Monday, May 17, 2010

धनाची पेटी.... ?

‘धवल क्रांती’ हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात. एकीकडे सामाजिक रूढींचा पगडा, आणि दुसरीकडे जाणीव जागृतीचे प्रयत्न... कदाचित, या संघर्षात, रूढी-विचारांनी प्रयत्नांवर मात केली, आणि अखेर, भूतकाळाने नोंदविलेली ही समस्या वर्तमानात जन्माला आलीच... आता भविष्यातही तिचे ओझे आपल्याला वाहावे लागणार आहे... कदाचित, ते इतके जड असेल, की आपल्याला ते पेलवणारदेखील नाही... आपण कोलमडून जाऊ... विस्कटून जाऊ, आणि नैराश्याचे भूत समाजाच्या मानगुटीवर बसेल...
... असे झाले, की एक स्थिती नक्की असते, हे इतिहासावरूनच वारंवार सिद्ध झाले आहे..
अराजक !...
... माणसांच्या मनावर जंगली, असंस्कृत, पाशवी वृत्तीचा पगडा, आणि, आत्मघात!!
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अवघड असतं, असं म्हणतात... इथे तसंच होतंय.
कित्येक वर्षांपासून ह्या भविष्याचे भान द्यायचा प्रयत्न सुरू आहे, तरीही आपण जागे होत नाही, म्हणजे, हे झोपेचं निव्वळ सोंग आहे...
+++ +++ +++
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले... देशभरात सगळ्याच राज्यांची विधिमंडळ अधिवेशनेही याच काळात ‘संपन्न’ झाली. देशाच्या संसदेचे अधिवेशनही नुकतेच संपले...
या दरम्यान, सगळीकडे या समस्येवर ‘सोपस्कारापुरती’ चिंताही व्यक्त झाली, आणि या समस्येचे वास्तव सामोरे आणणारी सरकारी आकडेवारीही जाहीर झाली...
... ह्या आकडेवारीतला तथ्यांश लक्षात घेतला, तर, आज दर हजार पुरुषांमागे जवळपास साडेआठशे स्त्रिया असे प्रमाण आहे.
म्हणजे, आपल्या ‘विवाहसंस्कृती’ला आव्हान देणारी धोक्याची घंटा अजून वाजतेच आहे...
‘माणुसकी’च्या व्याख्येला काळीमा लावणारा भविष्यकाळ यातून डोकावतोच आहे...
उद्याच्या अंधाराचे सावट दाट होते आहे...
... हीच ती समस्या आहे.
आता ही समस्या लपून राहिलेली नाही. तरीही, रूढी-परंपरांचा पगडा आपली मानगूट सोडत नाहीये.
... मेल्यानंतर मुलाने अग्नि दिला नाही, तर आत्म्याला शांति मिळत नाही, असे म्हणतात... आजवर याच समजूतीमुळे अनेक आत्म्यांना स्वर्गप्राप्ती झाली असेल...
पण अनेक घरांच्या ‘कुलदीपकां’नी ही समजूत खुंटीला टांगली आहे...
म्हणून दक्षिणेकडे, केरळसारख्या श्रीमंत, सुशिक्षित राज्यात, मुलाने ‘गल्फ’मधून पाठविलेल्या भक्कम पैशांच्या पुंजीवर पश्चिमेकडे झुकलेली असंख्य जोडपी चांगल्या अर्जाच्या वृद्धाश्रमांत दक्षिणेकडे डोळे लावून ‘बोलावण्या’ची वाट पाहात जगताहेत...
मुलगाच हवा, ह्या समजुतीत, तीन दशकांपूर्वीच्या कुटुंब कल्याणाच्या धडक मोहिमेची भर पडल्यानंतर स्त्री-पुरुष लोकसंख्येतील विषमतेची समस्या आता चटके देऊ लागली आहे.
चीनमध्ये, लोकसंख्या नियंत्रणाच्या अशाच धडक मोहिमांनंतर आता युवकांपेक्षा वृद्धांची संख्या तिथे वाढली आहे, असे तेथील आकडेवारी सांगते...
भारतात, या मोहिमेला समजूत, रूढींची जोड मिळाल्याने, मुलगा झाला, की कुटुंब परिपूर्ण झाल्याचे समाधान लाखो कुटुंबानी मिरविले...
आता तेच समाधान समस्येच्या रूपने थैमान घालू लागले आहे...
... पण, कोणत्याही चुकीची दुरुस्ती होऊ शकते, असे प्रगत विद्न्यान आज अस्तित्वात आहे.
म्हणजे, संगणकाच्या भाषेत, एखादी कृती ‘अन-डू’ केली, की त्याची दुरुस्ती होते.
मुलगा हवाच, अशी समजूत रूढ करणार्‍या आपल्या संस्कृतीलादेखील आपल्या या चुकीची जाणीव झाली होती.
म्हणूनच, `बेटी म्हणजे धनाची पेटी' असा समजही रूढ करण्याचा प्रयत्न संस्कृतीने केला असावा. पण तो रुळला नाही...
हे आपल्या संस्कृतीचे कदाचित अपयश असेल...
+++ +++ +++
दोन वर्षांपूर्वी, ८ मार्च २००८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमिताने आखलेल्या एका सप्ताहाच्या समारोपाला, दिल्लीत महिला -बालकल्याण मंत्रालयाने स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर एक परिषद आयोजित केली होती. स्त्री भ्रूणहत्येचे चिंताजनक वाढते प्रकार समाजाला कुठे घेऊन जातील, याचे एक भयंकर चित्र या परिषदेत पुन्हा मांडण्यात आले, आणि देशव्यापी जनजागृती करण्याचे पुन्हा एका ठरले. स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, करमणूक क्षेत्र, धार्मिक-अध्यात्मिक गुरू, वैद्यकीय व्यावसायिक, सर्वांनी या मोहिमेत झोकून द्यावे, अशी गरज तेथे पुन्हा उच्चारली गेली...
+ ग्रामीण भागापेक्षा, शहरी, सुशिक्षित भागात गर्भलिंग चाचणीचे प्रकार अधिक असल्याचे या परिषदेत अधिकृतपणे स्पष्ट झाले...
+ पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथे स्त्री-पुरुष प्रमाणातील विषमता सर्वाधिक असल्याची माहितीही पुन्हा सामोरी आली...
+ अगोदर एक मुलगी असेल, तर दुसरी मुलगी होऊ देण्याची मानसिकता ४४ टक्के लोकांमध्ये नाही, हेही स्पष्ट झाले...
+ झपाट्याने घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणातून, महिलांचा लैंगिक छळ, शोषण, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, महिलांची तस्करी, आणि, महिलांना अनैतिक व्यवसायात ‘ढकलले’ जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली...
... या सर्वांतून, एक धोका पुन्हा समोर आला आहे.
समजा, देशात, दर एक हजार पुरुषांमागे सुमारे साडेआठशे स्त्रिया असे विषम प्रमाण राहिले, तर त्याचा अर्थ, दर एक हजार पुरुषांमागे, दीडशे पुरुषांना विवाह नाकारला जाईल...
... भारताची लोकसंख्या अब्जावधी असल्याने, विवाह नाकारल्या गेलेल्यांची संख्या काही कोटींमध्ये असेल...
कदाचित, या समस्येतून मानसिक आजार, विकार बळावतील, आणि संस्कृतीच्या चौकटीत त्यावर कोणताच उपाय नसेल... मग अनैतिकता हीच संस्कृती होईल...(?)
... या भविष्याची चाहूल आजच लागली आहे, तरीही आपण निर्धास्त आहोत..
का?
+++ +++ +++
... परवाच्या एका बातमीमुळे हे सगळं डोक्यात भिणभिणायला लागलं...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधीजींच्या गुजरातेत, ‘धवल क्रांती’चा नारा घुमला, आणि दुग्धोत्पादनातून राज्याला समृद्धी येते, याचा सक्षात्कारही झाला. आता, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी गुजरात झपाटले आहे...
त्यासाठी गायींची संख्या वाढविली पाहिजे... म्हणजे, गायींची पैदास वाढविली पाहिजे...
त्यावर सरकारने एक उपाय शोधलाय.
गायींची गर्भलिंग चाचणी करण्याचा!!
यापुढे, गायीच्या पोटात मादीचा गर्भ असेल, तरच तो गर्भ जन्म घेईल...
नाहीतर?...
.... मागे, निवडणुकीच्या निमित्ताने रिपोर्टींग करण्यासाठी मी विदर्भात खेडोपाडी फिरलो... आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या व्यथा ऐकल्या, अनुभवल्या...
पंतप्रधान पॆकेजमधून गायींचे वाटप झाले, तेव्हा ‘यंत्रणे’ने कालवडी काढून घेतल्या, आणि नर जातीची वासरे दुभत्या गायींसोबत वाटली...
आपल्या पोटचा जीव पैशाच्या लोभापायी हिरावून घेतल्या गेलेल्या त्या गाय़ीनी परकी बाळे जवळ केलीच नाहीत, आणि दूध द्यायचे नाकारले...
यातून दोन संकटे ओढवली...
एक म्हणजे, आत्म्हत्याग्रस्तांची कुटुंबे उपाशीच राहिली,
दुसरे, कित्येक गायी आपल्या पोटच्या बछड्यांपासून दुरावल्या...
यातून दुसरे काय होणार?...
तर, मूळ मुद्दा, गुजरातेत आता गाय-बैलांच्या जन्मदरातही जाणीवपूर्वक विषमता आणण्याचा प्रयोग होणार आहे...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच राज्यात, माणसांच्या मुलींचा जन्म नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे...
इथे माणसाच्या मुलींना बंदी, आणि जनावरांच्या नरांना बंदी...
म्हणजे, जिथे गायी स्वीकरल्या, तिथे मुली मात्र नाकारल्या जातायत..
हा दुटप्पीपणा आला कुठून?
पैसा !!
माणसाने ‘बेटी ही धनाची पेटी’ हा समज माणसाच्या बाबतीत नाकारला, आणि जनावरांच्या बाबतीत स्वीकारला...
खरे?
---------------------------------------------------------
.

3 comments:

Anonymous said...

खूप खूप गंभीर समस्येला हात घातलास आणि ते गांभीर्य, त्यातलं क्रौर्य, किळस यावी अशी स्वार्थी मानसिकता सगळ पुरेपूर पोचलं. 'गोमाता' हे आपल्या संस्कृती मधलं पवित्र प्रतिक. तिच्या पोटातल्या 33 कोटी देवाना आपण डोळे मिटून मानतो, आणि त्याच पोटातल्या गर्भाची निर्घृण हत्या करायला मागे पुढे पाहत नाही. अधः पतनाला फक्त वेग असतो, दिशा नसते हेच खर. याला ब्लोग व्यतिरिक्त देखील प्रसिद्धी मिळाली पाहिजे. पेटा सारख्या सौन्स्था कदाचित या बाबतीत प्रस्थापितांना challenge करू शकतील; अस तुला वाटत का?

Naniwadekar said...

गुणे साहेब : ज्यांना भाऊ नाही आणि एकच बहीण आहे वा ती देखील नाही अशा अनेक ३०-४० वर्षांच्या बाया आज़ दिसतात. तेव्हा एका विशिष्ट वर्गात आज़ स्त्रियांना दुय्यम लेखण्याची समस्या नाहीच. हे लोक (विशेषत: स्त्रिया) इतर अनेक बाबतीत भम्पक असतात, त्यांच्यातले पुरुष तर बायकांपेक्षाही जास्त बायकीपणा करतात आणि गुरु दत्तचे रडके सिनेमे पाहून रडत बसतात, पण या एका मुद्‌द्‌यावर आज़ भरपूर जागृती आहे आणि स्त्रीगर्भहत्या हा प्रकार त्यांच्यात नाहीच.

ज़े लोक स्त्रीगर्भाची हत्या करतात त्यांच्याविषयी शहरी लोकांना फार कमी माहिती असते. मला स्वत:ला त्या वर्गाबद्‌दल काहीही माहिती नाही. असं असताना एकदम त्यांच्यावर टीका करायला माझी जीभ कचरते. एका रानटी रुढीचं समर्थन करायचा माझा विचार नाही, पण तुम्ही पोपला विचाराल तर तो सांगेल की कुटुम्बनियोजन हीच रानटी पद्‌धत आहे, जी अनेक भावी गर्भांची जन्माआधीच हत्या करते. सन्दर्भ बदलला, भूमिका बदलली की आपली मते खूप वेगळी होऊ शकतात. आज़ अनेक घरांत स्त्री ही एक प्रकारे भार असते. निदान तशी भावना आहे. ती दूर केली तर हा प्रश्न आपोआप नाहीसा होईल. प्रगत देशांत हा प्रश्न नाहीच, तसा तो भारतातूनही नाहीसा होईल.

दुसर्‍या लेखांत तुम्ही माधवराव मुळ्ये यांची माहिती दिली आहे, त्याबद्‌दल आभार. अनेक लोकांची ओळख मला त्यांच्या मृत्युची बातमी वाचून झाली आहे. मुळ्ये त्यांतलेच एक. त्यांना बाळासाहेब देवरसांनी एका भाषणात श्रद्‌धांजली वाहिली तेव्हा आम्हाला कळलं की असे कोणी होऊन गेले म्हणून. आणि लता ज़शी महाराष्ट्राची आहे तसे गोळवलकर गुरुजी नागपूरचे आहेत, बरं का. आम्ही गोळवली वगैरे काही ज़ाणत नाही.

Anonymous said...

पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या वारसा कायद्यामुळे असे घडते. हिंदू कॊटुंबिक मालमत्ता कायद्याने परिस्थिती आणखी बिघडविली आहे.