Friday, July 1, 2022

अप्रकाशित महाभारत...

 

अज्ञातवासात असताना पांडवांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केलेल्या त्या देवळाविषयी आम्हाला प्रचंड उत्सुकता होती. त्यापोटीच एकदा आम्ही तिरिमिरीत पाठीस सॅक लावली आणि रातराणी पकडून पहाटेच्या सुमारास त्या आडगावात पोहोचलो. सूर्योदय होण्यापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले नाही तर पांडवांच्या अज्ञातवासातील ठावठिकाणा जगजाहीर होईल, असे गुरुदेवांनी सांगितलेले असल्याने भीम, अर्जुनासह सर्वांनीच आपली शक्ती पणाला लावली होती. कळसाचा शेवटचा दगड बसवून झाला, आणि सभागारातील दगडी परातीखाली एक वस्तू लपवून भीमाने हात झटकले, तेव्हा त्याच्या बंधूंना शंका आलीच होती. तर, त्या परातीखालचे गूढ शोधण्याचा अनेकांनी अनेकवार प्रयत्न केला होता अशी दंतकथा असल्याने आम्हालाही तीच उत्सुकता होती. पहाटेपूर्वीच तेथे पोहोचल्याने आज ते शक्य होणार होते. टीममधल्या एका भीमकाय सहकाऱ्याने त्या प्रचंड दगडी परातीस हात घातला, आणि आश्चर्य म्हणजे, पिंजऱ्यातून मुक्ती मिळताच, मोक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोपटाच्या रूपातील राक्षसाने सदाचारी मनुष्यरूप घेऊन स्वर्गात प्रयाण करावे, त्याप्रमाणे त्या महाकाय परातीने आपल्याला सहजपणे उचलू दिले.
आतील दृश्य अंगावर आनंदाचा शहारा आणणारे होते. एका पुराणकालीन फाईलसदृश आवरणामध्ये निगुतीने गुंडाळून ठेवलेली काही भूर्जपत्रे आम्हांस दिसली. आता ती बाहेर काढून त्यावरील अगम्य लिपीचा अर्थ लावण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. आम्ही अनेक भाषातज्ज्ञांचे उंबरठे झिजविले, काहींना स्क्रीनशॉटस पाठविले. देवीदेवतांना आवाहन केले, आणि अखेर एक देवी प्रसन्न झाली. तिने आम्हास त्या मजकुराचा अर्थ उलगडून सांगितला...
... ‘महाभारत’ म्हणून जे महाकाव्य आपण वाचतो, ऐकतो, सांगतो, त्याचाच एक अप्रकाशित भाग आमच्या हाती लागला होता.
“तिकडे कुरुक्षेत्रावर रणकंदन माजले असताना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने धृतराष्ट्र उद्विग्न होऊन महाली बसला असताना त्याची मनोवस्था पाहून कळवळलेल्या संजयाने त्याचे मन रिझविण्याचा निर्णय घेतला. त्याची मानसिक अवस्था काहीशी खराब असल्याने त्याच्यासमोर काही गीतमाला सादर करण्याचे त्याने ठरविले, आणि राजगायकांना त्यांच्या वाद्यांसह निमंत्रण धाडले. धृतराष्ट्राचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या आसनाशेजारच्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहताना त्याच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. जणू आषाढाच्या पहिल्या दिवशीच मेघांनी धरतीवर समरसून बरसावे तसे त्याच्या डोळ्यातून भरभरून वाहणारे अश्रू पाहून संजयास भडभडून आले आणि त्याने काही केविलवाणी गाणी ऐकविण्याची सूचना राजगायकास केली. तबला, तंबोऱ्याने सूर जुळवून घेतले, आणि राजगायकाने संवादिनीवर हलकेच बोटे फिरविली...”
(आज आपण काही गीते समकालीन कवींची असल्याचे मानतो, पण त्याला धृतराष्ट्रकालीन पुराणकथांचा आधार आहे, हे आम्हास ती अगम्य लिपी उलगडताना जाणवले.)
तर, राजगायकाने सूर धरला, आणि पहिलेच गाणे आळविण्यास सुरुवात केली...
“भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...”
राजगायक गाणे गात होता, आणि धृतराष्ट्राच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा पाझरत होत्या. बाजूला बसलेली राणीही त्या क्षणी हळवी होऊन केविलवाणी झाली. मग धृतराष्ट्राने हलकेच चाचपडत अंदाज घेऊन तिचा हात हाती घेतला, आणि तिच्या दिशेने चेहरा फिरवून तो कुजबुजला, “मी पाहू शकत नसलो, तरी मला तुझी भाषा समजते आहे. माझ्या नशिबासोबतच तुझ्या या कोमल हातावरील भविष्यरेषा बोलणार हे विधिलिखितच आहे...”
राणीने हलकेच धृतराष्ट्राचा हात थोपटला. तिच्या पट्टी बांधलेल्या डोळ्यांतूनही अश्रुधारा वाहू लागल्या...
गायक गातच होता... “उद्या पहाटे कुठल्या वाटा, दुज्या गावचा वारा...”
धृतराष्ट्र पुन्हा कळवळला. त्याने बाजूच्या रिकाम्या, वंशपरंपरेने राजवाड्यात असलेल्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहिले, आणि तो पुन्हा राणीच्या कानाशी कुजबुजला, “आपण हे जीव असे का जोडले?... आणि तरीही फुलण्याआधीच हे फूल दैवाने असे का बरे तोडले?...”
या प्रश्नाला राणीकडे उत्तर नव्हते. ती अधिकच केविलवाणी झाली होती.
गाणे संपत आले होते. राजगायकाने शेवटचे कडवे आळविण्यास सुरुवात केली, आणि अखेरची ओळ पुन्हा उच्चारली...
“वाऱ्यावरती विरून गेली, एक उदास विराणी...”
धृतराष्ट्राचे डोळे पाझरतच होते, आणि बाहेर आषाढाचा पाऊस अधिकच जोमाने बरसू लागला होता.
...त्या अगम्य लिपीवरील अनोळखी मजकुराचे शब्द जसेच्या तसे असेच नव्हते, पण त्यामागील भाव याच आशयाचे होते हे आम्हांस जाणवले, आणि हे भूर्जपत्र भीमाने का लपवून ठेवले असावे ही शंका आम्हास छळू लागली.
कदाचित, धृतराष्ट्राच्या हळव्या व्यक्तिमत्वाचा हा पदर त्याला भविष्यातील जगासमोर यावा अशी त्याची इच्छा नसावी, असा तात्पुरता निष्कर्ष आम्ही काढला, आणि महाभारतातील अप्रकाशित भाग हाती लागल्याच्या आनंदाने आरोळी ठोकून आम्ही त्याचे स्क्रीनशॉट पेपरवाल्यांना पाठवून दिले.
आज सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू असल्याचे टीव्हीवर पाहात आम्ही त्या आडगावातल्या मंदिराशेजारच्या चहाच्या टपरीवर वाफाळता चहा घेत बसलो आहोत...
पुण्य नगरी ०१/०७

No comments: