Friday, July 1, 2022

सत्ता-संघटनेच्या अस्तित्वाचा संघर्ष

 

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या वाटचालीचे सक्रीय साक्षीदार असलेले माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांच्या वाटचालीवर एक प्रदीर्घ प्रबंध लिहिला. ‘शिवसेनाः काल, आज आणि उद्या’ या नावाने लिहिलेल्या सुमारे एक हजार पानांच्या या प्रबंधात, शिवसेनेचा भूतकाळ आणि सन २००७ पर्यंतचा सखोल तपशील मांडणाऱ्या जोशी यांनी शिवसेनेच्या भविष्यकाळावरचे भाष्य मात्र खुबीने टाळले. त्यावर त्यांनी समकालीन मान्यवरांची मते मांडली. जोशी यांनी २००७ नंतरच्या, म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतरच्या भविष्याचे भाकित जाणीवपूर्वक टाळले असावे, असे दिसते. त्या प्रबंधग्रंथातील संदर्भ पाहता, आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांमध्ये मोठे अंतर असल्याचे आजच्या घडामोडींवरून पडताळता येते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू झालेली एक ज्वलंत चळवळ, गतिमान संघटना, आणि प्रभावी राजकीय पक्ष अशा विविध रूपांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारा हा पक्ष सध्या एका वैचारिक संभ्रमावस्थेत सापडला असून सत्ता हेच या संभ्रमाचे कारण आहे, यात कोणाचेही दुमत असणार नाही. ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे’, असे सांगत, १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखरतेने हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यानंतरच्या कायदेशीर कारवाईला प्रचंड विश्वासाने तोंड देऊन हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात रुजविला आणि नंतरच्या राजकारणात हाच मुद्दा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी राहण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली, त्याच हिंदुत्वावरून आज शिवसेनेत उभी फूट पडण्याची वेळ आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे हिंदू खोमेनी आहेत’, अशी टीका तेव्हा करणारे शरद पवार हे आजच्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत संकटमोचक बनले आहेत, आणि पवार यांच्या राजनीतीतूनच सत्ता आणि संघटना वाचविता येईल, असा सूर शिवसेनेच्या पहिल्या फळीतून उमटू लागला आहे. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते हे खरे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये निवडणुकीत केलेली भाजपसोबतची नैसर्गिक युती आणि या युतीला मिळालेला जनादेश धुडकावून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी अवैधानिक ठरली नाही, तरी ती अनैसर्गिक होती, हे स्पष्ट आहे. या आघाडीनंतर मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातील उद्धव ठाकरे यांचा सूर आणि गेल्या काही महिन्यांत उमटू लागलेला हिंदुत्वाचा सूर पाहता, ही कसरतही स्पष्ट जाणवते. ‘धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली ही शिवसेनेची चूक होती’, अशी स्पष्ट कबुली विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिली, तेव्हाच खरे तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कडवट विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांच्या मनात पक्षाच्या नव्या वाटचालीविषयी शंकेची पाल चुकचुकली होती. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या संघर्षावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची भीतीही त्यांच्या मनात उमटली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा वाद संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेने सावधपणे हिंदुत्वाचा उच्चार करण्यास सुरुवात केली, पण सरकार या नात्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या असंख्य प्रसंगातील भूमिका मात्र काहीशी तटस्थतेचीच राहिली. शिवसैनिकांच्या मनात याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या, पण ते व्यक्त होत नव्हते. ‘आमचे हिंदुत्व गदाधारी हिंदुत्व आहे’, अशी टाळीबाज वाक्ये सभांमधून फेकली जात होती, पण पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडासारख्या घटना घडल्यानंतर, बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाचे संस्कार झालेल्या शिवसैनिकाच्या मनात सत्ताधारी शिवसेनेकडून ज्या कृतीची अपेक्षा होती, तसे घडलेच नाही. आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही भूमिकांशी तडजोड करावी लागते. मात्र, हिंदुत्व हा ज्यांचा श्वास आहे, त्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या भूमिकेशीच तडजोड केल्याचे दिसू लागल्यावर अस्वस्थ शिवसैनिकांची चलबिचल सुरू झाली. गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भरविल्या गेलेल्या अजान स्पर्धा, हिंदु सण साजरे करण्यावरील बंधने आणि अन्य धर्मांच्या सणांबाबत घेतली गेलेली भूमिका, राम मंदिराच्या उभारणीकाळात शिवसेनेने उपस्थित केलेल्या शंका, कोरोनाकाळात हिंदु प्रार्थनास्थळांवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या कुटुंबांवर ओढवलेली आर्थिक ओढाताण, अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेबांचा शिवसैनिक ठाकरे सरकारकडे अपेक्षेने पाहात होता. सध्याचे बंड हा अशाच अस्वस्थतेचा उद्रेक असावा.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत या नाराजीचा स्पष्ट इशारा शिवसेनेला मिळाला होता. विधानसभेत भाजपकडे असलेल्या ११३ मतांपेक्षा दहा मते जास्त मिळवून भाजपने राज्यसभेचे तीनही उमेदवार निवडून आणले, तेव्हाच सत्ताधारी आघाडीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत तर शिवसेनेतील नाराजांनी नेतृत्वाला थेट फुटीचा इशारा दिला. भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकही जादा मत नसतानाही सेनेच्याच एका उमेदवाराला पराभूत करून भाजपने बंडाची बीजे रुजविली. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणावर विसंबून शिवसेनेच्या नेतृत्वाने तिकडेही दुर्लक्ष केले. विधानसभेतील बहुमताच्या संख्याबळाचा प्रचंड विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांना भोवला. या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेसा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बंडाची आखणी पूर्ण झाली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून २१ जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावातडेही पुरेशा गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. कदाचित यापुढे शिवसेनेचे खरे दावेदार कोण या मुद्द्यावरून जेव्हा एकनाथ शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू होईल, तेव्हा ठाकरे गटाच्या बेफिकीरीचे परिणाम समोर येऊ लागतील.
या काळात सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडून असलेली शिवसैनिकाची अपेक्षा यांत अंतर पडल्यामुळे सध्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा मोठा पेच उभा राहिला आहे. मुख्य म्हणजे, ज्यांनी बाळासाहेबांवर ‘हिंदू खोमेनी’ म्हणून टीका केली, त्या शरद पवार यांच्याकडेच आज शिवसेना संकटमोचक म्हणून पाहते आहे, हा काळाने घेतलेला विचित्र बदला असल्याची भावना आज बंडातून व्यक्त झाली आहे.

No comments: