Tuesday, March 3, 2015

माय मराठी


मराठी दिनानिमित्त काहीतरी उपक्रम राबवावा असं मला आठवडाभर वाटत होतं.
मग मी ठरवलं.
... आसपासची माणसं वाचायची. त्या गर्दीतला मराठी माणूस ओळखायचा!
यासाठी मुंबईची उपनगरी गाडी हे साधन ठरवलं. मुंबईकडे जाताना आणि परतीच्या प्रवासात, शेजारी बसलेल्या, समोरच्या बाकड्यावरच्या, आणि उभ्या गर्दीतल्या माणसांचे चेहरे, देहबोली न्याहाळायची, आणि तो माणूस कोणत्या प्रांतातला, कोणता भाषिक असेल, त्याचे तर्क करत त्यातून मराठी माणसं चाळून निवडायची...
शंभरातले ऐशी अंदाज अचूक आले! एवढ्या गर्दीतही, मराठी माणूस वेगळा ओळखता येतो.
पण हे काही मोठं कसब नाही. मलाही कितीतरी वेळा, 'महाराष्ट्रीयन?' असा प्रश्न विचारणारे भेटलेत!
खरं म्हणजे, माणसाची भाषा, प्रांत, जोवर तो बोलता होत नाही तोवर कळता नये.
तरीही, त्याचा अदृश्य ठपका बहुधा कपाळावर असतोच!
काही अंदाज मात्र, साफ चुकतात.
परवा समोर बसलेल्या एका माणसानं माझा अंदाज चुकवला. खरं म्हणजे, त्याच्याविषयीचा अंदाजच येत नव्हता. तो गुजराती असावा, असं आधी वाटलं. पण खात्री होत नव्हती. मराठीही वाटत होता.
मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज घेतच होतो, तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
`हां. बोल'... तो म्हणाला. पण तेवढ्यावरून तो मराठी की गुजराती ते कळणं शक्य नव्हतं.
ठीक आहे, मी दोन चाळीसपर्यंत पोचतो तिथे... तो म्हणाला आणि मला आनंद झाला. आपला पन्नास टक्के असलेला अंदाज खरा निघाला म्हणून.
मग मी त्याचं फोनवरचं बोलणं एेकू लागलो.
`बेन्कमधे जाऊन आलास?' अचानक त्यानं पलीकडच्याला विचारलं, आणि माझा विरस झाला.
तो मराठी नव्हता.
तरीही मला एक आनंदही झाला होता.
पलीकडचा माणूस मराठी होता, याच्याशी मराठीत बोलत होता, आणि एक गुजराती माणूसही चांगलं मराठी बोलत होता...
मग मी आणखी आजूबाजूला बघितलं.
समोरचाएक  माणूस चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरूनही मराठी, आणि कोकणातला मराठी माणूस वाटतच होता.
पुढच्या स्टेशनवर त्याच्या शेजारचा माणूस उठून उतरला. एक सीट रिकामी झाली होती. तरीही यानं आपलं अंग आणखी चोरून, आखडून घेतलं होतं. कुणी बसायच्या आधीच, त्याला जागा करून द्यावी म्हणून.
मग त्यानं बॅगची चेन उघडली, आणि आतून एक पेपर काढून वाचायला लागला.
रत्नागिरी टाईम्स...
माझा अंदाज शंभर टक्के बरोबर होता.
त्याच गर्दीत एक पंचिवशीतला तरुण मोबाईलवर काहीतरी करत होता. बहुधा, इंटरनेटवर होता.
त्याचा फोन अधूनमधून वाजत होता. आणि तो अस्खलित इंग्रजीत, फर्ड्या हिंदीत, पलीकडच्याशी बोलत होता. आवाजात प्रचंड आत्मविश्वास. देखणा, रुबाबदार तरुण. चेहऱ्यावरही बिन्धास्तपणा.
तो कोण असावा, याचा तर्क मी लढवू लागलो. तो नक्कीच मराठी नाही, अशी माझी खात्री होती.
अर्थात, एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसात नोकरी करणारा असावा, एवढं नक्की असल्याने, तो गुजरातीही नव्हता. साऊथ इंडियन वाटत नव्हता. मग? यूपी, बिहारी?... तसाही नव्हता.
तो बंगाली असावा... मी मनात तर्क केला.
आणि त्याचाही फोन वाजला.
त्यानं तो बघितला, आणि छानसं हसला.
बायकोचा फोन असावा.
मी चोंबड्यासारखा तर्क केला.
तो बरोबर निघाला.
बोल जानू... तो मस्त स्माईल देत बोलला.
पण तेवढ्यावरून त्याची भाषा, प्रांत समजणं शक्य नव्हतं.
अगं पोचतोच आहे अर्ध्या तासात... काय घेऊन येऊ सांग... तो अस्खलितपणे म्हणाला.
आणि मला दुःख झालं.
अंदाज साफ चुकला होता...
मराठीपणाच्या खुणा कपाळावर असल्या, तरी पन्नाशी ओलांडलेल्यांच्या कपाळावर त्या ठळक असतात.
नव्या पिढीच्या कपाळावरच्या त्या खुणा हळुहळू पुसट होतायत.
काही वर्षांनी त्या निघून जातील.
पण ते चांगलंच आहे.
कारण तेवढ्यामुळे मराठीपण हरवणार नाही, हे नक्की!

No comments: