Sunday, March 29, 2020

आठवावा देव...

मी फारसा श्रद्धाळू नाही. पण श्रद्धाळूंच्या भावनांचा प्रामाणिक आदर करतो. कारण स्वत:स नास्तिक, अश्रद्ध वगैरे अभिमानाने म्हणविणाऱ्यांच्या मनातदेखील कुठेतरी अशाच कसल्याशा भावनांचा ओला कोपरा अस्तित्वात असतो, आणि एखाद्या हळव्या क्षणी त्या कोपऱ्याचा कप्पा उघडतो, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नास्तिकतेवर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण करणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर आहे.
मध्यंतरी, जेव्हा अंधश्रद्धांच्या विरोधातील चळवळ काहीशी जोरात होती, तेव्हा, अशा प्रसंगात नेमकी कोणाची बाजू घ्यायची या संभ्रमात राजकीय नेते सापडले होते. कारण अशा प्रश्नांवर भूमिका घेताना लोकांच्या भावनांचा विचार करावाच लागतो. ती राजकीय अपरिहार्यता असते. म्हणूनच, ‘गणपती दूध पितो’ अशी आवई उठली तेव्हा, ‘आमचा गणपतीही दूध प्याला’ असे तत्परतेने सांगून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आवईलाही अधिकृत करून टाकले होते, तर तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र ही आवई झुरळासारखी झटकून टाकली होती. त्या त्या वेळी त्यांनी घेतलेल्या दोन्ही भूमिकांमागील वास्तव मात्र, ‘लोकभावना जपणे’ हेच होते.
अशाच काळात, आणखी एका ‘राज’कीय नेत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेतली. नवग्रहांचे अंगठे, गंडेदोरे, अंगारेधुपारे ही अंधश्रद्धा असून ती झुगारली पाहिजे असे सांगत या नेत्याने आपल्या बोटांतील ‘ग्रहांच्या’ अंगठ्या समुद्रात ‘विसर्जित’ केल्या होत्या. त्या काढून ‘फेकून’ दिल्या नव्हत्या, हे विशेष होते.
तर, श्रद्धा, आस्तिकता हा बऱ्याचदा ‘भूमिका’ म्हणून जाहीरपणे मांडण्याचा मुद्दा असल्याने, कल बघून त्या मांडणे असाच अनेकदा कल असतो, असे वारंवार दिसले आहे. लोकांना कोणती भूमिका पटेल याचा विचार करून तशी भूमिका घेणे अनेक राजकारणी नेते श्रेयस्कर मानू लागले तेव्हाच मंदिर-मस्जिदचे मुद्दे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले होते.
आता राजकारणाने काहीशी कलाटणी घेतली आहे. तेव्हा ज्यांना लोकांच्या श्रद्धेच्या राजकारणात ‘राम’ वाटत होता, त्यांना आता मात्र, तेव्हा ती चूकच होती असे वाटू लागले आहे. ‘ती कामगिरी आमची असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे’ असे उजळपणे सांगणाऱ्यांच्या अनुयायांना, ‘संकटकाळी देवांनी देवळातून पळ काढला’ अशी भाषा करणे ही गरज ठरू लागली.
त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या भावनांचा मुद्दा असल्याने, चावडीचावडीवर, पारावर, अंगणात, ओटीवर आणि, माजघरातही त्याचे पडसाद उमटत आहेत.
अशीच एक प्रतिक्रिया कानावर आली. बोलकी वाटली.
‘देव आठवावा अशी स्थिती ओढवलेली नाही ही देवाचीच कृपा!’

No comments: