Friday, May 29, 2009

‘ध्यासपंथ’

‘ध्यासपंथ’ म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची गाथा - मनोहर जोशी दिनेश गुणे लिखित ‘ध्यासपंथ’ हे पुस्तक म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थाच्या कामाची गाथा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मंगळवारी प्रभादेवी येथे केले. परममित्र पब्लिकेशन्सतर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जोशी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते ‘ध्यासपंथ’ यासह संतोष शिंत्रे (अरण्यरुदन), शैलेश माळोदे (अतिसूक्ष्म, महाप्रचंड), ज्ञानेश्वर भोसले (१४ महिने, १३ दिवस आणि) यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. याच वेळी परममित्र पुरस्कारांचेही वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक माणूस हा स्वत:पुरता जगतो, तर काही जण कुटुंबासाठी जगतात, मात्र समाजात अशीही काही मंडळी असतात की ती समाजासाठी जगत असतात. गुणे यांच्या या पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱ्या माणसांचे चित्रण करण्यात आले आहे, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले. जो संवेदनाक्षम माणूस आहे, तोच सामाजिक कामाचा पंथ अनुसरू शकेल, या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने किमान एका तरी सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले. डॉ. फोंडके या वेळी बोलताना म्हणाले की, आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वस्तूनिष्ठ निरीक्षण, चिकित्सक विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय विवेचन दिसून येते. आज आपल्या जीवनशैलीवर विज्ञान-तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असून कोणत्याही तंत्रज्ञानाचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तो कसा करुन घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वामध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांचे लेखक माळोदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘नॅनो’ टेक्नॉलॉजी हा विषय युवकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. शिंत्रे यांनी सांगितले की, या पुस्तकामुळे आपल्या सर्वाना निसर्ग व पर्यावरण व त्याच्याशी निगडीत प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी. या वेळी बोलताना गुणे म्हणाले की, विशिष्ट ध्येयाने आणि ध्यासाने समाजासाठी स्वार्थरहित काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय या पुस्तकात मी करून दिला आहे. तर भोसले यांनी आपण फासेपारधी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या समाजासाठी आपण काय केले, त्याची माहिती दिली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी या चारही पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. ‘ध्यासपंथ’ पुस्तकातील गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर वालावलकर, संजय कांबळे, विजय जाधव यांचा या वेळी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल श्रुतिका शितोळे (मराठी), शकुंतला गावडे (संस्कृत), दिव्या रेवणकर (गणित), गिरिका भटेजा (तत्वज्ञान), अकबर पिंजारी (भौतिकशास्त्र) यांना जोशी यांच्या हस्ते परम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या गंगाधर गाडगीळ राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील भरत गोडांबे व सीमा शिरोडकर या प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. संजय कांबळे यांना समाजविकास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर अनुपमा उजगरे यांनी सूत्रसंचालन केले. परमविकास केंद्राच्या विश्वस्त संगीता पवार यांनी परममित्रच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.

No comments: