Tuesday, November 20, 2007

बरसात

...बरसात बस स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्‍या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात त्या इसमाशी किती बोलू अन काय असं तिला झालं होतं... "आणि आईला सांगा, मी दिवाळीआधी येऊन जाईन एकदा घरी.... तुमची औषधं आताच घ्या जाताना... मी उद्या ऑफिसला गेल्यावर फोन करेन आईला... त्या दुकानात गूळ स्वस्त आहे... बाकीचे पण जिन्नस स्वस्त आहेत... कधीतरी जाऊन या तिकडे"... असं काहीबाही बोलत असतानाच बस सुरू झाली आणि तिचा आवाज जडावला... बाहेरच्या त्या इसमानंही हात लांब करून खिडकीतनं तिच्या हातावर थोपटल्यासारखं केलं आणि तिनं एकदम मान फिरवली... बाहेरचा तो माणूस जडपणे हात हलवत तिला निरोप देत होता... बस पुढे सरकली आणि तिनं मागे वळून बघितलं... तो इसमही अज्ञातात हरवल्यासारखा हात उंचावून उभा होता... आता बस रस्त्याला लागली होती... कंडक्टर समोर येताच तिनं तिकीट घेतलं आणि ती निर्धास्त झाल्यासारखी व्यवस्थित बसली. मांडीवरच्या प्लास्टिकच्या पिशवीतलं एक पॅकेट घाईघाईनं काढून आधाशासारखं तिनं दातांनीच फाडलं आणि आतला पदार्थ काढून तोंडात कोंबला... नंतर प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ ती असाच तोंडात कोंबून भरत होती... बसच्या पॅसेजमधली दांडी नीट पकडून मी त्या सीटशेजारच्या खांबाला रेलून उभा होतो. अगदी तिच्यासमोरच असल्यानं त्यांचं सगळं बोलणंही मी नीट ऐकलं होतं, आणि म्हणूनच माझं कुतूहलही जागं झालं होतं. हा आपला आगाऊपणा आहे, हे लक्षात येऊनही माझे कान त्यांच्या संभाषणाकडे लागले होते. ते काही फार महत्त्वाचं आणि खाजगी बोलत नाहीयेत, हे कळूनही, कान देऊन ऐकावं असं त्या संभाषणात काय होतं ते माझं मलाच कळत नव्हतं. पण बस सुरू झाल्यावरही, माझं लक्ष तिच्या हालचालींकडे लागलं होतं, एवढं खरं... त्या पिशवीतलं पॅकेट आधाशासारखं दातांनी ओरबाडून खाणार्‍र्या तिला बघून मला कीव वाटू लागली. पण तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ चाखून तिनं पिशवी नीट बांधली आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली... तिच्या चेहेर्‍यावर काहीतरी अद्भूत भाव उमटले असावेत, असं मला उगीचच वाटलं. आता मात्र, आपण तिच्या हालचालींवर पाळत ठेवल्यासारखं वागणं बरं नाही, असं मला वाटायला लागलं, आणि मी तिच्यावरचं लक्ष वळवलं... गाडीत नेहेमीसारखीच गर्दी... नेहेमीसारखेच दमलेभागलेले, नोकरीवरून परतणारे प्रवासी शिणल्यासारखे उभे, बसलेले होते... नवीन काहीच नव्हतं. कुणी मोबाईलवरून गप्पा मारत होतं, कुणी ‘धंद्याच्या वार्ता’ करीत होतं. मी उभा असल्यानं उगीचच गाडीभर नजर फिरवत होतो. पुढच्याच स्टॉपला तिच्या शेजारचा प्रवासी उतरल्यानं मला बसायला जागा मिळाली. आता थोडा वेळ निवांतपणा होता. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. तितक्यात पुन्हा तिनं ती पिशवी उघडली. पुन्हा एकदोन पदार्थ तिनं तोंडात टाकले... पण आता मघाचा तो आधाशीपणा, उतावळेपणा नव्हता... उलट, तिच्या चेहेर्‍र्यावर, छानशी, समाधानाची छटा स्पष्टपणे उमटली होती. हळूच तिनं हातातली ती पिशवी कुरवाळली, आणि घट्ट धरली... तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. तितक्यात तिनं पर्समधला मोबाईल काढला, आणि एक नंबर फिरवून कानाला लावला. आता पुन्हा तिचं मोबईलवरचं बोलणं मला स्पष्ट ऐकायला येणार होतं. पण मी माझं लक्ष जाणूनबुजून दुसरीकडं वळवलं. मला उगीचच अपराध्यासारखं वाटत होतं. ती फोनवर बोलत होती. तिचा आवाज अगदी मोकळा होता, आणि शब्दांतला आनंद ओसंडून वहात होता. लक्ष नसतानाही मला ते जाणवलं, आणि नकळत कान पुन्हा तिकडे वळलेच. "अगं आत्ता बाबा भेटले गं स्टॉपवर..." तिनं उकळ्या फुटल्यासारख्या उतावळेपणानं पलीकडच्या बहुधा तिच्या मैत्रिणीला सांगितलं, आणि मघापासूनच्या ताणलेल्या माझ्या आगाऊ उत्सुकतेला उत्तर मिळालं. तो जडपणे तिच्याशी बोलणारा वयस्क इसम, तिचे वडील होते... "केव्हापासनं येऊन थांबले होते गं बाबा स्टॉपवर. मी साधारण याच वेळेला येते ना, ते त्यांना माहीत होतं. किती दिवसांनी अशी अचानक भेट झाली गं... इतकं बरं वाटलं बघ बाबांना भेटून... मला एकदम रडूच आलं बघ..." ती आवाजातला ओलावा लपवत पलीकडचीला भरभरून सांगत होती. आगाऊपणानं का होईना, मी तिच्या त्या आनंदक्षणाचा साक्षीदार झालो होतो. तिच्या चेहेर्‍यावरल्या समाधानाचा अर्थ मला आत्ता उमगत होता. नकळत माझ्याही मनात तिच्या समाधानाचा वाटेकरी झाल्याचं समाधान उमटत होतं. नुकतंच लग्न होऊन बहुधा ती या उपनगरात राहायला आली असावी. तिचे आईवडीलही बहुधा मुंबईतच कुठे दुसर्‍या उपनगरात राहत असावेत. लग्न झाल्यापासून माहेरी जायला तिला बहुधा वेळ मिळाला नसावा. लग्नाची रजा संपल्यावर लगेचच दोघांचीही नोकरी सुरू झाली असणार... नवलाईचे काही दिवस संपल्यावर त्या दोघांनीही मुंबईच्या वास्तव जीवनाला वाहून घेतलं असणार. आपल्या आणि नवर्‍याच्या, दोघांच्याही नोकरीच्या व्यापात आणि कदाचित नव्या नवलाईत बुडालेल्या तिला माहेरी जायला उसंत मिळाली नसणार... फोनवर बोलूनच ती बहुदा आईच्या मायेची ऊब अनुभवत असणार.... मोबाईलवर ती बोलत असतानच मी एकेक तर्क लढवत होतो... मुंबईतल्या नोकरदार तरुणांच्या दगदगीच्या जीवनाचा एक अस्सल अनुभव माझ्या बरोबरीने प्रवास करत होता. या जीवनातल्या रोजच्या व्यापात, प्रेमाच्या माणसांच्या मायेच्या छायेसाठी आसुसलेला एक जीव आपल्या जन्मदात्याच्या इवल्याश्या सहवासातला आनंद जपून ठेवण्यासाठी धडपडत होता... त्या अनोख्या मायेच्या दर्शनानं मी भारावून गेलो होतो. त्या पिशवीतल्या पदार्थांचा गोडवा मलाही जाणवून गेला... त्या पदार्थांना आईच्या हातातल्या मायेचीच चव असणार, आणि कित्येक दिवसांपासूनची त्या मायेची भूक भागवण्यासाठीच ती नकळतपणे आधाशीपणा करत असणार, हे मला उमगलं... अजूनही ती भरभरून मैत्रिणीशी बोलतच होती. पुन्हा माझे कान तिकडे लागले. तिच्या आईनं, तिला आवडणारी खजुराची चिक्की, सुकामेवा, बेदाणे असं काहीकाही त्या पिशवीतून पाठवलं होतं, आणि ते देण्यासाठी तिचे वडील मुद्दाम स्टॉपवर येऊन ताटकळत थांबले होते... त्या पिशवीत त्यांची माया भरली होती आणि ती आधाशासारखी ती माया साठवून घेत होती... तिचं बोलणं संपलं आणि फोन बंद करून तिनं पर्समध्ये टाकला. आता ती त्या पिशवीकडे नुसतं पाहात होती... बसमधली गर्दी हळुहळू ओसरत होती. आता ती आजूबाजूला पाहात होती. मी मुद्दामच तिच्याकडे पाहात होतो. मला तिच्या डोळ्यातलं समाधान अनुभवायचं होतं. ते शोधण्यासाठी आता मी धडपडत होतो... त्याच वेळी तिची माझ्याशी नजरानजर झाली, आणि छानसं हसून तिनं हातातली पिशवी पुन्हा नीट धरली... मी तिचं सगळं संभाषण ऐकलं होतं, हे तिला माहीत असणार. मीही आपुलकीनं हसून तिच्या आनंदाला दाद दिली, आणि खूपखूप बरं वाटल्याचा भाव तिच्या चेहेर्‍यावर उमटला... आगांतुकपणे तिच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न करताकरता अनुभवलेल्या एका हृद्गताच्या समाधानानं माझं मन भारावलं होतं. ते भारावलेपण बहुधा माझ्या नजरेतूनही ओसंडून उतरलं होतं... बिनचेहेर्‍याच्या गर्दीत एकटेपणानं वावरताना नकळतपणे झालेल्या एका जिव्हाळ्याच्या, मायेच्या शिडकाव्यानं मी तृप्ततृप्त झालो होतो.. काही क्षणांच्या छोट्याश्या सहवासानं मोहोरलेल्या एका मनाच्या पाकळ्या उलगडताना मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या... मुंबईतल्या गर्दीत आणि कोलाहलातही, कुठल्यातरी झाडातून उमटणारा कोकीळकंठी स्वर मला स्पष्टपणे ऐकू येत होता.. दिवसभराचा सगळा शीण मी विसरून गेलो होतो... माझ्या मनाच्या अंगणातच एका ‘माहेरच्या सुवासाची बरसात झाली', या आनंदात मी डुंबून गेलो होतो.

Wednesday, September 26, 2007

`मानव' आणि `माणूस'!

एका आईच्या कुशीत साकारला देह एक I
‘देई मजसी तो देवा’, म्हणे आत्मा एक नेक II

जाणुनिया संचिताला आत्मारामे रुकारिले I
देहामाजि येता आत्मा, तया सजीवत्व आले II

आले आत्म्याच्या मागोनि एक निरागस मन I
देहि आली संवेदना, मोहरले ते जीवन II

मानवाच्या जगी कधी जसा अंधार दाटला I
तळमळला तो आत्मा, झरा मनाचा आटला II

मन भुलले देहाला सुटे आत्म्याची संगत I
भौतिकाच्या जगातली, मना जडली रंगत II

मन देहापाशी जुळे आत्मा एकाकी पडला I
कोंडलेल्या देहामाजी, मग एकांती रडला II

शरमल्या आत्म्याने युद्ध छेडिले देहाशी I
मन गेले दूरदूर, स्वैर झुले मोहापाशी II

जर्जर तो देह अंती हात दोन्ही पसरूनी I
भीक मागतो मनाशी, घेई मज सावरूनि II

मन हासते मोकाट आत्मा जाहला उदास I
जाणुनिया देहस्थिति, म्हणे मग मानवास II

शेवटचा क्षण देहा तुझी संगत आत्म्याशी I
ठेवुनिया शस्त्र खाली, जाई शरण तयाशी II

मन आत्म्याशी सांधले आली देहाची कणव I
सारा प्रवास संपता, झाला `माणूस' मानव II

Wednesday, September 19, 2007

शहार!!

मनाच्या मैदानावरल्या
मोहोरलेल्या नंदनवनात
शब्दांचे ताटवे डोकावतायत
फुलून डोलायच्या तयारीत...

वा-याच्या ओंजळीतून
ओसंडत्या सुगंधासोबत
सांडलेले शब्द झेलायला
टपली कभिन्न कुत्री मोकाट...

केसाळलेल्या शेपट्या सावरत
डोळे लावून हिरवे हावरट
कवितांच्या रोपट्यांकडे
वखवखून लाळ घोटतायत...

लचके तोडायला कधीतरी
सापडतील दातात कोमेजलेल्या
शब्दांची लोंबकळती लक्तरं
समीक्षकाच्या हेकट थाटात...

कवींचा थवा आता शहारलाय
ताटव्यांचं चित्तपण
था-यावर नाही...
शब्दांचे ताटवेच कोमेजतायत!!

Saturday, September 8, 2007

सूर ( १ )

अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला.

...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली. देवकीला बाळ झाल्याची खबर देऊन कंसाच्या गळ्यातील कंठहाराचे बक्षिस मिळविण्यासाठी राक्षस पहारेकऱ्यांची पळापळ सुरू झाली. प्रत्यक्ष आपला मृत्यूच कारागृहात अवतरल्याच्या भयावह बातमीवर मात करण्यासाठी आसुसलेल्या निर्दयी कंसाची कर्दनकाळ पावलं कारागृहाच्या दिशेनं पडू लागताच, सूर्याची ती कोवळी किरणंही स्तब्ध झाली. सगळं काही आधीच ठरलंय, आणि सगळं काही ठरल्याप्रमाणंच होणार आहे, याची खात्री असतानादेखील आकाशात दाटलेले ढग उगीचच गडगडून गेले, आणि उगवत्या सूर्यादेखत विजेची एक किनारदेखील पश्चिमेकडल्या काळ्या ढगांमधून लखलखून गेली... नुकत्याच ओसरलेल्या पावसाच्या सरींनी तरारलेला वारा शहारल्यासारखा सरसरला आणि चिडीचूप होऊन पडला... कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्या वेली थरारल्या. अंगावर नुकत्याच फुललेल्या कळ्यांवर साचलेल्या पहाटबिंदूंचा ओलावादेखील त्यांना घामेजल्यासारखा खुपू लागला... हिरवाईनं टवटवलेल्या झाडाझुडुपांची पानं पहाटवाऱ्यासोबत झोपाळ्याचा खेळ खेळताखेळताच स्तब्ध झाली आणि भेदरलेल्या पक्ष्यांचं सकाळसंगीतही थिजलं... आसपासचं जग पुढच्या क्षणाकडे डोळे लावून बसलं. मृत्यूभयानं भेदरलेल्या कंसानं लाथेनंच कारागृहाचा दरवाजा ढकलला आणि जणू याच क्षणाची वाट पाहात स्तब्ध सूर्यकिरणे न्याहाळत पहुडलेल्या त्या बालिकेला देवकीच्या कुशीतून हिसकावत विक्राळ गडगडाट केला. थिजलेलं जग पुन्हा एकदा भयचकित होऊन शहारलं आणि कंसानं त्या बालिकेला हवेत गरागरा फिरवून आपटलं... सगळं ठरल्यासारखंच होतंय, याची खात्री असतानाही, वारा पुन्हा शहारला... वेली पुन्हा थरथरल्या... पक्षी पुन्हा भाबावले आणि सोनकिरणंही फिकट झाली...

ठरल्याप्रमाणं आपलं अवतारकार्य संपवतानाच कंसाला मृत्यूभयानं हादरवणारी आकाशवाणी करीत ती नवजात बालिका अदृश्‍य झाली. वारा पुन्हा खेळू लागला... पक्षी पुन्हा गाऊ लागले आणि झाडं-वेली पुन्हा तरारल्या. अवखळ वाऱ्यानं कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्याच वेलींवरल्या फुलांचा सुगंध ओंजळीत घेत आसमंताला वाटून टाकला... रात्री अंधारात दुथडी भरून वाहणारी यमुनाही जबाबदारी पार पाडल्याच्या समाधानानं निळ्याशार संथपणे वाहू लागली. आकाशातल्या ढगांनी एक सर आनंदानं धरतीवर बरसली आणि एकमेकांवर आदळत लडिवाळ गडगडाटही केला. नवा दिवस उगवत असतानाच, एका राक्षसी युगाचा अस्त सुरू झाल्याच्या जाणीवेनं अवघं जग आश्‍वस्त झालं... याच वाऱ्यांनी हा सुगंध यमुनेपारच्या "नंदन'वनात यशोदेच्या पलंगावरल्या त्या बाळापर्यंत पोहोचवला, आणि अंगठा चोखत याच वार्तेची वाट पाहात पहुडलेल्या कान्ह्याला सूर फुटताच नंदनवन मोहरून गेलं... यशोदेला बाळ झाल्याच्या वार्तेनं अवघं गोकुळ आणखीनच बहरलं...

... कारागृहात देवकीच्या पोटी जन्मलेल्या बालिकेची क्रूर कंसानं हत्या केल्याच्या बातमीसोबतच, गोकुळात नंद यशोदेला गोजिरं बाळ झाल्याची वार्ताही गंधभरल्या वाऱ्यांनी चहूकडे पसरवली आणि आनंदसुरांचा सुंदर साज आसमंतावर सजला... ठरल्यासारखं सारं काही सुरळित पार पडल्याच्या आनंदात अवघी सृष्टी बहरून, मोहरून गेली... गोपिकांच्या गर्दीनं नंदगृह ओसंडून गेलं... आणि कृष्णजन्माच्या आनंदसुरांचा वर्षाव सुरू झाला...

... त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या जगात कृष्ण्जन्माचा सोहळा साजरा होतोय... रोज उगवणाया नव्या दिवसासोबत जगाचं रूपही नवंनवं होत गेलं. कृष्णजन्माच्या आनंदावर नव्या जगाच्या बदलत्या छटा उमटू लागल्या, आणि भक्तीच्या धसमुसळ्या, ‘प्रायोजित’ प्रदर्शनात, कृष्ण्जन्माच्या आनंदस्वप्नात बहरणारी सृष्टी कोमेजत गेली.

Wednesday, August 29, 2007

करूणा!!

‘संभवामि युगेयुगे’... लाख वर्षांपूर्वी कधीतरी, अर्जुनाला दिलेला हा ‘कानमंत्र’ अठरा अक्षौहिणी़मधल्या कुणीतरी ऐकला आणि केवळ ‘कानोकानी’ होऊनच आजवर घुमत राहिला. द्वापार युगापासून आजपर्यंत आम्ही निर्धास्त आहोत, ते तुझ्या या आश्वस्त ग्वाहीमुळेच! खरं तर, ‘पब्लिक मेमरी इज शॊर्ट’ हा आमच्या युगाचा मंत्र आहे. म्हणून तर आमचे आजचे मायबाप वारेमाप आश्वासने देत सुटतात, आणि जनांच्या कानापर्यंत पोहोचायच्या आधीच, ती हवेत विरूनपण जातात. जे लक्षात ठेवायला हवे, ते आम्ही विसरतो, आणि जे विसरायला हवे, ते आम्ही युगानुयुगे लक्षात ठेवून बसतो... तू कधीकाळी सांगून ठेवलंस, म्हणूनच, ‘विनाशाय च दुष्कुताम’ तू इथे अवतरणार, अशी आमची खात्री असते. म्हणूनच, जेव्हाजेव्हा, आमच्यावर ‘धर्मसंकट’ येतं, तेव्हातेव्हा आम्ही तुझ्या आगमनाकडे डोळे लावून बसतो. तूच आम्हाला संकटातून तारशील, या खात्रीनं आम्ही पामरं, तुझी पूजा बांधतो, देवळादेवळात जपजाप्य करतो, यद्न्ययाग करतो... परवा आमची निरागस मुलं हसताखेळता कुणाच्या तरी ‘दुष्क्रुता’मुळे तुझ्या दारी आली. तेव्हा त्यांच्यापैकी कुणकुणाच्या घरात, तुझी बासरीधारी तसबीर, पुराणकथांमधला तुझा तो निरागसतेचा भाव चेहेयावर घेऊनच आश्वस्त हसत होती...

कघीकाळी तू अर्जुनाला सुनावलेले ते खडे बोल, हजारो वर्षापूर्वीच कधीतरी ‘व्यासांचं उष्टं’ चिवडताना आमच्या हाती लागले, आणि आम्हीही ते कपाळी लावून ‘धर्मवाक्य’ मानले. तुझ्या त्या आश्वासनामुळेच आम्ही ते सगळंच्या सगळं ‘व्यासोच्छिष्ट’ उचलून ‘देवघरा’त दडवलं... तेव्हापासूनच आम्ही तुझ्या त्या आश्वासनाच्या भरवशावर भविष्याकडे पावलं टाकतो आहोत. ‘धर्मसंस्थापना’आधी ‘विनाशाय च दुष्क्रुताम’ अवतरणार, असंही तू त्या अर्जुनाला सांगितलं होतस. आमची स्मरणशक्ती ‘तोकडी’ असेल, तरीही ते आम्ही आज, लाखो वर्षांनंतरही विसरलेलो नाही. कारण, त्या आश्वासनामुळेच तर तू आमचा ‘देव’ झाला आहेस. नाही तर, घराघरातल्या तुझ्या त्या हसया, बासरीधारी तसबिरी आता खूप वर्षांच्या झाल्यात. उदबत्त्यांच्या धुरानं त्या काळवंडल्या पण आहेत. तुझ्या त्या ‘भगवद्गीते’ला कधीपासून गुंडाळलेलं लाल, रेशमी वस्त्रंपण आता जुनाट झालंय.

पण, तीच तुझी गीता मात्र, आमच्या युगात दिमाखानं मिरवतेय एका जागी... कारण, तिच्यावर हात ठेवून आम्ही काहीही बोललो, तरी ते ‘सत्य’ असतं. म्हणूच्नच या गीतेचा महिमा आम्हाला पटला आहे, म्हणूनच तुझ्या ‘किमये’वरचा आमचा विश्वास आणखी घट्ट झाला आहे. कधीकाळी, शिशुपालाचे ‘शंभर अपराध’ होईपर्यंत तू त्याला मोकट सोडलं होतस. आता युग बदललंय, ते आम्हाला मान्य आहे. महागाईपण वाढली आहे. ‘शंभरा’ला आजकाल फार किंमतही राहिली नाहीये. पण आता नवं काहीतरी परिमाण तू ठरवलं असशीलच. दुष्क्रुतांच्या घड्यात नव्या ‘शिशुपाला’ची किती पापं भरली पाहिजेत?

गेल्या आठवड्यात, म्हणजे, तुझ्या जगातल्या, क्शणभरापूर्वी आमची मुलं तुझ्याकडे गेली आहेत. तुझ्या छायेत तिथेतरी ती सुखरूप असावीत, असं आम्ही मानतो... आमच्या जगातल्या ‘दुष्क्रुतां’चे पुरावे अशा असंख्य निरपराध, निरगसांच्या रूपानं तुला रोजच्या रोज घरबसल्याच मिळत असतील. तुझ्या नारदाला त्यासाठी आमच्या जगात फेरफटके मारायची आता गरज राहिलेली नाही. शभराच्या जागी आता, करोडोचा हिशेब केलास, तरी, आमच्या ‘शिशुपालां’चे ‘घडे’ भरलेत, असं तुला अजूनही वाटत नाही?... तुझ्या हिशेबांचा थांग आम्हा पामरांना लागत नाही. तू येशील, तोवर आमच्या ‘मायबाप’ सरकारनं, अशा ‘शिशुपालां’साठी, ‘निषेधाचे खलिते’ लिहून तयार ठेवलेलेच आहेत...
----