Saturday, August 9, 2014

फ्रेडशिप डे' चा विजय sss सो!




गण्या, माझा लंगोटी यार!! 

यंदा दहा दिवस अगोदर मला गण्याची आठवण आली... 
नक्की आठवत नाहीये, पण गेली जवळपास 40 वर्षं, मला या वेळी नेहमी गण्याची आठवण येतेच! 
निमित्त असतं, 15 ऑगस्टचं! 
.... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. 
कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही 
म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली मस्त शिरशिरी त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवली!
... ती अजूनही, इतक्या वर्षांनंतरही आठवतेय!
पाऊस ओसरला की मग घरी जाऊ असं ठरवून आम्ही कितीतरी वेळ शेडमध्येच उभे होतो. शेवटी निघालो... भिजतच!
घरी पोचलो तेव्हा चिंबचिंब होतो. मस्त वाटलं. कोकणातला पहिला पाऊस मी भरभरून अंगावर घेतला होता. तरी समाधान नव्हतं.
आई स्वैपाकघरात गेली, आणि मी खिडकीतून हात बाहेर काढून पागोळ्या झेलत बसलो.
असा पाऊस मी पहिल्यांदाच पाहिला होता...
तळव्यावर पडणाऱ्या पागोळ्यांचा तो पहिलावहिला गुदगुल्या स्पर्श अजूनही मी मनात जपून ठेवलाय...
कोकणातल्या पावसाशी त्या दिवशी पहिली ओळख झाली!
रात्री झोपलो, तरीही कानाशी पाऊसझडींचा तो ताशा तडतडतच होता. मस्तपैकी!
सकाळी उठलो, तेव्हा आई मागीलदारी कुणाशी तरी बोलत होती.
बहुधा, धुणंभांडीवाली बाई!
मी उठून मागे गेलो.
त्या बाईचं बोट धरून एक मुलगा उभा होता.
मी तिथं गेलो, अन तो माझ्याकडे बघून हसला. मस्त वाटलं.
मीपण हसलो, आणि एकमेकांचं नाव कळायच्या आधीच आमची दोस्ती झाली!!
... तोच हा गण्या!
कोकणातल्या गावात गेल्यानंतर झालेला माझा पहिला मित्र!
आमच्याकडे धुणंभांडी करणाऱ्या राधेचा मुलगा!
...मग माझं नाव शाळेत घातलं.
शाळेतला पहिला दिवस!
मी घाबरतच वर्गात शिरलो, आणि समोर बघितलं.
माझी भीती पळाली!
एका रांगेत मला गण्या दिसला.
माझ्याकडे बघून, मस्त हसला.
मी लगेचच त्याच्या रांगेत घुसलो.
गण्यानं मागच्या मुलाला दटावलं, मागे व्हायला सांगितल, तेव्हा त्याच्या आवाजातली जरब मलाही जाणवली.
ते पोरगं निमूटपणे बाजूला झालं होतं...
गण्या आमच्या वर्गातला दादा आहे, हे मला लगेचच जाणवलं होतं.
मी जवळ जाताच गण्या उठला! खाली अंथरलेलं गोणपाट त्यानं आणखी उलगडून मोठं केलं, आणि मला बसायची खूण करून तो मस्तपैकी हसला.
माझं दडपण एव्हाना पळालं होतं.
गण्या माझा मित्र झाला होता.
आमच्या घरी काम करणाऱ्या राधेचा गण्या..
मला सांभाळायची सारी जबाबदारी आपल्यावर आहे, असं समजून त्या दिवशीपासून गण्या मला जपू लागला.
सावलीसारखा सोबत राहू लागला!
शनिवारी आम्हाला वर्ग सारवायला लागायचा.
शाळेत गेलं की लगेच बादल्या घेऊन शेण गोळा करायला मुलं बाहेर पडायची.
मी अर्थातच, गण्याबरोबर असायचो.
गण्यानं मला कधीच शेणात हात घालू दिलाच नाही!
... आमच्या गल्लीतल्या, आमच्या वयाच्या मुलांमध्ये गण्या दादा होता, हे मला लक्षात आलं आणि मी बिन्धास्त झालो...
चौथीत असताना गण्याच्या दप्तरात तंबाखूची पुडी असायची.
मी दामटलं म्हणून एकदोन दिवस गण्यानं तंबाखू सोडला.
पुन्हा पुडी दिसली, तेव्हा त्यानं केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघितलं, आणि मी पाघळून त्याला माफ केलं.
गण्याचा नेम अफलातून होता.
पावसाळ्यात, रस्त्याकडेच्या डबक्यात, पिवळेजर्द भादूर, -बेडूक - डरावडराव करायचे. ते 'डबल डेकर' बेडूक बरोब्बर हेरून गण्या त्यांचा कोथळा काढायचा.... एका दगडात!
.... गण्याच्या बापाचं पानाचं दुकान होतं.
पानाची गादी!
खूपदा त्याला गादीवर बसायला लागायचं. कधीतरी मी तिथं जायचो.
पानं मोजताना नाच करणारी गण्याची बोटं बघताना खूप मजा वाटायची.
गण्या पानं मोजतमोजत माझ्या डोळ्यात पाहात हसत असायचा!
दरोज एकत्र शाळेत जायचा आमचा नेम होता. गण्या जणू माझा शाळेतला रक्षक होता. कुणाची वाकड्या नजरेनं बघायची हिंमत नसायची.
गण्याला कळलं तर खरं नाही ही भीती प्रत्येकाला असायची.
...
असेच दिवस जात होते.
गण्या आणि माझी मैत्री, शब्दांच्या पलीकडली घट्टघट्ट होती.
... त्या 15 ऑगस्टला प्रभातफेरीसाठी आलंच पाहिजे असा फतवा हेडमास्तरांनी काढला होता.
मी तयारी केली. कपडे धुवून ठेवलेलेच होते.
सकाळी आवरून मी बाहेर पडलो.
गण्या नेहमी मला बोलवायला यायचा.
त्या दिवशी तो आलाच नाही.
मग मीच त्याला बोलवायला गेलो.
गण्या आंघोळ करून बसला होता.... पण प्रभातफेरीला येणार नव्हता.
मी कारण विचारलं.
त्याच्याकडे पांढरा शर्ट नव्हता.
आतून राधेनं, त्याच्या आईनं मला सांगितलं...
मी सुन्न!
अचानक माझ्या डोक्यात कल्पना चमकली.
दप्तरातली रेनकोटची घडी विस्कटून मी रेनकोट गण्याच्या अंगावर घातला, आणि चल म्हणालो...
गण्या जाम खुश होता!
रेनकोटच्या आत उघडा असलेला गण्या, स्वातंत्र्य दिनाचा विजयसो... जोषात घोषणा देत होता...
... तेव्हापासून दर वर्षी, 15 ऑगस्टला मला गण्याची आठवण येते.
नंतर गण्यानं शाळा सोडली.
त्याचा बाप दारूत बुडून मेला.
गण्या पानाच्या गादीवर बसू लागला
राधा, त्याची आई, धुणीभांडी करतच होती.
पुढे गण्यालाही दारूचं व्यसन लागलं.
मी कधी गावाला गेलो, की मुद्दाम गण्याच्या गादीवर जायचो. पण गण्या बोलत नसे. तोंडाला वास यायचा म्हणून!
नंतर कधीतरी कळलं, गण्या गेला.
दारू पिऊन पिऊन, खंगून मेला...
मला मात्र, दर वर्शी तो आठवतो.
अगदी शोजारी असल्यासारखा!
आम्ही शाळेत असताना एक गोणपाटाची बैठक शेअर करायचो ना!...

1 comment:

Anonymous said...

फारच छान लिहिलं आहे. माझेही अगणित मित्र होते बालपणीचे. त्यांच्या छोट्या छोट्या आठवणी दडल्या आहेत मनाच्या खोल कोपऱ्यात कोठेतरी.....