Saturday, October 16, 2010

पांढरीशुभ्र माणुसकी !

पांढरीशुभ्र माणुसकी
भर दुपारची, रणरणत्या उन्हाची वेळ! हायवेवर गाड्यांची तुरळक ये-जा सुरू होती. एक आलिशान मोटार भरधाव वेगात रस्त्यावरून पुढे आली आणि क्षणभरासाठी तिची गती मंदावली. रस्त्याकडेला थांबली. मागचा दरवाजा किलकिला उघडला. काहीतरी पांढरंशुभ्र बाजूच्या खड्ड्यात भिरकावलं गेलं. गाडीनं पुन्हा वेग घेतला आणि पुढच्या क्षणाला ती दिसेनाशीही झाली.
... रस्त्याकडेच्या त्या खड्ड्यातून वेदनांनी कळवळणारे आवाज येत होते.
खूप मागून, एक जुनाट मोटार जिवाच्या करारावर रस्ता कापत चालत होती. खड्ड्याजवळ येताच, ती मोटार थांबली. मागच्या सीटवरून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. कळवळण्याचा आवाज आता मंद झाला होता. ती रस्त्याकडेला आली आणि तिनं वाकून खड्ड्यात बघितलं. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता. कानावर हात गच्च दाबत तिनं डोळे मिटले पण पुढच्या मिनिटभरात ती सावरली होती. खाली वाकून, जमिनीचा आधार घेत ती हळूहळू खड्ड्यात उतरली आणि ते, अगोदरच्या गाडीतून फेकलं गेलेलं, पांढरंशुभ्र, तिनं अलगद हातांनी कुरवाळलं. थोडीशी हालचाल जाणवली. मग मात्र तिनं वेळ घालवला नाही. जोर लावून ते तिनं उचललं आणि छातीशी धरून सावरत ती वरती आली. गाडीतून पाण्याची बाटली काढून तिनं एक धार त्याच्यावर सोडली आणि ती चरकली. दोन, गोंडस, शुभ्र केसाळ पामेरनियन कुत्री, एकमेकांना बांधून त्या निर्दयानं खड्ड्यात फेकली होती... जिवंत!
पाण्याची धार तोंडावर पडली पण एकानं डोळे मिटले... दुसरीच्या जिवाला थोडी धुगधुगी होती. केविलवण्या नजरेनं त्या जिवानं हिच्या डोळ्यात पाहिलं आणि एव्हाना निर्जीव झालेला एक जीव तिथेच सोडून, दुसरा धुगधुगता जीव सोबत घेऊन ती माघारी फिरली... सरळ घरी आली. मग औषधोपचार सुरू झाले. काही दिवसांनंतर तो जीव तगला. घरात आश्वस्तपणे वावरू लागला. पहिल्या दहाअकरांच्यात आणखी एकाची भर पडली होती. त्यापैकी कुणी लंगडं होतं, कुणी आंधळं होतं, कुणाला पायच नव्हता, तर कुणी आजारी होतं... पण सगळेजण तिच्यावर विश्वासून एकमेकांच्या सोबतीनं राहात होते.. प्रेमानं!
ह्या नव्या जिवालाही त्यांनी आपल्यात सामावून घेतलं.
~~~~~
मागे कधीतरी आमच्या पिंट्याला दत्तक द्यावं असा विचार मनात आला आणि मी फोनाफोनी सुरू केली. मुंबईतल्याच एका नावाजलेल्या प्राणिमित्र संस्थेत कुणाशीतरी बोललो. त्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. नाईलाजानं त्यांनी माझा नंबर लिहून घेतला. पुढच्या मिनिटात मला भराभर फोन सुरू झाले होते. त्यातला एक फोन, ह्या बाईंचा होता. शेजारच्याच उपनगरात राहाणारं एक गुजराती कुटुंब! आई, एक मुलगी, आणि दहाबारा कुत्री.. चारपाच मांजरं, चारदोन पक्षी... असा संसार. आमच्या पिंट्याला दत्तक घ्यायला ती तयार होती!
अर्थात तोवर मी निवळलो होतो. फोनवर बोलताबोलता तिनं आपल्या कुटुंबात दाखल झालेल्या एकेका सदस्याची कहाणी सांगायला सुरुवात केली...
आपण तिच्यासारखं ‘माणूस’ होऊ शकत नाही... पण निदान राक्षस तरी असता नये. मी तिची माफी मागितली आणि पिंट्याकडे पाहिलं. तो अतिशय विश्वासानं आणि प्रेमानं माझ्याकडे पाहात होता.
तेव्हापासूनच त्या कुटुंबाशी एक नवं, अव्यक्त नातं जडलं. कधीकधी त्या ‘माऊली’चा फोन येतो. असाच एक फोन झाला, तेव्हा तिनं तिच्या घरच्या त्या नव्या, पांढऱ्याशुभ्र पाहुण्याच्या आगमनाची ही कहाणी कळवळत सांगितली.
~~~~
अवतीभवतीच्या जगात रोज वावरताना, आसपासच्या गर्दीतलं हरवलेलं माणूसपण पावलापावलाला जाणवत जातं आणि इथे कुणालाच कुणाचं काहीच कसं वाटत नाही, असं वाटत राहतं.... पण, हीच गर्दी, जेव्हा ‘एकेरी’ होते, त्यातला प्रत्येकजण जेव्हा एकटा होतो, तेव्हा माणुसकीचे झरे अखंड जीवनाचा स्त्रोत ठरत आपापले वाहताना दिसतात. प्रत्येकजण हा काही ना काही आपापल्या परीनं इतरांसाठी करताना दिसतो. या गुजराती कुटुंबाने असाच एक अनुभव माझ्या झोळीत टाकला होता.. आणि मला माणुसकीचा धडादेखील दिला होता!

2 comments:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

आपण तिच्यासारखं ‘माणूस’ होऊ शकत नाही... पण निदान राक्षस तरी असता नये...... Perfect said

aativas said...

Human being yet to have learn to behave like humans with all the humans .. see the caste, gender, religious, ethnic discrimination! To love everything around is excelling to other level...don't know when it would happen and whether it will happen. But certainly we have glimpses of it and your experience shows one.