Monday, March 20, 2017

बोधकथा...

बोधकथा?
महाराज, मलाही अजातशत्रू व्हायचंय. उपदेश करा.... नतमस्तक होऊन हात पुढे बांधून व किंचित झुकून, बोलावे की न बोलावे अशा संभ्रमावस्थेत मनाचा हिय्या करून त्याने महाराजांना नम्रपणे विनंती केली, आणि तो महाराजांच्या मुखाकडे एकटक पाहू लागला. शाही सोफ्याच्या डाव्या हातावरचा पांढराशुभ्र टर्किश नॅपकिन उचलून महाराजांनी एकवार तोंडावरून फिरवला आणि ते हसले. म्हणजे, त्याला तसा भासही झाला असावा. महाराज हसतात तेव्हा कदाचित त्यांना राग आलेला असतो, असं त्याने एेकलेलं होतं. खरं म्हणजे, संपूर्ण महाराजच त्याला नेहमी अनप्रेडिक्टेबल वाटायचे. अवतारी माणसे अशीच, अनप्रेडिक्टेबलच असतात, असेही त्याने एेकले होते. तसे त्याने ज्यांनाज्यांना खाजगीत सांगितले, त्यांनीही त्याला दुजोरा दिला होता. महाराज जेव्हा जे बोलतात, तेव्हा ते तसे नसते, एवढेच आता सगळ्यांना सवयीने आणि अनुभवाने माहीत झाले होते. ते ज्यांच्यावर जोरदार रागावतात ते त्यांच्या सगळ्यात जवळचे असतात, असेही काहीजणांना वाटू लागले होते, पण तसे ते खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हते. महाराजांच्या टीकाशैलीविषयीदेखील अनेकांना शंका होत्या. ते सहज बोलतात असे वाटायचे तेव्हा ती नेमक्या कुणाला तरी आपल्यावरच केलेली बोचरी टीका आहे, असे वाटायचे, तर ते अगदी थेट रोख धरून टीका करतात तेव्हा त्यातही कौतुक दडलेले अाहे, असा समज व्हायचा. कात्रजचा घाट हे महाराजांचे सगळ्यात आवडते ठिकाण होते. अनेकांना त्यांनीच या घाटातून फिरवूनही आणले होते. त्या प्रवासामुळेच कितीतरी लोकांना महाराजांच्या शक्तीची प्रचीतीही आली होती. उंच आकाशातून हिंडताना, घारीचे लक्ष बरोब्बर जमिनीवरच्या सावजाकडे लागलेले असते. झाडाझुडुपात दडलेला जमिनीवरचा एखादा काळा ठिपकादेखील नेमका हेरून घार त्यावर झेपावते. महाराजांच्या बाबतीतही तसेच असावे असेही अनेकांना वाटायचे. विमानातून जमिनीवर पाहताना, खाली दिसणारे गाव कोणते, त्यातला झाडीने वेढलेला जमिनीचा तुकडा कुणाचा, इतकेच नव्हे तर त्याचा सर्वे नंबर काय हेदेखील ते सांगू शकायचे. जगाच्या पाठीवरच्या कितीतरी देशांत त्यांच्या ओळखी होत्या. त्यांचे शिष्यगण जगभर पसरलेले होते, तरीही त्यांनी कधीही स्वतः महान असल्याचा आव आणला नव्हता. भारतात तर त्यांच्या कृपेने अनेकांची आयुष्ये भराभराटून गेली होती. एखाद्यावर त्यांची मर्जी बसली की त्याच्या आयुष्याचे सोने होऊन जायचे, हेही अनेकांना माहीत होते. खरे म्हणजे, महाराज कुणा एकाचे नव्हतेच. सगळीकडे त्यांचे चाहते होते. त्यांचे शिष्यत्व मिळावे म्हणून अनेकांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी चतुराईने कामाच्या माणसांनाच जवळ केले होते. कोणता माणूस कोणत्या कामाचा आहे, हे ओळखण्याची अतींद्रिय शक्ती त्यांना लाभली आहे, असे त्यांना ओळखतो असे मानणाऱ्यांपैकी काहींना वाटायचे. काहीजण तर स्वतःलाच महाराजांचे शिष्य म्हणवून घ्यायचे, कधीकधी महाराजांनाच हे माहीतही नसायचे. तरीही महाराजांच्या स्थिर चेहऱ्यावरची रेषादेखील हलत नसे, हे त्याने प्रत्यक्ष बघितले होते. अनेकजणांनी महाराजांची एकलव्याप्रमाणे उपासना करून त्यांच्या अंगीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी अपार कष्टही केले होते. ज्यांना त्यातले काही साधले, त्यांनी अचनाक महाराजांना अनपेक्षित गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती... महाराजांनी कधीही कुणालाही नाराज केले नव्हते. भक्तिभावाने उतराई झालेल्या प्रत्येकाने जे जे दिले, त्याच्या त्यांनी निर्विकारपणे स्वीकारही केला होता...
***
... शाही सोफ्यावर बसलेले महाराज बराच वेळ काहीच बोलले नाहीत, तोवर त्यांच्यासमोर मान झुकवून उभ्या असलेल्या त्या पामराला हे सारे आठवत गेले, आणि ज्या प्रश्नाचे उत्तर महाराजांनी आपल्याला द्यावे म्हणून आपण ताटकळत होतो, ती उत्तरे आपल्याला आत्ताच मिळत गेली, असा साक्षात्कारी विचार त्याच्या मनात चमकून गेला. तो धन्य झाला होता.
***
महाराजांनी पुन्हा सोफ्याच्या हातावरचा शुभ्र नॅपकीन उचलला, तोंडावरून फिरवला, आणि ते मंद हसले.
महाराजांच्या हास्यातून कृपेचे चांदणे आपल्यावर बरसत आहे, अशा भावनेने महाराजांना हात जोडून तो त्यांच्या पायाशी बसला...

No comments: