Monday, June 22, 2020

पितृदिन



जेव्हाजेव्हा हा लहानसा दगड नजरेसमोर दिसतो, तेव्हा मला दादांची- माझ्या वडिलांची- आठवण होते. जवळपास २० वर्षांहून अधिक काळ हा दगड आम्ही जपून ठेवलाय. तोही, देव्हाऱ्यात. रस्त्यावर असे असंख्य दगड असतात. पण एका दिवशी चालताना दादांची नजर नेमकी या टीचभर दगडावर पडली, आणि त्यांनी तो उचलून कपाळाला लावत निगुतीने शर्टाच्या खिशात ठेवला. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या वेळी आठवणीनं तो बाहेर काढला, स्वच्छ धुतला, आणि पूजा करताना देव्हाऱ्यात ठेवून त्याला गंधही लावलं. या दगडात त्यांना गणपतीचं निराकार रूप दिसलं होतं ... मी फारसा देवभोळा वगैरे नाही. आम्हाला कुणालाच त्यात कधी तसं काही दिसलं नाही, पण दादांनी मात्र भक्तिभावाने त्या दगडाची पुढे रोज पूजा केली. विठोबा रखुमाई आणि पिढ्यापिढ्यांपासून देव्हाऱ्यात असलेल्या देवांच्या मूर्तींप्रमाणे या दगडालाही आंघोळ, गंध, दिवा-नैवेद्य मिळू लागला, आणि दादांच्या भक्तिभावामुळे रस्त्यावरच्या एका दुर्लक्षित, क्षुल्लक दगडाला देवत्व मिळाले.

आज दादा आमच्यात नाहीत. १६ वर्षांपूर्वी त्यांनी अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं. त्यांचा हा निराकार गणपती मात्र, आमच्या देव्हाऱ्यात आहे.
देव म्हणून, आणि दादांची, त्यांच्या भोळ्या, निरागस भक्तिभावाची आठवण म्हणून!
अधूनमधून जेव्हा मी पूजा करतो, देव्हारा साफ करतो आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुन्हा टापटिपीने जागेवर ठेवतो, तेव्हा या दादांनी भक्तिभावाने ‘देव’त्व दिलेल्या या दगडाची मूर्ती हाती असताना मला दादांची तीव्र आठवण येते.
वीसपंचवीस वर्षांपासूनचा देव्हाऱ्यातला हा दगड म्हणजे दादांच्या भक्तीचे अमूर्त रूप आहे.
म्हणून तो पूजेतला देव झालाय.
त्या दिवशी दादांनी त्याला रस्त्यावरून आणून देव्हाऱ्यात बसवला नसता, तर आज तो कुठे गेला असता, कळत नाही.
काही स्पर्श आणि त्यामागील भावनांच्या आधारावर माणसंही वाढतात. मोठी होतात.
आईवडिलांची अशी सावली, तो स्पर्श, ती भावना आधाराला नसती, तर आपणही रस्त्यावरच्या दगडासमान असतो. देवत्व लाभलेल्या त्या दगडाकडे पाहताना मी नकळत स्वत:कडे पाहू लागतो. आपण जे काही असतो, आहोत, ते अशा पितृभावाच्या कृपेमुळेच आहोत, हे स्वत:स बजावतो. त्या सावलीमुळेच
देव्हाऱ्याची लायकी आपल्याला लाभली, ही त्यांची कृपा.
म्हणून तो दगड देव झाला, याची जाणीव जिवंत राहते!

1 comment: