Saturday, July 26, 2008

प्रेरणादायक

प्रेरणादायक

काकांनी केलेल्या एका आवाहनाचा परिणाम होऊन अमेरिकेत असलेल्या एका तरुणाचे हृदय हेलावले. त्याच्या वडिलांचा आजार आणि आईने खाल्लेल्या खस्ता त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यानंतर सुरू झाला भारतातील गरीब रुग्णांसाठी मदतीचा ओघ.

"ज्या देशात तू जन्मलास, त्या देशातील हजारो गरजूंना तुमच्या मदतीची गरज आहे. या देशात अनेक रुग्ण केवळ औषधोपचाराचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे मृत्यूला सामोरे जातात. "तुमच्या मदतीतून या देशातील अशा असंख्य गरिबांना नवे जीवन मिळेल,' या एका आवाहनानंतर अमेरिकेतल्या त्या तरुणाचा अवघा जीवनक्रमच बदलून गेला. 1960 च्या दरम्यान मुंबईचे महापौर असलेल्या विष्णुप्रसाद देसाई यांनी अमेरिकेत स्थिरावलेल्या आपल्या पुतण्यास, जयदेव देसाई यांना 1975 मध्ये एक पत्र लिहून मुंबईतल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत पाठविण्याचे कळकळीचे आवाहन केले. ते पत्र वाचत असतानाच जयदेव देसाई यांच्या डोळ्यासमोरून आपल्या बालपणीचे, गुजरातेतील अहमदाबादेतले दिवस चित्रपटासारखे सरकत होते. नऊ वर्षांचा असताना वडिलांवर ओढवलेला जीवघेणा आजार, केवळ "चमत्कारा'ने बऱ्या झालेल्या वडिलांना नंतर आलेल्या अंधत्व व बहिरेपणामुळे आईने कष्टाने ओढलेला संसाराचा गाडा, शिक्षणासाठीची आर्थिक ओढाताण आणि त्याही परिस्थितीत इतरांच्यासाठी आईने काडी काडी जमवून केलेली मदत... सारे जयदेवभाईंच्या नजरेसमोर उभे राहिले. विष्णुप्रसादांची गरिबांविषयीची प्रामाणिक तळमळ ओळखून आपल्या कमाईतून त्यांनी मुंबईतील सांताक्रूजच्या "बीसीजे हॉस्पिटल'च्या (आजकाल या हॉस्पिटलला "आशा पारेख हॉस्पिटल' म्हणूनही ओळखतात) मदतीसाठी पहिला, तीनशे डॉलरचा चेक पाठविला.
तेव्हापासून आपल्या जन्मभूमीतील गरिबांचे दुःख `वाटून घेण्याची' कळकळ सुरू झाली आणि एका अनोख्या पद्धतीने अमेरिकेतून भारतातील असंख्य संस्था, व्यक्तींकडे मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा ओघ सातत्याने वाहतो आहे. जयदेव देसाई नावाच्या या "कटिबद्ध' भारतीयाने आजवर भारतातील 200 हून अधिक संस्थांना, अमेरिकेतील "इंडिया अब्रॉड फाउंडेशन'मार्फत लाखो डॉलरची आगळी आर्थिक मदत रवाना केली आहे. त्यातून खेडोपाड्यांतील हजारो गरीब, गरजूंना नवे जीवन मिळाले आहे. जयदेवभाईंच्या जन्मगावातील, अहमदाबादेतील शाळा- इस्पितळांबरोबरच मुंबईतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील दोनशेहून अधिक इस्पितळे आणि संस्थांच्या कामाला या मदतीमुळे नवी उभारी मिळाली आहे.
गुजरातेतील अनेक संस्था, शाळा, इस्पितळे, मुंबईतील कूपर रुग्णालय, भगवती हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल, शिशुकल्याण केंद्र, मिरजेतील सिद्धिविनायक गणपती हॉस्पिटल, पुण्यातील रुबी एज्युकेशन अकादमी, सोलापुरातील मतिमंदांसाठीची "जिव्हाळा' संस्था, यांसारख्या अनेक संस्था आणि पंजाब, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूतील अनेक शैक्षणिक-सामाजिक संस्थांना गेल्या चार दशकांमध्ये लाखो डॉलरची मदत करणाऱ्या जयदेव देसाईंना आता मदत गोळा करण्याचे "व्यसन' लागले आहे. "वर्षातील प्रत्येक दिवशी या कामासाठी वेळ काढून आम्ही एका आगळ्या समाधानाचा आनंद उपभोगतो आहोत,' असे जयदेवभाई म्हणतात. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळात जयदेवभाईंच्या निधिसंकलन मोहिमेला वेग येतो आणि त्या चार महिन्यांत त्यांचे अवघे कुटुंब या कामात स्वतःला वाहून घेते. 1975 मध्ये सुरू झालेली मदत निधिसंकलनाची ही आगळी संकल्पना आज अमेरिकेतील अनेक भारतीयांनी अक्षरशः उचलून धरली असून, भारताच्या मातीशी नाते असलेल्या- आणि नसलेल्याही- हजारो हातांचा आणि माणुसकीने भारलेल्या मनांचा आधार या मोहिमेला लागला आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे हे सामान्य घरांचे "स्वप्नरंजन' असायचे, त्या काळात- 1964 च्या सुमारास- गुजरातमध्ये इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदेव देसाईंनी मोठ्या जिद्दीने अमेरिका गाठली आणि मेक्‍सिको स्टेट युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते अमेरिकेत स्थिरावले. मानवतेच्या जाणिवांना देश-विदेशांच्या भौगोलिक सीमा नसतात, तरीही आपल्या देशातील गरिबांसाठी अमेरिकेसारख्या देशात मदतीकरिता हात पसरले किंवा अगदी हक्काने, मित्रांच्या खिशात वारंवार हात घालत राहिलो, तर कालांतराने मित्रही आपल्याला टाळतील, या शंकेतून काही वर्षांनी- 2001 च्या सुमारास- "गिफ्ट सर्टिफिकेटस्‌'ची आगळी "आयडिया' जन्माला आली. 10, 20 आणि 50 डॉलर किमतीची "गिफ्ट सर्टिफिकेट्‌स' विकून त्यातून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम मदतीच्या रूपाने भारतात पाठविण्यास सुरवात झाली. अमेरिकेतील काही बड्या व्यापाऱ्यांकडून माणुसकीचा प्रतिसाद मिळाला, आणि त्यांनी गिऱ्हाइकांकडून रोकड किंवा क्रेडिट कार्डांऐवजी जयदेवभाईंची सर्टिफिकेट्‌स स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सर्टिफिकेट्‌सची ही योजना जयदेवभाईंनी अमेरिकेतील आपल्या मित्रांना सांगितली आणि कानोकानी होत अनेक जणांनी त्यांच्याकडून ही सर्टिफिकेट्‌स खरेदी केली. या सर्टिफिकेट्‌सवर त्यांनी केलेल्या प्रत्येक खरेदीच्या किमतीतील पाच टक्के रक्कम दुकानदारांकडून थेट जयदेवभाईंना मिळणार होती. "दात्या'च्या "खिशा'त हात न घालताही, दात्याला "मदतीचे समाधान' मिळवून देणारा आगळा मार्ग जयदेवभाईंच्या तळमळीतून जन्माला आला आणि कमिशनच्या रूपाने गोळा होत गेलेल्या लाखो डॉलरचा ओघ भारताकडे सुरू झाला. ""आजवर 50 हजार डॉलरहून अधिक किमतीची कुपन्स मी विकली आहेत. त्यातून मदतीच्या या प्रवाहातील सातत्यपूर्ण सहभागाचा आनंद अनेकांना सहजपणे मिळत गेला आहे,'' असे जयदेवभाई सांगतात. ""जोपर्यंत शक्‍य आहे आणि जगातली माणुसकी "जिवंत' असल्याची आपली खात्री आहे, तोपर्यंत आपण याच योजनेतून मदत गोळा करत राहणार आहोत. भारतातल्या आपल्या बांधवांचे दुःख वाटून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत. "दुःख वाटून घेण्यात'ही एक आगळा आनंद आपण अनुभवत आहोत,'' असेही ते उत्कटपणे नमूद करतात. आता भारतातील आणि विशेषतः मुंबईतील इस्पितळांमध्ये काम करणाऱ्या "वॉर्डबॉय' आणि "वॉर्डगर्ल'ना रुग्णशुश्रूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचा जयदेवभाईंचा मानस आहे.

No comments: