Saturday, May 30, 2009

`डायरी`ची पाने...

सकाळ’चा प्रतिनिधी या नात्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये फिरून केलेले लिखाण सकाळमध्ये `फिरस्त्या बातमीदाराची डायरी' या स्तंभात प्रसिद्ध झाले. त्यापैकी काही निवडक पाने...
१)

नागपूर : 28 मार्च 2009

"सोशल इंजिनिअरिंग'

गडकरी असं नाव कुठंही वाचनात आलं, की मला नितीन गडकरी आठवतात. मग डोळ्यासमोर नागपूर दिसायला लागतं. आणि अचानक नाकात रॉकेलचा वास घुमायला लागतो..
गेली चारपाच वर्ष हे असं सुरू आहे.
नितीन गडकरी नागपूरचे आहेत, म्हणून नागपूरची आठवण येणं साहजिक आहे. पण रॉकेल..?
एकदा खूपच अस्वस्थ झालो आणि हे कोडं सोडवायला बसलो. शोधतशोधत चारपाच वर्ष मागं गेलो.
विरोधी बाकांवर बसलेल्या नितीन गडकरींनी तेव्हा विलासराव देशमुख सरकारच्या कारकिर्दीतले गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचा धडाका लावला होता. एक पुस्तिकाच त्यांनी छापली होती.
आखातातून आयात केलेल्या नाफ्त्याच्या आणि केरोसिनच्या विक्रीतून करोडोंच्या करचुकवेगिरीचा पर्दाफाश करून गडकरींना तेव्हा काही कोटींचं बक्षीसही मिळवलं होतं. गडकरी, नागपूर आणि केरोसिन यांची माझ्या मनातील रसायनाची उकल झाली आणि माझी अस्वस्थता संपली.
...गुढीपाडव्याच्या दिवशी मी नागपुरात आलो आणि रॉकेलचा वास नाकात भिनला. पुन्हा गडकरी आठवले. आजचा क्रम मात्र उलटा होता. आधी नागपूर, मग रॉकेल आणि शेवटी गडकरी....
सकाळी रेल्वेतून उतरलो, तेव्हा उन्हाच्या झळा चटके देत होत्या. पण शहरात फिरायचंच, असं ठरवलं. नागपुरात "भगव्या गुढ्या' घरोघरी उभारलेल्या असतील, ते शोधायचं ठरवून मी बाहेर पडलो होतो.
रस्त्याकडेला एक रिक्षावाला उभा होता. एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ऑइलच्या पिशव्या रित्या करत होता. आजूबाजूला रॉकेलचा वास घमघमत होता.
मी बाजूला उभा राहिल्यावर त्यानं डोळ्यांनीच मला बसायची खूण केली. कॅन बंद करून तो पुढे ठेवत रिक्षाचं हॅंडल खेचलं...
दहाबारा प्रयत्नांनंतर रिक्षा सुरू झाली आणि मिनिटभरात आमच्या भोवती धुराची वलयं दाटली... पुन्हा रॉकेलाचा वास घमघमला. आणि मला गडकरींची आठवण झाली. मी नाक दाबत रिक्षात बसलो.
सगळ्या अवयवांचा खडखडाट करत रिक्षा पुढे सरकू लागली होती.
"पेट्रोलमध्ये रॉकेल पण मिसळावं लागतं?'... मी रिक्षावाल्याला विचारलं.
"साहेब, आता तिचं आयुष्य संपलं.. ती चालेल तितकी चालेल. पण ऍव्हरेज देत नाही. मग नुसता पेट्रोल कसं परवडणार?..अर्ध पेट्रोल आणि अर्ध रॉकेल वापरतो. ऑइल थोडं जास्त टाकायचं'... तो सहजपणे उत्तरला.
"नागपुरातल्या रस्त्यांवर अशा कितीतरी रिक्षा धावतात.. नवी रिक्षा परवडत नाही आणि जुनी टाकून देता येत नाही. आमच्या पोटापाण्याचा हाच आधार आहे.' केविलवाण्या चेहऱ्यानं मागं बघत त्यानं उगीचच स्पष्टीकरण देऊन टाकलं.
"अरे पण प्रदूषण..? या धुरानं सगळी हवा खराब केली ना' मी शहरी थाटात बोललो.
""साहेब, ते प्रदूषण-बिदूषण आम्हाला माहीत नाही...असल्या कारणानं आमच्या रिक्षा बंद झाल्या, तर आमची उपासमार होईल. तुम्हाला जगवणारं, तुमचं ते प्रदूषण आम्हाला मारून टाकेल..' तो माझ्या डोळ्यात पाहत थेट उत्तरला आणि त्यानं गाडीची गती वाढवली..खडखडाट आणखीनच वाढवत रिक्षा पळाल्यासारखं करत होती.
मला काहीच बोलता आलं नाही. रॉकेलचा वास नाकात चांगलाच भिनला होते. मग मी उगाचच हवापाण्याच्या गप्पांवरून निवडणुकीवर उतरलो..
"काय होणार नागपुरात निवडणुकीचं?.. कोण जिंकणार?.. तू कुणाला मत देणार?'.. मी त्याला विचारलं.
"कसली निवडणूक साहेब.. बरीच मोठमोठी माणसं आहेत उभी. कुणीतरी निवडून येणार... नायतर, दोघांच्या लढाईत तिसराच कुणीतरी येईल. पुरोहित आहेत, मुत्तेमवार आहेत. हत्तीपण आहे.' तो समोर बघतच म्हणाला.
हत्तीच्या उमेदवाराचं नाव त्याला माहीत नव्हतं; पण तो "तिसरा' म्हणजे हत्तीच असं त्याला सुचवायचं होतं.
नागपुरातला हत्ती कॉंग्रेसची चाल रोखणार, असं इथं बोललं जातंय. हत्तीवाले वैद्य, भाजपच्या-संघाच्या गोटातले आहेत, असं म्हणतात. भाजपच्या पुरोहितांचा मार्ग मोकळा करण्यासाठीच हत्ती नागपुरात आलाय, असंही म्हणतात.
रिक्षावाल्याला हे राजकारण माहीत नाही. पण त्याला या वेळी हत्तीवर शिक्का मारायचाय.
"साहेब, महागाई वाढलीय. धंद्यातून दोन वेळच्या जेवणाची कमाई होत नाही. इथं आमचे दिवस वाईट आलेत, आणि तुमी निवडणुकीचं विचारताय.. गरिबाला कायपण देणंघेणं नाही तिचं. सगळे सारखेच. म्हणूनच आता हत्ती काय करतो बघायचं'... त्याच्या सुरातला कडवटपणा मला चांगलाच जाणवत होता.
अचानक रिक्षा घरघर करू लागली...आणि बंद पडली.. प्रयत्न करूनही ती चालू होत नव्हती..पण प्रत्येक प्रयत्नाबरोबर रॉकेलचा भपकारा मात्र दरवळत होता.
मी तिथंच उतरलो आणि बाजूच्या चहाच्या टपरीवर गेलो. अठरा-वीस वर्षांचे दोन तरुण टपरी चालवत होते. एक ग्लास चहा घेऊन मी त्यांना बोलतं केला. दोघांनीही अजूनपर्यंत मतदान केलंच नव्हतं. यंदाही नाव नोंदला नव्हतं.. "काय करायचंय मतदान करून?' .. त्यांच्यातल्याच एकानं मला प्रतिप्रश्žन केला.
चहा संपवून मी पुढे गेलो. "पंचशील चौका'त बजरंग दला'चा फलक दिसत होता. गेटातच उभ्या असलेल्या एकाशी गप्पा मारू लागलो.
"हत्ती यंदा तुम्हाला साथ देणार म्हणतात'... मी खडा टाकला. त्यानं चमकून बघितलं...आणि तो मंद हसला.
"सोशल इंजिनिअरिंगचा एक नवाच अर्थ नागपुरात जाणवतोय...

No comments: