Tuesday, October 22, 2019

शब्द

आम्हा घरी धन
शब्दांची कोठारे
शब्दांची हत्यारे
धारदार...

शब्द हे संचित
शब्द व्यवहार
शब्दांचा संभार
मनामाजि...

शब्द न केवळ
बापुडा तो वारा
जीवन पैलतीरा
लावितसे...

जयासि न सीमा
नसे उल्लंघन
शब्दांचे कुंपण
जगण्यासि...


- दिनेश

Monday, October 14, 2019

गुण्या गोविंदा

दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!...
अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते. कारण त्याआधी त्यांनी यावर खूप विचारविनिमय करून मगच त्यांचे तसे एकमत झाले होते.
काही काळ विचारविनिमय व चिंतन केल्याने आताच्या धाकट्याने ठरविले, भोजनालय सुरु करायचे! दहा रुपयात थाळी! मग त्याने जमवाजमव सुरू केली. त्यातलीच एक थाळी उचलून बडवत नव्या भोजनालयाची जाहिरातही सुरू केली, आणि गरीबांचे चेहरे खुलले. दहा रुपयात थाळी मिळणार म्हणताना, सरकारी योजनेतून दोन रुपये किलोने धान्य मिळत असले तरी ते अधूनमधून वाचविता येईल या विचाराने लोकं खुश झाली. जिकडेतिकडे धाकट्याच्या दहा रुपयेवाल्या थाळीचीच चर्चा सुरू झाली. धाकट्याचा सरकारदरबारी चांगला वशिला होता. दहा रुपयेवाल्या थाळीसाठी सरकारकडून अनुदान घ्यायचे हे त्याने मनाशी ठरविलेलेच होते.
तर, दहावाल्या थाळीचा बोलबाला सुरू होताच थोरल्याचा तीळपापड झाला, आणि त्यानेही ठरविले. आपणही भोजनालय सुरू करायचे. पाच रुपयांत थाळी...
दोघेही भाऊ एकाच बिल्डिंगमधे दुकान सुरू करणार हे ठरलेलेच होते. थोरलाही वरची किंमत अनुदानरूपाने सरकारकडून उकळणार होता.
आता धाकट्याला चिंता वाटू लागली. आता दहा रुपये थाळीवाला धंदा कसा चालणार या काळजीने तो बेचैन झाला...
इकडे दोघाही भावांची धंद्याची तयारी जोरात सुरू होती. त्याआधी दोघांनीही पुन्हा एक मिटिंग घेतली. जागा वाटप ठरवून घेतले.
धाकटा बेचैन आहे हे मोठ्याच्या लक्षात आले होते. आपण पाच रुपयात थाळी देणार म्हणताना धाकट्याचा दहा रुपयेवाल्या थाळीचा धंदा बसणार हे थोरल्याने ओळखले. त्याला दया आली. काहीही झाले तरी आपण भाऊ आहोत, हे त्याला माहीत होते.
मग दोघांनी युक्ती केली. दोघांनीही आपापली हाॅटेले थाटली.
थोरल्याचे हाॅटेल सुरू झाले. पहिली चारदोन ग्ऱ्हाईके पाच रुपयांत थाळी खाऊन बाहेर पडताना धाकट्याच्या हाॅटेलातील दहा रुपयात थाळी वाला बोर्ड पाहून हसत पुढे निघून जायची.
काही दिवस गेले.
थोरल्याचा धंदा तुफान चालत होता. गर्दी वाढत होती.
अशातच एक दिवस थोरल्याच्या हाॅटेलात तोबा गर्दी असताना अचानक बाहेर बोर्ड लागला... ‘जेवण शिल्लक नाही!’
गर्दी तर भुकेली होती. पण थोरल्याचा नाईलाज होता... लोकांचाही नाईलाज झाला, आणि सारी गर्दी धाकट्याच्या हाॅटेलात वळली.
पाच रुपयांऐवजी दहा रुपयेवाली थाळी खाऊ लागली. आजकाल साधा वडापावही बारा रुपये पडतात, मग थाळीचा दर ठीकच आहे, असे बोलू लागली.
पुढे असे रोजच होऊ लागले.
थोरला हाॅटेल उघडताच बाहेर बोर्ड लावू लागला.
जेवण शिल्लक नाही!
मग गर्दी धाकट्याकडे वळू लागली.
अशा प्रकारे धाकट्याचा धंदा जोरात सुरू झाला.
आता रात्री, हाॅटेल बंद झाल्यावर थोरला आणि धाकटा रोज एकत्र बसतात. धाकट्याच्या हाॅटेलात संपलेल्या थाळ्यांचा हिशेब केला जातो, आणि धाकटा थोरल्याला पाच रुपयांच्या हिशेबाने पैसे देतो. मह दोघे मिळून थाळीमागे ठरलेल्या सरकारी अनुदानाचे स्टेंटमेंट ट्रेझरीत सादर करतात, आणि अनुदान मिळवतात.
.. अशा प्रकारे, दोनही भावांच्या धंद्याला बरकत आली असून दोघेही पुन्हा गुण्यागोविंदानेच नांदत आहेत.
आता त्यांच्यात कोण मोठा, कोण धाकटा यांवरून वादही होत नाहीत.
कारण, भाऊ हा शेवटी भाऊ असतो, छोटा-मोठा कोण हे महत्वाचे नसते, हे सध्याच्या धाकट्यास कळून चुकले आहे!!