Wednesday, March 31, 2010

दरवळ !...

... कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये ‘सेव्ह’ करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा...
पण मेंदूची बातच अलग असते...
तिथल्या ‘आठवणींच्या कप्प्या’तली, कुठलीच गोष्ट ‘डिलीट’ होत नाही, आणि पुसलीही जात नाही... कितीही नव्या आठवणींची भर या ‘इनबॉक्स’मध्ये केली, तरी तो ’ओव्हरफ्लो’ होत नाही...
पण, आठवणीच्या त्या कप्प्यात, आपल्या नकळत ‘सेव्ह’ होऊन राहिलेलं, काहीतरी, कुठल्यातरी निमित्तानं असं एक्दम चमकून बाहेर येतं, आणि आपणच चमकून जातो...
`नॉस्टाल्जिया'!...
आठवणीतून पार पुसली गेलेली ती गोष्ट त्या कप्प्यात अजूनही जागी आहे, ही जाणीवच मग मन सुखावून टाकते...
नुसती जागी असते नव्हे, ती तितकीच ताजीतवानीही असते... पुन्हा ती समोर आली, की मगच हे लक्षात येतं...
... आणि, नकळत, सहजपणे आपण आठवणींमध्ये रमून जातो.
भूतकाळातलं, ते पुसलंपुसलं वाटणारं इतकं ताजंताजं असतं, की आपलं आपणच थक्क व्हावं...
मग त्याला जोडले गेलेले आठवणींचे बाकीचे पदरही हळूच उलगडत जातात...
... काळाचा पडदा आपोआपच बाजूला होत जातो.
आणि वर्तमानच विसरायला होतं!
... लहानपणी एखाद्या गावात आपण राहिलेलो असतो, मोठेपणी, खूप वर्षांनी कधीतरी तिथे जायचा योग येतो. तेव्हा मनाची मोहोरलेली अवस्था अनुभवली नाही, असा कुणी असेल?
तिथल्या गल्लीबोळांतून फिरताना, लहानपण पुन्हा जागं होतं.. एखाद्या गल्लीतला एखादा दगडही आपल्याशी ओळखीच्या खाणाखुणा जाग्या करतो... अगदी, रस्त्यावरून चालताना, तेव्हा, आपल्या लहानपणी असलेल्या एखाद्या खड्ड्याच्या त्या जागेवरून आजही, आपला पाय सहजपणे उचलला जातो, आणि आपण चमकून खाली पाहातो...
खरंच, तो खड्डादेखील तिथेच असतो... आपल्याशी नजरानजर होताच तोही ओळखीचं हसतो.
... आणि आपल्याला जाणवतं, अरे, हे आपल्या आठवणीत होत?... तितकंच ताजं?...
---- ---- -----
... आज मला पुन्हा हे सगळं लख्खपणे अनुभवायला मिळालं.
तुम्हालाही तो अनुभव यावा, म्हणून ते लगेच लिहायला घेतलं
... लहानपणी बाजारपेठा आजच्यासारख्या देशी-विदेशी `व्हरायटीज'नी अशा खचाखच भरलेल्या नसायच्या... अगदी काडेपेटीसुध्दा, फक्त ‘विमको’चीच असायची.
आणि, सिग्रेट, पिवळा हत्ती, चारमिनार...
... गावातल्या शाळेत एसएससी झालं, की, कॉलेजसाठी शहर गाठावं लागायचं.. तेव्हाची ती पत्र्याची ‘ट्रंक’... आज नसेल, पण अजूनही लख्ख आठवते ना?...
त्या ट्रंकेतल्या एका ‘अपरिहार्य’ वस्तूनंच आज मला ‘नॉस्टाल्जिक’ केलं...
आजचा पेपर चाळताना, डाव्या पानावर एका कोपर्‍यातल्या एका चौकटीकडे माझं लक्ष गेलं...
‘मीना खाकी फेस पावडर’चे संस्थापक, मोरेश्वरकाका पोतदार यांच्या निधनाची जाहिरात होती...
आणि खाकी पावडरचा तो ‘पुडा’ एकदम मेंदूतल्या आठवणींच्या कप्प्यातून बाहेर आला...
तितकाच ताजातवाना...
नाकात तो वासही क्षणभर दरवळून गेला... तितकाच फ्रेश ! त्या पुड्यातली चिमूटभर पावडर तळव्यावर घेऊन दोन्ही तळवे एकमेकांवर घासताना जाणवणारा तो थोडासा खरखरीतपणाही पुन्हा जाणवला.
...आणि, मी नकळत दोन्ही तळवे चेहेर्‍यावर घासले... खराखरा...
एक क्षणभर एकदम ‘फ्रेश’ वाटून गेले...
कप्प्यातल्या कोपर्‍यातल्या, त्या पुसल्यापुसल्या वाटणार्‍या, पण टवटवीत, ताज्याताज्या असलेल्या आठवणीसारखेच!
काका पोतदार नावाचा कुणी ती खाकी पावडर तयार करायचे, ते आज समजले...
आणि तिचा दरवळ पुन्हा घुमला...
----------------

No comments: