Friday, March 22, 2013
वेताळ आणि वेताळ !
‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल..
परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला. असे प्रश्न एकदा मनाला चिकटले की विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखे चिवटपणे मनात रुतून राहातात. उत्तर मिळेपर्यंत हटत नाहीत.
मग मी उत्तराच्या मागे लागलो. आणि पंतप्रधानांची आश्वासनं आठवली. अर्थमंत्र्यांनी दिलेली विकासदराची ग्वाही आठवली.. आणखी काही वर्षांनी देश महासत्तांच्या रांगेत जाणार, या घोषणा कानाशी दुमदुमू लागल्या. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत भारतीय बुद्धीने मारलेल्या भराऱ्या आठवल्या.. सारे जग जेव्हा मंदीच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतं, तेव्हा भारत सहजपणे मंदीचा महापूर तरला, ते आठवलं आणि उत्तर ठरलं.
‘हो.. आपला देश भविष्याच्या योग्य वाटेवरूनच पुढे चालला आहे!’
असं उत्तर मिळालं की मानगुटीवर बसलेला विचाराच्या वेताळाचा विळखा सोडविण्याची घाई होते. आपण उत्तर देऊन टाकतो. उत्तर चुकीचं ठरलं तर आपल्याच डोक्याची शंभर शकलं होतील, या इशाऱ्याचं भानच राहात नाही.
तसंच झालं. आणि आपलं उत्तर काहीतरी चुकतंय, असं उगीचच वाटू लागलं. मानगुटीवरचा प्रश्नाचा वेताळ आपली पकड आणखीनच घट्ट करतोय, असं वाटू लागलं. मग बेचैनी.. अस्वस्थता! अशा वेळी कुणालाही, कुणाचा तरी आधार लागतो. मीही उत्तराच्या शोधात भटकू लागलो आणि आसपासच्याच अनेक घटनांतून, अगोदर मनात आलेल्या सगळ्या सकारात्मक उत्तरांना छेद मिळू लागला.
.. ट्रेनमध्ये खिडकी मिळाल्यावर निवांतपणे कानाच्या हेडफोनमधून गाण्याची आवडती धून ऐकत बसलेलो असतानाच, कुणीतरी हलक्या हाताने पायावर थोपटल्याचं मला जाणवलं आणि मी चमकून समोर बघितलं.
केसांचं अस्ताव्यस्त जंजाळ पसरलेली, नजरेतलं केविलवाणेपण जाणीवपूर्वक माझ्या डोळ्यात घुसवत चिमुकल्या पंजाची बोटं एकत्र करून तोंडाजवळ नेणारी पाच सहा वर्षांची एक मुलगी भीक मागत समोर उभी होती.
पुन्हा बाहेर बघत मी हातानंच नकार दिला. तरीही तिचं केविलवाणं हात पसरणं सुरूच होतं. तिनं चक्क पायावर डोकं ठेवलं आणि मला अवघडल्यासारखं झालं. खिशात हात घालून मी एक नाणं तिच्या हातावर ठेवलं. तिनं ते बघितलं, केविलवाणे डोळे क्षणार्धासाठी आनंदानं चमकले. तिनं ते नाणं मुठीत घट्ट धरलं. एका स्टेशनवर गाडी थांबत असतानाच धावत्या गाडीतून फलाटावर उडी घेतली आणि माझ्यासकट डब्यातल्या सगळ्यांचा श्वास क्षणासाठी रोखला गेला.
दरवाज्याशी उभे असलेल्यांच्या नजरा, मागे जाणाऱ्या फलाटावर वळल्या. ती मुलगी धडपडत उठली होती. तिनं स्वतला सावरलं आणि शांतपणे, जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात ती बाकडय़ाकडे वळली. मग तिनं ती मूठ उघडली.. एव्हाना गाडीनं वेग घेतला होता. पण तिच्या मुठीतलं ते नाणं सुरक्षित आहे, हे जाणवल्यावर तिचे डोळे नक्कीच चमकले असणार, असं मला मनोमन वाटून गेलं.
कोण असेल ती मुलगी? तिचे आईबाप, भावंडं, घर कुठे असेल?.. तिचं भवितव्य काय असेल?.. अशीच, फलाटावर आणि धावत्या गाडीत भीक मागतच तिचं आयुष्य संपेल?.. बंद मुठीतलं नाणं सांभाळत धावत्या गाडीतून उडी मारताना तिला काही झालं तर?..
असे असंख्य प्रश्न समोर उभे राहिले.
आणि ‘त्या’ प्रश्नाला थेट जाऊन भिडले. मी अस्वस्थ!
घरी पोहोचल्यावर सवयीप्रमाणे कॉम्प्युटर काढला आणि लक्षात आलं..
तो ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा दिवस होता.
उगीचच, सवयीप्रमाणे, इकडच्या तिकडच्या बातम्या धुंडाळत बसलो आणि एका साईटवर स्थिरावल्यावर पुन्हा तो प्रश्न समोर उभा राहिला.
लोकसभेत अनाथ, निराधार मुलांसंदर्भात एक चर्चा त्याच दिवशी झाली होती. कुणा खासदारानं युनिसेफच्या अहवालाचा हवाला देत देशातील अशा मुलांच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह सभागृहात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. देशभरातील अनाथ, निराधार मुलांपैकी ८९ टक्के मुलगे आणि ११ टक्के मुली आहेत. ४९ टक्के मुलं ११ ते १५ वयोगटातली आहेत, चार टक्क्य़ांना आपलं नावसुद्धा माहीत नसतं, आणि ९२ टक्के मुलं, दारू आणि नशिल्या पदार्थाच्या आहारी जाऊन माणसांच्या जगापासून स्वतला वेगळं करून घेतात..
देशभरातील सरकारी बालगृहांमध्ये अशी तब्बल ७५ हजार मुलं दाखल आहेत.. हे त्यावर मंत्र्यांनी दिलेलं उत्तर.
ही आकडेवारी फक्त अधिकृत बालगृहांमधली. रस्त्यावर भटकणारी, आकाशाच्या छपराखाली एकाकीपणे भटकणारी, आणखी किती असतील?..
डोक्याची शंभर शकलं पुन्हा समोर लोंबतायत, असं मला वाटू लागलं. मी कॉम्प्युटर बंद केला. आणि ‘त्या’ प्रश्नाचं खरं उत्तर काय असेल, या प्रश्नाचा भुंगा पुन्हा डोक्यात भणभणू लागला. ..दादर स्टेशनवर एक महिन्याच्या एका बाळाला कुणीतरी चोरून नेलं आणि चोराचा शोध जारी आहे, अशी बातमी नंतर काही दिवसांनी पुन्हा छळू लागली. .. रेल्वे स्टेशनांच्या फलाटांवर, रस्त्याकडेच्या फूटपाथवर, कचराकुंडय़ांच्या आसपास, कधी कुणी लहान मुलं दिसली की पुन्हा हा प्रश्न डोक्यातून बाहेर येतो.
‘खरंच, आपल्या देशाच्या भविष्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे?’
Thursday, March 14, 2013
दोन बातम्या...
दोन बातम्या...
एखादा दिवस निवांत असतो. ठरवलेलंही काहीच नसतं. मग वेळ रेंगाळत राहतो, आणि कंटाळवाणेपण येतं..
हा प्रत्येकाचाच अनुभव असतो. असं कंटाळवाणेपण घालवण्यासाठी प्रत्येकजण आपलीआपली युक्ती शोधतं. अशाच एका कंटाळवाण्या वेळात एकदा कॉम्प्युटरवर निरपेक्ष धांडोळा घेताना, मी मेलबॉक्स उघडला. बरेच मेल डिलीट करायचेच राहून गेलेले. रिकामपण असलं, की असा भरगच्च मेलबॉक्स उघडून जुने मेल वाचायला मजा येते, हे मला जाणवलं. पूर्वी आमच्या घरी एक हुकाच्या आकाराची तार होती. त्याला खाली एक लाल, लाकडी चकती होती. त्यामध्ये जुनी पत्रं लटकलेली असायची. वेळ जाईनासा झाला, की मी ती जुनी पत्रं पुन्हापुन्हा वाचायचो. प्रत्येक वेळी काही ना काही खजिना हाती आल्याचा आनंद व्हायचाच. प्रत्येक पत्रातला माणूस, आपल्याशी पुन्हा बोलतोय, असा जिवंत भास व्हायचा. पुढे ती तार गेली.
.. आता इंटरनेटची सवय वाढल्यावर, पत्रांच्या त्या तारेऐवजी, मेलबॉक्स उघडायला आवडू लागलं. अनुभव मात्र, तोच. जुनाच!
त्या दिवशी अशाच अनुभवाच्या अपेक्षेने मी मेलबॉक्स उघडला. एकदम मागे गेलो, आणि एका जुन्या ई-मेलवर क्लिक केलं. एक लिंक समोर आली. मी त्या लिंकवर क्लिक केलं, आणि एक पान उघडलं गेलं. एक बातमी होती. जुनी.. साठवलेली. मग आठवलं, आपणच ती जपून ठेवली होती. कधीतरी, कशाच्या तरी संदर्भात वापरता येईल म्हणून..
आज ती बातमी समोर उघडली, आणि आजच वाचलेली एक ताजी बातमी लगेचच समोर पुन्हा उभी राहिली. दोन्ही बातम्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता.
.. असं काही झालं, की रिकामपणामुळे शिणलेलं डोकंदेखील नव्या कामाला लागतं.
ती जुनी बातमी एव्हाना मी पुन्हा वाचून काढली होती. गुजरातमधली बातमी होती. ऑगस्ट २०११ मधली. मेहसाणा जिल्ह्यच्या वडगाम नावाच्या गावात, एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानं आत्महत्या केली होती. खरं तर आत्महत्या, बलात्काराच्या घटना जवळपास रोजच घडत असतात. पण ही बातमी वेगळी होती. मरणाचा, मरणानंतर काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या कुतूहलातून त्यानं आत्महत्या केली होती. ही माझी आत्महत्या नाही, तर मरण समजून घेण्याचा आणि त्याच्या अनुभवाचा शोध आहे, असं त्या प्राचार्यानं मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. त्याच्या त्या मृत्यूपूर्व नोंदीचा पूर्ण तपशील त्या बातमीत होता. पण मला तो पुन्हा वाचवेना. मी बातमी बंद केली.
उदासउदास झालं. असा अनुभवही कधीकधी प्रत्येकालाच येत असतो. डोक्यात भणभणणारी ती बातमी झटकण्याचा मी प्रयत्न करू लागलो.
.. आणि अचानक ती, ताजीताजी वाचलेली बातमी आठवली. मग शिणवटा गेला.
मरणाला कवटाळणाऱ्या त्या माणसाचं जगणंही कदाचित उदास असेल. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच त्यानं कधी केला नसेल. कदाचित, बाहेर पडण्याच्या वाटा शोधण्याची त्याची इच्छादेखील नसेल. तसं असतं, तर मरणामागचं गूढ शोधण्याऐवजी, जगण्यातला आनंद शोधण्यात त्यानं आयुष्य वेचलं असतं. त्या शोधात त्याला कदाचित, उणंपुरं आयुष्यही कमी वाटलं असतं..
..त्या दुसऱ्या बातमीमुळे हा विचार माझ्या मनात आला. ती दुसरी बातमी अमेरिकेतली होती.
अमेरिकेतल्या ओहियोत रेबा विलियम्स नावाच्या एका वृद्धेनं, ८७ वर्षांंपूर्वी अर्धवट राहिलेलं शालेय शिक्षण तिनं १०६ व्या वर्षी पूर्ण केलं होतं. शाळा सुटल्यानंतर पुढे तिचं लग्न झालं, मुलंबाळं झाली, आणि त्यांचा छोटासा कौटुंबिक व्यवसायही बहरला. मग आपलं राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा तिला ध्यास लागला. तिनं त्याचा पिच्छा पुरवला, आणि ओहियोच्या स्कूल बोर्डानं अलीकडेच तिला शिक्षण पूर्ण केल्याचा दाखला दिला..
.. अति वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळलेल्या त्या वृद्धेच्या डोळ्यात ही बातमी ऐकल्यानंतर जी चमक उमटली असेल, त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, हे मला जाणवलं. त्या ध्यासापोटी तिनं आपलं वृद्ध आयुष्य पणाला लावलं होतं. त्यासाठीच जणू ती जगली असेल. त्या जगण्यातच तिनं आपला आनंद शोधला असेल. शारीरिक वृद्धत्वातही तिचं मन मात्र, उमेदीनं भारलेलंच असेल.
गुजरातेतल्या त्या प्राचार्याच्या मरणाच्या शोधाची बातमी वाचल्यानंतर बरोब्बर एक वर्षांनंतर वाचलेली आणखी एक बातमी मला आठवली. १०६ वर्षांंच्या रेबाच्या बातमीत त्या बातमीचेच प्रतिबिंब आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये, ओहियोमधीलच अॅन कोलगिओव्हनी नावाच्या ९७ वर्षांंच्या वृद्धेनं आपलं पदवीचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच दिवशी तिचा नातूदेखील पदवी घेऊन बाहेर पडला होता. शिकण्याच्या वयातच, मंदीचा विळखा पडला आणि अॅनला वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी शिक्षण अध्र्यावरच सोडून द्यावं लागलं. पदवीदान समारंभातून बाहेर पडताना अॅनच्या थकलेल्या डोळ्यातून तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अश्रू ओघळत होते, पण ती रडत नव्हती. ‘येस.. आय अॅम ग्रॅज्युएट नाऊ’ असं म्हणत तिनं डोळे पुसले, आणि नातवासोबत थरथरती पावलं पुढे टाकत ती पदवीदान सभागृहातून बाहेर पडली, तेव्हा सभागृहातील साऱ्या नजरा वृद्धत्वानं वाकलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात आदरानं झुकल्या होत्या..
.. ऐन उमेदीत मरणाचा अनुभव शोधणं, आणि मरणाच्या उंबरठय़ावर असतानाही, उमेदीनं जगण्यातला आनंद शोधणं, यातलं अंतर या बातम्यांनी दाखवून दिलं होतं.
अशा वेळी, कितीही रिकामा वेळ असला, तरी तो पुरेनासा होतो, हेच खरं!
Friday, February 22, 2013
पैसा आणि पोट
रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही..
कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं.
त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं.
त्या दिवशी मी गाडी पकडायच्या गडबडीत घाईनं चालत होतो, आणि अचानक एक केविलवाणा हात समोर पसरला गेला. मी थोडंसं चिडूनच, चमकून वर बघितलं. एक मध्यमवयीन स्त्री समोर उभी होती. कडेवर एक लहान मूल, हाताशी दोन मुलं. भांबावल्यागत भिरभिरत्या डोळ्यांची. विस्कटलेल्या केसांची, मळकटलेल्या फाटक्या कपडय़ांत गुंडाळून घेतलेली..
त्या बाईच्या डोळ्यातही केविलवाणेपण ठासून भरलेलं.
माझे पाय थबकले.
‘भाऊ, दुष्काळानं सगळं धुतलं. आम्ही शेतीवाडीवाली माणसं. पण हाती काही नाही राह्य़लं. वडापाव खायला घाला. पोरं लई भुकेली हाईत’..
त्या केविलवाण्या आवाजानं मन फाटलं. पण नेहमीसारखीच कुणीतरी भिकारीण असेल, असं समजून चालू लागलो. ती माझ्या मागोमागच हात पसरून चालत होती. शेवटी, मी बाजूच्या स्टॉलवर गेलो आणि चार वडापावची ऑर्डर दिली.
मग तिनं माझ्यासमोर पसरलेला हात झटक्यात मागे घेतला.
‘भाऊ, वडापाव नका देऊ.. पैसे द्या. पंचवीस-तीस रुपये. उद्याला व्हतील!’ तिनं आर्जवी स्वरात विनवलं.
मग मी खिशात हात घातला. वीस रुपये काढून तिच्या हातावर दिले. तिनं मला नमस्कार केला आणि ती निघून गेली. मी गाडीत चढलो. गाडीतली माणसं, आपापल्या हातातल्या मोबाइलवर काही ना काही करत होती. प्रत्येकजण समोरच्या मोबाइलमध्ये रमलेला. सगळे जणू आत्ममग्न! आपल्याआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखं..
गाडी सुरू झाली आणि माझा ‘शून्य प्रहर’ सुरू झाला. नजर आसपास भिरभिरू लागली.. आणि बाजूच्याच एका प्रवाशावर स्थिरावली.
गाडीनं वेग घेतल्यावर तो उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडून आतली पेपरची घडी काढली. बॅग पुन्हा वर टाकली आणि तो ऐसपैस बसला.
त्याच्या हातातला पेपर जुनाच होता. त्यानं खिशाचं मार्कर पेन काढलं. वाचता वाचता तो कुठल्या तरी मजकुरावर खुणाही करत होता. मग मी त्याच्या पेपरात मान खुपसली. त्याच्या ते लक्षात आलं. माझ्याकडे बघून तो हसला.
त्याच्या हातातला पेपर मराठी होता. त्यानं खुणा केलेल्या बातम्या माझ्यासमोर धरल्या. एक बातमी दुष्काळाची होती.
मराठवाडय़ात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. आताच अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसताहेत. कधीतरी एखादा टँकर गावात येतो, आणि माणसांची झुंबड उडते. मग भांडणं, मारामाऱ्या.. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यानं केंद्राकडे पैसे मागितले आहेत! दुसऱ्या बातमीत, जनावरांच्या छावण्यांच्या भ्रष्टाचाराचा मजकूर होता. दुष्काळाचा ‘धंदा’ सुरू झाल्याचा सूर त्या बातमीत स्पष्ट उमटला होता!
आणि तिसरी बातमी, मुंबईची होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं आयुक्तांचं भलंमोठं भाषण. त्यातली एक ओळ त्यानं मार्करनं लाल केली होती. तेवढीच त्यानं माझ्यासमोर धरली.
मुंबईला रोज होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी, जवळपास ३० टक्के पाणी वाया जातं, असं काहीतरी त्यात म्हटलं होतं. वाया जाण्याचं हे प्रमाण चारपाच टक्क्य़ांनी कमी करायचा संकल्प आयुक्तांनी सोडला होता. त्यासाठी पैशांची गरज असल्याचं काहीतरी म्हटलेलं.
.. ‘सगळ्यांना पैसे हवेत.’अचानक तो म्हणाला, आणि गूढपणे हसला.
मी चमकून त्याच्या तोंडाकडे बघितलं.
‘अहो, तिकडे माणसं पाण्यासाठी पायपीट करतायत आणि इकडे, दुष्काळाच्या नावानं राजकारण सुरू झालंय. पैसे हवेत सगळ्यांना. कशाला?’
असं म्हणत त्यानं उजव्या हाताची सगळी बोटं एकत्र केली, आणि तोंडाजवळ नेत तो हसला.
‘काय, बरोबर ना?’ त्यानं विचारलं. उत्तराची वाट न बघता बोलू लागला.
‘आपण मुंबईकर म्हणजे ना, पाण्याची किंमत आपल्याला नाहीये. कितीतरी पाणी आपण विनाकारण वाया घालवतो. आपल्याकडे पैसा पण पाण्यासारखा वाहातोय. जरा इकडे बघा म्हणावं..’ वर्तमानपत्रातल्या दुष्काळाच्या बातमीवर बोट आपटत तो तिडिकीनं बोलला.
‘वाया जाणारं पाणी वाचवलं, तर चार गावांची तहान भागेल. पण यांना काही करायचंच नाहीये. तसं केलं, तर पैशाचे प्रवाह बंद होतील ना..’
त्याच्या डोळ्यातही संताप संताप दिसत होता.
मग त्यानं तिरिमिरीतच तो पेपर गुंडाळला. रॅकवरची बॅग काढली. दुसरा पेपर काढला आणि घडी उलगडत पुन्हा त्यानं मार्कर पेन सरसावलं.
त्याचे डोळे चमकले आणि त्यानं सगळी बातमीच रंगवून टाकली. एका राज्यमंत्र्याच्या घरातल्या लग्नाची चमचमीत बातमी होती. शाही जेवण, शाही वरात आणि जखमेवर मीठ म्हणजे, लग्नाच्या मेजवानीचा शाही मेनू बनवण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातून माणसं आणलेली.. ती बातमी वाचता वाचता तो अक्षरश शहारला.
‘इथे मेजवान्या झडतायत आणि तिकडे माणसं, जनावरं उपाशी मरतायत. जेवण बनवायला आणलेल्या त्या लोकांच्या घशाखाली घास उतरला असेल त्या मेजवानीतला?.. हा मंत्री, आमच्या कोकणातला. हा काही पिढीजात श्रीमंत नाही. मग एवढा पैसा आला कुठून त्याच्याकडे..त्याचे साहेब म्हणे, चिडले त्याच्यावर. तिकडे दुष्काळ असताना संपत्तीचं असं प्रदर्शन करतो म्हणून.. पण मी म्हणतो, एवढा पैसा आला कसा त्याची चौकशी करा ना..’ तिरीमिरीत त्यानं तोही पेपर गुंडाळला. काही क्षण तसाच बसून राहिला. पण अस्वस्थतेची रेषा त्याच्या चेहऱ्यावरून पुसलीच जात नव्हती. ..
माझ्या डोळ्यासमोर, वाटेत भेटलेली ती केविलवाणी, हात पसरून भीक मागणारी, तीन मुलांची आई दिसू लागली..
अचानक तो पुन्हा जागेवरून उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडली, आणि गुंडाळलेला हेडफोन काढला. खिशातून मोबाइल काढून त्यानं हेडफोन जोडला, आणि कानाला लावला.. आता त्यानं डोळे मिटले होते. त्याच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थ, संतापाची रेषा पुसट होत चालली होती. मधूनच तो कानात घुमणाऱ्या सुरांना दाद देत होता. आसपासच्या गर्दीप्रमाणेच, तोही आता मोबाइलमधल्या गाण्यात गुंगला होता. आपआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखा!
मधूनच त्यानं डोळे उघडले. केविलवाणा हसला.
‘खूप त्रास होतो हो, पेपर वाचून. त्यापेक्षा, हे कानाशी असलं की जगणं तरी सुसह्य़ होतं.’ तो ओशाळवाण्या सुरात म्हणाला, आणि पुन्हा त्याचं मन कानातल्या सुरात रमलं.
.. मोबाइलमुळे क्रांती झाली म्हणतात, ते काही खोटं नाही!
Thursday, February 14, 2013
मनाचा पिसारा..!
आज नाथाला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. आळोखेपिळोखे देत तो बेडवरून उतरला आणि ब्रश करून गॅलरीत जाऊन उभा राहिला. ही त्याची नेहमीची सवय. नाथानं बाहेर बघितलं. रोजचचं दृश्य. समोरच्या बदामाच्या झाडावर कावळ्यांचे थवे कलकलाट करत होते. नाथाची नजर बदामाच्या झाडावर स्थिरावली. आणि त्याला धक्का बसला. ..
.. हे झाडसुद्धा नाथाच्या डोळ्यादेखतच लहानाचं मोठं झालं होतं.. त्याच्यावर लगडलेली बदामाची फळं मटकावायला पोपटांचे थवे दिवसभर मुक्काम ठोकून असायचे.
'आपल्याला हे आजच का आठवलं?' नाथा बुचकळ्यात पडला. त्यानं नीट झाडाकडे बघितलं. आत्ता बदामाचा सीझन असायला हवा होता, असं त्याला वाटून गेलं. मग त्याला आणखी एक गोष्ट जाणवली, आणि तो बेचैन झाला.
बदामाच्या झाडाची पानं लालसर व्हायला लागली होती. पानं पिकली होती. त्यानं जमिनीवर बघितलं. गुलाबी, सुकल्या पानांचा खच पडला होता. वाऱ्याचा एक झोत आला, आणि झाड शहारलं.. झाडावरची उरलीसुरली गुलाबी पानं जमिनीवर झेपावली.
नाथानं आणखी निरखून झाडाकडे बघितलं. फांदीच्या टोकाला कोवळे, हिरवे कोंब फुटलेले दिसत होते.
'म्हणजे, झाड पुन्हा बहरणार'.. नाथा स्वतशीच म्हणाला..
तेवढय़ात मागे टेबलावर कपबशीचा खण्णकन आवाज झाला. नाथा दचकून मागे वळला. त्याला हसू आलं. चहाचा घोट घेत त्यानं समोरचा पेपर उघडला. पहिल्याच पानावरचा गुलाबी रंगातला भलामोठ्ठा बदाम पाहून नाथाला आठवलं.
आज व्हॅलेंटाईन डे!!..नाथानं पुन्हा बदामाच्या झाडाकडे बघितलं. मघाशी केविलवाणं दिसणारं ते झाड नाथाला आता वेगळंच वाटलं. त्यानं स्वयंपाकघरात बघितलं. बायको चोरून आपल्याकडेच पाहातेय, असं त्याला वाटलं. मग चहाचा कप हातात घेऊन तोच आत गेला, तेव्हा नाथाच्या नजरेत खूप जुना, 'तेव्हा'चा खटय़ाळपणा उमटला होता.
नाथाला आठवलं..
सकाळी ऑफिसला जाताना ती नेहमी स्टॉपवर दिसायची. बसची वाट पाहात.
एकदा आपल्यालाच खूप उशीर झाला, तेव्हाही ती बसची वाट पाहातच होती. आपण शेजारून गेलो, तेव्हा तिनंच शेवटी अंगठा वर केला. मग आपण स्कूटर थांबवली, आणि ती मागं बसली.
नेमंकं वाटेतच पेट्रोल संपलं. थोडं ढकलत गाडी पंपापर्यंत नेली. पंपावर जाईपर्यंत आपण घामाघूम झालो होतो. गाडी स्टँडला लावली, आणि हेल्मेट काढून टकलावरचा घाम पुसत आपण तिच्याकडे पाहिलं.
..तिचे डोळे आपल्या टकलाकडे लागले होते. रांगेत उभं राहून बराच वेळ गेला. ती अस्वस्थ.. शेवटी, घडय़ाळाकडे पाहात ती म्हणाली, 'अंकल, मी जाते.. थँक्यू, पण उशीर होतोय खूप.'तिच्या खळाळत्या सुरात खटय़ाळपणा भरला होता. ओशाळून आपण पटकन हेल्मेट डोक्यावर घातलं, पण सगळं संपलं, असं तेव्हा वाटलंच होतं..
.. हे सारं आठवून नाथानं बायकोकडे बघितलं, आणि टकलावरून हात फिरवत तो हसला. बायकोनंही त्याच्याकडे बघितलं, आणि ती खुशीत हसली..
'अंकल, उठा.. आज सुट्टी नाहीये'.. ती म्हणाली. नाथाला खटय़ाळपणाची चांगलीच लहर आली होती. पण त्यानं मन आवरलं.
.. कारण तिथे पिसारा फुलला होता!!
Saturday, March 24, 2012
दरिद्री जगण्यावर मृत्यूची नजर!
कुपोषणाच्या समस्येने मेळघाटालाही लाजविले?
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हजारोंच्या घरात असले, तरी मुंबईच्या एका कोपऱ्यात, डंपिंग ग्राऊंडवरील कचरा वेचत जगणाऱ्या शेकडो कुटुंबांनी ‘नागरी दारिद्रय़ा’च्या निकषांनाही आव्हान देत मरणाशी संघर्ष चालविला आहे. मेळघाटातील कुपोषणाच्या बातम्यांनी अवघा देश हादरला होता. इथियोपियातील दुष्काळग्रस्त मुलांच्या कहाण्यांनी जगाचे डोळे ओलावले होते, पण मुंबईतील या वस्तीचे जिणे समोर येऊनही सरकार मात्र हललेले नाही. महापालिकेच्या हद्दीतील एम-पूर्व विभागातील सात वस्त्यांची ही कथा आता जिवंत झाली आहे. उद्या या कथेला वाचा फुटणार आहे..
मुंबईच्या २४ महापालिका विभागांपैकी एम-पूर्व भागात रफीनगर-२, संजयनगर-२, निरंकारी, शांतिनगर मोमीनपुरा, पद्मानगर, चिखलवाडी आणि इंदिरानगर या वस्त्या आहेत. यापैकी तीन वस्त्या देवनागरच्या क्षेपणभूमीवरच, म्हणजे, संपूर्ण मुंबईचा कचरा जिथे गोळा व्हायचा, त्यावर, तर तीन वस्त्या क्षेपणभूमीच्या परिसरातच आहेत. या वस्त्यांमध्ये ‘अपनालय’ नावाची संस्था सामाजिक काम करते. रफीनगरमधील १४ बालके दोन वर्षांपूर्वी दगावली, आणि ही वस्ती चर्चेत आली. या बालकांच्या मृत्यूचे वैद्यकीयदृष्टय़ा स्पष्ट झालेले आजार काहीही असले, तरी कुपोषण हेच त्या आजारांचे मूळ असल्याने इलाजाचा फायदा झाला नाही, हे स्पष्ट झाले, आणि ‘अपनालय’ने या वस्त्यांमध्ये बालकांसाठी पोषण कार्यक्रम हाती घेतला.
कुजट, रोगट दूषित हवा, स्वच्छ पाण्याचे दुर्भिक्ष्य, थंडी ही कारणे या वस्त्यांमधील दारिद्रय़ आणखी भयाण बनवतात. बहुतेक कुटुंबे कचरा वेचूनच जगतात. अनेक कुटुंबांमध्ये महिलांवरच कुटुंबांचा गाडा ओढण्याची जबाबदारी असते. सकाळ उजाडली की खांद्यावर कापडी झोळी घेऊन बाहेर पडणाऱ्या या माता आपल्या तान्ह्या मुलांना पुरेसे स्तनपानही देऊ शकत नाहीत. त्यामुळे अगोदरच दारिद्रय़ भोगणाऱ्या या मुलांची आणखीनच आबाळ होते. त्यात गुन्हेगारीच्या भयाची भर पडलेली असते. अपहरण, बलात्कार आणि त्याहूनही टोकाच्या संकटांचे सावट मुलींवर घिरटय़ा घालत असते. म्हणून वयात येण्याआधीच मुलींचे लग्न लावून देऊन आईबाप सुटकेचा निश्वास सोडतात. अशा अल्पवयीन, कुपोषित विवाहितांची मुलेही कुपोषित म्हणूनच जन्म घेतात आणि कुपोषणाचा पाढा पुढे सुरू राहतो.. इथे कचरा वेचून दिवसाकाठी १००-१५० रुपयांपर्यंत कमाई करणारी कुटुंबे आहेत. पण त्यापैकी २५ ते ५० रुपये केवळ पाणी विकत घेण्यात खर्च होतात. उरलेल्या रकमेतून अन्न, आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च.. तो अशक्यच असतो!
.. मग ‘अपनालय’ने व्यापक सर्वेक्षण सुरू केले. एकटय़ा रफीनगरात ४०० पैकी २०० हून अधिक बालके तीव्र कुपोषित असल्याचे, तर २७ बालके कुपोषणाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले, आणि रफीनगरवर सर्व यंत्रणांच्या नजरा खिळल्या. अंगणवाडय़ा सुरू करण्यासाठी यंत्रणा हलली. मात्र, अशा वस्तीत काम करण्यास अंगणवाडी शिक्षिका नाखूषच असत. अपनालयने गेल्या वर्षी बाल विकास केंद्र, पाळणाघर, पोषण केंद्र सुरू केले. रफीनगरसारख्या वस्त्यामधील ३० ते ४० टक्के प्रसूती घरातच होतात. कारण, या परिसरातील महापालिकेची प्रसूतीगृहे विकलांग आहेत. ‘अपनालय’ने घरी प्रसूती झालेल्या महिलांची यादीच महापालिकेला दिली, तरीही फारसा फरक पडला नाही. संपूर्ण एम-पूर्व भागात मिळून १०५ खाटांची व्यवस्था आहे. अशा वेळी, या प्रसूतीगृहांमधूनच गर्भवती महिलांना नवी मुंबईत जाण्याचा सल्ला दिला जातो, असे ‘अपनालय’च्या संचालिका लीना जोशी यांनी सांगितले. आता ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’नेदेखील या वस्त्यांमध्ये ‘एम-पूर्व विभागाचा कायापालट’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. लीना जोशी यांच्याकडे या प्रकल्पाचेदेखील संचालकत्व आहे. मध्य मुंबईतील डी विभागातील काही भागांत बालमृत्यूचे प्रमाण दर हजारांमागे नऊ इतके असल्याचे आढळले आहे. पण एम-पूर्व भागात या सात वस्त्यांमध्ये कदाचित हा दर १०० पर्यंत असेल, असे लीना जोशी सांगतात.. टाटा समाजविज्ञान संस्थेच्या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या महिनाभरात तयार होईल. वर उल्लेख केलेले वास्तव म्हणजे या सर्वेक्षणाचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर, मुंबईतील हे वास्तव मेळघाटापेक्षाही विदारक असेल, अशी भीती लीना जोशी यांना वाटत आहे..
Subscribe to:
Posts (Atom)