वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहायला गुरुजी सांगत असत. त्यात, ‘मी पंतप्रधान असतो तर…’ वगैरे विषयाचाही समावेश असायचा आणि आपण त्यावर आवेशाने निबंध लिहित असू ते मला आजही चांगले आठवते. चमच्याकडे पाहाताना मला ते दिवस आठवले, आणि एक खंत मनाच्या कोपऱ्यातून उगवून मनभर पसरत आहे असा भास मला होऊ लागला. हातातला चमचा काहीसा उदास होत आहे, असे मला वाटू लागले. मी निरखून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या खोलगट खड्ड्यावर एक काळसर ठिपका आहे, हे मला जाणवले, आणि मी विचार करू लागलो... हा काळा डाग चमच्यावर का बरे पडला असेल?... खरं म्हणजे, हा काही मनाला त्रास वगैरे करून घेण्याइतका गहनबिहन प्रश्न नव्हता. एका झटक्यासरशी तो झटकूनही टाकता आला असता. पण सुट्टीचा दिवस, समोर पसरलेलं वर्तमानपत्र, हातातील पोहेभरल्या प्लेटमधून आपल्याकडे पाहणारा चमचा आणि मोकळं मन एवढं सगळं जुळून आलेलं असताना असा प्रश्न झटकून टाकला तर नंतर करायचं काय, असा विचार करून मी तो प्रश्न मनात तसाच राहू दिला. मग वर्तमानपत्र बाजूला केलं. पोह्याची प्लेटही खाली ठेवली. आता माझ्या हातात फक्त चमचा होता. मी त्याच्याकडे निरखून पाहिले, आणि त्या काळ्या डागाविषयी विचार करू लागलो... माझी विचारतंद्री ऐन भरात आलेली असताना, बायकोने एका भांड्यातून आणखी पोहे आणले आणि हातातल्या चमच्यापेक्षा थोड्या मोठ्याशा चमच्याने तिने चमचाभर पोहे माझ्या प्लेटमध्ये टाकले... मी हाताने ‘पुरे’ म्हणत असताना, माझ्या हातातला चमचा आणि तो थोडा मोठा चमचा एकमेकांवर आपटले, आणि ‘किण्ण’ असा एक मंजुळ ध्वनी कानाशेजारी घुमला. त्याला एक गोड नाद आहे हे माझ्या लक्षात आले. मग मी त्यावर विचार करीत असताना, ‘कदाचित दोन चमचे बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे त्यांनी प्रेमाने एकमेकांची विचारपूस केली असावी’ असा विचार मनात येऊन चमच्यांना भाषादेखील असते, या निष्कर्षाचा मला शोध लागला.
... आता माझ्या मौनाचा अर्थ शोधण्यात माझी बायको गर्क झाली असावी. मोठा चमचा काहीशा जोरातच भांड्यात ठेवून तिने माझ्यासमोर तळवा हलविला, आणि भांड्यात चमचा आपटतानाच्या आवाजाने माझी तंद्री पुन्हा एकदा भंग झाली. या वेळी मोठ्या चमच्याच्या आपटण्याच्या ध्वनीतून त्याची नाराजी स्पष्टपणे उमटली आहे, असा मला भास झाला, आणि मी हातातल्या चमच्याकडे नजर वळविली. आता त्याच्यावरचा काळा डाग अधिकच ठळक झाला असावा, असे मला वाटू लागले होते. या क्षणी आपण मौन सोडले नाही, तर मनातल्या विचारास वाचा फुटणे कठीणच, असा विचार करून मी माझ्या प्लेटमधला तो छोटा चमचा बायकोसमेर उंचावला, आणि, ‘हा काळा डाग कसला’ असा प्रश्न नम्रपणे तिला विचारला. तिनेही काही क्षण चमच्यावरच्या त्या काळ्या डागाकडे पाहिले. विचार करतच ती चमच्याकडे निरखून पाहात होती, आणि मी तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावरेषा निरखत होतो. माझ्या हातातला तो काळा डाग असलेला चमचा आता तिच्याशी बोलत असावा असे मला तिच्या डोळ्यात पाहताना वाटू लागले. असेच काही क्षण गेले, आणि अचानक, तिला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. ‘बरेच दिवस तो चमचा लोणच्याच्या बरणीत पडून होता... म्हणून काळा पडला असावा’... तिने मला सांगितले. मग मी चमच्याकडे पाहिले. काळवंडलेल्या चेहऱ्याने उदासपणे तो माझ्याकडेच पाहात होता. लोणचं संपल्यावर तो चमचा खूप वेळ घासला, तरी थोडासा डाग त्याच्यावर राहिलाच... त्या आठवणीची बायको उजळणी करत असताना काळवंडलेला तो चमचा समाधानाने उजळतोय, असे मला वाटले. अंगावरच्या छोट्याशा डागाचे आता आपल्याला काही वाटत नाही, असाच त्याचा भाव असावा असाही मला भास झाला. तरीही, थोड्या दिवसांच्या लोणच्याच्या सहवासामुळे याने आयुष्यभरासाठी स्वतःस डाग लावून घेतला, असा खेदजनक विचार माझ्या मनात आलाच! मग मी तो चमचा हलकेच प्लेटवर आपटला. रिकाम्या चमच्याचा नाद मधुर असतो, हे मला तेव्हा जाणवले. ज्या जागी आपण असू तेथे प्रामाणिक रहायचे, आणि आपले काम बजावायचे हा चमच्यांचा गुणधर्मच असतो. म्हणूनच तो अनेक दिवस बरणीतल्या लोणच्यासोबत बिनबोभाटपणे राहिला, नंतर पोह्याच्या प्लेटमध्ये आनंदाने आला, आणि दुसरा चमचा भेटताच त्याच्याशी संवादही साधता झाला... चमच्याचे हे वेगळेपण मला त्या क्षणी साक्षात्कारासारखे वाटू लागले, आणि पुढचा जन्म असलाच, तर आपणही चमचा व्हावे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.
मग मी चमच्यांची कूळकथा शोधू लागलो. चमच्यांचे अनंत प्रकार असतात, आणि आकारानुसार त्यांचा वापर केला जातो, असे मला त्या संशोधनातून आढळून आले. मग मी उत्सुकतेपोटी चमच्यांची चित्रे शोधू लागलो, आणि हे सारे चमचे आपल्यादेखील आसपास आहेत, हे माझ्या लक्षात आले. कधीच शक्य नसलेल्या किंवा न पाहिलेल्या, न हाताळलेल्या किंवा आवाक्यापलीकडच्या गोष्टींचा विचार करत, आपण अमुक असतो तर, तमुक असतो तर अशा कल्पना लढवत आपण आपले बालपण वाया घालविले, त्याऐवजी, ‘आपण चमचा असतो तर…’ या विषयावर एखादा तरी निबंध लिहावयास हवा होता, असे मला वाटू लागले. मग, आपणास असे का वाटू लागले यावर मी विचार करू लागलो. असे विचार मनात येऊ लागले, की त्याचे उत्तर सापडेपर्यंत मनाला चैन पडत नाही. समजा, आपण चमचा असतो तर या विषयावर लहानपणीच आपण विचार केला असता, तर त्याने काय फरक पडणार होता, असाही प्रश्न मला पडला, आणि हातातला काळा डागवाला चमचा पोह्याच्या प्लेटमध्ये खुपसून चमचाभर पोहे पुन्हा तोंडात कोंबून मी त्याचेही उत्तर शोधू लागलो. पण त्यासाठी फार वेळ घालवावा लागला नाही. काही क्षणांतच मला पहिले त्तर सापडले. ते म्हणजे, आपण लहानपणीच यावर विचार केला असता, तर मोठेपणा, आता यावर विचार करण्यात वेळ घालवायची वेळच आली नसती, आणि आसपासच्या चमच्यांची वैशिष्ट्ये, त्यांची भाषा, त्यांचे परस्परांशी वागणे यांचा अर्थ कधीच आपल्याला उमगूनही गेला असता. चमचे ज्याच्यासोबत असतात, त्याच्याशी सेवाभावानेच नव्हे, तर एकनिष्ठेने राहतात, आणि जागा बदलल्यानंतर नव्या जागेत ज्याच्यासोबत राहतात, त्याच्याशीही त्यांची तेवढीच निष्ठा असते, हे सत्य आपल्याला लहानपणीच उमगले असते, असेही वाटून गेले. शिवाय, आकारानुसार त्यांची उपयुक्तता असते, हेही वास्तव जे आज उमगले, त्याची थोडीशी तरी ओळख लहानपणीच करून घेता येणेही शक्य झाले असते, असेही मला वाटू लागले.
चमचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही चहासाखरेच्या डब्यातल्या चमच्यांना सहसा जागा बदलायची वेळच येत नाही. साखरेच्या डब्यातल्या चमच्यावर तर, कायम साखरेसोबत राहून साखरेचा थरच जमा झालेला असतो, हेही माझ्या लक्षात आले. आमच्या मिठाच्या डब्यात आईस्क्रीमच्या कपात असलेला प्लास्टिकचा चमचा पर्मनंटली ठेवलेला असतो. स्टीलचे चमचे मिठात टिकत नाहीत, असे बायकोने सांगितले. मग ओट्याखालचे कपाट उघडून मी वेगवेगळ्या चमच्यांची त्यांच्या आकारानुसार उपयुक्तता काय, यावर बायकोशी चर्चा केली. चपटा चमचा भाताच्या भांड्यातच चालतो, तर मोठा चमचा- आम्ही त्याला डाव असेही म्हणतो- आमटीच्या पातेलीतच वावरतो. ढवळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, हाही मला माहीत असलेलाच उपयोग बायकोकडून पुन्हा ऐकावयास मिळाला. एक पूर्ण चपटा असाही चमचा मला पहायला मिळाला. त्याला खोलगटपणा अजिबातच नव्हता. फक्त पसरटपणा असलेला हा चमचा, तव्यावरच्या पोळ्या, डोसा वगैरे पदार्थ परतण्यासाठी उपयोगी पडतो, असे बायकोने सांगितले.
टीस्पून आणि टेबलस्पून असे शब्द आपण नेहमी वापरतो. ते त्यांच्या आकारावरून आणि उपयुक्ततेवरूनच पडलेले असतात. कोणत्याही पदार्थात, चवीपुरता मीठमसाला घालण्यासाठी टीस्पून वापरतात, तर तयार पदार्थ पानात वाढून घेण्यासाठी टेबलस्पून वापरतात...
या नाना गुणांनी युक्त असलेल्या चमचा या वस्तूचे महात्म्य मला पोह्यांच्या प्लेटीतल्या एका छोट्याशा चमच्याने समजावून सांगितले, आणि ‘चमचायुग’ या शब्दाचा व्यापक अर्थ मला समजून आला. चमच्याशिवाय सारे व्यर्थ आहे, हे मला पटले, आणि चमचा ही या जगातील अत्यावश्यक चीज आहे, याची खात्री पटली.
पुढच्या जन्मी कोण व्हावे असे तुला वाटते, असा प्रश्न मला जर कुणी आता विचारला, तर क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर देईन, ‘च म चा’!

निष्ठा आणि जिद्द!

अगदी अलीकडे, बऱ्याच वर्षांनंतर रामभाऊ नाईक यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर, वयाच्या ८५ व्या वर्षी, पुन्हा मातृपक्षाच्या सेवेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रुजू होण्याची रामभाऊंची भावना म्हणजे पक्षाच्या असंख्य नव्याजुन्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा प्रेरणास्रोत ठरणार आहे. कालच्या रामभाऊंच्या पत्रकार परिषदेस त्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची गर्दी आणि पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे मन:पूर्वक प्रास्ताविक यांतून हेच चिन्ह स्पष्ट डोकावत होते...
कालच्या पत्रकार परिषदेत, आपल्या प्रारंभीच्या तब्बल एक तासाच्या निवेदनात रामभाऊंनी आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीचा सम्यक आढावा घेतला. पत्रकारांच्या नजरेतून पाहिले, तर यात ‘बातमीयोग्य मसाला’ फारसा नव्हताच. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमुळे राज भवनाच्या संस्कृतीमध्ये घडून गेलेले दोन महत्वाचे बदल माध्यमांच्या पानांवर फारसे दखलपात्र असणारही नाहीत, सहाजिकच, ते समाजापर्यंत पोहोचण्याचा वेग फारच मंद असेल. तरीही ते बदल पोहोचायला हवेत. आजकाल, देशासमोरील अनेक महत्वाच्या प्रश्नांची सामान्य माणसांना गंभीर चिंता वाटत असते, आणि आपल्यालादेखील ज्या प्रश्नाचे गांभीर्य वाटते ते प्रश्न सरकारच्या ध्यानातही आलेले नसावेत अशीच बहुतेकांची धारणा असते. अशा गंभीर प्रश्नांच्या गर्तेत तर, रामभाऊंच्या कारकिर्दीतील हे बदल बेदखल राहण्याची व त्याला महत्व नसण्याचीच शक्यता अधिक! तरीही त्याची नोंद घेतली पाहिजे. कारण या बदलांतून एका अप्रिय परंपरेचे अस्तित्व पुसण्याचा पराक्रमही घडला आहे. अनेकांना ही बाब ‘चिल्लर’ वाटू शकते, पण तो त्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा मुद्दा आहे.
राज्यपालास जे स्थान असते, त्यावरून त्याचा परमआदरार्थी म्हणून ‘हिज एक्सलेन्सी’ किंवा ‘महामहीम’ असा उल्लेख करण्याची ब्रिटिश परंपरा आजही देशात सुरू आहे. उत्तर प्रदेशात या पदाची सूत्रे हाती घेताच रामभाऊंनी ही परंपरा पुसून टाकली. यापुढे ‘माननीय’ हा आदरार्थी उल्लेख पुरेसा राहील असा निर्णय रामभाऊंनी घेतला.
वरवर पाहता, हे काही फार क्रांतिकारक वगैरे दिसत नाही. पण थोडा अधिक विचार केला, तर, या निर्णयामुळे राज्यपाल आणि समाज यांच्यातील अंतर पुसले जात असल्याचे लक्षात येते. राज भवनाचे दरवाजे या एका निर्णयामुळे सामान्यांसाठी उघडले जातात. रामभाऊंनी ते केले. गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशच्या राज भवनात ४० हजार लोकांना थेट राज्यपालांची भेट घेता आली होती...
राज्यपालपदावरील व्यक्तीची निवृत्ती आणि नव्या व्यक्तीची नियुक्ती या परंपरेला काहीशी विचित्र झालर असते. नव्या राज्यपालाच्या पदग्रहणाआधी मावळत्या राज्यपालाने गाशा गुंडाळून घर गाठावे व राजभवन नव्यासाठी रिकामे करावे अशी प्रथा असते. नवा राज्यपाल येईल तेव्हा जुन्या राज्यपालाने आसपासही असू नये या विचित्र परंपरेस मोडीत काढून रामभाऊंनी नव्या राज्यपालांचे राजभवनात स्वागत केले.
अशाच काही जुन्या परंपरा मोडीत काढून रामभाऊंनी काही नव्या परंपरांचा पाया घातला आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, पक्षाच्या शिस्तपालन व अनुशासन समितीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, अशी सारी मानाची पदे भूषविल्यानंतचा निवृत्तीचा काळ एका सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेतून पुन्हा पक्षास अर्पण करणे हे सोपे काम नाही.
आता पुन्हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रामभाऊ राजकारणात, भाजपमधे आणि समाजाच्या सेवेत दाखल झाले आहेत.
वयाच्या, ८५ व्या वर्षी!
आता ते मुंबईच्या माध्यमांना भेटत राहतील.
भाजपच्या नेते -कार्यकर्त्यांना त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा लाभ मिळत राहील...
विशेष म्हणजे, आता निवडणुकीच्या राजकारणापासून आपण लांब राहणार, हे रामभाऊंनी पाच वर्षांपूर्वीच जाहीर केलेले असल्याने, जिद्दीकार्यकर्त्याचे वेगळे रूप रामभाऊंच्या रूपाने नव्याने पाहावयास मिळणार आहे.
याला म्हणावे जिद्द... याला म्हणावे निष्ठा!!

विचार करा...

मोठी धरणे बांधण्याच्या धोरणाचा आता पुनर्विचार व्हायला हवा. मोठ्या धरणांचा फायदा नेमका काय याचाही अभ्यास व्हायला हवा. यासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च, प्रचंड भूसंपादन, प्रचंड विस्थापन आणि पुनर्वसनाच्या नावाने शंख हीच परिस्थिती पहायला मिळते. अर्थात, प्रचंड प्रकल्पांचा मलिदाही प्रचंड असतो.
अशा प्रचंड प्रकल्पांचे फायदे नसतात असे नाही, पण एखाद्याच वेळी या प्रकल्पांमुळे बसणारा फटका हा त्याचे सर्व फायदे धुवून टाकणारा ठरतो. माणसे, जनावरे, घरे, गोठे, गावे, शहरे उद्ध्वस्त होतात. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी वा पश्चिम महाराष्ट्रात आज पुराच्या विळख्यात सापडलेली शहरे हा या मोठ्या धरणांच्या फटक्याचाच परिणाम आहे.
जगातील अनेक राष्ट्रे आज महाकाय धरणांचे धोरण गुंडाळून लहान धरणांची कास धरू लागली आहेत. एखाद्या नदीवर एकच महाकाय धरण बांधण्यापेक्षा, नदीच्या प्रवाहात ठरावीक टप्प्यांवर लहानलहान धरणे बांधल्यास खर्च कमी होईल, भूसंपादन मर्यादित होऊन विस्थापनाची व सहाजिकच पुनर्वसनाची परवडही कमी होईल व नदीच्या प्रवाहक्षेत्रात एकाच टप्प्यावर नव्हे तर टप्प्याटप्प्यावर सिंचनक्षमता निर्माण करता येईल.
शिवाय, पूरस्थितीच्या संकटाची टांगती तलवार काहीशी सौम्य करता येईल.
जीवन आश्वस्त होईल आणि संकटांची भयाणताही कमी होईल.
ती वेळ कधी येईल? कुणास ठाऊक !!

... तरी कोल्हापुरी खंबीर!

...’लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो. “शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?”... कोल्हापूर परिसरातील अनेक गावांमधील शाळांना पुराने वेढले आहे. शाळेभावती पाणीच पाणी साचले आहे. मुलांना सुट्टी आहे. पण शाळेभोवती साचलेल्या पाण्यामुळे मिळालेल्या सुट्टीला वेदनेची, आक्रोशाची किनार आहे... मुलांच्या शाळेभोवतीच नव्हे, घराभोवतीही पाणी साचलंय, आणि या सक्तीच्या सुट्टीत, जीव मुठीत धरून आपल्या केविलवाण्या, हतबल आईबापांच्या कुशीत लपवेली शेकडो मुलं भयभीत नजरेनं आयुष्यातला हा भयाण अनुभव झेलण्याची शिकस्त करताहेत...
उद्ध्वस्त घरे, रिकामे गोठे आणि भुईसपाट शेती, पाण्याचे विक्राळ लोट सभोवती... अशी अवस्था आजही कोल्हापूर-सांगलीच्या परिसरात आहे. एक खिन्न, उदास सावट इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दाटलंय... उद्ध्वस्त आयुष्याला पुन्हा उभारी मिळेल असे आशेचे किरण आज तरी अनेकांच्या उरल्यासुरल्या घरांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत...
#झी२४_तास च्या दीपक भातुसेने आज एका सहकाऱ्यासोबत राजापूरवाडी, अर्जुनवाडीच्या दैनावस्थेची कहाणी लोकांसमोर मांडली...
‘आता पुढे काय?’ हा प्रश्न त्याने विचारला, आणि संकटग्रस्तांच्या मनात रुतलेले तेच प्रश्नचिन्ह स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरही उमटले...
दिलाशाची बाब एवढीच, की, या प्रश्नाचं उत्तर अनेकजण शोधतायत... हातपाय गळाले नाहीयेत. उत्तर शोधण्याची उमेदही संपलेली नाहीये. म्हणूनच, या प्रश्नावर जवळपास प्रत्येकाचे उत्तर एकच आहे.
ते म्हणजे, “आता पहिल्यापासून सुरुवात!”...
कोल्हापूरवासींयांनी संकटाला धैर्याने तोंड दिले. त्यांच्या ‘पहिल्यापासून सुरुवात’ करण्याच्या प्रयत्नांसोबत प्रत्येक हाताची साथ असायला हवी. म्हणजे त्यांची उमेद आणखी ताकदवान होईल... मग, ‘प्रसंग गंभीर, तरी कोल्हापुरी खंबीर’ हा विश्वासही दृढ होईल!

Tuesday, June 4, 2019

मूर्ख भक्त आणि त्याचा देव!

मूर्ख भक्त आणि त्याचा देव...
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला.
शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर...
त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला.
त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले.
धन्य तो भक्त आणि धन्य तो त्याचा देव... त्याला आपल्या देवापलीकडे कशाचेही भान उरले नाही.
आपल्याला तोच तारेल, तोच मारेल... जे काही होईल ते तो आपल्या भल्याचेच करेल अशी त्याची अपार श्रद्धा होती.
दिवसेंदिवस ती अधिकच गहिरी होत होती. आता तर, तो स्वत्व विसरून आपल्या देवाच्या चरणी विलीन झाला होता.
धन्य तो भक्त!
एकदा अचानक आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वारे सुटले. गावकऱ्यांना संकटाची चाहूल लागली आणि सर्वांनी सुरक्षित जागी स्थलांतर करायचा निर्णय घेतला.
निघताना सारेजण यालाही म्हणाले, हे भक्ता, इथे आता राहणे सुरक्षित नाही. तू आमच्यासोबत सुरक्षित स्थळी चल!
भक्ताने ठाम नकार दिला.
‘तो कृष्ण, माझा देव, माझ्यासोबत आहे. तो मला वाचवेल!’ भक्त म्हणाला, आणि कृष्णभजनात रममाण झाला.
पाऊस कोसळतच होता.
गावातल्या नदीने विक्राळ रूप धारण करून गावाला वेढा घातला.
हा भक्तिगीते गात घरातच बसला होता.
गावातल्या मच्छिमारांनी आपल्या होड्या काढल्या. चुकून मागे राहिलेल्यांना सुरक्षित जागी हलविण्याची घाई सुरू झाली.
ते याच्याकडेही आले. ‘चल’ म्हणाले. पण याचा त्याच्या देवावर पूर्ण विश्वास होता. त्याने पुन्हा नकार दिला, आणि भजनात दंग झाला.
पाऊस कोसळतच होता. आता प्रलय होणार आणि नदीचा महापूर गावाचा घास घेणार अशी परिस्थिती ओढवली. प्रशासनाने लष्कराला पाचारण केले.
हेलिकाॅप्टर गावावर घिरट्या घालू लागले. एक अधिकारी याच्याजवळ आला, आणि घर सोडून सुरक्षित जागी यावे यासाठी गयावया करू लागला.
याचे एकच पालुपद होते. ‘माझा देव मला या संकटातून नक्की वाचवेल! तुम्ही जा!’
लष्करी जवान नाईलाजाने निघून गेले.
पुढच्या काही वेळातच, प्रलयाने याचा घास घेतलाच!

... अत्यंत अस्वस्थ होऊन त्याने स्वर्गाचे प्रवेशद्वार ओलांडले. आत प्रवेश केला. इंद्राच्या दरबारात सारे देव समोरच बसलेले होते. त्यात कष्ण-याचाही देव- होताच.
हा कृष्णासमोर गेला. हात जोडून देवापुढे झुकला.
पण बेचैन होता.
‘देवा, किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर... त्या भक्तीपायीच मी समोरच्या संकटालाही य:कश्चित मानलं. पण तू मला वाचवलंच नाहीस...’ काहीशा नाराजीनेच भक्ताने देवाला सुनावले.
कृष्ण नेहमीसारखा गालात हसला.
‘मूर्ख भक्ता, मी तुला वाचविण्यासाठी किती वेळा आलो होतो. एकदा गावकरी झालो, मग मच्छीमार झालो, नंतर लष्करी अधिकारीही झालो. पण तुला माझी ओळखच पटली नाही. तू भक्तीने अंध झाला होतास. असे अंधभक्त असाच आत्मघात करून घेतात. सावध व्हा, डोळस भक्ती करा, मी त्याच्यासोबतच असेन. नाहीतरं अंधभक्त म्हणून तुमची तर खिल्ली उडेलच, पण माझीही नाहक नालस्ती होईल...’ असे बोलून त्याचा देव तिथून निघून गेला.
इकडे, भक्ताला आपली चूक उमगली होती.
पण वेळ निघून गेली होती!!

Sunday, June 2, 2019

आई...

तिन्हिसांजेची वेळ. अंधार पडायला सुरुवात झालेली... एका घनदाट जंगलातून मोलमजुरी करून घराचा गाडा हाकणारी एक स्त्री आपल्या तान्ह्याला कडेवर घेऊन झपझप पावलं टाकत पायवाट कापत असते. काळोख मिट्ट व्हायच्या आत जंगल पार करून घर गाठायचं असतं... अचानक वारे वाहू लागतात. आभाळ भरून येतं, झाडं आडवीतिडवी होत एकमेकांना झोडपू लागतात... पायवाटेवरचा पावलापुरता प्रकाशही अंधुक होतो आणि ही स्त्री घाबरते... ती भीती वादळाची नसते. अधाराचीही नसते. ती भीती, कडेवरच्या बाळाच्या सुरक्षिततेची असते...
वादळ आणखीनच जोर धरतं. झाडं बुंध्यापासूनच पिंगा घालू लागतात आणि पायवाटेवरून बाळाला छातीशी धरून एकएक पाऊल पुढे सरकणाऱ्या तिला वारापाऊस झोडपू लागतो. मधूनच झाडाची एखादी फांदी वाटेवर, डोक्याचा नेम धरून कोसळताना दिसते, आणि ही स्त्री सावध होते. बाळाला छातीशी घट्ट धरते, आणि वादळवारा, पावसाचा मारा, फांद्यांचे फटके स्वत:च्या पाठीवर झेलत दमानं पुढे जात रहाते.
अचानक सुरू झालेलं वादळ काही वेळाने शांत होतं. पाऊसही मंदावतो...
तोवर जंगल संपून गावाची वेस सुरू झालेली असते.
ती स्त्री पदरात घट्ट लपेटलेल्या बाळाकडे पाहाते.
ते शांत, आश्वस्तपणे झोपलेलं असतं.
मग ती आई समाधानानं हसते.
काही वेळापूर्वी भयाण संकटाशी सामना करताना आलेला शीणही विसरते, आणि बाळाला आणखीनच घट्ट, उराशी कवटाळते.
कारण ती आई असते...
*****
“शेतकऱ्याचा प्रश्न हा असाच प्रश्न आहे. ते आपलं बाळ आहे असं समजून, आईच्या मायेनं त्याला संकटातून जपत बाहेर काढलं पाहिजे.
त्यात राजकारण झालं, तर अगोदरच समस्यांचे तडाखे सोसणारा शेतकरी अधिक घायाळ होईल...”
शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मला ही गोष्ट सांगत प्रश्न समजावायचा प्रयत्न केला.
.... माझ्या मनातलं प्रश्नचिन्ह बहुधा त्याने वाचलं असावं.
“माझ्याकडे पद आहे हो... पण ते शेळीच्या शेपटागत! काही वेळा, येडं राहाण्यातच शानपना आसतोय!...”
तो म्हणाला.
त्याच्या सुरातला खेद मला स्पष्ट जाणवत होता!!

Thursday, March 28, 2019

नाटक!

आज जागतिक रंगभूमी दिन आहे म्हणे. 
खरं तर, हे जग हीच एक विशाल रंगभूमी आहे, आणि आपण सारे - माणसे, पशुपक्षी, किडेमुंग्या, साप-गांडुळे, - या रंगभूमीवरची पात्रे आहोत, असं कुणीतरी म्हणून ठेवलंय. 
प्रत्येकाच्या वाटणीला त्याची त्याची भूमिका आलेली असते. ती त्याने बजावायची असते. तरीही, 
काहीजण स्वत:ची भूमिका विसरून पुन्हा तोंडाला रंग फासतात, काहीजण वेगळे मुखवटे धारण करतात, आणि आपली मूळ भूमिका न बजावता, दुसरीच भूमिका वठवतात.
उलट, अशांमधलेच काहीजण श्रेष्ठ, नटसम्राट ठरतात.
मग त्यांच्यातला माणूस शोधण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची किंवा आपणच शोधलेला, त्यांच्यातला माणूस कसा मोठा आहे, त्याचं कसं वेगळेपण आहे, असं सांगणाऱ्यांची स्पर्धा सुरू होते.
यातून एक नवं नाट्य तयार होतं.
कधीकधी ते इतकं रंगतं, की बाकीचे सारेजण भान विसरून ते नाटक न्याहळू लागतात.
... म्हणजे, मुखवटा धारण करणाऱ्या नटसम्राटाच्या आतला माणूस शोधणाऱ्या माणसांच्या कथेतून निर्माण होणाऱ्या नाटकात नवे मुखवटाधारी अभिनेते तयार होतात, आणि या अभिनयात, त्यांच्यातला खरा माणूस, म्हणजे, त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचा नायक तो हरवून बसतो.
... आणि आपण, प्रेक्षक बनून तोंडात बोटं घालून बसताना आपली मूळ भूमिकाही विसरलेलो असतो.
मग समीक्षा सुरू होते, नाटकातून निर्माण होणाऱ्या नाटकांची. त्यातील पात्रांची आणि त्यांनी बजावलेल्या भूमिकांची!
त्यातून सर्वश्रेष्ठ नटसम्राट निवडला जातो. काही दुय्यम कलाकारही नावारूपाला येतात.
या सर्वात, खरं म्हणजे, आपणही, कलाकारच असतो. कारण आपण प्रेक्षक झालेले असतो म्हणजे प्रेक्षकाची भूमिकाच वठवलेली असते.
त्याचं मात्र, मूल्यमापन होतच नाही.
म्हणजे, मूळ भूमिका तर आपण विसरलेलो असतोच, पण प्रेक्षकाची भूमिकाही उठावदारपणे वठलेली नसते.
मग, प्रश्न पडणारच!
या जगाच्या रंगभूमीवर, आपल्या वाट्याला आलेली नेमकी भूमिका काय?
कारण, आपण कलावंतही ठरत नसतो, आणि प्रेक्षकही!!


आठ चौपन

आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या...

गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या...

पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले... एका प्लास्टिकच्या पिशवीतली एक छोटीशी डफली बाहेर आली, आणि नाजूकशी थाप पडताच नेहेमीच्या सवयीनं तो डबा सळसळला...
डोळे मिटून, हात जोडून सगळ्याजणी शांत सुरात प्रार्थना म्हणत होत्या... `इतनी शक्ती हमें देना दाता....' विंडोच्या बाजूला उमटलेल्या त्या सुरानी फलाटावरच्या गर्दीतही एक प्रसन्न झुळूक लहरून गेली...
चढत्या सुरांबरोबर गाडीनंही वेग घेतला आणि अवघ्या डब्यात सूर आणि तालाचा मस्त मेळ जमला... अवघ्या डब्याला सवयीचा झालेला नेहेमीचाच तो आगळा सोहळा सुरू झाला... एकामागून एक येणाऱ्या सुरेल गाण्यांबरोबर डब्यातल्या सगळ्या बायका गुणगुणू लागल्या, आणि खचाखच भरलेली सगळी गर्दीच जणू एक्जीव होऊन गेली... पुढच्या पाऊण तासाच्या प्रवासाला सूर गवसला, आणि त्या सुरांनी सकाळच्या ताजेपणालाही एक नवी टवटवी आणली... मधल्या स्टेशनावर चढणाऱ्या एका वयस्कर सोबतीणीसाठी अगोदरच कुणीतरी जागा मोकळी करून ठेवली होती...

मिनिटभरासाठी गाडी थांबली आणि डब्यातल्या सुरांची पट्टी थोडीशी खाली झाली. दररोज न चुकता त्यांच्याबरोबर असणारी ती सोबतीण आज फलाटावर नव्हतीच... गाडी सुटली तेव्हा त्या सुरांमधली अस्वस्थ छटा बाकीच्या नेहेमीच्या प्रवाशांना नेमकी जाणवली, आणि पुढचं स्टेशन येईपर्यंत डबा थोडासा शांत झाला...

आता गाडीनं मुंबई गाठली होती. पुन्हा पिशव्या, पर्स सावरायला सुरुवात झाली आणि डब्यातला नाद हळूहळू मंदावत गेला. पुन्हा डोळे मिटून एक प्रार्थना झाली आणि पुढच्या स्टेशनागणिक रितारिता होताना डब्यातला उदासपणा मात्र वाढत गेला. प्रवासाच्या सुरुवातीला सुरांमधून सांडणारं चैतन्य गाडी शेवटच्या स्टेशनावर थांबली, तेव्हा कोमेजून गेलं होतं. त्या स्टेशनवर नेहेमी चढणारी त्यांची नेहेमीची साथीदारीण का आली नसेल, ही चिंता प्रत्येकीच्या चेहेयावर दिसत होती.