Sunday, January 30, 2011

नात्याचा धागा...

लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले. हजारो हात मानवतेच्या जाणीवेतून एकत्र आले, तर उद्ध्वस्त संसारांना पुन्हा उभारी मिळते, हे त्या दुर्घटनेनंतर अजित जोशीच्या मनावर कायमचे कोरले गेले, आणि वंचितांच्या मदतीसाठी आपला हात कायमचा पुढे राहिला पाहिजे, असे त्याने तेव्हाच ठरवले...
महाराष्ट्राच्या मातीत मनाची मशागत झालेला अजित जोशी २००३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाला, आणि त्याची नेमणूक हरियाणात झाली. २००८ मध्ये हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात कलेक्टर म्हणून रुजू होताच त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक नवे मॉडेल आखले आणि निर्धाराने काम सुरू केले... इथे पानिपतचे पुन्हा महाराष्ट्राशी नाते जडले. त्याआधी २००५ मध्ये, गोहाणा येथे दलित-सवर्ण संघर्षाच्या भडक्यात दलितांची घरे पेटवून दिली गेली होती... ५२ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली, आणि अजित जोशींनी त्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान स्वीकारले. फक्त साडेतीन महिन्यांत त्यांच्यासाठी नवी घरे उभी राहिली, आणि या कुटुंबांना नवे, आश्वस्त छप्पर मिळाले...
महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी जिल्ह्यांत शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कुटुंबकबिल्यासह गावोगावी हिंडत असतात, हे लहानपणापासूनच पाहिलेले असल्याने, आपण जिथे प्रशासकीय अधिकारी आहोत तेथील कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये असे त्यांनी तेव्हाच ठरविले आणि या तरुण जिल्हाधिकार्‍याने सोनिपतमध्ये काम सुरू केले. महाराष्ट्रात ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी `साखर शाळां’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये वीटभट्ट्यांवर काम करणारी कुटुंबेही राज्यात स्थलांतर करीत असतात. या कुटुंबांमधील मुलांसाठी साखर शाळांच्या धर्तीवर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अजित जोशी यांनी हरियाणा सरकारसमोर ठेवला आणि तात्काळ त्याला मान्यताही मिळाली. या प्रकल्पाने आज राज्यात एक नवा आदर्श उभा केला आहे. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरिता हरियाणामध्ये आज अडीच हजार शाळा सुरू आहेत. ‘युनेस्को’च्या ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कारा’साठी या प्रकल्पाची निवडही झाली. हरियाणाच्या विकासाचा आलेख मांडताना आज अभिमानाने या प्रकल्पाचा उल्लेख केला जातो. हरियाणातील वंचितांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पामागे महाराष्ट्राचीच प्रेरणा आहे, असे अजित जोशी अभिमानाने नमूद करतात...



... अजित जोशींच्या कलेक्टर बंगल्यामागच्या जागेतील त्यांनी स्वत: मशागत करून जोपासलेल्या हिरव्यागार शेतांच्या काठांवर पहाटे मोर बागडू लागतात, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गावाला जाग येते, आणि सोनिपतचा हा तरुण जिल्हाधिकारी सकाळच्या फेरफटक्यासाठी मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो. ही एक प्रभात फेरीच असते. या वेळी गावातील शेकडो रहिवासी आपल्या समस्या, गा-हाणी घेऊन एकत्र येतात आणि गावातल्याच एखाद्या मैदानावर, शाळेच्या ओट्यावर ‘कलेक्टर’चा ‘जनता दरबार’ भरतो... तिथल्या तिथे गावकèयांच्या समस्या जाणून घेतल्या जातात, आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिका-यांना सूचनाही दिल्या जातात... उगवत्या सूर्याबरोबर जिल्हाधिकारी अजित जोशींचे ‘फिरते कार्यालय’ सुरू होते... वर्षानुवर्षांपासून दररोज सकाळचा हा उपक्रम आजही नेमाने सुरू आहे. ‘सरकारी वेळे’नुसार ते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात, तेव्हाही नागरिकांची रीघ लागलेलीच असते. भेट मिळाली नाही म्हणून पुन्हा यावे लागले, असा अनुभव कुणालाही कधीच येत नाही. सकाळच्या फेरफटक्यातून जनतेसोबत मिसळून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविणारा अजित जोशी हा बहुधा एकमेव जिल्हाधिकारी असावा. यामुळेच, प्रशासन आणि जनता यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आणि हरियाणा सरकारनेदेखील या नात्याची दखल घेतली. अजित जोशींचे सर्व प्रस्ताव सरकारकडून विनाविलंब संमत होतात, आणि जनता सरकारला दुवा देते. अजित जोशी हा सरकार आणि जनता यांच्यातील अदृश्य दुवा असतो...
दोन वर्षांपूर्वी, २००८ मध्ये बिहारमध्ये कोसी नदीला महापूर आला आणि हाहाःकार माजला. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अजित जोशींनी हरियाणा सरकारला प्रस्ताव दिला. एका उद्ध्वस्त गावाचे पुनर्वसन करायचे ठरले, आणि हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्याने बिहारमधील मुसहारी नावाचे एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेतले. एक वेळचे जेवण कमी करून त्याचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्या, असे आवाहन अजित जोशी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले, आणि सोनिपतच्या गावक-यांनी लोकवर्गणीतून एक कोटी ४३ लाखांचा निधी अजित जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्या निधीतून सोनिपतने बिहारमध्ये उभे केलेले मुसहारी गाव आज आनंदाने नांदते आहे... २२३ घरे उभी राहिली, एक समाजमंदिर आणि एक शाळाही बांधून झाली... ५० शौचालये, ३२ हातपंप आणि गाव हायवेला जोदणारा एक भक्कम रस्ता निर्माण झाला... महाराष्ट्रातील लातूरच्या भूकंपानंतर मदतीसाठी पुढे आलेल्या हजारो हातांनी आखून दिलेल्या आदर्शाची त्यामागे प्रेरणा आहे. अजित जोशी यांनी हा प्रकल्प मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आहे.
`पेपरलेस इलेक्शन' हा जेव्हा एक `विचार' होता, तेव्हा अजित जोशींनी `एस्क्यूएल२०००' नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले... आता त्या जिल्ह्यात होणार्‍या कोणत्याही निवडणुकीसाठी मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याकरिता, नवे सायास करावे लागत नाहीत... अजित जोशींनी हरियाणात केलेल्या वेगवेगळ्या विधायक कामांतून आपले नाव कोरले आहे... म्हणूनच, हरियाणातले प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतात, तेव्हा त्यांच्या ‘मराठी माणूस’पणाचा उल्लेख आवर्जून केला जातो...
म्हणूनच, अजित जोशी हा महाराष्ट्र, पानिपत आणि बिहार यांचे तिहेरी नाते जोडणारा धागा ठरला आहे.
------------------

3 comments:

aativas said...

ही माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार.

Anonymous said...

खूपच सुरेख ..असे अजित जोशी आपल्याला हवे आहेत आणि त्यांची काम लोकांपर्यंत पोचविण्याचे काम माध्यमांनी करायला हवे.

धन्यवाद दिनेश.

..मंदार जोगळेकर

Unknown said...

Chaan Mahiti Dilya Baddl Thx. Dinesh

Prasad Vaidya, Devurkh