Tuesday, September 10, 2013

समाधान...

एखादं द़श्य आपण पाहतो, त्या वेळी त्यात वेगळं काही वाटत नाही, इतकं ते सहज असतं. काही क्षणांत ते मनावरून पुसलंही जातं. आज सकाळी असंच काहीतरी मला दिसलं. आत्ता खूप वेळानंतर ते पुन्हा आठवलं. म्हणजे, ते मनावरून पुसलं गेलं नव्हतं... प्रसंग अगदी साधा! म्युनिसिपालिटीची कचऱ्याची गाडी रस्त्यावर उभी होती. सगळा कचरा, घाण, दुर्गंध खचाखच भरलेली! ... आणि गाडीवरचा एक कर्मचारी, एक कपडा हातात घेऊन उतरला. बाजूच्या एका खड्ड्यातलं पाणी बऱ्यापैकी नितळ होतं. त्यात त्यानं तो कपडा भिजवला, घट्ट पिळला, आणि गाडीचा समोरचा भाग स्वच्छ पुसून काढला. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या एका वेलावर टवटवीत निळी फुलं फुलली होती. त्यानं ती सगळी तोडली आणि समोर काचेभोवती अडकवली. नंतर तो थोडा मागे गेला... दोन्ही बाजूंना मान थोडी तिरपी करून त्यानं गाडीकडे बघितलं... त्याच्या नजरेतलं समाधान स्पष्टपणे चमकत होतं. मिनिटभरानं गाडी निघून गेली. कचऱ्याचा नकोसा दुर्गंध मागे दरवळत होता! ... मागे एकदा पाहिलेलं आणखी एक द़श्य मला आठवलं. मळानं काळेकुट्ट झालेले फाटके कपडे घातलेल्या, अंगावर मळाचे थर साचलेल्या एका भिकाऱ्यानं, रस्त्याकडेला फूटपाथवर बसण्याआधी खांद्यावरच्या फाटक्या कापडानं झाडून जागा साफसूफ केली, तेव्हाही त्याच्या डोळ्यात असंच समाधान दिसलं होतं!...

1 comment:

तृप्ती said...

:) अर्धी पोस्ट वाचून होइपर्यंत मला पण तुमची ती जुनी पोस्ट आठवली होती :)

मला ट्रेनने किंवा बसने प्रवास करणं या कारणासाठी आवडतं. ओळख-पाळख नसलेली अनेक माण्सं अशी अचानकच भेटतात आणि आठवणींत रेंगाळतात.