Sunday, September 6, 2009

मठ-मंदिरांच्या दारी, इच्छुकांची वारी...

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण आणि अध्यात्म यांच्यातील आणखी घट्ट होत आहे. उमेदवारी मिळावी, नंतर विजय मिळावा व पुढे भलेभलेच होत जावे, यासाठी अध्यात्मिक गुरू, मठ-मंदिरे, बुवा-बाबांच्या दारी आता गर्दी सुरू होईल...
महाराष्ट्राला लाभलेल्या अध्यात्मिक परंपरेमुळे राज्यात अनेक आध्यात्मिक गुरूंचे वास्तव्य आहे. त्यांचा भक्तगण मोठा आहे. तोही मतदार आहे. त्यामुळे राजकीय यशासाठी गुरुचरणी डोके ठेवून भाविकांची मने जिंकणे ही अनेकदा "राजकीय गरज' ठरते. आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने ही गरज आणखी वाढेल. कोल्हापूर, सांगलीतील इच्छुकांच्या गाड्यांची वर्दळ बाहुबली, नरसिंहवाडीस सुरू होईल, तर औरंगाबाद, नाशिक, नगरचे इच्छुक दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वरला धाव घेतील. कोकण आणि मराठवाड्यातील काहींना रत्नागिरीजवळच्या नरेंद्र महाराजांची वेळ मागून घ्यावी लागेल, तर राजकीय वजन आणि वलय लाभलेल्या कुणा "देवी'च्या आशीर्वादाने "सहज'पणे उमेदवारी साध्य व्हावी म्हणून काहींची मोर्चेबांधणी सुरू होईल.
विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक वजनदार नेत्यांनी भय्यू महाराजांना गुरुस्थानी मानले आहे. काहींनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. नाशिकच्या शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे त्यांचे कट्टर अनुयायी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यापुढे राजकीय आणि आध्यात्मिक पेच उभा राहिला; पण आता सारे सुरळीत झाले आहे. शांतिगिरींच्या मठात पुन्हा पहिल्यासारखीच वर्दळ सुरू होणार आहे... नाशिक परिसरातले "फरशीवाले बाबा' वादग्रस्त ठरले होते. मात्र, राजकीय मंडळींची त्यांच्याकडची ऊठबस अजूनही कायम असल्याचे बोलले जाते. कोल्हापूरच्या शहाजी कॉलनीतील एक महाराजही असेच वादग्रस्त ठरले; पण पहाटेपूर्वीच त्यांच्या दर्शनासाठी राजकीय मंडळींची वर्दळ सुरू होते, अशी चर्चा आहे. रत्नागिरीजवळ नाणीज येथील नरेंद्र महाराजांच्या मठात लागणारी या भाविकांची रीघ लक्षात घेऊन तेथे नियोजन सुरू असल्याचे समजते.
औरंगाबाद, नगर, कोपरगावातील काही मुरब्बी राजकारणी वैजापूर तालुक्‍यातील मठाधिपतींच्या दर्शनासाठी धाव घेतात, असे सांगण्यात येते. काही जण वेरूळच्या वाटेवरील भांगशीमाता गडावरील परमानंदगिरींच्या आश्रमाची वाट धरतात. औरंगाबाद जिल्ह्यातच सिल्लोड तालुक्‍यात अल्पसंख्य समाजाच्या बड्या नेत्याने अलीकडेच पावसासाठी केलेल्या "पर्जन्ययागा'चे गोडवे अजूनही भाविकांमध्ये गायले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात वाशीम मतदारसंघातील एक उमेदवार पहाटे प्रथम भेटणाऱ्याची शाल-श्रीफळ देऊन पूजा करून त्याच्याकडून "यशस्वी भव' असा आशीर्वाद `घेत' असे. हे "व्रत' फळाला आले असते, तर विधानसभेसाठी अनेकांनी या व्रताचे पालन करण्याचे ठरविले होते; पण तो उमेदवारच पराभूत झाल्याने आशीर्वाद "घेण्याची' कल्पना बारगळली, असे बोलले जाते. सांगलीच्या कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी अकलूजच्या एका हितचिंतकाने संग्रामनगरातल्या साईबाबांना नवस केला आणि त्यांचा विजय झाला. या युवा खासदाराला मंत्रिपदही मिळाले. नंतर त्यांनी या दैवताचे दर्शन घेऊन भाविकांना तीनशे नारळांचे वाटप केले होते. आता येथे दर्शनासाठी राजकारण्यांची हमखास गर्दी होईल, अशी चर्चा आहे. औरंगाबादजवळ हातमळी नावाच्या खेड्यातील "मामा-भाचे मारुती'ही नवसाला पावतात, अशी श्रद्धा आहे. या मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती असल्याने मामा-भाच्यांनी एकत्र येऊन नवस केला, तर फळ मिळते, असे म्हणतात. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यावर भाजपच्या एका उमेदवाराने हा नवस फेडला आणि 101 नारळ अर्पण केले. या मंदिरालाही आता "राजकीय महत्त्व' प्राप्त होणार आहे. कुणी विजयासाठी तुळजापूरच्या भवानीला "तलवारी'चा नवस बोलेल, तर कुणी परभणीच्या पिराला कंदुरी करून मन्नत मागण्यासाठी धाव घेईल. कुणी मारुती मंदिरांसमोर घंटा बांधेल, तर कुणी शंकराला त्रिशूळ अर्पण करून विजयासाठी साकडे घालेल.
महाराष्ट्राची राजधानी आणि राज्याचे सत्ताकेंद्र मुंबईत तर निवडणुकीच्या मोसमात भाविकतेचा महापूरच येण्याची चिन्हे आहेत. ऐन गणेशोत्सवाचा मोका साधून भाविकांना शुभेच्छा देणारे "इच्छुकां'चे जागोजागी लागलेले फलक निवडणूक आयोगाने हद्दपार केले आहेत. त्यामुळे भाविकतेचा नवा मार्ग येत्या काही दिवसांत मुंबईत बांधला जाईल. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाची आरती करून आणि दर्शन घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रथाच पडलेली असल्याने येत्या काही दिवसांत सिद्धिविनायक मंदिरातील "व्हीआयपी' रांगांचीच लांबी वाढलेली दिसेल.
वशीकरण, हमखास यश, जादूटोणा अशा कलांमध्ये प्रसिद्ध असलेले बंगाली व हैदराबादी बाबाही राजकारणी मासे "गळाला' लावण्याच्या खेळात हिरिरीने उतरतील.
...निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आध्यात्मिक क्षेत्रही राजकारणाच्या रंगात न्हाऊन निघेल.

No comments: