Tuesday, June 24, 2008

अगा "कवतिक' जाहले!!

अगा "कवतिक' जाहले!!
आज आम्हाला भारी कवतिक वाटतंय.... मराठीचं, आणि आमच्या पठ्ठ्या ‘मऱ्हाटी’ बाण्याचं... मागं कधीतरी राघोबादादानं मराठीचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावला, त्याचा अजूनही आम्ही उदोउदो करतोय. पंचवीस वर्षांपूर्वी एकदा जिंकलेल्या वल्डकपसारखा... कारण सरळ आहे. असा योग वारंवार येत नसतो. अशा काही हळुवार स्मृती मनाच्या आणि जनाच्या मनाच्या कप्प्यात जपूनच ठेवाव्या लागतात. अस्मितेचा प्रश्‍न समोर आला, की त्या हळूच बाहेर काढायच्या, त्यावर हलकीशी फुंकर मारून त्यावरली धूळ झटकायची, आणि त्या स्मृती कुरवाळत आपल्या पराक्रमाचे पोवाडे रचायचे... इतकी वर्ष आम्ही हेच करत राहिलो. आज मात्र, मराठीला नवे दिवस आल्याची आमची खात्री पटली आहे. ‘एकमेकांचे पाय खेचू म्हण झाली जुनी’, असं सांगत शाहरुख खान बदललेल्या मराठी बाण्याचं कौतुक करत असला, तरी एकमेकांचे पाय खेचणे हे तर मराठीपणाचे गुणसूत्र- म्हणजे- डीएनए आहे. कधीतरी ते असे उफाळून वर येते, आणि आपला मराठीपणा सिद्ध करते. आज मराठी साता समुद्रापार चाललीये... आम्हाला केवढा आनंद झालाय... ज्ञानेश्‍वरांची आठवण होतेय. "बोलू कवतिके' अशी आमची स्थिती झालीये. "कवतिका'साठी शब्द सुचेनासे झालेत, आणि मराठीचं पाऊल पुढे पडत असताना त्यात खोडा घालून आपला बाणा सिद्ध करण्यासाठी सरसावलेल्या मराठमोळ्या साहित्यिकांची कीव वाटतेय. मराठीनं अनेकांची साहित्यं- पक्षी साहित्यकृती- पचवली. त्याच्याच जिवावर कितीतरी साहित्यिक मातब्बर झाले. परकी साहित्य बेमालूमपणे मराठीपणात मिसळण्याची कला अनेकांना साधली. इतकी, की परकी साहित्याचा गंधदेखील या साहित्याला येणार नाही, इतका सराईतपणा मराठी साहित्यविश्‍वानं सहजपणे साधला. आता मात्र, मराठीला महाराष्ट्राबाहेर जायची संधी आली असताना, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषांमध्ये बांधून घेतलेल्या मराठी साहित्य"विश्‍वा'त खळबळ माजून राहिली आहे. उलट, साता समुद्रापारच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या मराठीची अवीट गोडी अमेरिकनांना चाखविण्याचा चंग आम्ही बांधला असताना, हा अंगचोरपणा का केला जातोय, हेच आम्हाला समजेनासं झालंय. यासाठी विचार करता, आम्हाला एकच कारण समोर दिसते. ते म्हणजे, काही मोजक्‍याच लोकांना या निमित्ताने अमेरिकावारी घडणार, या विचारानं काही माथी पोखरली असतील, किंवा इतकी वर्षं साहित्यसेवा करूनसुद्धा अमेरिकावारीचे कवतिक आपल्या वाटणीस नाही, याचे वैषम्य वाटत असेल. आम्ही म्हणतो, इथल्या संमेलनात समजा अडीच कोटींची पुस्तकं विकली गेली असतील. इथली वाचनसंस्कृती संमेलनाच्या निमित्तानं समृद्ध झाली असेल, असंही समजू या. म्हणूनच आता मधल्या वर्षभरात निघालेल्या पुस्तकांना संमेलन हाच वाली असावा, असं कुणा प्रकाशकांना वाटू लागलं असेल. म्हणजे, संमेलनं भरली नाहीत, तर पुस्तकं कशी खपणार, ही इथली स्थिती! म्हणून, पुस्तकं खपण्यासाठी तरी संमेलनं इथल्याइथे भरवा, असा आग्रह? अमेरिकेतले आमचे मराठी बांधव, मराठीच्या संवर्धनासाठी कधीपासून आसुसलेत... मराठीची इथे होणारी प्रगती त्यांना आपल्या दोनचार आठवड्यांच्या भारतभेटीत अनुभवता येत नसेल, आणि संमेलनाच्या निमित्तानं त्यांचं भावविश्‍व, अनुभवविश्‍व आणि मराठमोळ मन समृद्ध होणार असेल, तर स्वस्ताततल्या पाहुणचारात तेवढं त्यांना द्यायला काय हरकत असावी? जाऊ द्यात पाचपन्नास लेखक तिकडे. आजकाल, परदेशवारीसाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालावेत, आणि आपल्या रटाळ साहित्यकृती "रसिकां'च्या माथी मारायच्या हे समीकरण जुळणारे नाहीच... (कणेकरांना विचारा... ते बऱ्याचदा त्याच त्याच कार्यक्रमांची निमंत्रणं मिळवून जाऊनसुद्धा आलेत. तिथे त्यांना साहित्यिक म्हणूनही ओळखतात.) दुसरं म्हणजे, कधीतरी अमेरिकेची सफर करायचीच, अशी कुणा साहित्यिकांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असेल, तर त्याला बाकीच्यांची हरकत का असावी? उलट, अर्धा खिसाच रिता करून पूर्ण वारी करायची आगळी संधी मिळत असेल, तर आपल्या संस्कृतीला ते साजेसेच नाही का? मग सर्वांनी मिळून त्याचं स्वागतच करायला हवं, असं आम्हाला वाटतं... आणि या अजब आयडियाबाजांचे "कवतिक'च करायला हवं. कारण, मराठीचा झेंडा सातासमुद्रापार जाणार आहे. पुस्तकाच्या खपासाठी रत्नांग्रीत समांतर संमेलन भरवायलाही आमची काहीच हरकत नाही म्हणा... वर्षभरात बरेच गठ्ठे प्रकाशकांच्या गोदामात साठले असतील!!

No comments: