Saturday, June 27, 2009

सेतू झाला रे सागरी...

महाराष्ट्राचे आणि समुद्राचे एक अनोखे भौगोलिक नाते आहे. मुंबईचे तर याच समुद्राशी आणखीनच जवळचे नाते आहे, कारण मुंबई फक्त समुद्राच्या किनाऱ्याचे एक महानगर नाही, तर बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या शहर जिल्ह्यालाही समुद्राने वेढले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर वळणांवरचा रात्रीचा झगमगाट प्रत्येकालाच भुरळ घालतो, म्हणूनच मरीन ड्राईव्हचा राणीचा रत्नजडित कंठहार हे देश-विदेशातील पर्यटकांचे आणि पोटापाण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे पहिले आकर्षण असते. उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईवर आदळणाऱ्या लोंढ्यांनी कधी समुद्र पाहिलेलाच नसतो. म्हणूनच मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या उत्तर भारतीयांचे कान समुद्राची गाज ऐकण्यासाठी आसुसलेले असतात आणि नोकरीधंद्यात जम बसला नाही, तर याच समुद्राच्या सुंदर चौपाट्या त्यांना चाट आणि भेलपुरी किंवा अगदीच काही नाही, तर शेंगदाणे विकून गुजराण करण्याचाही मार्ग दाखवतात. मग जुन्या मुंबईकरांबरोबरच, या नवख्यांचेही समुद्राशी नाते जडून जाते.... आद्य मुंबईकर म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज याच समुद्राच्या विश्‍वासावर इथे स्थिरावला आणि मुंबईची लहान लहान गावठाणे बघता बघता इतिहासजमा होत महानगरात सामावत गेली. म्हणून समुद्र हे मुंबईचे सौंदर्य आहे आणि साधनही आहे.
.... आता या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसपेक्षाही झगमगणारा, मुंबईचा इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा एक आगळा सेतू येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मुंबईच्या वैभवात भर घालणार आहे. मुंबई आणि समुद्राचे नाते आता आणखी घट्ट होणार आहे. आजवर मुंबईला केवळ किनाऱ्यापलीकडून न्याहाळणारा समुद्र आता आपल्या अंगाखांद्यावरही खेळवणार आहे. अभियांत्रिकीचे एक नवे आश्‍चर्य मानले जावे, असा वरळी-वांद्रे सागरी सेतू तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे नाते जोडायला सज्ज झाला आहे आणि मुंबईच्या सर्वांत भीषण समस्येवरचा- वाहतूक कोंडीवरचा तोडगाही ठरणार आहे.


येत्या 30 जूनला या सागरी सेतूचे उद्‌घाटन होईल आणि मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल... आता हा सेतू साकारलाय, हे "ऑफिशियल' सत्य सगळीकडेच झालेय... म्हणून, मुंबईच्या इतिहासातून वर्तमानापर्यंतच्या बदलांचा साक्षीदार असलेल्या या स्वामी विवेकानंद मार्गालाही त्या दिवसाची ओढ लागली असेल.... येत्या दोन-चार दिवसांत या मार्गाच्या दुतर्फा बांबूंचे बॅरिकेड्‌स लागतील... पोलिसांची वर्दळ वाढेल.... रस्त्यावरून अहोरात्र धावणाऱ्या काही वाहनांच्या वर्षानुवर्षांच्या सहवासालाला आता आपण मुकणार, या जाणिवेने हा रस्ता मूकपणे व्याकूळदेखील होईल, पण दुसऱ्याच क्षणाला तो सुखावूनही जाईल. कारण त्याने मुंबईच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलाच्या साक्षीदाराची भूमिका निभावलेली आहे. उपनगरातल्या वांद्य्राचं शहरातल्या वरळीशी आणखी जवळचे नाते जोडणाऱ्या या सेतूचा मग त्यालाही अभिमान वाटेल... जवळपास प्रत्येक मुंबईकराला केवळ वासाने ओळखीची असलेली माहीमची खाडीदेखील या नव्या आश्‍चर्याच्या सहवासाने आनंदून जाईल....
गेल्या काही वर्षांपासून स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे समुद्रात आकार घेणाऱ्या त्या अवाढव्य सेतूच्या प्रगतीकडे लागलेले होते. जवळपास 50 हजार आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढा अवाढव्य आणि केबलच्या ताणामुळे कित्येक टन वजन सहज पेलविण्याची क्षमता असलेल्या या सेतूच्या उदरात, अवघ्या पृथ्वीला विळखा घालू शकेल इतक्‍या लांबीच्या लोखंडी तारांचे जाळे सामावलेले आहे, असं सांगतात, कुतुबमिनारच्या 63 पट उंचीच्या या पुलाच्या उभारणीसाठी 90 हजार टन सिमेंटचा वापर झाला आहे.
माहीम कॉजवेवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात रहदारीची कोंडी अगदी ठरलेलीच असल्याने वरळी आणि वांद्रे हे आठ किलोमीटरचे अंतर कापायला सव्वातासाचा वेळही ठरलेलाच. पण आता, या सागरी सेतूने हे समीकरण संपवलेय. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे मुंबईला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. वाहनांमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बनयुक्त धुराचा विळखा मुंबईला पडला आहे आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्याही समस्यांनी मुंबईला वेढले आहे. सव्वातासाची वाहतूक सात मिनिटांपर्यंत खाली आणणारा हा सेतू मुंबईच्या आरोग्यासाठीही एक वरदान ठरू शकेल. कारण एकाच गतीने समुद्रावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, या वाहतूक कोंडीमुळे होणारी मौल्यवान इंधनाची हकनाक नासाडीही संपुष्टात येणार आहे. प्रवासाचा वेळ एक दशांशाइतका खाली आणणाऱ्या या सागरी सेतूमुळे दर वर्षी 100 कोटी रुपयांची इंधनबचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतात. खरे तर, ठरल्या वेळात या सेतूची उभारणी पूर्ण असती, तर सुमारे 350 कोटी रुपयांची बचतही झाली असती. पण वेगवेगळ्या पर्यावरणविषयात समस्या आणि त्यावर न्याय मिळवण्यासाठी पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी केलेला पाठपुरावा यांमुळे या सेतूचे कामही अपेक्षेपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लांबले आणि मुळापासून कराव्या लागलेल्या रचनात्मक बदलांमुळे खर्चदेखील वाढला.... मुळात 1306 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प या बदलांमुळे 1650 कोटींवर गेला. पण या सगळ्या समस्यांवर मात करून हा सेतू आता साकारलाय...
या सागरी सेतूने मुंबापुरीला एक नवे वैभव आणि आगळे महत्त्व मिळवून दिले आहे, हे खरे असले, तरी काही समस्यादेखील उद्‌भवण्याची शंका व्यक्त केली जाते. मुळात, हा सागरी सेतू आठ पदरी आहे. म्हणजे, या सेतूवरून एका वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या स्वामी विवेकानंद मार्ग किंवा वरळीच्या रस्त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे स्पष्ट आहे. पण एकाच वेळी या सेतूवर प्रवेश करणारी वाहने जेव्हा कोणत्याही बाजूने बाहेर पडतील आणि पुन्हा रस्त्यावर मिळतील, तेव्हा हे रस्ते मात्र, जुनेच तीन-चार पदरी असतील. त्यातही वांद्रे आणि वरळी या दोन्ही ठिकाणी या सेतूच्या मुखाशीच असलेल्या वस्तीमुळे, अनेक जागी रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने हे रस्ते आणखीनच चिंचोळे झाले आहेत. एकदम आठ पदरी रस्त्यावरून या चिंचोळ्या रस्त्यांवर थडकणाऱ्या वाहनांना सामावून घेण्याची या रस्त्यांची क्षमता तोकडी पडेल आणि सागरी सेतूच्या तोंडाशीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल, अशीही भीती काही जण व्यक्त करतात.
पण ही समस्या काही फारशी गंभीर नाही, कारण मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उत्तरे शोधण्यात गेल्या काही वर्षांपासून इथले वाहतूकतज्ज्ञ वाकबगार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारले गेले. वाहतुकीची समस्या सुटेल. प्रवासाला लागणारा वेळ वाचेल आणि इंधनातही बचत होईल, असा त्यामागचा प्रामाणिक तिहेरी हेतू होता. पण उड्डाणपूल झाले आणि मुंबईतील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. साहजिकच, रस्ते अपुरे पडू लागले आणि कोंडीची समस्या कायमच राहिली. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीतल्या नॅनो गाड्या रस्त्यावर येतील, आणि पुन्हा एकदा हीच समस्या निर्माण होईल. तेव्हा वरळी-वांद्रे सागरी सेतू या समस्येवरचा तोडगा ठरू शकेल का, हाही शंकास्पद मुद्दा आहे. कारण, या सेतूच्या उभारणीसाठी झालेला कोट्यवधींचा खर्च वसूल करण्यासाठी या सेतूचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवरच टोल बसविला जाणार आहे. टोल प्रत्येकालाच परवडेल अशी स्थिती नाही. टोलचे दर निश्‍चित झालेले नाहीत. पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. साहजिकच, ज्यांच्या खिशाला हा आकार परवडेल आणि ज्यांना वरळी-वांद्रे प्रवासातील नऊ दशांश वेळ वाचवायची खरी आवश्‍यकता असेल अशा लोकांकरिताच हा सेतू वापरात राहील आणि सर्वसामान्य वाहनचालक मात्र, जुन्याच स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करत या सेतूचे वैभव न्याहाळत राहतील.
पण ही स्थिती काही फार काळ राहणार नाही. कारण अशा समस्यांवरही तोडगा काढणे ही वाढत्या आणि वाहत्या मुंबईची गरजच असेल. काही वर्षानंतर, याच सेतूवरून सगळी मुंबई सागराशी लगट करत धावू लागेल...
माहीमच्या खाडीवरून जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गाला कदाचित हा भविष्यकाळदेखील पाहावा लागेल....
(sakal, June 27, 2009)

Friday, June 26, 2009

अण्णांचा आशीर्वाद

शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्‍यात जागे झाले होते.
एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता... ड्रायव्हरने त्याच्या भाषेत त्या ट्रकला शेलकी विशेषणं वापरली आणि पुढे पळणाऱ्या ट्रककडे बघून तो उपहासाने हसला.
"काय झालं...?' मी विचारलं.
त्यानं डोळ्यांनीच ट्रकच्या पाठीवर लिहिलेली अक्षरं मला दाखवली..."अण्णांचा आशीर्वाद'
"आजकाल कुणीही उठतंय आणि अण्णांचा आशीर्वाद मिळाल्यावर कसं पन वागायला लागतंय...' तो बोलून गेला आणि माझं कुतूहल चाळवलं. हा कुठल्या अण्णांबद्दल बोलतोय, हे मला समजत नव्हतं.
तोवर आमच्या गाडीचा ड्रायव्हर आणि माझ्यासकट सगळी गर्दी सावरली होती. त्याच्या या वाक्‍यावर बाकीचे सगळे समजल्यागत हसले. मी मात्र कोराच होतो. त्यानं हे ओळखलं असावं.
"अहो, आमच्याकडले सगळे उमेदवार ऊठसूट पारनेरला चाललेत. अण्णांना भेटून येत्यात आणि जनतेला सांगतात, अण्णांनी आशीर्वाद दिलाय म्हणून... अण्णांचा आशीर्वाद म्हणजे विजयाची खात्री...' तो म्हणाला आणि मी समजून गेलो.
अण्णा म्हणजे अण्णा हजारे... तो नगर मतदारसंघातल्या उमेदवारांबद्दल बोलत होता. हूल मारून पळून जाणाऱ्या त्या ट्रकच्या पाठीवरल्या अक्षरामुळे अण्णा हजारेंच्या आशीर्वादाचं प्रचारासाठी भांडवल करणाऱ्या उमेदवारांबद्दलची त्याची भावना जागी झाली होती.
संगमनेरला पोचलो. अण्णा हजारेंच्या कार्यालयात फोन लावला. अनिल शर्मांशी बोलणं झालं आणि कोडं आणखी उलगडत गेलं.
निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरू लागल्यापासून नगर जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांची अण्णांच्या दर्शनासाठी रीघ लागली होती.
अण्णांचे आशीर्वाद घेऊन परतलेले हे उमेदवार मग प्रचारातही त्याचा वापर करीत होते, हे लक्षात आल्यावर अण्णांना त्याचा इन्कार करावा लागला होता.
माझे आशीर्वाद म्हणजे पाठिंबा नव्हे, हे स्पष्ट करून अण्णांनी मतदार जागृतीची एक मोहीमच सुरू केली. सत्कर्म करणारा, जनतेचे प्रश्‍न सोडवणारा आणि जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या उमेदवारालाच मत द्या... असं आवाहन करणारी पत्रकं मग अण्णांनी राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात पाठवली.
नगर मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव कर्डिले, कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजीव राजळे आणि भाजपचे दिलीप गांधी या सर्वांनीच अण्णांचे आशीर्वाद घेतले होते; पण अण्णांचा पाठिंबा मात्र मिळाला नाही. परंतु यामुळे अण्णांची मोहीम राज्यभर पसरली.
मात्र, या निकषात बसणारे उमेदवार बहुधा त्यांनाही मिळाले नाहीत.
संपूर्ण राज्यात अण्णांनी फक्त तीन मतदारसंघांमधल्या तीन उमेदवारांची शिफारस केली होती...
लोकांचे प्रश्‍न सोडवणारे, अन्यायाला वाचा फोडणारे आणि जनतेच्या प्रश्‍नावर आंदोलनं करणारे तीन उमेदवार लोकसभेत जावेत, अशी अण्णांची इच्छा होती.
महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुधा सर्वत्र बहुरंगी लढती ल्हाल्या. राजकीय पक्षांचा, आघाड्यांचा आणि युतीचा पाठिंबा असलेले अनेक नामांकित उमेदवार रिंगणात उतरले होते.
नगर जिल्ह्यातल्या उमेदवारांनी केलेली अण्णांची दर्शनवारी फारशी फलद्रूप ठरली नाही. "अण्णांचा आशीर्वाद' प्रचारात आणण्याचे प्रयत्न फुसके ठरल्यावर मग नेहमीचीच प्रचारनीती सुरू झाली. लालकृष्ण अडवानी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, काळा पैसा अशा विषयांवर बोलून गेले. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्‍नांना हात घातला.
नगरचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे राज्यातल्या कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार समितीचे नेतृत्व असल्यामुळे ते नगरमध्ये फारसे नसतात, असं लोक म्हणतात. राजळे म्हणजे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे. त्यांनी बंडखोरी केली असली, तरी थोरातांनी आघाडीचा धर्म पाळायचं ठरवलेलं. दिलीप गांधींच्या प्रचारात "युती' दिसत नाही, असं काहींचं म्हणणं...
नगरमध्ये कोण निवडून येईल, ते सांगता येत नाही, असंच उत्तर कोणीही देत होतं.
निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसा कुणातरी एकाचा विजय निश्‍चित होईल, असं म्हटलं जायचं...
...आणि निवडणुका पार पडेतोवर अण्णांच्या आशीर्वादाचं प्रकरणही फारसं ताजं राहिलेलं नव्हतंच!

Friday, June 19, 2009

एक धागा...

लाल सिग्नल पडल्यानंतरही त्या गाडीने सुसाट वेगात रस्ता ओलांडला आणि पाठोपाठ एक जोरदार शिट्टी घुमली. करकचून ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या कडेला आली, आणि एका क्षणात थांबली. मुंबईत अजूनही ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्टीचा दबदबा आहे. पोलिसानं अडवल्यानंतर काय केलं म्हणजे रहदारीच्या नियमांतून "सुटका' होते, याचा अनुभव मुंबईतल्या जवळपास प्रत्येक वाहनधारकाला कधी ना कधी आलेला असतो. म्हणूनच, शिट्टी वाजली, की थांबायचं, ही "शिस्त' मुंबईच्या वाहनधारकांनी स्वतःहून अंगी बाणवली आहे.

म्हणूनच, या गाडीचा वेगही शिट्टीच्या आवाजानं रोखला गेला. गाडी थांबली आणि लपल्यासारखा रस्त्याकडेच्या आडोशाला उभा राहिलेला एक ट्रॅफिक हवालदार झपाट्यानं पुढे आला. कुठल्यातरी "एअरलाईन्स'च्या केटरिंग सर्व्हिसची ती व्हॅन होती. वेळेत विमानतळ गाठायचा म्हणून बहुधा भरधाव चालली होती. हवालदार जवळ येताच गाडीच्या डाव्या खिडकीतून एक हात पुढे आला आणि हवालदाराचे दोन्ही हात पुढे झाले...
असं काही दिसलं, की सामान्य माणसांचं कुतूहल नेहमीच जागं होतं. त्या गाडीच्या पाठोपाठ मी त्याच दिशेनं जात होतो. माझंही कुतूहल जागं झालं आणि वेगही मंदावला. माझे डोळे आता गाडीच्या डाव्या खिडकीला खेटून उभ्या असलेल्या हवालदाराकडे लागले होते. खिडकीतून थंडगार पाण्याच्या तीनचार बाटल्या बाहेर आल्या होत्या. हवालदारानं त्या बाटल्या हातात घेतल्या आणि तो मागे वळला. गाडी पुढे सरकली आणि आधीच्याच वेगानं विमानतळाच्या दिशेने निघाली.
हवालदार पुन्हा त्याच्या नेहमीच्या आडोशाला जाऊन बसला होता. शातंपणे त्यानं हातातल्या बाटल्यांपैकी एक बाटली उघडली, आणि बाटलीवरच्याच प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी भरून घटाघटा पिऊन संपवले.
भर दुपारचे उन्ह रस्त्यावर रणरणत होते.
हवालदारानं खिशातून रुमाल काढला. बाटलीतलं पाणी रुमालावर शिंपडलं, आणि सगळ्या बाटल्यांभोवती तो ओला रुमाल गुंडाळला. बाजूच्याच सिग्नल बॉक्‍समध्ये सगळ्या बाटल्या काळजीपूर्वक ठेवल्या, आणि शिट्टी तोंडातच ठेवून तो पुन्हा ड्यूटीवर दाखल झाला...
... दुपारचा हा अनुभव खरं म्हणजे नोंदवून ठेवावा असा नव्हता. नंतर रेल्वे स्टेशनवर पोहोचून गाडीत बसल्यावर तो प्रसंग मी विसरूनदेखील गेलो होतो. चर्चगेटला उतरून थेट विधानसभेत पोहोचलो, तेव्हा राजकारण, गुन्हेगारीकरण आणि कायदा सुव्यवस्था असे शब्द विधानसभेच्या परिसरात "दुमदुमत' होते.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना त्याच दिवशी "सीबीआय'ने अटक केली आणि राजकारण ढवळून निघालं. विधिमंडळात डॉ. पाटील यांची अटक गाजणार, हे अपेक्षितच होते.
विधानसभेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेतून डॉ. पाटील यांच्या अटकेचे पडसाद सभागृहात उमटलेच. अपेक्षेप्रमाणे गदारोळही झाला, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या, आणि कायदा सुव्यवस्थेवरील सगळी चर्चा डॉ. पाटील यांच्या अटकेभोवतीच घुटमळणार असे चित्र निर्माण झाले. "राजकारणाचे गुन्हेगारीकरण' नावाचा गुळगुळीत (!) झालेला शब्द पुन्हा घासूनपुसून बाहेर आला, आणि विधिमंडळापासून प्रसार माध्यमांच्या पडद्यांवर सर्वत्र दुमदुमू लागला...
...याच गदारोळात पोलिसांच्या परिस्थितीवर एक हलकासा प्रकाशझोत विधानसभेच्या सभागृहात पडला, म्हणून मला त्याच दिवशी सिग्नलजवळ पाहिलेला तो प्रसंग सहज आठवला.
कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेत गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहातून पोलिसांच्या परिस्थितीवर आश्‍वासक शब्दांचा शिडकावा केला, आणि दुपारच्या रणरणत्या उन्हात, सिग्नल तोडणाऱ्या एका गाडीला थांबवून दोनतीन पाण्याच्या बाटल्या "उकळणाऱ्या' त्या हवालदाराचा, थंड पाणी पिऊन संपल्यानंतरचा शांत चेहरा मला लख्ख आठवला...
जयंत पाटील यांनी विधिमंडळात दिलेला शब्द कृतीत उतरला, तर अशा असंख्य पोलीस हवालदारांना रणरणत्या उन्हातून घरी गेल्यानंतर सावली देणारं एक हक्काचं घर तरी मिळेल, असं वाटून मी उगीचच सुखावून गेलो. घरदार विसरून, उन्हातान्हात, रात्रंदिवस "ड्यूटी' बजावणाऱ्या सामान्य पोलीस हवालदारांच्या परिस्थितीवर स्वतः गृहमंत्र्यांनीच विदारक प्रकाशझोत टाकला होता.
... गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी बजावलेल्या कर्तृत्वाला मुंबईकरांनी सलाम केला. त्यामुळेच, सामान्य हवालदाराविषयीदेखील सामान्य माणसाच्या मनात आपुलकीची भावना दिसते. म्हणूनच, रस्त्याकडेला सिग्नलजवळ आडोशाला उभं राहून "सावज' पकडल्यासारखं एकाद्या वाहनचालकाला थांबवणाऱ्या हवालदाराच्या हातात "चिरिमिरी' कोंबताना, "लाच देणे हा गुन्हा आहे', हे विसरायला होतं. तुटपुंज्या, अनियमितपणानं मिळणाऱ्या पगारात हा "कायद्याचा रक्षक' घरादाराचा गाडा हाकताना मेटाकुटीला आलाय, हे एव्हाना तमाम जनतेला माहीत झालंय. मुंबईच्या हवालदाराला चांगलं घरही नाही, पोलीस वसाहतींची परिस्थिती दयनीय आहे आणि माणसांनी राहण्यायोग्य आरोग्यपूर्ण वातावरण तिथे नाही, हेही सगळ्यांना माहीत आहे. 26 नोव्हेंबरनंतर झालेल्या खांदेपालटात जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आले, आणि लगोलग त्यांनी मुंबईतील पोलीस वसाहतींना भेटी दिल्या. पोलिसांशी संवाद साधला. आणि त्यांच्या कुटुंबाला सोसावे लागणारे हाल डोळ्यांनी पाहिले. गलिच्छ, मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींमध्ये आणि चिखलाच्या पायवाटा तुडवत झोपडपट्ट्यांमधल्या आपल्या घरी रात्री अपरात्री पोहोचणाऱ्या हवालदारांच्या व्यथा जाणून घेतल्या...
त्या सभागृहात विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढल्यानंतर चर्चेच्या उत्तरात जयंत पाटील यांनी स्वतःच पोलिसांच्या या अवस्थेची कबुलीच दिली. पद्मसिंह पाटील यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, सरकार त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासावर प्रभाव पडेल अशी कोणतीही भूमिका घेणार नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा खरा रक्षक असलेल्या पोलीस यंत्रणेच्या भल्याचा पाढा वाचला, आणि 26 नोव्हेंबरनंतर पोलिस खात्यातील त्रुटी आणि उणीवा प्रकर्षाने सामोऱ्या येऊ लागल्याचे उघड झाले. गुप्तवार्ता यंत्रणेपासून पोलिसांची बुलेटप्रुफ जॅकेटस, "फोर्स वन' कार्यान्वित होण्याची गरज आणि अगदी पोलिसांच्या मानसिक आरोग्यापर्यंतची प्रत्येक बाब आता ऐरणीवर आली आहे. पोलिसांचे कौटुंबिक स्वास्थ्य, त्यांचे प्रशिक्षण आणि कमरेला लटकावलेल्या शस्त्राची निगराणी यावरही कटाक्ष देण्याची गरज सरकारला भासू लागली आहे, हे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
... आता पोलिसांना शस्त्रे चालविण्याचा सराव करता येईल. आता पोलिसांचे "फोर्स वन' पथक कार्यरत होईल आणि गुप्तवार्ता पथकात प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा ताफाही दाखल होईल. दहशतवादविरोधी पथक आणखी सक्षम होईल. त्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याचे अर्थमंत्र्यांनी मान्य केलंय, असा शब्द जयंत पाटील यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिला आहे.
पद्मसिंह पाटील यांच्या अटकेचे वादळ राज्यात घोंघावत असल्याने, पोलिसांना दिलाशाचा शिडकावा देणारे जयंत पाटील यांचे ते शब्द अजून सभागृहाबाहेर फारसे पोहोचलेच नाहीत...
पण, त्याच दुपारच्या रणरणत्या उन्हात, रस्त्यावरच्या त्या हवालदाराला थंडगार पाण्यामुळे मिळालेले समाधान आणि सभागृहात जयंत पाटील यांनी केलेला आश्‍वासक शब्दांचा शिडकावा यांचा एक अदृश्‍य धागा मला जाणवून गेला. केवळ योगायोगाने!...

(Sakal, Saptarang, 14 June 2009)

Sunday, June 14, 2009

दिल मिले ना मिले....

`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो.
त्याच्या प्रश्‍नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्‍न माझ्यासमोर फेकला होता.
`अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता.
इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं.
प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या. त्यामुळेच, त्या सामाजिक समस्या बनल्याचा माझा निष्कर्ष होता.
पण `माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो', असं तो म्हणाला तेव्हा मी विचार करायला लागलो.
नंतर त्याचं बोलणं जसजसं स्पष्ट होत गेलं, तसतसा माझा गोंधळही संपत गेला.
माणूस पहिल्यांदा समाजाचा विचार करतो, म्हणजे तो ज्या जातीचा आहे, त्याचा पहिल्यांदा विचार करतो... असंच त्याला म्हणायचं होतं.
`माणूस आपल्या समाजाच्याच उमेदवाराला मत देणार... मग तो कुठल्याही पक्षाचा असो'... त्यानं आणखी रोखठोक स्पष्ट केलं आणि मी अक्षरशः अचंबित झालो.
इथल्या मतदारांच्या मानसिकतेनं, राजकारण, निवडणुकांचे आडाखे यांची साधारणपणे आखली जाणारी गणितंच पुसून टाकली होती.
निकष फक्त एकच!... जात.
`माणूस फक्त जातीचा विचार पहिल्यांदा करतो... पक्ष नंतर' त्याचं हे मत मी ऐकलं आणि रावेर मतदारसंघातलं त्यावरच आधारलेलं विश्‍लेषणही ऐकण्यासाठी मी थोडासा पुढे झुकलो...
या मतदारसंघात लेवा पाटील समाजाच्या आणि मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. म्हणजे, ज्या समाजाचे मतदार इथे सर्वाधिक मतदान करतील, तो उमेदवार निवडून येणार... तो कोणत्या पक्षाचा, हे महत्त्वाचे नाही... मी तर्क लढविला.
एरंडोल मतदारसंघ नकाशावरून पुसला गेल्यानंतर अस्तित्वात आलेला रावेर मतदारसंघ हा सर्वांत मोठा मतदारसंघ असल्याचा अभिमान इथल्या मतदारांमध्ये रुजला आहे. जवळपास 14 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात उमेदवार कितीही असले, तरी मराठा विरुद्ध लेवा पाटील अशी सरळ दुरंगी लढत आहे, असे मानतात. म्हणूनच, `आता नाही तर पुन्हा कधीच नाही' हे इथल्या दोन्ही बाजूंच्या प्रचाराचं परवलीचं वाक्‍य आहे.
`गेली असंख्य वर्षं एकाच समाजाचा खासदार निवडून दिला, आता बदल हवा. आता दुसऱ्या समाजाला लोकसभेत पाठवा,' असा संदेश एका बाजूने दिला जातो, तर `या वेळी हा बदल झालाच, तर पुन्हा आपल्या समाजाचा उमेदवार कधीच लोकसभेत जाणार नाही' असा प्रचार दुसऱ्या बाजूने केला जातो.
रावेर मतदारसंघातली लढाई ही दोन प्रस्थापित, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांची आहे, हे केवळ म्हणण्यापुरतं... कारण, तिथल्या उमेदवारांची निवडणूक चिन्हं त्या पक्षांची आहेत; पण खरं तर इथली लढाई दोन प्रस्थापित समाजांमधील, जातींमधील राजकीय वर्चस्वाची...
...रावेरचं हे चित्र अगदी सुशिक्षित मतदारांमध्ये आणि अगदी सामान्य, अर्धशिक्षित किंवा अशिक्षितांमध्येही तसंच भिनलेलं...
उन्हाचा कडाका ओसरत असताना, संध्याकाळच्या वेळी तिथल्या एसटी स्टॅंडवर गर्दी सुरू होते... आसपासची माणसं आपापल्या गावी जाण्यासाठी तिथं जमतात. सहा आसनी रिक्षांमध्ये इंच-इंच जागेत मावेल एवढी गर्दी कोंबून झाली, की उरलेली गर्दी एसटीची वाट पाहत ताटकळते.
मग निवडणुकीच्याही गप्पा रंगत जातात. उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, त्याचं काम काय, तो समस्या सोडवतो की नाही, असले प्रश्‍न त्यात नसतात. तो कोणत्या समाजाचा आहे, हेच तिथे महत्त्वाचे असते. शिवाय, नाराजीचे मुद्दे असतातच...
`कशाला हवं हे मतदान...?' कुणीतरी वैतागल्यासारखा बडबडून जातो.
मग अचानक सगळेच गंभीर होतात.
`नाही... तो आपला हक्क आहे. तो बजावलाच पाहिजे... म्हणून तरी मतदान करायचंच'... एक जण आणखी गंभीरपणे बोलून जातो.
मग अशाच गप्पा मारतामारता कुणीतरी गर्दीतच एक शेर फेकतो...
`शहर अन्जाना है, लोग भी अनजाने है... हाथ तो मिलाते चलो, दिल मिले ना मिले ...
आणि गर्दी माना हलवत पसंती दर्शवते. गाडी येते, गर्दी पांगूनही जाते...

Tuesday, June 9, 2009

तिसरा सामना

नंदुरबारकडे जाताना रस्त्याच्या डावीकडे रनाळे आणि वावद अशी दोन लहानशी गावं लगटून वसलीत. रस्त्याकडे पाठ करून असलेली इथली घरं उगीचच आपली उत्सुकता वाढवतात. रस्त्याच्या दुसऱ्या अंगाला, नुसतं मोकळं मैदान लांबवर पसरलेलं....
नंदुरबारकडे जाताना मी रस्त्याच्या दोन्ही बाजू सहज न्याहाळत होतो.
आणि माझी नजर त्या मैदानावर खिळली. हे दृश्‍य आपण कुठंतरी पाहिलंय, असं उगीचच वाटत राहिलं. आणि "लगान'ची आठवण झाली.
त्या मैदानावर, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, क्रिकेटचा सामना सुरू होता...अगदी "लगान'मधलं दृश्‍य.



मग मी तिथंच उतरलो. रस्त्याकडेच्या झाडाखाली एक टीम सावलीत बसली होती. त्यांचे दोन खेळाडू बॅटिंगला गेले होते. मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. सहज एक फोटो काढला.
मग ओळख करून दिली आणि गप्पा सुरू झाल्या.
विशी-पंचविशीतली पंधरावीस मुलं सकाळपासून क्रिकेट खेळत होती. मी तिथं गेलो, तेव्हा त्यांचा दुसरा सामना सुरू झाला होता.
त्यांच्यातले बरेचजण आदिवासी समाजातले होते.
मी निवडणुकीचा विषय काढला आणि सगळ्यांनी माना फिरवल्या. कुणी बोलायलाच तयार नव्हतं. मी मात्र त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतच होतो.
अखेर नाइलाज झाल्यासारखा एकजण बोलायला लागला.
हा त्या घोळक्‍यातला सगळ्यात जास्त शिकलेला तरुण . तो डी.एड. करत होता. सुट्टीला गावी आला होता. बाकीचे सगळे सातवी-आठवीनंतर शाळेला रामराम ठोकलेले.
"पेपर वाचता की नाही?'...माझ्या या प्रश्‍नावर कुणीच उत्तर दिलं नाही.
"कोण निवडून येणार?' मी पुढचा प्रश्‍न विचारला.
"आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही'.....एक जण तुटकपणानं बोलू लागला. "निवडणुकीचे आठपंधरा दिवस सगळेच दारू, चिकनमध्ये अटकलेत. मजा करतायत....नंतर पुन्हा तेच....आमच्या गावात गेली 18 वर्ष प्यायला पाणी नाही. भरपूर मोर्चे काढले; पण उपयोग झाला नाही. सरपंचाकडं तक्रार केली, तर "मुतून प्या' म्हणून सल्ला देतो'...दुसरा एक जण कडवटपणानं म्हणाला...
मग मी निवडणुकीचा विषय काढलाच नाही.
"काय करता तुम्ही सगळे?'....मी विचारलं.
"काही नाही...दिवस उजाडला, की एकत्र जमतो...इथं क्रिकेट खेळतो.'...डी.एड. करणाऱ्या त्या तरुणानं उत्तर दिलं.
"मग आता कामधंदे, शाळा-कॉलेज काही नाही?'...मी विचारलं.
"काहीजण करतात की. नंदुरबारला जातात. मजुरीनं काम करतात. कुणी बांधकामावर जातात...पण सध्या सगळे घरीच आहेत. काही जणांनी नोकरीचे फॉर्म भरलेत. निवडणुका झाल्या, की शिपायाच्या नोकऱ्या मिळणार असं सांगितलंय आम्हाला...निवडणुका संपायची वाट बघतोय. तो बॅटिंग करतोय, तो डिप्लोमा इंजिनिअर आहे. जागतिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. मंदी संपली की पुन्हा घेणारेत त्याला कामावर....तस मालकानं सांगितलंय'....तो म्हणाला.
"सुट्टीत काय करणार?'....मी आणखी एक खडा टाकला.
"क्रिकेट खेळणार. रोज तीन मॅच....12 घंटे लोडशेडिंग असतं. घरात बसून काय करणार?'....तो सहजपणे उत्तरला.
मी पुन्हा मुद्द्यावर आलो....निवडणुकीचा विषय ओघानं आलाच होता.
"तुम्ही ज्यांना निवडून देता, त्यानं तुमची काम केलीत?'....मी विचारलं आणि त्यानं होकार देत मान हलवली.
"आमच्या गावात गरिबांना ढोरं, बकऱ्या, अनाज भेटतंय....विधवांना पैसे मिळालेत.'....तो म्हणाला.
"मग मतदान कुणाला करणार?'....माझ्या या प्रश्‍नावर त्यानं हातातल्या घड्याळाकडे बघितलं. दुपार टळटळीत झाली होती.
"आमच्या भागात घड्याळच चालू आहे.'....तो उत्तरला.
नंदुरबारमध्ये कॉंग्रेसचा पंजा, भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादीचा बंडखोर असा तिरंगी सामना आहे. डॉ. विजय गावितांचा भाऊ, राष्ट्रवादीच्या शरद गावितांनी कॉंग्रेसच्या माणिकराव गावितांच्या विरोधात समाजवादी पक्ष ाच्या तिकिटावर उभं राहून बंडखोरी केलीय. "भाऊ आपलं ऐकतच नाही,' असं विजयकुमार गावित सांगतात. ते राज्याचे मंत्री आहेत. शरद गावितांनी निवडणुकीआधीपासून खूप तयारी सुरू केली होती, असं इथले लोक सांगतात. तरीही उमेदवारी मिळाली नाही, म्हणून बंडखोरी केलीय.
नंदुरबार जिल्ह्यात "रीड इंडिया मिशन'चा प्रसार जोरात सुरू आहे. जागोजागी "वाचणारा नंदुरबार' अशा घोषणा रंगवलेल्या दिसतात.
इथला आदिवासी मतदार मात्र, "चिन्हा'ला मतदान करणार आहे.
...पण त्यांच्या घराघरात पोचलेलं चिन्ह. मतदान यंत्रावर दिसणारच नाहीये...

Monday, June 8, 2009

जनांचा प्रवाहो ...

भर दुपारची वेळ. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यावरची वाहतूक थंडावलेली. झाडाच्या आडोशाला, सावलीखाली उभ्या राहिलेल्या ट्रकखाली विश्रांती घेणारे ड्रायव्हर-क्‍लिनर सोडले, तर रस्त्यावर माणसांचा मागमूसदेखील नाही... मैलामैलांवर हीच स्थिती. शेगावकडे जाणारा रस्ता सुरू होतो आणि हे चित्र पालटून जातं. रणरणत्या उन्हात, माणसांचे घोळके संथ लयीत चालत असतात. तळपत्या उन्हात त्यांच्या हातातले भगवे झेंडे लांबवरून आणखीनच भडकभडक वाटू लागतात.
निवडणुकांचे दिवस आहेत, कार्यकर्त्यांच्या फौजा प्रचारासाठी बाहेर पडल्या असतील, असं क्षणभर वाटून जातं...पण विदर्भात रस्त्यावरून चालणारे, प्रचारासाठी चालत फिरणारे कार्यकर्ते दिसतच नाहीत. उन्हाच्या वेळा टाळूनच होणाऱ्या प्रचारासाठी देखील, वाहनांचे ताफेच दिसतात.
घोळक्‍यांचं अंतर कमी कमी होत जातं आणि हे कुठल्या पक्षाचे "प्रचारक' नव्हेत, हे चटकन लक्षात येतं.
आणि हे झेंडेही, "शिवसेनेचे भगवे' नव्हते, तर "भाविकांच्या भगव्या पताका' आहेत, हेही लक्षात येतं.



...राजकारण आणि निवडणुकांपलीकडे अलीकडे डोक्‍यात कुठलेच विचार नसल्याने, या झेंड्यांनाही आपण राजकारणाचाच रंग चढवला, असं वाटून मी उगीचच खंतावून जातो. घोळका रस्ता कापतच असतो.
हलक्‍या आवाजात, भजनाचा गजर सुरू असतो...
"गणगण गणात बोते'
घोळक्‍यात सर्वांत पुढे, कुठल्या तरी गावाच्या भाविक मंडळाचं नाव असलेला फलक. त्यामागे एकतारीचा किणकिणाट करत भजन सांगणारा म्होरक्‍या, मागे टाळ आणि पताका घेतलेले भाविक, आणि त्यांच्या मागून काही महिला...
खामगावच्या परिसरात शेगावच्या दिशेने जाणाऱ्या आणि शेगावकडून येणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर हेच दृश्‍य दिसतं. त्या रस्त्यावरून जाताना, मीदेखील राजकारण आणि निवडणूक विसरून गेलो.
रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता, "विदर्भाच्या पंढरी'चे हे वारकरी रस्ता कापत असतात. भर उन्हात, तापलेल्या, वाहनांची अजिबात वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावर फक्त भजनाचे, टाळ-ढोलक्‍यांचे सूर घुमत असतात. निवडणुकीचे सगळे रंग पुरते पुसलेले असतात. इतका, की या भाविकांच्या संगतीत, एखादा सरकारी अधिकारी, कर्मचारीही निवडणूक विसरून गेलेला असतो.
...बाळापूरच्या नाक्‍यांवरचं ते दृश्‍य मी पाहिलं आणि थक्क झालो.
रस्त्याच्या कडेला, एका मोठ्या झाडाच्या सावलीतच एक पोलिस चौकी आहे. वाहतूक पोलिसांचीही चौकी तिथंच आहे.
झाडाच्या पारावर, पाण्यानं भरलेला एक भलामोठा माठ...
झाडाखाली सावलीला विसावलेला पंचवीस-तीस भाविकांचा घोळका, आणि त्यांच्या गर्दीत, त्यांच्याशी चक्क आपुलकीनं गप्पा मारणारा, त्यांची विचारपूस करणारा एक पोलिस अधिकारी.



दुसरा शिपाई, त्या माठातलं पाणणी एकेका ग्लासमध्ये भरून प्रत्येक भाविकाच्या हातात देत असतो...
पोलिसांचं हे वेगळेच रूप मला त्या दिवशी दिसलं.
मी तिथं थांबलो. त्या घोळक्‍यासोबत बसलो. सहजच कुठून आले म्हणून विचारपूस केली.
नाशिकजवळच्या कुठल्या तरी गावातून विदर्भाच्या पंढरीला आलेली ती वारी होती.
या बायकापण तुमच्यासोबत चालतात? मी एकाला विचारलं.
त्याला बहुधा खोटं बोलवेना.
"नाही... मधूनमधून एखाद्या गाडीने प ्रवास करून पुढच्या टप्प्यापर्यंत जातात. तिथं पुन्हा आम्हासोबत येतात आणि दुसरा गट गाडीनं पुढं जातो... एवढं चालणं सगळ्यांना झेपत नाही.. लई उन हाये...' तो प्रामाणिकपणे म्हणाला.
तो पोलिस अधिकारी, घोळक्‍याच्या मधोमध टेबल-खुर्ची टाकून बसला होता.
"काय हो तुम्हाला आचारसंहिता नाही?' मी उगीचच त्याला म्हणालो.
भगव्या झेंड्यांनी घेरलेल्या घोळक्‍यात बसलेल्या त्या अधिकाऱ्याला आचारसंह�¤ �तेचं नाव काढल्यावर कदाचित भीती वाटेल, अशी माझी समजूत होती.
पण तो केवळ हसला.
"अहो, हाच आमचा नेहमीचा आचार आहे.. इथून रोज शेकडो भाविक महाराजांच्या दर्शनाला जातात. त्यांना पाणी दिलं, त्यांची सेवा केली, तर आचारसंहितेचा भंग होईल?.. त्यानं मला उलटा सवाल केला.
आणि त्यावर काय बोलावं हे न सुचल्यानं मी गप्प बसलो.
थोड्या वेळानं तो घोळका उठला.. पोलिस अधिकारी आणि तो शिपाईही उठले. एकमेकांचे हात हातात घेऊन ते नमस्कार करत परस्परांचा निरोप घेत होते. आणि टाळ वाजले...
"गणगण गणात बोते.' गजर झाला आणि घोळका पुढे सरकू लागला....
रस्त्यावर पुन्हा भगव्या पताका फडकू लागल्या....
.....................

Sunday, June 7, 2009

गळती ...

चंद्रपुरातल्या समस्यांविषयी कॉंग्रेस उमेदवार नरेश पुगलिया आणि भाजपच्या हंसराज अहिरांचे प्रतिनिधी आमदार सुधीर मुनगंटीवार या दोघांशी माझं बोलणं झालं होतं. एक नेमका धागा मिळाला होता; पण त्या समस्यांच्या पलीकडेही काही असू शकतं, असं मला वाटत होतं. इथं शाळा आहेत; पण गळतीचं प्रमाणही खूप आहे.
मुनगंटीवारांकडून निघताना एक कार्यकर्ता सोबत बाहेर आला.
`इथे शिक्षणाच्या, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कशा आहेत?....' मी त्याला विचारलं.
`इथल्या पाण्यात क्षार वाढलेत. ते पिऊन ग्रामीण भागात आजार, किडनीचे विकार बळावतायत. लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो.' तो म्हणाला.
`मुलं शाळा का सोडतात? शाळांमधली गळतीची समस्या कशामुळे वाढते?'... बोलता बोलता अचानक त्यानं मलाच प्रश्न केला. मग मी मला आठवणारे सगळ्या समित्यांचे अहवाल डोक्यात साठवायला सुरवात केली.
`मुलांना शिक्षणात रस नसतो. आईबापांमध्येही शिक्षणाचे महत्त्व पोचले नाही. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, असा आग्रह धरणारे आईबाप अजूनही ग्रामीण भागात कमी आहेत आणि मुख्य म्हणजे, गरिबी. आपला मुलगा शाळेत गेला, तर मजुरीच्या कामात त्याची मदत होणार नाही, कमावणारे हात कमी होतील, या भीतीनं आईबापदेखील शाळेचा आग्रह धरत नसावेत. मुलीनं शिकून काय करायचं, हा विचारही ग्रामीण भागात असतोच,' आठवेल तसं मी बोलून गेलो;
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
`तुम्हाला अभिमन्यूची गोष्ट माहीत आहे?' त्यानं नवाच प्रश्न विचारला. मी "हो' म्हटलं, आणि त्याच्याकडे बघितलं.
`आईच्या पोटात असताना चक्रव्यूह भेदायची कला तो ऐकून शिकला. कारण, त्याच्या आईला सकस आहार मिळत होता. गर्भवतीला सकस आहार मिळाला, तर तिचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. शहरातल्या, नोकरी करणाऱ्या बायकांना बाळंतपणाआधी आणि नंतरही, विश्रांतीसाठी, बाळाच्या पालनपोषणासाठी हक्काची रजा मिळते. खेडेगावांमध्ये, गरोदर बाई अवघडलेली असली, तरी तिला पाणी काढावं लागतं. शेतात राबावं लागतं, गुरंढोरं, शेळ्या घेऊन रानात जावं लागतं. बाळंतपणानंतर पुन्हा लगेच तिला राबावंच लागतं....' तो माझ्याकडे न पाहता, चालताचालता बोलत होता.
`तिचं मानसिक आरोग्य शहरी बाई इतकं सुदृढ राहील? तिच्या बाळाच्या बुद्धीचा विकास होईल?' त्यानं पुन्हा मलाच सवाल केला.
पुन्हा मी नकारार्थी मान हलवली.
आता अभिमन्यूचा संदर्भ हळूहळू लक्षात येत होता.
`तर तो अभिमन्यू, एका संपन्न घरातल्या बाईच्या पोटात होता. पोटातल्या बाळाचं नीट संगोपन व्हावं, म्हणून तीच नव्हे, तर अवतीभोवतीचं सगळं जग तिची काळजी घेत होतं. मग गर्भातल्या त्या बाळानं स्वस्थपणानं चक्रव्यूह भेदायचं तंत्र ऐकलं, तर त्यात विशेष ते काय?
आमच्या गावातल्या बाईच्या पोटातलं बाळ काय ऐकणार? तिचं आरोग्य तितकं चांगलं असतं? तिला सकस अन्न मिळतं? पोटातल्या बाळाचं संगोपन नीट होतं?' तो पुन्हा भडभडून बोलत होता. मी नकारार्थी मान हलवत होतो.
`मुलाला जन्मानंतर सकस आहार मिळाला, त्याचं नीट संगोपन झालं. तर त्याच्या मेंदूची वाढही चांगली होते. मुलांची बुद्धी वाढते आणि त्याला शिक्षणाची गोडी लागते. तो स्वत:च शिक्षणात रमतो आणि शाळेत जातो.' तो विश्žवासानं बोलत होता.
`आमच्या भागात, शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप आहे; पण त्याचं कारण हेच आहे. त्याला शिक्षणात गोडी वाटत नाही. कारण त्याच्या मेंदूचा तसा विकासच झालेला नसतो.' त्यानं कोडं उलगडलं.
आपल्या मुलानं खूप शिकावं, असं ग्रामीण भागातल्या आईबापांनाही वाटत असतं. त्यासाठी स्वत: राबायची त्यांचीही तयारी असते. मुलींनाही शिकवायची त्यांची इच्छा असते. पण...'
तो पुढे बोलला नाही.
पण, मी समजून गेलो.
आईच्या आरोग्याशी, तिच्या गरोदरपणाच्या काळातील काळजीशी आणि पोटातल्या बाळाच्या संगोपनाशी शाळा गळतीच्या कारणाचं मूळ जोडलं गेलं आहे, हे कुणी लक्षात घेतलं असेल?... मला प्रश्न पडला.
`कुठून मिळवलीत एवढी माहिती?' मी त्याला विचारलं.
`भाऊंनीच मागं कधीतरी सांगितलं होतं.' तो उत्तरला.
निवडणुकीच्या प्रचारात गळतीचा मुद्दा नसला, तरी त्याला ही समस्या छळतच होती. गळतीच्या कारणांचा एक वेगळा कंगोरा मला शिकायला मिळाला होता.
------------------

Saturday, June 6, 2009

`भाऊसंस्कृती'!

...एक नवी संस्कृती निवडणुकीच्या माहोलात जोर धरते आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला आहे... गावोगावी नवे नेते उदयाला येत आहेत.
नेता, आमदार, खासदार जणू आपल्या खिशात आहेत, अशा थाटात हे नवे नेते वागतात आणि गावातल्या प्रचाराची, खर्चाची आणि गाड्याघोड्यांची, झेंडे-टोप्यांची सगळी व्यवस्था आपोआपच त्यांच्याकडे येते.
प्रचारासाठी गावात आलेला उमेदवार, सोबतचा नेता, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी जवळीक साधत गावावर इम्प्रेशन मारणारी ही संस्कृती नेत्याला आणि उमेदवाराला टाळताच येत नाही.
`सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा अवघड स्थितीत अखेर नेते आणि उमेदवार या संस्कृतीपुढे गुडघे टेकतात.
`कार्यकर्त्यां'चा `नेता' होण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा, म्हणजे ही संस्कृती...
उमेदवार, खासदार किंवा नेता हा या संस्कृतीचा `भाऊ' असतो. त्यांच्यापुढे `भाऊ, भाऊ' म्हणत घुटमळणे हा या नवसंस्कृतीचा गुणधर्म म्हणून ही `भाऊसंस्कृती.'
अंगावर खादीचे कडक कपडे, डोळ्यावर भारी गॉगल, पायात पांढऱ्या चपला आणि गळ्याभोवती झेंड्याच्या रंगाचा पट्टा... एवढं भांडवल या संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुरेसं असतं.
मग भाऊसंस्कृती `कामाला' लागते.
गावात आमदार, खासदार प्रचाराला येणार असला, की हे नवोदित नेते त्याआधीच ठिकाणावर हजर होतात. नेत्याचं आगमन झालं, की हार घालण्यासाठी, स्वागतासाठी चढाओढ करणाऱ्या गर्दीच्या नियोजनाचं काम ते स्वतःहून हातात घेतात.
भाऊ येऊन बसले, की यांच्या खिशातला मोबाईल बाहेर निघतो. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा नंबर फिरवला जातो. पलीकडून अधिकाऱ्यानं फोन उचलला, की याचा आवाज चढतो.
`जरा भाऊंशी बोला...' असं सांगून आपला मोबाईल तो भाऊंच्या हातात देतो.
भाऊ गोंधळतात... कुणाशी बोलायचंय, काय बोलायचंय, काहीच कल्पना नसते. मग केविलवाणेपणाने भाऊ याच्याकडेच बघतात. मग हा भाऊंच्या कानाला लागतो.
आजूबाजूची गर्दी हे न्याहाळत असते. भाऊंशी याची जवळीक असल्याचा एक पुरावा आपोआपच गर्दीला मिळतो.
आणि हा नेता होतो!
पलीकडचा अधिकारी, साहेबाच्या `आदेशा'ची वाट बघत फोन कानाला लावून ताटकळत असतो. यानं सांगितलेलं ऐकलं न ऐकलं करत भाऊ त्या अधिकाऱ्याला फर्मान सोडतात आणि अधिकाऱ्यासोबतचं पुढचं बोलणं हाच करतो.
याच्या फोनवरून प्रत्यक्ष साहेबांनीच आदेश दिलेले असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यालाही साहेब म्हणून स्वीकारतात...
आणि हा नेता होतो!
... सकाळी भाऊंना दौऱ्यावर निघायचं असतं; पण बंगल्याबाहेर `जनते'ची गर्दी असते.
हाही बंगल्यावर पोचतो. दोन-चार वेळा उगीचच आतबाहेर करतो.
भाऊ घाईगडबडीत असतात. घरातला फोन खणखणत असतो. त्याच गडबडीत ते फोनवर कुणाकुणाला काही काही सांगत असतात. त्यातले काहीबाही याच्याही कानावर पडते.
मग बाहेर आल्यावर, त्यातलं काहीतरी सांगून हाच गर्दीवर इंप्रेशन मारतो. आपण भाऊंना अंतर्बाह्य ओळखतो, असा त्याचा तेव्हा चेहरा असतो...
आणि हाही नेता होतो!
भाऊसंस्कृतीच्या या उदयामुळे नवनेतृत्वाची दारे खुली झाली आणि अनेकांचे दरवाजे बंद झाले.
भाऊसंस्कृतीमुळे उदयाला आलेल्या नव्या नेत्यांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांना खूष ठेवण्यासाठी जुन्या नेत्यांना, भाऊंना कसरती करण्याची वेळ आली.
या नव्या संस्कृतीच्या आपापसातील स्पर्धेमुळे, सरकारी समित्यांवर कुणाची नियुक्ती करावी, ही समस्या भाऊंपुढे उभी राहिली आणि त्या नियुक्त्याच रखडत गेल्या. निवडणुका आल्या, जुन्या सरकारचा कालावधी संपायची वेळ आली, तरी समित्याच अस्तित्वात आल्या नाहीत.
...भाऊसंस्कृतीचा उदय असो!
या संस्कृतीतून उदयाला आलेल्या नेत्याला जपण्यासाठी, विहिरीच्या लाभार्थींच्या याद्या बदलाव्या लागतात. पॅकेजचे लाभार्थी बदलतात. अकोल्यात पाच वर्षांत विहिरींच्या लाभार्थींची अंतिम यादी झालीच नाही... कारण भाऊसंस्कृती!
अकोल्यात ठेकेदारीचीही मक्तेदारी झाली... ठराविक लोकांचीच कामं सरकारी अधिकारी सर्टिफाय करतो. भाऊसंस्कृतीमुळे...!
पूर्वी, जेव्हा ही संस्कृती फोफावली नव्हती, तेव्हा उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळून वर यायचं.
आता डांबर तरी दिसतं?
कारण काय? `भाऊसंस्कृती'!
रेशन दुकानाचं वाटप का रखडलं? समित्या का रखडल्या? योजनेचे लाभार्थी का बदलले?
सगळ्याचं उत्तर एकच `भाऊसंस्कृती'!
ही संस्कृती आता आणखीनच फोफावली आहे. नवे नेते जन्म घेताहेत.
... भाऊसंस्कृतीचा विजय असो...!

Wednesday, June 3, 2009

आचारसंहिता

सातत्याने हाल सहन करावे लागले, की ती जणू जीवनशैलीच होऊन जाते. असं जगण म्हणजेच आयुष्य असं वाटायला लागतं. विनोबांच्या वर्ध्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत. आत्महत्यांमुळे वर्धा जिल्हा जगाला माहीत झाला. इथल्या प्रचारातही मदतीचे पॅकेज हाच मुख्य मुद्दा आहे.
`तरीही इथल्या समस्या संपलेल्या नाहीत.' वर्ध्यात एका चहाच्या टपरीवर ओळख झालेल्या एकाशी गप्पा मारताना मी तसं म्हणालो आणि तोही हसला.
`का हसलात?' ... मी विचारलं.
`तुम्हा पुण्या - मुंबईकडच्यांना हे सगळं वेगळंच वाटणार... आम्हाला यात नवीन काहीच नाही.' तो म्हणाला.
`विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अनेक जण पोरके झाले. सरकारनं त्यांच्यासाठी हजारो कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पुढे काय झालं? त्यानं मला उलटा प्रश्žन केला.
...`अशी अनेक कुटुंबं आजही वाऱ्यावरच आहेत. कोट्यवधींचा निधी कुठे गेला? मदत म्हणून आलेल्या गाई-म्हशी कुठे गेल्या? ' तो एकामागोमाग एक प्रश्žन विचारत होता.
`इथे दुभत्या गाई वाटताना, त्यांच्या कालवडींना त्यांच्यापासून तोडलं... कालवडी ठेवून घेतल्या आणि गाईंसोबत दुसऱ्याच गायांचे गोऱ्हे जोड्या करून वाटले. कसं देतील त्या दूध?' ...त्याच्या सुरात कडवटपणा भरला होता.
`आमच्या जिल्ह्यात मदतीचा ओघ आला; पण आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाच डावललं गेलंय. पवनारला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्žया आत्महत्या झाल्या असतील; पण लाभार्थी तब्बल 38. त्यांना विहिरी खोदण्यासाठी लाखांचं अनुदान मंजूर झालंय. आणि अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विहिरी नाहीत. काही जण आता कोर्टात गेलेत. रंजना देशमुखपण वादी आहे.' तो म्हणाला आणि मला रंजना देशमुख आठवली.
पतीनं आत्महत्या केल्यानंतर सोनिया गांधी सांत्वनासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. वर्ध्यापासून दहा- पंधरा किलोमीटरवरच्या तळेगावातल्या रंजनाच्या घरी तेव्हा प्रसारमाध्यमांची रीघ लागली होती...
`विहिरीचं अनुदान मिळावं म्हणून रंजना अजूनही वणवण करतेय... त्याच गावातल्या एकाच्या नावावर सातबारापण नाही, आणि त्याला मात्र विहीर मंजूर झालीय... आता ती खोदायची कुठं हा प्रश्žन त्याला पडला असेल..' म्हणूनच म्हणतो, आम्हाला हे रोजचंच झालंय...' अचानक त्यानं बोलणं थांबवलं.
`रंजना देशमुखला भेटता येईल का?' मी त्याला विचारलं.
`तिचं गाव इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे.' तो म्हणाला. लगेचच त्यालाच बरोबर घेऊन मी तळेगावकडे निघालो.
रंजना देशमुखच्या घरी पोचलो, तेव्हा अंधारत होतं... रंजनाबाई घरातच होत्या. मी ओळख करून दिली आणि आम्ही आत गेलो.
घरात समोरच्या भिंतीवर रंजनाबाईंचं सांत्वन करताना सोनिया गांधींचा फ्रेम केलेला फोटो लटकावला होता. सुशीलकुमार शिंदे आणखी काही नेतेही त्यात दिसत होते.
`नंतर कुणीच आलं नाही. विहीरपण मिळाली नाही.' रंजनाबाईंनीच बोलायला सुरवात केली.
`सोनिया गांधींच्या हातानं एक लाखाचा चेक मिळाला. त्यातले 30 हजार आतापर्यंत संपलेत. 70 हजारांची पावती केलीये... 25 हजारांची शेतीची औजारं मिळाली. पण ती आमच्याकडे आधीपास्नंच होती. आमची जमीन कोरडवाहू आहे. खरं तर विहिरीसाठी अनुदान मिळायला हवं. मी खूप प्रयत्न केले. पण काहीच उपयोग नाही...' रंजनाबाईंच्या आवाजात खंबीरपणा होता.



`पण तुम्हाला गाई मिळाल्या असतील ना. मी विचारलं.
`मिळाल्या पण त्या दूध देत नव्हत्या. विकल्या. सहा हजारांचा तोटा झाला माझा त्यात... गाईसाठी अर्ध अनुदान होतं. आणि अर्धे पैसे शेतकऱ्यानं भरायचे होते. मला 16 हजारांची एक गाय, अशा दोन गाई मिळाल्या. मी सोळा हजार भरले. नंतर दहा हजारांत दोन्ही गाई विकल्या. सहा हजार गेले. गाईपण गेल्या. आता विहिरीसाठी अर्जविनंत्या केल्यात. रोज कलेक्žटरपासून सगळ्यांना भेटते. पण... आता निवडणुकीची आचारसंहिता आहे. आचारसंहिता संपेपर्यंत काही होणार नाही म्हणतात ते...' रंजनाबाई म्हणाल्या.
आचारसंहिता संपल्यावर शेतात विहीर होईल, अशी त्यांना आशा आहे.
रंजनाबाईंची समस्या अजूनही संपलेली नाही.
`...म्हणूनच म्हणतो, आम्हाला हे नेहमीचंच आहे.' ...रंजनाबाईंच्या घरातून बाहेर पडल्याक्षणी तो पुन्हा म्हणाला.
...गावात अंधार गडद झाला होता. मिणमिणते दिवे केविलवाणे दिसत होते.

नाना कुलकर्णी

दुपारच्या टळटळत्या उन्हात भटकताना मी अकोल्यातल्या एका चौकातील आळशी संकुलाच्या इमारतीवरचा झेंडा बघून मी आत शिरलो आणि जिना चढून थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो.
भाजपच्या त्या निवडणूक कार्यालयात पन्नासएक कार्यकर्ते हॉलमधल्या भल्यामोठ्या सतरंजीवर पहुडले होते. कुणी खांद्यावरचा रुमाल स्वतःभोवती पंख्यासारख्या फिरवत होते, तर कुणाच्या हातात वर्तमानपत्रांच्या घड्या होत्या. तिथून आणखी पुढे, आत गेलो.
टेबलावर एक जण फायलींच्या ढिगाऱ्यात डोकं खुपसून बसला होता. सिल्क खादीचा झब्बा, जाड चौकोनी फ्रेमचा चष्मा... निवडणूक कार्यालयाची सारी जबाबदारी त्याच्यावरच असावी, असं व्यक्तिमत्त्व. मी ओळख करून दिली.
त्यांनीही वर पाहत नमस्कार केला. `मी नाना कुलकर्णी...' स्वतःचं नाव सांगत समोरच्या खुर्चीत बसण्याची खूण करून त्यांनी पुन्हा फायलीत डोकं खुपसलं.
बाजूच्या पार्टिशनपलीकडच्या केबिनमध्ये आणखी काही जण कामात असावेत. नाना इकडूनच त्यांना सूचना देत होते. दहा-पंधरा मिनिटांनंतर मी घड्याळाकडे बघितलं आणि नानांनी फाईल मिटली. घड्याळाकडे पाहत त्यांनी बाहेर सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांना हाक दिली.
`चला... कामाला लागा... निघा...' बसल्या जागेवरूनच ते म्हणाले आणि सुस्तावलेले ते कार्यकर्ते क्षणात ताजेतवाने झाल्यासारखे उठले. भिंतीशी ठेवलेल्या पिशव्या काखोटीला मारल्या गेल्या. मिनिटभरात कार्यालयातली गर्दी ओसरली.
उन्हं खूप असल्यामुळे त्यांना जरा वेळ सुट्टी दिली होती. थोडेसे सैलावून बसत नाना म्हणाले,
`बोला.'... माझ्याकडे पाहत, जुनी ओळख असल्याच्या सुरात नाना ऐसपैसपणे बोलले आणि मी काही बोलायच्या आधीच त्यांनी टेबलाचे खण उघडले. आतून भराभरा कागद बाहेर काढले आणि माझ्या हातावर ठेवले.
`हा आमच्या उमेदवाराच्या प्रचाराचा कार्यक्रम... हे प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्यांचे नंबर... मी त्यांना वाटून दिलेल्या कामाची यादी... हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार.. बाहेरच्या भिंतीवर उमेदवाराच्या येत्या आठवडाभराच्या प्रचार दौऱ्याचा संपूर्ण तपशील चिकटवलाय... कार्यकर्त्याला कोणतीही शंका राहू नये म्हणून सगळं काही कागदावर उतरवलं आहे. ते तसंच्या तसंच होणार.'... नाना झपाट्यानं बोलत होते.
`या मतदारसंघात कोणते मुद्दे प्रचाराचे ठरणार?'... नानांनी दिलेले कागद बॅगमध्ये ठेवत मी विचारलं आणि पुन्हा एक ड्रॉवर उघडून त्यांनी आणखी एक कागद माझ्या हातात ठेवला. संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या ठळक समस्यांची यादी त्यावर होती. वीजटंचाई, पाणीटंचाई, आदिवासींच्या, विकासकामांच्या, शिक्षणाच्या, कुपोषणाच्या समस्यांनी ग्रासलेल्या वेगवेगळ्या भागांचे नकाशेच त्यांनी तयार केले होते.
`अकोला जिल्हा आहे, पण इथला विकास मात्र तालुक्याच्या स्तराइतकाच... ग्रामीण भागात अजूनही चांगले रस्ते नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट नीट नाही. त्याचा परिणाम पाण्याच्या भूमिगत स्रोतांवर होतो. आरोग्याच्या समस्या उग्र होतायत. पूर्वी अकोल्याच्या मुलांचं नाव एस.एस.सी. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये असायचं... काही वर्षांपासून ते गायब झालंय... अकोट विधानसभा क्षेत्रात आदिवासींच्या समस्या कायमच आहेत. मूर्तिजापूरला पाणीटंचाईचा प्रश्žन भेडसावतोय.'... नाना एकेका तालुक्याच्या समस्यांची यादी वाचत होते.
तो कागद हातात घेऊन आणि ऐकता ऐकता मी काही नोंदी करून घेत होतो.
शिवाय नानांची टेबलाच्या खणात आणखी काही कागदांची शोधाशोध सुरूच होती.
... `तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे?' माझ्या डोळ्यात रोखून पाहत नानांनी विचारलं. मी डोळ्यांनीच `काय' म्हणून विचारलं.
`इथे पेन्शनरांच्याही समस्या खूप आहेत... 1970 च्या दशकात सरकारी नोकरीत असलेले असंख्य लोक आता रिटायर झालेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिकामेच असतात. वेळ कसा घालवावा, याच्याच चिंतेतल्या या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणात या मुद्द्याला स्थान नाही, पण त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या. त्यांना काम द्या.'... नाना तळमळून बोलत होते.
... ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या हा काही एकट्या अकोला मतदारसंघाचा विषय नाही.
नाना कुलकर्णी भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या आखणीत बुडालेत. मोकळ्या वेळात ते जेव्हा घरी जात असतील, तेव्हा बागेत, मंदिरांमध्ये आणि वाचनालयांमध्ये दिसणारे ज्येष्ठ नागरिकांचे घोळके त्यांना अस्वस्थ करत असतील.
... पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो.
राजकारणाच्या धबडग्यातही, नानांच्या मनाचा हा जिवंत कोपरा मला भावला. डायरीत नोंदवावासा वाटला...
----------

Monday, June 1, 2009

"बीपीएल' आणि "इलेक्शन'

..
भंडारा, ता. 30 मार्च 09
....
"तुला कोणता पंतप्रधान आवडेल?... मनमोहनसिंग की अडवानी?'
वजन करून तिनं कागदात बांधलेली द्राक्षाची पुडी हातात घेत मी तिला विचारलं आणि ती चमकली.
असला प्रश्न तिला अनपेक्षित असावा. कदाचित हा प्रश्न विचारणारा मीच पहिला असावा.
मिनिटभर ती काहीच बोलली नाही. ती खूप विचार करतेय, हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
"मला बीपीएल कार्ड कोण काढून द्येल?'... काही वेळानंतर तिनं मलाच उलटा प्रश्न केला.
आता मी गोंधळलो होतो. तिच्या प्रश्नाचा संदर्भ मला समजत नव्हता.
"आमाला काय करायचंय पंतप्रधान... आमचं कार्ड अजून मिळालेलं नाही. किती खेपा घातल्या, किती अर्ज केले. अजून काय बी नाही.'
"तुमचे त्ये मनमोहनसिंग काय आणि अडवानी काय... मला बीपीएलचं कार्ड आणून देनार हाय?' तिनं ठामपणानं तोच प्रश्žन पुन्हा विचारला.
...भंडारा जिल्ह्यात पवनी नावाचं एक गाव आहे. तिथल्या रस्त्यावरच्या एका एसटीच्या शेडजवळ नूतन अंबाडे नावाची ही महिला दिवसभर द्राक्ष विकते. त्यातून होणारी कमाई, हे तिचं त्या दिवसाचं चरितार्थाचं साधन.
मी बस थांब्याच्या आसपास रेंगाळत होतो. द्राक्षाच्या टोपलीवर घोंघावणाऱ्या माश्या एका छोट्याशा फांदीनं हाकलत ती रस्त्याच्या कडेला बसली होती.

निवडणुकीविषयी तिला काय वाटतं ते विचारावं म्हणून मी तिथं गेलो. काही तरी बोलायच्या अगोदर थोडीशी द्राक्षं घेतली आणि पैसे देतादेता तिच्याशी बोलू लागलो.
विदर्भात अजून गावोगावी निवडणुकांचा माहोल सुरू झालेला नाही. लहान गावांमध्ये मात्र अजूनही निवडणुकीचे वारे पोचलेलेच नाहीत.
पवनीच्या रस्त्यावर मला हाच अनुभव आला. सकाळी दहाला ही महिला पाच-दहा किलो द्राक्षांची टोपली घेऊन विकायला बसते. सायंकाळपर्यंत एक-दोन किलो द्राक्ष उरतातच. दुसऱ्या दिवशी ती मातीमोलानं विकायची.
निवडणुकीचा विषय काढला तेव्हा क्षणभर तिच्या कपाळावर आठी पडली.
असल्या विषयावर बोलण्यात तिला रस दिसत नव्हता. समोरच्या द्राक्षाच्या टोपलीकडे टक लावून पाहात ती नाईलाजानं माझ्याशी बोलत होती.
"साहेब, बीपीएलचं कार्ड मला अजून मिळालं नाहीये. म्हणून निराधारीचे पैसेबी मिळत न्हाईत...'
तिनं आणखी एक समस्या मांडली.
"पण तू कुठे निराधार आहेस..? तू तर व्यापार करतेस, पैसे मिळवतेयस... तुला कशाला हवेत निराधारीचे पैसे?' मी विचारलं.
"निराधारी'चे पैसे म्हणजे सरकारच्या "निराधार योजने'तून मिळणारी मदत. निराधार लोकांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून.
सरकारची मदत योजना आहे. त्यासाठीही तिला अर्ज करायचा होता; पण त्याआधी आपण दारिद्य्ररेषेखालील उत्पन्न गटातले आहोत, हे तिला सिद्ध करावं लागणार. त्यासाठी तिचं नाव त्या यादीत यायला हवं होतं. मग तिला तसं रेशनकार्ड काढता येणार होतं.
"निराधारी'चा मुद्दा त्यानंतरचा... त्याकडे डोळे लावून ती किती तरी महिने ही व्यथा उगाळत असावी, हे तिच्या शब्दाशब्दांतून जाणवत होतं.
"साहेब, माझी आई लहानपणीच वारली. बाप आधीच कवातरी गेला. तवापास्न मी एकटीच हाये... मला कुणाचाच आधार नव्हता. माझी मीच लहानीची मोठी झाले... आता आपल्या हिमतीवर धंदा करतेय; पण काय कमाई न्हाई... कसंतरी चालवतेय... मग मला नको निराधारीचे पैसे...?' तिनं मला प्रश्न केला.
"नाव काय तुझं?' मी विचारलं.
"आमी अंबाडे'... तिच्या सुरात क्षणात अभिमान उमटला.
"नाव... तुझं पहिलं नाव काय?' मी विचारलं.
"नूतन...' खाली मान घालत ती उत्तरली.
"पण तुला बीपीएलचं कार्ड मिळालं नाही, म्हणून तू मतदान करणार नाहीस?' मी तिला आणखी डिवचलं.
"करणार कुणाला तरी' ती म्हणाली आणि मान वळवून दुसरीकडे पाहू लागली.
तिला या विषयावर बहुधा बोलायचंच नव्हतं.
बाजूलाच बसस्टॉपच्या शेडमध्ये पंधरा-वीस शाळकरी मुली बसल्या होत्या. दोन-चार जणी पुढं येऊन आमच्यातला संवाद ऐकत होत्या.
मी त्यांच्याशी बोलू लागलो.
पवनीपासून सहा-सात किलोमीटरवरच्या या मुली, रोज बसने शाळेत येतात. आता त्या परतीच्या बसची वाट बघत थांबल्या होत्या.
"इलेक्शन कधी आहे?' मी एकीला विचारलं. तिचा चेहरा कोराच.
"अगं, इलेक्शन म्हणजे मतदान...' तेवढ्यात नूतन तिच्या मदतीला धावून आली.
त्या शाळकरी मुलीला "इलेक्शन' माहीतच नव्हतं.
नूतननं तिला समजावून सांगितल्यावर तिनं मान हलवली.
"हां हां, मतदान होनार हाय...' ती म्हणाली.
"कोण उमेदवार आहेत तुमच्याकडे? मी विचारलं आणि पुन्हा तिचा चेहरा कोरा झाला. मी बाजूच्या सगळ्या मुलींकडे बघितलं. सगळ्यांचेच चेहरे कोरे होते.
"माहीत नाही. आसन कोनतरी...' एकीनं उत्तर दिलं.
मी तिथून निघालो.
भंडाऱ्यात भेटलेल्या प्रत्येकाला निवडणुकीच्या राजकारणाचे सगळे रंग पक्के माहीत होते. पवनीत इलेक्शनचा कुठलाच रंग पोचला नव्हता; पण दोन-चार दिवसांतच सगळे रंग तिथंही पसरणार आहेत.
मी वळलो आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागलो.
बाजूलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचं निवडणूक कार्यालय दिसत होतं.