Sunday, September 8, 2019

बिगरी ते डिगरी (२)

भोंदे शाळेत का. वि. सावंत नावाचे हेडमास्तर होते. जेमतेम पावणेपाच फूट उंचीचा हा माणूस समोर दिसला, की मुलांची अक्षरशः फाटल्यागत व्हायची. जाम कडक वाटायचे. पण आम्ही त्यांना अधूनमधून हसतानाही पाहिले होते. त्यांना एक सवय होती. सिगरेटची! शाळा सुरू असताना ते मधेच कधीतरी शाळेच्या मागे भिंतीजवळ जाऊन सिगरेट ओढून यायचे. ते आम्ही पाहायचो. पण सिगरेट ही मुलांच्या देखत ओढण्याची वस्तू नाही, हे त्यांना माहीत होते. ते तसे करत त्यामुळे आम्हालाही ते कळले. सावंत गुरुजी सिगरेट ओढतात हे आम्हाला माहीत होते, पण मुलांनी ते करू नये म्हणून ते शाळेमागे जाऊन घाईघाईने सिगरेट ओढून परत येतात, यावरून सिगरेट ओढणे वाईट हा संस्कार आमच्या बालमनावर तेव्हा झालाच! हे गुरुजी मला आजही जसेच्या तसे आठवतात. कारण, माझ्या डोक्याचा लहान मेंदूकडचा भाग... जेव्हाजेव्हा माझा हात डोक्याच्या त्या बाजूला जातो, तेव्हातेव्हा तिथे कधीतरी झालेल्या एका स्पर्शाच्या आठवणी जाग्या होतात, आणि तो स्पर्श आपला आयुष्यभर पाठलाग करणार हे जाणवून सावंत गुरुजी आठवतात...
ती एक गमतीदार कहाणी आहे. आमच्या वर्गातलाच एक मुलगा- आम्ही आणि सगळेच जण त्याला दादा म्हणायचो- एकदम हिरो होता. त्या काळात त्याच्या मनगटावर चकचकीत पट्ट्याचे घड्याळ असायचे. गळ्यात वाघनखाची सोन्याची चेन, कधीकधी डोळ्यावर गॉगल, मस्त सजवलेली हरक्युलस सायकल, दप्तराची पत्र्याची पेटी असा त्याचा थाट होता. तो आपोआपच सगळ्यांचा हिरो, लीडर झाला होता.
दर शनिवारी शाळेचा वर्ग आणि बाहेरचा पॅसेज सारवायचे काम मुलांना करावे लागायचे. एका शनिवारी आमच्या वर्गाची पाळी असताना, आम्ही शेण गोळा करायला पत्र्याच्या तीनचार बादल्या काठीत कडी अडकवून पालखीसारख्या नाचवत गावाबाहेरच्या रानात गेलो. तिथे गुरं चरायला यायची. त्यामुळे शेण मुबलक सापडायचे. तर, त्या रानात गेल्यावर चार बादल्या शेण गोळा करून झाडाखाली बसलो असताना अचानक दादाने खिशातून काही पेेनं बाहेर काढली. आणि प्रत्येकाच्या हातावर एकएक पेन ठेवलं. आमचे डोळे विस्फारले. वर्गातल्याच मुलांची कधी ना कधी पेनं गायब व्हायची. कुणी तक्रारीही करत. पण चोर कधीच सापडत नसे. आज एवढी पेनं दादाच्या खिशात पाहून ते कोडं सुटलं होतं. आणि त्याचा भागीदार करून घेण्यासाठी दादाने एकएक पेन आमच्या हाती दिलं होतं. क्षणभरासाठी छातीत धडधड झाली. आपण करतोय ते चांगलं काम नाही, हेही जाणवलं. ही चोरी उघड झाली तर आपण पकडले जाऊ अशी भीतीही वाटू लागली. आम्ही दादाला तसं सांगितलं, आणि पेनं परत करू लागलो. पण दादानं डोळे वटारले. आता पेनं घेतली नाहीत, तर दादाची चोरी सगळ्यांना कळणार होती. दादाला ते माहीत होतं. म्हणून त्याने सगळ्यांच्या हातात बळेच पेन कोंबलं, आणि चोरी लपविण्याची एक युक्तीही सांगितली. पेनला तेल-हळद लावली की त्याचा रंग बदलतो. मग मूळ मालकाला ते पेन आपले आहे हेही कळत नाही... दादाने सांगितलेली ही युक्ती भन्नाट होती. ती करून पाहावी यासाठी तरी पेन घ्यावे असे वाटून मी ते पेन खिशात ठेवलं, आणि धडधडत्या छातीने वर्गात परतलो. त्या दिवशी पेन जपतच आम्ही वर्ग सारवले. शाळा सुटली. घरी गेलो, आणि आईकडून एका वाटीत गोडेतेल घेतले. त्यात चमचाभर हळद घातली, आणि चोरीचा रंग बदलण्यासाठी हळूच मागच्या पडवीत गेलो. तिथे पेनावर तेलहळद लावली, आणि आश्चर्य... काही सेकंदातच पेनाचा मूळ रंग पुरता बदलला होता... आता आपल्याला हे पेन राजरोस वापरायला हरकतच नाही, असे समजून मी ते पेन दप्तरात ठेवले.
सोमवारी शाळेत गेलो, तेव्हा काहीजण पेन हरवल्याच्या तक्रारी सावंत गुरुजींकडे करत होते. वर्गात वातावरण काहीसे तंग वाटत होते. सावंत गुरुजींनी शांतपणे तक्रारी ऐकून घेतल्या. मागे जाऊन एक सिगरेट ओढली, आणि ते परत आले. एकएक मुलास दप्तर ओतण्याचा आदेश झाला. माझी पाळी आली. मी प्रचंड विश्वासाने दप्तर मोकळेही केले. ते रंग बदललेले पेन खाली पडले, आणि ज्याचे पेन होते, त्याच्या नजरेत संशय उमटला... पण मी घाबरलो नाही... सावंत गुरुजींनी पेन उचलले. त्याचे टोपण उघडले, आणि त्यांचे डोळे चमकले. मग मात्र मी घाबरून गेलो. टोपणच्या आतल्या बाजूला तेलहळद लावायची राहूनच गेली होती. माझी चोरी, आणि रंग बदलण्याचे दादाचे तंत्र, दोन्हीचा पर्दाफाश झाला होता...
मग अपेक्षेप्रमाणे, सावंत गुरुजींना मला बकोटीला धरलं. वर्गासमोर उभं केलं, आणि घंटा वाजवायचा टोल लाकडी हातोडा हाती घेऊन टणाटणा माझ्या डोक्यात लहान मेंदूच्या बाजूला प्रहार करण्यास सुरुवात केली. शाळा सुटली तेव्हा डोक्यावर दोनचार टेंगळं उगवली होती. नंतर दोन दिवस तिथे हात गेला, की वेदनेची सूक्ष्म जाणीव व्हायची, आणि चोरी करणे वाईट हा धडा आणखीनच पाठ व्हायचा...
आजही, डोक्याच्या मागच्या बाजूला हात गेला, त्या जागी स्पर्श झाला, की, चोरी करू नये हा लहानपणी मिळालेला धडा पक्का आठवतो, आणि सहाजिकच, सावंत गुरुजीही आठवतात...
मोठा झाल्यावर मी सिगरेट ओढू लागलो होतो. पण मोठ्या माणसांसमोर आणि लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये, हे मी लहानपणीच शिकलो होतो. त्याचे श्रेयदेखील त्यांचेच!... ते शाळेमागे जाऊन मुलांच्या नजरेआड सिगरेट ओढतात, हे दिसायचे, तेव्हा, लहान मुलांसमोर सिगरेट ओढू नये हाच संदेश त्यांना द्यायचा असावा, हे आम्हाला लहानपणीच कळले होते.
आता मी सिगरेट ओढत नाही. पण मुलाबाळांदेखत सिगरेट ओढणारा कुणी पाहिला, की मला शाळेमागे जाऊन सिगरेट ओढणारे सावंतगुरुजी आठवतात...

No comments: