Saturday, August 9, 2014

किस्सा किस्मत का....


आज अचानक एक जुनाच किस्सा लख्ख आठवला. 
एक निर्माता, एका शूर इतिहासपुरुषाच्या जीवनावर चित्रपट काढायचं ठरवतो. 
प्रमुख भूमिकेसाठी एका नामवंत अभिनेत्याला भरपूर पैसे देऊन करारबद्ध करतो. 
मग त्या अभिनेत्याच्या पसंतीनुसार इतर पात्रांची निवड होते. 
सारी तयारी झाल्यावर, वेगवेगळी लोकेशन्स नक्की केली जातात. आता शूटिंग सुरू होणार असतं. 
दणक्यात चित्रपटाची जाहिरातही सुरू होते, आणि प्रमुख अभिनेता आणखीनच फेमस होतो!
कोकणात, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या एका गावात, एका किल्ल्याच्या पायथ्यीशी घनघोर युद्धाचा सीनचे चित्रीकरण करायचं असतं.
सगळी टीम तयारीनिशी गावात पोहोचते.
युद्धासाठी लागणारं सैन्य आजूबाजूच्या गावातील तरुणांनाच गोळा करून जमवायचं असतं. सरपंच, पोलीस पाटील या सगळ्यांशी तसं तोडपाणी झालेलं असतं.
.... ठरल्याप्रमाणे, जमवाजमव होते. एक दिवसाच्या मजुरीच्या बोलीवर शे दीडशे तरुण जमा होतात. सर्वांना सैनिकांचा वेश चढवला जातो. हातात तलवार, पाठीशी ढाल बांधून हे सारे सैनिक मैदानात उभे राहातात.
लढाईचा सीनचे शूटिंग सुरु करण्याआधी दिग्दर्शक या गर्दीतून एक फेरफटका मारतो.
सैनिकांनी सज्ज अवस्थेत कसं उभं राहायचं, तेही अगोदरच सांगून ठेवलेलं असतं.
अचानक दिग्दर्शकाची नजर एका सैनिकावर पडते.
खांदे पाडून, छाती आत ओढून पोक काढत उभा असलेेला तो सैनिक पाहून दिग्दर्शक वैतागतो. पण राग आवरतो. त्याच्या समोर उभा राहातो, आणि म्हणतो,
'अरे, या मर्द राजाचा शूर शिपाई आहेस ना तू?... मग असा पोक काढून उभा का?... चांगलं छाती पुढे काढून ताठ मानेनं उभं रहायचं. समजलं? '...
तो सैनिक दिग्दर्शकाकडे पाहात नुसती नकारार्थी मान हलवतो.
दिग्दर्शकाला राग येत असतो पण तो सावरतो. नजरेनंच सैनिकाला का, म्हणून विचारतो.
...'दीडशे रुपयात एवढीच छाती पुढे येणार साहेब! ' तो तरुण करारीपणानं उत्तरतो.
दिग्दर्शक क्षणात वरमतो.
मग आणखी शंभर रुपये वाढवून द्यायचॆ ठरतं.
... आणि सगळे सैनिक ताठ मानेनं, छाती पुढे काढून युद्धाला सज्ज होतात!

..... अलीकडे अनेकजण मान पाडून, छाती आत घेऊन का वावरताना दिसतात, त्याचाही उलगडा झाला!!!

1 comment:

Bharatiya Yuva said...

Connect Your Marathi Blog to MarathiBlogs.in And Increase Marathi Visitors.
Buy Marathi Books Online from www.marathiboli.com