Friday, December 20, 2019

शास्त्रीय संगीताचं शास्त्र!

मला शास्त्रीय संगीतातलं शास्त्र मुळीच कळत नाही. पण सूर, ताल आणि तान यांचा कानाशी बसणारा आनंददायी मेळ अनुभवणे हा एक आनंद असतो एवढं कळतं, आणि या अनुभवापुरते कुणाचेही कान तयार असतात. माझेही आहेत असा माझा समज आहे.
एखाद्या शांत रात्री, लांबवर शहरातील दिव्यांच्या माळा लुकलुकताहेत, आकाश चांदण्यांनी गच्च भरलं आहे, गारवा भरलेल्या वाऱ्याची मंद झुळूक आसपास विहरते आहे, अशा तन्मय वातावरणात असे काही सूर कानावर पडणे हा एक अमृतानुभव असतो...
आत्ता मी तो अनुभवतोय!
पण अचानक मिठाचा खडा जिभेवर यावा असं काहीतरी वाटून गेलं.
कौशिकी चक्रवर्ती आणि महेश काळे यांची जुगलबंदी !
‘कानडा राजा पंढरीचा’...
दोघांच्या स्वरांच्या जादूने मन भारून गेले असतानाच, ‘हा नाम्याची खीर चाखतो’ या ओळीवर दोघांनीही सुरांच्या लगडी उलगडण्यास सुरुवात केली.
नाम्या या एका शब्दाभोवती तानांच्या गिरक्या सुरू झाल्या, आणि मला वसंतराव देशपांडेच्या काही मिनिटांपूर्वी पाहिलेल्या मुलाखतीतील किस्सा आठवला... ‘मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली’ हे गाणं आळवणाऱ्या गायिकेस जणू ‘शिमला’ दाखवावयास निघाले आहेत, असे वाटावे अशा रीतीने गाण्यातला तो शब्द ‘दाखवावया शिमला’ असा तोडल्यामुळे गंमत झाली, पण दर्दी श्रोते गायकाचा अधिकार मान्य करून ती गंमतही एन्जाॅय करतात हे सांगतानाच वसंतरावांनी गाण्यातले शब्द सुरांच्या सोयीसाठी तोडण्यामुळे होणाऱ्या गंमतीचे बहारदार किस्से या मुलाखतीत कथन केले. ‘रूपबली तो नरशा’ हादेखील सुराच्या सोयीचाच एक आविष्कार!...
नाम्या... नाम्या... नाम्या या शब्दाभोवतीच्या ताना ऐकताना मला तीच मुलाखत आठवलीच, पण पुढच्या ओळीमुळे चोखोबाही आठवला. मग, आमच्या गावातल्या एका हौशी कलाकाराने गायिलेल्या एका अभंगाचा कसा ‘चोथा’ झाला होता, तो प्रसंग आठवूनही मी स्वत:चीच करमणूकही करून घेतली.
त्या मैफिलीत चोखा मेळ्याचा अभंग तो गात होता, आणि श्रोते उगीचच दाद देत होते. गायक रंगात आला होता...
अभंगात, ‘चोखा म्हणे माझा, विठ्ठल विसावा’ वगैरे काहीतरी ओळ असावी. गायक तिथवर आला, आणि दाद मिळताच, ‘चोखा म्हणे माझा’शी रेंगाळला... ताना, गिरक्या फिरक्या मारत, पुन्हापुन्हा, ‘चोखा म्हणे माझा’ या ओळीशी रेंगाळू लागला, आणि काही मिनिटांनंतर श्रोते कंटाळले...
‘अरे पुढे बोल’... म्हणत एका रसिकाने ठेवणीतली कमेंट मारली, आणि मैफलीत ‘हास्यरंग’ उसळला!
नाम्या... नाम्या..., ना... म्या..., ना...म्या’ ऐकताना उगीचच तो प्रसंग आठवला.
म्हणून म्हणतो, अस्सल संगीतातले शास्त्र कळत नसलं की काहीही ‘खटकू’ शकतं कानाला.
... महेश काळे आणि कौशिकी चक्रवर्तीची ती ‘कानडा राजा पंढरीचा’ जुगलबंदी नक्की ऐका, आणि ‘नाम्या’भोवतीच्या ताना आणि फिरक्या कानाला कशा वाटल्या ते नक्की सांगा!

No comments: