Friday, June 17, 2022

हिमालय आणि समुद्र

 

चि. मोरूस अनेक आशिर्वाद
मागे तुला पाठविलेल्या ई-पत्रावर तुझ्याकडून कोणतेच उत्तर आले नाही तेव्हाच तू त्यापेक्षा महत्त्वाच्या मोहिमेत व्यग्र असावास याचा मला अंदाज आला होता. म्हणून मीदेखील थोडे दिवस पत्रव्यवहाराला विश्रांती द्यावी असा विचार केला. मोरू, मला माहीत आहे की आजकाल पत्र वगैरे लिहिणे हा प्रकार तसा आऊटडेटेडच झाला असून व्हिडियो चॅट करून एकमेकांशी गप्पा मारून मन मोकळे करता येते. पण मला आपलं पत्र लिहिणं आवडत असल्याने मी काही माझी सवय मोडणार नाही. मध्यंतरी तू उत्तराखंडाच्या सहलीवर गेला होतास ते समजले. असे अधूनमधून देशातील इतर प्रांत पाहणे चांगलेच असते. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि विविधतेतील एकतेचेही दर्शन होते. तुला तसा काही अनुभव असल्यास प्रवास वर्णनाचे एखादे सविस्तर पत्र लिहून कळव. निसर्गाचे सौंदर्य अनुभवायलाही एक नजर असावी लागते. मागे एकदा आमच्या शेजारच्या नायगावकर काकांचा कुणीतरी मित्र निसर्ग पहायला कोकणात गेला होता, तर बसमधून जात असताना सगळीकडे दाट झाडी आडवी येत असल्याने निसर्ग नीट पाहाताच आला नाही असे त्याने काकांना सांगितल्यावर वाईट वाटले होते. तुला तिथला निसर्ग नीट पाहता आला असेल अशी आशा आहे. तिथे तू काढलेले फोटो मला आमच्या काशीने तुझ्या फेसबुक पेजवर उघडून दाखविले आणि खूप बरे वाटले. मोरू, काय गंमत आहे ना, की तिकडची माणसं हिमालयाच्या कुशीत राहातात, तर त्यांना इकडचा समुद्र पहायची ओढ लागते, आणि आपल्या लोकांना हिमालयाची भव्यता खुणावते. त्या निसर्गवेडापायी आपण तिकडे सहली काढतो, सफर करतो, आणि तिकडे कायम हिमालयाच्या सावलीत राहणाऱ्या लोकांना आपल्या समुद्राची गाज खुणावते. बाकी आपलं राज्य आणि उत्तराखंड सारखेच सुंदर आहेत असे आपले राज्यपाल परवा म्हणाले तेव्हा आपल्या राज्याच्या अभिमानाने माझा ऊर भरून आला होता. तरीही, उत्तराखंडासारखा हिमालय आपल्याकडे कुठे आहे असा विचार माझ्या मनात येत असतानाच राज्यपालांनीही तेव्हा तोच विचार बोलून दाखवला, आणि लगेच माझ्या मनात समुद्राच्या लाटा उचंबळून आल्या. पूर्वी असं म्हणायचे की, उंच हिमालय तुमचा अमुचा केवळ सह्यकडा… तर, तेव्हा हिमालयाच्या मदतीला नेहमी सह्याद्री धावून जायचा म्हणून तसे म्हणायची प्रथा पडली असली तरी आता हिमालयाच्या सौंदर्याची बरोबरी आपल्याकडच्या समुद्राच्या सौंदर्याशी झालेली पाहून बरे वाटले. तसेही अलीकडे आपल्या सह्याद्रीवर हिमालयाच्या मदतीला धावून जायची वेळ बऱ्याच वर्षात आलेली नसल्याने समुद्र आणि हिमालयाचीच तुलना योग्य असे मी मनाशी म्हणत असतानाच, आपल्या मनातील विचारच राज्यपालांनी बोलून दाखविल्याचा आनंदही वाटला. पण थोर लोकांचे विचार सारखेच असतात अशी काहीतरी इंग्रजी म्हण असल्याने त्या योगायोगाचे काही विशेष वाटले नाही. त्यामुळे असो… तुझ्या उत्तराखंडच्या फोटोवरून हे सगळे आठवले, एवढेच! तर मोरू, निसर्ग पाहाण्यासाठी आपण तिकडे जातो तसे तिकडची माणसंही निसर्ग पाहण्यासाठी इकडे येत असावीत. राज्यपालांची इकडे यायची फार इच्छा नव्हती असे त्यांनीच परवा सांगितले. पण हिमालयाच्या कुशीत वाढलेला माणूस आता समुद्राच्या सान्निध्यात राहातोय आणि इथल्या वातावरणात दूध साखरेसारखा विरघळून गेला हे पाहून बरे वाटले.
दूध साखरेवरून आठवले. हल्ली आम्ही अमूलचंच दूध आणतो. ते चांगलं असतं, असं म्हणतात. शिवाय पूरा इंडिया अमूल दूध पितो असंही जाहिरातीत ऐकलंय. परवा मी टीव्हीवर बातम्या पाहात बसलो होतो तेव्हाच आमच्या सौभाग्यवतीने समोर अमूलच्या दुधाचा ग्लास आणून ठेवला, आणि शेजारी साखरेचा डबा! ही साखर आपल्या राज्यातल्या कुठल्याशा सहकारी कारखान्यातच तयार झाली असली पाहिजे. ते मला का वाटतं ते मी नंतर कधीतरी सांगेन. तर, गुजरातमधल्या अमूलच्या दुधात आपल्याकडच्या कारखान्यात तयार झालेली साखर घालून मी चमच्याने ते ढवळले, तर अशी फक्कड चव लागली की सांगता सोय नाही. मी दूध पीत असतानाच समोर आपले मुख्यमंत्री गुजरात आणि महाराष्ट्राला दूधसाखरेची उपमा देत होते. तर हाही एक योगायोगच म्हणायचा. मोठी माणसं सारखाच विचार करतात हेच मला यावरून तुला सुचवावेसे वाटते. म्हणून, कधीतरी माझ्या पत्राला तू उत्तर द्यावेस, एवढीच अपेक्षा आहे.
कळावे, काय म्हणायचंय हे तुला कळलं असेलच!
तुझा
दादू
पुण्य नगरी १७-०६

No comments: