Friday, September 27, 2019

धोबीपछाड

भविष्यात काय असेल माहीत नाही. पण काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची पुरती पडझड झाली आहे, आणि आता ‘कात्रजच्या घाटा’तून दोन्ही पक्षांचा प्रवास सुरू आहे, हे मान्य करावेच लागेल.
या राजकारणातील सगळ्या घडामोडी काही योगायोगाने घडत असतील असे समजणे हा दुधखुळेपणा ठरेल.
मग कोण असेल त्यामागचा मेंदू??
आज सकाळपासून शरद पवार यांनी ईडी चौकशीच्या निमित्ताने धोबीपछाड देऊन बाजी मारल्याचे चित्र तयार झाले आणि मरगळलेल्या राष्ट्रवादीमध्ये चैतन्य सळसळू लागले. या मुद्द्यावर पवारांनी आपली पाॅवर दाखवून देऊन ते पुण्यात पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी दाखल होतात तोच इकडे मुंबईत अनपेक्षितपणे प्रकटलेल्या अजितदादांनी विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला, आणि बातमीचे केंद्रस्थानच बदलून गेले. ईडी आणि चौकशीच्या माध्यमांतील चर्चा संपल्या आणि अजितदादांच्या धक्कादायक खेळीची चर्चा सुरू झाली. थोरल्या पवारांवरील प्रसिद्धीचा झोत काही क्षणांतच धाकट्या पवारांवर स्थिरावला... तेव्हा मुख्यमंत्री मात्र, वर्षावर विश्रांती घेत होते. ही बातमी त्यांना देणारा फोन वाजला आणि ते झोपेतून खडबडून जागे झाले असे म्हणतात. त्यांनी डोळे चोळतच ही बातमी ऐकली आणि त्यांनाही धक्का बसला, असेही कळते.
राजीनाम्याची बातमी सर्वात आधी ज्यांना कळली ती एकमेव व्यक्ती म्हणजे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. नंतर एकएक करून ती वार्ता पसरत पसरत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली...
सगळेच अंधारात?
या घटनांच्या योगायोगासही एक अनाकलनीय संगती आहे. राजकारणात ती असतेच! तरीही, राजीनाम्याची खेळी हा राजकारणातील धक्कादायक चमत्कार म्हणावा लागेल!! जर्जर राष्ट्रवादीला हा एक जबर धक्का आहे, यात शंका नाही.
आता एक नवा डाव सुरू झालेला दिसतो. दादांच्या मनात राजकीय निवृत्तीचे विचार सुरूच होते, हा शरदरावांचा दावा म्हणजे डावपेचाचे नवे संकेत ठरेल अशी चिन्हे आहेत.
आता ‘तो’ मेंदू काय खेळी करतो ते पहायलाच हवे!!
कारण, ‘सातारा’ अजून बाकी आहेच!

Friday, September 20, 2019

तुझं माझं जमेना...

गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे.
पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी... एक म्हणजे, विरोधक असूनही भाजपसोबत सत्तेत राहून सरकारच्या स्थैर्याला सेनेने धक्का लागू दिला नाही. म्हणूनच फडणवीस यांना अल्पमतातील असूनही एकहाती सरकार चालविता आले, आणि दुसरे महत्वाचे म्हणजे, सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका कठोरपणे निभावल्यामुळेच राज्यातील विरोधकांच्या स्पेसवर शिवसेनेने कब्जा मिळविला. राज्यातील खरे विरोधक असलेल्या काॅंग्रेस राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात आज भाजपला जे यश आले आहे, त्याचा मोठा वाटा शिवसेनेचाही आहे.
आज परिस्थिती पालटली आहे, तो शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत बजावलेल्या विरोधकाच्या भूमिकेचा परिणाम असू शकतो. सेना-भाजपचे सूर सरकार म्हणून जुळलेच नाहीत असे वाटण्यासारखी परिस्थिती गेल्या पाच वर्षांत वारंवार दिसत राहिली. विरोधकांची स्पेस कब्जात घेण्यासाठी सेना-भाजपने जाणीवपूर्वकच हे राजकारण जपले असावे असे सुरुवातीला वाटले, पण केंद्र सरकारबाबतही सेना आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत गेली. सरकारचे नाक दाबण्याची कोणतीही संधी जणू सोडायची नाही, असाच सेनेचा पवित्रा राहिला.
कालचे पंतप्रधानांचे खोचक टोमणे आणि आजचा सेनेचा बचावात्मक पवित्रा पाहता, आता बाजी पालटली असून नाक दाबण्याची खेळी आता भाजपकडे आली आहे, हे स्पष्ट दिसते.
म्हणजे, पाच वर्षांतील परिस्थितीचा व सेनेच्या विरोधकाच्या भूमिकेचाही, भाजपने पुरेपूर वापर करून घेतला, असेच चित्र आहे.
आता मिळेल ते घेऊ पण भाजपसोबत राहू अशी हतबलता सेनेच्या सुरात दिसते, हा त्याचाच परिणाम आहे!

Saturday, September 14, 2019

धन वर्षा...

एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती. डॉक्टरांनी तो जीव उचलून हातात घेतला, उलटा केल्याबरोबर त्याची बाहेर आलेली मान उलट्या दिशेने कलंडली. मग त्यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. निर्जीवपणे तो लोंबकळत होता.
डॉक्टरांनी निराशेने नकारार्थी मान हलविली.
ते कासव मेलं होतं.
'काहीच उपयोग नाही... तुम्ही उशीर केलात...' डॉक्टर म्हणाले, आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर काळजी, भीती, चिंता असे सारे संमिश्र भाव स्पष्टपणे उमटले.
'कुठून घेतलं हे कासव?'... डॉक्टरांनी विचारलं
‘कहींसे मंगवाया था'... ती म्हणाली आणि हताशपणे  मागे फिरू लागली.
डॉक्टरांनी निर्विकारपणे तिला खुणेनंच ते मेलेलं कासव उचलण्यास सांगितले, आणि तपासणी फीची रक्कमही सांगितली.
त्या महिलेचा चेहरा आणखीनच चिंताक्रांत झाला.
मेलेल्या कासवाच्या तपासणीसाठी पैसे द्यावे लागणार हाच त्या चेहऱ्यावरील भावाचा अर्थ असावा, हे लक्षात येत होतं. तिने पर्स उघडली. पैसे डॉक्टरांच्या टेबलवर ठेवले, आणि कसानुसा चेहरा करत तो गतप्राण देह पुन्हा कापडात गुंडाळून लांब धरत ती बाहेर पडली...
----
आजकाल अनेक घरांमध्ये कासव पाळण्याची प्रथा पडली आहे.
जनावरांच्या दवाखान्यात अधूनमधून अशी, तळव्याहूनही लहान कासवं उपचारासाठी आलेली दिसतात.
कुत्रीमांजरं पाळणारे प्राणीप्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा घटक म्हणून सांभाळतात. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात, आणि ते प्राणीही निर्व्याजपणे त्या प्रेमाची परतफेड करतात. अशा घरांमधील या सौहार्दामुळे त्या घरांत एक सकारात्मक वातावरण आपोआपच तयार झालेलं असतं. कुठलंही वास्तुशास्त्र घरातील पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कुत्रं-मांजर पाळा असा सल्ला देत नसतानाही हजारो कुटुंबे या प्राण्यांचा कुटुंबातील घटकाच्या मायेनं सांभाळ करतात, आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घरात घेतात...
पण वास्तुशास्त्र मात्र, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कासवं पाळायचा सल्ला देते.
-------
परवाचा जनावरांच्या दवाखान्यातील तो प्रसंग मला आज अचानक आठवला.
कारण, माझ्या मेलबॉक्समध्ये येऊन पडलेला एक ई-मेल.
'तीन पीढियोवाला कछुआ देता है अपार धन.. इतना धन, की आप संभाल नही पाओगे... घरमे कछुआ रखने को बहुत शुभ माना जाता है... अपने घर कछुआ ऑनलाईन मंगवाने के लिए, यहा क्लिक करे.. इससे घर और ऑफिसमे सकारात्मक उर्जा का प्रवाह बना रहता है!;... '
'धन वर्षा कछुआ' अशा मथळ्याखाली कासवाची ती जाहिरात मेलवर येऊन पडली होती. ती वाचली, आणि मला त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला.
ते मेल्याचं तिला वाईट वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी स्पष्ट दिसत होतं.
आता मला त्याचं वेगळंच कारण असावं, असं वाटू लागलं.
ते ‘धनवर्षा करणाऱ्या’ त्या कासवांपैकीच एक तर नसेल?ते कासव असं अचानक मेलं, तर धनाचा वर्षाव कमी होणार या भयाने तर तिचा चेहरा दुःखी झाला नसावा?
धनवर्षा करणाऱ्या कासवांच्या धंद्यामुळे कुठे तरी धन वर्षा सुरू आहे, हे स्पष्ट आहे. बिचारी मांडुळं तर आता नष्ट व्हायला लागली आहेत.
----
शिक्षणाचा अभाव आणि समजुतींचा पगडा यांमुळे अंधश्रद्धा फोफावतात, असे म्हणतात. पण तळव्यावर मावणारी कासवं दिवाणखान्याच्या दर्शनी भागात ठेवून शोभेची वस्तू म्हणून त्यांना मिरवणारा समाज अशिक्षित आडाणी नसतो. धनवर्षावाची हाव हेच त्याचे कारण असेल, तर त्या मुक्या जिवांच्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल ते स्पष्टच आहे....

उतारा!

कोणत्याही समस्येकडे सकारात्मक व विधायक भावनेने पाहिले तर कितीही गंभीर समस्या असली तरी ती कोणत्या तरी बाजूने उपकारक वाटू लागते, व एक समस्या हा दुसऱ्या त्याहून तीव्र समस्येवरील इलाज असावा असेही वाटू लागते.
महागाई, निवाऱ्याचा प्रश्न, महागडे शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी माणसाचे जगणे कठीण झाले आहेच, पण याच समस्यांमुळे या समस्येचे मूळ असलेली, बेफाम वाढणाऱ्या लोकसंख्येची बेसिक समस्या आटोक्यात यायला मदत झाली, हे वास्तव आहे.
अपुऱ्या आर्थिक उत्पन्नामुळे कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याचा मुद्दा संकटासमान वाटू लागतो. मुलाच्या जन्माआधीच आईबापांना त्याच्या अॅडमिशनचा, प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या डोनेशनचा, शाळा महाविद्यालयांतील भरमसाठ फीचा आणि शिक्षणातील गुणवत्तेसाठी सुरू असलेल्या गळेकापू स्पर्धेचा धसका बसलेला असतो. या सगळ्यातून पार पडून आपले मूल भविष्यात सुखी समाधानी व चांगले नागरिक बनू शकेल का, आपण तसे बनविण्यातील आपली जबाबदारी पेलवू शकतो का, हा विचार बळावतो, आणि नकारात्मक उत्तराच्या भयापोटी, ‘नकोच ते मूल’ असा निष्कर्ष काढणे भाग पडते.
महागाई, बेरेजगारी हे प्रश्नही कुटुंबविस्तीराच्या विचाराला वेसण घालतात, तर ‘डोक्यावर छप्परच नसेल तर संसाराचा पसारा कशाला वाढवायचा असा विचार बळावू लागतो.
अशा अनेक समस्यांचा परिणाम म्हणून लोकसंख्येची वाढ रोखली जाते.
हा या समस्यांचा थेट परिणाम नसला तरी लोकसंख्यावाढीचा वेग कमी होण्याची ही अप्रत्यक्ष पण प्रमुख कारणे असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. अर्थात, समस्या कायम ठेवणे किंवा वाढत ठेवणे हा अन्य कोणती समस्यांचा उपाय नाही, हे खरेच असल्यामुळे या समस्या म्हणजे अप्रिय, कडवट विषारी डोस आहे हेही खरे आहे.
पण काही समस्या सोडविण्यासाठी काही भयंकर मात्रा लागू पडतात.
मुंबईसारख्या महानगरातील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी याआधी सनदशीर मार्गांनी अनेक उपाय केले गेले. फ्लायओव्हर झाले, सी-लिंक झाला, फ्रीवे झाला, पादचाऱ्यांसाठी स्कायवाॅकही झाले. पण माणसांची आणि वाहनांची गर्दी वाढतच राहिली आणि वाहतुकीचा प्रश्न बिकटच होत गेला. आता तो एवढा बळावला आहे, की तो कायमचा सोडविण्यासाठी एखादी नवी समस्याच उभी करणे हाच पर्याय ठरावा...
केंद्र सरकारने संमत केलेल्या नव्या वाहन कायदा ही एक समस्या असल्याचे काहींना वाटू लागले असले, तरी या कायद्यातील दंड आकारणीच्या जबर तरतुदीमुळे रस्त्यावर विनाउद्देश उतरणाऱ्या वाहनांच्या गर्दीस आळा बसणे शक्य आहे. नवा कायद्याचा धसका हा समस्याग्रस्ततेमुळे लोकसंख्या विस्तारास वेसण घालण्याच्या विचारासारखाच जालीम उपाय ठरू शकतो, यात शंका नाही.
काही वेळा, नवी समस्या हाच दुसऱ्या जुनाट समस्येचा उपाय असू शकतो.
तुम्हाला काय वाटते?

Thursday, September 12, 2019

भविष्य

वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही. उलट, तसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस प्राप्त होते.
तरीही, वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, तसे घेऊन दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे स्वत:चे मत आहे.
त्यासाठी ही पोस्ट!
उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये आज माझ्या राशीच्या ‘भविष्या’त म्हटले आहे की, ‘कमी पडू नका. आपले काम साधून घ्यावे. ‘लेकी बोले सुने लागे’ करावे लागेल!’
आता, एक तर, आजचे हे राशिभविष्य मी अर्धा दिवस उलटल्यानंतर वाचले. म्हणजे, ते खरे ठरविण्याचा अर्धा दिवस वाया गेला. म्हणजे, या क्षणापर्यंत या भविष्यानुसार काही घडलेले नाही.
आता उरलेल्या अर्ध्याच दिवसांत हे भविष्य खरे ठरवावे लागणार आहे. वेळ कमी असल्याने व ‘कमी पडू नका’ असे भविष्यातच म्हटलेले असल्याने, पुढच्या अर्ध्या दिवसात ते खरे ठरविण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडला आहे.
... त्यासाठी ‘सेकंड ओपीनियन’ हवे आहे!!

Sunday, September 8, 2019

बिगरी ते डिगरी (२)

भोंदे शाळेत का. वि. सावंत नावाचे हेडमास्तर होते. जेमतेम पावणेपाच फूट उंचीचा हा माणूस समोर दिसला, की मुलांची अक्षरशः फाटल्यागत व्हायची. जाम कडक वाटायचे. पण आम्ही त्यांना अधूनमधून हसतानाही पाहिले होते. त्यांना एक सवय होती. सिगरेटची! शाळा सुरू असताना ते मधेच कधीतरी शाळेच्या मागे भिंतीजवळ जाऊन सिगरेट ओढून यायचे. ते आम्ही पाहायचो. पण सिगरेट ही मुलांच्या देखत ओढण्याची वस्तू नाही, हे त्यांना माहीत होते. ते तसे करत त्यामुळे आम्हालाही ते कळले. सावंत गुरुजी सिगरेट ओढतात हे आम्हाला माहीत होते, पण मुलांनी ते करू नये म्हणून ते शाळेमागे जाऊन घाईघाईने सिगरेट ओढून परत येतात, यावरून सिगरेट ओढणे वाईट हा संस्कार आमच्या बालमनावर तेव्हा झालाच! हे गुरुजी मला आजही जसेच्या तसे आठवतात. कारण, माझ्या डोक्याचा लहान मेंदूकडचा भाग... जेव्हाजेव्हा माझा हात डोक्याच्या त्या बाजूला जातो, तेव्हातेव्हा तिथे कधीतरी झालेल्या एका स्पर्शाच्या आठवणी जाग्या होतात, आणि तो स्पर्श आपला आयुष्यभर पाठलाग करणार हे जाणवून सावंत गुरुजी आठवतात...
ती एक गमतीदार कहाणी आहे. आमच्या वर्गातलाच एक मुलगा- आम्ही आणि सगळेच जण त्याला दादा म्हणायचो- एकदम हिरो होता. त्या काळात त्याच्या मनगटावर चकचकीत पट्ट्याचे घड्याळ असायचे. गळ्यात वाघनखाची सोन्याची चेन, कधीकधी डोळ्यावर गॉगल, मस्त सजवलेली हरक्युलस सायकल, दप्तराची पत्र्याची पेटी असा त्याचा थाट होता. तो आपोआपच सगळ्यांचा हिरो, लीडर झाला होता.
दर शनिवारी शाळेचा वर्ग आणि बाहेरचा पॅसेज सारवायचे काम मुलांना करावे लागायचे. एका शनिवारी आमच्या वर्गाची पाळी असताना, आम्ही शेण गोळा करायला पत्र्याच्या तीनचार बादल्या काठीत कडी अडकवून पालखीसारख्या नाचवत गावाबाहेरच्या रानात गेलो. तिथे गुरं चरायला यायची. त्यामुळे शेण मुबलक सापडायचे. तर, त्या रानात गेल्यावर चार बादल्या शेण गोळा करून झाडाखाली बसलो असताना अचानक दादाने खिशातून काही पेेनं बाहेर काढली. आणि प्रत्येकाच्या हातावर एकएक पेन ठेवलं. आमचे डोळे विस्फारले. वर्गातल्याच मुलांची कधी ना कधी पेनं गायब व्हायची. कुणी तक्रारीही करत. पण चोर कधीच सापडत नसे. आज एवढी पेनं दादाच्या खिशात पाहून ते कोडं सुटलं होतं. आणि त्याचा भागीदार करून घेण्यासाठी दादाने एकएक पेन आमच्या हाती दिलं होतं. क्षणभरासाठी छातीत धडधड झाली. आपण करतोय ते चांगलं काम नाही, हेही जाणवलं. ही चोरी उघड झाली तर आपण पकडले जाऊ अशी भीतीही वाटू लागली. आम्ही दादाला तसं सांगितलं, आणि पेनं परत करू लागलो. पण दादानं डोळे वटारले. आता पेनं घेतली नाहीत, तर दादाची चोरी सगळ्यांना कळणार होती. दादाला ते माहीत होतं. म्हणून त्याने सगळ्यांच्या हातात बळेच पेन कोंबलं, आणि चोरी लपविण्याची एक युक्तीही सांगितली. पेनला तेल-हळद लावली की त्याचा रंग बदलतो. मग मूळ मालकाला ते पेन आपले आहे हेही कळत नाही... दादाने सांगितलेली ही युक्ती भन्नाट होती. ती करून पाहावी यासाठी तरी पेन घ्यावे असे वाटून मी ते पेन खिशात ठेवलं, आणि धडधडत्या छातीने वर्गात परतलो. त्या दिवशी पेन जपतच आम्ही वर्ग सारवले. शाळा सुटली. घरी गेलो, आणि आईकडून एका वाटीत गोडेतेल घेतले. त्यात चमचाभर हळद घातली, आणि चोरीचा रंग बदलण्यासाठी हळूच मागच्या पडवीत गेलो. तिथे पेनावर तेलहळद लावली, आणि आश्चर्य... काही सेकंदातच पेनाचा मूळ रंग पुरता बदलला होता... आता आपल्याला हे पेन राजरोस वापरायला हरकतच नाही, असे समजून मी ते पेन दप्तरात ठेवले.
सोमवारी शाळेत गेलो, तेव्हा काहीजण पेन हरवल्याच्या तक्रारी सावंत गुरुजींकडे करत होते. वर्गात वातावरण काहीसे तंग वाटत होते. सावंत गुरुजींनी शांतपणे तक्रारी ऐकून घेतल्या. मागे जाऊन एक सिगरेट ओढली, आणि ते परत आले. एकएक मुलास दप्तर ओतण्याचा आदेश झाला. माझी पाळी आली. मी प्रचंड विश्वासाने दप्तर मोकळेही केले. ते रंग बदललेले पेन खाली पडले, आणि ज्याचे पेन होते, त्याच्या नजरेत संशय उमटला... पण मी घाबरलो नाही... सावंत गुरुजींनी पेन उचलले. त्याचे टोपण उघडले, आणि त्यांचे डोळे चमकले. मग मात्र मी घाबरून गेलो. टोपणच्या आतल्या बाजूला तेलहळद लावायची राहूनच गेली होती. माझी चोरी, आणि रंग बदलण्याचे दादाचे तंत्र, दोन्हीचा पर्दाफाश झाला होता...
मग अपेक्षेप्रमाणे, सावंत गुरुजींना मला बकोटीला धरलं. वर्गासमोर उभं केलं, आणि घंटा वाजवायचा टोल लाकडी हातोडा हाती घेऊन टणाटणा माझ्या डोक्यात लहान मेंदूच्या बाजूला प्रहार करण्यास सुरुवात केली. शाळा सुटली तेव्हा डोक्यावर दोनचार टेंगळं उगवली होती. नंतर दोन दिवस तिथे हात गेला, की वेदनेची सूक्ष्म जाणीव व्हायची, आणि चोरी करणे वाईट हा धडा आणखीनच पाठ व्हायचा...
आजही, डोक्याच्या मागच्या बाजूला हात गेला, त्या जागी स्पर्श झाला, की, चोरी करू नये हा लहानपणी मिळालेला धडा पक्का आठवतो, आणि सहाजिकच, सावंत गुरुजीही आठवतात...
मोठा झाल्यावर मी सिगरेट ओढू लागलो होतो. पण मोठ्या माणसांसमोर आणि लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये, हे मी लहानपणीच शिकलो होतो. त्याचे श्रेयदेखील त्यांचेच!... ते शाळेमागे जाऊन मुलांच्या नजरेआड सिगरेट ओढतात, हे दिसायचे, तेव्हा, लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये हाच संदेश त्यांना द्यायचा असावा, हे आम्हाला लहानपणीच कळले होते.
आता मी सिगरेट ओढत नाही. पण मुलाबाळांदेखत सिगरेट ओढणारा कुणी पाहिला, की मला शाळेमागे जाऊन सिगरेट ओढणारे सावंतगुरुजी आठवतात...

Saturday, September 7, 2019

बिगरी ते 'डिगरी'! ( १)

तर, आपल्या बोटाला धरून 'बिगरी'पासून 'डिगरी'पर्यंतचा प्रवास घडवून आणणाऱ्या गुरुजनांच्या अनेक आठवणी काल मनात अचानक, आणि नकळतही, उचंबळून आल्या.
अशा आठवणींना वयाचा क्रम नसतो. म्हणजे, संगमनेरच्या नवीन मराठी शाळेच्या पहिल्या मजल्यावरचा तिसरीचा ५२ वर्षांपूर्वीचा वर्ग अचानक लख्ख आठवायला लागतो, नऊवारी पातळ नेसलेल्या, कपाळावर चंद्राएवढा कुंकवाचा टिळा लावलेल्या करजगीकर बाई गणिताचा पाढा शिकवताहेत आणि आपण मांडी घालून जमिनीवर बसल्यावस्थेत पेंगत झोपेचे आक्रमण परतवून लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, असे दृश्य जसेच्या तसे आठवून हसूदेखील येते, तोवर एकदम देवरूखच्या भोंदे शाळेतला ४८ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग धूसरपणे जागा होऊ लागतो.
या शाळेत मी चौथीच्या वर्गापासून दाखल झालो. चौथीला के. ज. पुरोहित नावाचे गुरुजी होते. (त्यांची पुढे ‘शांताराम-केजं’मुळे कायम आठवण येत असे.) देवरुखपासून आठएक किलोमीटरवरचं काटवली हे त्यांचं गाव. शनिवारी सकाळी शाळा असली की गावातच, अगदी शाळेची घंटा घरात ऐकू येईल एवढ्या अंतरावर असूनही आम्हाला हमखास उशीर व्हायचा, पण स्वच्छ पांढरा लेंगा सदरा घातलेली, दाट केसांचा व्यवस्थित भांग पाडलेली पुरोहित गुर्जींची मूर्ती मात्र, खुर्चीत दाखल असायची. हस्ताक्षर ‘घडविणे’ हा त्यांचा ‘ध्यास’ असायचा. एकएका मुलासमोर मांडी ठोकून बसून, उजव्या चिमटीत टाचणी लपवून ते ‘ह’ आणि ‘ळ’ ही अक्षरे घोटवून घेत असत. ही दोन अक्षरे वळणदारपणे लिहिता येईल त्याचे हस्ताक्षर सुंदर झालेच समजा, हा त्यांचा सिद्धान्त होता... ते वळण मनाजोगते जमेपर्यंत त्यांच्या हातातील टाचणीचे टोक किती वेळा मी बोटावर टोचून घेतले असेल त्याची गणतीच नाही. पुढे माझे हस्ताक्षर सुवाच्यच नव्हे, तर सुंदर झाले. एवढे, की मलाच नव्हे, तर इतरांनाही माझ्या अक्षराचा अभिमान वाटू लागला. इतका, की पुढे शाळा-काॅलेजातील सभा-समारंभांच्या निमित्ताने फळ्यावर ‘सुस्वागतम’ किंवा ‘सुविचार’ वगैरे लिहिणे हे माझे कामच ठरून गेले. नंतर तर, देवरुखच्या बाजारपेठेतील माणिक चौकात पुरोहित टेलरांच्या इमारतीवरील ‘ग्रामफलका’वर देश आणि जगातल्या महत्वाच्या बातम्या गावासाठी लिहिण्याची जबाबदारी आम्ही काही मित्रांनी माझ्या हसिताक्षराच्या विश्वासावरच उचलली, आणि कितीतरी वर्षे पेललीदेखील!
माझ्या ‘बातमीदारी’ची मुळे बहुधा त्यातच रुजली असावीत.
आणि त्याचे मूळ, पुरोहित गुर्जींनी टोचून टोचून घोटवून घेतलेल्या ‘ह’ आणि ‘ळ’ मध्ये असावे. आजही, ही अक्षरे कोणत्या शब्दात वाचताना किंवा लिहीताना मला पुरोहित गुरुजींची आठवण होते.!
(क्रमश:)

Monday, September 2, 2019

पहाट

सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...

कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!

लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...

घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!