Monday, August 16, 2021

लोकनेता!

 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. त्याच्या भाषणात कधी काव्य दिसायचे, कधी राजकारण दिसायचे. कधी कनवाळू ममतेची झाक दिसायची तर कधी धारदार कठोरपणा दिसायचा. विद्वत्ता हा तर त्यांच्या वक्तृत्वाचा गाभाच होता. त्यांच्याही वक्तृत्वात शब्दांची सुंदर अनुप्रासयुक्त गुंफण असायची. ‘गंभीर’पणातही विश्वसनीय व आश्वस्त ‘खंबीर’पणा भरलेला असायचा. वाजपेयींच्या अशा बहुपेडी वक्तृत्वाला व्यासपीठाचे मात्र पुरेपूर भान असायचे. कोणत्या मंचावर वक्तृत्वाचा कोणता पदर अलगदपणे उलगडायचा याची त्यांना नेमकी जाण असायची. म्हणूनच, आपल्याला काय बोलायचे आहे यापेक्षा, काय बोलले म्हणजे श्रोत्यांना ते आपलेसे वाटेल हे ओळखून आपल्या भाषणास नेमकी वळणे देत आपले मत श्रोत्यांच्या गळी उतरविण्याचे कसब त्यांच्या शैलीत होते. म्हणूनच वाजपेयी हे यशस्वी व पक्षभेदांपलीकडचा ‘लोकनेता’ ठरले. त्यांच्या नेतृत्वाची कमान उंचावण्यात त्यांच्या विचारवंत वक्तृत्वाचा मोठा हिस्सा होता.

मात्र, ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या वक्तृत्वास प्रशासकीय शिष्टाचाराची बंधने आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी काय बोलायचे, आणि कितीही मनात असले, तरीही काय बोलायचे नाही, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयातील संबंधित यंत्रणेकडे गेला, आणि ‘पंतप्रधान वाजपेयी’ व ‘लोकनेता वाजपेयी’ यांच्यातील संघर्षात वाजपेयी नावाचा संवेदनशील कवीची, वक्त्याची आणि ‘माणसा’ची घुसमट होऊ लागली. एकदा अनौपचारिक गप्पांत त्यांची ही घुसमट त्यांनी बोलूनही दाखविली आहे.
पण पदाच्या जबाबदारीचे भान त्याहूनही कठोर आहे हे ओळखून वाजपेयींनी त्या जबाबदारीला महत्व दिले.
... म्हणून, अटलबिहारी वाजपेयी हे ‘लोकनेता’च राहिले!!
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
🙏

Tuesday, August 10, 2021

खाण्याची 'श्रावण'संहिता !

 
बऱ्याच दिवसांपासून राजेंच्या मनात एक विचार घोळत होता. पण त्यावर निर्णय घ्यावा की नाही यावर त्यांचा निर्णय होत नव्हता. त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याशी विचारविनिमय केला, आपल्या मनातील विचार त्याच्याकडे बोलून दाखविला, आणि काय करावे हे सुचविण्यासही सुचविले. मग राजेंचा सहकारीही त्यावर विचार करू लागला. राजेंना कोणता सल्ला द्यावा हे त्यालाही कळत नव्हते. त्या रात्री, गटारीच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र जमले असताना, त्याच्या मनातील त्या विचाराने उचल खाल्ली, आणि शेंगदाण्याचा बकाणा तोंडात कोंबून त्याने अडखळत बोलायला सुरुवात केली. सारे मित्र थबकले. आपले काम थांबवून त्यांनी मित्राचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि राजेंनी दिलेल्या अवघड कामगिरीचे वर्णन कसेबसे करून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने आपल्या मित्रांनाही निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. मग गप्पांचा नूरच बदलून गेला. प्रत्येकजण उपाय शोधू लागला. विचारांच्या गोंधळात समोरचा सारा माल कधी फस्त झाला तेही कुणालाच कळले नाही. अखेर राजेंचा विश्वासू सहकारी गोंधळला. थोडेसे रागावूनच त्याने आपल्या मित्रांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. एवढा साधा प्रश्नदेखील तुम्हाला सोडविता येत नसेल तर आपण मित्र म्हणून राहायच्या लायकीचे नाही, असेही त्याने अडखळत मित्रांना सुनावले, आणि अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत एका मित्राने बोट वर केले. तो आता काहीतरी बोलणार हे ओळखून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सर्वांना हातानेच शांत राहण्याची खूण केली आणि डोळ्यांच्या इशाऱ्यानेच त्या मित्रास बोलण्याची परवानगी दिली. समोरच्या रिकाम्या प्लेटकडे पाहून उलट्या मनगटाने ओठ पुसत तो मित्र बोलू लागला, "उद्याच्या उद्या, सर्वांची बैठक बोलावून राजेंनी त्या विचाराची अंमलबजावणी केली पाहिजे. श्रावण सुरू होत असल्याने, खाण्यावर बंधने घातली पाहिजेत. खरे तर, श्रावण महिन्यात कडकडीत उपवास करायचे असतात, पण राजेंच्या सहकाऱ्यांना खाण्याची सवय असल्याने महिनाभर उपवास पाळणे शक्य होणार नाही. दुसरे म्हणजे, उपवास करणे हे काही धार्मिक व्रत वगैरे नसून, अति खाण्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना आवर घालणे आवश्यक असते, हे राजेंनी साऱ्या सहकाऱ्यांस पटवून द्यायला हवे. अति खाण्याने अपचन होते, काही वेळा पित्त उसळते, आणि खाल्लेले पचविणे जड जाते. अशा वेळी, उपवास शक्य नसेल, तर, पचायला हलके व सहज जिरवता येईल एवढेच काही खावे. श्रावण महिन्यात सणासुदीच्या निमित्ताने, शक्यतो उपवासच करणे चांगले असते असे म्हणतात. आदल्या दिवशीपर्यंतची खाण्याची सवय मोडल्यास सहकारी नाराज होऊ शकतात. तसेच, अपचन झाल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसल्याने, अपचन होईपर्यंत खाण्याची सवय सहजासहजी मोडताही येत नसते. अलीकडे राजेंच्या अनेक सहकाऱ्यांच्या खाण्याची मोठी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती, आणि कोण किती खातो याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काही सहकाऱ्यांना तर उलटी करावयास लागल्याने, आता तरी खाण्याच्या सवयीवर बंधने घालणे गरजेचे आहे, हे राजेंनी सर्वांस समजावून सांगायला हवे. ज्यांनी भरपूर खाल्ले आहे, त्यांना खाऊ घालणारेच आता त्यांच्या भुकेचे वाभाडे काढू लागल्याने, खाऊ घालणाऱ्याकडे मागणी करताना संयम बाळगणेही गरजेचे झाले आहे. राजेंनी हे सारे आपल्या सहकाऱ्यांस समजावून सांगावे, व किमानपक्षी श्रावण महिन्यात तरी खाण्याची बंधने पाळण्याचे आवाहन करावे"...
मित्राने अर्धवट डोळे उघडून दिलेला हा कानमंत्र ऐकताच राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याचे डोळे खाडकन उघडले, आणि तो कसाबसा उठला. श्रावणात खाण्यासंबंधीची आचारसंहिता सहकाऱ्यांना आखून द्यावी, असा सल्ला राजेंना देण्यासाठी त्याने फोन उचलला. श्रावण सुरू होण्यास काही तासांचाच अवधी उरलेला असल्याने, गटारीचे औचित्य साधून उरलेला हात मारून घ्यावा आणि मगच सर्वांनी श्रावण पाळण्यास सुरुवात करावी, असा तोडगाही सुचविण्याचे त्याने ठरविले. राजेंनी फोन उचलला, आणि या विश्वासू सहकाऱ्याने आपला विचार राजेंसमोर मांडला. राजेंनी मान हलविली, आणि यावर काय निर्णय घ्यावा याचा विचार करत ते पलंगावर पहुडले...

Friday, July 30, 2021

'जंगली’ आणि ‘रानटी’!

 

... आणखी काही दिवसांतच तिच्या पोटातल्या बछड्यांना बाहेरचं जग दिसणार होतं... त्यांच्या जन्माचा सोहळा सुरक्षितपणे साजरा करता यावा म्हणून तिने एक मोक्याची जागाही हेरून ठेवली होती. अरुंद तोंडाची एक अंधारी गुहा... पोटात पिल्लं वाढतायत याची पहिली जाणीव झाली, तेव्हा याच गुहेच्या तोंडाशी लोळण घेत तिने आनंद साजरा केला आणि गुहेच्या अरुंद तोंडातून आत जाऊन पुन्हा एकदा गुहेची पाहणी केली. पिल्लांसाठी याच्यापेक्षा सुरक्षित जागा कोणती नाही याची खात्री करून घेण्यासाठी नंतरही दररोज ठरलेल्या वेळी ती त्या जागेवर यायची. दबक्या, सावध नजरेने आसपासचा कानोसा घ्यायची. परिसरातलं सारं जंगल, स्तब्ध होऊन तिच्या हालचाली न्याहाळत असायचं. झाडाच्या शेंड्यांवरली वानरं विस्फारल्या नजरेनं तिच्या हालचालींवर सावध नजर ठेवून जंगलाला इशारा देणारा एखादाच आवाज उमटवायची, आणि पुढचे पाय ताणून शरीराला लांबलचक आळस देत बेपर्वाईच्या आविर्भावात त्याकडे दुर्लक्ष करून ती गुहेत शिरायची... त्या दिवशीही तसेच झाले. ती आली, तिने आसपास पाहिले. जंगल नेहमीसारखं स्तब्ध होऊन तिच्या आगमनाचं मूक स्वागत करत होतं. मग फार वेळ न दवडता ती गुहेत शिरली. आता पिल्लांच्या जन्माला फार अवधी उरलेला नाही हे बहुधा तिच्या जडावलेल्या देहाला जाणवले होते. आता गुहेतच मुक्काम ठोकावा असा बहुधा तिचा विचार असावा. ती गुहेत शिरली, आणि गुहेतलाच एक कोपरा पकडून तिने अंग पसरले. आता तिला सुरक्षित वाटत होते. आपल्या पिल्लांना येथे कोणताच धोका नाही याचीही तिला खात्री झाली होती. आता पिल्लांचा जन्म होईपर्यंत बाहेरच पडायचं नाही, असंही बहुधा तिने ठरवलं असावं...
... तीच संधी साधून गुहेच्या तोंडाजवळ त्यांनी बांबूंचं जाळं लावलं. तिने कान टवकारले, डरकाळीही फोडली, आणि बाहेर शांतता पसरली. ती पुन्हा निर्धास्त झाली, आणि तिने डोळे मिटले. अचानक काही वेळानंतर ती खडबडून जागी झाली. बाहेर काहीतरी संकट आहे याचा तिच्या तीक्ष्ण नाकांना सुगावा लागला. गुहेचा आतला भाग धुराने भरून गेला होता. पोटातल्या पिल्लांना इजा होऊ नये म्हणून ती जडावलेल्या देहानिशी कशीबशी उठली, आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागली. पण गुहेच्या तोंडाशी आग पसरली होती, आणि गुहेत धूर माजला होता. आता जगणं अवघड आहे हे जाणवून तिने एक अखेरची डरकाळीही फोडली. पण आग आणि धुराने त्या धमकीला जुमानलेच नाही. आता तिला श्वास घेणंही अवघड झालं होतं. पोटातल्या पिल्लांच्या विचाराने ती कासावीस झाली, त्यांना वाचविण्यास आता आपण असमर्थ आहोत याची जाणीव होऊन ती कळवळली, आणि तिने श्वास थांबविला... पुढच्या काही मिनिटांतच तिची हालचालही थंडावली, आणि एका गर्भवतीचा मृत्यू झाला...
यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागातील मुकुटबन नावाच्या जंगलक्षेत्रात दोनतीन महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली... पोटात चार बछडे असलेल्या त्या गरोदर वाघिणीलाही अशाच पद्धतीने माणसांनी ठार मारले होते. मूल होण्यासाठी गरोदर वाघिणीची शिकार करण्याचा अघोरी इलाज कुणीतरी सुचविला आणि त्यानंतर एका वाघिणीची तिच्या गर्भातील बछड्यांसह कोंडी करून हत्या करण्यात आली... तिच्या मृतदेहाचे पंजे कापून नेले, मिशांनाही कात्री लावून रानटी शिकारी पसार झाले...
ही घटना घडली त्याच्या जवळपास तीनचार आठवडे अगोदर, मार्च महिन्यात, देशातील वाघांची संख्या, संरक्षण, संवर्धन, वगैरे मुद्द्यांवर लोकसभेत गंभीर चर्चा झाली होती. वाघ वाचविण्याच्या सरकारी मोहिमा, रानटीपणाने होणाऱ्या वाघांच्या शिकारी आणि माणसापासून स्वतःस वाचविण्याची केविलवाणी धडपड करणारी वाघांची जमात असे एक विसंगत चित्र त्या चर्चेतून अस्पष्टपणे उमटलेही होते. एका बाजूला वाघांच्या अधिवासाची नवनवी क्षेत्रे निर्माण करण्याच्या सरकारी योजनांची माहिती पुढे येत असतानाच, वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूचे आकडे मात्र, वाघांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवत होते. सन २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांत देशात तब्बल ३०३ वाघांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ५५ वाघ एकट्या महाराष्ट्रातील होते.
जंगली वाघांच्या कथा ऐकत आणि ऐकवत माणसाच्या पिढ्या मोठ्या होतात. पण अशा क्रूर शिकारींच्या कहाण्या समोर येऊ लागल्या की, तर क्षुल्लक समजुतींपायी त्यांची शिकार करणारा माणूस तर रानटी आहे, असेच वाटू लागते. निराधार अंधश्रद्धांची शिकार होऊन वाघाला जेव्हा जगाचा निरोप घ्यावा लागतो, तेव्हा जंगली आणि रानटी यांमधील फरकाची रेषा गडदच होते.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करताना, माणसाच्या ‘रानटी’पणाची शिकार ठरलेल्या त्या उमद्या ‘जंगली’ प्राण्यांची क्षमा तरी आपण मागू शकतो ना?...

Monday, June 28, 2021

राष्ट्रनीतीचा पांथस्थ!

 


प्रदीर्घ काळ परकीय राजसत्तेच्या अमलाखाली राहिलेल्या भारतीय समाजाच्या मानसिकतेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात तीन विचारधारा विकसित झाल्या. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतीय जनतेस विकासाची, विद्येची वेगळी दृष्टी प्राप्त झाली असे मानणाऱ्या एका वर्गास ब्रिटीश राजवट ही गुलामगिरी असली तरी विकासाची संधी वाटत होती. ब्रिटीश विचारधारा, त्यांची शिक्षणपद्धती आणि राज्यकारभाराची रीत भारतासारख्या परंपरावादात गुरफटून नव्याच्या शोधापासून अलिप्त राहिलेल्या देशाकरिता अनुकरणीय आहे, असे मानणारा हा वर्ग होता. त्याच दरम्यान, भारताची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची पुनर्स्थापना केल्याखेरीज समाजाचा विकास होणार नाही असे आग्रही प्रतिपादन करणारा दुसरा वर्गही होता. हा वर्ग विदेशी, विशेषतः युरोपीय जीवनशैलीचा कठोर टीकाकार आणि भारतीय संस्कृतीचा कट्टर पुरस्कर्ता होता. या वर्गाने संस्कृतीरक्षणाचा वसा घेऊन स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याचे ध्येय जपले, तर तिसरा एक वर्ग जहाल क्रांतिकारी विचारसरणीतून व आंदोलनात्मक मार्गांनी स्वातंत्र्याचे लढे लढत होता. सहाजिकच, याच काळात अशा तीन वर्गांची राजकीय बैठक तयार होत गेली. डाव्या विचारधारेच्या अनुयायांनी साम्यवादी पक्षांची कास धरली, मध्यममार्गी विचारसरणीचे लोक काँग्रेससोबत राहिले, तर उजव्या, किंवा हिदुत्ववादी विचारांचे पाईक असलेल्यांनी हिंदु महासभेस जवळ केले.
स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सुमारे पाऊणशे वर्षांच्या वाटचालीचे राजकीय दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर असे आढळते की सत्ता आणि प्रतिनिधित्वाच्या स्तरावर या तीन वर्गांमध्ये कमीअधिक अंतर दिसत असले तरी देशाच्या संपूर्ण राजनीतीमध्ये मात्र या विचारांचेच अस्तित्व दखल घेण्याएवढे अधोरेखित होऊन राहिलेले आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी देशातील श्रमिक, मजूर, शेतकरी आणि वंचित समाजास आपल्यासोबत जोडण्याचे प्रयत्न केले, मात्र, देशातील परंपरावर अंधश्रद्धांचा शिक्का मारून त्या नष्ट करण्याच्या प्रयत्नांत डावे पक्ष फारसे यशस्वी ठरले नाहीत. कम्युनिस्ट पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले अनेकजण स्वातंत्र्यानंतर वैचारिक मतभेदांमुळे वेगळ्या चुली मांडून बसले. ब्रिटीश राजसत्तेशी संघर्ष करण्यासाठीच १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसवर पहिल्या दोन दशकांत मध्यममार्गी व समन्वयवादी विचारांचे वर्चस्व होते. पुढे स्वदेशी आंदोलनाच्या रूपाने काँग्रेसला लढ्याचे एक प्रभावी अस्त्र हाती आले, आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेही समाजातील मध्यमवर्गीय, वंचित गटांमध्ये आपले स्थान रुजविले. या देशाच्या परंपरांना धर्माचे अधिष्ठान आहे, देशाच्या समाजावर हिंदु धर्म आणि संस्कृतीचा पगडा आहे, त्यामुळे धार्मिक परंपरा आणि संस्कृतीला अव्हेरून व परंपरा पुसून कोणताच राजकीय पक्ष देश चालवू शकणार नाही, त्यामुळे हिंदुत्वाचे रक्षण करणे व परंपरांचा अभिमान जागृत ठेवणे ही गरज असल्याचे मानणाऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीस पोषक असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळातही सुरू होते. त्यातच, राजकीय लांगूलचालनाच्या प्रयत्नांमुळे देशात मुस्लिम लीगचा प्रभाव वाढू लागला होता. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमुळे हिंदुत्वाचा आणि हिंदु समाजसंघटनाचा विचार देशभर पसरू लागला. या विचारास होणारा राजकीय विरोध आणि त्यातून निर्माण होणारे संघर्षाचे प्रसंग टाळण्याकरिता, राजकीय मंचावर राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधाची धार कमी करणे शक्य होईल या जाणिवेतून राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय संघ धुरिणांनी घेतला, आणि २१ ऑक्टोबर १९५१ या दिवशी दिल्लीतील एका प्रतिनिधी संमेलनात भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचे जाहीर झाले. राजकीय मंचावर हिंदु राष्ट्रवादाचा, म्हणजे उजव्या विचारसरणीचा उदय झाला, आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारास राजकीय दिशा देण्याची जबाबदारी संघाने जनसंघावर सोपविली, आणि हिंदुत्व रक्षणाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघर्ष करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जबाबदारीचे ते आव्हान स्वीकारले. जनसंघाच्या रूपाने राजकीय मंचावर हिंदुत्ववादी राष्ट्रनीतीचा विचार ठळक झाला.
स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उजव्या, हिंदुत्ववादी पक्षांच्या पदरी निराशादायक निकाल पडले. स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षातून प्राप्त झालेल्या जनाधाराचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसला ३६३ जागांवर विजय मिळाला, तर जनसंघ जेमतेम तीन जागा मिळवू शकला. राजकीय लढाई मोठी आहे, जनाधार मिळविण्यासाठी महत्प्रयास करावे लागणार आहेत, याची जाणीव डॉ. मुखर्जींसह सर्वच नेत्यांना होती. मात्र, हिंदुत्वाच्या विचारानेच पक्षाला राजकीय बैठक द्यायची हा निर्धार पक्का होता. १९५३ मध्ये काश्मीर आंदोलनात डॉ. मुखर्जींच्या संशयास्पद मृत्यूमुळे जनसंघास मोठा धक्का बसला, पण डॉ. मुखर्जी यांनी जनसंघास दिलेल्या भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे पुनरुत्थान या दोन विचारधारा मात्र पुढे भारतीय राजकारणात परिवर्तन घडवून आणण्याइतक्या सक्षम बनल्या. याच विचारांचा वारसा घेऊन पुढे पं. दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, पं. मौलिचंद्र शर्मा आदी नेत्यांनी जनसंघाची राजकीय विचारधारा जनमानसात रुजविण्यासाठी परिश्रम घेतले, आणि स्वातंत्र्यानंतर सुमारे तीन दशके देशावर असलेली काँग्रेसची पकड हळुहळू सैलावत गेली. आणीबाणीच्या काळात स्थापन झालेल्या जनता पार्टीच्या प्रयोगाने प्रस्थापित काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. पुढे वैचारिक मतभेदातून जनता पार्टीमधून जनसंघास बाहेर पडावे लागले, आणि ६ एप्रिल १९८० या दिवशी संघ परिवारात भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने जनसंघाचा नवा अवतार दाखल झाला. १९२५ ते १९५२ आणि १९५२ ते १९८० या तीन टप्प्यांत हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा विचार घेत धीराने वाटचाल करणारा भाजप आज सत्तेपर्यंत पोहोचला आहे, हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाचा, द्रष्ट्या विचारांचा विजय म्हणावा लागेल. श्यामाप्रसादजींचे व्यक्तिमत्व, त्यांचे चिंतन, आणि ‘हिंदुत्व हेच भारतीयत्व’ हा त्यांचा विचार म्हणजे प्रखर हिंदुत्ववादाचे प्रतिबिंब आहे. जम्मू-काश्मीरच्या अलगतावादास खतपाणी घालणारे ३७० वे कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास आपण तयार आहोत, असे तडाखेबंद भाषण २६ जून १९५२ रोजी त्यांनी संसदेत केले, आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू येथे झालेल्या विशाल मेळाव्यातही त्याच विचारांचा पुनरुच्चार केला. आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ८ मे १९५३ रोजी त्यांनी जम्मू काश्मीरकडे प्रयाण केले, आणि त्यांना अटक झाली. तुरुंगात असतानाच २३ जून १९५३ रोजी त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.
जातपात, धर्म, प्रांतभेदाच्या पलीकडे सर्वांकरिता जनसंघाची दारे खुली आहेत, असे डॉ. मुखर्जी यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले होते. भारताची संस्कृती आणि मूल्यांच्या प्रतिष्ठेतच भारताचे भविष्य सामावलेले आहे. जसे आपण धर्म, किंवा कायद्याचा आदर करतो, तसाच आदर भारतीय संस्कृतीचा केला पाहिजे, आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या भारतीय मूल्यांचे पालन केले पाहिजे, असे ते या भाषणात म्हणाले होते. जात, धर्म, विचार आदी भेदभावांपासून राजकारणाने अलिप्त राहिले पाहिजे, असा विशाल विचार मांडून देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या श्यामाप्रसादजींच्या स्वप्नातील भारतात हिंदु राष्ट्रवादाचा त्यांचा विचार पुढे नेत सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या विचारांनी आज अग्रस्थान मिळविले आहे, ही त्यांच्या तपश्चर्येचीच पुण्याई आहे. त्यामुळे, भारतीय राजकारणातील तेजस्वी सूर्य म्हणून डॉ. मुखर्जी यांच्या स्मृती कायमच तजेलदार राहतील..

प्रसिद्धी- दै. नवराष्ट्र

Monday, June 22, 2020

पितृदिन



जेव्हाजेव्हा हा लहानसा दगड नजरेसमोर दिसतो, तेव्हा मला दादांची- माझ्या वडिलांची- आठवण होते. जवळपास २० वर्षांहून अधिक काळ हा दगड आम्ही जपून ठेवलाय. तोही, देव्हाऱ्यात. रस्त्यावर असे असंख्य दगड असतात. पण एका दिवशी चालताना दादांची नजर नेमकी या टीचभर दगडावर पडली, आणि त्यांनी तो उचलून कपाळाला लावत निगुतीने शर्टाच्या खिशात ठेवला. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या वेळी आठवणीनं तो बाहेर काढला, स्वच्छ धुतला, आणि पूजा करताना देव्हाऱ्यात ठेवून त्याला गंधही लावलं. या दगडात त्यांना गणपतीचं निराकार रूप दिसलं होतं ... मी फारसा देवभोळा वगैरे नाही. आम्हाला कुणालाच त्यात कधी तसं काही दिसलं नाही, पण दादांनी मात्र भक्तिभावाने त्या दगडाची पुढे रोज पूजा केली. विठोबा रखुमाई आणि पिढ्यापिढ्यांपासून देव्हाऱ्यात असलेल्या देवांच्या मूर्तींप्रमाणे या दगडालाही आंघोळ, गंध, दिवा-नैवेद्य मिळू लागला, आणि दादांच्या भक्तिभावामुळे रस्त्यावरच्या एका दुर्लक्षित, क्षुल्लक दगडाला देवत्व मिळाले.

आज दादा आमच्यात नाहीत. १६ वर्षांपूर्वी त्यांनी अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं. त्यांचा हा निराकार गणपती मात्र, आमच्या देव्हाऱ्यात आहे.
देव म्हणून, आणि दादांची, त्यांच्या भोळ्या, निरागस भक्तिभावाची आठवण म्हणून!
अधूनमधून जेव्हा मी पूजा करतो, देव्हारा साफ करतो आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुन्हा टापटिपीने जागेवर ठेवतो, तेव्हा या दादांनी भक्तिभावाने ‘देव’त्व दिलेल्या या दगडाची मूर्ती हाती असताना मला दादांची तीव्र आठवण येते.
वीसपंचवीस वर्षांपासूनचा देव्हाऱ्यातला हा दगड म्हणजे दादांच्या भक्तीचे अमूर्त रूप आहे.
म्हणून तो पूजेतला देव झालाय.
त्या दिवशी दादांनी त्याला रस्त्यावरून आणून देव्हाऱ्यात बसवला नसता, तर आज तो कुठे गेला असता, कळत नाही.
काही स्पर्श आणि त्यामागील भावनांच्या आधारावर माणसंही वाढतात. मोठी होतात.
आईवडिलांची अशी सावली, तो स्पर्श, ती भावना आधाराला नसती, तर आपणही रस्त्यावरच्या दगडासमान असतो. देवत्व लाभलेल्या त्या दगडाकडे पाहताना मी नकळत स्वत:कडे पाहू लागतो. आपण जे काही असतो, आहोत, ते अशा पितृभावाच्या कृपेमुळेच आहोत, हे स्वत:स बजावतो. त्या सावलीमुळेच
देव्हाऱ्याची लायकी आपल्याला लाभली, ही त्यांची कृपा.
म्हणून तो दगड देव झाला, याची जाणीव जिवंत राहते!