Thursday, October 8, 2009

'ठेवणीतला' प्रश्‍न!

'आकाशातून कोसळणाऱ्या धारांच्या माऱ्यातून वाट काढत आमची एस. टी. मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. खिडक्‍यांच्या काचांवरही ढग साचले होते आणि त्यावर बोटं फिरवून साफ केलेल्या काचेतून बाहेर पाहात माझ्या शेजारच्या सीटवरचा तो वयस्कर प्रवासी सुन्न सुस्कारे सोडत होता. त्याचा चेहराही काळजीनं भरल्यासारखा होत होता. ...धुवांधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातलंय, जनजीवन पुरतं कोलमडून गेलंय....एरव्ही वाहनांनी गजबजून पळणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना आहे. एखादं मागे फिरून परतणारं वाहन आणि पावसातून वाट काढत जमेल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी एस. टी. अशी चुकार वाहनं मधूनमधून त्या ओल्याचिंब रस्त्यावरून सरकताना दिसत होती. पाचदहाच प्रवाशांना घेऊन जाणारी आमची एस. टी. कणकवलीपर्यंत जाण्यासाठी हळुहळू सरकत होती. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर काळजी होती.....माझ्या शेजारचा तो प्रवासी तर प्रचंड दडपणाखाली असल्यासारखा वाटत होता. ....मला राहवेना. त्याच्या मनावरचं दडपण बाजूला व्हावं, या उद्देशानं मी त्याच्याकडे बघून हलकंसं हसलो. पण त्याच्या डोळ्यातली काळजीची झाक मिटलीच नाही. तो त्याच नजरेनं माझ्याकडे बघत होता... 'मामा, काय म्हणताय? कुणाला मत देणार?' निवडणुकीच्या माहोलात प्रवास करतानाचा माझा 'ठेवणीतला' प्रश्‍न मी त्याला विचारला, आणि हसलो. पण तो हसला नाहीच, उलट काहीशा रागानंच त्यानं माझ्याकडे बघितलं. 'तुमाला सुचतायत मतां...हिकडं आमची भातां बगा...गेली सगली व्हावन...ह्या पावसानं सगलं वाट्टोलं क्‍येलान...निस्ता कोसलतोय....तीन दिस झाले. त्येला थोप न्हाई.' त्याच्या काळजीचं कारण मला समजलं होतं. मग मीही खिडकीची काच पुसली आणि बाहेर बघू लागलो... त्याचं दुःख वेगळं होतं... शेतातली आडवी झालेली भाताची रोपं त्याला अस्वस्थ करत होती. तोही माझ्याबरोबर बाहेर बघू लागला... एका वळणावर घाईघाईनं त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला आणि एका शेताकडं बोट दाखवत तो पुन्हा चुकचुकला. लोंब्यांनी ओथंबलेली भाताची रोपं जमिनीवर पडली होती. 'आता हातास काय लागणार...सगल्या दान्यास्नी पुन्ना मोड येनार...भातां सगली संपली. सत्यानास केलान पावसान... ज्यांनी भातं कापली, त्यांचीपन वाट लागली असंल...सुकवनार कुटं ती भातं? ....तो पुन्हा कळवळला. 'पण ही शेतातली रोपं अजून तयार नाही झालीत ना?' हिरवी दिसणारी काही रोपं बघून मी धीर करून त्याला विचारलं. 'तर वो...ही म्हान भातं...पन तयार झाली हायेत. कापायला झालीत. पन ह्या पावसातनं काय कापतांव?' प्रत्येक वाक्‍यासोबत तो अधिकच हळवा होत होता. "महान' म्हणजे, थोडं उशीरा तयार होणारं पीक...आणि "हळवी' म्हणजे लवकर पिकणारं पीक.. 'मिरगात कोसलला नाय येवडा आता हस्तात कोसलतोय...संपली सगली शेती'....तो स्वतःशीच बोलल्यासारखं बोलला. आता मात्र त्याच्या चिंतातूर चेहऱ्यातून ओसंडणारा अस्वस्थपणा आपल्यालाही घेरतोय, असं मला वाटायला लागलं होतं. 'जाऊ द्या हो मामा, हे शेत तुमचं थोडंच आहे?' मी जरा जोरातच बोललो आणि मला धक्का बसला. मघासारख्याच रागाच्या छटा आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या आणि माझ्या डोळ्यात त्यानं आपली नजर खुपसली होती. 'म्हजी? काय बोलताव काय तुमी?....कुटनं आलाव, मुंबईवरनं?'....त्यानं जरा जोरातच मला विचारलं. मी मानेनंच "हो' म्हटलं. 'तरीच`... तो पुटपुटला... `जानार कुटं?'.....त्यानं मोठ्यानं विचारलं. 'सावंतवाडी'....मी तुटकपणानं म्हणालो 'कोन पावनेबिवने हायत तितं?'....त्यानं सौम्यपणानं प्रश्‍न केला. तो पुढं काय विचारणार याचा मला अंदाजच येत नव्हता. मी मानेनंच नाही म्हणालो. 'मुक्काम किती?'.....त्यानं पुढचा प्रश्‍न विचारला. 'दोन दिवस...एखाद्या हॉटेलात राहणार'....मी सांगून टाकलं. आणि तो खिन्न हसला. "तितं तुमी जेवनार, ते दाने काय तुमच्या शेतात पिकलेत?' त्यानं विचारलं, आणि त्याच्या प्रश्‍नाचा रोख मला समजला. "आवं, कुटल्या दान्यावर कुटल्या खानाऱ्याचं नाव लिवल्यालं आसतंय, ते कुनाला ठावं असतं का?....मंग हे शेत माजं नाय, म्हनू काय झालं?...हितलं दानं खानारा कोनतरी दुसराच असंल की नाय?....त्याच्या पोटात जानारे हे दाने आसं वाया जातायत....मंग चालंल का?'....तो समजावणीच्या सुरात माझ्याशी बोलत होता. मी खजिलपणानं मान डोलावली आणि तो समाधानानं हसला....आपल्या अस्वस्थपणाचं कारण त्यानं असं मला समजावून दिलं होतं. काहीच न बोलता रस्त्याकडेच्या शेतातली ती कोसळून गेलेली हिरवी रोपं न्याहाळत मी खिडकीची काच पुसून बाहेर बघत राहिलो. "किती वाजले?'....काही वेळानंतर अचानक त्यानं मला विचारलं आणि मी घड्याळ बांधलेलं मनगटच त्याच्यासमोर धरलं. "सांगा तुमीच, आमी काय पढीलिखी मान्सं नाय'...तो म्हणाला. आकडेदेखील वाचता न येणाऱ्या त्यानं अनुभवाच्या शहाणपणातून दिलेला धडा गिरवत मी त्याला वेळ सांगितली... शेतात पडलेल्या भाताच्या रोपांमुळे त्याचा मतांचा उत्साह पार हरवला होता... मग निवडणुकीचा आणि मतांचा तो "ठेवणीतला' प्रेश्‍न सरसकटपणे कुणाच्या माथ्यावर मारायचा नाही, असं मी ठरवलं... पाऊस ओसरला, की मगच पुन्हा तो प्रश्‍न घेऊन लोकांसमोर जायचं, असंही मी ठरवलंय...

No comments: