Friday, October 24, 2008

सहज सुचलं म्हणून...!

"...या उद्यानात उन्मळून पडलेल्या, वठलेल्या वृक्षांचे पुनर्वसन होईल. इथे ते नव्या पालवीने बहरतील'...
मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात पत्रकारांशी बोलताना "राजकीय भाष्यकारा'च्या मिश्‍किल शैलीत, चेहऱ्यावरची मिश्‍किल हास्यरेषा न लपविता छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते... शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' असलेल्या छगन भुजबळ यांना महापौरपदी असताना अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये एका पडीक भूखंडावर एक अनोखे उद्यान उभारण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते अहोरात्र झटत होते. या उद्यानात बहरलेली झाडे, वेली असतील, संधिप्रकाशाला संगीताची साथ असेल, आणि मुख्य म्हणजे, मुंबईतील ज्या कलावंतांना महागड्या कलादालनांमध्ये प्रदर्शने भरविणे परवडत नाही, त्यांच्यासाठी एक खुले कलादालनही असेल, असा ध्यास त्यांनी घेतला होता... उद्यानाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी ते जातीने दिवसागणिक तेथे जात होते. उद्यानातीलच एका कृत्रिम टेकडीवर खास मागवून घेतलेले एक विशाल स्वयंभू "पाषाणशिल्प' त्यांनी उभे केले होते. अमिताभ बच्चनही ते शिल्प पाहून भारावला, असे भुजबळ तेव्हा प्रत्येकाला कौतुकाने सांगत असत...

सुमारे 18 वर्षांपूर्वीची ही हकीकत! छगन भुजबळ यांची 1989-90 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. या कालावधीत हे "कला प्रदर्शनी उद्यान' उभारण्याचे त्यांनी ठरविले. या उद्यानामुळे भुजबळांची महापौरपदाची कारकिर्द त्यांच्या रसिकतेचा पुरावा देत अधोरेखित होणार होती. सर्वत्र कला प्रदर्शनी उद्यानाचा बोलबाला होता. सारे काही गोड गोड होते.
... आणि याच गोडीमध्ये उद्यानातील टेकडीवरच्या त्या "पाषाणशिल्पा'ने मिठाचा खडा टाकला. "दर्शनी जागी बसविलेले दगडदेखील प्रेक्षणीय होतात', असा कडवट सूर सेनेतूनच उमटू लागला आणि उद्यानाच्या उद्‌घाटन समारंभात बाळासाहेबांच्या तशाच आशयाच्या वक्तव्यानंतर सारे वातावरण "कडवट' झाले. शिवसेनेतील भुजबळांचे वजन कमी झाल्याचे संकेत मिळू लागले. कला प्रदर्शनी उद्यानात जुन्या वृक्षांचे पुनर्वसन करण्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाहीष उलट नंतर ते उद्यानच करपून गेले. राजकारणाबाहेर गेलेल्या एखाद्या जुन्या नेत्यासारखे दुर्लक्षित, एकाकी झाले. संगीताचे सूर तिथे घुमलेच नाहीत, आणि कलाकारांची कलाही तेथे फुललीच नाही.
त्यानंतर काही दिवसांतच नाट्यमय "जय महाराष्ट्र' करून भुजबळांनी शिवसेनेलाच दणका दिला आणि ते "कॉंग्रेसवासी' झाले. त्या काळात शिवसेनेशी "गद्दारी' करणे हे सामान्य शिवसैनिकाचे काम नव्हते. भुजबळांच्या या अचाट धाडसामुळे राज्याच्या सत्ताकारणातही छगन भुजबळ हे नाव आघाडीवर आले. त्या वेळी शिवसेनेत भुजबळांविषयी प्रचंड असंतोष माजलेला होता. "लखोबा लोखंडे' या नावाचा शिक्का भुजबळांच्या माथी बसला. पण त्याला प्रतिआव्हान देत, शिवसेनाप्रमुखांवरच राजकीय प्रत्याघात करण्याची हिमत दाखवून, खुद्द बाळासाहेबांचा "टी. बाळू' असा उल्लेख करीत सेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळांनी सेनेचे आक्रमण परतवून लावले.
सेनेतील कटुता अशी शिगेला पोहोचलेली असतानाच, भुजबळांच्या मनात "सेनाप्रेमा'चा एक हळवा कोपरा सतत जपलेला होता. राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, तेव्हा भुजबळ विरोधी पक्षात होते. "वर्षा'वरच्या एका चहापानास हजेरी लावताना, काही आवडीचे पदार्थ दिसताच, "हवा हवाई' हा "परवली'चा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला, आणि तो हळवा कोपरा आणखी नाजूक झाला... राज्यातील आणि देशातीलही मानाचे पद भूषविलेला शिवसेनेचा एक नेता नंतर कितीतरी वेळा त्या आठवणीने हळवा झालेला अनेकांनी पाहिला होता. भुजबळांविषयीच्या कटुतेतही, शिवसेनेमध्ये कुठेतरी एक "गोडवा' जपला जात होता. राजकीय अपरिहार्यतेपोटी त्यांनी बाळासाहेबांवर कारवाई करण्याचेही धाडस दाखविले. बाळासाहेबांवर टीका करतानादेखील, त्यांच्याविषयीचा भुजबळांचा आदर अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला होता. सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते असताना, तेलगी प्रकरणात त्यांना मनस्ताप सोसावा लागला. डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातही त्यांना लक्ष्य केले गेले. उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द संपल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय क्षेत्रात होत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीआधीही, भुजबळ पक्षबाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहूनच महाराष्ट्रातील आणि देशभरातील "ओबीसी' ताकद एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बरोब्बर एक वर्षापूर्वी, भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे एका समारंभात गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, सुरूपसिंग नाईक आदी नेते एका व्यासपीठावर आले आणि राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याचे संकेत गडद झाले. ओबीसी नेत्यांची एक आघाडी आकार घेणार असे आडाखे बांधले जाऊ लागले. अलीकडेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर पुन्हा भुजबळ, मुंडे आणि काही असंतुष्ट नेते एकत्र आले. राष्ट्रवादीच्या तंबूत आपण समाधानी नाही, हे दाखविण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. भुजबळ नव्या पक्षाची स्थापना करणार, की एखाद्या प्रस्थापित पक्षाला बळ देणार, एवढाच मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. राजकारणात उपेक्षा सहन करतानाही, आपण "बाप माणूस' आहोत, हे दाखविण्याची संधी मात्र वेगवेगळ्या शक्तिप्रदर्शनांतून ते साधत राहिले.
मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा भुजबळांच्या राजकारणाने "नाट्यमय वळण' घेतले आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी, ऑक्‍टोबर महिन्यातच, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून भुजबळांना दिलासा दिला होता. भुजबळांना आकाशापर्यंत उचलून धरणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता मात्र त्यांची गरज संपली असून त्यांची उपेक्षा होत असल्याचे ठाकरे यांनी संपादकीय लिखाणात म्हटले होते. राजकारण गाजविणारी शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' अशी प्रशंसाही ठाकरे यांनी केली होती. भुजबळ सेनेत असते, तर त्यांची अशी उपेक्षा झाली नसती, असा "दिलासा'ही त्यांनी दिला होता...
...पुन्हा "हवा हवाई'चा परवलीचा शब्द सेनेच्या पहिल्या फळीत घुमेल?

Saturday, October 4, 2008

बाकडं...

लोकसभेत नोट फॊर व्होट’ प्रकरण झालं, तेव्हापासून बाकडं माझं डोकं पोखरतंय...
म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय.
कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय.
बाकड्याचा परिणाम. दुसरं काय?
लोकसभेत विरोधी बाकांवर बसलं, की आपोआपच व्यक्तिमत्वावर पराभूतपणाचा ओशाळा अंमल चढतो, अशी त्या दिवशीच्या त्यांच्या चेहे-यावरून माझी खात्री झालीय.
सत्ताधारी बाजूच्या, शेवटच्या रांगेतला, कधी सभागृहात तोंडही न उघडलेला, तो अनोळखी खासदार मात्र, त्या दिवशी कसा खुशीत दिसत होता?
बाकड्याचाच परिणाम!
तर, तेव्हापासून हे बाकडं माझ्या डोक्यात घर करून बसलंय.
आज त्यानं डोकं वर काढलं...
...‘मी जर वर्गात समोर बसलो, तर, मीपण पोरांसारखाच वागेन, अशी मला भीती वाटते’... पत्रकारितेच्या वर्गाला शिकवणाया माझ्या एका सहकार्यानं वैतागलेल्या सुरात मला सांगितलं, आणि मला राहवेना. काय झालं, ते कळल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं.
‘अरे, काय कलकलाट करतात ती मुलं... एवढी मोठी झाली, तरी, सारखं ‘गप्प बसा’ म्हणून दामटावं लागतं रे... त्यातली एकदोघं तर शिक्षक आहेत. नोकरी करतात. पण इथे आल्यावर, समोरच्या बाकांवर बसली, की मुलांसारखीच कलकल करतात. त्या बाकड्यांचाच गुण असला पाहिजे हा... ’ तो आणखीनच वैतागल्या सुरात बोलला, आणि विरोधी बाकावर सुन्न, पराभूत चेहेरा करून बसलेले अडवाणी माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले.
आणखी काही दिवस मागे गेलो, तर देशाचे उपपंतप्रधान, खिल्ली उडवणा-या सुरात बोलणारे अडवाणी आठवले.
आणि, बाकडे हा माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारा महत्वाचा घटक आहे, ह्याबद्दल माझी खात्री झाली...
मागे एकदा चर्चगेटच्या एका कॊलेजात एका कार्यक्र्माला गेलो होतो, तेव्हा गर्दीमुळे खुर्ची मिळाली नाही म्हणून बाजूच्या रिकाम्या वर्गात एका बाकड्यावर बसून भाषणं ऐकत होतो. बसल्याबसल्या बाकड्याच्या पुस्तकं ठेवायच्या कप्प्यात हात फिरवला, आणि हाताला एक टाचणी लागली.
माझे कान बाजूच्या हॊलमधल्या भाषणाकडेच होते.
खूपच चांगलं बोलत होता तो वक्ता. मी तल्लीन होऊन ऐकत होतो...
भाषण संपलं, आणि टाळ्या वाजवण्यासाठी मी हात वर घेतला, तेव्हा हातातली ती टाचणी नकळत बाजूला ठेवली गेली.
हे सगळं अगदी सहजपणे घडत होतं...
टाळ्या वाजवून मी उठायच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात माझं लक्ष त्या बाकड्याकडे गेलं.
भाषण ऐकताऐकता जुन्या सवयीनं आपलं काम केलं होतं.
हातातली टाचणी बाकड्यावर ‘चालली’ होती.
माझ्या थोड्याश्या वेळाच्या तिथं बसण्याच्या खाणाखुणा नकळतपणे बाकड्यावर नावानिशी उतरल्या होत्या.
शाळाकॊलेजात असताना मला बाकड्यावर नाव कोरायची सवय होती.
पण त्याला आता खूप वर्षं झालीत.
तरीही, त्या दिवशी कॊलेजचं बाकडं आयतं समोर आलं, आणि आपोआप नाव कोरलं गेलं.
माझ्या नकळत मी पुन्हा विद्यार्थी झालो होतो.
... बाकड्याचाच परिणाम!
हे आठवलं, आणि, ‘शाळेच्या बाकावर बसलो, तर आपण पुन्हा मूल होऊ’, ही त्याची भीती खरी ठरेल, अशी भीती मला वाटली.
त्याचे ते शब्द काही केल्या कानातून जात नव्हते.
तशातच मी स्टेशनवर आलो.
फलाटावर नेहेमीसारखीच तोबा गर्दी होती.
लांबूनच गाडी येताना दिसली आणि सगळी गर्दी सावज पकडायला शिकारी जसा सज्ज होतो, तशी झाली.
गाडी पुरते थांबायच्या आतच सगळ्या खिडक्या भरल्या होत्या...
गाडीच्या बाकावर खिडकीशी बसलेला प्रत्येकजण, पराक्रम गाजवल्याच्या विजयी मुद्रेनं थांबलेल्या गाडीत चढणा-या प्रत्येकाकडे पाहात होता.
मला बाकड्यावरची खिडकीची जागा पकडता आल्याने, मीही तेच करत होतो...
काही सेकंदातच गाडी ब-यापैकी भरली.
कुठेकुठे एखाददुसरी चौथी सीट शिल्लक होती.
जरा वेळात एक सुटाबुटातला माणूस डब्यात शिरला.
पॆसेजमधूनच त्यानं कुठे जागा आहे का, याचा अंदाज घेतला.
एक चौथी सीट रिकामी दिसताच त्याचा चेहेराही उजळला.
आणि बाकड्यावरच्या तिघांना सरकायला सांगून, जमा झालेल्या कोप-यावर तो कसाबसा टेकला.
गर्दी वाढतच होती.
गाडीनं शिट्टी दिली, आणि ती थोडीशी हलली, तेवढ्यात दोनचार जणांनी धावत येऊन गाडी पकडली, आणि सुटकेचा सुस्कारा टाकत तेही आत आले.
गर्दीतच तेही जागेचा अंदाज घेत होते.
अचानक त्यांचं लक्षं चौथ्या सीटवरच्या त्या सुटाबुटातल्या माणसाकडे गेले, आणि ते निमूटपणे मागे वळून पॆसेजमध्ये उभे राहिले.
त्या माणसानंही त्यांना पाहिलं होतं बहुधा.
त्याच्या ऒफिसातले, त्याच्या हाताखालचे लोक असावेत ते.
इतका वेळ चौथ्या सीटवरल्या कोप-यातही आनंदात बसलेल्या त्याचा चेहेरा एकदम उतरल्यासारखा झाला.
मिनिटभारानं तो तिथून उठला, आणि सरळ उभाच राहिला.
बाकड्यावरच्या कोप-याच्या जागेचा परिणाम.
मी बाकड्याचाच विचार करत होतो...
नुसतं बाकडंच नाही, तर त्यावर बसायला मिळालेली जागादेखील, माणसाचं व्यक्तिमत्व बदलून टाकते, याचा पुरावाच मला मिळाला.
...माझं स्टेशन येताच मी गाडीतून उतरलो आणि स्टेशनाबाहेर येउन बसच्या रांगेत उभा राहिलो...
एक बस सोडल्यावर नंतरच्या बसमध्ये बसायला जागा मिळाली.
बस भरली, तेव्हा उभ्यानं प्रवास करणारी, अगोदरच थकलीभागली माणसं मला आणखीनच केविलवाणी वाटत होती.
मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांवर सहज नजर फिरवली.
खिडकीत बसलेले, बाजूच्या प्रवाशापेक्षा जास्तं फ्रेश आहेत, असं मला उगीचच वाटलं.
बाकड्याचा परिणाम....!
मग बस चालत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणची बाकडी आठवू लागलो.
मंत्रालयात मंत्र्याच्या दालनाबाहेच्या बाकड्यावर बसून, मंत्र्याच्या भेटीसाठी ताटकळणारी माणसं मला आठवली.
डॊक्टरच्या दवाखान्यात, आपला नंबर येण्याची वाट पाहात बाकड्यावर बसलेले पेशंट माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले.
कोर्टातल्या बाकड्यांवर बसलेल्या माणसांच्या मनावरचं दडपण त्याच्या चेहे-यावर उमटलंय, असं मला उगीचच दिसू लागलं.
...आणि, मंत्रालयातून, दवाखान्यातून, कोर्टातून आपापली कामं आटोपून घरी परतून, घरातल्या बाकड्यांवर बिन्धास्तपणे ऐसपैसपणे बसलेली माणसंही माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागली.
त्याच्या चेहे-यांअर ‘घरच्या बाकड्या’चा आत्मविश्वास झळकताना मला दिसत होता...
‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’... असा एक नाना पाटेकरचा डायलॊग असल्याचं कधीतरी ऐकलं होतं.
एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं... खरं की नाही?

Monday, August 4, 2008

ते राहूनच गेलं...

एक वाईट बातमी आहे.
अरूण गेला.
मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची- गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं.
नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा...
गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला...
गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऎटॆक आला...
...त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहका-याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली... आमच्या माहितीतल्या कुणाकडेही, काहीही झालं, की आम्हा सर्वांना हा सहकारी ते जाणीवपूर्वक कळवतो...
अगदी सकाळी त्याचा फोन म्हणजे काहीतरी गडबड असणार, असा विचार करतच मी हॆलो म्हटलं, आणि त्यानं ही बातमी सांगितली.
मी क्षणभरासाठी अक्षरश: बधीर झालो.
अरूण राहायचा त्या सोसायटीतल्या त्याच्या शेजा-याला फोन केला.
बातमी खरी होती.
.... आम्हा पत्रकारांचं खाजगी जग खूप छोटं आहे.
गेल्या वर्ष-दोन वर्षांत मुंबईतल्या आमच्या या जगानं असे खूप आघात सोसले.
अरूणच्या जाण्याच्या आणखी एका आघातामुळे त्या दिवशी आमचं छोटंसं खाजगी जग पार कोलमडून गेलं...
त्या दिवशी प्रत्येकजण अरूणच्या आठवणींनी हळहळत होता.
माझी व्यथा वेगळी होती...
अनेक आनंदाचे, गंमतीचे क्षण आम्ही शेअर केले होते.
तो माझ्या क्षेत्रातला, अनुभवी, ज्येष्ठ सहकारी होताच, आणि कधीकाळचा माझा सख्खा शेजारीही होता.
माणुसकीला हात घालणा-या अनेक उदाहरणांचा खजिना अरूणच्या अनुभवांच्या पोतडीत होता...
कितीतरी लेले त्याला भेटले होते...
कितीतरी लेल्यांना त्यानं प्रोत्साहन दिलं होतं...
... त्या दिवशी सिद्धिविनायकाच्या शेजा-याची, त्या लेलेंची हकीकत मी तुम्हाला सांगितली, त्यानंतर पुन्हा आम्ही लेलेंना भेटायचं पक्कं ठरवण्यासाठी एकमेकांशी बोललो.
... आणि एका नव्या ‘लेले’ची माहिती मिळाली.
*** *** ***
मुम्बईतल्या टाटा होस्पिटलच्या आसपास दिवसादेखील अकल्पिताची एक भयाण सावली वावरत अस्ल्याचा भास होतो. अनेक हतबल जीव, उपचाराच्या आशेनं आजूबाजूच्या कट्ट्यांवर, फूटपाथवर आसरा घेऊन दिवस ढकलत असतात... कितीकांनां मुम्बईची ओळखदेखील नसते... कुठल्याश्या कोप-यातल्या आपल्या एवढ्याश्या खेडेगावातून, गाठीची सारी पुंजी कनवटीला बांधून कुणीतरी आशेनं एखादा मरणासन्न जीव घेऊन इथे येतो, आणि रुग्णाबरोबरच, स्वत:ही इथल्या जगण्यामरण्याच्या लढाईत उतरतो...
कधीतरी कनवटीची पुंजी रिती होते, आणि त्या रुग्णाला वाचवण्याच्या लढाईबरोबरच, जगण्याचीही लढाई सुरू होते...
कधी कल्पनेतही विचार केला नसेल, अशी जगासमोर मदतीसाठी हात पसरायचीही वेळ येऊन ठेपते, आणि जगणंही केविलवाणं होतं...
*** *** ***
.... घाटकोपर किंवा तिथल्याच आसपासच्या एका गार्डनमधे एका संध्याकाळी फेरफटका मारणा-या दोनचार मित्रांसमोर
एकदा असाच एक दीनवाणा, हतबल हात पसरला गेला.
‘माझी बायको कॆन्सरनं आजारी आहे... मला मदत करा’ कसंबसं एवढंच वाक्य उच्चारताना त्या माणसाच्या दु:खानं
करपलेल्या चेहे-यावरच्या दीनवाण्या रेषा आणखीनच गडद झाल्या आणि हे मित्र चालताचालता थबकले.
... मुम्बईत एखादा माणूस पैसे उकळण्यासाठी प्रसंगी मरणाच्या कहाण्याही रंगवितो, ह्याचा अनुभव असलेल्या त्या मित्रांनी ह्या केविलवाण्या देहाकडे अगोदर तशाच नजरेनं पाहिलं...
त्याचा चेहेरा खोटं बोलत नाही, हे त्यांना पटलं.
पण बागेत फिरायला येताना एखाद्याजवळ असतील, तेव्हढेच पैसे त्यांच्याकडे होते.
तरीही सगळ्यांनी आपले खिसे त्याच्या पसरलेल्या ओंजळीत रिकामे केले.
पण ते अपुरं दान त्यांना समाधान देऊ शकलं नाही.
बायकोच्या आजाराच्या चिंतेनं खंगलेल्या त्या माणसाला त्यांनी हॊस्पिटलाचा पत्ता, वॊर्ड नंबर विचारला, आणि
दुस-याच दिवशी हे मित्रमंडळ हॊस्पिटलमध्ये पोहोचले...
तो खंगलेला, श्रमलेला दीनवाणा माणूस आण्खीनच थकल्या शरीरानं रुग्णशय्येवरल्या बायकोच्या पायाशी बसलेलाच होता...
त्याच्या हाती नोटांचं एक बंडल सोपवून, त्याच्या पाठीवर थोपटून, काहीही न बोलता हे मित्र तिथून बाहेर पडले.
... पण तो केविलवाणा माणूस आणि त्याची मरणपंथाला लागलेली बायको त्यांच्या नजरेसमोरून हलत नव्हती.
दुस-या दिवशी कामधंद्याला निघताना ट्रेनमध्ये पत्ते खेळताखेळता त्यांच्यतल्याच एकानं ग्रूपमधल्या आपल्या इतर दोस्तांना ही हकीकत सांगितली,
आणि पत्ते खेळणारे हात थबकले....
पुढच्या क्षणाला ते हात खिशात गेले होते...
माणुसकीच्या एका झ-याचा उगम झाला होता...
पुन्हा त्या संध्याकाळी हॊस्पिटलमध्ये जाऊन ते जमलेले पैसे त्यांनी त्या माणसाच्या स्वाधीन केले...
एका आगळ्या समाधानाचा अनुभव त्या दिवशी सगळ्या ग्रुपनं घेतला होता...
दुसर्या दिवशी तो ग्रूप ट्रेनमधून प्रवास करताना पत्ते खेळत नव्हता...
... ब-याच चर्चेनंतर, अशा गरजूंसाठी आपल्या खिशाचा एक कोपरा राखून ठेवायचा निर्णय त्या तसाभराच्या प्रवासात
झाला होता.
... आता ह्या ग्रूपमध्ये आणखी कितीतरी हातांची भर पडलीये.
... एक ट्रस्ट उभा राहिलाय.
... पैशाअभावी उपचार घेऊ न शकणा-या रुग्णांसाठी हे हात सैल होतात...
आजवर कितीतरी रुग्णांना ह्या ट्र्स्ट्नं जीवदान दिलंय...
ट्रेनमधला, पत्ते कुटणारा, एक गट, एका अपघातानं घडलेल्या साक्षात्कारातून, माणुसकीचं आगळं रूप घेऊन नव्या
जाणीवांनी ‘जबाबदार’ झालाय.
*** *** ***
लेलेंच्या निमित्तानं गप्पा मारतामारता त्या दिवशी अरूणकडून मिळालेल्या या नव्या माहितीमुळे, त्या ग्रुपला भेटायची माझी इच्छा तीव्र झाली आहे.
पण आता त्यांना भेटायला घेऊन जायला अरूण सोबत असणार नाही.
... ‘कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ पत्रकार, ‘हिंदू’ या दैनिकाचे महाराष्ट्र ब्यूरोचे उपप्रमुख अरूण भट यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले’अशी बातमी गेल्या आठवड्यात मुम्बईतल्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांत आपण वाचली असेल...
...लेलेंच्या निमितानं तुमची मी अरूणशीही ओळख करून दिली होती.
त्यानंतर अशा ‘आणखी काही लेलें’ची माझ्याशी ओळख करून दिली, आणि अरूण गेला!

Saturday, July 26, 2008

प्रेरणादायक

प्रेरणादायक

काकांनी केलेल्या एका आवाहनाचा परिणाम होऊन अमेरिकेत असलेल्या एका तरुणाचे हृदय हेलावले. त्याच्या वडिलांचा आजार आणि आईने खाल्लेल्या खस्ता त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यानंतर सुरू झाला भारतातील गरीब रुग्णांसाठी मदतीचा ओघ.

"ज्या देशात तू जन्मलास, त्या देशातील हजारो गरजूंना तुमच्या मदतीची गरज आहे. या देशात अनेक रुग्ण केवळ औषधोपचाराचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे मृत्यूला सामोरे जातात. "तुमच्या मदतीतून या देशातील अशा असंख्य गरिबांना नवे जीवन मिळेल,' या एका आवाहनानंतर अमेरिकेतल्या त्या तरुणाचा अवघा जीवनक्रमच बदलून गेला. 1960 च्या दरम्यान मुंबईचे महापौर असलेल्या विष्णुप्रसाद देसाई यांनी अमेरिकेत स्थिरावलेल्या आपल्या पुतण्यास, जयदेव देसाई यांना 1975 मध्ये एक पत्र लिहून मुंबईतल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत पाठविण्याचे कळकळीचे आवाहन केले. ते पत्र वाचत असतानाच जयदेव देसाई यांच्या डोळ्यासमोरून आपल्या बालपणीचे, गुजरातेतील अहमदाबादेतले दिवस चित्रपटासारखे सरकत होते. नऊ वर्षांचा असताना वडिलांवर ओढवलेला जीवघेणा आजार, केवळ "चमत्कारा'ने बऱ्या झालेल्या वडिलांना नंतर आलेल्या अंधत्व व बहिरेपणामुळे आईने कष्टाने ओढलेला संसाराचा गाडा, शिक्षणासाठीची आर्थिक ओढाताण आणि त्याही परिस्थितीत इतरांच्यासाठी आईने काडी काडी जमवून केलेली मदत... सारे जयदेवभाईंच्या नजरेसमोर उभे राहिले. विष्णुप्रसादांची गरिबांविषयीची प्रामाणिक तळमळ ओळखून आपल्या कमाईतून त्यांनी मुंबईतील सांताक्रूजच्या "बीसीजे हॉस्पिटल'च्या (आजकाल या हॉस्पिटलला "आशा पारेख हॉस्पिटल' म्हणूनही ओळखतात) मदतीसाठी पहिला, तीनशे डॉलरचा चेक पाठविला.
तेव्हापासून आपल्या जन्मभूमीतील गरिबांचे दुःख `वाटून घेण्याची' कळकळ सुरू झाली आणि एका अनोख्या पद्धतीने अमेरिकेतून भारतातील असंख्य संस्था, व्यक्तींकडे मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा ओघ सातत्याने वाहतो आहे. जयदेव देसाई नावाच्या या "कटिबद्ध' भारतीयाने आजवर भारतातील 200 हून अधिक संस्थांना, अमेरिकेतील "इंडिया अब्रॉड फाउंडेशन'मार्फत लाखो डॉलरची आगळी आर्थिक मदत रवाना केली आहे. त्यातून खेडोपाड्यांतील हजारो गरीब, गरजूंना नवे जीवन मिळाले आहे. जयदेवभाईंच्या जन्मगावातील, अहमदाबादेतील शाळा- इस्पितळांबरोबरच मुंबईतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील दोनशेहून अधिक इस्पितळे आणि संस्थांच्या कामाला या मदतीमुळे नवी उभारी मिळाली आहे.
गुजरातेतील अनेक संस्था, शाळा, इस्पितळे, मुंबईतील कूपर रुग्णालय, भगवती हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल, शिशुकल्याण केंद्र, मिरजेतील सिद्धिविनायक गणपती हॉस्पिटल, पुण्यातील रुबी एज्युकेशन अकादमी, सोलापुरातील मतिमंदांसाठीची "जिव्हाळा' संस्था, यांसारख्या अनेक संस्था आणि पंजाब, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूतील अनेक शैक्षणिक-सामाजिक संस्थांना गेल्या चार दशकांमध्ये लाखो डॉलरची मदत करणाऱ्या जयदेव देसाईंना आता मदत गोळा करण्याचे "व्यसन' लागले आहे. "वर्षातील प्रत्येक दिवशी या कामासाठी वेळ काढून आम्ही एका आगळ्या समाधानाचा आनंद उपभोगतो आहोत,' असे जयदेवभाई म्हणतात. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळात जयदेवभाईंच्या निधिसंकलन मोहिमेला वेग येतो आणि त्या चार महिन्यांत त्यांचे अवघे कुटुंब या कामात स्वतःला वाहून घेते. 1975 मध्ये सुरू झालेली मदत निधिसंकलनाची ही आगळी संकल्पना आज अमेरिकेतील अनेक भारतीयांनी अक्षरशः उचलून धरली असून, भारताच्या मातीशी नाते असलेल्या- आणि नसलेल्याही- हजारो हातांचा आणि माणुसकीने भारलेल्या मनांचा आधार या मोहिमेला लागला आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे हे सामान्य घरांचे "स्वप्नरंजन' असायचे, त्या काळात- 1964 च्या सुमारास- गुजरातमध्ये इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदेव देसाईंनी मोठ्या जिद्दीने अमेरिका गाठली आणि मेक्‍सिको स्टेट युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते अमेरिकेत स्थिरावले. मानवतेच्या जाणिवांना देश-विदेशांच्या भौगोलिक सीमा नसतात, तरीही आपल्या देशातील गरिबांसाठी अमेरिकेसारख्या देशात मदतीकरिता हात पसरले किंवा अगदी हक्काने, मित्रांच्या खिशात वारंवार हात घालत राहिलो, तर कालांतराने मित्रही आपल्याला टाळतील, या शंकेतून काही वर्षांनी- 2001 च्या सुमारास- "गिफ्ट सर्टिफिकेटस्‌'ची आगळी "आयडिया' जन्माला आली. 10, 20 आणि 50 डॉलर किमतीची "गिफ्ट सर्टिफिकेट्‌स' विकून त्यातून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम मदतीच्या रूपाने भारतात पाठविण्यास सुरवात झाली. अमेरिकेतील काही बड्या व्यापाऱ्यांकडून माणुसकीचा प्रतिसाद मिळाला, आणि त्यांनी गिऱ्हाइकांकडून रोकड किंवा क्रेडिट कार्डांऐवजी जयदेवभाईंची सर्टिफिकेट्‌स स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सर्टिफिकेट्‌सची ही योजना जयदेवभाईंनी अमेरिकेतील आपल्या मित्रांना सांगितली आणि कानोकानी होत अनेक जणांनी त्यांच्याकडून ही सर्टिफिकेट्‌स खरेदी केली. या सर्टिफिकेट्‌सवर त्यांनी केलेल्या प्रत्येक खरेदीच्या किमतीतील पाच टक्के रक्कम दुकानदारांकडून थेट जयदेवभाईंना मिळणार होती. "दात्या'च्या "खिशा'त हात न घालताही, दात्याला "मदतीचे समाधान' मिळवून देणारा आगळा मार्ग जयदेवभाईंच्या तळमळीतून जन्माला आला आणि कमिशनच्या रूपाने गोळा होत गेलेल्या लाखो डॉलरचा ओघ भारताकडे सुरू झाला. ""आजवर 50 हजार डॉलरहून अधिक किमतीची कुपन्स मी विकली आहेत. त्यातून मदतीच्या या प्रवाहातील सातत्यपूर्ण सहभागाचा आनंद अनेकांना सहजपणे मिळत गेला आहे,'' असे जयदेवभाई सांगतात. ""जोपर्यंत शक्‍य आहे आणि जगातली माणुसकी "जिवंत' असल्याची आपली खात्री आहे, तोपर्यंत आपण याच योजनेतून मदत गोळा करत राहणार आहोत. भारतातल्या आपल्या बांधवांचे दुःख वाटून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत. "दुःख वाटून घेण्यात'ही एक आगळा आनंद आपण अनुभवत आहोत,'' असेही ते उत्कटपणे नमूद करतात. आता भारतातील आणि विशेषतः मुंबईतील इस्पितळांमध्ये काम करणाऱ्या "वॉर्डबॉय' आणि "वॉर्डगर्ल'ना रुग्णशुश्रूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचा जयदेवभाईंचा मानस आहे.

Sunday, July 20, 2008

माझ्या आईच्या कविता

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परीे गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि

गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात

कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
असा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं

काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला