Saturday, May 15, 2010

कोकणातले ‘केरळ’...

मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल... गोळवलीत गुरुजींच्या वास्तूस्थानी काही विकास प्रकल्पही सुरू झालेत...
ओझरखोलातही, सहज उतरून थांबलं, की काहीतरी वेगळं सुरू झाल्याचा ‘वास’ येतो... मग वाटेवरच भेटणार्‍या कुणाशीही गप्पा मारतामारता त्या वेगळेपणाची ओळख होते, आणि हे आगळेपण बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही, असं आपण आपोआपच ठरवूनही टाकतो.
अलीकडे गावागावांतल्या महिलांना स्वयंपूर्णतेचा आणि स्वयंसहाय्याचा एक नवा मंत्र मिळालाय. बचत गटांमुळे, महिलांचा आत्मविश्वासही वाढलाय. बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन पापड, लोणची, शेवया असे पदार्थ बनवून त्यांची विक्री करणे, या नेहेमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा, काहीतरी वेगळं करावं, आणि आपल्या अंगीच्या कर्तृत्वालाही वाव द्यावा असं ओझरखोलातल्या महिला बचत गटानं ठरवलं, आणि खाडीकिनारीच्या या गावात एक नवी वाट रुळली... लौकिकार्थाच्या शिक्षणातूनच उत्कर्ष साधता येतो, या समजुतीमुळे घराबाहेर पडण्यासाठी बुजणार्‍या महिलांनी एक वेगळाच उद्योग सुरू केला, आणि ओझरखोलातल्या घरांना भक्कम आर्थिक आधार मिळाला... जिद्द, मेहनत व कल्पकतेच्या आधारे इथल्या महिला आता आपली नवी ओळख करुन देत आहेत. आजवर केवळ कौटुंबिक, धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार्‍या या महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत, आणि त्यांच्या ‘काथ्या’ उद्योगाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जवळपास सात वर्षापूर्वी ओझरखोलच्या महालक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना झाली, आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून माहिती घेऊन या महिलांनी काथ्या उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. मग काही महिलांनी काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. उद्योगासाठी अडीचतीन लाख रुपयांचे भांडवल आवश्यक होते. संगमेश्वरच्या बँक ऑफ इंडियाकडून दीड लाखाचे कर्ज व एक लाखाचे शासकीय अनुदान मिळवून ‘महालक्ष्मी’ने भांडवलाची उभारणी केली. महिलांच्या या आगळ्या धाडसाला दाद देण्यासाठी आणि, कौतुकापोटी, ओझरखोल ग्रामपंचायतीने वर्कशॉपची इमारत बांधून दिली, आणि कर्नाटकातील बंगळूरमधून काथ्या उद्योगासाठी लागणारी मशिनरी आणली गेली. ओझरखोलच्या आसपास काथ्या बनविण्यासाठी नारळाची सोडणे मुबलक प्रमाणात मिळतात. या नारळाच्या सोडणांपासून प्रथम काथ्या बनविला जातो. या काथ्यापासून सुंभ, पायपुसणी तयार केली जातात. या मालाला स्थानिक बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे. तालुक्याच्या बाजारपेठेत ओझरखोलच्या महालक्ष्मी बचतगटाची पायपुसणी, सुंभ आणि ‘रश्शी’ येते, तेव्हा गिहाईकेदेखील, आवर्जून त्यांचीच खरेदी करतात. रत्नागिरीच्या बाजारातही, ओझरखोलची ही उत्पादने ‘फेमस’ झाली आहेत.
नारळाला ‘कल्पवृक्ष’ मानतात, हे कोकणी माणसाला पूर्वीपासून माहीत आहे. म्हणूनच, माजघर पडवीचं एखादं टुमदार दुपाखी चिरेबंदी घर बांधलं, की आंगणाच्या बाजूला, बेड्याशेजारी दोहोबाजूंना नारळाची रोपे लावली जातात... ‘परड्या’त आणखी जागा असली, तर दोनचार ‘कलमं’देखील लावली जातात, आणि ‘फळं’ येईपर्यंत कोकणातल्या त्या घरातला प्रत्येकजण झाडांची काळजी घेतो... केरळ, तामीळनाडूसारखा नारळाच्या बहुविध उपयोगांचा आजवर कोकणी माणसाने फारसा विचार केला नव्हता. आता मात्र, ‘मुंबैची मनिऒर्डर’ हेच आजवरचा जगण्याचे मुख्य साधन असल्याची मानसिकता कोकणातून पुसली जातेय. आता, मुंबईत शिकायला जाणाया मुलाबाळांना गावातून पैसे पाठवले जातायत... कोकण बदलतेय...
मेहनतीची किंमत कोकणाला उमगली आहे. म्हणूनच, केरळ, तामिळनाडूतला काथ्या उद्योगाने इथे मूळ धरले आहे... हा उद्योग नावारुपाला आणायचा, ही ओझरखोलच्या ‘महालक्ष्मी’ची जिद्द आहे.
-------------------------------------------------------

No comments: